व्यक्तिकोश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यक्तिकोश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

नादब्रम्हाचा उपासक सुप्रसिद्ध भजनी गायक ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर

 

नादब्रम्हाचा उपासक

सुप्रसिद्ध भजनी गायक ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर 

पोलादपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध भजनी गायक आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वर्यू संगीतरत्न ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर यांचे आज (मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ ) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८७ व्या वर्षी  निधन झाले. त्यांच्याच गावातील वारकरी संप्रदायातील पोलादपूर मधील थोर संत ह भ प. वै ढवळे बाबा आणि गुरुवर्य वै ह भ प नारायणदादा घाडगे यांचा पांडुरंगबुवांना लहानपणापासून खुप जवळचा सहवास आणि स्नेह लाभला. किर्तनासह, भजनामध्ये आपल्या वेगळ्या शैलीतील गायनाने बुवांनी रसिकांना गेली सहा दशके मंत्रमुग्ध केले. पोलादपूर तालुक्यातला वारकरी क्षेत्राचा सुवर्णकाळ हा साधारणतः १९५५  ते  १९७५. या काळात अनेक गुरुतुल्य व्यक्ती जन्माला आली. अर्जुनमामा साळुंखे, ढवळे बाबा,नारायणदादा घाडगे, गणेशनाथ बाबा, हनवतीबुवा, हबुबुवा, ज्ञानेश्वर मोरे माउली, विठोबाअण्णा मालुसरे, ढवळे गुरुजी, भजनानंदी हरिभाऊ रिंगे, सुप्रसिद्ध पखवाजवादक रामदादा मेस्त्री, शंकर मेस्त्री, भाईबुवा घाडगे, विठोबा घाडगे (पखवाज), विठोबा घाडगे (गायक) अशी बुद्धिमान आणि ईश्वराशी समरस झालेली मोठी माणसे होऊन गेली. त्यावेळी पांडुरंगबुवा आपली गायनकला भजन-कीर्तनातून श्रोत्यांसमोर सादर करीत होते. हळूहळू त्यांचा वेगळा असा श्रोतृ वर्ग निर्माण झाला. त्यांच्या अचानक जाण्याने आजरेकर समाज फड आणि पोलादपूर तालुका वारकरी संप्रदायासह संगीत क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना "रायगड भूषण" पुरस्कार प्रदान करून सन्मानाने गौरविले होते. 

        सुरवातीच्या काळात तरुण वयातच त्यांना गावागावातील भजने ऐकून त्यांना भजनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर  गायनाचार्य पं रामबुवा यादव (लोअर परेल) यांच्याकडे संगीत भजन शिकण्यास सुरुवात केली. यादवबुवांकडे काही काळ संगीत भजनाचे धडे घेतल्यानंतर सेंच्युरी गिरणीतील नोकरी आणि गावाकडची शेतीवाडी यामुळे त्यांना संगीत क्षेत्रातील शिक्षणाला वेळ देवू शकले नाहीत, मात्र त्यांनी स्वसाधनेने शास्त्रीय संगीताची साधना केली.  किर्तनात गायनसाथ करण्याची संधी लाभलेल्या पांडुरंगबुवांच्या आवाजात विशेष गोडी होती. आपल्या वेगळ्या शैलीतील गायनाने पोलादपूर, मुंबई, आळंदी, पंढरपूर परिसरातील श्रोत्यांना देखील बुवांच्या सुमधुर आवाजाची भुरळ पडली. वारकऱ्याने आयुष्यभर त्या फडाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असा नियम वारकरी पंथात आहे.आजरेकर फडाच्या जवळपास पाच पिढ्यांशी ते एकनिष्ठ राहिले. आळंदी-पंढरपूर पायी वारीतील बऱ्याचदा ज्येष्ठ म्हणून मुख्य चाल म्हणण्याचा अधिकार फडप्रमुख त्यांना देत असत. मुंबईतील गिरणी कामगारांच्या भजन स्पर्धा होत असत त्यावेळी सेंच्युरी मिल भजन मंडळ सतत पहिला क्रमांक पटकावत असत. भजन सम्राट वै मारुतीबुवा बागडे यांच्या साथीला बुवा नेहमी असत.

 पांडुरंगबुवांना मानणारा वारकरी संप्रदायातील एक मोठा वर्ग आहे.  काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. अखेर आज हृदय विकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे आणि एक मुलगी , सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने संगीत क्षेत्राची फार मोठी हानी झाल्याची भावना कलाकार मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.

गायकाची सारी करामत त्याच्या गळ्यावर अवलंबून असते. गाणं नुसतं डोक्यात असून चालत नाही. तेवढ्याच ताकदीनं ते गळ्यातून बाहेर पडावे लागते. त्यासाठी नैसर्गिक देणगीबरोबरच पराकोटीची  साधनाही असावी लागते. नशिबाची साथ तर लागतेच लागते. पांडुरंगबुवा उतेकर तसे खरेच भाग्यवान ! वय वर्षे ८७ या उतारवयातही त्यांचा आवाज एखादा प्रकाशाचा झोत चहुबाजुंनी अंगावर यावा, तसा श्रोत्याला भारावून टाकायचा. साऱ्या वातावरणात भरणारा हा आवाज खूपच जबरदस्त गोड. साधारणपणे बारीक, टोकदार, रुंद, घुमारदार, पिळदार, लांब पल्ल्याचा, दमसास पेलणारा. सुरेलपणा, स्वरांची  आस आणि गोडवा हेही त्यात होतेच. कोणतीही गायकी जन्माला येते तेव्हा ती परिपूर्ण नसते. हळूहळू ती परिपक्व होत जाते. गाणारा स्वरभास्कर अस्ताला गेला असला तरी त्यांची आठवण कायम राहील.  पोलादपूर वासियांच्या इतिहासात घडलेली अभूतपूर्व घटना म्हणजे त्यांचा काळातील पिढीने समृद्ध केले. पांडुरंगबंवा यांनी तर शेकडो अभंगांच्या पाठांतरामुळे वारकरी कीर्तन लोकप्रिय केले. शास्त्रीय संगीतातील रागांची तोंडओळख खेड्यापाड्यातल्या लोकांना भरभरून करून दिली. अनेकांना गाण्याची आवड लावली. खेडोपाडीच्या नुसत्याच भक्तीनं किंवा भावनेनं वेडेवाकडे गाणाऱ्यांना शास्त्रकाट्याची कसोटी दिली. त्यांचं गाणं वाढवलं. आणि संगीताच्या गाभाऱ्यात श्रद्धेचं, भक्तीच निरांजन लावलं. त्यांच्या वागण्यातला साधेपणा, गोडवा, निरागसता, समरसता, भक्ती हीच त्यांच्या गोड गळ्यातून स्वरांच्या रूपाने बाहेर पडत असे. गायकासाठी सूर हाच ईश्वर आहे व तो सच्चा लागला तरच ईश्वराला प्रिय आहे.   

