मंगळवार, १९ मे, २०२०

स्वकीयांच्या पारंतंत्र्यात




१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन

स्वकीयांच्या पारंतंत्र्यात


स्वातंत्र्यदिन म्हणजे देशभक्ती.... तिरंगा ध्वज आणि मातृभूमीच्या विषयी अभिमान व्यक्त करण्याचा दिवस. विसाव्या शतकात आपल्या देशाने गुलामीविरुध्द लढा दिला. ब्रिटिशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. साता समुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले. युनियन जॅक फडकावत ठेवला आणि दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत राहिलो. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली.  मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला ?  दीडशे वर्षे राज्य कसे केले ? तर भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा घेत फोडा आणि झोडा याचा अवलंब करीत इंग्रजांनी सारा देश पादाक्रांत केला. आपल्या देशातील संपत्ती त्यांच्या देशात घेऊन गेले इंग्लंडला संपन्न केले आपल्या देशाला द्ररिद्री बनवले. 



स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यवीरांनी कारावास पत्करला, छातीवर गोळ्या झेलल्या प्रसंगी फाशी जात आपल्या प्राणाची आहुती दिली.  आपल्या पिढीतल्या लोकांसाठी कोणत्याही दृष्टीने १९४७ हे वर्ष म्हणजे ऐतिहासिक होय. या ऎत्यिहासिक सालाच्या पवित्र घटनाच्या पावनस्मृती आपण कायम जपून ठेवल्याच पाहिजेत. आणि कर्तव्यबुद्धीने आपण दरवर्षी १५ ऑगष्ट्लास्वातंत्र्यदिनम्हणून साजरा करायला पाहिजे. माणूस असो वा देश असो स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही.  हे जाणून देशप्रेमाने प्रेरित होऊन हजारो भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले. या प्रयत्नाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय एकच होते आणि ते म्हणजे मायभूमीचे स्वातंत्र्य !  इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतात राज्य केले. तेवढ्या काळात आमचा इतिहास, आमचा पराक्रम, आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम त्यांनी केले.
इंग्रजांचा कावेबाजपणा ओळखणाऱ्या काहींनी त्यांच्या विरुद्ध शस्त्र उगारले. १८५७ चे स्वातंत्र्यसमर तात्या टोपे, झाशीची राणीलक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे यांनी गाजविले. पुढे सशस्त्र उठाव करून वासुदेव बळवंत फडके,  क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इत्यादीनी आपला निषेध हातात शस्त्र घेऊन नोंदविला.  अश्याप्रकारे अनेकांनी भिन्नभिन्न मार्गाने अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळविले गेले आहे.  आपल्या पिढीचा स्वतंत्र्य भारतात जन्म झाला आहे. पण भारतातील थोर देशभक्तांनी भारतमातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे, सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या तेव्हाच  आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला.

