उद्धव ठाकरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उद्धव ठाकरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ?

 शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ?

◆ महेश सावंत कोण ?
२१ मार्च २०१७ ला मुंबई मनपा ची निवडणूक झाली, या महापलिका निवडणुकीत महेश सावंत यांनी प्रभादेवी वॉर्ड १९४ मध्ये बंडखोरी केली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र 'समाधान' यांना आव्हान दिलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर महेशने ही निवडणूक लढवावी असा प्रयत्न त्यावेळी झाला, परंतु महेश अपक्ष उमेदवार म्हणूनच ठाम राहिला. विद्यमान नगरसेवक संतोष धुरी निवडणुकीच्या रिंगणात हे सुद्धा असल्याने व प्रभादेवीच्या घराघरात संपर्क असलेल्या महेशमुळे निवडणूक सुरुवातीपासूनच रंगात आली, अटीतटीची होणारी ही निवडणूक निकालाच्या दिवशी उद्धव साहेबांचे समाधान न होता बंडखोराला विजयाची लॉटरी लागणार अशी शक्यता आहे याचे राजकीय निरीक्षकांनी भाकीत वर्तवले होती. असे घडू नये याची कल्पना आल्याने निवडणूकीच्या २ दिवस अगोदर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामना समोरच्या रस्त्यावर भव्य प्रचार सभा घेतली आणि प्रभादेवीकरांना जाहीर आवाहन केले की, "या वार्डात बंडखोरी करून काही फडकी फडकत आहेत त्याच्या चिंध्या करा !" त्याचबरोबर पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्यामुळे सावंत यांची उद्धव ठाकरेंनी हकालपट्टीही केली होती. परंतु महेश सावंत यांना माहीम, वडाळा, दादर, वरळी येथील काही मोठ्या सेनानेत्यांचा छुपा पाठींबा होता हे काही गोष्टीत लक्षात येत होते.
सावंत यांना निवडणुकीत सुमारे ८३०० मते मिळाली होती. पण समाधान सरवणकर यांचा २५० मतांनी निसटता विजय झाला होता. निकालाची ती संध्याकाळ मला आठवतेय, सामना दैनिकाच्या आणि महेशच्या वाकडी चाळीच्या समोर महेशच्या निवडणूक चिन्ह असलेल्या नारळ या चिन्हावर राग काढताना शेकडो नारळ रस्त्यावर फोडीत ढीग रचला होता. पुढे ४ महिन्यानंतर मातोश्री निवासस्थानी सावंत यांना उध्दवजींनी पुन्हा शिवसेना पक्षात घेतले.
सरवणकर शिवसेना कार्यकर्ता ते आमदार अशी राजकीय वाटचाल आहे. १९९२ ते २००४ तीन वेळा नगरसेवक, त्यावेळी २००२-२००४ या दोन वर्षात स्थायी समिती अध्यक्ष. त्यानंतर २००४, २०१४, २०१९ विधानसभेत शिवसेनेचे आमदार, २००९ च्या निवडणूकीच्या वेळी तिकीट नाकारल्यानंतर नारायण राणेंच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश करून निवडणूक लढवली परंतु पराभव झाला. २०१२ मध्ये शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला.
कधीकाळी आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक अशी ओळख महेश सावंत यांची होती. २००९ मध्ये सदा यांनी विधानसभा तिकीट नाकारल्या नंतर त्यांच्यासोबत तेव्हाचे शाखाप्रमुख महेश सावंत हे सुद्धा होते, सदा सरवणकर (काँग्रेस), आदेश बांदेकर (शिवसेना) यांचा पराभव झाला आणि राज ठाकरे यांच्या मनसेचे नितीन सरदेसाई आमदार झाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील हा पराभव मातोश्रीला फारच अस्वस्थ करून गेला. दादर प्रभादेवीत अनेक मनसेचे अनेक नगरसेवक निवडून आले, त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी सदा सरवणकर यांना पायघड्या घालून शिवसेना पक्षात घेतले गेले आणि पुन्हा ते आमदार झाले. आता 'आमचीच खरी शिवसेना' म्हणत पुन्हा त्यांनी शिंदेगट जवळ केला आहे. मात्र 
एकेकाळी एकाच रस्त्यावर स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या आसपासच्या चाळीत राहणारे हे दोघे मित्र एकेकाळी कट्टरमित्र होते, परंतु सध्या सरवणकर यांचे ते कट्टर विरोधक आहेत. एकनाथ शिंदे यांनी अलीकडे शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्या बरोबर ज्या ४० आमदारांनी बंडखोरी केली त्यात सदा सरवणकर हेही अखेरच्या काळात गोहोटी येथे सहभागी झाले.....

◆ दादर आणि ठाकरे परिवाराचे ऋणानुबंध
दादर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. दादर आणि शिवसेना हे अतूट बंधन ! दादर म्हणजे ठाकरे घराण्याच्या वास्तव्याचा १२० वर्षाचा कालखंड ! सुरुवातीला प्रबोधनकार मुंबईत आल्यानंतर दादरमध्ये 'मिरांडा' चाळीत राहिले, त्यानंतर प्लाझा समोर 'कामाठी चाळीत' व शेवटी सेनापती बापट यांच्या पुतळा आहे त्याठिकाणी. व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकचे वितरण तिथूनच होत असे. १३ ऑगस्ट १९६० ला दादरच्या बालमोहन विद्यालयाच्या हॉलमध्ये मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करून मार्मिक सुरु झाला. १९ जून १९६६ ला रितसर शिवसेनेची स्थापना झाली.
३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तुडुंब गर्दीत झाला. एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान आणि गर्दीचा उच्चांक मोडणारी शिवाजी पार्कची सभा असे समीकरण दुसऱ्या कुणाच्याही वाट्याला आले नाही. त्याला यंदा ५६ वर्षे होत आहेत. १९७१ साली शिवसेनेचे पहिले महापौर डॉ हेमचंद्र गुप्ते हे दादरच्या. त्यानंतर सुधीर जोशी, मनोहर जोशी, दिवाकर रावते, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत हे मुंबईचे महापौर झाले आहेत. १९ जून १९७७ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दादरमध्ये शिवसेनेचा कारभार चालविण्यासाठी शिवसेना भवनाचे उद्घाटन झाले. २३ जानेवारी १९८९ रोजी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' दादरचा भाग असलेल्या प्रभादेवी येथील नागुसयाजीच्या वाडीत सुरु झाला.
१९९२ ला युतीची पहिली सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री म्हणून दादरच्या प्रि. मनोहर जोशी सरांनी शपथ घेतली. पोर्तुगीज चर्च येथे प्रबोधनकार सीताराम केशव ठाकरे यांचा पूर्णाकृती तर शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा सुंदर अर्धाकृती पुतळा आहे. १७ नोव्हेंबर २०१२ ला शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्क मध्येच लाखोंच्या उपस्थितीत करण्यात आले.

◆भविष्यातली राजकीय वाटमारी
माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची दखल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली आणि त्यांची माहीम-दादर-प्रभादेवीचे विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केली. सरवणकर यांच्या सोबत सावली सारखे असलेले त्यांचे अनेक निष्ठावंत पदाधिकारी उपविभाग संघटक कैलास पाटील, शाखाप्रमुख संजय भगत, शैलेश माळी व असंख्य कार्यकर्ते उध्दवजींच्या सोबत आहेत त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान आणि संघर्ष काय होणार आहे त्यातून भविष्यात सदा सरवणकर राजकीय पटलावर कुठे असतील हे काळ ठरवणार आहे. मतदार संघात ३० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना सरवणकर हे लोकप्रिय आणि कार्यसम्राट म्हणून परिचित आहेत. लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी वेळ आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणारा नेता म्हणून ओळख आहे. परंतु तळागाळातील कार्यकर्ता जाग्यावरच आहे. मतदारांची सहानुभूती सध्या तरी संयमाने मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या उध्दवजींच्या बाजूने आहे. ती मतांच्या स्वरूपात निवडणुकी पर्यंत किती टिकून राहतेय हे सुद्धा महत्वाचे आहे.
शिवाय शिवसेना पक्षफुटी पुर्वी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे माहिम मधून विधानसभा लढवणार अशी वदंता माध्यम जगतात होती. तशी बॅनर्सबाजी सुध्दा परिसरात दिसून येत आहे. राजकारणात काहीही घडू शकते हे मागचे माविआचे सरकार पडताना दिसून आले. पोलादी आणि बलदंड असलेल्या शिवसेना पक्षात नेतृत्वाच्या विरोधात जात एव्हढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन पक्ष संपवण्याची प्रक्रिया होईल असे कोणत्याही मराठी माणसाला स्वप्नातही वाटले नसावे. आणि पक्ष फुटल्यानंतर गद्दारांच्या विरोधात सेनाभवनावर निदर्शने आणि शिंदेंच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्यानंतर आपले नेते आमदार सरवणकर बंडखोरी करीत डायरेक्ट टीव्हीच्या बातमीत गोहाटीच्या आलिशान हॉटेलमध्ये दिसतील असे स्थानिक शिवसैनिकांनाही वाटले नसेल....

- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ
9323117704




सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

वृत्तपत्र लेखकांनी पेनाची निब बोथट होऊ न देता निर्भीडपणे लिहावे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे

 मातोश्रीवर नवशक्तिच्या जमका चळवळीच्या अमृत महोत्सवाला प्रारंभ



वृत्तपत्र लेखकांशी आमचे तीन पिढ्यांचे नाते आहे. तर सहावी पिढी लोकांमध्ये काम करते आहे. आम्हा ठाकरे कुटुंबियांना पत्रकारितेच्या सोबत कलेचाही वारसा आहे. त्याची नोंद इतिहासात आहे. साहजिकच तुम्ही आणि आम्ही लोकांसाठी काम करतो आहोत. तुम्ही मला पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह भेट दिलेत, पेनाची टोकदार निब महत्वाची असते. तुम्ही निर्भीडपणे लिहिता ती लेखणीची धार कधीही बोथट होऊ देऊ नका. बाळासाहेबांचे व्यंगचित्रांचे 'फटकारे' नावाचे पुस्तक आहे, त्यावर फटका मारणारा वाघाचा पंजा आहे. वृत्तपत्र लेखक सुद्धा समाजातले व्यंग शोधून बोचकारत असतो, साहजिकच बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी जसे राजकारणी दुखावतात तसे तुम्ही व्यक्त केलेल्या मतांनीही आम्ही राजकारणी आणि प्रशासन घायाळ होतो.  परंतु त्याला एक अर्थ आहे. जे पटत नाही ते निस्पृहपणे आणि निर्भीडपणे जाहीररीत्या सांगणे हे तुमचे महत्वाचे काम आहे ते तुम्ही 'कर नाही त्याला डर कशाला' या भावनेने लिहीत राहा असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ या निमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मातोश्री येथे कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, आमदार नितीन बानूगडे पाटील, आमदार रवींद्र वायकर, चंद्रकांतमामा वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

वृत्तपत्र लेखन चळवळीसाठी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलेल्या ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुनिल कुवरे आणि दिलीप ल सावंत यांना यंदाचा जीवन गौरव प्रदान करण्यात आला.  तर नवशक्तीचे कार्यकारी संपादक प्रकाश सावंत, संस्थेचे माजी प्रमुख कार्यवाह आणि वृत्तमानसचे सहसंपादक सुनिल रमेश शिंदे यांचा चळवळीतील योगदानाबद्दल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राजन देसाई यांनी संपादित केलेल्या '"शिवसेना आणि मराठी माणूस" हे वृत्तपत्र लेखकांनी व्यक्त केलेले ई पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्याचे देशभरचे वातावरण पाहाता अघोषित आणीबाणी आहे की काय अशी परिस्थिती आहे, इंदिरा गांधींनी आणीबाणी देशावर लादली होती परंतु ती घोषित आणीबाणी होती. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी आणीबाणीला पाठिंबा दिला होता तरी मार्मिकसह सर्व वर्तमानपत्रांवर आणि विचार स्वातंत्र्यावर बंधने होती. आजच्या प्राप्त परिस्थितीत मतस्वातंत्र्य मानणाऱ्यांची मग ती प्रिंट मीडिया असो वा अलीकडच्या सोशल मीडियावर तात्काळ व्यक्त होणे असो यांची जबाबदारी वाढली आहे. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारी ही वृत्तपत्र लेखकांची चळवळ आणि तुम्ही जुनी जाणती परंतु समाजातील जागती मंडळी आज माझ्यासमोर आहात. बाळासाहेब मला नेहमी सांगायचे लोकांना काय पाहिजे हे समजण्यासाठी एकवेळ तू अग्रलेख वाचू नकोस परंतु सामान्य माणसांचा आवाज असलेली वाचकांची पत्रे जरूर वाच. तुमच्या जागेची अडचण आहे तेव्हा हे जागल्यांचे व्यासपीठ अबाधित ठेवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. असे आश्वासनही उध्दव ठाकरे यांनी दिले.

सध्याच्या राजकीय परिस्थिती वर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी देशभर इतर पक्षांना भारतीय जनता पक्ष अस्पृश्य होता तेव्हा शिवसेनेने हात पुढे करून त्यांच्याशी युती केली. नंतर ती वाढत गेली आणि जवळ गेलेले दुरही होत गेले. आम्हाला म्हणतात तुम्ही मोदींचा फोटो लावून निवडून आलात तर आता बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय मते मिळणार नाहीत आता मोदी महाराष्ट्रात चालणार नाहीत हे तुम्हाला उमगले आहे.

सुरुवातीला प्रस्तावना करताना संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ऋणानुबंध मराठी वृत्तपत्र लेखक संघाशी १९४९ च्या पहिल्या जमका संमेलनापासून कसे दृढ होते याचे अनेक दाखले दिले. संस्था आणि वृत्तपत्र लेखक अडचणीच्या काळातही नाउमेद न होता कसा कार्यक्रम-उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यशील आहे. हे आपल्या भाषणात सांगताना मालुसरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने संस्था भविष्यात कार्यरत राहावी यासाठी उद्धव साहेबांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यानिमित्त ज्या ज्येष्ठ वृत्तपत्र लेखकांनी स्वातंत्र्याची पहाट पाहिली असे ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मधू शिरोडकर, वि अ सावंत, श्रीनिवास डोंगरे, मधुकर कुबल, अनंत आंगचेकर, श्रीमती मंदाकिनी भट, डॉ दिलीप साठ्ये, कृष्णा ब्रीद, ऍड मनमोहन चोणकर, कृष्णा काजरोळकर, प्रकाश बाडकर यांचा सन्मान उध्दवजींच्या हस्ते करण्यात आला.

संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रमुख राजन देसाई यांनी केले. कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्यवाह नितीन कदम, माजी अध्यक्ष मनोहर साळवी, माजी अध्यक्ष विजय कदम, माजी अध्यक्ष प्रकाश नागणे, अरुण खटावकर, प्रशांत भाटकर, चंद्रकांत पाटणकर, दिगंबर चव्हाण, सतीश भोसले, सुनिल कुडतरकर, नारायण परब, पंकज पाटील, दत्ताराम गवस यांनी विशेष मेहनत घेतली.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...