तेचि पुरुष दैवाचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तेचि पुरुष दैवाचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

।। तेचि पुरुष दैवाचे ।।

 ।। तेचि पुरुष दैवाचे ।।







नमोस्तु ते व्यास विशालबुद्धे

फुल्लार विंदायत पत्रनेत्र ||

येन त्वया भारत तैल पूर्ण:

प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप ||

अशा तऱ्हेचा एखादा श्लोक  वाचला  की, मी ज्यांच्या सहवासात आलो अशा पोलादपूर तालुक्यातील उच्च, विशुद्ध दोन  महनीय व्यक्तींचे धवल चारित्र्यवान प्रसन्न चेहरे नजरेसमोर येतात. पहिले म्हणजे श्रीगुरु ह भ प वै नारायणदादा घाडगे आणि श्रीगुरु ह भ प वै ढवळेबाबा. जनसामान्यांना श्रीविठ्ठलासी एकरूप कसे व्हावे हे सोप्या भाषेत सांगण्यासाठी या दोघांना परमेश्वराने पोलादपूर तालुक्यातील  दुर्गम डोंगरदऱ्यांसारख्या प्रदेशात जन्माला घातले. पंढरपूर, मुंबई, खडकवाडी, रानवडी या चार ठिकाणी ऐन उमेदीत मला या दोन रम्याकृतीशी सातत्याने भेटता आले. त्यांच्या सहवासात राहाता आले आणि त्यांच्याशी मुक्तपणे बोलता आले. त्यांच्यात काय अनुभवता आले तर ज्ञान, विद्वत्ता आणि मार्दव यांचा मिलाफ म्हणजे दादा आणि बाबा !

गेल्या शतकात जन्मलेल्या तालुक्यातल्या बऱ्याचजणांना त्यांची योग्यता माहिती झाली होती. निरागसता, निर्व्याजता, कोमलता आणि रम्यता यांच्या विशाल जलाशयात निःसंकोचपणे अवगहान करीत असल्याचा अनुपमेय आनंद सर्वांच्यासारखा मलासुद्धा अनुभवायला मिळाला.त्यांच्या सहवासाने चित्तशुद्धी व शांती यांनी मनुष्याचे जीवनमूल्य उंचावते व विशालतर क्षेत्रात पदार्पण करीत करीत मनुष्य प्रगत होत असतो. अगदी हाच आनंद दादा-बाबांच्या सहवासात येणाऱ्याला लाभत असे. आणि हो तो लुटताना कुणालाही आर्जव करावे लागले नाही.  संकोचून, लाजून, अंग आखडून विनम्रतेचा लाचार चेहरा करून त्यांच्याजवळ बसावे लागत नसे. त्यांनी आपल्याशी बोलायला सुरुवात केली की, एकदोन मिनिटातच आपण आपल्या दीर्घ परिचित व्यक्तीशी बोलत असल्यासारखा मोकळेपणा, विश्वास व आनंद वाटत असे.  या दोघांच्या बोलण्यात इतका स्पष्टपणा, सरळपणा व प्रामाणिकपणा होता की ऐकणारा अगदी मुग्ध होऊन ऐकत असे. आणि  बोलण्याच्या ओघात त्यांनाही कशाचेच भान न राहता विषयाच्या गांभीर्याप्रमाणे  संथ लयीत ते सतत बोलतच राहत असत.

दादा आणि बाबा हे किती थोर ज्ञानी, भव्य व उदात्त होते याची कल्पना त्यांच्या हयातीत होतीच परंतु ते स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांचा खडतर कार्यकाळ आणि परमार्थातील साधना आणि त्यांनी आयुष्यात केलेले धर्मकार्य याचा धांडोळा घेतल्यानंतर युगायुगात एक बृहस्पती जन्माला येतो त्याप्रमाणे आधुनिक पोलादपूर तालुक्यात विशाल बुद्धिमत्ता, चारित्र्य व निर्गवीपणा सोबत  शुद्धाचरण घेऊन हे दोन ज्ञानी भगवद भक्त जन्माला आले होते. आणि कुणालाही सहज प्राप्त न होणारे शंभरीच्या जवळपासचे दीर्घायुष्य सुखा - समाधानात ईश्वरचिंतनात जगले. जन्मता या दोघांच्या अंगी सत्वशीलता असल्याने अखंड परमार्थ साधनेने त्यांनी बुद्धी तल्लख केली होती. ही आपली बुध्दि त्यांनी विनयाच्या व विचारांच्या पायावर स्थिरावून ठेवलेली असल्याने दोघांच्याही वागण्यात नम्रपणा तर दिसण्यात भारदस्तपणा दिसून येत असे.  गुरुवर्य म्हणून महर्षी व्यासांची विशाल बुध्दि व गुरुवर्य म्हणून द्रोणाचार्यांचे चारित्र्य या दोघांच्यात  एकवटल्याचा भास मला होत असे..... कार्तिक एकादशीच्या निमित्ताने श्री पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत असताना या दोन श्रीगुरुचरणांना भावपूर्ण साष्ठांग नमस्कार !!

 


-रवींद्र मालुसरे

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...