या क्षेत्रात वावरताना त्यांना मानमरातब, आदर नेहमीच मिळत राहिला. पूर्वजन्मीचे सुकृत त्याला कारणीभूत असावे, ते अशा घरात जन्माला आले की तिथं स्वर-तालाची पूजा होत नव्हती. लहानपणी काहीसा पोरकेपणा वाट्याला आला होता. परंतु वर्तनातूनच आपल्यामधील कलेमध्ये हुनर दाखवत एक साधा माणूस म्हणून ते 'उजेडी राहिले उजेडी होऊन' जगले.  त्यांच्या गाण्यातला मोठा बिंदू म्हणजे भक्ती ! भक्ती  म्हणजे  भक्तिपदे गायन करणे नव्हे. तर गायकाच्या स्वभावातून निर्माण झालेला भक्तीचा भाव आणि त्या भावातून निघालेले स्वर आणि राग याच्यांशी एकरूप होऊन समर्पित होण्याची भक्ती आणि हीच गाण्यातली सर्वात मोठी शक्ती आहे. ज्या लोकांनी पांडुरंगबुवांच्या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व ज्यांना त्याची प्रचिती मिळाली ते सर्वजण धन्यता व सार्थकतेचा अनुभव करतात. म्हणूनच गेली पाच दशकांतील पिढ्यासाठी ते एक ऊर्जा स्रोत ठरले. मध्यसप्तकाचा षड्ज हा संगीतातील 'आधारस्वर' होय हा षड्ज साधारणपणे गायकाला सहजतेने लावता येण्यासारखा आणि रागानुरूप इष्ट त्या सर्व सप्तकांत फिरण्यास योग्य असा असावा लागतो. वादकाच्या बाबतीत तो वाद्य आणि वाद्यगुण यांना अनुसरून असतो. सर्व सांप्रदायातील वारकरी बंधूना नम्रपणे हात जोडून नमस्कार करणारा पांडुरंगबुवांचा प्रेमाचा आधार मात्र यापुढे नसेल मात्र त्यांची कीर्ती दिगंत उरणार आहे. 
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

 

रवींद्र मालुसरे (अध्यक्ष)

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

वै ह भ प मुरलीधर ढवळे गुरुजी माणूस घडवणारा शिल्पकार

वै ह भ प मुरलीधर ढवळे गुरुजी
माणूस घडवणारा शिल्पकार  

माणूस बदलवण्याच्या प्रक्रियेत प्रबोधनाचा वाटा फार मोलाचा असतो, गेल्या हजारो वर्षांपासून वारकरी संप्रदायातील लाखो प्रवचनकार- किर्तनकारांनी आणि ज्ञानदान देणाऱ्या गुरुजनांनी प्रबोधन करीत माणसांना सन्मार्गावर आणण्याचे काम केले आहे. फरक इतकाच असतो की शिल्पकार आपल्या डोळ्यासमोर एखादे शिल्प घडवतो आणि शाळा शिक्षकाच्या माध्यमातून तर वारकरी सत्संगाच्या माध्यमातून आपल्यातला माणूस नकळत घडवत असतो.
शिक्षण आणि वारकरी कीर्तन या दोन क्षेत्राचा अवलंब करीत गेल्या वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या ९१ व्या वर्षांपर्यंत कार्यरत असणारे पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक या गावचे वै ह.भ.प. मुरलीधर गेणू ढवळेगुरुजी यांनी आयुष्यभर हेच काम केले.आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्याचे महत्व आणि गरज अधिक ठळकपणे अधोरेखित व्हावी यासाठी हा लेखनप्रपंच !
समाजाला सुशिक्षित व सुसंकृत करणारा 'आधार' म्हणजे शिक्षक आणि कीर्तनकार ! पोलादपूर तालुक्यातील जणू पितामह असलेल्या गुरुजींनी असिधाराव्रत म्हणून या दोन्ही प्रांतातील भूमिका देह ठेवेपर्यंत निष्ठेने केल्या.
शिक्षण देणे हे आपल्या जीवनाचे धेय्य आहे आणि ज्ञानदानाचे समर्पण करणे हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे मनोमन स्वीकारलेल्या गुरुजींच्या दोन्ही कार्याची महानता भावी पिढीला आदर्शवत अन प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.
शिक्षणाने व्यक्तीला समाजात राहायला शिकवले पाहिजे, हे स्पष्ट करताना डॉ. राधाकृष्णन म्हणतात. 'The importnace of education is not only in knowlege and skill but it is to help us to live with other's. आज माणूस एकेकापासून तुटत चालला असताना हा विचार किती मोलाचा आहे. या त्यांच्या विधानावरून 'विद्वान सर्वत्र पूज्यते' या वचनाची प्रचिती येते. वर्तमान काळात 'शिक्षक' हे केवळ अध्यापनकर्ता न राहता ते 'मार्गदर्शक', समुपदेशक देखील असले पाहिजेत. शिक्षकांचे व्यक्तिमत्व जितके विनयशील, संपन्न, व्यासंगी तितका परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर व विद्यार्थ्यांना मिळणार्‍या प्रेरणेवर होत असतो म्हणून तत्त्वज्ञान कितीही बदलले अध्ययन, अध्यापनाच्या प्रक्रियेत बदल झाला तरी गुरुजींसारख्या संस्कारक्षम शिक्षकांचे महत्त्व कमी होणार नाही.

२२ ऑक्टोबर  १९३० साली रानवडी येथील शेतकरी गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे पहिली ते दुसरी शिक्षण रानवडी बुद्रुक येथील खाजगी शाळेत. तिसरी ते चौथी शिक्षण कापडे येथील सरकारी शाळेत, पाचवी ते सातवी महाड येथे त्यानंतर पी.एस.सी. परीक्षा सन १९४७ साली पास झाले. त्या काळातील हे शिक्षण त्यांना एखादी चांगली सरकारी नोकरी देऊ शकले असते. परंतु स्वतःचे शिक्षण घेतानाच त्यांना एक विचार मनोमन पटला होता. तो म्हणजे शिक्षण हे संस्कृती संवर्धनाचे साधन आहे, तर शिक्षक हा संस्कृतीचा साधक आहे. त्या दृष्टीकोनातून त्यांनी १९४८ साली स्वतःहा रानवडी येथे शाळा स्थापन करून गावातल्या मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.

माणसाने पावले दूरदृष्टीने टाकली तर भरारी घ्यायला वेळ लागत नाही, या पावलांना जर नम्रतेची जोड असेल तर रोवलेले पाय अधिक कटिबद्ध होतात एवढे मात्र खरे. गुरुजींनी अशीच वाटचाल सुरू केली, या शाळेला व्हॅलेंटरी शाळा म्हणून चालवल्यानंतर १९५५ मध्ये ही शाळा सरकारने स्कुल बोर्डाकडे वर्ग केली. १९६० पर्यंत रानवडी शाळेवर काम केल्यानंतर सन १९६०-६१ पनवेल येथे ते पुढील ट्रेनिंग घेऊन पास झाले. तदनंतर १९७२ ते १९८१ घागरकोंड आणि १९८१ ते १९८७ पर्यंत रानवडी येथे त्यांची नेमणूक झाली. १९८८ ला घागरकोंड येथे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले.

ज्या ज्या शाळेत त्यांनी अध्यापनाचे काम केले त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी दर्शनी भागावर प्रथम लिहिले, "यावे शिक्षणासाठी जावे सेवेसाठी" माणसांचं मोठेपण तो किती मोठा झाला यापेक्षा त्याने किती लोकांना मोठे केले यावर त्यांचे मोठेपण मोजले जाते. गुरुजींनी त्यांच्या हयातीत विद्यार्थ्यांच्या आणि वारकरी क्षेत्रातील लोकांच्या संदर्भात नेमकं हेच केलं. जो त्यांच्या सहवासात आला तो सद्गुणांनी मोठा कसा होईल हे पाहिले त्यांनी जणू हे व्रतच स्वीकारलं होतं.

नावारूपाला आलेले इतर पुष्कळ असतात, पण एव्हढ्या पावित्र्यानं, एवढ्या मंगलतेने ढवळे गुरुजींनी आपल्या आयुष्याकडे पाहिले, की आपलं जीवन नुसते जगणे न ठरता इतरांसाठी प्रेरणा ठरेल. कुटुंब कल्याण, आदिवासी बांधवाना साक्षर करणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करणे अशी अनेक उदाहरणे सामाजिक बांधिलकीची त्यांच्या बाबत सांगता येतील.