सर्वांच्या बलिदानाने,  हाल अपेष्टांनी, खडतर प्रयत्नांनी स्वातंत्र्य सूर्य उगवला, भारताला स्वातंत्र्य देण्याची घाई करू नका.  ते लोक ५० वर्षांतच त्याची वाट लाऊन टाकतील, असं विन्स्टन चर्चिल म्हणाला होता.  त्याचे हे उदगार खुळेपणाचे आणि अहंकाराचे प्रतिक होते, पण त्याचे हे उद्गार आमच्या लोकांनी  खरे करून दाखवलेच की नाही ? देशाचा अभिमान असणारा हा दिवस असला तरी प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र दिसते आहे.  १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी फक्त एक हक्काची सार्वजनिक सुट्टी,  मौजमजा करण्याचा आणखी एक दिवस असे सध्याच्या परिस्थितीवरून वाटते. भारताच्या स्वातंत्र्याला आता ७० वर्षे उलटून गेली आहेत. परंतु अजूनही आपणास स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला असे म्हणणे धाडसाचेच ठरेल.
१४ ऑगस्टच्या मध्यरात्री देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हर्षाने म्हणाले, ''मध्यरात्री बारा वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले आहे ! आपला देश स्वातंत्र्य झाला म्हणजे नेमके काय झाले, १९४७ च्या नंतरच्या पिढीतील अनेक जणांना माहीत नसेल. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण प्रजासत्ताक राष्ट्राची आणि सार्वभौम लोकशाहीची संकल्पना स्वीकारली. लोकांनी लोकांसाठी आपल्यातीलच लोकांचे स्वीकारलेले राज्य म्हणजेच प्रजेचे राज्य. शिवकाळातल्या संदर्भानुसार रयतेचे राज्य. आज स्वतंत्रदिन साजरा करताना देशात खरेच का प्रजेची सत्ता आहे असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही. या प्रजेमध्ये जर ७०-७५ टक्के समाज दुर्बल, वंचित घटकांचा आहे आणि आजही अन्न, वस्त्र, निवारा,शिक्षण या मूलभूत गरजांसाठी तो झगडत आहे. त्यांचे योग्य प्रतिनिधित्व स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभेपर्यंत पोहोचू शकत नसेल, तर अजूनही आपण -या  स्वातंत्र्यापासूनपासून फारच दूर आहोत असे खेदाने म्हणावे लागेल. खरंच आज ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यांना अभिप्रेत असलेले लोकशाहीचे राज्य अस्तित्वात आहे का ? भारतीय संविधानानुसार सत्ता, राज्यकर्ते आणि समाज वागतो आहे का ? सत्ताधारी मंडळी देशावर राज्य करत असताना,  ते प्रजासत्ताक मधील फक्त  सत्ताहाच शब्द ( आपल्या आणि फक्त आपल्या पिढ्यांसाठी ) लक्षात ठेवून कारभार चालवताना दिसत आहेत. राजकीय सत्ता त्यामाध्यमातून मिळणारी अफाट संपत्ती जमा करण्याकडेच राजकारणी मंडळी लक्ष ठेवून आहेत. स्वातंत्र्यदिना  दिवशी तिरंगा ध्वजापुढे अभिवादन केले की आपली इतिकर्तव्यता संपली अशी मनोधारणा झालेल्या पुढाऱ्यांचे  काय करणार ? लोकशाहीमध्ये जनता हीच खरी मालक असते, हेच हे राजकारणी विसरत चालले आहेत.  देशातील फक्त एक टक्का व्यक्तींकडे देशातील सर्वाधिक संपत्ती आहे, तर उर्वरित करोडो लोक गरीब आहेत. हा विरोधाभास फक्त भारतातच आढळतो. जगातली सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपली लोकशाही जगात आदरणीय आहे. पण खरेच का आदरणीय लोकशाहीचा लाभ सामान्य जणांना होतो आहे ?  आज आरक्षण, जातीयवाद, खाण्या-पिण्याच्या सवयी, लिंगभेद, आदी अनेक कारणांनी समाजातील दुफळी दिवसेंदिवस वाढते आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असा अर्थ काढून लोकशाहीतील मुख्य स्तंभांचा  आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात, स्वातंत्र्याच्या नावाखाली मनमानी करत आहेत. तरुणांसाठी तर स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे मजा-मस्ती करणं, शिक्षण झालं की पैसा कमवून मजा करणं एवढाच उरला आहे.  दुसऱ्यांसाठी, समाजासाठी काही करण्याची भावना, वृत्ती तरुणांमध्ये उरली नाहीये, असं चित्रं बघायला मिळतं. राज्यघटनेतील तरतुदीनुसार समाजातील प्रत्येकाला समान न्याय, समान अधिकार आणि समान संरक्षण देऊ करण्यात आले आहे. पण, केवळ स्वार्थी राजकारण, मतपेटय़ांचा विचार करून आज प्रत्येक राजकीय पक्ष जाती-धर्म पुरस्कृत मते लादत राजकारण करतो आहे.  इंग्रजांच्या गुलामगिरीतून जरी आपण मुक्त झालो असलो तरी कुठल्याना कुठल्या विचारधारेचं आजही आपल्यावर बंधन आहे. स्वतंत्र देशामध्ये जेवढी प्रगती, उन्नती आणि विकास व्हायला हवा होता, तेवढा आपल्या देशात अजिबात झाली नाही.  राजकीय स्वार्थ आणि आपल्या नेतृत्वाचे वर्चस्व कायम ठेवायसाठी अधूनमधून काही अपप्रवृत्ती डोके वर काढतात. चिथावणीखोर कृत्ये करतात. धार्मिक वातावरण बिघडते. भिन्न जातीत असहिष्णुतेचे वातावरण निर्माण होते. पण, फारच थोडा काळ ते टिकते. काही महिन्यांनी परस्परातले गैरसमज निवळतात आणि पुन्हा एकोपा होतो. काही घटनांना राजकीय रंग फासला जातो. त्याचे राजकीय भांडवल करून आपल्या स्वार्थाची पोळी त्या पेटत्या होळी वर भाजून घेणारे राजकारणी गणंग हेच राष्ट्रीय एकतेचे खरे वैरी आहेत. जातीय दंगलीत सर्वसामान्य आणि गोरगरिबांचेच प्राण जातात. अशा दंगलीमुळे सामाजिक ऐक्याला तडा जातो. राष्ट्राचे आणि समाजाचे नुकसान होते. पण राजकारण्यांना त्याचे काही सोयरसुतक नसते. मोठय़ा शहरांमध्ये कदाचित थोडं स्वातंत्र्य असेल, पण आजही अनेक खेडय़ापाडय़ांत तेथील लोकांना जुन्या समस्यांनाच तोंड द्यावं लागत आहे.  दैनंदिन जीवनाच्या गरजांसाठी लढा द्यावा लागतो आहे. अशा परिस्थितीलास्वातंत्र्य कसं म्हणू शकतो आपण ? जातीयवाद, धर्मवाद जोपर्यंत भारतातून जात नाही तो पर्यंत भारत देश पूर्णपणे स्वतंत्र आहे असं मी म्हणू शकणार नाही. शिवाय भ्रष्टाचार आहेच. जागोजागी होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे ही नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, हे चित्र बदलणे जसे आवश्यक वाटते, तसेच जाण त्या तरुणाईने राजकारणातील आपला अभ्यासू सहभाग वाढवला पाहिजे असेही वाटते. संविधानानुसार स्वातंत्र्य, समता, बंधुता सामाजिक न्याय देणारी राज्यव्यवस्था म्हणजे प्रजासत्ताक लोकशाही; परंतु आजच्या राज्यकर्त्यांच्या कृतीत त्याचा अभाव दिसत आहे. अधिकाधिक समाज हा संविधान साक्षर नसल्यामुळे आपल्या हक्क-अधिकार कर्तव्याविषयी उदासीन आहे.
 
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांचं स्मरण स्वातंत्र्यदिनी केलंच पाहिजे. आजची भारतीय तरुण पिढी विदेशी वस्तूंकडे, विदेशी जीवनशैलीकडे झुकताना आढळतेय. विदेशी संस्कृतीचा तिच्यावर खूप प्रभाव पडत आहे असं दृश्य सर्वत्र बघायला मिळतंय.
ब्रिटिशांच्या जोखडातून देश स्वतंत्र झाला, तेव्हा अन्नधान्याच्या उत्पादनासह सर्वच बाबतीत आपण परावलंबी होतो. आता दशकांच्या वाटचालीनंतर भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वावलंबी आहे. जगातली तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता म्हणून आपल्या देशाकडे जगाचे लक्ष आहे.  अनेक समस्यांवर मातही करण्यात देशाने यश मिळवले आहे. या सार्या बाबी अभिमानास्पद असल्या तरीही सामाजिक एकता आणि समानता मात्र अद्यापही प्रस्थापित झालेली नाही. आपल्यातल्या मतभेदांचा लाभ घेत शेजारच्या राष्ट्रे पाक-चीनसारखे देश आपल्या सीमा तणावपूर्ण ठेवत आहेत. अलीकडे तर जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात आपले शूर जवान हौतात्म्य पत्करत आहेत. आता या पुढच्या काळात अतिरेक्यांसह राष्ट्रद्रोह्यांचे हे सारे मनसुबे उधळून लावण्यासाठी सामाजिक एकजूट कायम ठेवायला हवी आणि तसे घडले, तर ही भारतभूमी जगाला शांततेचा संदेश तर देईल.
भारताला 'स्वातंत्र्य' देण्याची घाई करू नका. ते लोक ५० वर्षांतच त्याची वाट लाऊन टाकतील, असं विन्स्टन चर्चिल म्हणाला होता. त्याचे हे उदगार खुळेपणाचे आणि अहंकाराचे प्रतिक होते.  भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकित वर्तवले होते. परंतू विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ठय ठरले आणि आज 78 वर्षाच्या स्वातंत्र्यतोत्तर वाटचालीत भारताच्या एकात्मतेला कुठेही तडे गेले नाहीत.  भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, शेती, शिक्षण असा विविध क्षेत्रात प्रगती केली. आज भारताकडे स्वत:चा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलं जातं.
भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्या किबंहुना त्याच्या दुप्पट वेगाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे. ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो. पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र अडकलो आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होत चाललयं. परदेशियांशी लढणं सोपं आहे पण स्वकियांशी तितकेच कठीणआर्थिक महासत्तेची स्वप्न बघणाऱ्या भारतात दारिद्रय रेषेखालील जनेतेला अन्न, निवारा या जीवनाश्यक गोष्टीची भ्रांत आहे. आज अनेक संकटांना सामोरे जाऊनही भारत निर्विवादपणे जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला विकसनशील देश म्हणून झेपावत आहे. परंतु प्रत्येकाच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे आणि भुकेल्या, लाखो लोकांना स्वराज्यासह सुराज्याची खात्री देणे या गांधीजींच्या उक्तीमध्येच स्वातंत्र्याचा खरा अर्थ दडलाय. एक जबाबदार सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाला संविधानाने काही महत्त्वाचे हक्क दिले आहेत. अगदी माझा  पेहराव परिधान करण्यापासून ते करिअर निवडण्यापर्यंतचं स्वातंत्र्य. तसंच विचार करण्याचं, बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य. अशी अनेक स्वातंत्र्यं आपल्याला दिली गेलेली आहेत. पण या अधिकारांबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. मला मनापासून वाटतं की आजच्या तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्याबद्दल, त्याच्या सर्वसमावेशक आणि व्यापक अर्थाबद्दल जागरूक असलं पाहिजेदेशहा केवळ एक शब्द नसून ती एक भावना आहे असा विचार लहानपणापासून मनात आणि उरात जपायला हवामाझ्या मते, स्वातंत्र्याबद्दल केवळ बोललं जाऊ नये तर ते जगलं पाहिजे, उपभोगलं पाहिजे आणि त्याचबरोबर इतरांनाही त्याचा अनुभव देता आला पाहिजे. स्वातंत्र्याचा अर्थ पाश्चिमात्त्यांचं अंधानुकरण असा घेता विविध संस्कृतींतून आलेल्या मानवतावादी मूल्यांना एकत्र करून स्वातंत्र्याची जाणीव करून दिली पाहिजे.

चौदा ऑगष्टच्या रात्री दिल्लीत घटना सभेत पंडित जवाहरलाल नेहरू भाषण करताना म्हणाले होते, पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे.  मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल. स्वातंत्र्यप्राप्ती होईल. जुन्याला सोडचिठ्ठी देऊन नव्या आयुष्यात पाऊल टाकतानाचे, एका युगाचा शेवट होत असतानाचे आणि पिचलेले राष्ट्र स्वतःचा उद्धार करतानाचे, असे क्षण इतिहासात खूप कमी वेळा येतात. या महत्त्वपूर्ण क्षणी आपण भारत, भारतवासीय आणि मानवतेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेणे योग्य ठरेल.
भारताला अखेर स्वत्वाची ओळख झाली आहे. आज आम्ही साजरा करत असलेला आनंदोत्सव म्हणजे आगामी काळात आणखी कीर्ति आणि विजय मिळविण्यासाठी टाकलेले केवळ एक पाऊल आहे. असा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी यापुढेही मिळणार आहेत. आतापर्यंत आपण जे संकल्प केले आणि आजही करत आहोत,त्यांना पूर्ण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहण्यासाठी आहे. भारताची सेवा म्हणजे कोट्यवधी दीनदलितांची सेवा आहे. याचा अर्थ दारिद्र्य, अज्ञान संधीची विषमता आपल्याला संपवावी लागणार आहे. प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू पुसले पाहिजेत, अशी आमच्या पिढीतील सर्वांत मोठ्या व्यक्तीची आकांक्षा आहे. कदाचित हे आपल्या क्षमतेपलिकडील असेल. पण जोपर्यंत अश्रू आहेत, दुःख आहेत, तोपर्यंत आपले काम पूर्ण होणार नाही.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना अंमलात आली. एकभाषक राज्यांच्या निर्मितीमुळे राज्यांचा विकास झपाट्याने होईल, अशी योजनाकारांची आणि सरकारची अपेक्षा होती. पण, तसे काही घडले नाही. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे सर्व भारतीयांना समान आर्थिक, सामाजिक आणि राजकीय हक्क-अधिकार आणि सप्तस्वातंत्र्ये बहाल केलेली आहेत. पण, इतक्या वर्षानंतरही आर्थिक समता अस्तित्वात आलेली नाही. मुक्त उदारमतवादी अर्थव्यवस्थेच्या धडाकेबाज अंमलबजावणीनंतर पाश्चात्य चंगळवादी संस्कृती फोफावली आहे.  देशात बहुराष्ट्रीय आणि कार्पोरेट कंपन्यांना भारतातल्या ग्राहकांची मनमानी लूट करायचे मुक्त परवाने मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया' अशी घोषणा करून परदेशी भांडवलाची देशात गुंतवणूक व्हावी यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती केली असली, तरी महात्मा गांधीजींच्या स्वदेशीच्या मंत्राचे काय? याचा गंभीर विचार भारतीयांनी करायला हवा. 'मेक इन इंडिया' बरोबरच 'मेड इन इंडिया'  या मंत्राचा जागर करायलाच हवा. स्वातंत्र्य मिळाले, पण त्याचे सुराज्यात रूपांतर झालेले नाही. दुर्गम भागात राहणाऱ्या गरीब आदिवासींच्या झोपडीपर्यंत स्वातंत्र्य सूर्याची किरणे पोहोचलेली नाहीत. अशा स्थितीत देशाने कितीही आर्थिक विकास केला, आर्थिक विकासाचा दर वाढवला, आर्थिक महासत्तेच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू असली. तरी त्या विकासाला तसा काही अर्थ नाही. आर्थिक प्रगती आणि चंगळवादाच्या प्रसारामुळे दिखाऊ भौतिक सुखे देशवासीयांना मिळाल्याने, संपूर्ण देशवासीय सुखी झाले असे होत नाही. शेवटच्या तळागाळापर्यंतच्या माणसापर्यंत स्वातंत्र्याचे अधिकार पोहोचायला हवेत आणि ते पोहोचण्यासाठी  केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि समाजानेही प्रयत्न करायला हवेत. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या शक्तींचा नायनाट करण्याबरोबरच देशांतर्गत सामाजिक ऐक्याला आव्हान देणाऱ्या शक्तींचाही कठोरपणे बिमोड करायलाच हवा. आपले राष्ट्र बलशाली, शस्त्रसंपन्न, सामर्थ्यशाली असेल तरच जगाला शांततेचा मंत्र द्यायचा अधिकार असेल.

चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री तिरंगा फडकवताना त्या वेळच्या पिढीने बलशाली भारताचे स्वप्न पहिले होते. ते पूर्ण करण्यासाठीच काम करण्याचे त्यासाठी परीश्रम घेण्याचे आणि हे स्वप्न केवळ भारतवासियांचे नसून वैश्विक असेल. त्याचबरोबर आपली आगामी पिढी सुखासमाधानाने राहू शकेल अशा बलाढ्य विशाल भारताची इमारत आपल्याला उभारायची आहे.....प्रचंड संख्येने असलेली आजची सुशिक्षित युवाशक्ती हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा येणाऱ्या काळात कसा वापर करील हे येणार काळच सांगेल. तेव्हा अभिमानाने जगच म्हणेल



'बलसागर भारत ....विश्वात शोभुनि राहो'





रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...