पोलादपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोलादपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

पोलादपूर-महाड : शौर्याची परंपरा




पोलादपूर-महाड  : शौर्याची परंपरा

- रवींद्र मालुसरे

गडकिल्ले आणि दुर्गम दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला पोलादपूर - महाड तालुका हा रणभूमीवर लढणाऱ्या प्रसंगी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचा. पूर्वीचा कुलाबा आणि सध्याचा रायगड जिल्हा हा सुभेदार नरवीर तानाजी -  सूर्याजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे यांच्यापासून शूरवीरांचा जिल्हा आहे. या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाल्यानंतर तेव्हापासून विरांना प्रसवणारी ही भूमी आजपर्यंत शौर्याने तळपत आहे.

शिवकाळात, पेशवाईत, ब्रिटिश काळात व देश स्वातंत्र्य झाल्यानंतर वेळोवेळी या दोन्ही तालुक्यातील अनेक वीर पुरुषांनी पराक्रम केला व आपल्या नावाची व अद्वितीय पराक्रमाची नोंद इतिहासाच्या पानापानावर करून ठेवली आहे. आमचा साखर गाव तर या देव, देश, व धर्म कार्यात नेहमीच अग्रेसर राहात आला.  शिवकाळात सुभेदार तान्हाजी - सूर्याजी मालुसरे, पहिल्या जागतिक महायुद्धात सुभेदार भाऊराव मालुसरे तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सेनानी अंबाजीराव मालुसरे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नाना पुरोहित यांच्या सोबत स्वातंत्र्य सेनानी सखाराम चोरगे, बिठोबाअण्णा मालुसरे यांनी सहभाग घेतला. मालुसरे कुटुंबासह साखर गावाचा हा मोलाचा सहभाग आमचा ऐतिहासिकदृष्ट्या वारसा सांगणारा आणि समाजातल्या पुढच्या पिढीला ऊर्जा देणारा आहे...

पहिल्या महायुद्धाच्या काळात म्हणजे १९१४-१८ या काळात साखर खडकवाडीचे सुभेदार भाऊराव मालुसरे हे परभूमीत मेसोपोटेमियाच्या मोहिमेत धारातीर्थी पडले. मेसोपोटेमियाच्या मोहिमेत म्हणजे आजचे इराक, सीरिया हे देश तसेच इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेय कडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमिया मध्ये समावेश होतो.  पंजाब आणि अन्य पाच 'मरहट्टा' बटालियन' यांनी मिळून युद्धाला तोंड दिलं होतं. मेजर जनरल चार्ल्स टाऊनशेंड यांच्या नेतृत्वाखालील सहाव्या पूना डिव्हिजनचा भाग असलेली पाचवी रॉयल 'मरहट्टा' ही या पाचांपैकी एक.ही लढाई नोव्हेंबर १९१५ पासून एप्रिल १९१६ पर्यंत चालली होती. या काळात सैन्याची रसद आधी निम्मी झाली, मग पाव झाली आणि शेवटी तर स्वतःचं खेचर मारून खा, नाहीतर उपाशी मरा अशी वेळ आली. मराठा लढवय्यांनी खेचराचं मांस खायला साफ नकार दिला. तेव्हा मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शाहू महाराज यांनी तारेनं आपल्या सैन्याला कळवलं की, "खाण्यापिण्याच्या निर्बंधाविषयी असलेल्या मोठ्या अंधश्रद्धांपेक्षा जीव वाचवणं हे अधिक महत्त्वाचं आणि आवश्यक आहे." अखेर उपासमारीनं दमलेल्या खंगलेल्या, संख्याबळ कमी झालेल्या डिव्हिजनला शरणागती पत्करावी लागली. सर्व शूर अधिकारी आणि जवान तुर्की फौजेचे युद्धकैदी बनले. तुर्की छावणीत भारतीय युद्धकैद्यांच्या कष्टांना सीमा नव्हती. इराकी वाळवंटातून पायपीट करत त्यांना सिरियापर्यंत नेलं गेलं आणि सिरिया ते तुर्कस्थान हा रेल्वेमार्ग बांधण्याच्या कामावर त्यांना जुंपलं गेलं. कित्येकांचा बंदिवासात छळ झाला. आजारपण, उपासमार यांनी खंगून कित्येक जण मृत्युमुखी पडले.ब्रिटिश साम्राज्यासाठी, स्वतंत्र जगाच्या निर्मितीसाठी भारतातल्या विशेषतः पंजाब आणि महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांनी परक्या भूमीवर आपल्या पलटणीखातर बलिदान दिलेलं आहे. ते जगले ते 'नाव', 'निशाण', 'इमान', (नमक), 'परंपरा' (दस्तुर) आणि 'इज्जत' यांच्यासाठी आणि त्यांनी देह ठेवला तोही त्यासाठीच. महाड-पोलादपूर तालुक्याच्या खेड्यापाड्यांतली लढवय्यी आणि काटक परंतु साधी, नेक, कष्टाळू अनेक जणांनी त्यावेळी हौतात्म्य पत्करले. त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने राणीची मुद्रा असलेले  नंतर त्यांना पंचधातूचे एक शौर्य पदक त्यांच्या कुटुंबियांना सन्मानाने दिले होते. HE DEAD FOR FREEDOM & HONOUR - BHAU MALUSARE 

मराठ्यांना लढवय्येपणाची परंपरा आहे. मेसोपोटेमियाची मोहीम ही त्यांच्या या कीर्तीला साजेशी युगप्रवर्तक आणि इतिहासावर आपली मोहोर उमटवणारी होती. त्यांचं शौर्य, धैर्य, चापल्य आणि अत्यंत खडतर परिस्थितीतही पहिल्या महायुद्धात चिवटपणे झुंजण्याचं सामर्थ्य या त्यांच्या गुणांचा गौरव म्हणून या रेजिमेंटला लाइट इन्फन्ट्री (Light Infantry) हा किताब मिळाला.

भारताला खूप मोठा इतिहास आहे. ब्रिटिश येण्यापूर्वी भारताला अशी काही सीमा नव्हती. खरं तर देश म्हणून असं वेगळं स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. तर अनेक राजे, बादशहा, सरदार हे आपल्या राज्य विस्ताराकरता लढत होते. स्वसंरक्षण करत होते. मात्र १८५७ च्या पहिल्या लढाईनंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिशांनी भारतीय भूखंडाची सत्ता ताब्यात घेतली आणि खऱ्या अर्थाने भारताला सीमारेषा प्राप्त झाली, ओळख मिळाली. दक्षिण आशियात आपलं स्थान बळकट रहावं यासाठी ब्रिटिशांनी शास्त्रोक्त पद्धतीने संरक्षण दलाची उभारणी सुरू केली आणि 'भारतीय सैन्य' म्हणून संरक्षण दलाला चेहरा प्राप्त झाला.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक उच्च पदवी घेऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे. भविष्यात ऐशआरामी जीवन जगण्यासाठी परदेशात जाणाऱ्या युवकांची संख्याही वाढत आहे.  परंतु महाड - पोलादपूर हे शूरवीरांची परंपरा जपणारे तालुके व प्रत्येक गावातील एक तरी तरुण सैन्यात पाठवून आपली देशसेवेची परंपरा आजही अनेक गावात टिकून आहे. या दोन्ही तालुक्यांनी देशाला हजारो सैनिक तर दिलेच परंतु मातृभूमीसाठी बलिदान देणा-यांमध्येही ते मागे राहिले नाहीत.

सैन्यातील नोकरी आता बिकट होऊ लागली आहे. सीमोपलिकडे वाढणाऱ्या हालचालीं बरोबरच अंतर्गत आव्हानेही वाढली आहेत. अशा स्थितीत सैन्यातील नोकरी अनेक जण टाळतात परंतु मृत्यु समोर आहे हे माहित असुनही त्यात स्व:ताला झोकून देणारे अनेक जण या दोन्ही तालुक्यात दिसतात.

ज्यांच्या हाती आपलं आयुष्य सोपवून आपण देशात निर्धास्त राहत असतो अशा तालुक्यातील आंर्मी इतिहासाचा धांडोळा घेत तालुक्यातील अनेक योध्यांची दखल या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न मी करीत आहे. लढवय्या ही अस्मिता असलेल्या तालुकावासीयांना हे वाचायला नक्की आवडेल व स्फूर्तिदायक ठरेल अशी खात्री आहे. याचे कारणही महत्वाचे आहे  ते असे की, दि मराठा लाईट इन्फन्ट्रीचं बोधचिन्ह आहे 'कर्तव्य, सन्मान आणि धाडस' (Duty, Honour and Courage) तेही मला तितकंच प्रिय आहे.परिश्रम, सचोटी, निष्ठा आणि दैव या तत्वांवर विश्वास ठेऊन अनेकजण सैन्यदलात भरती झाले त्याप्रमाणे- 

सुभेदार नरवीर तान्हाजी - सूर्याजी मालुसरे यांच्या कुळाचा वारसा सांगणारे आमच्या साखर गावातील नायक पंढरीनाथ तुकाराम मालुसरे हे भारतीय सैन्यदलात देशसेवा करण्यासाठी६ मराठा लाईफ इन्फंट्री बेळगाव मध्ये भरती झाल्यानंतर २२  वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्त झाले आहेत, बेळगाव, जम्मू काश्मीर(सांभा), नॉर्थ सिक्कीम, नॉर्थ ईस्ट सिक्कीम, पुणे, जम्मू काश्मीर(आखनूर ), पश्चिम बंगाल, न्यू दिल्ली, मध्य प्रदेश, साऊथ सुदान देश, खंजळवान गुरेझ सेक्शन, पठाणकोट या ठिकाणी त्यांनी आपली ड्युटी बजावली. विशेषत: जम्मू काश्मीरमध्ये सांभा येथे (२००४ ), नॉर्थ सिक्कीम बंकर येथे (२००६ )नॉर्थ ईस्ट सिक्कीम लांचूग येथे (२००७ ), जम्मू काश्मीर आखनूर येथे (२०१२ ), युनायटेड नेशन-दक्षिण आफ्रिका येथे साऊथ सुदान (२०१७ ),जम्मू काश्मीर खंजळवान गुरेझ सेक्शन येथे (२०१९ ) या ठिकाणी झालेल्या सैन्यदलाच्या महत्वाच्या ऑपरेशन मध्ये त्यांना कामगिरी बजावता आली.

नायक पंढरीनाथ मालुसरे हे सैन्यदलातील निवृत्तीनंतर मंगळवार, दिनांक १०  सप्टेंबर २०२४  रोजी सकाळी ११  वाजता आपल्या जन्मभूमीत साखर गावात येत आहेत. साखर गावातील सर्व आबाल-वृद्धाना याचा अत्यंत आनंद होत आहे. याप्रित्यर्थ गावाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत होत आहे. साखर ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलेल्या स्वागत कार्यक्रमास तालुक्यातील सर्व समाजबांधव सुद्धा अगत्याने उपस्थित राहात आहेत यालाही महत्व आहे.

लष्कराच्या समूहात, गणवेशाच्या आवरणाखाली स्वतःचे व्यक्तिगत अस्तित्त्व हरवून धैर्याने, शौर्याने भारताचे सर्वार्थाने संरक्षण करून, समाजाकडून काहीही अपेक्षा न ठेवणाऱ्या भारतीय सैन्यातील वीर जवान जेव्हा आपल्या गावात येईल तेव्हा प्रत्येक सैनिकास, कृतज्ञतापूर्वक त्याचे स्वागत करण्यासाठी एकत्र पुढे सामोरे जायला हवे याचा चांगला पायंडा निर्माण होणे यानिमित्ताने गरजेचे आहे. साखर गावातील यापूर्वी नारायण रामचंद्र मालुसरे, पांडुरंग तांदळेकर, सुधीर चोरगे, शशिकांत खैरे, प्रदीप मारुती मालुसरे आणि पंढरीनाथ तुकाराम मालुसरे यांनी भारतीय सैन्यदलात देशसेवा केली आहे.  साखर गावाची ही  मोठी असाधारण कमाई म्हणावी लागेल.

आपल्या तालुक्यातील बहुसंख्य जवान हे पायदळात असतात. इन्फंट्री अथवा पायदळ हा सेनादलाचा प्रत्यक्ष सरहद्दीवर शत्रूशी आमने-सामने लढणारा विभाग. शत्रूवर हे पायदळाचे लोक चढाई करतात तेव्हा तोफखाना व रणगाडा तुकड्या त्यांना साहाय्य करतात. भारतातील सीमेचा खूप मोठा भाग असा आहे की, जिथे रणगाडे जाऊच शकत नाहीत. तर हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांमुळे तोफखान्याला मर्यादा पडते. अशा ठिकाणी सर्व मदार पायदळावरच असते. चढाई करताना एक संघ किंवा तुकडी असणे आवश्यक असते, म्हणून पायदळाची रचना पूर्वीपासून वेगळी आहे. पायदळ हे अनेक रेजिमेंटस् (अथवा विभाग) मध्ये विभागले गेले आहे. काही पलटणी खूप जुन्या आहेत. मराठा रेजिमेंटच्या १ मराठा, २ मराठा ह्या अडीचशे वर्षे जुन्या पलटणी आहेत.  एका भागातल्या लोकांची भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी सारख्या असतात. त्यांच्या राहण्याच्या पद्धतीत साम्य असते. त्यांचे सणवार, रीतिरिवाज, देवदैवते एक असतात. ह्या गोष्टी दिसायला लहान असल्या, तरी त्याने बराच फरक पडतो. 'शिवाजी महाराज की जय' ह्या आरोळीने मराठा जवानाला जेवढी 'स्फूर्ती' मिळेल तेवढी शीख जवानाला मिळणार नाही, तर 'सत् श्री अकाल' म्हटल्यावर त्यांना जेवढे स्फुरण चढेल तेवढे इतर कुणाला चढणार नाही. वरून छोट्या वाटणाऱ्या ह्या गोष्टींची पाळेमुळे अशी खोलवर रुजली आहेत.










हे मरहट्टे मोठे शूर, कडवे आणि चिवट असतात. म्हणून तर त्यांना त्या युद्धात 'लाइट इन्फन्ट्री' हा किताब मिळाला." शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांना लढवय्येपणाची परंपरा आहे. मराठा सैनिकांना पूर्वी 'गणपत' म्हणायचे. पहिल्या महायुद्धाच्या काळात Frankfurter Zeitung मध्ये एका जर्मन सैनिकाचं पत्र प्रसिद्ध झालेलं आहे. त्यात भारतीय सैन्याच्या शौर्याचं वर्णन त्यानं असं केलेलं आहे

फौजी आंबवडे गावाचा इतिहास :

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची परंपरा जपणारे गाव प्रत्येक घरातील एक तरी तरुण सैन्यात पाठवून आपली देशसेवेची परंपरा आजही टिकून आहे. फौजी आंबवडे गावाने देशाला हजारो सैनिक तर दिलेच परंतु मातृभूमीसाठी बलिदान देणा-यांमध्येही ते मागे राहिले नाही.

सैन्यातील नोकरी आता बिकट होउ लागली आहे. सीमोपलिकडे वाढणा-या हालचालीं बरोबरच अंतर्गत आव्हानेही वाढली आहेत. अशा स्थितीत सैन्यातील नोकरी अनेक जण टाळतात परंतु मृत्यु समोर आहे हे माहित असुनही त्यात स्वतला झोकून देणारे अनेक जण फौजी आंबवडे गावात दिसतात. फौजी आंबवडे गाव २३  लहान वाड्यांमध्ये वसलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात येथील अनेक कुटुंब होती. कान्होजी आंग्रे यांच्या आरमारातही काहींनी गुप्तहेरांची जबाबदारी पार पाडली होती. गावातील या पराक्रमाची साक्ष वतनदारी सनदीचे कागद व मानाची पंचधातूची तलवार गावात देत असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुमारे ४०० वर्षांचा इतिहास असलेले महाड तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या फौजी आंबवडे या गावाचा इतिहास आजदेखील संपूर्ण देशाला प्रेरणादायी व आदर्शवत राहिला आहे. गावातील प्रत्येक घरातील एक तरुण आज भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत आहे. आजघडीला या गावाची लोकसंख्या सुमारे ४ हजार आहे. १९१४  मध्ये झालेल्या पहिल्या महायुद्धात या गावातील १११  सैनिकांनी सहभाग घेतला. पैकी सहा जवान शहीद झाले होते. या १११  मधील १०५  जवान मायदेशी परतले. दुस-या महायुद्धात २५०  तरुणांनी भाग घेतला त्यातील ७०  जणांना वीरगती प्राप्त झाली.एकाच दिवशी २१  धारातीर्थी पडल्याच्या तारा गावात आल्याचे वृध्द व्यक्ती सांगात. या युद्धाचे प्रतीक म्हणून तत्कालीन ब्रिटिश सरकारने शहीद जवान स्मारक गावात उभे केले. ते आजही स्फूर्ती देत आहे.

सहा पिढ्यांपासून शौर्य परंपरा

१९४२  चा रणसंग्राम, १९६०  संयुक्त महाराष्ट्र, १९६२  चीनचे युद्ध, १९६५  भारत-पाक युद्ध, १९७१ चे युद्ध व १९९९  च्या कारगिल युद्धामध्येदेखील फौजी अंबवडे गावच्या सुपुत्रांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याची साक्ष भारतीय सैन्य दलातील ऐतिहासिक दस्तऐवजांमधून पाहावयास मिळते. भारत पाकिस्तान, बांगला देश युद्धातही या गावातील अनेक सुपुत्रांनी शौर्य गाजवले. या गावचे शहीद सुभेदार रघुनाथ गणपत कदम १९६५ च्या युद्धामध्ये जम्मू-काश्मीर येथे लढत असताना शहीद झाले, त्याचप्रमाणे २००३  यावर्षी मनोज रामचंद्र पवार यांना लेह लडाख भारत-पाक सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झाली. या वीरांची आठवण म्हणून त्यांच्या नावाने समाधी स्मारक गावात उभारण्यात आले असून, ते पुढील पिढीला प्रेरणादायी ठरले आहे. १९८०  मध्ये महाराष्ट्र सरकारने या गावाचे नामांतर 'फौजी आंबवडे' असे केले. आज या गावामध्ये माजी सैनिकांची संख्या पाचशेच्यावर असून आज भारतीय सैन्यात १००  पेक्षा जास्त तरुण कर्तव्य पार पाडत आहेत. आज या गावातील सैन्यात दोनशे जण सेवेत आहेत तर एकशे बारा निवृत्त झालेले आहेत. तरुण वर्ग सैन्य भरतीत कायम पुढे असतो. प्रत्येक घरातील एक जण सैन्यात आहेच. भारतीय सैन्यात अगदी शिपायापासून ते कॅप्टन पदापर्यंत गावातील अनेक जवानांनी पदे भूषवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. मनोहर रखमाजी पवार यांना तसेच काहीना त्यांच्या कामगिरीबद्दल सेनापदकेही मिळालेली आहेत. या गावातील तरुण शिक्षण कोणतेही घेतील परंतु सैन्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही असे माजी सैनिक कृष्णा पवार यांनी सांगितले. या गावातील 





फौजी अंबवडे गावचे सुपुत्र निखिल निवृत्ती कदम हा युवक तर सध्या लेफ्टनंट या पदावर भारतीय सैन्यात आहे.



महावीरचक्र प्राप्त सुभेदार कृष्णा सोनावणे :

कृष्णा सयाजी सोनावणे यांचा जन्म पोलादपूर तालुक्यातील कुडपण या गावी झाला. ७नोव्हेंबर १९४१ रोजी ते भूसेनेत दाखल झाले. १६फेब्रुवारी१९४८ रोजी शत्रूने नौशेराच्या सर्व ठिकाणी एकाच वेळी चौफेर हल्ला चढविला. त्यांपैकी ७ क्रमांकाच्या एम.एम.जी. चौकीवर शत्रूच्या सुमारे बाराशे जणांनी जोरदार हल्ला केला. कृष्णा सोनावणे यांच्या ताब्यात ही चौकी होती. हल्लेखोरांनी अगदी जवळून आपल्या बंदुका चालविल्या. हल्लेखोरांचे गट चौकीवर एकसारखे हल्ले करू लागले.

     नाईक कृष्णा सोनावणे यांनी आपल्या पथकाला आपली शांतता ढळू न देता मारा चालू ठेवण्याचे आदेश दिले आणि शत्रूची मोठी हानी करणे चालू ठेवले. या चकमकीत क्रमांक एकचा बंदूकधारी मानेवर गोळी लागून जखमी झाला. नाईक सोनावणे यांनी स्वत: ती बंदूक चालविण्यास सुरुवात केली. हे करीत असताना शत्रूच्या गोळ्यांनी त्यांच्या उजव्या हाताची चाळण झाली. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी जीवाची तमा न बाळगता डाव्या हाताने बंदुकीचा मारा चालू ठेवला. त्यांच्या चौकीचे भवितव्य दोलायमान स्थितीत असताना त्यांनी लढा चालूच ठेवला. त्यांची बंदूक नंतर नादुरुस्त झाली. अशा परिस्थितीत त्यांनी डाव्या हाताने हातगोळा फेकून व आपल्या सैनिकांनाही तसे करण्याचा आदेश देऊन लढा जारी ठेवला. अशा प्रकारे शत्रूची जबरदस्त हानी करून त्यांनी हल्ला परतवून लावला. अशा प्रकारे धैर्य व निर्धार दाखवून कठीण प्रसंगातही थंड डोक्यानेे कर्तव्यनिष्ठा बजावली आणि दोन तासांच्या अतिशय निकराच्या व बिकट प्रसंगात आपल्या सहकार्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या कृतीमुळे शत्रूचे सातशेहून अधिक सैनिक ठार झाले व महत्त्वाचे ठाणे वाचविणे शक्य झाले. या कार्याबद्दल त्यांना ‘महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले.

वाकण गावचे कॅप्टन आनंद रामजी साने हे १९६२ च्या लाईट इन्फ्रंट्री मराठा रेजिमेंट मध्ये देशसेवेच्या ध्येयाने  दाखल झाले होते. १९७१मध्ये झालेल्या पाकिस्तानच्या युद्धात सरहद्दीवर शत्रुसैन्याशीं प्रतिकूल परिस्थितीत झुंज देऊन अतुलनीय कामगिरी करून शौर्याचे दर्शन घडवले होते, त्याबद्दल त्यांना तत्कालीन राष्ट्रपतींकडून सन्मानित केले होते. 

पूर्वीचा कुलाबा आणि सध्याचा रायगड जिल्ह्यातील अनेक वीर जवानांनी रणभूमीत पराक्रम केला व आपल्या नावाची, पराक्रमाची नोंद इतिहासात करून ठेवली आहे. ब्रिटिश काळापासून सैनिकी पेशातील महाड-पोलादपूर मधील ज्या वीरांनी लढताना वीरमरण पत्करले त्यांची यादी -

(१) सयाजी गणपत जाधव - १८ जून १९४२ दुसरे जागतिक महायुद्ध - खडपी ता. पोलापूर

(२) देऊ दाजी सकपाळ - २१ मे १९४२ - भारत पाकिस्तान युद्ध - धामणेची वाडी - पोलादपूर

(३) गणपत राघोबा सालेकर - १९ नोव्हेंबर १९६२ - भारत चीन युद्ध - मोरसडे - पोलादपूर

(४) अनाजी धोंडू चव्हाण - १८ डिसेंबर १९६२ - भारत चीन युद्ध - फणसकोंड कोंढवी - पोलादपूर

(५) बाबुराव विठ्ठल जाधव - १२ सप्टेंबर १९६५ - भारत पाकिस्तान युद्ध -  पळसुले - पोलादपूर

(६) गणपत पार्टे - २६ नोव्हेंबर १९७१ -     भारत पाकिस्तान युद्ध -  तुर्भे बुद्रुक - पोलादपूर

(७) सखाराम गोविंद लाड - ३ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  उंदेरी - महाड

(८) लक्ष्मण गमरे - १० डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  पार्ले  - पोलादपूर

(९) यशवंत रामचंद्र गावंड - १४ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  वाघेरी - महाड

(१०) गणपत गोपाळ कळमकर - १४ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  वाकी - महाड

(११) नथुराम गोविंद कासारे - १६ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  नातोंडी - महाड

(१२) सुडकोजीं दगडू जाधव - १७ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  वरंध - महाड 

(१३) सुरेश गुणाजी भोसले - १५ डिसेंबर १९८७ - ऑपरेशन मेघदूत -  लोहारे - पोलादपूर

(१४) सुरेश दगडू सुतार - १३ मे १९८८ - ऑपरेशन रक्षक - मांडला - पोलादपूर

(१५) प्रकाश अर्जुन सावंत - १५ ऑगस्ट १९९३ - ऑपरेशन रक्षक - दिवील - पोलादपूर

(१६) विश्वनाथ रामजी कोरपे - ११ डिसेंबर १९९४ - ऑपरेशन रक्षक - पुनाडे - महाड

(१७) नामदेव दगडू पवार - २१ सप्टेंबर १९९९ - ऑपरेशन मेघदूत - धामणे - महाड

(१८) तानाजी हबाजी  बांदल - ४ मे २००१ -  ऑपरेशन पराक्रम - चिखली - पोलादपूर

(१९) मनोज रामचंद्र पवार - २१ फेब्रुवारी २००३ - ऑपरेशन पराक्रम - फौजी आंबवडे - महाड

(२०) सुभेदार भरत अमृत मोरे - ९ मे २००३ - ऑपरेशन पराक्रम - कोंढवी - पोलादपूर

(२१ ) लक्ष्मण महादेव निकम  - ९ मे २००३ - ऑपरेशन पराक्रम - कोंढवी - पोलादपूर

(२२) ६ जून २००९ राकेश तात्याबा सावंत -  सावंत कोंड - पोलादपूर

(२३) १ सप्टेंबर १९२१ पोलादपूर तालुक्यातील लोहारे गावातील भुमीपुत्र श्री धीरज साळुंखे

(२४) २ ऑक्टोबरला २०२२ महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावचेराहुल आनंद भगत

(२५) १२ मे २०१८ महाड तालुक्यातील शेवते गावातील प्रथमेश कदम

 


रवींद्र तुकाराम मालुसरे

अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

 

हा लेख वाचल्यानंतर कृपया ९३२३११७७०४ यावर प्रतिक्रिया द्याव्या.



 इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


गुरुवार, ६ जून, २०२४

पोलादपूर तालुक्यातील ऐत्याहासिक दस्ताऐवज









पोलादपूर तालुक्यातील ऐत्याहासिक दस्ताऐवजाचा मागोवा . 

आज राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजाभिषेक दिन, जग जिंकता येऊ शकते हा आत्मविश्वास या मातीला मिळाला, तो रुजला तो आजचा दिवस. पोलादपूर तालुक्यातील मावळे या शुभ कार्यात राजांच्या सोबत होते. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे (उमरठ), सुभेदार सूर्याजी मालुसरे (साखर), नरवीर मुरारबाजी देशपांडे (किंजळोली), गोदाजी जगताप (सांदोशी) अशा अनेकांनी प्राणाची आहुती देत शिवरायांना मोलाची साथ दिली होती याची नोंद अनेक बखरकारांनी घेतली आहे. प्रतापगड ते रायगड या दरम्यानच्या भूभागाने शिवाजी राजांना स्थैर्य दिले. बारा मावळातील वतनदारांचे वर्तन स्वराज्याच्या कामी सहकार्याचे आणि भेदाभेद करणारे आहे हे स्वराज्याचे तोरण बांधताना लक्षात आल्यावर,महाराजांनी राजगड आणि पुणे परिसर सोडून घनदाट जावळीतील अरण्याचा आसरा घेतला नाही तर स्व-राज्य स्थापन करण्याचे मातोश्री जिजाऊंचे स्वप्न पूर्ण होणार नाही हे महाराज जाणून होते. इतिहासाचा धांडोळा घेत असताना मला एक प्रश्न निर्माण झाला होता, गेल्या शेदीडशे वर्षांत अनेकांनी पाहिलेली अन अनुभवलेली बलदंड आणि धिप्पाड शिवाय अचाट ताकदीची माणसे त्यातील काही तर दंतकथांचे नायक झाले. मग साडेतीनशे वर्षांपूर्वी  शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या घोड्यांच्या टापांणी आणि तलवारीच्या खणखणाटाने निनादलेला या भूभागाचा इतिहास कुठेतरी असणारच आणि तो कसा सापडेल ? अलीकडे काही महत्वाची कागदपत्रे आणि माहिती मिळाली. आजच्या राजाभिषेकदिनाच्या त्यानिमित्ताने हे विवेचन आपल्यासाठी - 

बाळाजी आवाजी चिटणिसांचे घराणे म्हणजे चित्रे घराणे. (अधिक तपशील याच ब्लॉगवर दुसऱ्या पूर्वीच्या लेखात वाचा) या इतिहासकालीन घराण्याचा सेवा व लौकिक गेले साडेतीन शतके प्रसिद्ध आहेच. चित्रे घराणे देवळे, विन्हेरे, कोंढवी, पोलादपूर, देवास इत्यादी ठिकाणी नांदत होते. कालपरत्वे या घराण्यातील काही पुरुषांची आडनांवेही बदलली आहेत. मध्यप्रदेशातील देवासचे चित्रे आपणास देवळेकर म्हणवितात. देशपांडेपणाचे वतन चालविणारे काही चित्रे मंडळी देशपांडे झाली आहेत. काहीजण आपणास कोंढवीकर म्हणवितात. पोलादपूर तालुक्यातील देवळे गावातील 'रावजी गोविंद चित्रे' यांच्या दप्तरात अनेक ऐत्याहासिक कागदपत्रे, सनदा  ज्येष्ठ इतिहास संशोधक शांताराम गोवळसकर यांना सापडली होती. परंतु आता ती कुठे आहेत हे चित्रे मंडळींना माहित होत नव्हते. त्याचाच मागोवा या लेखात घेऊया.

२५ एप्रिल ते ४ मे १८१८ दरम्यान रायगडला ब्रिटिशांच्या सैन्याचा  वेढा पडल्याची बातमी कांगोरी, सावित्री खोऱ्यातील  व प्रतापगड येथे पोहोचली तेव्हा या भागातील जे सातारा गादीशी म्हणजे छत्रपती प्रतापसिंहराजे शाहूराजे भोसले यांच्याशी एकनिष्ठ होते असे मावळ्यांच्या वंशजांचे मराठा सैन्य रायगडच्या मदतीसाठी शस्त्रास्त्रे घेऊन धावले. पोटल्याच्या डोंगराकडून कर्नल प्रॉथर आपला मोर्चा रायगडवर लागू करणार होता; त्याच्या पिछाडीस मराठी सैन्य येऊन उतरले. पण महाड येथे संरक्षणार्थ ठेवलेल्या लेफ्टनंट क्रॉस्बी यांच्या तुकडीने या सैन्याचा समाचार घेतला; त्यामुळे  मराठ्यांची मदत रायगडास पोहोचणे अशक्य झाले. लेफ्टनंट क्रॉस्बी याने या परतलेल्या सैन्याबरोबर पोलादपूर येथे लढाई पुकारत  सैन्याचा सामना केला. कमी संख्येने असलेल्या  मराठा सैन्याने झुंज दिली पण हिंदुस्थानी सैन्यच सोबत घेऊन लढणाऱ्या क्रॉसब्रीने त्याचा बीमोड केला व रायगडच्या वेढ्याबाबतचा धोका पूर्ण नाहीसा करून टाकला, दुसऱ्याच दिवशी रायगडावरचा भगवा ध्वज उतरला गेला आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला. त्यानंतर रायगडाच्या परिसरापुरते बोलायचे झाले तर ब्रिटिश राजवट सुरु झाल्यानंतर १८१८ पासून १८५७ पर्यंत संपूर्ण क्षात्रतेज देशभर झाकोळले गेले होते. गडकिल्ले ओस पडले आणि ज्या ताकदवान मनगटानी समशेरी पेलल्या होत्या त्यांनी आपल्या समशेरी घराच्या आड्याला खोचुन ठेवल्या तर काहींनी त्याचे नांगराचे फाळ बनवून  पोटापाण्यासाठी शेतीवाडी करू लागले. मात्र नंतर १८६५ च्या सुमारास ज्योतीबा फुले रायगडावर गेले होते, पडझड झालेला किल्ला, घनदाट अरण्य आणि सर्वत्र वाढलेले गवत यातून शिवरायांची समाधी त्यांनी हुडकून काढली, आणि तेथे स्फूर्ती घेऊन शिवाजी महाराजांवर त्यांनी एक मोठा पोवाडा केला. तो पुढे १८६९ मध्ये प्रसिद्ध केला. नंतरच्या काळात १८८५ च्या सुमारास गोविंद आबाजी वसईकर जोशी हे महाडचे गृहस्थ रायगडावरील समाधीची अवस्था पाहून आले आणि त्यांनी सरकारचे आणि मराठी माणसाचे दुर्लक्ष होत आहे हा वाद निकराने लढवला, त्यांनी यावर एक सविस्तर पुस्तकही लिहिले. दरम्यान पुण्यात महादेव गोविंद रानडे आणि तेलंग यांनी सभा भरवून याबद्दल लोकजागृती केली. या सगळ्याच्या एकत्रित परिणामाने सरकारचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीच्या व्यवस्थेसाठी सरकारकडून पैसेही मंजूर करून घेतले गेले. टिळकांनी २ जुलै १८९५ साली 'शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबद्दल सूचना' अशा शीर्षकाचा लेख केसरीत लिहिला. लोकांच्या सहभागातून शिवाजी महाराजांच्या समाधीचे काम होणे किती आवश्यक आहे हेच यातून पटवून दिले. या सगळ्याचा परिणाम असा झाला की शिवरायांच्या स्मारकासाठी एक विशेष समिती तयार झाली. अर्थात त्यात टिळकांचा समावेश होताच. समाधीच्या प्रश्नापासून ते पहिला-वहिला शिवजयंती उत्सव सुरु करेपर्यंत टिळकांनी स्वतः प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत लक्ष घातले.  हळूहळू वातावरण तापत चालले होते, शिवाजी महाराज हा विषय आणखी पुढे येईल या हेतूने टिळक प्रयत्नशील होते. महाराजांची समाधी रायगडावर असल्याने हा रायगड या निमित्ताने चर्चिला जाऊ लागला होता. मग शिवजन्मोत्सव रायगडावरच का साजरा होऊ नये ? टिळकांच्या मनातला प्रश्न त्यांना खूप काही सांगून जात होता. शिवजयंतीची सुरुवात रायगडावरून झाली तर त्याचे भविष्यात होणारे परिणाम टिळकांसारख्या द्रष्ट्या नेत्याला दिसत होते. मात्र ते सोपे नव्हते. न. र. फाटक त्यांच्या टिळक चरित्रात लिहितात, “उत्सवाचे ठिकाण रायगड. तो सरकारी जंगलखात्याच्या ताब्यात. डोंगराच्या खालील रानाप्रमाणे डोंगरावरदेखील रानच होते. त्यावेळी ओसाडी आणि ऐतिहासिक इमारतींची पडझड... याने गडाची अवस्था भयाण व दुर्गम झाली असल्यास नवल वाटायला नको. रायगडावर उत्सव करायचे ठरवले जरी असले तरी ते सोपे अजिबात नव्हते. महाड हाच मोठ्या वस्तीचा गाव. रायगडावर शिवजयंतीचा पहिलावहिला उत्सव कसा साजरा झाला, याची आठवण मूळचे महाडचे परंतु पुण्याला स्थायिक  काळकर्ते शिवरामपंत परांजपे यांनी लिहिली आहे. पंत लिहितात, “लोकमान्य त्या छावणीमध्ये आल्यानंतर रात्रभर तेथे विश्रांती घेतील आणि नंतर ते पहाटेस गड चढून वर जातील अशी पुष्कळांची साहजिकच कल्पना होती. पण, हा कार्यक्रम अविश्रांत श्रम करण्याची सवय असलेल्या लोकमान्यांच्या उत्साही धडाडीला मुळीच पसंत पडला नाही. त्यांनी संध्याकाळचा फराळ झाल्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर रात्रीच्या रात्री गडावर चढून जाण्याचा व तेथे पोहोचून मग झोप घेण्याचा निश्चय ठरवला. त्यांच्याबरोबर जी मंडळी पहाटेस उठून वर जाणार होती, त्या लोकांनीही लोकमान्यांच्याच समागमामध्ये रायगडावर चढून जाण्याची तयारी चालवली. अशा रीतीने शेकडो लोक इतक्या रात्री रायगड चढून जाण्याचे धाडस करण्याला लोकमान्यांच्या उद्दीपक उदाहरणामुळे उद्युक्त झाले. लगेच शेकडो मार्गदर्शक मजुरांनी आपल्या चुडी पेटवल्या. ओझेवाल्या मजुरांनी आपल्या पाहुणे मंडळींचे बोजे आपल्या डोक्यावर घेतले आणि चार-पाच लोकांच्या दरम्यान एकेक चुडवाला मनुष्य असा रीतीने जवळजवळ चार-पाचशे लोक एकेक माणसांची रांग चढून करून चालू लागले. शेकडो चुडी पेटलेल्या असून त्यांची लांबच लांब अशी एक रांग डोंगरातील वळणे घेत घेत वरवर चढत असलेली पाहून तळच्या छावणीमध्ये असलेल्या लोकांना हा डोंगरातील देखावा फारच मनोवेधक भासला. त्यातच ‘श्री शिवाजी महाराज की जय’ आणि ‘टिळक महाराज की जय’ अशा रणगर्जना त्या गडावर होऊ लागल्या आणि त्यांचे प्रतिध्वनी त्या गडाच्या दर्‍याखोर्‍यातून उत्पन्न होऊ लागले. त्यावेळी हा सारा रायगड किल्लाच त्या चुडीच्या उजेडामध्ये स्वदेशभक्तीने प्रज्वलित होऊन स्वराज्यसंस्थापनेची भाषा बोलू लागला आहे की काय असा भास झाला.”  