शाळा ही एकाच छापाच्या विटा भाजून काढण्याचा कारखाना होऊ नये तर प्रत्येक विद्यार्थीरूपी शिल्प स्वतंत्ररीतीने घडावे याकडे गुरुजींचा कटाक्ष असे. जीवन आणि शिक्षण यांची फारकत त्यांनी कधी मान्य केली नाही. शिक्षणातून नेहमी श्रमाची प्रतिष्ठा, ग्राम स्वच्छतेचे महत्व, पर्यावरण, समाजातला बंधुभाव, साधेपणाने जगण्याची वृत्ती अंगी कशी बाणवावी त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केला. शिक्षणाच्या ध्यासातून आपला दिवा वादळात देखील जपून ठेवणारे गुरुजी एक खंत माझ्याकडे नेहमी बोलून दाखवीत ती म्हणजे आजच्या पालकांना आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, सनदी अधिकारी होणे श्रेयस्कर वाटते. त्यासाठी त्यांना उत्तम शिक्षक आणि शिक्षण हवे असते, पण आपल्या व आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण करणारा त्यापैकी कुणी उत्तम शिक्षक व्हावा असे मनापासून वाटणारे फार कमी आहेत.

लहानपणापासूनच त्यांना परमार्थाची आवड होती. पोलादपूर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे अर्ध्वर्यू वै ह भ प रामचंद्र आ तथा ढवळे बाबा यांच्याकडून आदेश आल्यानंतर महाराष्ट्रातील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड (पंढरपूर) ते माळकरी झाले. आळंदी ते पंढरपूर अशा १५ पायी वाऱ्या त्यांनी केल्या. अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि अभ्यास केल्यानंतर १९६१ सालापासून कीर्तन सेवेस प्रारंभ केला. सात दशके कीर्तन प्रवचन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. संकट असो, दुःख असो, प्रवासात शारीरिक किंवा मानसिक व्यथा असोत, 'रामकृष्ण हरी' म्हणायला सुरुवात केली. आणि त्यांचे दैवत पांडुरंगाचे नामस्मरण केले की, कोणत्याही व्यथेचा त्यांच्या चेहऱ्यावर लवलेश दिसत नसायचा असे त्यांच्याच गावातील त्यांचे सहकारी रायगड भूषण सुप्रसिद्ध भजनी गायक पांडुरंग बुवा उतेकर हे सांगतात. रायगड जिल्हा, सांगली, मिरज, पंढरपूर, आळंदी, देहू, रत्नागिरी, सातारा येथे त्यांची शेकडो कीर्तने झाली आहेत. त्यांचे कीर्तन म्हणजे भक्तिरसाचा खळखळणारा प्रवाह. अभंगांचे मधुर व प्रभावी गायन, त्यातील प्रत्येक शब्दाच्या अर्थछटा उलगडून सांगण्याची विद्वता यामुळे त्यांचे कीर्तन ऐकणे म्हणजे एक अलौकिक अनुभूती असते. जितका मोठा कार्यक्रम तितके त्यांचे कीर्तन रंगून जात असे. समोर विद्वान अथवा मोठी माणसं आहेत म्हणून ते कधी बावरलेत अथवा आता काय सांगावे असा विचार त्यांनी कधीच केला नाही. कीर्तन प्रवचनासाठी बसलेला समाज बघून त्याप्रमाणे ते निरूपण करीत असल्याने त्यांच्या कीर्तनातले प्रत्येक वाक्य प्रत्येकाला भावते. श्री पांडुरंग चरणी ते इतके एकरूप झालेले असतात की, 'ते वर्तत दिसती देही | परी ते देही ना माझ्या ठायी || अशी त्यांची अवस्था होत असे. ज्या आजरेकर फडाची वारकरी परंपरा त्यांनी हयातभर जोपासली त्यावर त्यांची दृढ श्रद्धा होती. त्याकरिता त्यांनी आपले तन-मन-धन अर्पण केले. अविचाराने, अव्यवहाराचे आणि अविश्वासाचे वातावरण प्रदूषणमुक्त करायला संतविचारांचा मारा या भूमीवर सातत्याने घातला गेला पाहिजे यासाठी आपले वृद्धत्व जाणवत होते तरी ते कीर्तन सेवेच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजात चांगला माणूस घडावा या हेतूने त्यांचे 'घडो कीर्तन सेवा सदैव या हाती' या उक्तीप्रमाणे त्यांचे भ्रमण अविरत सुरु होते यादृष्टीकोनातून त्यांनी केलेल्या कार्यावर नजर टाकली, तर त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव होते.


मागच्या एका भेटीत आधुनिक शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यासंदर्भात ढवळे गुरुजींशी साकल्याने चर्चा झाली. जग आणि आधुनिक शिक्षण पद्धती झपाट्याने बदलत असल्याचे त्यांनी मत मांडले. याविषयी बोलताना ते म्हणाले, विद्यार्थी जसा निव्वळ परीक्षार्थी असता कामा नये तसा, शिक्षकही निव्वळ 'अर्थार्जनाचे' साधन म्हणून शिक्षण क्षेत्राकडे पाहणारा असता कामा नये. 'शिक्षक' असण्याची पहिली अट 'विद्यार्थी' असणे हीच आहे. 'शिक्षक' केवळ 'पोपटपंची' करणारा, प्रश्नांना वावच न देणारा असेल तर अर्थपूर्ण ज्ञान-व्यवहार संभवणार नाही. शिक्षक-विद्यार्थी परस्परपूरक असावेत. 'चांगला' शिक्षक विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करतो. माहिती तंत्रज्ञानाचा 'विस्फोट' झालेल्या काळात विद्यार्थी पूर्वीसारखा माहितीसाठी शिक्षकांवर अवलंबून राहिलेला नाही. माहिती देण्यासाठी सुसज्ज वाचनालयापासून ते माहिती महाजालापर्यंत अनेक साधने आज सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहेत. त्या साधनांची योग्य ती 'दिशा' त्यांना खुली करून द्यावी लागेल. विद्यार्थी त्यामुळे भटकणार नाही. झपाट्याने बदलणार्‍या काळात सतत अद्ययावत राहणे हे शिक्षकांसाठी देखील गरजेचे बनले आहे. काळाची नवीन आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी दोघांनाही आता स्वतःला परस्परपूरक व समर्थ केलेच पाहिजे. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमुल्यन केला जात असल्याचे चित्र समाजात दिवस आहे. आमच्यावेळी हे कॉम्प्युटर - मोबाईल नव्हते पण मान मर्यादा आणि पावित्र्य होते. गुरू-शिष्य संबंधांमधील ती पवित्र भावना सध्या लोप पावत आहे.

१८ मे १९२० रोजी .गुरुजींचे दुःखद निधन झाले. संबंध आयुष्य भर शाळेतील विद्यार्थ्यांना व कित्येक परमार्थ साधकांना व समाजातील अनेकांना संसाररुपी भव सागरातून तरुन जाण्यासाठी दिशा दर्शक दीपस्तंभ बनून  त्यांनी काम केले.

‘विठ्ठल नामाची शाळा भरली॥ शाळा शिकताना तहान भूक हरली…॥’ अशा पवित्र वातावरणात
वारकरी संप्रदायाच्या सेवाधारी गुरुजींच्यामध्ये विचारांची आणि भावनेची श्रीमंती होती, त्याचप्रमाणे त्याग, निष्ठा, सहिष्णुता, औदार्य असे गुणही होते.


पोलादपूर तालुका हा वारकऱ्यांचा तालुका म्हणून ख्याती आहे. अगोदरच्या पिढीतील फक्त निखळ परमार्थ करणारा आणि सांगणारी गुरुजींरूपी जीवनज्योत जरी विझली असली तरी त्यांच्या सेवाकार्याचा दीपस्तंभ अध्यात्म मार्गातील नवतरुणांची वाटचाल सतत उजळवीत राहील, आज त्यांच्या जन्मदिनाच्या स्मृतींच्या प्रकाशात मात्र प्रत्येकाने आपली वाट शोधायला हवी.


- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई       

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

'अँग्री यंग मॅन' अमिताभ

 


बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आज ८ वा वाढदिवस.  आपल्या दमदार अभिनयाने अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी चित्रपटांसाठी व्यतीत केलं आहे. 

बॉलिवूडचा शहनशहा, बिग बी, महानायक अशी अनेक बिरुदं मानाने मिरवणारा हा बॉलिवूडचा बाप..वयाच्या ८ व्या वर्षीही रुपेरी पडद्यावर तितक्याच सशक्तपणे नायकाच्या भूमिकेत वावरणारा आणि प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी  ठरणारा या रुपेरी पडद्यावरच्या अनभिषिक्त सम्राटाचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा  !

'अँग्री यंग मॅन' अशी ओळख असलेल्या अमिताभ यांनी १९६९ च्या दशकापासून सिनेसृष्टीचे रुप पालटले. चार दशकांहूनही अधिकच्या कारकीर्दीत त्यांनी १८० हून अधिक चित्रपटांत काम केले. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. सर्वोत्तम अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंच चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवलाय. अग्नीपथ, ब्लॅक, पा आणि २०१५ मध्ये आलेला पिंकू या सिनेमांसाठी बिग बींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. सिनेमांसोबतच अमिताभ बच्चन यांनी गायक, निर्माता आणि टीव्ही होस्ट म्हणूनही काम केलं आहे.


भारत आणि जगभरातल्या सात विद्यापीठांकडून अमिताभ यांना डॉक्टरेट  देण्यात आलीय. यात इजिप्तमधल्या अकॅडमी ऑफ आर्ट्स आणि ऑस्ट्रेलिया  क्वीन्सलॅण्ड युनिव्हर्सिटीजचा समावेश आहे. देश-विदेशातले शंभराहून अधिक मानाचे पुरस्कार अमिताभ बच्चन यांच्या नावावर आहेत. भारत सरकारचा पद्मविभूषण  तर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अमिताभ यांना प्रदान करण्यात आलाय. लंडनमधल्या प्रसिद्ध मादाम तुसाँ या संग्रहालयात अमिताभ बच्चन यांचा मेणाचा पुतळा समाविष्ट करण्यात आलाय. हा मान मिळवणारे अमिताभ बच्चन हे आशियातले पहिले अभिनेते आहेत.

अमिताभ बच्चन हा महानायक ... पृथ्वीवरचा एकही देश असा नसेल की, महानायकाची ख्याती तिथं पोहोचलेली नाही. जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य खूप कमी लोकांना मिळतं. त्यात अमिताभ अव्वल आहेत. त्यांचं रिअल लाईफसुद्धा एखाद्या फिल्मपेक्षा कमी थरारक नाही. सुरुवातीला आलेलं अपयश, त्यानंतर मिळालेलं अमाप यश, त्यानंतर करिअरला लागलेली घसरण, गांधी-नेहरु परिवाराशी दुरावलेले संबंध अशा कधी निसरड्या तर कधी पक्क्या रस्त्यावरुन अमिताभ चालत राहिले. पण हे सगळं सुरु असताना अमिताभ कधी थांबले नाहीत. चलते रहना हा त्यांच्या आयुष्याचा फॉर्म्युला राहिला. कौन बनेगा करोडपती हा शो अमिताभ बच्चन यांच्या करीयरमधला महत्वाचा टप्पा. पडत्या काळाता या टीव्ही शोने त्यांना चांगली साथ दिली. या शोसाठी अमिताभ यांचं एका दिवसाचं मानधन आहे तीन कोटी रुपये. एका सिनेमासाठी अमिताभ बच्चन  तब्बल २० कोटी रुपये मानधन म्हणून घेतात. या वयातही त्यांचा भाव अजिबात कमी झालेला नाही.

अमिताभची उमेदवारीच्या काळातील धडपड, त्याची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीचा भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास, त्याच्या समकालीन चित्रपटांचं स्वरूप, त्याचा पडता काळ याचं सखोल, हे यापूर्वी अनेकदा लिहून आले आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला जंजीर, दिवार या चित्रपटातील विजय वर्मा या व्यक्तिरेखेने खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’ची ओळख मिळवून दिली. ७२ च्या युद्धानंतर आणीबाणी लादेपर्यंतचा तो काळ म्हणजे व्यवस्थेविरुद्ध खदखद होती. ती सुरुवातीला जंजीर आणि दिवार चित्रपटातील नायक अँग्री यंग मॅन अमिताभच्या रूपाने पडद्यावर लोकांना दिसली, अभिनयाचा तो अंगार आज सुद्धा सिनेरसिकांच्या मनावर ठसलेला आहे. अडल्या-नाडलेल्यांची पिळवणूक करणाऱ्यांना ठोसे लगावणारा कोणीतरी मासिहा अवतीर्ण व्हावा असे लोकांना वाटत होते असा तो काळ. 

सलीम-जावेद यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला ‘दिवार’ हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटच्या मृत्यूच्या सीनपर्यंत मनाची पकड घेतो. अमिताभ या चित्रपटामुळे सुपरस्टार झाला तो आजही त्या पदावर विराजमान आहे. 

अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली 'सात हिंदोस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. परंतु 'जंजीर' या चित्रपटाने त्यांना प्रकाशझोतात आणले. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर बिग बी यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ७६ व्या वर्षीही अमिताभ यांच्याकडे अनेक चित्रपट येत आहेत. अमिताभ यांनी मोठ्या पडदा तर गाजवला आहे तसेच त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची भूरळ घातली आहे. रिअलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' मधील त्यांचे सूत्रसंचालन खूपच लोकप्रिय आहे

दादासाहेब फाळके पुरस्कार या भारत सरकारकडून दिला जातो त्यासाठी अमिताभ यांची दोन वर्षांपूर्वी निवड केली. हा एक वार्षिक पुरस्कार असून भारतीय सिनेमांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो. सिनेसृष्टीतील त्याच्या योगदानाला सरकारने दिलेली ही कौतुकाची थाप असते. 



- रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

९३२३११७७०४


गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

सामाजिक कार्यकर्तृत्वाची दुसरी माळ

 पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी



जीवरसायन शास्त्रामध्ये मूलभूत संशोधन करणा-या पहिल्या भारतीय महिला कमला सोहनी या ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत यांच्या त्या भगिनी होत.  कमला भागवत-सोहोनी यांचं भागवत घराणं साधी राहणी, उच्च विचारसरणी असं होतं. सर्वच माणसं बुद्धिमान. घेतलेलं काम उत्तमरीत्या तडीस नेणारी. कमलाबाईंचा जन्म १९११ सालचा.  त्यापूर्वी मागच्या पिढीतली त्यांची आजी मॅट्रिक झालेली, इंग्रजीवर प्रभुत्व असलेली होती. मुलींनी शिक्षण घेतलंच पाहिजे, त्यापूर्वी लग्न नाही, या ठाम विचारांची. त्यांच्या नाती त्यांना इंग्रजीबद्दलच्या शंका विचारीत. आत्या, काका घरातले सर्वच लोक उच्च शिक्षण घेतलेले.

दुर्गाबाई, कमलाबाई आणि विमलाबाई तिघीही बहिणी शिकल्या. मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी मिळवणा-या त्या पहिल्या आणि त्या काळातील एकमेव महिला होत्या. तंत्रज्ञान संशोधन शिष्यवृत्ती आणि स्पिंगर रिसर्च शिष्यवृत्ती मिळवल्यानंतर त्यांनी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगलोर’ या संस्थेत प्रवेश मिळवला.  इंग्रजांच्या अंकित राष्ट्रातली एक हिंदुस्थानी मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. इसवी सन १९३३ मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात बी.एस्सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी वर्तमानपत्रातीत जाहिरातीनुसार शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स'मध्ये अर्ज केला. टाटांनी १९११ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत प्रवेश मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई. प्रवेशासाठी कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या, परंतु संस्थेचे प्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांनी 'मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही' असे कमलाबाईंना कळविले. कमलाबाई श्री. रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या व 'मुलगी म्हणून माझ्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही,आणि इथे राहून मी संशोधन करून एम.एस्सी. होणारच.' असे ठामपणे सांगितले. श्री. रामन यांनी कमलाबाईंच्या हट्टास्तव त्यांना एका वर्षासाठी प्रवेश दिला. मग वर्षभर कमलाबाईंनी बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला. वर्षअखेर रामन त्यांना म्हणाले. तुमची निष्ठा आणि चिकाटी पाहून असे वाटते की, यापुढे संस्थेत फक्त मुलींनाच प्रवेश द्यावा.'

 जीवरसायनशास्त्रात संशोधन करणाऱ्या डॉ. कमलाबाई सोहोनी यांचा भारतातल्या पहिल्या स्त्री शास्त्रज्ञ म्हाणून सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते २९ एप्रिल १९६० रोजी मिळालं आणि विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठीचा शेवटचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना १९९७ मध्ये मिळाला. दरम्यान, त्यांनी परदेशात आणि देशातही संशोधनाचं महत्त्वाचं काम केलं. त्यांच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या १५५ इतकी आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी आपलं सारं आयुष्य अन्नभेसळी विरोधातच काम करण्यात व्यतीत केलं म्हशीचे दूध मातेच्या दुधासमान करण्याची प्रक्रिया शोधणे, दुधातील व कडधान्यांतील प्रथिने शोधणे, निरा पेयाचे परिणाम व उपयोग आणि ताडगुळाविषयीचे त्यांचे संशोधन.

१९३६ मध्ये कमलाचा प्रबंध पूर्ण झाला. तिला मुंबई विद्यापीठाकडून एम.एस्सी.ची पदवी मिळाली. आता पीएच.डी.! तिने जानेवारी १९३७ मध्ये मुंबईच्या हॉफकिन इन्स्टिटय़ूटमधे प्रवेश घेतला. औषधासाठी प्राण्यांचं विच्छेदन करण्याचं काम तिच्याकडे आलं. ते काम करता करता इकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणं चालू होतं. आणि मुंबई विद्यापीठाने तिला दोन शिष्यवृत्त्या दिल्या. ‘स्प्रगर रिसर्च स्कॉलरशिप’ आणि ‘सर मंगलदास नथुभाई फॉरिन स्कॉलरशिप’ या दोन्ही शिष्यवृत्त्या मिळवणारीही ती पहिलीच विद्याíथनी. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, जीवरसायन संशोधक डॉ. डेरिक रिक्टर यांच्यामुळे कमलाला पीएच.डी.साठी १८ डिसेंबर १९३७ साली केंब्रिजमधे प्रवेश मिळाला. मुंबईत असताना १९३६ मध्ये तिने अमेरिकेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. पण वेळ टळून गेली होती. तिला पुढच्या वर्षी अर्ज करा, असं त्या विमेन विद्यापीठानं कळवलं होतं. पण कमलाने केंब्रिजला प्रवेश मिळताच त्या विद्यापीठाला कळवून टाकलं. ‘मी यंदा अर्ज करणार नाही. मला दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत. माझं संशोधन चालू आहे,’ असं पत्र एका स्त्रीकडून तेही एक मागास देशातल्या स्त्रीकडून, पाहून तिथल्या उच्चपदस्थांनी जीवरसायनशास्त्राचे जनक आणि नोबेल पुरस्कार विजेते सर गॉलंड हॉपकिन्स यांना पत्र पाठवून विचारलं, ‘ही अजब मुलगी कोण? तिची माहिती कळवा.’ हॉपकिन्सनी कळवलं, ‘अत्यंत बुद्धिमान, कठोर परिश्रम करणारी ध्येयवेडी मुलगी आहे.’ हॉपकिन्सचं हे प्रशंसापत्र पाहून ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सटिी, विमेन’ फार प्रभावित झाली. त्यांनी कमलाला ताबडतोब पत्र लिहिलं, ‘‘आम्ही तुला प्रवासी शिष्यवृत्ती देत आहोत. तिच्या आधारे तू अमेरिकेत ये.’’ (१९३८) ‘काही तरी घोटाळा आहे. ही शिष्यवृत्ती तर प्रोफेसरना देतात, मला कशी?’ असा प्रश्न कमलाला पडला. तिने हॉपकिन्सना विचारलं. त्यांनी सगळी हकिगत सांगून म्हटलं, ‘यात काही घोटाळा नाही.’ अर्थात कमलाला अत्यंत आनंद झाला. मार्च १९३८मध्ये युरोपात लीग ऑफ नेशन्सची बठक होती. तेथील विद्यार्थी परिषदेला हजर राहा, असं तिला सांगण्यात आलं. तेही भारत, इंग्लड, अमेरिका या तीन देशांतील विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून. कारण काय तर ती भारतीय, शिकत होती केंब्रिजमध्ये (म्हणजे युरोपात) आणि अमेरिकन फेडरेशनने तिला फेलोशिप दिली म्हणून ती अमेरिकन विद्यार्थिनीपण होती. लक्झेंबर्गला ती गेली. तिला ठरावीक प्रश्न विचारण्यात आले. आपल्या भाषणात तिने सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या संशोधनाच्या आवडीबद्दल सांगताना वडिलांचा संदर्भ दिला. घरातलं मोकळं वातावरण आणि वडिलांनी मुलगी म्हणून कधीच आडकाठी केली नाही. मला ज्यात रस होता ते शिकण्यासाठी मदत केली. तिच्या या भाषणाचं अर्थातच कौतुक झालं.

केंब्रिजला परतल्यावर तिचं संशोधनाचं काम सुरू झालं. आता तिनं व डॉ. डेरिक यांनी वनस्पतींवर काम सुरू केलं. प्रचंड आणि सातत्याने काम करत असताना तो क्षण आला. अचानक कमलाला एक महत्त्वाचा शोध लागला. बटाटय़ातील प्रेसिपिटेट हँड-स्पेक्ट्रोस्कोपमधून पाहताना तिला एक निराळ्याच रंगाची रेष दिसली. त्याचं नाव सायट्रोक्रोम ‘सी’. वनस्पतींच्या श्वसनक्रियेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या सायट्रोक्रोम घटकाचा शोध होता तो. तिने आणि मार्गदर्शक रॉबिन यांनी अधिक अभ्यास करून त्यावर लेख लिहिला. आजही जगात वनस्पतींच्या श्वसनाचा विषय चच्रेला येतो तेव्हा कमला भागवत यांचा व ‘नेचर’मधील त्यांच्या लेखाचा (१९३९) उल्लेख असतोच. ‘वनस्पतींमध्ये सायटोक्रोमचा शोध’ हा पीएच.डी.चा विषय तिला आवडला. तिने मार्गदर्शक रॉबिन यांचा सल्ला घेऊन प्रबंध लिहिला.

केंब्रिज विद्यापीठाकडून पीएच.डी. मिळवणारी ती पहिली भारतीय स्त्री आणि मराठी भाषिक. १४ महिन्यांत प्रबंध हा एक विक्रमच होता. अनेकांनी आग्रह करूनही परदेशात मिळालेलं शिक्षण, ज्ञान आपल्या देशासाठी उपयोगात आणायचं या उदात्त विचाराने ती भारतात परतली..

तत्पूर्वी, भारतात परतण्यापूर्वी एक घटना घडलेली होती.. दिल्लीच्या लेडी हार्डिज कॉलेजला ‘लेडी डफरीन फंड’ची मदत होत होती. आणि त्या फंडच्या सल्लागार समितीवर कमलाबाईंचे केंब्रिजमध्ये गुरू सर एफ. जी. हॉफकिन्स होते. त्या कॉलेजमध्ये जीवरसायनश्स्त्र विभाग नव्याने उघडण्यात येणार होता. तिथे विभाग प्रमुख म्हणून सर हॉफकिन्सनी कमलाबाईंचं नाव कळवून टाकलं. त्या वेळी कमलाबाई पीएच.डी.साठीच्या संशोधनात मग्न होत्या. त्या हॉफकिन्सना म्हणाल्या, ‘मी ज्या कामासाठी इथे आलेय ते पूर्ण झाल्याशिवाय परत जाण्याचा विचारही करणार नाही.’ हॉफकिन्सना त्याचं कौतुक वाटलं. त्यांनी दिल्लीला कळवलं, ‘ती जागा कमला भागवत यांच्यासाठी राखून ठेवावी. ते पद भरू नये.’ त्यामुळे भारतात आल्यावर १ ऑक्टोबर १९३९ पासून कमला भागवत दिल्लीत लेडी हाìडज कॉलेजमध्ये जीवरसायनशास्त्राच्या व्याख्यात्या म्हणून रुजू झाल्यामहाराष्ट्र सरकारने मुंबईतील विज्ञानसंस्थेत जीवरसायनशास्त्राचा विभाग नव्याने उघडला. तिथे कमलाबाई १९ जून १९४९ ला विज्ञान संस्थेत रुजू झाल्या. म्युझियमसमोर या विभागाला स्वतंत्र जागा मिळाली आणि कमलाबाईंनी सुसज्ज प्रयोगशाळा उभारली. आपल्या विद्यार्थ्यांना (एम.एस्सी.) त्या सहा-आठ महिने शिक्षण देऊन नंतर संशोधन करायला सांगत.

पुढे कमलाबाई इन्स्टिटय़ूटच्या संचालक झाल्या. या पदाची धुरा नि:पक्षपाती बुद्धीने सांभाळून १८ जून १९६९ रोजी निवृत्त झाल्या. प्रख्यात शास्त्रीय संशोधन संस्थेच्या त्या पहिल्या स्त्री संचालक ठरल्या. त्यांनी इतिहास घडवला. कमलाबाईंच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या १५५ इतकी आहे.

त्यांचे अनेक विद्यार्थी परदेशात गुरूचं नाव उज्ज्वल करीत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांनी भरभरून आणि आपुलकीने प्रेमाने ज्ञान दिलं. निवृत्त झाल्यावरही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. ग्राहक मार्गदर्शन सोसायटी ऑफ इंडियासाठी काम करीत तिथेही अन्नातली भेसळ कशी ओळखायची यावरती शिबिरं घेतली. यावरती प्रात्यक्षिक देऊन खेडय़ापाडय़ात, शहरात सर्वसामान्य ग्राहकाला वापरता येईल अशी शोध पेटी तयार केली. विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिलं.१९९७ मध्ये आयुष्याच्या अखेरीस कमला सोहोनी यांना विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. भारतीय वैद्यकीय संशोधन खात्याने त्यांना सन्मानित करण्यासाठी एक खास कार्यक्रम दिल्ली इथे आयोजित केला. कमलाबाई सोहोनी यांच्या सन्मानार्थ खूप प्रेक्षक सभागृहात जमले होते. सर्वानी उभं राहून टाशांचा कडकडाटात त्यांच्या कार्याला मानवंदना दिली. आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हातात पुरस्कार घेऊन उभ्या असलेल्या कमलाबाई व्यासपीठावर कोसळल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण अगदी थोडय़ा दिवसांत त्या गेल्याच. तारीख होती २६ सप्टेंबर १९९७. वयाच्या ८५ व्या वर्षी त्या अनंतात विलीन झाल्या. कमलाबाईंनी केंब्रिजपर्यंत धडक मारली आणि प्रत्येक ठिकाणी आपला प्रथम क्रमांक कायम राखला. कसलीही प्रसिद्धीची हाव नाही. आयुष्यभर ज्ञानार्जन आणि विद्यार्थ्यांना प्रेमाने ज्ञान देणं यात त्या रमल्या. सरकारी नोकरीतही त्यांनी देशहित पाहिलं. कुणाचाही दबाव सहन करता उत्तम काम केलं. या प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या प्रेमळ कर्तव्यतत्पर शास्त्रज्ञस्त्रीला माझे लाख लाख प्रणाम !



..... रवींद्र मालुसरे

९३२३११७७०४

 

सामाजिक कार्यकर्तृत्वाची पहिली माळ

  ज्ञानाई सावित्रीबाई फुले 



सावित्रीबाई फुले भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका. क्रांतिबा जोतिराव फुले यांच्या पत्नी.  शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खऱ्या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही, असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. तिने वयाच्या दहाव्या वर्षापासून अक्षरओळख करून घेतली. साक्षर झाली.त्या शाळेत जय लागल्या कि कर्मठ लोक त्यांच्यावर दगड,शेण व चिखल फेकत असत. काहीजण त्यांच्या अंगावर धावून जात परंतु ह्या सर्वाना सावित्रीबाईंनी खंबीरपणे तोंड दिले.  अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी पुले दांम्पत्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली. ही शाळा पुढे भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून गणली गेली. तसेच पुण्यात व मुंबईतही मुलींसाठी शाळा सुरु केला. गिरगावातील कमलाबाई हायस्कुल अजूनही कार्यान्वयीत आहे. ज्योतीरावांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांची त्या शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती केली. ज्योतीरावांनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले आणि तिच्यात शिक्षिका होण्याची गुणवत्ता निर्माण केली. त्या पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटल्या गेल्या.

१९  व्या शतकात स्त्री शिक्षणात त्यांनी केलेली कामगिरी अद्वितीय ठरली. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य १८ व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते.  शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

अभिरुची संवर्धन व चारित्र्याची जडणघडण या गोष्टींकडे फुलेंच्या शाळांमध्ये कटाक्षाने लक्ष दिले जात असे. त्यामुळे फुले दांम्पत्यांच्या शाळांमधील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांच्या संख्येपेक्षा १० पटीने वाढली. इतकेच नव्हे तर, फुलेंच्या शाळेतील मुली परीक्षेतही सरकारी शाळेतल्या मुलांपेक्षा गुणवत्तेत सरस ठरल्या. परिणामी फुले दांम्पत्यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीची सर्वदूर प्रशंसा झाली.

स्त्रियांसोबत होणाऱ्या क्रूर प्रथाना त्यांनी विरोध केला. बालविवाह,बाळ-जरठ विवाह, सतीप्रथा,केशवपन अश्या नावाखाली वर्षानुवर्षे होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात त्यांनी सरकार दरबारी आवाज उठवला. तरुण मुली अनेकदा नराधमांच्या शिकार बनत त्यांच्या आणि गरोदर विधवांच्या संततीला समाजात मंचाने स्थान नव्हते. अशा स्त्रियांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करताना त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले. सावित्रीबाई व ज्योतिराव फुलेंना स्वतःचे अपत्य नव्हते. त्यांनी एका विधवेला व तिचा मुलगा यशवंत याला आधार दिला. पुढे रीतसर यशवंतला दत्तक घेतले. तसेच त्याच्या आईचा सांभाळ केला अनेकांचे आंतरजातीय विवाह लावून दिले. पुनर्विवाह चळवळीत भाग घेतला. विधवा केशवपना विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. दीडशे वर्षापूर्वी स्त्री-पुरुष समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारुन तत्कालीन रुढीप्रिय समाज व्यवस्थेशी कडवी झुंज कोणी दिली, तर ती फुले दांम्पत्याने. बालविवाहाला विरोध करुन ते थांबले नाहीत, तर विधवांचा पुनर्विवाह करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडलं. विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मागणी केली आणि या सामाजिक कार्यात फुले दांम्पत्यांना यश येऊन त्यास १८५६ मध्ये मान्यता मिळाली. 



सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. त्यामुळेच १८७६७७च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.'काव्यफुले' व 'बावनकशी' हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्यातील मोलाच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा जन्मदिन हा 'बालिकादिन' म्हणून ओळखला जातो.



रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

९३२३११७७०४ 

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

महात्मा गांधीजी कळणार नाहीतच

 

मेल्यानंतरही माणूस जिवंत राहतो काय ? तो माणूस कसा आहे यावर त्याचे उत्तर अवलंबून आहे किंवा तो माणूस कशासाठी जगत होता यावरही अवलंबून आहे.

मारूनही जीवंत राहातो...प्रेषित म्हणून जगाला प्रेरणा देत नतमस्तक व्हायला लावतो तो "गांधी"
स्वातंत्र्य-संघर्षात, जीवन संग्रामात माणसाची कुळी लावणाऱ्याने जगावे कसे व मरावे कसे यांची मोलाची शिकवण देणारा गांधी नावाचा एक भणंग महात्मा जन्माला आला होता. केवळ भाषणापूरता, कृतीपुरता, किंवा लौकिकापुरताच लोकोत्तर नव्हे तर साध्या साध्या दैनंदिन गोष्टीत, अविर्भावात व श्वासोच्छ्वासात लोकोत्तर वाटणारा हाडामासाचा कुणी एक 'गांधी' नावाचा माणूस या भारत भूमीत वावरला यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काहीशा उशिराने जन्मलेल्या आमच्या पिढीला गांधी फक्त पाठ्यपुस्तकातून माहित होते, गांधींना पाहिलेली वा त्यांच्या हाकेला ओ देत चळवळीत भाग घेतलेली पिढी संपत चालली आहे. पडद्यावरचा गांधी मात्र घराघरांत पोहोचला.
ब्रिटिश निर्माता रिचर्ड एटनबरो यांनी १९८२ मध्‍ये ‘गांधी’ हा तर राजकुमार हिरानी यांनी २००६ मध्‍ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपट आणला. प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलेल्‍या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी गांधीजींची व्‍यक्‍तिेरखा साकारली होती.


निष्पाप माणसाचं जेव्हा जालियनवाला बागेत क्रूर हत्याकांड केले जाते तेव्हा हा महात्मा गांधींनी ब्रिटिशांना इशारा दिला होता, 'तुम्ही जा नाही तर तुम्हाला जावे लागेल.' गांधीजी हे केवळ निर्भय नेते नव्हते तर शाश्वत सत्याचा आग्रह धरणारे आणि तेच ध्येय उराशी बाळगणाऱ्या समुदायाचे नेतृत्व करणारे होते. अफगाणिस्तान पासून बांगलादेश पर्यंत सर्वधर्मीय स्वातंत्र्याच्या ध्येयापोटी गांधींना नेता मानून एकत्र
आले होते, कारण गांधींच्या नेतृत्वात लोकांना जगण्याची नैतिकता स्पष्ट दिसत असे. गांधी म्हणजे निर्मळ, अधिक उन्नत, उदात्त, निर्भयता, धैर्य आणि त्याग यांचे जीवंत प्रतीक होते म्हणूनच नायक या नात्याने स्वीकारले होते.

गांधींचा निर्भयपणा, बावनकशी सच्ची प्रामाणिकता आता कुठेच दिसत नाही. मूल्यहीन समाजात आपण एकमेकांना, परस्परांना ओरबाडून घेण्यात मग्न आहोत.
गांधीहत्येपूर्वीच तुकडे झालेल्या या अवाढव्य देशात आजच्या घडीला आमच्या तरुण पिढीला दिसतोय उध्वस्त जीवन जगणारा अफाट जनसमुदाय. बंद उद्योग, बेकारी आणि बेशिस्त, बेजबाबदार राजकारणी आणि त्यामुळेच लोकशाहिवरचा लोकांचा उडत चाललेला विश्वास आपण पाहतोय.
गांधीने गोऱ्यांचे राज्य खालसा केले पण गेल्या ७४ वर्षात आपल्याच काळ्या माणसांच्या राज्यात जातीय दंगे, राजकीय हिंसाचार आणि प्रांतीय संकुचित दृष्टीचा उदोउदो चौफेर ऐकू येतोय !
खून, मारामाऱ्या, गुंडगिरी, हिंसाचार व क्रौर्य यांचा सुळसुळाट असलेल्या गुन्हेगारी दुनियेतच आपण जगतोय. त्यातूनच अस्थिरता, असुरक्षिता यांनी आम्हाला पुरतं घेरलेय. आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या समाजजीवनात वासना, विकृती, द्वेष, लोभ, स्पर्धा, मत्सर, लाचारी आणि स्वार्थ, राजकिय वारसदारी या प्रवृत्तींना उधाण आलंय आणि त्याचमुळे वैफल्य भावनेने युवकाला ग्रासले आहे.


गांधींनी आयुष्यभर ज्या स्वप्नांना जिवापाड जोपासले त्यांची होत असलेली होळी आपण पाहतोय. काँग्रेसने गांधींच्या 'रामराज्य' या संकल्पनेचा पार विचका केला तर ज्यांनी गांधींच्या हत्येचे समर्थन केले तेच 'गांधीवादाचा बुरखा' पांघरून त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत आपल्याकडे मते मागत आहेत.
गांधीजी मध्ये काय होते, अतिशय विशुद्ध अशी सत्यसाधना आणि करुणेचा ओलावा..... म्हणूनच मित्रांनो महात्मा गांधी या व्यक्तीची हत्या होऊ शकली मात्र त्यांच्या विचारांची नाही. ज्या शतकात विंधवस्क बॉम्ब जन्माला आला त्याच शतकात मोहनदासचा जन्म झाला जो पुढे जगाच्या अंतापर्यंत
एक प्रेषित म्हणून 'महात्मा गांधी' नावाने शिल्लक राहणार आहे.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

बुधवार, २० मे, २०२०

दुसऱ्याना तेजोमय करणारा 'रवी '


दुसऱ्याना तेजोमय करणारा 'रवी ' 




                                      -  सायली प्रशांत भाटकर, दैनिक मुंबई तरुण भारत  

शनिवार, १६ मे, २०२०

अटल बिहारी वाजपेयी : संसद मंदिरातील दीपस्तंभ


अटल बिहारी वाजपेयी  : संसद मंदिरातील दीपस्तंभ 



 ग्वाल्हेरच्या एका उपनगरातील शाळा मास्तराचा मुलगा म्हणून कारकिर्दीला प्रारंभ करणारे वाजपेयी आर्य समाजाचे सदस्य झाले, संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले जनसंघाचे नेते बनले, खासदार बनले, भाजपचे संस्थापक बनले, संसदेत विरोधी पक्षनेते बनले, आणि पाच वर्षाची कारकीर्द पूर्ण करणारे पहिले काँग्रेसेतर पक्षाचे पंतप्रधान बनले. हे स्थान मिळवून वाजपेयींनी इतिहासाचं नव तेजस्वी पान लिहिल.ग्वाल्हेर मधील प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या मुलाच्या दृष्टीनं हे काही सोपं काम नव्हतं.  देशातील अत्यंत लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक ! ते २००९ साली आजारानं कमजोर झाले; पण त्यापूर्वीच्या पन्नास वर्षे ते त्यांच्या पक्षाच्या अत्यंत उच्च वर्तुळातील महत्वपूर्ण हस्ती होते. नेमकी धोरणात्मक उद्धिष्ट असलेला आणि सीमित लोकप्रियता लाभलेला लहानसा हिंदुत्ववादी पक्ष त्यांनी प्रयत्नपूर्वक विकास घडवून आज भारताच्या संसदेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या स्थानी नेऊन पोहोचवला आहे. वाजपेयी म्हणजे ब्रम्हचारी ....त्यांना कवितेच आणि खानपानाच वेड ! भारतीय जनता पक्षाचा उगम ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून झाला त्या संघाची उद्दिष्ट अधिकच कडवी होती, वाजपेयी प्रचारक असले तरी त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी आणि पारंपरिक विचारांच्या उच्च वर्तुळात त्यांचं वेगळेपण नेहमीच उठून दिसायचं. 

१९४२ च्या महात्मा गांधींच्या भारत छोडो चळवळीनंतर ब्रिटिश हिंदुस्थान सोडून जातील अशी आशा बाळगणारे वाजपेयी त्या काळाच्या अन्य महाविद्यालयीन युवकांप्रमाणे हा गांधींचा प्रयत्न संपला असे समजून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकृष्ट झाले. शाळेत असताना त्यांनी रचलेला एक पोवाडा आता संघाच्या अनेक शाखांमध्ये गायला जातो, "हिंदू तनमन,हिंदू जीवन,रग रग मेरा हिंदू परिचय" 
१९२५ साली डॉक्टर हेगडेवार यांनी राष्ट्रीय सवयंसेवक संघाची स्थापना केली होती. त्यावेळी बाबासाहेब आपटे हे देशभर प्रवास करून नवे स्वयंसेवक शोधण्यात मग्न असतात. त्यावेळी आपटे यांचा खूपच त्यांच्यावर प्रभाव पडू लागला. वाजपेयींनी संघाच्या कार्यात पूर्णपणे बुडून गेल्यानंतर त्यांना हिंदी मासिक राष्ट्रधर्म, हिंदी साप्ताहिक पांचजन्य, आणि स्वदेश आणि वीर अर्जुन हि दैनिक यांच्या संपादनाच काम बघू लागले. त्यानंतर जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सुरुवातीला त्यांचे टंकलेखक,सचिव,अनुवादक आणि मदतनीस अशी चौफेर जबाबदारी एकहाती निभावत असत. त्यांनी त्यांच्या त्यांच्या उत्तम वक्तृत्व कौशल्याचा उपयोग करून घेतला.  

वाजपेयींचे राजकारणातील प्रारंभीचे गुरु होते, दीनदयाळ उपाध्याय. ते वाजपेयींसारखेच उच्चकुलीन हिंदू आणि पूर्णवेळ संघाला वाहून घेतलेले कार्यकर्ते होते. शेतजमिनींबाबत पुनर्रधोरण, हिंदू जातीयेतील उच्च-निचतेच उच्चटन, इतर पक्षांशी सहकार्य यांसारखी धोरण आखण्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक बैठक वाजपेयीजींना दीनदयाळ यांच्याकडून लाभली. त्यामुळेच भाजपचे नेतृत्व करताना त्यांना पक्षाचा सामाजिक,वैचारिक आणि भौगोलिक पाया अधिक व्यापक होण्यास खूपच मदत झाली. आज संघ सुद्धा पेहेरावासकट वैचारिकदृष्ट्या बदलतोय त्यामागचं एक कारण वाजपेयींनी आग्रहपूर्वक धरलेली सर्वसमावेशकता हे आहे. 
राजनीतीज्ञ या भूमिकेत वाजपेयींना अवगत असलेलं असामान्य वक्तृत्व आणि आत्मविश्वास हि त्यांच्या राजकारणातील प्रदीर्घ कारकिर्दीतील अनेकविध भूमिकांची फलश्रुती म्हटलं पाहिजे. वाजपेयींना संसद हे पवित्र मंदिर वाटत असे आणि तेथे ते नीटपणे तयार केलेली भलीमोठी भाषण करत असत. 
१९३९ सालापासून ते थेट २१ व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत त्यांनी भारतीय जनजीवनातील अनेक महत्वाचे विषय हाताळले आणि त्यात प्रयोग केले. साम्यवादापासून स्वदेशीपर्यंत आणि उदारीकरणापर्यंत विविध बाबींची त्यांनी सक्रिय दाखल घेतली. वाजपेयी अत्यंत कुशल राजकारणी होते आणि कोणाच्या वेळेस कोणती खेळी खेळणं योग्य ठरेल हे ताडून जागरूकतेने ते बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत.
संघातील काही गट वाजपेयींना ढिसाळ संघटक, संधीसाधू आणि मार्गच्युत समाजत होते.परंतु तरीसुद्धा त्यांचं महत्व उत्तरोत्तर वाढतच गेलं. त्यांचे वाईटात वाईट टीकाकारसुद्धा नाईलाजानं काबुल करत कि, ते वरकरणी निरुपद्रवी भासणार बाह्यरूप अत्यंत फसवं होत. त्यांच्या तीक्ष्ण कानातून काहीही सुटत नसे. आपल्याला कमी लेखनाऱ्या शत्रुंना ते असे काही नामोहरम करीत कि त्यांची राजकीय कारकीर्द संपून जात असे. मात्र कठीण परिस्थिती अखेरच्या क्षणी निसटता विजय मिळवण्यात ते माहीर होते. 

१९६२ च्या चीन आक्रमणानंतर वाजपेयी आणि त्यांच्या पक्षातले मूठभर सदस्य पंडित नेहरूंच्याकडे गेले आणि त्यांनी आक्रमणाबाबत चर्चा घडवण्यासाठी संसदेची संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी केली, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी त्यांची हि मागणी ताबडतोब मान्य केली कारण त्यांना माहित होते...हा तरुण पुढे आपल्या देशाचा पंतप्रधान होणार आहे. 
शेवटी कविहृदयाच्या राजकारणपटूंच अस्ताला जाताना वर्णन करताना लिहावंसं वाटत -
आयुष्याच्या संध्यासमयी चैतन्य उसळावं 
प्रकाश अस्ताला जाण्यापूर्वी त्वेषान सज्ज व्हावं


रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष 
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...