दिवंगत शरद वर्तक यांना शब्द सुमनांजली !
दिवंगत शरद वर्तक यांना शब्द सुमनांजली ! नमस्कार करावा अशी पावलं आज दिसत नाहीत. संस्थात्मक पातळीवर तर अभावानेच निःस्पृह माणसं भेटतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कातडीबचऊ धोरण अवलंबविणाऱ्या माणसांचा गजबजाट आज सभोवती दिसतो आहे. आयुष्याच्या प्रवासात ऐन उमेदीच्या काळात कोणीतरी भेटावे आणि त्याच्याशी ओळख व्हावी, पुढे तिचे मैत्रीच्या रुपात कौटुंबीक ममत्वात रूपांतर व्हावे आणि आकस्मिक भेटलेला हा माणूस आपल्या आयुष्याचा भाग बनावा तसे दिवंगत शरद वर्तक साहेब नकळत माझ्या आयुष्यात आले आणि ३७ वर्षे कायम मुक्कामाला राहिले. त्या राहण्यात त्यांच्या सौ वर्तकांचे घरच्या माणसाचे आपलेपण तर शरदरावांचे ज्येष्ठ मार्गदर्शकाचे नाते होते. वर्तक जेवढे साधे दिसत तेवढेच ते साधेपणाने बोलत परंतु निर्भीड आणि परखडपणे संपादकीय पानावर लिहीत असत. वर्तक साहेबांची आणि माझी भेट १९८६ ला शिंदेवाडीच्या संस्थेच्या कार्यालयात झाली. पुढे दर शनिवारी आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट होत गेली. काही माणसे अनेक चेहऱ्यांनी समाजात वावरत असतात. शरद वर्तकांना दुसरा चेहरा नव्हताच, एकच होता. सार्वजनिक जीवनात वावरताना आज मी थोडीफार श्रीम...