सामाजिक कार्यकर्तृत्वाची चौथी माळ
डॉ. आनंदीबाई जोशी- पहिल्या महिला डॉक्टर
आनंदीबाई म्हणजे भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होतं. हो...एक मराठमोळी स्त्री भारताची पहिली महिला डॉक्टर होती. त्यांनी १८८६ मध्ये थेट अमेरिकेमधून डॉक्टरकी मिळवली होती. आनंदीबाईंचा जन्म सनातनी ब्राम्हण कुटुंबात झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुणे येथे झाला. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचे गोपाळरावांशी लग्न झाले. गोपाळराव विधुर होते आणि वयाने २० वर्षांनी मोठे hote.
आनंदीबाईंपेक्षा तिप्पट मोठे होते. लग्नानंतर गोपालरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४ व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने प्रसूतीच्या वेळी वैद्यकीय संसाधने उपलब्ध नसल्याने आनंदीबाईना त्यांच्या पहिल्या मुलाला गमवावे लागले.. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली.
आनंदीबाईंचे पती गोपाळराव जोशी हे उदारमतवादी होते. त्यांनी नेहमी आपल्या पत्नीच्या मागे खंबीरपणे उभे राहून तिचा विश्वास वाढवला. त्यांनी नेहमी आनंदीबाईना प्रेरणा देण्याचे काम केले. वयाच्या १४ व्या वर्षी त्याच क्षणाला त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरवले. गोपाळरावांनी सुद्धा आपल्या बायकोला शिकवण्याचे ध्येय मनाशी बाळगले आणि तिच्या मागे खंबीरपणे उभे राहून तिचे प्रत्येक पाऊलावर समर्थन केले.त्यावेळी स्त्रियांचे शिक्षण कुणीही गंभीरपणे घेत नसे. परंतु गोपाळराव त्यामधील नव्हते. त्यांनी आनंदीबाईंशी एका अटीवर लग्न केले होते की, मुलीने शिक्षण घेण्यास तयार असावे, तसेच किमान तिने लिहिता वाचता येईल एवढे तरी शिकावे.
गोपाळरावांनी आनंदीबाईंना मराठी, इंग्रजी आणि संस्कृत कशी लिहितात आणि वाचतात त्याचे शिक्षण दिले. कोल्हापूरमध्ये मिशनऱ्यांशी ओळख वाढल्यावर तिथे प्रथम गोपाळरावांच्या मनात आलं की आनंदीला अमेरिकेला पाठवून तिचं शिक्षण करावं. त्या वेळी गोपाळरावांनाही अमेरिकेला जायची इच्छा होती, परंतु ते काही जमू शकलं नाही. आनंदी बुद्धिमान. तिनं इंग्रजी भाषा व अन्य विषय पटकन आत्मसात केले. आनंदीला अमेरिकेला शिकायला जाण्यासाठी पैशांची तरतूद आवश्यक होती. ती करण्यात, तिला जायला सोबत शोधण्यात २-४ वर्षे गेली. भारतात बदलीच्या ठिकाणी आनंदीबाईना समाजाचे, शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे विपरीत अनुभव आले. त्या गोपाळरावांबरोबर फिरायला जातात. इंग्रजी शिक्षण घेतात. याबद्दल कुतूहल म्हणून त्या दोघांना पाहायला लोक गर्दी करीत आणि गोपाळरावांना विचारीत, ही ठेवलेली बाई का? आनंदीलाही खूप अपमानास्पद शेरे ऐकावे लागत. परंतु तिकडे दुर्लक्ष करून आनंदी आपला अभ्यास निष्ठेने करी. आनंदीच्या आई–वडिलांनी तिच्या शिक्षणामध्ये हस्तक्षेप करू नये, म्हणून गोपाळरावांनी आपली बदली कोलकत्त्याला करून घेतली. गोपाळराव आनंदीच्या शिक्षणासाठी नेहमी आग्रही असायचे. १८८० मध्ये गोपाळरावांनी प्रसिद्ध अमेरिकन मिशनरी रॉयल विल्डर यांना पत्र पाठवले. त्या पत्रात त्यांनी आपल्या पत्नीची अमेरिकन औषधांचा अभ्यास करण्याची इच्छा आहे तर तिला काही मदत मिळू शकते का असे? असे विचारले होते.
