विठोबा आण्णा मालुसरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विठोबा आण्णा मालुसरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १६ मे, २०२०

निष्काम कर्मयोगी : ह.भ.प. विठोबा आण्णा मालुसरे

निष्काम कर्मयोगी : ..विठोबा आण्णा मालुसरे




छत्रपती शिवरायांना जीवाची बाजी लावून साथ देणाऱ्या नरव्याघ्र नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांची वंशावळ खडान खडा सांगणाऱ्या विठोबा अण्णा मालुसरे यांना आपण सूर्याजी रावांचे वंशज म्हणून जन्माला आलो याचा सार्थ अभिमान होता आणि म्हणून अलिबागचे प्रसिद्ध इतिहासकार अण्णा दाते यांच्या तोंडून तानाजीरावांचा समग्र इतिहास ऐकला तेव्हा त्यांचे चुलते ४२ च्या स्वतंत्र लढ्यातील सेनानी कै. अम्बाजीराव मालुसरे व विठोबाराव एका असीम ध्येयाने पेटून उठले. उमरठला जाऊन त्या गावच्या लोकांना सोबत घेऊन त्या गावचे स्मशान उकरून ३०० वर्षापूर्वी गाडला गेलेला इतिहास तानाजीराव व शेलार मामांच्या समाध्या उकरून काढून जिवंत केल्या आणि दिवाबत्ती चालू करून दरवर्षी माघ शु. नवमीला नरवीरांची पुण्यतिथी साजरी करू लागले.


बालपण आणि शिक्षण -
विठोबारावांचा जन्म पोलादपूर तालुक्यातील खडकवाडी-साखर येथे १ डिसेंबर १९२५ साली एका गरीब परंतु वारकरी कुटुंबात झाला. अण्णा चौथी पर्यंत शिकले. त्यांच्या कुशाग्र बुद्धीची पारख त्यांचे चुलते अम्बाजीराव यांनी हेरली होती. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याने शिवकालीन काही मराठे सरदारांच्या वंशावळीतील मुलांवर शिक्षणाचा  खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. स्वातंत्र संग्रामात सहभागी असणाऱ्या अंबाजी रावाना खबर लागली . त्यांनी पोलादपूर मधील कंक , भोसले , मोरे , मालुसरे , भिसे , यांच्या मुलांची निवड केली . ग्वाल्हेरला जाण्याची तयारी झाली आणि लहानग्या विठोबारावांच्या आई रुक्मिणीबाईने मायेपोटी याला मोडता घातला. एकुलता एक लाडात वाढवलेला पोराला परगावी पाठविण्यास ती तयार झाली नाही. 

संग्रामात उडी -
१९४२ च्या ' भारत छोडो ' आंदोलनाचे पर्व देशभर जोरात चालू होते. महाड-पोलादपूर चे नेतृत्व होते नाना पुरोहित यांच्याकडे. महाड ची मामलेदार कचेरी जाळण्याचा कार्यक्रम ठरला होता . नानांनी पोलादपूरच्या कार्यकर्त्याना निरोप पाठविला . रत्नागिरी कडे जाणाऱ्या कशेडी घाटातील रस्ता तोडा. जेणेकरून ऐनवेळी रत्नागिरीहून येणाऱ्या पोलिसांचा मार्ग बंद होइल. अंबाजीराव मालुसरे , डॉक्टर गणेश आनंद करमरकर, कोंडीराम मास्तर उतेकर, सखाराम चोरगे , गणपत चोरगे , तुकाराम साळवी , विठोबा तु. कळंबे , कमलाकर दादा चित्रे आणि तरुण वयातील विठोबाराव आणि तुकाराम चोरगे यांनी घाटाचा रस्ता तोडला. अंबाजीराव मालुसरे यांच्या नावे वारंट काढून त्यांना काही दिवसानंतर पकडले. अण्णाच्यासह  सर्वच कार्यकर्ते भूमिगत झाले. त्यांच्यासोबत स्वत: नाना पुरोहित व तुकाराम पानसरे,शंकरभाई गांधी, गोपीनाथ गांधी साखर गावच्या माचीला येउन राहिले होते . सयुंक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही अण्णांनी भाग घेतला होता . पोलादपूर तालुक्यातून पहिली तुकडी साखर गावाची महाडला रवाना झाली. तुकडीत गणपत चोरगे, रामचंद्र मालुसरे, सखाराम चोरघे आदी होते . तर यांचे नेतृत्व आण्णा कडे होते . जनसेवा आणि वारकरी - देश स्वतंत्र झाला . अण्णांनी कॉंग्रेसचे एक निष्ठावंत पाईक या नात्याने लोकसेवा हेच आपले ध्येय ठरविले . पोलादपूर तालुक्यातील मुख्यत: सावित्री, ढवळी व कामथी या तिन्ही खोऱ्यातील डोंगरी भागाचा विकास व्हावा यासाठी अण्णा अहोरात्र झटू लागले . राजकारणातही  आपले आचरण शुद्ध असावे यासाठी अण्णा पंढरपूरला गेले आणि ह.भ.प. ढवळे बाबांच्या साक्षीने आजरेकर माउलींच्या फडात तुळशीची माळ घातली. आषाढी वारी नित्यनेमाने करू लागले . संत वांड.मयाचा सखोल अभ्यास करून अण्णांनी प्रवचने-कीर्तने सांगण्यास सुरुवात केली . आपल्या स्पष्ठ व ओघवत्या रसाळ वाणीने अण्णा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडीत.  अल्पावधीत आण्णा एक प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून नावारूपास आले . महाड,पोलादपूर, महाबळेश्वर पर्यंत अनेक खेडोपाडी साजऱ्या होणाऱ्या हरीनाम सप्ताहात त्यांची कीर्तने-प्रवचने होऊ लागली . पुढे त्यांचे चुलत भाऊ लक्ष्मणबुवा मालुसरे यांनी स्थापन केलेल्या पोलादपूर-महाड ते आळंदी या पायी वारीच्या वीरेश्वर पालखीचे ते प्रमुख मार्गदर्शक बनले .

राजकीय कारकीर्द -
सरपंच पदापासून सुरुवात करणारे आण्णा पंचायत समितीवर निवडून गेले आणि उपसभापती हि झाले. पहिल्या वेळी सीताराम सकपाळ तर दुसऱ्या वेळी कै .बाळाराम मोरे सभापती तर आण्णा दोन्ही वेळा उपसभापती झाले . या तिघांच्या कारकिर्दीत तालुक्याचा कायापालट होऊ लागला . सावित्री नदीवरील कापडे व पितळवाडी येथील पूल त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले आणि वाहतुकीसाठी मार्ग मोकळा झाला . यामुळे मोरसडे, उमरठ, कोतवाल, देवळे आदी रस्त्यांची कामही सुरु झाले . १९७८ आण्णा रायगड जिल्हा परिषदेवर निवडून गेले. श्री वांगारे जिल्हा परिषद अध्यक्ष. आण्णा आपल्या फर्ड्या वक्तृत्वाने सभागृह गाजवू लागले.  त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाने कॉंग्रेस च्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडला होता . कॉंग्रेस अंतर्गत भांडणामुळे सत्ता संपुष्ठात येते कि काय अशी परिस्थिती होती कॉंग्रेस तर्फे वांगारे, दत्ताजी तटकरे व अण्णांची भाषणे होणार होती . शेवटचे भाषण आण्णाचे झाल्यांनतर ठरावावर मतदान होणार होते . प्रेक्षकगृह आणि पत्रकार कक्षात तुडुंब गर्दी होती . दि. बा . पाटील, दत्ता पाटील, नानासाहेब कुंटे आदि मंडळी आवर्जून उपस्थित होती आणि आण्णा भाषणासाठी उभे राहिले.'' तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म ' या उक्तीने सुरुवात करीत आणि प्रसंगी धर्म ग्रंथातील दाखले देत अण्णानी क्षणाक्षणाला वातावरण बदलून टाकले आणि नंतर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेला . अवघे सभागृह मंत्रमुग्ध झाले होते . त्यावेळच्या त्यांच्या या भाषणाची रायगड जिल्हा परिषदेच्या इतिहासातील एक सुवर्णाक्षराने नोंद ठरणारे भाषण ठरले .

नरवीर तानाजीरावांचा पूर्णाकृती पुतळा -
अंबाजीराव व आणांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील जनता नरवीरांची पुण्यतिथी माघ वद्य नवमीला साजरी करीतच होते. नरवीर तानाजी मालुसरे यांचा पूर्णाकृती पुतळा असावा असा निर्णय जनतेने घेतला आणि अण्णा एका असीम ध्येयाने कामाला लागले . त्यावेळचे कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दादासाहेब लिमये यांची त्यांनी भेट घेऊन त्यांना हेतू सांगितला . दादासाहेब सुद्धा या गोष्टीला तयार झाले . अण्णांच्या वरच त्यांनी संपूर्ण जबाबदारी टाकली . आण्णा सिंहगडावरील अर्ध पुतळ्याची छायाचित्रे घेऊन आले. व मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार सहस्त्र्बुध्ये यांना कामही दिले आणि इकडे दोन्ही उमरठ मध्ये पुतळा कुठे असावा यावरून वाद झाला . यातून दादासाहेब लिमये, आण्णा दाते, अंबाजीराव, गुरुवर्य ज्ञानेश्वर मोरे माउली, विठोबाराव यांनी मार्ग काढला आणि २६ एप्रिल १९६५ साली लढाईच्या पावित्रातील सहा फुटी कृती नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते अनावरण झाले .


 दारूबंदीचा वसा -
आण्णा वयोमानाप्रमाणे थकले होते . शरीरही साथ देत नव्हते. म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्र आटोपते घेतले. परंतु महाराष्ट्र शासन त्यांना गप्प बसू देण्यास तयार नव्हते. १ एप्रिल १९८४ साली शासनाने त्यांची रायगड जिल्हा दारूबंदी विभागाचे प्रमुख संघटक म्हणून नियुक्ती केली . त्याचबरोबर रायगड किल्ला पूजा निधी ट्रस्ट वर मानद आजीव सदस्य म्हणून नियुक्ती केली . आता अण्णांचा एकच मंत्र होता दारूबंदी आणि व्यसनमुक्ती. कीर्तन - प्रवचन - व्याख्याने - सामाजिक सभा आदी कार्यक्रमात जीवनाच्या अंतापर्यंत अण्णांचा हा एकच विषय होता . खादीचे धोतर, सदरा, टोपी आणि गळ्यात तुळशीची माळ अशा पेहेरावातल्या अण्णांना पाहताच कुणीही लहान-थोर त्यांच्या समोर नतमस्तक होत असे. अशा विठोबा अण्णांच्या निधनाला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे स्मृतिवर्ष वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमाने साजरे करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील जनता एका स्वातंत्र सेनानी, राजकारणाचा गाढा अभ्यासक, प्रसिद्ध कीर्तनकार-प्रवचनकार,सामाजिक न्यायनिवाडे करणारा धुरंदर फर्डा वक्ता मुकली आहे असेच म्हणावे लागते आहे

रवींद्र मालुसरे 
(अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई)





वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...