शिवजयंतीचा पहिलावाहिला उत्सव दोन दिवसांचा होता. पहिल्या दिवशी टिळकांचे समारोपाचे भाषण जोरदार झाले.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणे हे राष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक आहे, असाच टिळकांच्या बोलण्याचा सूर होता. दुसर्‍या दिवशी आलेले लोक गडावर हिंडले, फिरले, गडाची अवस्था त्यांना जाणवली, आपल्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देणारा गड जो काहीसा एकाकी पडला होता, त्याला पुन्हा नव्याने उर्जितावस्था आणावी, याची जाणीव कुठेतरी गडावर हिंडताना लोकांना झाली असावी. “उत्सवाच्या निमित्ताने तीन हजार लोकांच्या पंगती रायगडावर उठल्या,” असे तर टिळकांनीच लिहिले आहे. भोजनानंतर आख्याने, कीर्तने झाली. शिवछत्रपतींच्या कार्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचे सध्या हयात असलेले वंशज त्यांचाही या पहिल्यावहिल्या उत्सवाच्या निमित्ताने २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे.  

प्रतापगड किंवा रायगड किल्ल्यांना भेट देणारे शिवप्रेमी पोलादपूर तालुक्यातील तान्हाजी मालुसरे आणि शेलारमामा यांची समाधी असलेल्या उमरठ आणि साखर गावात असलेल्या सूर्याजी मालुसरे समाधी यांना भेट देतात. मुळातच जावळी ते राजधानी रायगड व बिरवाडीपर्यंत पसरलेला हा सह्याद्रीचा दुर्गम खोरा शिवकाळापूर्वीपासून ऐत्याहासिक किल्ले, माची, वाटा, खिंडी, घळई यांनी स्थापित असाच आहे. उंचच उंच डोंगर आणि दुर्गम झाडी असे निसर्गरम्य वरदान या भागाला लाभलेले आहे. प्रतापगड, चंद्रगड, कांगोरीगड, कोंढवी हे किल्ले, महादेवाचा मुरा, सडे गावातील चौक, बोरावळे गावातील जावळीकर मोऱ्यांपैकी एका बंधूंचा दगडी वाडा, पाच खिंड, तुर्भे खिंड, पारघाट, श्रीरामवरदायिनी-कापडे, बिरवाडी, महाड बंदर अशी अनेक ऐत्याहासिक स्थळे शिवकाळाच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. असे असले तरी इतिहासाचे कागदोपत्री पुरावे इतिहास संशोधकांच्या समोर येत नव्हते. ब्रिटिशांचे दडपण असल्यामुळे महाराष्ट्रभर  बरेचसे कागद अडगळीत टाकले गेले होते. ग्रांट डफ, इतिहासाचार्य राजवाडे, यदुनाथ सरकार, रामकृष्ण भांडारकर, बिरवाडीचे दत्तो वामन पोतदार, गोविंद सखाराम सरदेसाई इत्यादी इतिहासाचा धांडोळा घेणारे महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात फिरू लागले. त्यामुळे अनेक ठिकाणी गोण्यांच्या मध्ये किंवा इतस्ततः कोंबून ठेवलेले पत्रव्यवहाराचे कागद, सनदा बाहेर येऊ लागले. बिरवाडी, वाळण बुद्रुक, वरंध,  महाड मधील  आणि पोलादपूर मधील देवळे येथील महत्वाचे कागद इतिहासाच्या अभ्यासकांना उपलब्ध होत नव्हते.  चित्र्यांचा मूळपुरुष श्रीरंग प्रभू. त्याला पिलाजी आणि रामाजी असे दोन मुलगे होते. त्यांच्या दोन शाखा झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी चित्रे हे दुसऱ्या शाखेतील रामाजींचे नातू. तर पोलादपूर चित्र्यांची शाखा पिलाजीपासून सुरु होते. 

शांताराम आवळसकर हे महाडच्या परिसरात शिक्षक असताना त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रे जमविण्यास सुरुवात केली. त्या विषयाची आत्यंतिक गोडी निर्माण झाल्याने तो त्यांच्या अध्ययन - संशोधनाचा विषय झाला होता. कागदपत्रांचा शोध घेत हिंडणे, जुनी दप्तरे पाहणे, ऐतिहासिक कागदपत्रांच्या नकला करणे, त्या पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाकडे पाठवणे, अन्य संशोधकांबरोबर चर्चा करणे, संशोधित कागदपत्रांना विवेचक प्रस्तावना लिहिणे या प्रकाराची कामे ते करत असत. भारत इतिहास संशोधक मंडळाशी १९४० पासून त्यांचा संबंध आला होता.  गतेतिहासाचा शोध घेत असताना राजकीय घटनांच्या अन्वयार्थाबरोबरच तत्कालीन भौगोलिक,आर्थिक, सामाजिक संदर्भ परिश्रमपूर्वक ध्यानात घेत आवळसकरांनी आपली संशोधनदृष्टी किती सूक्ष्म, चौफेर, व्यापक आणि विश्लेषक बनवली होती. त्यामुळे त्यांना वाळण बुद्रुक येथील तुकाराम झुरू कालगुडे (२४ ऑक्टोबर १६४३ / १० जानेवारी १६४५ / १७ ऑगस्ट १६४९ / १६ ऑगस्ट १६४८ आणि देवळे पोलादपूर येथील रावजी गोविंद चित्रे यांच्याकडील (२५ ऑगस्ट १६७६ / ३ ऑगस्ट १६९२ / १५ डिसेंबर १६९४ / २२ ऑक्टोबर १६९८ / २४ जून १७०२ / २ एप्रिल १७०८ / ४ मे १७०८ / २७ फेब्रुवारी १७०९ त्याचप्रमणे वरंध येथील तात्यासाहेब देशमुख यांच्याकडील ३ नोव्हेंबर १६९५ /  ऑक्टोबर १७३३ ही महत्वाची कागदपत्रे सापडली होती. या ठेव्याचा शोध मला लागला. प्रतापगडापासून रायगडापर्यंत घडलेल्या महत्वाच्या घटना म्हणजे  चंद्रराव मोरे, छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या काळातील ठळक नोंदी असलेला हा पत्रव्यवहार आहे. 

 इ.स. १७३४च्या जानेवारी महिन्यात काळ नदीच्या खोऱ्यात पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले. किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचाड मारीत सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास आणि पुढे देवळे येथे पोहोचला. देवळे येथे त्यावेळी चित्रेंचा गवताने शाकारलेला भव्य चौसोपी वाडा होता. सिद्दीने त्यावेळी धनुष्याला आगीचे पलिते सोडून या वाड्यास आग लावली, त्यामुळे बराचसा महत्वाचा दस्तऐवज जळून खाक झाला. मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख-देशपांडे-देसाई ही महत्त्वाची वतने होती. देश म्हणजे परगणा (हल्लीच्या तालुक्याएवढा किंवा मोठा प्रदेश) होय. त्यावर अधिकार गाजवणारी ती विविध वतने असत.  देशमुख म्हणजे देशमुख्य होय. देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत तो सर्वाधिकारी असे. ‘राज्यातील देशमुख आदिकरून यास वतनदार ही प्राकृत परिभाषा मात्र आहे. ते स्वल्पच परंतु स्वतंत्र देशनायकच होते. देशमुखाला समाजात व राजदरबारातही मान असे. देशपांडे हा देशमुखांच्या हाताखालील अधिकारी होय. ग्रामव्यवस्थेत जे स्थान कुलकर्ण्याला, तेच स्थान परगण्याच्या व्यवस्थेत देशपांड्याला असे. परगण्यातील जमाबंदीचे सर्व कागदपत्र देशपांड्याच्या स्वाधीन असत. त्यामुळे चित्रे म्हणजे महाड-पोलादपूर मधील देशपांडे या हुद्द्यावर काम करीत  देशपांड्याला त्याच्या कामाच्या स्वरूपावरून देशकुळकर्णी असेही म्हणत असत. रावजी गोविंद चित्रे हे पोलादपूर येथे राहात. धिप्पाड शरीरयष्टीअसलेले जनमानसावर जरब असलेले रावजी घोड्यावरून पोलादपूर पेठेत फिरत असत. तर देवळे येथे वास्तव्यास असलेल्या कमलाकरदादा चित्रे यांना पाहिलेले अनेक जण आहेत. प्रकांड पंडित आणि लोकांसाठी सहकार्याचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्त्व अशीच त्यांची ओळख होती. चंद्रगड किल्ल्याची वतनदारी त्यांच्याकडे होती. देश स्वातंत्र्य होईपर्यंत 1 रुपया चित्र्यांकडे येत असे आणि तो 16 जण हिश्ह्याने वाटून घेत.

महत्वाचे - कांगोरी किल्ला, मालुसरे, कादवा डोंगर (महिपतगड ), कापडे बुद्रुक,  केवनाळे, कोंढवी तर्फ, कोंढवी कसबा, कोंढवी परगणे, घेरा चंद्रगड, चंद्रगड किल्ला, चंद्रराव मोरे, जावळी सुभा, जोर खोरे, ढवळा घाट, ढवळे मौजे, देवळे, साखर, पारघाट, बालाजी मोरे (चंद्रराव), बिरवाडी, वरदायिनी, वाळण बुद्रुक,  विन्हेरे, शंकराजी गोळे, सिंहगड, हणमंतराव मोरे, हबाजी नाईक उतेकर, हिरोजीराव दरेकर, क्षेत्रपाल यांचा संदर्भ असलेला मला सापडलेला पत्रव्यवहार मी लवकरच या ठिकाणी सर्वांसाठी प्रसिद्ध करतो.  






रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, ९३२३११७७०४


इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


शुक्रवार, २४ मे, २०२४

ज्ञानपंढरीचा वारकरी – वै. श्रीगुरु ह. भ. प. हरिश्चन्द्र महाराज मोरे







ज्ञानपंढरीचा वारकरी – वै. संतचरणरज श्रीगुरु ह. भ. प.  हरिश्चन्द्र महाराज मोरे    



जन्मापासून आयुष्याच्या अंतापर्यंत “लावूनी मृदुंग श्रुतीटाळघोष | सेवू ब्रम्हरस आवडीने ||” हे संत तुकाराम महाराजांचे वचन ज्यांनी सार्थ केले असे पोलादपूरचे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संतचरणरज श्रीगुरु ह. भ. प. हरिश्चन्द्र महाराज मोरे यांचे नुकतेच वैशाख शु. दशमी, शनिवार, दिनांक १८ मे 2024 रोजी देहावसान झाले. आयुष्यभर केलेली ईश्वरआराधना आपल्या चरणी रुजू करण्यासाठी नियती आणि परमेश्वरही इतक्या तातडीने त्यांना वैकुंठात आपल्यापाशी बोलावून घेईल असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. समाजाचे नेतृत्व करणारे आम्ही काही निवडक त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ठाणे येथील रुग्णालयात श्रीगुरु बाबांच्या भेटीला गेलो असताना, ते आमचे हात हातात घेऊन, नेहमीप्रमाणे अत्यंत आपुलकीने आमच्याशी हितगुज साधू लागले. त्यावेळेस आम्हाला अनपेक्षित अशी निर्वाणीची भाषा श्रीगुरु बाबांच्या श्रीमुखातून येऊ लागली. आता माझे कार्य संपूष्टात आले आहे ...यापुढे गुरुवर्य रघुनाथदादांना मी तुमच्याकडे सोपवतो आहे, यापुढे त्यांची आणि समाजाचीही काळजी घ्या...समाजाच्या वतीने चाललेल्या नित्य नैमित्तिक संप्रदायीक कार्यक्रमात खंड पडून देऊ नका." त्यांचे हे अंतरीचे बोल २-४ दिवसात खरे झाले. एकादशी हा वारकऱ्यांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा दिवस. काया-वाचा-मने भगवान श्री विष्णूच्या सानिध्यात राहण्याचा आणि धार्मिक व आध्यात्मिक लाभ प्राप्त करण्याचा दिवस. वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीचा दिवस उगवला.
आपल्या अवतार कार्य समाप्तीची वेळ जवळ आली आहे याची महाराजांना चाहूल लागल्यानंतर त्यांच्या जीवाची घालमेल सुरु झाली. मला एकादशीला बोरजफ़ाटा येथील आश्रमात तातडीने घेऊन चला असा आदेश त्यांनी दिला. मुंबई ते पोलादपूर प्रवास सुरु झाला. गाडीने सावित्री नदीचा पूल ओलांडला... गाडी आश्रमाच्या  समोर उभी राहिली आणि "रामकृष्ण हरी" असा वारकऱ्यांचा मंत्र जपत वयाच्या ७६ व्या वर्षी, वैशाख शुद्ध दशमीला रात्री त्यांनी आपलं अवतार कार्य संपवून देह रूपाने जगाचा निरोप घेतला. एकादशीच्या पवित्र दिवशी देहावर अग्नीसंस्कार झाले. द्वादशी सावडण्याचा ( दूध पाजण्याचा ) विधी पार पडला.
दशमी, एकादशी, द्वादशी हा वारकऱ्याचा पर्वकाळ. संतचरणरज श्रीगुरु बाबांनी हा पर्वकाळ साधला आणि वारकरी संप्रदायला अपेक्षित आपल्या मरणाचा सोहळा करून घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरेंच्या पराक्रमाने, हिंदवी स्वराज्याच्या विचाराने भारलेल्या,  आणि वारकरी परंपरेने समृद्ध पोलादपूर तालुक्यातील दाभीळ या डोंगराच्या कड्याकपारीत, प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सद्गुरू वै. हनुमंतबाबा हे अध्यात्मिक ऐश्वर्य संपन्न महापुरुष. त्यांनीच पोलादपूर, खेड तालुक्यात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ  रोवली. कौटुंबीक जबाबदारी पूर्ण व्हावी म्हणून ते डिलाईल रोडच्या पुलाजवळ गुळवाला चाळीत राहायचे आणि मिलमध्ये नोकरी करायचे. तसे पाहिले तर गरिबीची परिस्थिती परंतु आपल्या मुलाने चांगले शालेय शिक्षण घ्यावे त्याने त्याच्यावर चांगले संस्कार होतील परंतु जगाचे यथार्थ ज्ञान व्हावे आणी आध्यत्मिक संपन्नता साधता यावी यासाठी त्यांनी त्यांच्या शालेय शिक्षणासोबत अध्यमिक ज्ञानांर्जनाकडे विशेष लक्ष दिले त्यामुळे श्रीगुरु बाबांनी त्यावेळी जुनी दहावी पर्यंत शालेय शिक्षण घेतले. आणि वै हनुमंतबाबा यांच्या सानिध्यात अध्यात्मिक शिक्षणाची कास धरली. सद्गुरू हनुमंतबाबा म्हणजे निष्ठावान वारकरी होते तसेच गावागावातील समाजात परमार्थात वाढ व्हावी यासाठी पुढाकार घेणारे, त्यासाठी सातत्याने जनसंपर्क वाढविण्यासाठी प्रयत्नात राहणारे वारकरी होते. साहजिकच महाड-पोलादपूर तालुक्यातील अनेक समाजधुरीण त्यांच्या घरी येत असत. महाराजांच्या समोरच परमार्थाची चर्चा, नवनव्या कार्यक्रमांची आखणी होत असे. त्याचा योग्य तो परिणाम झाला. श्रीगुरु हरिश्चंद्र महाराज तारुण्यातच मोठ्यांचे मार्गदर्शन घेत व लहानांना मार्गदर्शन करत.  अध्यात्म पथावर मार्गक्रमण करीत होते. घरातले भक्तिपूर्ण वातावरण व बाहेर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर नव्या राष्ट्रउभारणीची सुरुवात ते ऐन तारुण्यात अनुभवत होते. सुधारणावाद्यांचे समाजसुधारणा कार्य, पूर्वजांनी अव्याहतपणे शंभर वर्ष चालविलेले धर्मजागरण, संतमत जागरण असे दर्शन आंतर्बाह्य जगात घेत ते त्यावेळच्या पिढीबरोबर वाढत होते.
वडीलधाऱ्या मंडळींची घरातली नित्याची भजने, कामगार विभागात होणारी चक्रीभजने, ज्ञानेश्वरी, भागवत, भगवतगीता,कीर्तन, प्रवचन रूपातली उपासना, वाडवडिलांनी डोळसपणे केलेला संतवाङ् मयाचा अभ्यास व त्याच्या प्रसारासाठी केलेले हिमालयासारखे उत्तुंग कार्य, या सगळ्याच गोष्टींचा बालपणापासूनच महाराजांच्या मनावर ठसा उठला होता, त्यामुळे ' यन्नवे भाजने लग्न: संस्कारो नातिवर्तते । म्हणजे मडक्याच्या ओलेपणात त्यावर झालेला संस्कार बदलत नाही, असे म्हणतात ना ! तसेच झाले. व्यावहारिक जगात रमावेसे त्यांना नको वाटू लागले. त्यामुळे त्यांनी श्रीक्षेत्र अलंकापुरी (आळंदी) गाठली. तिथे त्यांच्या पूर्वपुण्याईने परमपूज्य सदानंद गुरुजींचा सहवास लाभला. श्रीगुरु बाबा आणि सद्गुरू सदानंद गुरुजी यांची जवळीक श्रीगुरु बाबांना अलौकिक अध्यात्मिक श्रीमंती देऊन गेली. त्याची प्रचिती श्रीगुरु बाबांच्या कीर्तन कलेतून अवघ्या महाराष्ट्राने घेतली.  त्याच दरम्याने वै.गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, वै मारुतीबाबा गुरव, ह भ प किसनमहाराज साखरे यांच्या मौलिक मार्गदर्शनाचा लाभही त्यांना झाला. मुळातली विद्याभ्यासाची अभिरूची, त्यात संतश्रेष्ठ ज्ञानराजांच्या पुण्यपावन धर्मक्षेत्री अभ्यासाचा योग, उत्तमोत्तम मार्गदर्शक व घरचाच वडिलांचा विद्या व्यासंगाचा आदर्श, अंत:करणावरचे धार्मिक, सांप्रदायिक संस्कार  यामुळे श्रीगुरु हरिश्चन्द्र महाराजांचे धार्मिक शिक्षण कसदार झाले. वारकरी शिक्षणसंस्थेतील अभ्यासात संस्कृतभाषेचे साधारण ज्ञान आणि साहित्यशास्त्राचे चांगले मार्मिक ज्ञानही त्यांनी मिळविले.  ज्ञानेश्वरी, गीता, सकलसंत गाथा, भागवत,विचारसागर ब्रह्मसूत्र शांकरभाष्य, भामती, सिद्धांतबिंदू, विवरणप्रमेय संग्रह, सर्वदर्शनसंग्रह - इत्यादी वेदांतग्रंथाचे अध्ययन केले होते. गीतेवरील टीका व भक्तिरसायन या ग्रंथांचा अभ्यास घेतला होता, त्यांच्या निरूपणाची भाषा रसाळतेने सुंदर व आशय घनतेने प्रगल्भ झालेली जाणवत होती. आळंदीवरून विद्याभ्यास घेऊन आल्यानंतर श्रीक्षेत्र आळंदी व श्रीक्षेत्र पंढरपूरची वारी,पारायणे, प्रवचन, कीर्तन असे चतुरंग पद्धतीने त्यांनी संप्रदायाचे सेवाकार्य मोठ्या जोमाने परंतु भक्तिभावाने सुरु केले. आळंदीहून आल्यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या "आजिचे हे मज तुम्ही कृपादान , दिले संतजन मायबापी !" या अभंगावर निरूपण केले होते. मात्र त्यानंतर "मी मूर्खु । जरी जाहला अविवेकु । तरी संतकृपादीपकु । सोज्वळु असे ।।" या ओवीनुसार  व 'सकळमंगळनिधी । श्रीविठ्ठलाचे नाम आधी ।।' या अभंगानुसार त्यांचे 'संतचरणरज' सेवाकार्य सुरू झाले होते.
श्री गुरू वैराग्यसंप्पन्न गंगूकाका शिरवळकर फडच्या अधिपत्याखाली सद्गुरू ह.भ.प.वै. हनुमंतबाबांच्या कृपाशीर्वादाने रचलेल्या भक्कम पायावर "सद्गुरू ह.भ.प.वै. हनुमंतबाबा मोरे वारकरी समाजाच्या" या इमारतीला त्यांनी आकाशाची उंची दिली, असे त्यांचे आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात अनमोल कार्य आहे. वडिलांच्या पश्चात पोलादपूर, महाड, खेड,मुंबई, ठाणे, बडोदे या ठिकाणी त्यांच्या मनोगतानुसार हरिनाम सप्ताहांचे व श्रीमद ज्ञानेश्वरी पारायणांचे आयोजन त्यांनी केले. आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी आयुष्यात अनेकदा केली. प्राथमिक परमार्थ संस्काराचा माध्यम म्हणून खेडोपाडी शिस्तबद्ध, शुद्ध स्वरूपात अखंड हरीनाम सप्ताहाच्या रूपाने ज्ञानसत्र परंपरा आपल्या नंतरही पुढे सुरू राहावी यासाठी त्यांनी अभ्युदय बॅंकेतून निवृत्त झाल्यानंतर बोरजफ़ाटा येथे सावित्री, ढवळी, कामथी या तीन नद्यांच्या संगमावर संत हनुमंतबाबा वारकरी शिक्षण संस्था या नावाने धर्मशाळा उभारण्याचा संकल्प आपल्या अनुयायी शिष्यांच्याकडे व्यक्त केला. महाराजांचा हा सत्यसंकल्प सर्वानाच आवडला. संस्थेचे अध्यक्ष, श्रीगुरु बाबांचे निष्ठावंत सेवक, साळवीकोंड गावचे सुपुत्र आणि दानशूर श्री रामशेठ साळवी यांनी तात्काळ एक लक्ष रुपये देणगी देण्याची घोषणा केली. त्यानंतर याकामासाठी देणग्यांचा ओघ सुरु झाला.
महाड-पोलादपूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी, दानशूरांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि लहान-थोरांनी सढळ हस्ते या धार्मिक यज्ञासाठी आर्थिक रूपाने योगदान दिले.  न भूतो न भविष्यती अशी संस्था वेळेपूर्वीच उभी राहिली आणि पोलादपूर तालुक्यातील आणि मुंबई-ठाण्यातील सर्व समाजबांधवांच्या उपस्थित भव्यदिव्य उदघाटनाचा सोहळा होत या वास्तूचे समाजार्पण करण्यात आले. त्यानंतर या आश्रमातूनच महाराज समाजाच्या विस्तारासाठी आणि परमार्थ वाढीसाठी अहोरात्र झटू लागले. तालुक्यातील जीर्णशीर्ण अशा मंदिरांना आपले योग्याशिष्य पदाधिकारी देऊन वारकरी संप्रदायाच्या परमार्थस्थलाच्या स्वरूपात विकसित केले. त्यांचा जीर्णोद्धार करवून घेतला. त्यांचे  सुपुत्र ह भ प रघुनाथदादा त्यांच्या सोबत परमार्थाची धुरा वाहू लागले. रघुनाथदादांच्या विचारामुळे समाजाला एक शिस्त आली, त्यामुळे आबालवृद्धांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अधिक संख्येने लोक परमार्थाला वाहून घेऊ लागले.
अनेक ठिकाणच्या नामसप्ताहात तेथील लोकांच्या आग्रहानुसार कीर्तनादी कार्यक्रमासाठी महाराजांचे जाणे अनेक गावात होई. शिवाय अनेक ठिकाणच्या सप्ताहाचे सगळे नियोजन त्यांचे असे.
वारकरी सांप्रदायातील अनेक प्रासादिक परंपरेपैकी हनुमंत बाबांची एक परंपरा असुन तिचे जतन करुन आता ती वृद्धिंगत झालेली आहे. वारकरी पंथासारखा दुसरा पंथ नाही. पांडुरंगाची मूर्ती ही योगस्थानक आहे. वारकरी पंथातील आद्यगुरू ज्ञानेश्वर महाराजांनीही त्यांना योगीराज असे संबोधले आहे. म्हणूनच त्यांच्या समोर गेल्यानंतर प्रत्येकाचे भान हरपून जाते व कुठल्याही प्रकारचे मागणे मागितले जात नाही. कारण या मागण्यालाही मर्यादा असते. वै गुरुवर्य हनुमंतबाबा हे पोलादपूर तालुक्यातील लोकांच्या पारमार्थिक जीवनाचे निस्वार्थ सेवाभाव जपणारे पथदर्शक होते. त्यांनी स्वतःचे अधिष्ठान तयार करून साधा सोपा परमार्थ कीर्तनरूपाने मुंबईत अनेक ठिकाणी सांगितला. कॉटनग्रीनच्या श्रीराममंदिरात प्रत्येक रविवारी ते कीर्तन ऐकण्यासाठी जात असत. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील जगद्गुरू संत तुकाराम  महाराजांच्या मंदिरात कार्तिकी वारीला देहूकर फडाच्या वतीने नियमित कीर्तन, बकरीअड्डा, कुलाबा, प्रभादेवी येथील श्री विठ्ठल मंदिर, करीरोड पुलाखाली पिंपळेश्वर मंदिरात शे-दीडशे भाविक श्रोत्यांसमोर अशी त्यांची कीर्तने होत असत. यासाठी त्यांना साथ देण्यासाठी गवई म्हणून गोविंद कोळी आणि पखवाज वादनासाठी विठ्ठल पवार (जांगलयाबुवा) सातत्याने असत. वारकरी सांप्रदायाची शिकवण, परंपरा व पद्धती आपल्या ग्रामीण पोलादपूर तालुक्यात वाडी-वस्त्यांवर राबविण्यासाठी त्यांनी सुरु केली. वृद्धापकाळाने त्यांचे देहावसान झाल्यानंतर साहजिकच सांप्रदायिक परंपरा पुढे चालविण्यासाठी हरिश्चंद्र महाराजांच्यावर जबाबदारी येऊन पडली. सद्गुरू हनुमंतबाबांच्या उतारवयातील प्राकृतिक विकलतेत महाराजांनी, छायेप्रमाणे त्यांच्या सोबत त्यांची सेवा केली. 'सकळ तीर्थाचिये धुरे । जिये का मातापितरे । तया सेवेसी कीर शरीरे । राहून लोण कीजे।।' ही त्यांची दृढभावना होती. भक्तवर्य पुंडलिकासारखे मातृपितृसेवन त्यांनी केले. पितृचरणांची केवळ शारीरसेवाच नव्हे तर त्यांनी जन्मभर चालविलेली अनेक  गावागावांमधील ज्ञानेश्वरी प्रवचनाची व कीर्तनाची सेवा चालवूनही पुढे त्यांनी पित्राराधन केले. व्यक्ती आपल्यातून गेली तरी त्यांच्या कीर्तीतनू, वैचारिक कास, पथ तसेच अबाधित राहत असतात. वै हनुमंतबाबा यांच्या वैकुंठगमनानंतर तसेच घडले.
आजपर्यंतच्या समाजाच्या पारमार्थिक उन्नतीसाठी महाराजांच्या कृपा-मार्गदर्शनाखाली संस्थेच्या अनुयायी गावातील अनेक ज्येष्ठ पारमार्थिक सेवाधारी, समाजधुरीण अशा अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले. महत्वाचे म्हणजे बोरज गावाचे सुपुत्र आणि श्रीगुरु बाबांचे पट्ट्शिष्य वै.रामचंद्र कुशाबा झाडाणेबुवा आणि त्यांच्या परिवाराने स्वतःची जागा मोठ्या स्वखुशीने संस्था उभारण्यासाठी दिली. बोरज गावची गुरुनिष्ठा काही औरंच!
वै. श्रीगुरु हरिश्चन्द्र बाबांचा सहवास आम्हाला प्रेमळ पित्याप्रमाणे लाभला. त्यामुळे तालुक्यातील वारकरी कुटुंबातील आम्हां शेकडो अनुयायींच्या जन्माचे सार्थक झाले. दाभिळ, बोरज, साळवीकोण्ड , साखर कदमवाडी, साखर-सुतारवाडी, कामथे, चांदले, वडघर, शिंगरी, चिंचवली, पुरे , गांजवणे, सातविनवाडी , तळे या अनुयायी गावांतील आम्ही समस्त अनुयायी कृतकृत्य आहोत, 
रामकृष्ण हरी
 मृत्यू हे माणसाच्या जीवनातील अंतिम सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. परुंतु एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा कुठे जातो हा प्रश्न अनेकांना पडतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, आत्मा कधीही मरत नाही. कोणाचा जन्म झाला तर त्याचा मृत्यू निश्‍चित आहे आणि जो मेला आहे त्याचाही पुनर्जन्म निश्चित आहे. आयुष्यात चांगले कर्म करणारेच या जीवन-मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकतात आणि परलोकात जातात. गुरुवर्य ह भ प हरिश्चन्द्र महाराजांच्या मृत्यूनंतर पुढील १३ दिवस त्यांच्या परमार्थ सेवासाधनेत खंड पडू नये म्हणून समाजाच्या वतीने तालुक्यातील महान किर्तनकारांची दररोज सायंकाळी किर्तनांची जागरण सेवा आयोजित करण्यात आली आहेत. धर्मजागरणासाठी सर्वश्री गुरुवर्य ह भ प केशवदास महाराज दळवी, अजितमहाराज गद्रे, पंढरीनाथ महाराज दळवी, बाळकृष्ण महाराज पवार, लक्ष्मण महाराज खेडेकर, भजनानंदी गुरुवर्य हरिभाऊ रिंगे महाराज, गुरुवर्य ढवळेबाबा संप्रदाय प्रमुख ह भ प गणपत महाराज मोराणकार, सदगुरु भावे महाराज वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान प्रमुख गुरुवर्य ह भ प रामदादा महाराज घाडगे, सद्गुरू मोरे माऊली संप्रदायाचे अधिष्ठान प्रमुख गुरुवर्य ह भ प अनंत तथा दादामहाराज मोरे, शिरवळकर फडाचे प्रमुख गुरुवर्य ह भ प भागवत महाराज शिरवळकर आणि उत्तरकार्याच्या दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या १४ व्या पिढीचे वारसदार देहूकर फडप्रमुख गुरुवर्य ह भ प चैतन्य महाराज देहूकर यांची प्रासंगिक कीर्तने होणार आहेत.
नामा म्हणे लोपला दिनकर |
बाप ज्ञानेश्वर समाधिस्त ||
गुरुवर्य हनुमंतबाबा मोरे वारकरी संप्रदायाच्या सर्व शिष्यगणांच्या वतीने वै. संतचरणरज श्रीगुरु ह. भ. प. हरिश्चन्द्र महाराज मोरे यांना  
|| भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली ||

श्री रामशेठ साळवी (अध्यक्ष)
श्री कृष्णा चं कदम के के (सेक्रेटरी)

शब्दांकन - ज्येष्ठ पत्रकार रवींद्र मालुसरे 













इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...