सामाजिक कार्यकर्तृत्वाची तिसरी माळ
पहिली अभिनेत्री : 'कमलाबाई कामत'
'कमलाबाई कामत' यांचा जन्म ६ सप्टेंबर १९०१ रोजी कलाप्रेमी कुटुंबात झाला होता. कमलाबाई यांचे वडील उत्तम किर्तनकार होते. तर आई दुर्गाबाई कामत या
सतारवादन करायच्या.
२० व्या शतकात भारतामध्ये चित्रपट श्रुष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याकाळी आपल्या समाजामध्ये प्रबोधानाचे मुख्य साधन होते ते संगीत नाटक. वैविध्यपूर्ण विषय, सजीव अभिनय, या गोष्टी खऱ्या अर्थाने समाजामध्ये करमणुकीचे आणि प्रबोधनाची माध्यमे होत्या. मात्र चित्रपट असो वा नाटक त्याकाळी मोठी उणीव जाणवायची ती स्त्रियांच्या पात्रांची.
अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी त्याकाळी स्त्रिया पुढे येत नव्हत्या. त्यामुळे स्त्री भुमिकाही पुरुष साकारत होते. १९१३ साली चित्रपट युग सुरु झाले ते 'राजा हरिश्चंद्र' चित्रपटापासून. या बोलपटाच्या यशानंतर दादासाहेब फाळकेंचा 'मोहिनी भस्मासुर' या मुकपटाचा प्रयोग सुरु झाला होता. आपल्या बोलपटांमध्ये स्त्री पात्र हे स्त्री कलाकारांनी साकारावीत यासाठी दादासाहेब फाळके आग्रही होते. त्याच वेळी कमला कामत नावाच्या लहान मुलीचं नाव त्यांना सुचवण्यात आल. घरची परिस्थिती बेताची असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा तसंच जत्रांमधून कामं करायला सुरुवात केली. आणि याच माध्यमातून त्यांनी संवाद,संगीत आणि अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुढे याचाच फायदा त्यांना मूकपट तसेच संगीत नाटकांतील अभिनयासाठी झाला. दादासाहेब फाळकेंच्या मोहिनी भस्मासुर या मुकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंची निवड करण्यात आली. या चित्रपटात पार्वतीची भूमिका साकारून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. आणि पुढे कमलाबाईच्या रुपाने चित्रपट श्रुष्टीला एक स्त्री अभिनेत्रीचा चेहरा मिळाला. कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांनी या मूकपटात पार्वतीच्या छोट्या भूमिकेच काम केल. ११८ वर्षापूर्वी आजच्या दिवशी
'या' पहिल्या महिला अभिनेत्रीचा जन्म झाला होता.
कमलाबाईनी साकारलेल्या भूमिकेचं सर्व स्तरातून स्वागत झालं आणि पुढे
दिवसेदिवस त्यांचा अभिनयाची कमान वाढतच गेली.
पुढे अनेक मुकपटांमधून त्यांनी परिपूर्ण भूमिका साकारुन स्त्री कलाकारांना एका अर्थाने या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहनच दिले. अनेक नाटकांमध्ये कमलाबाईंनी प्रमुख भूमिका साकाराल्या होत्या. चित्ताकर्षकचे मालक राजाभाऊ गोखले यांच्याबरोबर कमलाबाई कामत यांनी विवाह केला आणि त्या कमलाबाई गोखले झाले. कमलाबाईंनी 'मनोहर स्त्री संगीत मंडळी' नावाची संस्था स्थापन केली. या नाटक कंपनीत पुरुषांची पात्र स्त्रियाच सादर करत. 'पेशव्यांचा पेशवा' या ऐतिहासिक नाटकातली त्यांची आनंदीबाईची भूमिका, 'सौभद्र' मधील सुभद्रा व अर्जुन, 'मानापमान' मधील धैर्यधर (पुरुषपात्र) या व्यक्तिरेखा तर गाजल्याच पण विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या नामवंत लेखकांच्या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रत्येक व्यक्तिरेखेला जिवंतपणा प्राप्त करुन दिला. तब्बल २०० पेक्षा ही अधिक नाटकं, मुकपट त्यासोबतच कारकिर्दीत ३५ पेक्षाही अधिक चित्रपटांतून नायिका तसेच स्त्रीप्रधान भूमिकांमुळे कमलाबाई गोखले कायमच लक्षात राहतात. चाळीस वर्ष या क्षेत्रासाठी योगदान दिल्याबद्दल, त्यांचा वयाच्या ७० व्या वर्षी दिलीपकुमार यांच्या हस्ते सत्कार झाला. विक्रम गोखले यांच्या रुपात आज कमलाबाईंची तिसरी पिढी त्यांचा अभिनयाचा वारसा चालवत आहे. कमलबाईंची आई दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटातील पहिल्या नायिका मानल्या जातात. रघुनाथराव व कमलाबाई या दांपत्याचे चंद्रकांत हे पूत्र. तर चंद्रकांत यांचे पुत्र म्हणजे विक्रम गोखले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या ‘संगीत उ:शाप’ या नाटकात कमलाबाईंची भूमिका होती. तेव्हापासून गोखले घराण्याच्या तिन्ही पिढ्या या सावरकरांच्या विचारांच्या अनुयायी आहेत. कमलाबाई यांना २५ व्या वर्षी वैधव्य आले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात अबला, त्याचप्रमाणे लष्करातील सैनिक यांना आपल्या परीने जेवढी मदत किंवा सहकार्य करता येईल तेवढे केले होते.
कमलाबाई यांच्याकडून हा वसा पुत्र चंद्रकांत यांनी घेतला. चंद्रकांत हे दरवर्षी एक लाख रुपये, युद्धात परावलंबी झालेल्या सैनिकांना देत असत. त्यासाठी त्यांनी बँकेत काही रक्कम ठेवली होती. चंद्रकांत यांचे पुत्र विक्रम यांनी २५ वर्षांपूर्वी आपली आजी कमलाबाई यांच्या नावाने ट्रस्ट स्थापन केला. या माध्यमातून ते आदिवासी मुलांच्या कल्याणासाठी कार्य करतात. त्याचप्रमाणे अपंग मुलांच्या पुनर्वसनासाठीदेखील काही मदत दिली जाते. कैद्यांसाठीही त्यांनी सेवाकार्य केले आहे. अभिनेत्री कमलाबाई कामत-गोखले यांचे १८ मे १९९७ रोजी निधन झाले.
रवींद्र मालुसरे
९३२३११७७०४
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने पुरुषसत्ताक भारतीय समाजातील हाडामांसाच्या वास्तव दुर्गा-अंबांच्या अमर्याद, जीवघेण्या तीव्र संघर्षांच्या कथा "माळे"च्या रूपात "पोलादपूर अस्मिता"त सादर करण्याची आपली कल्पकता आपल्या निडर, बुद्धिनिष्ठ, अभ्यासू वृत्तीची जाणीव करून देणारी असून ती अत्यंत कौतुकास आणि सन्मानास पात्र आहे. कमलाबाई कामत यांच्या रूपात आपण देवी दुर्गेस समर्पित केलेली ही "तिसरी माळ" ही सुगंधी आणि आकर्षक बनली आहे. आपले अभिनंदन!
उत्तर द्याहटवा- अशोक सावंत
संपादक: समुद्र, हेलोसखी
खूपच छान माहिती दिली धन्यवाद मालुसरेजी
उत्तर द्याहटवा