रॉयल विल्डरने आनंदीबाईंना मदत मिळावी म्हणून ही बातमी एका लेखाद्वारे स्थानिक वर्तमानपत्रात छापली. त्याच दरम्यान न्यू जर्सीतील एक श्रीमंत अमेरिकन थिऑडीसिया कारपेंटर याने हा लेख वाचला आणि ती आनंदीबाईंची औषधांविषयी शिकण्याची असणारी डोंगराएवढी कळकळ बघून त्यांनी आनंदीबाईंना मदत करण्याचे ठरवले. अमेरिकेला जाण्यापूर्वी श्रीरामपूर (बंगाल) इथल्या
बॅप्टिस्ट कॉलेजच्या सभागृहात आनंदीबाई जोशी
यांनी ‘मी अमेरिकेस का जाते?’ यावरती
अस्खलित इंग्रजीत व्याख्यान दिलं. मुळातून त्यातला एक मुद्दा असा,
वैद्यकशास्त्रज्ञ
स्त्रियांची हिंदुस्थानातल्या प्रत्येक भागात
अतिशय जरुरी आहे.
सभ्य स्त्रिया पुरुष
वैद्याकडून चिकित्सा करून
घेण्यास प्रवृत्त नसतात. इथे स्त्री डॉक्टरची किती
गरज आहे हे ओळखून आनंदीबाई डॉक्टरची पदवी
घेण्यासाठी अमेरिकेत गेल्या.
१९ वर्षाच्या आनंदीबाईंनी पेनीसिल्व्हेनियातील महिला वैद्यकीय महाविद्यालयात (सध्या ड्रेक्सेल विद्यापीठ, वैद्यकीय विद्यालय म्हणून ओळखले जाते) प्रवेश घेतला. शिक्षण घेताना आनंदीबाईंचे आरोग्य नेहमी बिघडायचे. पण त्यावर मात करत १८८६ मध्ये त्यांनी एम.डी.ची पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर खुद्द राणी विक्टोरिया हिने अभिनंदनाचा संदेश आनंदीबाईंना पाठवला. प्राचीन हिंदू स्त्रियांच्या प्रसूतीकरणावर अभ्यास करून आनंदीबाईंनी आपला प्रबंध पूर्ण केला. प्रत्येक ठिकाणी त्यांना सतत संघर्ष करावा
लागला. अठराव्या वर्षी
१८८३ मध्ये एका अमेरिकी बाईच्या सोबतीने, एकटीने दोन महिन्यांचा बोटीने
प्रवास केला. त्यात
त्या शाकाहारी आणि साडी हाच पोशाख. बोटीवर
त्यांची उपासमार झाली. त्या आजारी पडल्या, पण पुढेही चार वर्षे त्यांची उपासमारच झाली. भारतीय
पद्धतीचं अन्न मिळालं
नाही. परदेशी कपडे
वापरायचे नाहीत म्हणून
त्या साडी नेसून
धाबळीचे जाकीट घालीत. त्यामुळे तिथली
बर्फाळ थंडी त्यांचं शरीर चिरत राहिली. त्यात
अभ्यास, स्वत:चा स्वयंपाक स्वत: करायचा, समाज-नातलग
यांनी दिलेली दूषणं
सहन करीत इच्छित
कार्य करीत त्या
राहत असत तिथला
समाजही आनंदीशी कुत्सितपणे वागत
होता. तिथेही कार्पेटरबाई आणि कॉलेजच्या प्रिन्सिपॉल इत्यादी चांगल्या स्त्रिया भेटल्या, परंतु
अन्य बऱ्याच जणांनी
आनंदीला त्रास दिला. बोटीवर तर पुरुषांनीही त्रास
दिला आणि जिच्या
सोबतीने आनंदी निघाली
होती, तिचंही वागणं
ठीक नव्हतं. याचा
तिच्या मनावर परिणाम
होत होता. तो शरीरावरही झाला. सतत अर्धपोटी राहिल्याने आजारपणं तिच्या पाठी लागली.
जेव्हा आनंदीबाई भारतात
परतल्या- १६ नोव्हेंबर १८८६
या दिवशी- तेव्हा
मुंबई बंदरावर लोकांनी गर्दी केली. त्यांचं पुष्पवृष्टीनं स्वागत केलं. मुंबई बंदरात बोटीतून उतरण्यापूर्वीचं त्यांच्या पोशाखाचं वर्णन
आहे. ‘नारायणपेठी काळी
चंद्रकळा (नऊवारी), खणाची
चोळी, कपाळावर कुंकू, नाकात
नथ, कानात कुडी, पायात बूट व स्टॉकिंग्ज’ असा थाट होता. त्या
आजारीच होत्या, परंतु
हिंदुस्थानात घरी जायला
मिळणार, घरचं अन्न
मिळणार म्हणून त्यांची प्रकृती तात्पुरती स्थिर
होती. आनंदीबाईंना अभिनंदनाच्या तारा
आल्या, मानपत्रे पाठवली
गेली. मानपत्रात त्यांच्या उच्च
शिक्षणाचा गौरव केला
गेला. अमेरिकेच्या त्यांच्या मेडिकल
कॉलेजने ११ मार्च
१८८६ रोजी फिलाडेल्फियाला त्यांना ‘वैद्य
विद्यापारंगत’
हा किताब दिला. त्यांच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः
उपस्थित राहिले. पंडिता
रमाबाई होत्या. ‘भारतातील पहिली
स्त्री डॉक्टर’ म्हणून
सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार
टाळ्या वाजवून तिची
प्रशंसा केली. आनंदीबाई जोशी
डॉक्टर होऊन स्वदेशी आल्या. जाताना एकटय़ा
होत्या. येताना गोपाळ
जोशी बरोबर होते. पण एव्हाना त्यांना क्षयाची बाधा झाली
होती. बोटीवर कुणीही गोऱ्या डॉक्टरने तिला बिगर गौरवर्णीय म्हणून उपचार केले नाहीत तर मायदेशी पोहोचल्यानंतर समुद्रोल्लंघन करून आलेली त्यातून स्त्री म्हणून हिंदू डॉक्टर किंवा वैद्यही तपासून पाहीनात. वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला. पण दुर्दैव असे की, ज्या कार्यासाठी त्यांनी एवढे शिक्षण घेतले होते ते वाया गेले, कारण २२ फेब्रुवारी १८८७ रोजी,वयाची २२ वर्ष पूर्ण होण्यास महिन्याभरच कालावधी उरला असताना त्यांचे निधन झाले.
अमेरिकेत त्यांचा पाहुणचार करणाऱ्या कार्पेटर कुटूबियांनी आपल्या
कुटुंबाच्या स्मशानात त्यांचे लहानसे थडगे बांधले. त्यावर ‘आनंदी
जोशी, एक तरुण
हिंदू ब्राह्मणकन्या. परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर
पदवी मिळवणारी पहिली
भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरून
तिचे स्मारक केले.अगदी खडतर परिस्थितीवर मात करीत पतीच्या मार्गदर्शनाने आणि साथीने आनंदीबाईंनी भारताची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. त्यांच्या लहानग्या आयुष्यात त्यांनी केलेले कार्य म्हणजे प्रत्येक भारतीय स्त्री साठी आदर्श आहे.
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा