लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार


लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार 

अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना मानाचा त्रिवार मुजरा !  

फाड देंगे मुघल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरुरत की…

हम शोर नही करते, सिधा शिकार करते है..!

अग्नि भी वो, 

पाणी भी वो, 

तुफान भी वो, 

शेर शिवरायांचा छावा है वो ! 

राजे छत्रपती शिवरायांचे रयतेचे हिंदवी स्वराज्यआणि राजाभिषेक ज्या भूमीत स्थापन झाले आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या कर्तृत्ववाने रक्ताने लाल झालेल्या महाड - पोलादपूरच्या भूमीत जन्म झालेल्या लक्ष्मण उतेकर यांचा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या महापराक्रमाचा वेध घेणारा छावा हा चित्रपट येत आहे.  

ज्या खोऱ्यातील मावळ्यांनी शिवरायांना प्रसंगी जीवाचे बलिदान देत साथ दिली त्या मावळ्यांचा वारसा लक्ष्मण उतेकर यांना लाभला आहे. उतेकरांच्या रक्तात 'शौर्य आणि निष्ठा' हा रक्तगट असल्यामुळे आणि इतिहासावर असलेल्या वेडापायी एव्हढे मोठे धाडस त्यांनी केले आहे. कॅमेरा अटेंडंट ते सुपरस्टार सिनेमॅटोग्राफर असा लक्ष्मण उतेकर यांचा प्रवास आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील छायांकन क्षेत्रामधील सध्याचं हे आघाडीचं नाव आहे.  "छावा" चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, आणि हा चित्रपट खरोखरच भव्यदिव्य वाटतो आहॆ. अंगावर शहारे आणणारे दृश्यांनी भरलेला हा ट्रेलर पाहून थक्क व्हायला होतं. थिएटरमध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो पहायचा आहॆ. मराठ्यांच्या इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द हे मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील एक तेजस्वी पर्व मानले जाते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी धर्माभिमानी, स्वराज्यरक्षक, सकलशास्त्र पारंगत, उत्तम राजनीतिज्ञ, परमप्रतापी आणि धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे छ्त्रपती संभाजी महाराज स्वराज्याची धुरा सांभाळणारे धाकले धनी.  महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांनी वीरतेने स्वराज्याचे रक्षण केले आणि पुढच्या काळातील स्वाभिमानाच्या लढाईला प्रेरणा दिली. त्यांचे शौर्य आणि बलिदान आजही आपल्याला प्रेरित करते. 

मौत डरी थी देखकर उसे ये खुद मौत का दावा है।

धरती को नाज़ है जिस पर ऐसा शेर "शिवबा" का छावा है।।

छत्रपती संभाजी महाराजांनी सहन केलेला त्रास इतका भयानक आहे त्यामुळे तेवढा आदर जास्त आणि म्हणून ते तितकंच ताकदीने मांडलं पाहिजे ही अपेक्षा असतें. आम्हांला शंभूराजे कळलेच नव्हते. जे दुर्गुण कळले होते ते त्यांच्यात नव्हतेच. जे सद्‌गुण त्यांच्यात होते ते कुणी सांगितलेच नाहीत. लक्ष्मण उतेकर यांनी इतिहासाचा अभ्यास करून धाडसाने हा प्रयत्न केला आहे, याबद्दल त्यांचे नरवीरांचा वंशज 'मालुसरे' म्हणून मनापासून अभिनंदन! 

"छावा" चित्रपटातील नाचाला आक्षेप कशासाठी ? काळाच्या ओघात या मराठी मातीतले अनेक जिव्हाळ्याचे पुरर्वापार परंपरेचे मराठमोळे संचित आपण हरवत व विसरत चाललो आहोत, जो नाच दाखवला आहे तो खेड्यापाड्यातला मराठमोळा लेझीम नाच आहे .... हल्ली कॉन्व्हेंट शाळेत जाणाऱ्यांनी हा नाच पाहिलाच नसेल किंवा लेझीम वस्तू कशी असते हे माहितही नसेल.... धुरळा उडवत अंगाचे मर्दन आणि घाम गाळत अंगात रग असलेला महाराष्ट्रातला रांगडा गडी हा नाच करतो...या नाचाला पूर्वापार महाराष्ट्राची ओळख आणि इतिहास आहे... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करणारे मराठी साहित्य आणि कलाकृती आजही महाराष्ट्रात अनेक दशकांपासून आहे. आणि ते निर्माण करणारे आजही आपल्या मतावर ठाम आहेत. वा सी. बेंद्रे, सु. ग. शेवडे, कमल गोखले, इंद्रजित सावंत, जयसिंगराव पवार, बानूगडे पाटील असे अभ्यासक ज्यांनी संभाजी राजांची उजवी बाजू उजेडात आणली नसती तर..... खोटा इतिहास सांगणाऱ्यांच्या मागे जो समाज झुंडीने उभा आहे तो मस्तक गहाण ठेवून अधिक गर्दीने उभा राहिलेला दिसला असता. आयुष्यात एकही लढाई न हरलेल्या राजाचा पराक्रमी इतिहास मोठया पडद्यावर यावा अशी शिवप्रेमीची इच्छा होतीच. धर्माच्या - प्रांताच्या - जातीच्या भिंती अलीकडे मोठया प्रमाणात उभ्या केल्या जात असताना, कुणी परप्रांतीय निर्माता मराठ्यांच्या राजाचा पराक्रम दाखवण्याचे एव्हढे धाडस कशाला करील. मराठा माणूसच धाडसाने अटकेपार भगवा ध्वज फडकविण्याचे धाडस करू शकतो. आणि अलीकडच्या काळात सर्व क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करू शकतो.

हा चित्रपट हिंदीत येत असल्याने काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व प्रांतात सर्व धर्मात सर्व जातीत पाहिला जाईल याचा आनंद मराठी माणसांना अगोदर असायला हवा..... "लक्ष्मण उतेकर" नावाचा मराठी आणि मराठा माणूस करोडो रुपये खर्च करून हे धाडस करतो आहे. दोन तासाचा चित्रपट २ मिनिटांचा ट्रेलर पाहून कसा कळणार. काहीवेळा व्यक्तीरेखा सशक्त करण्यासाठी किंवा पटकथा पुढे जाण्यासाठी वा कलाकृती कंटाळवाणी होऊ नये यासाठी आवश्यक गोष्टी केल्या जातात.  भावना दुखावतील म्हणून शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवार काढून घेतली. चित्रपट पाहूनच योग्य अयोग्य भूमिका घ्यायला हवी. जेवणाच्या ताटातली भाजी लाल दिसतेय म्हणजे तीं जाळ तिखटच असणार. सारासार विचार न करता बायकोच्या कानाखाली अगोदर आवाज काढायचा असा प्रकार घडू नये. विरोध करणाऱ्यांनी भूमिका बदलून स्वागत करण्याची भूमिका घ्यावी... आणि मनगटात ताकद असली तर सिनेमागृहात जाऊन  हर हर महादेव अशी जोरात आरोळी द्यावी..... हा चित्रपट इतिहासप्रेमींच्या हृदयात देशभक्तीची नवीन चेतना जागवणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या अजरामर शौर्याची, त्यागाची आणि स्वाभिमानाची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे. हा पण चांगला प्रयत्न आहे. देशाला कळेल छावा काय प्रकरण होते. 

“मृत्यूला मारण्याचे धाडस बाळगणारा, रणांगणातील झुंजार छावा..” स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे. इतिहासप्रेमींच्या हृदयात देशभक्तीची नवीन चेतना जागवली जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या अजरामर शौर्याची, त्यागाची आणि स्वाभिमानाची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे. सुभेदार तान्हाजी चित्रपटात अजय देवगण यांनी पुण्यात समुद्र, नागीण तोफ, उदयभानू मुस्लिम पेहेरावत खुनशी असे इतिहासात न वाचलेले प्रसंग दाखवले होते, भव्यता दाखविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर होतो आहे. ज्या परप्रांतीयांनी इतिहास वाचलाच नव्हता ती सुभेदारांची व्यक्तीरेखा आणि पराक्रम घराघरात पोहोचला. चित्रपट मराठी असता तर जास्तीत जास्त ३ लाख लोकांनी पाहिला असता मात्र हिंदीत असल्यामुळे तो ३ करोड लोकांनी पाहिला. आपल्या देशात खरोखरीच्या ऐत्याहासिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक व्यक्तीरेखा जन्माला आल्या आणि आजही त्या लोकांची दैवतं आहेत. त्या समोर आणण्याचे धाडस केले जाते. आपण त्यांचे थंडे स्वागत करतो. बाहुबली, पुष्पा, बजरंगी भाईजान सारख्या रंजक कलाकृतीवर करोडो रुपयांची उधळण करतो.

झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा....

ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा....

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्रात चैतन्याचे एक नवे युग सुरू केले. पण त्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहासारख्या महाबलाढ्य शत्रूशी सतत ९ वर्षे निकराचा लढा देऊन या हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. शिवराय हे हिंदवी स्वराज्याचे 'संस्थापक', तर शंभूराजे त्या स्वराज्याचे 'संरक्षक' बनले. 

विशेषतः कवी, कादंबरीकार, नाटककार इत्यादीनी संभाजीराजांचा सत्य इतिहास न जाणून घेता केवळ आपली कलाकृती सजविण्यासाठी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांना विकृत रूप दिले. त्यातून त्यांनी त्यांच्यावर बरेच आक्षेप घेतलेला दिसले. महाराजांच्या कर्तृत्वाशी त्यांची तुलना करून त्यांचे कर्तृत्व शून्यवत् दाखविले. मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकताना ३५० वर्षांपूर्वी तत्कालीन समाजजीवन कसे होते, त्यावेळच्या लोकांची संस्कृती, राजकीय-सामाजिक-आर्थिक जीवन याचा पूर्वग्रह न ठेवता अभ्यास करावा लागतो.  इतिहास जाणून घेतल्याशिवाय संभाजीराजांच्या जीवन चरित्राला न्याय देता येणार नाही. 

औरंगजेबाच्या दरबारातील खाफीखान याने संभाजी राजा बद्दल "सत्तेची नशा चढलेला राजा असे वर्णन केले तर ग्रँडडफ याने Intoxicated With the wine of Folly & Pride" असे त्याचे इंग्रजी भाषांतर केले व आम्ही त्या नशेचा अर्थ मद्यपी असा केला व संभाजी राजांना रंगेल राजा असे समजून त्यांची विकृत प्रतिमा समाजांत उभी केली. आपले खापरपणजोबा बाळाजी आवजी चिटणीस यांना हत्तीच्या पायी देण्यात आले याचा सूड शंभूराजांच्या मृत्यूनंतर १२२ वर्षांनी मल्हार रामराव चिटणीस यांने घेतला आणि सभासदाच्या मूळच्याच मसालेदार बखरीत खोट्या नाट्याचा मसाला बेमालूम घुसडून देऊन संभाजी राजांचे चरित्र लिहिले. येवढे खरे की मल्हार रामरावाने शंभूचरित्राचे जे पाणी वेगळ्या पाटाने वळवले ते पुनः मूळ पाटात आणून सोडण्याचे काम वा. सी. बेंद्रे यांनी केले.  कमल गोखले, महाडचे आमदार आणि नंतर खासदार झालेले शंकरराव बा. सावंत यांचे सुद्धा संभाजी राजांची सत्य बाजू मांडणारे पुस्तक त्याकाळी प्रकाशित झाले होते. 

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी संभाजी राजांच्या पराक्रमाबद्दल म्हणतात - "व्यक्ती की पुण्याई, व्यक्ती की शक्ति, व्यक्ति का स्वत्व प्रगट होता है अंतिम क्षणो में। संभाजी महाराज समझौता कर सकते थे, पर उन्होंने नही किया। अगर वे शरीरसे दुर्बल होते, अगर मनके कच्चे होते, जिस तरह के व्यसनों का उनके जीवन में उल्लेख किया जाता है, अगर उस तरह के व्यसनके वे शिकार होते तो अंतिम परीक्षा में विफल हो जाते। लेकिन वे अंतिम परीक्षा में सफल रहे। पिढीयों तक उनके बलिदानसे हमें प्रेरणा मिलेगी। उन्होंने जीवनका क्षणक्षण, शरीरका कण कण स्वतंत्रता के लिये समर्पित किया।

एखादी व्यक्ती अत्यंत चैनी, ख्यालीखुशाली, रंगेल असती तर मृत्यू समोर दिसत असतांना आणि शरीराचे हाल होत असतानाही निर्भय व स्वाभिमानी राहील असे दृष्य दिसणार नाही. परंतु शंभूराजे ज्या अर्थी कष्ट सोसायला तयार झाले आणि शेवटी त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्याअर्थी त्यांची या त-हेची पुढे प्रतिमा जी उभी करण्यात आली ती चुकीची वाटते. रंगेल मनुष्य तेव्हाच शरण गेला असता. त्यांच्या कारकीर्दीचा एकूण आठ वर्षे आणि आठ महिन्यांचा काळ विलक्षण धामधुमीचा ठरला. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि मोंगल हे चार शत्रू. त्यातही मराठेशाही नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेऊन महाराष्ट्रात जातीनिशी उतरलेला महाशत्रू औरंगजेब! या अल्पकाळात सुमारे सव्वाशे लढाया शंभूराजांनी केल्या. औरंगजेबाने चिडून जमिनीवर आपली पगडी आपटली आणि शंभूराजांचे पारिपत्य केल्याशिवाय पगडी डोक्यावर न घालण्याची प्रतिज्ञा केली. त्याच्या सात लाख फौजेशी आपल्या बेताच्या सामर्थ्यानिशी उणी पुरी नऊ वर्षे शंभूराजांनी झुंज दिली. हा जगाच्या इतिहासातला अपूर्व पराक्रम आहे.

छत्रपती संभाजी राजांच्या युद्धाचा थरार, शब्दांतील धगधगता स्वाभिमान, आणि त्यांच्या अविस्मरणीय जीवनातील घटना पाहून अंगावर काटा येईल असे वाटते आहे. लेखक शिवाजी सावंत यांनी 'छावा' हा ग्रंथ सन १९७२ साली लिहायला घेतला.  लिखाणाच्या पहिल्याच दिवशी जगदंबेने कसा कौल दिला याबद्दल त्यांनी प्रस्तावनेत  लिहिले आहे. किल्ले प्रतापगडावर १९७९ साली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते छावा प्रकाशित झाले आणि महाराष्ट्राच्या जनतेने या पुस्तकाला अक्षरशः डोक्यावर घेतले. लक्ष्मण उतेकरांनी आपल्या मोरसडे गावाजवळ असलेल्या कांगोरी गडावर जाऊन नजरेच्या टप्प्यात दिसणाऱ्या प्रतापगडावरील भवानी मातेचे आणि रायगडावर असलेल्या शिरकाई देवीचे मनोभावे स्मरण करावे. महाराष्ट्रातील मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती महाराणी ताराबाई यांच्यासह हजारो मावळ्यांच्या पराक्रमावर त्यांनी घडविलेल्या इतिहासावर तन- मन-धन अर्पून प्रेम करतो आहे. हा चित्रपट मराठी जणांसाठी एक अमूल्य भेट ठरणार आहे असे अनेकांचे मत आहे.  

चित्रपट चालणार...संभाजी राजेंचा महापराक्रम नव्याने सर्व हिंदुस्थानभर घराघरात पोहोचणार !  जय भवानी !  जय छत्रपती शिवाजी राजे !! जय छत्रपती संभाजी राजे !!

“श्री शंभोः शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।

यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।”

- रवींद्र मालुसरे

सुभेदार नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे यांचा कुलोत्पन्न 

९३२३११७७०४ 


डॉ. जयसिंगराव पवार (छ. संभाजी स्मारक ग्रंथातून)

सभासदाने आपली बखर राजाराम महाराजांचे जिजीस वास्तव्य असताना त्यांच्या दरबाराच्या आश्रयाने लिहून पुरी केली. त्यामध्ये संभाजी महाराजांची नालस्ती करून राजाराम महाराजांची स्तुती करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो. कारण त्याने संभाजी महाराजांची केलेली नालस्ती ही जशी खोटी आहे, तशी त्याने केलेली राजाराम महाराजांची अवास्तव स्तुतीही खोटी आहे."

मल्हार रामरावाने संभाजी महाराजांच्या राज्य कारभाराचे (बेबंदशाहीचे) जे चित्र रंगविले आहे, त्यास तत्कालिन कागदोपत्री काही पुरावा मिळत नाही. उलट जी काही हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी अस्सल कागदपत्रे मिळतात त्यावरून संभाजी महाराज आपला राज्य कारभार कर्तव्य निष्ठेने, दक्षतेने व न्यायाने करीत होते असेच पुरावे मिळतात."

"जीवनाच्या अंतिम क्षणी शरीरावर व मनावर भयंकर आघात होत असतानासुद्धा स्थितप्रज्ञाच्या आत्मिक बलाने तो संकटांशी मुकाबला करू शकला याचे कोडे संभाजीराजाच्या व्यक्तित्वाच्या अध्यात्मवादी शक्तीच्या आविष्काराने सुटू शकते. व्यसनाधीन माणूस एवढ्या प्रचंड आत्मिक बलाने उभा राहूच शकत नाही. कारण व्यसन हे केवळ शरीरच नव्हे तर मनही दुबळे बनवीत असते." -








टिप्पण्या

  1. 'छावा'सिनेमाचा ट्रेलर मलाही आवडला,पण सिनेमात ऐतिहासिक सत्याशी इमान राखले गेले आहे की नाही याबाबत शंका वाटते,पूर्ण चित्रपट पाहिल्यावरच तमाम शंकांचं निरसन होऊ शकेल.पराक्रमी छत्रपती शिवरायांचे महापराक्रमी सुपुत्र छत्रपती संभाजीराजांची रोमहर्षक कहाणी राष्ट्रीय स्तरावर मांडली जातेय,याचा आनंद तर आहेच.

    उत्तर द्याहटवा
  2. एव्हढा सर्व इतिहास माहीत असूनही नाच काम दाखवता 😡 ......
    जसा खोटा इतिहास तसा च हा नाच 😡 पुढील पिढी पर्यंत असले चुकीचे दाखवणार आहे काय ? 😡😡😡😡

    उत्तर द्याहटवा
  3. एखाद्या चित्रपटात नृत्य दाखवणे किंवा सुंदर चा एखादा नृत्य अविष्कार दाखवणे म्हणजे संपूर्ण त्या चित्रपटाचे भवितव्य नसून तो एक व्यवसायिक भाग आहे पण केवळ नृत्य म्हणजे विकृती किंवा नृत्य हीच त्या चित्रपटाची इमेज असू नये महत्त्वाचा भाग हा आहे की एखादी कलाकृती सादर करताना आपण काय करत आहोत त्या कलाकृतीला आपण योग्य तो न्याय देत आहोत किंवा नाही हे महत्त्वाचे असते इतिहास कधीच बदलता येत नाही पण इतिहासाचे चित्रपट करताना मूळ आपल्या हृदयातील देवतांना किंवा महा न व्यक्तिमत्त्वांना साधा ओरखडा देखील पाडू देऊ नये इतके भान सांभाळावे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा