पोलादपूरच्या चित्रे घराण्याचा इतिहास
मुंबईच्या दक्षिणेकडे रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला मुंबईपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर पोलादपूर तालुका आहे. ब्रिटिशांच्या काळात पोलादपूर तालुका हा महाड तालुक्याचाच एक भाग होता. स्वातंत्र्यानंतर पोलादपूरला प्रथम महालाचा आणि नंतर तालुक्याचा दर्जा प्राप्त झाला. पोलादपूर हे तालुक्याचे गाव. पोलादपूरचे नाके हा एक तिठा आहे. येथून तीन रस्ते फुटतात. उत्तरेचा रस्ता रायगड जिल्हा (जुना कुलाबा) पार करून ठाणे जिल्ह्याच्या दिशेने जात मुंबई शहराकडे जातो. दक्षिणेकडील रस्ता सुमारे बारा-तेरा किलोमीटर अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करीत गोवा राज्यापर्यंत जातो. तर आग्नेय दिशेकडील रस्ता प्रतापगडच्या रोखाने सरकत सातारा जिल्ह्याकडे मिळतो. पोलादपूरपासून पंचवीस मैलावर असलेल्या महाबळेश्वरात उगम पावलेली सावित्री नदी डोंगराखाली उतरते आणि पुढे महाडच्या कडेकडेने वाहत जाऊन बाणकोटचा खाडीला मिळते.
आज पोलादपुरात नवनवीन घरे-इमारती बांधली जात आहेत. अनेक वस्त्या निर्माण झाल्या आहेत. पण स्वातंत्रपूर्व काळातील पोलादपूर आजच्या इतके विस्तारलेले नव्हते. त्या वेळचे जे पोलादपूर गाव होते. त्याच्या मध्यभागी पेठकर आळी नावाची वस्ती होती. आजही आहे. त्या आळीच्या मध्यभागी समोरच्या बाजूला पोलादजंगाचा पीर आहे. "पोलादजंग" हा विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार. त्याच्याच नावाने चित्र्यानी बसविलेले गाव म्हणजे आजचे पोलादपूर. सन १३०७ साली अल्लाउद्दीन खिलजीच्या सेनापती मलिक काफूर हा देवगिरीवर चालून आला. तेव्हा चित्रे मंडळी समुद्रमार्गाने सह्याद्रीच्या पश्चिमेला कोकणात येऊन दापोली तालुक्यातील घोलेवाडी नावाच्या डोंगराळ गावी येऊन राहू लागले. चित्रे तिथे येऊन नुसते राहिले नाहीत. तर त्या डोंगरावर त्यांनी घोलेवाडीचा किल्ला बांधला आणि जंगलतोड करून किल्ल्याच्या भोवतीच त्यांनी वस्ती केली. तेव्हा त्यांना घोलकर हेही नाव मिळाले.
ह्या चित्रांचा मूळपुरुष श्रीरंग प्रभू. त्याला पिलाजी आणि रामाजी असे दोन मुलगे होते. त्यांच्या दोन शाखा झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी चित्रे हे दुसऱ्या शाखेतील रामाजींचे नातू. तर पोलादपूर चित्र्यांची शाखा पिलाजीपासून सुरु होते. पिलाजी घोलेवाडीतच येऊन राहू लागले. तेव्हा कोकणावर विजापूरकरांचे राज्य होते. पण राज्य विजापूरकरांचे असले तरी सत्ता मात्र कोणाचीच नव्हती. ह्या भागातील लोक खंडणी कोणालाच देत नसत. महसूल गोळा होत नसे. थोडक्यात चित्रे आणि कोकणातली इतर मंडळीहि कुणालाच दाद देत नसत. न दिल्लीकरांना न विजापूरकरांना. विजापूरकर खंडणी मागायला आले तर म्हणत आम्ही दिल्लीकरांना खंडणी देतो. दिल्लीकरांना सांगत इथला महसूल विजापूरकर गोळा करून घेऊन जातात. वास्तविक दिल्लीकरांचा ह्या भागाशी फारसा संबंध नव्हताच. विजापूरकरांना संशय आला आणि बहुधा कोकणी लोकांची हि युक्ती त्यांच्या लक्षात आली असावी. त्यांनी कोल्हापूरचा सरदार पोलादजंग ह्याला कोकणातली हि बेशिस्त मोडून काढण्यासाठी कामगिरीवर पाठवले. त्याने आल्याबरोबर घोलेवाडीला वेढा दिला. पण किल्ला सर होईना, पोलादजंगाने जंग जंग पछाडले पण चित्र्यानी त्याला नामोहम केले. पोलादजंग हुशार आणि महत्वाकांक्षी होता. त्याने आपली फौज विजापूरच्या रस्त्यावर आणून ठेवली. आणि विजापूरला परतण्याचा बहाणा केला. पण तो स्वतः मात्र घोलेवाडीवर मारा करण्याच्या नेमक्या जागा शोधण्यासाठी गुराख्याच्या वेष धारण करून टेहळणी करू लागला. सहा महिन्यात त्याने कोंढवी चा डोंगर हि घोलेवाडीवर मारा करण्यास योग्य अशी जागा हेरून ठेवली. कोंढवी चा डोंगर घोलेवाडीच्या पश्चिमेला होता. पोलादजंगाने आपली फौज तोफेसह कोंढवीच्या किल्ल्यावर चढवली. आणि घोळकरांना (चित्र्याना) निरोप पाठविला कि, जरा पश्चिमेकडे पहा. आता आपला पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यानंतर मुत्सद्दी चित्र्यानी उत्तर पाठवले, आम्ही आपलेच आहोत. सांगाल तसे करू आणि राखाल तसे राहू. त्यावर प्रत्युत्तर आले, किल्ला सोडून खाली जावे व राहावे. घोळकर खाली उतरले. घोलेवाडी सोडून कोंढवीपर्यंत आले. आणि कोंढवीच्या चार बाजूस त्यांनी चार गावे वसवली. पोलादजंगच्या हिकमतीमुळे आपल्याला किल्ला सोडावा लागला. हि साल चित्र्यांच्या मनात होतीच. तेही हिकमती होते. त्यांची चिकाटी विलक्षण होती. आणि आत्मविश्वास दांडगा होता. चित्र्यानी पोलादजंगाशी चांगले संबंध ठेवण्यास सुरुवात केली. एके दिवशी चित्र्यांबरोबर त्याने बुद्धिबळाचा डाव टाकला. खेळता खेळता त्याने घोलेवाडीच्या दिशेकडे पाहून म्हटले शेवटी मात झाली. शह झाला. ते पाहून चित्र्यांकडील एक तरुण हसला, पण एका अनुभवी वृद्धाने त्याला दाबले. ते पोलादजंगाच्या लक्षात आले. तो अस्वस्थ झाला आणि काय झाले म्हणून विचारले. त्याचा राजकीय डाव चित्र्यानी त्याच्यावरच उलटविला होता.
ते असे घडले होते, कोंढवीच्या सभोवती चित्र्यानी चार बाजूना चार गावे वसविल्यानंतर पोलादजंगाने कोंढवीच्या डोंगरावर किल्ला बांधला. चित्र्यानी चाणाक्षपणे पोलादजंगाकडे येणे जाणे ठेऊन त्याच्याशी स्नेह वाढविला आणि किल्ल्यावर घरे बांधण्याची परवानगी मिळवली. पोलादजंगाच्या फौजेतील लोक जसजसे कमी होऊ लागले तसतशी चित्रे मंडळी वेषांतर करून त्याच्या फौजेत शिरली, वर उल्लेख केलेल्या बुद्धिबळाच्या खेळाच्या प्रसंगी हे त्याला समजले. तेव्हा चित्र्यानी आपल्यावर मात केल्याचे त्याला जाणवले. चित्र्यानी कोंढवी आपल्या ताब्यात घेतली आहे त्याच्या लक्षात आल्यावर तो बावरला. पण चित्रे विश्वासू आणि निष्ठावंत होते. त्यांनी पोलादजंगाशी दोस्ती केली होती. त्यांनी त्याला चांगले वागविले आणि आश्वासन देत म्हटले, आपल्या केसालाही धक्का न लागता आपण आहात तोपर्यंत आम्हास कर्तव्य नाही, तथापि उपकाराची फेड अपकाराने करू नका. पहिल्या वाक्यातील आश्वासन आणि दुसऱ्या वाक्यातील गर्भित इशारा ह्या दोहोंचाही पोलादजंग वर परिणाम झाला असावा. तो म्हणाला, माझ्या मृत्यूनंतर चित्र्यांच्या दारासमोर त्यांच्या आवारात माझे थडगे बांधले जावे. त्याच्या इच्छेप्रमाणे तसे करण्यात आले. चित्र्यानी त्याच्या मैत्रीच्या स्मरणार्थ आपल्या गावाचे नाव पोलादपूर ठेवले. कोंढवीभोतालच्या इतर तीन गावांना विन्हेरे, देवळे आणि शिरवली हि नावे मिळाली. पोलादजंगाच्या पिराच्या दिवाबत्तीचा खर्च पुढे कित्येक वर्षे चित्रेच करीत. पिराची जागा चित्रांच्याच ताब्यात होती. सन १९८१ च्या सुमारास त्या चित्र्यांचे वंशज रामचंद्र गणेश चित्रे ह्यांनी ती पोलादजंगच्या भक्तांना विकून टाकली.
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा