प्रभादेवी महापालिका शाळेतील आठवणी
.... आणि मुळाक्षरांच्या आठवणी जाग्या झाल्या !
आज ३० वर्षानंतर ...मी ज्या शाळेत 'मुळाक्षरे'
गिरवली आणि कलेकलेने वाढलो त्या 'प्रभादेवी
म्युनिसिपल सेकंडरी शाळेत' काही
कामानिमित्त जाण्याचा योग आला. इतक्या वर्षानंतर या शाळेच्या इमारतीत आपल्या
ओळखीचे कुणीच नसणार हे माहित असतानाही मनात एक हुरहूर दाटून आली होती. आमच्यावेळी
मुख्याध्यापक ज्या जागेत बसायचे तिथे प्रवेश केला तर शिपायाने सांगितले तिकडच्या
रूम मध्ये मुख्याध्यापकांचे कार्यालय आहे....जी जागा मी दहावीला होतो त्यावेळी
आमची वर्ग खोली होती. मुख्याध्यापिका शेख मॅडम यांच्याशी चर्चा चालू असतानाच
प्रार्थनेची घंटा वाजली...माझ्याबरोबर त्यासुद्धा हातातले काम बाजूला सारून उभ्या
राहिल्या.....काम झाल्यानंतर मी पूर्ण चौथ्या मजल्याला फेरी मारली आणि ज्या ठिकाणी
आमचे शिक्षक बसायचे त्या रूममध्ये डोकावून बाहेरच्या गॅलरीत येऊन उभा
राहिलो....... आणि श्रावणातल्या ऊन - पाऊस खेळासारख्या अनेक आठवणी जाग्या
झाल्या...गणिताचे दिंडोरे सर आणि 'आ जा सनम मधुर
चांदणी मे' हे गाणे म्हणून
सेंड ऑफ साजरे करणारे गणिताचेच महाजन सर,
भूगोलाच्या नागपुरे मॅडम, इंग्रजी पक्की
करून घेण्यासाठी ज्यांच्या डस्टर चा मार खाल्ला ते खाड्ये सर,
पी टी चे गोन्साल्विस सर, चित्रकलेचे
भालचंद्र पिळणकर सर, प्राथमिक
शाळेच्या पाटील मॅडम आणि नाईक मॅडम या गुरुजनांची विद्वत्ता आणि आमच्यासाठी
अहोरात्र घेतलेले कष्ठ हे सर्वच एकामागोमाग आठवू लागले. आणि त्यावेळचा शाळेतला
मित्र परिवार चित्रकार देसाई, अविनाश हुले,
अरविंद दोडे, अविनाश पाटील,
भुर्के, सुंदर अक्षरांचा
धनी शशिकांत जुईकर, विलनकर,
फोटोफ्रेम वाला पांचाळ,कबड्डीपटू दिनेश
पांढरे, दीनानाथ शेळके,
गँगस्टर म्हणून ठार झालेला मोडक, दिनेश मोकळ,
कौटुंबिक नातेसंबंध जपलेला पांडुरंग वारिसे,
किस्मत टॉकीजमध्ये फुकट चित्रपट दाखवणारा म्हात्रे,
सलूनवाला आजगावकर, अशोक निर्गुण,
सचिन पाताडे, मधुबाला फेम
नारकर, डोक्याला तेल चोपडणारा म्हणून ज्याला तेल्या
चिडवायचो तो गंगाराम कदम, लोखंडे,देसाई ,....
आणि आणि व्हर्सटाईल-डायनॅमिक थोडेसे बिनधास्त (आजही आहेत) प्रशांत भाटकर आणि
महेश पै. ..... अभ्यासात आणि परीक्षेत वरच्या क्रमांकावर असलेल्या हुशार
वर्गमैत्रिणी ,मिनाक्षी बोरकर,
संगीता पाटणकर, खो खो खेळात
नैपुण्य असलेली आंब्रे, मुरकर,
महाराव, लता म्हात्रे
आणि बरेच जण .... यातले काही आजही संपर्कात आहेत. मित्र म्हणून भेटतात
जुन्या आठवणी काढून गप्पा मारतातही.
प्रभादेवी शाळेतील गुरुजन |
पण आजचा दिवस
आयुष्यातला वेगळाच ठरला आहे असेच वाटतेय. ज्या शाळेत मुळाक्षरे गिरवली,
प्रसंगी शिक्षकांचा मार सुद्धा झाला आणि दहावी पास ची मार्कलिस्ट घेऊन ज्या
इमारतीच्या पायऱ्या उतरलो ... ते पुढे जीवनाच्या आयुष्यातल्या पुढच्या अनेक शिढया
चढण्यासाठी....आज त्याचे समाधानही वाटतेय. अलीकडचे शिक्षक
सुध्दा शिक्षणात अर्धे कच्चे, काहींचा
सन्माननीय अपवाद सोडला तर पगारासाठीच काम करणारी शिल्पकारांची पिढी जन्माला आलीय.
फक्त शालेय पुस्तकांकडे scoring subject म्हणून score
board कडे लक्ष देत अभ्यास करीत पहायचे. आम्ही मात्र नशीबवान ठरलो आजही नावानिशी आणि त्यांच्या स्वभाव-विशिष्ठ लकबिसह
लक्षात असलेले शिक्षक नव्हे जीवनाची दूर पर्यंत जाणारी वाट दाखवणारे तुमच्यासारखे
गुरू मिळाले. तुम्ही दिलेल्या ज्ञानामुळे घडत्या वयात आमचा पाया मजबूत अभ्यासावर,
आणि ध्येयावर फिक्स झाला, त्यामुळेच
उर्वरित आयुष्यात मनपा शाळेत शिकल्याची खंत न वाटता वडिलांनी योग्य निर्णय
घेतल्याचे समाधान वाटत आले आहे. आम्ही शाळेत होतो तेंव्हा कदाचित moulding
हा शब्द वा त्याचा अर्थही माहीत नव्हता....खाडये सरांसारख्या मारकुट्या
शिक्षकांनी सुद्धा तो शिकवला नाही...पण त्याचा अर्थ पुढच्या ३८
वर्षात यशस्वीपणे समाजात वावरताना नेहमी आम्ही अनुभवत आहोत. तुम्ही पद्धतशीर
आम्हाला जर 'मोल्ड'
केले नसते तर .... थोरामोठ्यांचा सहवास, लेखन,वाचन वैगरे
वाट्याला आलेच नसते.... कृतज्ञता पूर्वक धन्यवाद सर ...
प्रभादेवी शाळेतील गुरुजन |
आज सर्व पालकांच्या मनात महापालिका शाळेतल्या शिक्षणाविषयी आणि मराठी
माध्यमातल्या शिक्षणाबाबत एक न्यूनगंड आहे. या शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या
कमी होत त्यामुळे या शाळा एकामागोमाग बंद पडत चालल्या आहेत.हि चिंतेची बाबच खरेच
आहे.सरकार करोडो पैसे यासाठी खर्च करत आहे. सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. आणि
म्हणून म्हणावेसे वाटतेय या महापालिका शाळेत किंबहुना मराठी शाळेत जे पालक मुलांना
शिक्षण देताहेत तेच 'पालक आणि
विद्यार्थी मराठी भाषेचे खरे कैवारी' ठरत आहेत.
महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मुंबईत मराठी टक्का वाचवा असे म्हणून गळा
काढणारे आणि उसना आव आणणारेच मराठीचे मारेकरी आहेत. दोन दिवसापूर्वी ग्रंथालीच्या
'गर्जे मराठी'
या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले, त्यांचे शिक्षणही महापालिका मुंबई शाळेत झाले होते, महाराष्ट्रात मराठी शिकून आज जगभर स्वतःच्या
कर्तृत्वावर व्यक्तींचा परिचय या पुस्तकात आहे.त्यांच्या जिद्दीचा प्रवास सुंदर
शब्दबद्ध केला आहे
..... मी महापालिका शाळेत शिकलो आहे याचा मलासुद्धा १९ जानेवारी २०१० मध्ये अभिमान वाटला होता.. बृहन्मुंबई महानगर पालिका शाळेत शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या काहींचा सत्कार बृहन्मुंबई महानगर पालिकेने केला होता.मुंबईच्या तत्कालीन महापौर श्रद्धा जाधव, उपमहापौर शैलजा गिरकर, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, शिक्षण समिती अध्यक्ष डॉ राम बारोट हे मान्यवर उपस्थित होते. ...मागच्या अनेक वर्षाच्या वलयांकित विद्यार्थ्यांमध्ये माझाही समावेश होता.
.... रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704
9323117704
( ही पोस्ट /लिंक प्रभादेवी शाळेतील तुमच्या मित्रांना पाठवा आणि आपल्या आठवणी माझ्या व्हाट्सअप किंवा फेसबुक पेजवर सहारे करा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा