नरवीर तानाजीराव मालुसरे स्मरुनी तुमची गाथा | आदराने झुकतो माथा ||


नरवीर तानाजीराव मालुसरे स्मरुनी तुमची गाथा | आदराने झुकतो माथा ||


आपला शिवकालीन इतिहास तेजस्वी आहे. पूर्वजांच्या रक्ताचा, स्वाभिमानाचा, शौर्याचा, निष्ठेचा आणि शहाणपणाचा वारसाहक्क आपल्याकडे आहे. त्यांचा इतिहास जर आपण विसरत चाललो तर वर्तमानकाळापेक्षाही आपला भविष्यकाळ काजळलेला दिसेल हे सांगायला नको. शिवरायांचा सिंह पडला समरांगणी मराठा गडी यशाचा धनी असा गौरव इतिहासाच्या पानापानात सुवर्णाक्षराने शिवछत्रपतींच्या ज्या सुभेदाराचा झाला आहे त्या नरव्याघ्र नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा महाराष्ट्राला आणि मराठी मनाला आजवर सतत स्फूर्तिदायी ठरत आली आहे. नरवीर तानाजींनी भावनेपेक्षा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या कर्तव्यापेक्षा स्वराज्याची किंबहुना राष्ट्रकार्याची हाक ऐकली आणि हे करताना स्वामीकार्यासाठी स्वतःच्या रक्ताचा सडा शिंपडून प्राण अर्पण केले. अशा नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे या पराक्रमी दोन बंधूंच्या महान कार्याचे सिहांवलोकन शौर्यदिनी करणे हेच इतिकर्तव्य ठरणारे आहे. शिवकाळाच्या इतिहासाबाबत अनेक गोष्टी नव्याने पुढे येत आहेत. नवनवीन ऐत्याहासिक कागदपत्रे आणि साधने उपलब्ध होत आहेत, त्यामुळे जुने संदर्भ कालबाह्य ठरत आहेत. वादविवाद होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि बदललेली शिक्षण पद्धती लक्षात घेऊन वाडवडिलांनी जपलेला इतिहास आपल्या पुढच्या पिढीकडे संक्रमित होत राहणे गरजेचे असते.


'आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे' किंवा 'गड आला पण माझा सिंह गेला' अशी इतिहासात असलेली नोंद म्हणजेच नरवीरांचा इतिहास नव्हे तर तानाजीवांच्या देदीप्यमान अद्वितीय तेजस्वी पराक्रमाची गाथा सांगणारा शाहीर तुलसीदासाने रचलेला शिवकाळातला पहिला पोवाडा आणि अशा इतर बऱ्याच प्रसंगांची नोंद इतिहासात आजही उपलब्ध आहे.

पिलाजी नाईक हे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार. निळकंठराव सरनाईक यांचे चिरंजीव. त्यांना आणि तानाजी मालुसरे यांना शिवाजी महाराजांनी कोकणात संगमेश्वर येथे ठेवले होते. त्या काळात कोकणात वाहतुकीसाठी चांगले रस्ते नव्हते. संगमेश्वरला छावणी करून राहात असताना महाराजांनी तानाजी पिलाजी यांना रस्तेबांधणीचे काम सांगितले. तानाजीने त्यात मुळीच कमीपणा मानला नाही. ढाल-तलवारी, भले-बरचे छावणीत ठेऊन मंडळींनी रस्त्याच्या जडणघडणीला सुरुवात केली, विश्रांती घेणाऱ्या सैन्यावर शृंगारपूरचे सूर्याजीराव सुर्वे यांनी एके रात्री अकस्मात हल्ला चढविला. शांतपणे विश्रांती घेत असलेल्या लष्करात एकदम गलबला उडाला. तानाजीराव सावध होतेच, त्यांनी हातात ढाल-तलवार घेतली. अकस्मात हल्ल्याने ते मुळीच भ्याले नाहीत, निकराने लढू लागले. भिणे त्यांना ठाऊकच नव्हते.

अकस्मात झालेला हा हल्ला तानाजीने मागे लोटला.पिलाजी आपली फौज घेऊन दुसऱ्या बाजूला लढत होता. त्याचा मात्र निभाव लागेना. शत्रूचा जोर जसा जसा वाढला तसा स्वतः पिलाजी निळकंठराव हत्यार टाकून पळू लागला. तानाजीराव त्या दिशेला ताबडतोब धावले. आपल्या राकट हातांनी त्याची मानगूट पकडली आणि म्हणाले, पळून जायला लाज नाही वाटत ? उठ, भ्याड कुणा मुलुखाचा. अरे लढाईच्या अशा बाक्या वक्ताला आमच्या मावळातल्या बाया पण पळत नाहीत, तू तर मोठ्या मिश्यांचा बाप्या. पिलाजीरावाला दरदरून घाम फुटला होता. त्याच्या घशाला कोरड पडली होती. भीतीने त्याचे सर्वांग लटपट कापत होते. त्याची छाती भात्यासारखी फू फू करीत होती. त्याच्या डोक्यावर पागोटे नव्हते कि पायात जोडे नव्हते. त्याच्या अंगरख्यावर रक्ताचे डाग उडाले होते. एकंदर त्याची अवस्था शोचनीय झाली होती. तानाजीरावांनी प्रथम त्याची खूप निंदा केली. एव्हढे करून थांबता एक मोठा दोरखंड आणवाला. त्या दोराने त्यांनी पिलाजीला एका दगडाशी आवळून बांधले. आणि समशेर उपसून शत्रूवर तुटून पडले. तोंडाने भयंकर गर्जना करीत आपल्या फौजेला चेव आणला. काही अवधीतच सुर्व्यांच्या सैन्याचा बुकणा होत चालला. तो पाहण्यासाठी सूर्यराव सुर्वे नव्हताच. त्याने केव्हाच पळ काढला होता. तानाजीने आपल्या भीमपराक्रमाने शत्रूचा डाव उधळला होता. आणि विजापूरच्या आदिलशाहीचा कोकण सेनापती धुळीला मिळवला होता. तानाजीराव त्या बांधलेल्या दगडाजवळ आले आणि पिलाजीला मोकळे करीत म्हणाले, अरे बाबा मरणाला भिऊन चालत न्हाई. मरणाच्या मागे आपण पळू लागलो म्हंजे ते पळते. असे भिऊन पुन्यांदा पळू नका, नेटाने लढत चला.

सुभेदार अंगापिंडाने चांगलेच भरदार होते. त्यांच्या भरदार शरीराचे आणि गुलजार मिशांचे वर्णन रसिकपणे शाहिराच्या करीत. कुणी म्हणतात त्यांच्या मिश्यांच्या आकड्यात टपोरी लिंबे सहज बसत ! शरीराप्रमाणे त्यांचे मनही मोठे बेडर,हिंमती, धाडसी होते. स्वतःच्या शक्तीवर त्यांचा विश्वास मोठा होता. या सर्व गोष्टीमुळे तानाजी मालुसरे म्हणजे शिवाजीराजांचा हुकमी एक्का होता. किती तरी कामगिऱ्या त्यांनी बिनबोभाट पार पाडल्या. तानाजी मालुसरे यांच्या हाताखाली एक हजार मावळ्यांचे पथक होते.

अफझलखानाच्या भेटीस महाराज जेव्हा गेले तेच सावधगिरीने आपले सैन्य आजूबाजूच्या आडरानात, दऱ्याखोऱ्यात उभे केले होते. ज्यांना या किर्रर्र जंगलातल्या वाटा-वहिवाटा आणि खिंडी माहिती होत्या. तानाजीराव महाबळेश्वराच्या याच खोऱ्यात मोठा झालेला, त्यामुळे खानाची सर्व बाजूनी नाकेबंदी करताना मोरोपंत पिंगळे,तानाजी मालुसरे,येसाजी कंक, बांदल, जेधे,मारणे,ढमाले अशांना मोर्चेकरी नेमले होते. अफझलखानाचा कोथळा काढल्यानंतर झालेल्या धुमश्चक्रित तानाजीरावांनी कापाकापी करीत खानाच्या सैन्याची धूळधाण उडवून दिली होती. 

अफझलखान वधानंतर महाराजांनी तातडीने विजापूरच्या प्रदेशावर मोहीम काढली. खटाव,मायणी,आष्टे,वडगाव,वेळापूर काबीज केले. औदुंबर,मसूर,कराड पर्यंतचा मुलुख काबीज केला. या मोहिमेत तानाजी मालुसरे यांनी अग्रक्रमाने पराक्रमाची शर्त केली होती. शिवदिग्विजयात नोंद असल्याप्रमाणे मिर्झाराजांबरोबर झालेल्या तहान्वये दिल्लीला जाताना जीवाला जीव देणारे म्हणून जे निवडक लोक महाराजांनी सोबत घेतले होते त्यात रघुनाथ कोरडे,प्रतापराव गुजर,त्रिंबकपंत डबीर,निराजी रावजी,हिरोजी फर्जंद,चिटणीस बाळाजी आवजी यांच्यासह तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक ही निवडक मंडळी होती.
सुभेदारांचा नाव इतिहासात अजरामर झाले ती मोहीम सिंहगडाची. सिंहगड हा 'कोंढाणा' या नावानेही ओळखला जातो. पुरंदरच्या तहान्वये औरंगजेबाला जे २३ किल्ले देण्यात आले होते. त्याप्रमाणे मिर्झाराजांना हा गड शिवाजी महाराजांनी मोगलांना खाली करून दिला होता. महाराज आग्रा भेटीनंतर शिताफीने निसटून आल्यानंतर तह मोडून हा किल्ला आपल्या ताब्यात घेण्याचे त्यांनी ठरवले. सिंहगडावर महाराजांची आणि जिजाऊंची तशी विशेष ममताही होती. ह्या गडावर मुघलांचा फडकणारा हिरवा ध्वज हा जिजाऊ आऊसाहेबांच्या हृदयातील साल झाला होता.

एक तर गड अवघड ! त्यावर अंमलदार होता उदयभानु राठोड हा राजपूत परंतु मुसलमान झालेला कडवा शूर किल्लेदार. तो स्वतः शूर होता, सावधपणे तो गडाची राखण करीत होता. तो कामात कडक होता. कामचुकार अगर ढिलाई करणाऱ्यांची तो गय करीत नसे. औरंगजेबाचा त्याच्यावर अतिशय विश्वास होता. त्याच्या हाताखाली १५०० राजपूत लढवय्ये शिपाई होते. गडावर तोफा, दारुगोळा, बंदुका,धान्य, रसद भरपूर होती. असा अवघड किल्ला घेण्यासाठी प्रत्यक्षात आपल्या मुलाचे लग्न ठरले असताना तानाजीरावांनी मोहिमेचा विडा उचलला. आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे अशी सिंहगर्जना करीत ही मोहीम हट्टाने मागून घेतली होती.

आपला धाकटा भाऊ सूर्याजी आणि वयोवृद्ध मामा शेलार यांनाही सोबत घेतले. रोहिडे खोऱ्यातील जेधे,देशमुख यांच्याकडील जवळपास ५०० मावळे सोबतीला घेतले. अचानक छापा घालून गड घेण्यासाठी तानाजींनी मध्यरात्रीची वेळ निवडली. सिंहगडाच्या पश्चिम बाजूस खोल कडा. खाली पहिले तर नजरा फिरतात. दरीत अजस्त्र झाडे-झुडपी आणि काट्याकुट्यांचे रान, वाघ,तरस,लांडगे यांचा मुक्त वावर. गडाची ही बाजू निर्धोक. तिकडून वाऱ्यांखेरीज कोणीही येण्याची शक्यता नसे. त्यामुळे या बाजूस फारसे चौक्या-पहारेही नव्हते. आणि गडाची हीच बाजू तानाजीरावांनी हल्ला करण्यासाठी निवडली. दिवस होता माघ वाद्य नवमीचा. रात्रीचा भीषण काळोख सर्वत्र पसरला होता. रातकिड्यांची किरकिर चालली होती. तुळशीदास शाहिराच्या पोवाड्यात घेरे सरनाईक खंडोजी कोळी यांना वश करून तानाजी आपल्या मावळे मंडळीत आला. डोणगिरीच्या कड्याजवळ पोहोचल्यानंतर श्रीशिवकौनडिण्यश्वराला मनोभावे हात जोडून 'यशवंती' या नावाची घोरपड त्यांनी पेटाऱ्यातून बाहेर काढली. तानाजीरावांनी तिला शेंदूर फासला तिच्या कमरेला साखळी बांधून कडा चढण्यासाठी कड्यावर सोडली. ती अर्धा कडा चढून परत आली....तानाजीराव तिला म्हणाले,' बये अस्से करू नकोस नाहीतर तुझी खांडोळी करून भाकरी बरोबर खाईन'. तिला पुन्हा वर सोडले. ती वर गेली आपले पंजे रोवून बसली. काही मावळे तानाजीराव गेल्यानंतर मेख ठोकताना गलबला झालाच. सुरुवातीला गाईची वासरे नेणारा वाघ असावा असा समज झाला. पण ५० मावळे वर आल्यानंतर घोटाळा झालाच.

गडावरचे शिपाई जागे झाले. एकाच गलका उडाला. हर हर महादेव ! हर हर महादेव ! गर्जनेबरोबर जोरदार लढाई सुरु झाली. दयामाया ठेवता शत्रूची कापकप सुरु झाली. १२०० राजपूत भाले, ढाल-तलवारी घेऊन लढाईला उभे राहिले. एकाच धुमश्चक्री उडाली. पहिल्या ५०० राजपूत पडले. ४०-५० मावळे ठार झाले. उदयभानु किल्लेदार सुभेदार तानाजी मालुसरे यांची गाठ पडली. दोघेही मोठे योद्धे. चिडलेले दोन सिंह एकमेकांशी भिडले. दात-ओठ खाऊन ते एकमेकांच्या अंगावर वर करू लागले. रक्ताने न्हाहून निघाले होते.या युद्धाचे वर्णन करताना इतिहासकार असे म्हणतात, धरणी हादरू लागली, गड गदगदा हालू लागला. जणू दोन प्रचंड गिरिशिखरे एकमेकांवर कडाडून कोसळली. दोघेही एकमेकांवर त्वेशाने तलवारीचे घाव घालत होते. इतक्यात घात झाला., लढाईच्या खणाणित सुभेदाराच्या  हातातील ढाल तुटली. दुसरी ढाल समयास हाती आली नाही. सुभेदार तानाजी डगमगले नाहीत. छातीचा कोट करून मुंडासे गुंडाळून सुभेदारांनी हाताची ढाल केली. डाव्या हातावर ते वर सोसू लागले. त्यांनी चवताळून एक वार उदयभानुवर केला. तानाजीचा तो तडाखा वज्रासारखा बसला. त्याचवेळी उदयभानुचा असाच शिळाघाती एक वार तानाजीला बसला..

ते क्षणाधार्त कोसळले. उदयभानुही पुरता जायबंदी झाला होता. पण त्याची लढण्याची खुमखुमी जिवंत होती. प्रसंगावधान पाहून वयोवृद्ध शेलारमामा तानाजीचे पट्टे घेऊन पुढे सरसावले आणि लढण्याच्या आवेशातच उदयभानुवर हल्ला करून उभा चिरला. लढाई चालूच होती. सुभेदार पडल्याचे पाहताच मावळ्यांचा धीर सुटला. त्यांनी हाय खाल्ली. मावळे मागे हटू लागले. पळापळ सुरु झाली. पण सुभेदारांचा धाकटे भाऊ सूर्याजीराव पुढे सरसावले. चवताळून पुढे झाले आणि पळणाराना रोखत म्हणाले, 'तुमचा बाप येथे मरून पडला असता पळता कुठे ? कड्यावरचे दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत. फिरा मागे, एकतर लढा नाहीतर गडावरून उड्या टाकून जीव द्या'....सूर्याजीच्या या आवेशपूर्ण गर्जनेने मावळे मागे फिरले. हर हर महादेव गर्जना गगनात गेली. अवसान गळालेल्या मावळ्यांनी घनघोर लढाईला सुरुवात केली. आणि राजपुतांची धांदल उडाली. हजारभर शिपाई मारले गेले. काही पळाले, कुणी जखमा झाले. बाकीचे शरण आले. गड फत्ते झाला. गडावरच्या पागेच्या खोपटाला सूर्याजीने आग लावली. त्या आगीचा उजेड राजगडावर महाराजांनी पहिला. महाराज बोलले....शाब्बास फत्ते झाली. दुसऱ्या दिवशी महाराजांचा जासूद आला त्याने सुभेदार पडल्याची बातमी आणली....सारा राजगड हादरला. राजांचा हुकुमाचा एक्का गेला. अतोनात दुःखाने महाराज म्हणाले, एक गड घेतला पण एक गड मी गमावला !

सिंहगड घेताना तानाजीरावांनी आपले नाव इतिहासात कायमचे कोरून ठेवले. आधी कर्तव्य स्वराज्यासाठी, आपल्या महाराजांसाठी, कारण स्वतः महाराजांनी या मोहिमेवर जाऊ नये म्हणून त्याचा ही मोहीम स्वीकारण्याचा अट्टाहास ! कारण त्यांनी अफझलखान वधाच्या वेळी महाराजांनी दाखवलेले धाडस,साहस,शौर्य पहिले होते.

पन्हाळगडाच्या मगरमिठीतून विशाळगडावर पोहोचेपर्यंत जिवावरचे कसरत पहिली होती. प्रत्यक्षात आग्रा येथून मृत्यूला थांबा म्हणून करून घेतलेली सुटका तानाजीने अनुभवली होती. आणि यापुढेही स्वतः शिवाजी महाराजांनी अशा प्रकारच्या जोखमीची, जीवावर बेतणाऱ्या प्रसंगांची जबाबदारी घेऊ नये, अशा प्रकारच्या मोहिमेवर जाऊ नये म्हणून स्वतःच्या मुलाचे आमंत्रण देण्यास गेला असता त्याच्या कानावर सिंहगड मोहिमेची कुजबुज कानी पडताच त्या स्वामिनिष्ठ, एकनिष्ठ, विश्वासू प्राण देणाऱ्या तानाजीने हि मोहीम आपल्या हाती घेतली. स्वराज्याची थंडावलेली मोहीम आपल्या प्राणाची आहुती देऊन गड ताब्यात घेऊन तानाजीने यशस्वीपणे पार पाडली. हि कामगिरी फारच मोलाची आहे हे निःसंशय ! कारण त्यानंतरच महाराष्ट्र पुन्हा जागा झाला.

तानाजीरावांसारख्या नेक आणि इनामी कर्तव्यनिष्ठ सेवकाने राजांना साथ दिली म्हणून स्वराज्याची इमारत पुढे भक्कमपणे उभी राहिली. आयुयायी कसा असावा हे तानाजीने दाखवून दिले, तर भाऊ कसा असावा हे सूर्याजीने दाखवून दिले. राम्राज्यात राम-लक्ष्मण हि भावंडे अमर झाली. तर महाराष्ट्राच्या शिवराज्यात तानाजी-सूर्याजी हे भाऊ अढळ झाले. जसे चंद्र-सूर्य. शिवाजी महाराजांना सूर्याजीची हिंमत पाहून फार धन्यता वाटली योजना केली. त्यांनी तानाजीच्या जागी सूर्याजीची योजना केली. त्याचा सुभा सूर्याजीला दिला. आज पोलादपूर तालुक्यात उमरठ येथे तानाजी मालुसरे शेलारमामा यांची समाधी आणि लढाईच्या पावित्रातील फूट उंचीचा भव्य पुतळा आहे. तर जवळच साखर येथे सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे. साखर येथील मालुसरे मंडळी १९३० पासून उमरठ येथे माघ वद्य नवमीला जाऊन आजतागायत नतमस्तक होत शौर्यदिन साजरा करीत आली आहे.

इथेच सुभेदार तानाजीरावांचे चरित्र संपले....पण त्यापासून स्फूर्ती घेत गेल्या ४०० वर्षात अनेक असेच लढवय्ये आपल्या हिंदुस्थानात निर्माण झाले. तानाजीरावांच्या चरित्रात एव्हढी ताकद आहे कि, स्वातंत्रवीर सावरकरांनी देश पारतंत्र्यात असताना जनता पेटून उठवी यासाठी तानाजीच्या जीवनावर एक पोवाडा लिहिला, या पोवाड्यातून गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी हा देश पेटून उठेल हे लक्षात येताच इंग्रज सरकारने त्यावर बंदी आणली.....तानाजीरावांचे चरित्र कितीही गायिले तरी थोडेच. आणि त्यातील थोडे जरी आचरले तरी पुष्कळच.

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण