हरिभाऊ रिंगे महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हरिभाऊ रिंगे महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ जुलै, २०२२

श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गायनाचार्य हरिभाऊ रिंगे महाराजांचा सत्कार


मुंबई : (रवींद्र मालुसरे ) आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो. मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतात. चांगले रस्ते, पिण्याचं मुबलक पाणी, शौचालये असतात. त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत जे झालं नाही ते पंढरपूरसाठी करणार असून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना दिले. महाराष्ट्रातील प्रमुख कीर्तनकारांनी त्यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते. वारकरी सांप्रदायातील अध्वर्यू आणि ज्येष्ठ गायनाचार्य ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिंगे महाराजांना मानपत्र प्रदान करण्यात आले. 
यावेळी एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले की, केवळ हिंदुत्व आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम रहावेत यासाठी आम्ही शिवसेना खासदार-आमदारांनी वेगळी वाट निवडली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या तेजस्वी हिंदुत्वाच्या विचारांची ही लढाई लढतो आहोत. हे हिंदुत्व म्हणजे दुसऱ्या समाजाचा द्वेष नव्हे. हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होत असताना त्याचा इतर धर्मावर परिणाम होणार नाही हीच भूमिका आमची कायम राहणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केली. सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, खासदार हेमंत डोके, अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, कीर्तनकार विश्वनाथ महाराज वारिंगे, कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज उगले, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे,  अंबरनाथचे नगरसेवक सुभाष साळुंखे,  नगराध्यक्ष सुनील चौधरी, आळंदीचे रविदास महाराज शिरसाट, संत मुक्ताबाई संस्थांनचे तुकाराम महाराज मेहुणकर, पैठणचे ज्ञानेश्वर महाराज इंगळे, ह भ प चंद्रभान सांगळे महाराज, मनोजकुमार गायकवाड  सिन्नरचे किशोर महाराज खरात, बदलापूरचे रवींद्र महाराज मांडे, मुरबाडचे हिम्मत महाराज गगे, शहापूरचे योगेश महाराज वागे, योगेश महाराज घरत, वासींदचे ज्ञानेश्वर महाराज शेळके, खडवलीचे नारायण महाराज बजागे, बदलापूरचे अशोक महाराज घरत, मोहन महाराज राऊत, टिटवाळाचे दशरथ महाराज किणे, आंबिवलीचे भीमसेन महाराज पाटील, ठाण्याचे जगन्नाथ महाराज म्हस्के, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम रिंगे, नवोदित गायक चिन्मय रिंगे, आदी पारमार्थिक क्षेत्रातील शेकडो वारकरी मंडळी उपस्थित होते. 



शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

कर्मे इशु भजावा

 कर्मे इशु भजावा 

अभंग गायनाची खासियत अशी, की तो देवाच्या द्वारी उभा राहून गायला, तर त्यात रंग भरतोच, परंतु जिथे असू तिथे तल्लीन होऊन अभंग गायला, तर आपल्या सभोवतालचा परिसर गाभाऱ्यासारखा पवित्र होतो. समाधीस्थ अवस्था तयार होते आणि त्या आनंदात टाळ, चिपळ्या, मृदंगही नाचू लागतात. सगळे विठ्ठलमय होतात. तिथे रंक-राव असा भेदभाव उरतच नाही. कारण तो दरबार ईश्वराचा असतो. त्याचा कृपाप्रसाद सर्वांना सारखा मिळतो. सर्व विषयांशी संग सुटतो आणि केवळ विठुनामाचा संग जडतो. त्याचप्रमाणे विविध गुणांनी, विविध अभिव्यक्तीनी आणि वैविध्यपूर्ण स्वभावांनी बनलेली अनेकविध माणसं समाजात वावरत असतात. सारीच माणसं जिवंत असतात. पण ज्या माणसांत चैतन्य असते, कर्तृत्वाची स्फुल्लिंगं प्रज्वलित झालेली असतात, जीवनाचा अन्वयार्थ ज्यांना ज्ञात झालेला असतो अशीच माणसं जिवंत वाटतात आणि समाजातल्या अशा विखुरलेल्या चैतन्यमयी माणसांमुळे समाजपुरुष जिवंत साहे असे वाटते. अशी कर्तृत्ववान माणसं समाजाची भूषण असतात. इतकेच नव्हे तर अशी माणसं समाजाची कवचकुंडल असतात. असंच एक कवचकुंडल पोलादपूर तालुक्यातील लहुळसे गावात ८० वर्षांपूर्वी एका अज्ञानी, दरिद्री, विपन्नावस्थेत वावरणाऱ्या कुटुंबात जन्माला आले, जे पुढे संपूर्ण महाराष्ट्रात भजनानंदी हरिभाऊ रिंगे महाराज म्हणून समाजाला ललामभूत ठरले.

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले जातात. त्यात पहिले तीन भौतिक उद्देश आहेत.. चौथा ज्ञानी. त्याला एका कामासाठी देवाने मर्त्यलोकी पाठविलेला असतो. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' असे जगायचे कल्याण चिंतने आणि त्यासाठी देह कष्टविणे हे संतांच्या कर्तव्यापैकी एक आहे. हरिभाऊंनी आयुष्यभर आवडीच्या क्षेत्रात केलेले भव्यदिव्य काम पाहता ते एक व्यक्ती आहे असे मी मानत नाही, त्यांचं जीवन आता पारमार्थिक क्षेत्रातील एक विचार बनलेला आहे.

मनुष्याला त्याच्या जन्माला आल्यानंतर जेव्हा संतसंग किंवा सत्संग लाभतो तेव्हा त्याच्या पाठीमागे पूर्वपुण्याई, पूर्वजन्माचे संस्कार व सुकृत असते.रिंगेमहाराजांचा सहवास आपल्या सर्वाना लाभतो आहे हे आपले परम भाग्यच. 


हरिभाऊंना मुंबईत आल्यानंतर परम पूजनीय गुरुवर्य ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचा सहवास लाभला. त्यांच्या हातून तुळशीची माळ घेतल्यानंतर त्यांचे जीवन पूर्ण आंतरर्बाह्य बदलले. तुझ्या गळ्यात सूर आहे ...तुम्ही आयुष्यभर सुरात गात चला. नंतर भजन सम्राट खाशाबा कोकाटे यांच्याकडे संगीताची रागदरबारी शिकण्यासाठी जाऊ लागले. गात राहिले... शिकत राहिले...वयाच्या २० व्या वर्षांपासून आता वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत त्यांचा रोजचा सराव आणि साधना यामुळे  हरिबुवा रिंगेमहाराज यांची नाममुद्रा श्रद्धेने आणि कर्तृत्वाने मंतरलेली झाली आहे. महाराजांनी महाराष्ट्रात वारकरी गायन क्षेत्रात संस्मरणीय कार्य केले आहे. गेली ६० वर्षे अखंड साधना केल्यामुळे स्वतः सुरेल आणि पल्लेदार पहाडी आवाजाचे ते जसे धनी आहेत तसेच शेकडो गुणिजन विद्यार्थ्यांचे ज्ञानदान करणारे गुरुजींही आहेत. श्री पांडुरंगाचे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे वारकरी आणि निस्सीम भक्त म्हणून महिन्याची वारी करणारे अशा अनेकविध नात्यांनी ते जसे समाजात सुपरिचित आहेत. तशी प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या सत्वसंपन्न व्यक्तिमत्वाची मुद्रा उमटवली आहे. उदा. दोन वर्षांपूर्वी लहुलसे गावात द्वादशी व्रताचा करण्याचा संकल्प त्यांनी गावकऱ्यांसमोर मांडला. गावाने त्यांचा शब्द प्रमाण मानला, एकजुटीने एकमताने उभा राहिला. न भूतो न भविष्यती असा कोकणात महायज्ञ सुफळ संपन्न झाला.

हाती घेतलेलं कोणतंही काम करताना त्यांचे केवळ कोरडं कर्तव्य नसतं, तर ते भावस्निग्ध व्रत असतं. ते काम सरस आणि सकस व्हावं, कार्यपूर्तीला सौजन्याचं कोंदण हवं याची त्यांना सतत जाणीव असते.  आपले अनेक विद्यार्थी, सहकारी आणि स्नेही यांच्या भल्यासाठी ते जीवाचं रान करतात.

त्यांच्या प्रत्येक श्वासात प्रभुनाम स्मरणाची स्पंदने आहेत.पारमार्थिक तळमळ असणारे आणि अध्यात्मिक जीवन जगणारे असे हरिभाऊ रिंगे यांच्या वयाच्या ८० व्या वर्षपूर्ती निमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न होत आहे. कर्मानेच ईश्वराची सेवा करावी लागते. सेवा करण्याला भजन म्हणतात. म्हणजे सर्व सुखासाठी 'कर्मे ईशु भजावा' हेच खरे. हरिभाऊ रिंगे महाराज यांचा जीवनपट नजरेसमोर आणला तर कर्माने ईश्वराला भजावे म्हणजे 'कर्मे ईशु भजावा' चा अर्थ अधिक स्पष्टपणे लक्षात येईल.

हरिभाऊंना माणसाची विलक्षण ओढ आहे. अनेक स्तरांतील आणि विविध व्यवसायातील माणसंविषयी त्यांना उत्कट प्रेम आहे. दोष कुणात नसतात ? दोष बाजूला ठेऊन माणूस शोधायचा असतो, असे अनेक उभे आडवे धागे जुळवीत समाज जीवनाचं वस्त्र ते विणत असतात. हरिभाऊ ८० वर्षानंतरची वाटचाल करीत असताना त्यांची उमेद पूर्वीसारखीच उदंड आहे. प्रतिकुलता झेलत आणि चैतन्य उधळत जगावं कसं याचा वस्तुपाठ म्हणजे हरिभाऊंचे जीवन आहे.

हरिभाऊंनी आयुष्यभर नाद ब्रम्हाचा अर्थ सांगितला व लेखाच्या विद्वान संगीत तज्ज्ञांपेक्षा काकणभर सरस असे भारतीय शास्त्रीय संगीतावर आपले चिंतन मांडले. विद्यादानासारखे श्रेष्ठ दान नाही. विद्यादान हे म्हणजे आत्मानंद देणारे ज्ञानदान होय. सतचित आनंद देणारे ज्ञान. यासाठी योग्य गुरु योग्य शिष्यासाठी जीवन जगतो आणि योग्यतेचा शिष्य भेटल्यावर अनेक कसोट्यांतून नेल्यावर नाते निर्माण होते.  मानवधर्म मानणाऱ्या वारकरी संप्रदायाची विचारधारा जगाला मार्गदर्शक ठरेल, अशी हरिभाऊंची धारणा आहे. नभोमंडलात तळपणाऱ्या भास्काराप्रमाणे रिंगेमहाराज आपल्या शिष्यगणांसह अवघा महाराष्ट्र फिरत असतात. ऐसी कळवल्याची जाती करी लाभावीण प्रीती श्री तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे भाविक भक्तगणांना गेली ६० वर्षे दीपप्रकाशात रिंगे महाराज सन्मार्ग दाखवीत आहेत. कर्तव्यतत्पर माणसाला विश्रांती माहीत नसते. संगीत क्षेत्राची अफाट बौद्धिक ताकद असलेले कल्पक कलावंत जेव्हा एखाद्या समाजात निर्माण होतात तेव्हा त्या समाजाच्या परंपरेच्या दृष्टीने सांस्कृतिक आणि भौतिक पातळीवर काही नवे घडत असते. काळाच्या ओघात समाजात सतत स्थित्यंतरे घडत असतात. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःला झोकून देणारे आणि तन-मन-धन अर्पण करणारे निष्काम महापुरुष ठामपणे उभे राहातात तेव्हाच इतिहासात नोंद घेणारे बरेचसे त्यांच्याकडून घडत असते. पोलादपूरच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्र प्रांतात हरिभाऊंनी वारकरी गायन क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय असेच आहे.

वारकरी गायन क्षेत्रातील एक तपस्वी म्हणून त्यांनी हजारॊना जे ज्ञान दिले ते देताना त्यांच्या कर्मात निष्कामता होती. कर्मामध्ये निष्कामता येणे अत्यंत अवघड आहे. जो निष्कामतेने कर्म करतो त्यास 'कर्मयोगी' असे म्हणतात. कर्मामध्ये निष्कामता येण्यासाठी कर्माचे तत्व नीट समजले पाहिजे. जे करावयाचे आहे ते भगवंतासाठीच करावयाचे आहे असा भाव मनात निर्माण करावयाचा म्हणजेच निष्काम कर्म करावयाचे. सर्वव्यापी ईश्वर भावाने केलेले कर्म हे निष्काम कर्मच होते. यालाच दुसरे नाव 'भक्तिमार्ग' असे आहे. ती वाट परमात्म्याच्या पर्यंत पोहोचते व जीवास परमात्मरूप करते. हरिभाऊंनी ईश्वर भक्ती त्यांच्या विचारातून व आचारातून जाणवते कारण महाराज हे सच्चे वैष्णव आहेत. जीवन पराकोटीचं समर्पित केले की जीवन जीर्णशीर्ण होत नाही. सूर्याला म्हातारपण येत नाही. दर्या कधीच संकोचत नाही. चंद्र कधीच जुना होत नाही. विनाश कधीच त्यांच्याजवळ पोहोचत नाही. त्यांच्यात ना स्थित्यंतर ना कायापालट होतो.

भजनानंदी सुप्रसिद्ध भजन सम्राट ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज हे ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्याबद्दल अंतःकरणपूर्वक शुभेच्छा ! यांनी हरिभाऊंनी मंगल जीवनाची, गौरवमय ऐंशी वर्षाची कारकीर्द पूर्ण केल्याचे निमित्त साधून त्यांच्या अभिष्टचिंतन करण्याची हि सुवर्णसंधी लाभली आहे, विश्वात्मक देवाच्या या महान भक्तास उत्कृष्ट, आरोग्य, दीर्घायुष्य, समाधान व शांती व सर्व भाविक भक्तांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन लाभून त्यांचे जीवन पुढील अनेक वर्षे कृतार्थ होवो हीच माउलींच्या चरणी प्रार्थना. माणूस किती वर्षे जगला यापेक्षा कसा जगला हे महत्वाचे आहे. 'कसा' हा शब्द संबंधित व्यक्तीची जीवनपद्धती, संस्कार व तिच्या जीवनविषयक ध्येयाचा निर्देशक असतो.

हरिभाऊ हे कुटुंबाचे, गावाचे, समाजाचे, वारकरी संप्रदायाचे उपकारकर्ते. आपल्यावर ज्यांनी उपकार केले, त्याची जाणीव मनात असून उपकार कर्त्याविषयी मनात सदैव सद्भावना असणे व त्याला अनुसरून उपकारकर्त्याशी वेळप्रसंगी तसे आपले वर्तन असणे ही झाली 'कृतज्ञता' या शब्दाची व्याख्या. आपल्या भारतीय संस्कृतीची जी अंगे उपांगे आहेत, त्यात कृतज्ञतेचा समावेश होतो. ....या चार शब्दांची ही शब्दसुमने त्यांच्या चरणी अर्पण !

-




रवींद्र मालुसरे (
अध्यक्ष )

 मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई  ९३२३११७७०४ 


वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...