चळवळ वृत्तपत्र लेखकांची

'जनसामान्यांची महाशक्ती'




22 ऑगस्ट 2024 आजच्याच दिवशी फ्री प्रेस आणि दैनिक नवशक्तीच्या वतीने वृत्तपत्र लेखकांचा मेळावा फोर्टच्या तांबे उपहारगृहात आयोजित केला होता....या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने 22ऑगस्ट हा दिवस "वृत्तपत्र लेखक दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. प्रसार माध्यमांची वाटचाल छापील वृत्तपत्राकडून इलेक्ट्रॉनिक व्हाया ऑनलाइनकडे झाली असली तरी या सर्वांचा कान असलेल्या वाचकांचा विसर मात्र कोणत्याही माध्यमांना झालेला नाही. 'वाचकांचा पत्रव्यवहार' हे सादर आजही दैनिक,नियतकालिकामंध्ये आपले अस्तित्व टिकवून आहे. वृत्तपत्रसृष्टीच्या प्रारंभापासूनच वाचक पत्रव्यवहाराचे सामाजिक महत्व ओळखून संपादकांनी या पत्रव्यवहारास संपादकीय पानावर खास जागा दिली आहे. शतकर्ते लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख वृत्तपत्रांना 'बृहत्तरजिव्हा' म्हणायचे. प्रत्यक्षात 'बृहत्तरजिव्हा' चे स्वरूप पत्रव्यवहाराचे होते. वाचकांना आपली मते, विचार, तक्रारी, अपेक्षा, वादविवादावरील प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जणू हक्काची जागाच एका व्यासपीठाप्रमाणे पत्रव्यवहाराच्या सदरात उपलब्ध होते. वाचकांच्या पात्रातून समाजमनाची स्पंदने, समाजाच्या जाणीव व्यक्त होतात. 

समाजमनाच्या जिवंतपणाचा प्रत्यय देणाऱ्या या पत्रव्यवहाराला आणि ते सातत्याने लिहिणाऱ्या पत्रलेखकांना समाजमान्यता देण्याचे पहिला प्रयत्न 'जनसामान्यांची महाशक्ती' हे बिरुदावली मानाने मिरवणाऱ्या दैनिक नवशक्तीने पुढाकार घेऊन केला.देशाच्या स्वातंत्र्यानंतर देश घडवण्याचा प्रयत्न सर्वच आघाडीवर सुरु होता. वृत्तपत्रांनीसुद्धा या सोनेरी पहाटेचे स्वागत करून देश एकसंध करण्याचा आणि एकजुटीने पुढे जाताना विकासाचा दृष्टीकोन काय असायला हवा याची मांडणी करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. मात्र समाजमन घडवण्यासाठी 'सामान्य वाचक' हा सुद्धा व्यक्त होऊन वाचकांच्या पत्रातून अनेक चांगल्या उपयुक्त सूचना करून शकतो व काही चुकीचे घडत असेल तर तो त्यावर निस्वार्थी आणि परखडपणे प्रहार सुद्धा करू शकतो याचे महत्व जाणून  विचारवंत असलेल्या प्रभाकर पाध्ये यांनी १९४९ पूर्वीच ओळखले होते. त्यांनी नवशक्तीमध्ये 'जनमनाचा कानोसा' हा वाचकांच्या पत्रव्यवहासाठी वेगळा स्तंभ सुरु केला. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापूर्वी किर्लोस्कर मासिकाच्या व्यवस्थापकांना स्वतःच्या लेखक वर्गाचे एक संमेलन स्वखर्चाने किर्लोस्करवाडीला भरवले होते. त्याच धर्तीवर संपादक प्रभाकर पाध्ये आणि सहसंपादक श्रीकांत पालेकर यांनी नवशक्तीचे संचालक श्री सदानंद व श्री डी.एन. नाडकर्णी यांच्या सहकार्याने पत्रलेखनाचे संमेलन भरवण्याचा प्रयत्न केला. २२ ऑगस्ट १९४९ रोजी त्यावेळच्या फोर्टच्या सुप्रसिद्ध तांबे उपाहारगृहात त्यावेळी नवशक्तीच्या जनमनाचा कानोसा या सदरातून पत्रलेखन करणाऱ्यांचे पहिले संमेलन नवशक्तीने आयोजित केले होते. जवळजवळ २०० पत्रलेखक हजर होते. 


मोठ्या उत्साहाने पार पडलेल्या या पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा अनंत काणेकर हे होते. तर सन्माननीय पाहुण्यांमध्ये मुंबई सरकारचे प्रसिद्धी प्रमुख श्री अय्यर, प्रा. वा. ल. कुलकर्णी, अप्पा पेंडसे, र.गो.सरदेसाई, वा.रा.ढवळे, नि.श.नवरे, वि ह कुलकर्णी,व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे,  रा भी जोशी, सुधा जोशी   हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.केसरीचे संपादक दि वि गोखले, इतिहास संशोधक न र फाटक यांनी शुभेच्छा पत्रे पाठवली होती. सदर संमेलन कमालीचे यशस्वी झाल्याबद्दल वृत्तपत्र लेखकांचे आधारस्तंभ श्रीकांत पालेकर यांनी यापुढे सर्वांच्या सहकार्याने अशीच संमेलने भरविण्याची व्यवस्था करावी अशी इच्छा व्यक्ती केली. नवशक्तीने पत्रलेखकांना जे प्रोत्साहन दिले त्यामुळे जनतेत लिहिण्याविषयी आस्था निर्माण झाली. आणि त्याचवेळी  'मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई' या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस पुढे संघाच्या वतीने दरवर्षी 'वृत्तपत्रलेखक दिन' म्हणून साजरा केला जातो. डॉ ज द सिधये हे सुरुवातीपासून या वृत्तपत्र लेखक चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ होते. शरद कोरगावकर, छोटू जुवेकर, दौलत मुरारी साटम, यशवंत गुंडाजी मयेकर, दा बा भाटकर, नरेंद्र म्हात्रे, दत्ता अहिरे, रवींद्र पाटकर, गजानन लोके, रघुनाथ घानकुटकर, गजानन तांडेल, मधू नाशिककर हि पहिल्या संमेलनाची मंडळी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत चळवळीत सहभागी होती हे विषेश. त्यांनंतर झालेल्या संमेलनांना आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे,प्रा वि ह कुलकर्णी, कॅप्टनमा कृ शिंदे, पा वा गाडगीळ. धनंजय किर, बाळासाहेब  देसाई  यांनी अध्यक्ष म्हणून हजेरी लावली.सलग ५० संमेलने मुंबई शहरात पार पडल्यानंतर हि चळवळ खेड्यापाड्यात पोहोचावी या दृष्टीने संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी पुढची संमेलने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात घेण्याचा संकल्प केला. त्यामुळे ५१ वे ठाणे जिल्हा, ५२ वे रायगड जिल्हा, ५३ वे पुणे जिल्हा, ५४ वे सिंधुदुर्ग जिल्हा, तर नुकतेच संघाचे ५५ वे राज्यस्तरीय संमेलन ठाणे जिल्हा ग्रामीण म्हणून पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यासपीठावर आले आणि वृत्तपत्रलेखकांचे प्रबोधन करून गेले आहेत. 

वृत्तपत्र लेखक संघाला नेहमीच सृजनशील कार्यकर्ते लाभत गेले आहेत. ग शं सामंत, मधू शिरोडकर, गणेश केळकर, मधुसूदन आचरेकर, दत्ता टिपणीस, भाई तांबे, इस्माईल रखांगी, मिलिंद तांबे, वि. अ. सावंत, विश्वनाथ पंडित, सीताराम राणे, रणजित केळस्कर, रामचंद्र पुजारे, शांता भंडारे, सुनील शिंदे, नितीन चव्हाण, मनोहर साळवी, प्रकाश नागणे, विजय कदम, मनोहर मांदाडकर, नंदकुमार रोपळेकर, मधुकर कुबल, शरद वर्तक, दत्ताराम घुगे, प्रकाश नागणे, दिलीप ल सावंत, अनंत आंगचेकर,  रमेश सांगळे, सुनील कुवरे, नितीन कदम, प्रशांत घाडीगावकर, श्रीकांत मयेकर, आत्माराम गायकवाड, अरुण खटावकर, चंद्रकांत पाटणकर, नितीन कदम, शांताराम म्हस्के, मंदाकिनी भट, दिगंबर चव्हाण, दत्ताराम गवस, पास्कोल लोबो, दिलीप अ सावंत, राजन देसाई, सतीश भोसले, हेमंत सामंत,श्रीनिवास डोंगरे, प्रशांत भाटकर, रामचंद्र जयस्वाल, कृष्णा ब्रीद, मनमोहन चोणकर अशी अनेकांची मांदियाळी लाभल्यामुळे गेल्या 75 वर्षात नव्या कल्पना नवे उपक्रम नवे कार्यक्रम राबविता आले.



मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या १९७६-७७-७८ च्या संमेलनाला नवशक्तीचे संपादक पु रा बेहेरे उपस्थित होते. ७८ सालच्या संमेलनात  त्यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त भालचंद्र देशमुख याना संघाच्या कार्यालयासाठी जागा देण्याची सूचना केली. या सूचनेचा स्वीकार करीत देशमुख यांनी संघाला दादर-पूर्वेकडील शिंदेवाडी महापालिका शाळेत एक वर्गखोली उपलब्ध करून दिली. बेहेरे एव्हढ्यावरच थांबले नाहीत तर संस्था वाढीसाठी पोषक वातावरण करून देण्यासाठी नवशक्तीची संपादकीय केबिन उघडी करून दिली.त्यामुळे त्यानंतरच्या काळात झपाट्याने संस्थेची वाढ झाली. १९७८ फ्रि प्रेस कार्यालय आगीच्या भक्षस्थानी पडल्याने बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी संघाने रु. ४०१/- ची मदत दिली होती.

राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा, सर्वोत्कृष्ट पत्र स्पर्धा, सामान्य जनतेच्या प्रश्नावर वार्तालाप, वृत्तपत्र लेखक कार्यशाळा इत्यादी अनेक चांगले उपक्रम सुरु झाले आणि महाराष्ट्रभर संस्थेचे कार्य पोहोचविते ठरले. 

'वाचकांचा पत्रव्यवहार' हि लेखन क्षेत्रात करियर करण्याची महत्वपूर्ण शिडी आहे. ज्या पत्रलेखकाचे राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक भान चांगले होते त्या संघाच्या अनेक सभासदांना या शिडीचा वापर करून माध्यमात नोकऱ्या करणे शक्य झाले आहे. 'मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई' हि पत्रलेखनची मुंबईतील सर्वात जुनी आणि प्रातिनिधिक संस्था आहे. जणू वृत्तपत्रलेखकांसाठी हे 'विद्यापीठ' आहे. या विद्यापीठात शिकलेला विद्यार्थी माध्यमे किंवा इतर क्षेत्रात अयशस्वी  ठरलेला नाही.'मराठी अस्मिता' हे एकमेव ध्येय घेऊन कोणत्याही राजकीय प्रणालीची बांधिलकी न स्वीकारता केवळ समाज प्रबोधनाचे लक्ष डोळ्यासमोर ठेऊन कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना आपल्या निस्पृह कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमावरच मराठी वृत्तपत्र लेखक संघाची वाटचाल जोमाने सुरु आहे. कार्यालय आहे त्या जागेला  रिकामी करण्याची नोटीस.  बेघर होण्याच्या उंबरठ्यावर हि चळवळ कशी पुढे घेऊन जायची हि अलीकडची मुख्य चिंता असली तरी  कवी अनिल यांनी 'पेरते व्हा' असा संदेश कविकुळाला दिला आहे. त्याच धर्तीवर वाचकांची हि चळवळ 'पेरते व्हा' असा समाजहिताचा संदेश घेऊन वाटचाल करीत आहे. 

रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष 
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण