साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

मराठीच्या भल्यासाठी दिवाळी अंक परंपरा जपू या !

 

दिवाळी ! दिव्यांची आरास. रांगोळीचा थाट, पक्वानांचा घमघमाट आणि फटाक्यांची आतषबाजी ! दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्साह, उल्हासाचा उत्सव ! प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. अशी ही दिवाळी मराठी माणसांच्या नसानसातून झिरपत असते. दिवाळी म्हणजे दीप मांगल्याचा सण. रोषणाई,फराळ आणि फटाक्यांची आतिषबाजी हे दिवाळी सणाचे वैशिष्ट्य. त्याचप्रमाणे दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा  एक अविभाज्य भाग आहे.  म्हणूनच दीपावली सणाची केवळ चाहूल सुद्धा अबाल वृद्धांना हर्षभरित करते.

दिवाळी' येते तीच मुळात हसत, खेळत, नाचत. सभोवताल प्रकाशाने, देदीप्यमान तेजाने उजळून टाकत. सोबतीला असतात गतकाळाच्या दिवाळीच्या आठवणी, वर्तमानकालीन अपेक्षा आणि पुढील वर्ष आनंदात, सुखासमाधात जावं, ह्या आशा आणि इच्छा. दिवाळी म्हटलं की पहाटेची अभ्यंगस्नानं, उटणी, मोती आणि म्हैसूर चंदन साबणाचे सुवास, अत्तरं, फराळ, फटाके, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, नवीन कपडे हे सारं असतंच, त्याचबरोबर दिवाळी अंक घरी आल्याशिवाय बऱ्याच मराठी घरांत ह्या सणाची पूर्तता होत नाही! दिवाळीची चाहूल लागताच मराठी माणूस आणखी एका गोष्टीत गुंतून राहतो ते म्हणजे दिवाळी अंक. ह्या दिवाळी अंकांनी मराठी मनाला मोहवून टाकले आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि जगभरातील काही ठिकाणी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते. प्रत्येक सण, उत्सवावर त्या त्या प्रदेशातील सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा प्रभाव असतो. पण, महाराष्ट्रात दिवाळी सणाचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे. हा पैलू म्हणजे दिवाळी अंक. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे. जो केवळ मराठी भाषेतच पहायला मिळतो. अर्थात, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा महोत्सवाच्या निमित्ताने विशेषांक, गुजराती भाषेतही दिवाळी अंक छापले जातात. पण, त्यांचे प्रमाण अगदीच अल्प आहे. दिवाळी अंकाची सुरुवातच मुळात साहित्यिक प्रेरणेतून झाली आहे.

या दिवाळी अंकांच्या उगमतेचा इतिहास फार 'मनोरंजक' आहे. साहित्य क्षेत्रातील दिवाळी अंकांची प्रथा सुरु केली ती मनोरंजनकार काशिनाथ रघुनाथ तथा का र मित्र यांनी १९०९ साली. एकूण २०० पृष्ठसंख्या असलेल्या या दिवाळी अंकाची किंमत केवळ १ रुपया होती. हिरव्या रंगाच्या जाड कागदाच्या मुखपृष्ठावर एक मुलगा व एक स्त्री अंक पाहत असतानाचे चित्र असलेल्या या अंकात एकूण ४२ पाने जाहिरातीची होती. मात्र सुरुवातीची २६ पाने संपल्यानंतर अनुक्रमणिका दर्शविणारी ४ पाने होती. त्यानंतरच्या पानावर भारताचे तत्कालीन राजे किंग एडवर्ड सात यांचे चित्र व त्या पुढील पानावर संपादकाचे 'दोन शब्द' होते. आजच्या जाहिरातीचे बीज त्या काळातही पेरले गेले होते याची प्रचिती या दिवाळी अंकातील 'स्वदेशी लोटस' या साबणाच्या जाहिरातींवरून येते. जाहिरातीसोबत असलेले कुपन घेऊन येणाऱ्यास एक साबण बक्षीस देण्याची ती योजना विविधोपयोगी वस्तूंच्या जाहिरातींसोबत 'दामोदर सावळाराम आणि मंडळी' यांची १६ पानी दीर्घ जाहिरात आहे. . मनोरंजनाचा हा दिवाळी खास अंक महाराष्ट्रीयांस प्रिय होवो, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे. बालकवींची सुप्रसिद्ध असणारी ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता या पहिल्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती! यानिमित्ताने सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे.  गेली ११३ वर्षे मराठी साहित्याचा हा जागर अखंड होत आहे. हे सातत्य इतर भाषांमध्ये फारसे घडताना दिसत नाही. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषेची मिठ्ठास असून, ती खास महाराष्ट्राची साहित्यिक दौलत आहे. मराठी संस्कृतीमधील दिवाळी अंकांचे योगदान मोठे असून, लेखकांच्या दृष्टीने त्यांच्या जडणघडणीची ती एक शाळाच आहे. दिवाळी अंकांनी मराठी साहित्यातील विविध प्रकार हाताळले असून, त्यातून अनेक लेखक-साहित्यिक नावारूपास आले आहेत.  गेल्या ११३ वर्षांमधील  दिवाळी अंकातील साहित्यिक, कवी कोण होते यांची नुसती यादी बनवली, तरी त्यातून मराठीत किती विपुल आणि व्यापक प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली आहे हे लक्षात येते.  शतकोत्तर वर्षाच्या कालखंडात दिवाळी सणात आमूलाग्र बदल झाला आहे.  त्याला दिवाळी अंकही अपवाद ठरले नाहीत. दिवाळी व दिवाळी अंक या नात्यांमधील वीण दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली आहे. मराठी माणसाची 'दिवाळी' दिवाळी अंकाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही ! ‘दिवाळी-दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या उक्तींमधील आनंद दिवाळी साजरा करण्यातील अनेक गोष्टींइतकाच दिवाळी अंक हा त्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

प्रत्येक दिवाळी अंकाचा स्वत:चा असा एक वाचक वर्ग असतो. तो शक्यतो मिळेल त्या किमतीला तो अंक विकत घेतो. यंदाही तसेच घडेल, असे दिवाळी अंक संपादक आणि  विक्रेत्यांना वाटते आहे.  कारण दिवाळी अंक आले, की त्यावर उड्या मारणारे वाचक अजूनही तितक्याच निष्ठेने ते विकत घेताना दिसतात. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे.

दिवाळी अंकांच्या निर्मितीला शंभर वर्ष होऊन गेली. आजही नव्या पिढीला एकदा तरी दिवाळी अंक प्रकाशित करायचा याची भुरळ पडत असते. दरवर्षी नवनवीन दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. सध्याच्या घडीला मराठीत पाचशेहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात. हा आकडा आश्चर्य चकित करणारा आहे. यात दर्जेदार असे अंक खूप कमी असतात हि गोष्ट वेगळी पण आजही दिवाळी अंक नव्या पिढीला आकर्षित करतात याचं समाधान वाटतं. मजकूर कमी आणि जाहिराती जास्त असं स्वरूप अलीकडच्या अनेक दिवाळी अंकाचं दिसू लागलंय. पण तरीही दिवाळी अंकांच्या या गर्दीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ते टिकवून आहेत. दिवाळी अंकांचा व्याप सांभाळणे सोपे नाही, त्यातून मिळणारे उत्पन्नही बेताचे असते. असे असूनही मराठीतले बरेचसे म्हणजे मौज, दीपावली, आवाज, चंद्रकांत, धनंजय, किस्त्रीम, साधना,हंस, नवल, शतायुषी, आक्रोश, कलाकुंज, प्रसाद, धर्मभास्कर इत्यादी  दिवाळी अंक २५, ५० किंवा किंवा त्याहून अधिक वर्षे निघत आहेत.

१९५० ते ८० या काळातील दिवाळी अंक हे खरोखर साहित्यिक  विशेषांक होते आणि ते जाहिरातींचा वापर केवळ आधार म्हणून करत. जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतशी महाराष्ट्रातील मराठी मनाची साहित्यिक, सांस्कृतीक भूक वाढत होती. यात दिवाळी अंकांनी मोलाची भूमिका बजावत हे खाद्य अधिक सकसपणे द्यायला सुरुवात केली.  या वाढत्या भुकेला मराठी प्रकाशक साप्ताहिके, मासिके, पुस्तके आणि दैनंदिन घडामोडींसाठी वृत्तपत्रे जमेल तसे खाद्य देत आहेत आजही देतात. वैचारिक देवाणघेवाण होत पुढे वाढलेली वाचकांची भूक पाहून साप्ताहिकांनी विषयनिवडीत पहिल्यांदा कात टाकली. त्याचे पडसाद दिवाळी अंकातही उमटले. कथा, कविता, नाटक, कादंबरी यांसोबतच इतर भाषांमधील लेखकांचे अनुवादित साहित्य, भाषांतरीत कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं दिवाळी अंकात छापून येऊ लागली. आज तर दिवाळी अंकांचे स्वरुप इतके बदलले आहे की, दर वर्षी मोठ्या संख्येने दिवाळी अंक बाजारात येतात व स्वत:च्या वैशिष्ट्यांसह ते वाचकांपर्यंत पोहोचतातही. विशेषतः धार्मिक, महिला, ज्योतिष, आरोग्य, रहस्यकथा, विनोद, पाककला  या वैविध्यपूर्ण प्रकारांसह ते वाचलेही जातात. काही दिवाळी अंक तर अलीकडे पाणी, सोने, गड किल्ले, नातेसंबंध इत्यादी विषयांवर दर वर्षी स्वतंत्र विषय घेऊन त्याचा विशेषांक काढत असतात. काही संपादक आता तर जाहिराती जास्त व त्याला तोंडी लावायला साहित्य अशी अवस्था आहे.

दिवाळी अंकांना बँकांच्या जाहिराती यंदा मिळालेल्या नाहीत. टाळेबंदीत बरेच नुकसान सोसल्याने खासगी कंपन्यांनीही हात आखडता घेतला. दिवाळी अंकांच्या संपादकांना स्नेहसंबंधांतून मिळालेल्या जाहिरातींवरच अवलंबून राहावे लागले आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच पुस्तकांची व नियतकालिकांची छपाई बंद होती. प्रकाशकांच्या अडचणी आणि इतर समस्यांमुळे जो पुस्तकांचा खप आहे तो मंदावला असे म्हणता येईल. याचाच परिणाम या वर्षीच्या दिवाळी अंकांवर मोठ्या प्रमाणावर दिसून येणार आहेत. दोन वर्षे लागोपाठ जागतिक कोरोना संकट टाळेबंदीचा फटका दिवाळी अंकांनाही बसल्याचे सांगितले जाते आहे.  साहित्य फराळाची शतकी परंपरा सांगणाऱ्या दिवाळी अंकांकडे जाहिरातदारांनी पाठ फिरवली आहे. 'कोरोना'मुळे बाजारात दिवाळी अंक येणार नाहीत असे वातावरण तयार होत असतानाही आलेल्या इतर अनेक संकटांवर मात करीत, नवी जिद्द बाळगत, निराशेचे ढग बाजूला करीत गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही अनेक दिवाळी अंक तयार होऊन बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.  'हल्ली जाहिराती मिळत नाहीत, त्या मिळाल्या तरी मागाहून त्यांचे पैसे वसूल करणे फार जिकीरीचे होते', 'वाढत्या किंमती आणि घटता वाचक या दुष्टचक्रामुळे आता अंक काढणे परवडत नाही', अशा तक्रारी कानावर येतात. या तक्रारी खोट्या आहेत, असे नाही. मात्र, तरीही पाचशेच्या घरात अंक निघतात आणि दिवाळी अंकांची परंपरा सुरू राहावी यासाठी संपादक, लेखक सतत प्रयत्न करतात हेही तेवढेच महत्त्वाचे. आता काही दिवसांपासून कुठे आपल्या भारतात जनजीवन सुसह्य होऊ पाहत आहे. परंतु जगभरात करोनाची साथ चालू आहेच,  महाराष्ट्रामधे गेल्या वर्षभरात वादळ आणि पावसाच्या  महापूराने थैमान घातलेले आपण अनुभवले  आहे. निसर्ग सर्व बाजूंनी असहकार करत असताना संकटांच्या काळात मनुष्याला सकारात्मक रहाण्यासाठी, आलेल्या संकटांशी झुंजण्यासाठी, मनाला पुन्हा उभारी येण्यासाठी साहित्य महत्वाची भुमिका बजावत असते. कोरोनाची टाळेबंदी, समुद्री वादळ, ढगफुटी पावसामुळे अनेक ठिकाणी आलेले महापूर व  विस्कळीत झालेले जनजीवन या पार्श्वभूमीवर ही स्थिती अपेक्षित असूनही संकटाच्या काळातही मराठी भाषेतील दिवाळी अंकांची ही भव्य परंपरा, आपले सांस्कृतिक वैभव जपले जावे  केवळ परंपरा खंडित होऊ नये या  हेतूने प्रकाशकांनी दिवाळी अंकांची निर्मिती केली आहे. तुम्हा-आम्हा वाचकांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करून दिली जात आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.  साहित्य त्याच्या थकलेल्या मनाला विरंगुळा देतेच देते पण त्यासोबत हे ही दिवस जातील आणि पुन्हा ताठ कण्याने उभे रहाण्याची आशा आणि इच्छा जागृत करुन संकटकाळात धीर आणि दिलासा देते.

तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवीन बदल होत आहेत. अनेक गोष्टीत थोड्याबहुत प्रमाणात ते बदल अनुभवता येत आहेत. असाच बदल डिजिटल जगात होतोय. पहिला ‘डिजिटल’ स्वरूपातील दिवाळी अंक २००० मध्ये प्रसिद्ध झाला होता. ‘ऑनलाइन’ प्रकाशित झालेल्या घटनेला यंदा बावीस र्वष पूर्ण होत आहेत. एकवीस वर्षापूर्वी कोणी कल्पनासुद्धा केली नसेल की, इंटरनेटच्या आणि समाज माध्यमांच्या या युगात आपण पुस्तके आपल्या हातातील मोबाईलवर वाचू शकू. पण प्रत्येक दशक आपल्या बदललेल्या काळाची भाषा बोलत असतं. डिजिटल रूपात संगणकावर, मोबाइलवर आणि किंडल किंवा टॅब्लेटवर वाचता येणारे दिवाळी अंक, ऑडिओ बुक दिवाळी अंक, व्हिडीओ रूपात संवाद साधणारे दिवाळी अंक अशी एक नवी परंपराच सुरू झाली आहे.  या परंपरेनं जसं लोकप्रिय साहित्य जगभरातल्या मराठी भाषकांना तळहातावर उपलब्ध करून दिलं, तसंच यातून अनेक नवे लेखक घडवले आहेत. तो म्हणजे पुस्तके, मासिके, पाक्षिक नियतकालिके यामध्ये. तसेच प्रकाशित होणार्‍या आजच्या दिवाळी अंकांमध्ये सुद्धा ई-जगातला बदल पाहायला मिळतोय. पारंपरिक छापील दिवाळी अंकांचा आनंद घेतानाच नव्या माध्यमातील प्रयत्नांचंही स्वागत टेक्नोसॅव्ही नवीन पिढीने करायला हवे.

 भाषा आणि संस्कृती एकमेकींच्या हातात हात घालून वाटचाल करतात, एखादी भाषा नष्ट होते तेव्हा शेकडो वर्षांच्या संचितातून साकार झालेली, संपन्न झालेली संस्कृतीही लयाला जाते. आपल्या पूर्वसूरींच्या श्रमातून, कौशल्यातून, बौद्धिक-सामाजिक मंथनातून आकाराला आलेली अशी संस्कृती आपल्या डोळ्यांदेखत संपू नये असे वाटत असेल तर त्या संस्कृतीच्या खुणा आणि प्रतीक म्हणून जे उरले आहे ते जपणे, वृद्धिंगत करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव मराठी भाषिक अस्मिता म्हणून आपल्याच मुळा-नातवंडांमध्ये रुजवायला हवी. 

मराठी भाषा जगवा, समृद्ध करा. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत, बंद होत आहेत. शतकी परंपरा असूनही मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळत नाही. इंग्लिश माध्यमांच्या शाळांत मराठी भाषेची सक्ती करा अशा घोषणा आणि चर्चा आपण अधूनमधून करीत असतो. शंभर वर्षात अनेक आक्रमणे पचवत आणि स्वीकारत आजही चारशे-पाचशेच्या आसपास प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक मराठीची पताका खांद्यावर घेऊन मिरवत आहेत. दिवाळी अंकांची ही परंपरा तशीच सुरू रहावी यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपला वाटा उचलणे गरजेचे आहे. मराठी भाषा जगवायची असेल, तिचं स्थान भक्कम करायचं असेल, तर आज आपण सर्वांनी निश्चय करणे गरजेचे आहे. 

महागडे मोबाईल आणि टी व्ही ने आपली संस्कृती बिघडवण्याचा घाट घातला आहे, पण दिवाळी अंक मराठी माणसांची सांस्कृतिक भूक भागवित आहेत. अभिरुची वाढविताहेत, मराठी वाचक वाढविताहेत त्याबद्दल ह्या अंकांच्या संपादकांना  धन्यवाद द्यायलाच हवेत. त्याचवेळी, दिवाळी अंक प्रकाशकांनी आता नव्या जगातील नव्या माध्यमांशी मैत्री करणेही गरजेचे आहे. दिवाळी अंक हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ती स्वतःला समृद्ध करण्यासाठीची ती एक पर्वणी असते. कायदा न करता तिच्या संवर्धनासाठी आत्मीयतेने  मराठी वाचूया, बोलूया आणि लिहूया !

 रवींद्र तुकाराम मालुसरे,  अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४  

शनिवार, १६ मे, २०२०

मराठी भाषेची चिंता आणि चिंतन


मराठी भाषेची चिंता आणि चिंतन




प्रत्येक वर्षी जगाच्या पाठीवरील कोठेही वास्तव्य करणारा मराठी माणूस २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून उत्साहाने साजरा करीत असतो. पण आपला  हा मराठी भाषेचे चिंतन करण्याचा हा एकच दिवस आहे का ? हा प्रश्न उभा राहतो. खरे तर मराठीची काळजी वर्षाच्या ३६५ दिवस करायला हवी. पण तसे होताना दिसत नाही. कवी जुलिअन यांनी "मराठी असे माझी मायबोली जरी आज ती राजभाषा नसे" हि खंत प्रकट केलेली होती. आज ती राजभाषा आहे पण, तिची अवस्था मात्र कशी आहे ते कवी कुसूमाग्रजांनी यापूर्वीच तितक्याच खेदाने नमूद करून ठेवल्याचे आपणा सर्वाना स्मरते आहे. आपल्या या मराठी साहित्याला साडेसातशे वर्षाची परंपरा असली तरी मराठी बोलीला किमान एक हजार वर्षापेक्षा अधिकच परंपरा लाभलेली आहे. सव्वा अकरा कोटी लोकांची मराठी ही जगातील १० व्या क्रमांकाची मोठी भाषा आहे. संपन्न ज्ञानभाषा असणारी मराठी महानुभावांची धर्मभाषाही आहे. मराठी ही राजभाषा असणारे सातवाहन,राष्ट्रकूट आणि मराठे हे राज्यकर्ते भारतभर राज्य करत होते. मराठी भाषा बोलणारे आज जगातील ७२ देशात पसरलेले आहेत. भारताच्या अनेक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात अनेक जण महत्वाच्या अधिकार पदावर काम करीत आहेत, त्यामुळे ही फक्त एका प्रांताची भाषा नसून ती महत्वाची राष्ट्रीय भाषा झाली आहे. मराठी भाषेत आजवर सुमारे एक लाख ग्रंथ प्रकाशित झालेले असुन त्यातील असंख्य ग्रंथ वैश्विकदृष्ट्या श्रेष्ठ ठरावेत असे आहेत. या एक हजार वर्षाच्या परंपरेत मराठीने अनेक संकटे पेलून आपली योग्यता आणि संपन्नता सिद्ध केलेली आहे. मराठी ही अमृतातेही पैजा जिंकणारी भाषा आहे. १६१४ मध्ये मराठीचे परदेशी उपासक फादर स्टीफन यांनी मराठीचा केलेला गौरव बघितला तर मराठीचे भव्य आणि सुंदर स्वरूप दिसून येईल.

जैशी हरळामांजी रत्नकीळा | की रत्नामाजी हिरा निळा |
तैशी भाषा मांजी चोखळा | भाषा मराठी ||१||
जैशी पुष्पामांजी पुष्प मोगरी | की परिमळामांजी कस्तुरी |
तैशी भाषामंजी साजिरी | मराठीया ||२||



केंद्र सरकारने आजवर भारतातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून तामिळ,संस्कृत,तेलगू,कन्नड व मल्याळम या भाषांना अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला आहे. आपल्या मराठी भाषेला सुद्धा तो मिळावा अशी तमाम मराठी भाषकांची तीव्र इच्छा आहे. सरकारी पातळीवरूनसुद्धा तसा पाठपुरावा केला जातो आहे, पण अजूनही यश पदरात पडेनासे झाले आहे. या दर्जामुळे कोणत्याही भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोर तर उमटते. आणि त्याचबरोबर भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळते व  भाषाविकासाच्या कार्याला चालना मिळते.
आपल्या शेजारील तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा मिळाला आहे. तिथे या भाषेचे चिंतन आणि चिंता वर्षभर केले जाते. पण मराठीची आपण फारशी चिंता करतो आहे अथवा चिंतन करतो आहे असे दिसून येत  नाही. साहित्य संमेलनाच्या नावाने एक उरूस पार पडला की बस्स.  कन्नड भाषेच्या उत्थापनासाठी सवंर्धनासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले जाते. कन्नड भाषा वाढावी यासाठी शासकीय पातळीवरून सर्व व्यवहार कन्नडमधून केले जातात. आपण मराठी माणूस अथवा आपले राज्यकर्ते स्वभाषा टिकविण्यासाठी कितपत प्रयत्न करतो याचे आता चिंतन करायला हवे.

कोणतीही भाषा हि ज्ञानाची भाषा असते. जे आपल्या भाषेत नाही ते इतर भाषेतून आपल्याला घेता येते. केवळ आपल्या भाषेला महत्व देऊन इतर भाषेला नकार म्हणजे एका दृष्टीने ज्ञानाला नकार असतो. परंतु इतर भाषेला अधिक महत्व देऊन स्वभाषेकडे दुर्लक्ष झाले तर ती भाषा आपले अस्तित्व गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या भाषेचे महत्व ओळखून इतर भाषा आत्मसात केली पाहिजे. इंग्रजीला नकार देऊन जसे चालणार नाही तसे तिचेच गोडवे गाऊनही चालणार नाही. मराठी भाषा संपन्न बनवण्यासाठी अन्य भाषेतून जे साहित्य,ज्ञान आणता येईल ते आणले पाहिजे. अशा प्रकारे मराठीचे ज्ञान भांडार वाढविता येणे शक्य आहे. असे झाले तरच मराठी हि ज्ञानभाषा बनायला फार उशीर लागणार नाही.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी |
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी |
एवढ्या जगात माय मानतो मराठी ||



असे कवी सुरेश भटांनी म्हटले आहे. खरोखरच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा आणि मराठी भाषा ऐकण्या-बोलण्याचा सार्थ अभिमान आम्हा मराठीजनांना आहे असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे मराठी भाषेबद्दल खंत व्यक्त करायची. ज्यांना स्वतःलाच मराठीबद्दल अभिमान वाटत नाही तेच मराठी भाषेला दुय्यम दर्जा देतात. आमचे महाविद्यालयातील प्राध्यापक महोदय तर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना म्हणतात की, मराठी विषय घेऊ नका. मराठी भाषा घेऊन पुढे काय करणार ? आणि घेतला तर त्यामागे निवडताना असा विचार असतो..एकतर तो सोपा आहे किंवा अवघड आहे म्हणून. सोपा या अर्थाने कारण आपली ती मातृभाषा आहे आणि अवघड या अर्थाने की त्यामध्ये भरपूर कविता असतात. पण काव्य म्हणजे मानवी जीवनातील हिरवळ आणि संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव यांचे अभंग म्हणजे मानवी जीवनाला दिशा देणारे तत्वज्ञान. खरं तर आज महाविद्यालयीन स्तरावर मराठी विषय सक्तीचा करणे गरजेचे आहे. कारण मुलांच्या बुध्यांकाबरोबर भावनांक देखील वाढला पाहिजे. आणि हा भावनांक वाढविण्याचे काम मराठी साहित्य विषय करीत असतो. मातृभाषेमध्ये शिक्षण म्हणजे आईच्या दुधावर पोसणे. त्याला दाईच्या दुधाची जोड कशी येईल ? इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे यामध्ये निश्चितच फरक आहे. ज्ञानाची निर्मिती ही मानवी बुद्धीचा आणि विचारसामर्थ्याचा सर्वश्रेष्ठ अविष्कार असतो. असा अविष्कार इतर भाषेवर अवलंबून राहिल्याने कधीच होत नाही. विचारसामर्थ्य हे खऱ्या अर्थाने मातृभाषेतूनच घडत असते. आपण इतर कोणत्याही भाषेत बोलत असलो तरी विचार मात्र मातृभाषेतूनच करतो. म्हणूनच शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असले पाहिजे असेच शिक्षण क्षेत्रातील विचारवंतांना वाटत आले आहे.

आज मराठी भाषेवर सर्वांगांनी असे आक्रमण चालू झाले आहे. यातून आपली मूळ मराठी भाषा वाचवायची अथवा टिकवायची असेल तर तिची नाळ कदापि तोडता काम नये. आज मराठी भाषा आणि संस्कृतीलाही मरणयातना भोगाव्या लागत आहेत. पर्यायाने या मरणयातना मराठी माणसांच्या आहेत. याला जबाबदार आपण मराठी भाषिकच आहोत. इंग्रजी अथवा इतर भाषेचा तिरस्कार करून मराठीचा विचार करता येणार नाही. यासाठी जागरूकपणे मराठी भाषेचा विचार करायला हवा. हतबल होऊन चालणार नाही. सकारात्मक कृती करायला हवी. आपल्याला भावनात्मक पातळीवर मराठीचा विचार करून चालणार नाही. व्यावहारिक पातळीवर मराठीबद्दल सांगोपांग विचार करायला हवा. मराठी माणसाच्या ठिकाणी असलेली भाषेबद्दलची उदासिनवृत्ती नाहीशी व्हायला हवी. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. हा जागतिकारणाचा काळ आहे. आणि या जागतिकारणाची भाषा इंग्रजी आहे. त्यामुळे इंग्रजीपासून दूर जाऊन चालणार नाही. अशी मराठी मरणारही नाही आणि संपणारही नाही. परंतु तिचे पालन पोषण अर्थात संवर्धन मात्र होणे आवश्यक आहे. एकूणच माय मराठी भाषा ही सक्षम असून भाकरी देणारी भाषा म्हणून ती श्रेष्ठच आहे. मात्र मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी मराठीला अमृतरूपी गोडवा देणाऱ्या मराठीच्या बोली टिकवायला हव्यात.

भाषा हि अंगवळणी पडल्यानेच समाजात रूढ होत असते, असा भाषेच्या जाणकारांचा अनुभव आहे. ती पर्यायी पारिभाषिक शब्दाने क्रमशः विकसित होत असते. हाही नवा अनुभव नाही. पण त्याकरिता वैयक्तिक व सामूहिक पातळीवर कितपत पायाभूत पद्धतीने प्रयत्न होतात हेच महत्वाचे आहे. कदाचित हे ओळखूनच भाषाविकास मंडळाची नव्याने स्थापना केली गेली असावी. पण हि स्थापना फक्त घोषणेपुरती उरली हेही राजभाषा दिनाच्या निमित्ताने खेदाने नमूद केले पाहिजे. राजभाषा हि फक्त अशत: सचिवालयात आणि तिथल्या पत्रव्यवहारात राहू नये अशी आपली सततची अपेक्षा असते. ती समाजाभिमुख होणे व समाजाकडून तिचा अधिकात अधिक वापर होत गेल्यानेच राजभाषा म्हणून सिद्ध होणार आहे. हे काम कुणा एकट्या दुकट्याचे नसून सर्वस्व शासनाचेही नाही. तर ते शासन आणि समाज अशा दुहेरी पातळीवरून प्रकट होणारे असावे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषेविषयी केला जाणारा विचार-चिंतन हे मराठीतूनच होत असल्याने मराठी भाषा अधिक काळ संवादी राहणार आहे. जागतिकीकरणामुळे कितीही बलिष्ठ आव्हान तिच्यासमोर उभे राहिले असले तरी ती मरणार नाही. हे निर्विवाद सत्य आहे. इंग्रजीचा स्वीकार करीत असताना मराठी भाषेला त्यागून चालणार नाही. आपल्या भाषेचा स्वाभिमान जपणे आणि इतर भाषेचा आदर करणे हे सूत्र आत्मसात करण्याची वेळ आली आहे. आपली मातृभाषा अधिक समृद्ध करण्यासाठी तिच्या ज्ञानवाटा अधिक विस्तारित करायला हव्यात. नवनवीन  ज्ञान मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न सर्व मराठी जणांनी  केला पाहिजे कारण भाषेचा विकास हा सर्व समाजाचाच असतो. म्हणून सर्व समाजानेच आपल्या मराठी भाषेविषयी अस्मिता ठेवायला हवी.

शेवटी असे म्हणावेसे वाटते, विश्वकल्याणाची संकल्पना 'पसायदानाच्या' रूपात सर्वप्रथम ज्या माय मराठीत कोरली गेली ती विश्वात मराठी माणसाला श्रेष्ठत्व देणारी ठरणारी आहे. 

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704




कालिदासाची प्रतिभा : मेघदूत


कालिदासाची प्रतिभा : मेघदूत


 महाकवी कालिदास कुणाला माहिती नाही. फक्त भारतीयच नव्हे तर सगळे जग हा थोर कवी आणि नाटककार होता असे मानते. पण त्याच्याबद्दल म्हणजे वैयक्तीक आयुष्याबद्दल फारसे काही काळात नाही. कविकुलगुरू कालिदासाविषयी आतापर्यंत पुष्कळ संशोधन झाले आहे. त्याचा काल, त्याचे जन्मस्थान, त्याचा नाश्रयदाता विक्रमादित्य, त्याचे ग्रंथ, त्याचे विचार वगैरेविषयी अनेक विद्वानांनी चर्चा केली आहे. तथापि बद्यापि त्याच्या स्थलकालाविषयी आणि त्याच्या जीवनातील घटनांविषयी विद्वानांचे एकमत झाले नाही. त्याविषयी विविध तर्क केले जातात.

इतिहास पंडितांच्या अभ्यासानुसार तो सम्राट विक्रमादित्याच्या पदरी होता. त्यामुळे कालिदासाचा काल बहुधा इ स पूर्व पहिले शतक असा येतो. तर पाश्चत्त्य पंडितांच्या मते कालिदास ११ व्या शतकातील धारा नगरीचा राजा भोज ह्याच्या पदरी होता. गेल्या दशकात कर्नाटकात काही पुरावे सापडल्यानंतर कालिदास  ४ थ्या किंवा ५ व्या शतकाच्या कालखंडात होऊन गेला असावा असे माननाल्या  सबळ पुरावा आहे. भविष्यात अजून काही पुरावे, शिलालेख, जुनी हस्तलिखिते सापडली तर अधिक प्रकाश पडेल. परंतु कालिदासभोवती दंतकथा आणि आख्यायिकांचे एक जाळे तयार झाले आहे. कालिदास हा जन्माने गवळी. त्यामुळे सुरुवातीला अशिक्षित होता. पण दिसायला अत्यंत राजबिंडा अन देखणा होता.तर ह्या गवळ्याच्या पोराचा महाकवी कसा झाला मोठे रंजक आहे. कालिदासाने मालविकाग्निमित्र, शाकुंतल, विक्रमोर्वशीय  ही तिन नाटके, रघुवंश, कुमारसंभव ही दोन महाकाव्ये, मेघदूत हे खंड काव्य आणि ऋतुसंहार हे निसर्ग काव्य लिहिले.


‘आषाढ’ महिना म्हटलं की, आठवतो ढगांच्या काळ्या पुजक्यांआडून गर्जना करत धो धो बरसणारा मुसळधार पाऊस आणि कवी कालिदासाची स्वतंत्र अभिजात साहित्यकृती असलेलं ‘मेघदूत. निसर्ग, प्रदेश, माणसं याबद्दलचं कालिदासाचं भान आणि जाण, अवघ्या सृष्टीबद्दल वाटणारं प्रेम हे आपल्याला या आषाढात सदोदित जाणवत राहतं आणि मनात तरळते ती ‘मेघदूत’ या सर्वागसुंदर प्रेमकाव्यातली पहिली ओळ ‘आषाढस्य प्रथम दिवसे।’ पावसाचा सांगावा घेऊन आलेला ‘ज्येष्ठ’ संपला आणि आषाढाला सुरुवात झाली कि निळ्या जांभळ्या मेघांनी आभाळ भरून येतं. गरजू लागतं. पावसाचे टपोरे थेंब ताल धरू लागतात. मध्येच वाराही उनाड मुलासारखा धिंगाणा घालतो. उकाडयानं त्रस्त झालेल्या धरणीला आषाढसरींचा शिडकावा हवाहवासा वाटतो. ओल्या मातीच्या गंधानं उल्हसित झालेलं वातावरण होरपळलेल्याधरणीला आणि आपल्या मनालाही तजेला देतं.आषाढातली सृष्टीची ही रूपं पाहून प्रेमीजनांच्या प्रेमभावना ही उत्फल्ल होतात. पावसाचं भरभरून दान देणारी, प्रेमिकांना एका अनोख्या रंगात भिजवून चिंब करणारी आषाढवेळा म्हणूनच तर महाकवी कालिदासालाही भावली असावी. कालिदासाचे ‘मेघदूत’ हे एक सर्वागसुंदर प्रेमकाव्य आहे. ते कुठल्याही पुराणकथेवर आधारलेलंनाही. मानवी अंत:करणातील प्रेमाचा आणि त्यातून उद्भवणाया विरहवेदनांचा तो सुस्पष्ट आविष्कार आहे. कालिदासाची ‘मेघदूत’ ही एक साहित्यकृती वाचल्यावर तो स्वत: किती सुजाण रसिक होता, याची कल्पना येते.


प्रेम कसे व्यक्त करावे, हे कालिदास सहज सोप्या संकेतांनी सुचवतो. आणि जीवनाकडे कसे पाहावे याचेही मेघाच्या सोबत आपल्याला 'मार्गदर्शन' करतो. होय 'मेघदूत' या अजरामर काव्यामध्ये फक्त उपमा-उत्प्रेक्षांचा जलसा नाही, चमकदार शब्दांची दिमाखदार आतषबाजी नाही. तर त्यात मानवी मनाच्या विविध छटांचा रंगोत्सव पाहायला मिळतो एक वर्षासाठी गाव सोडण्याची शिक्षा लाभलेला हा विरहात बुडालेला यक्ष पहिले आठ महिने कसेतरी काढतो पण , आषाढाच्या पहिल्याच दिवसाने त्याचा सारा  संयम सुटून जातो.   त्याला पत्नीची आठवण अस्वस्थ करू लागते. आपल्या पत्नीशी संवाद साधण्यासाठी तो यक्ष  पर्वतावर टेकलेल्या मेघालाच आपले कुशल विरहव्याकुळ पत्नीपर्यंत पोहचवण्याची विनंती करतो. मेघदूताची या कामासाठी अनुमती आहे कि नाही , याची साधी विचारणा करण्या एव्हढा धीर कालिदासापाशी नाही. तो त्या ढगाची प्रतिक्रिया काय याचा विचार सुद्धा करीत नाही. आणि त्याला  अलकापुरीत, यक्षनगरीत  राहणाऱ्या आपल्या पत्नीला संदेश देण्याचे काम सोपवतो. ढगसुद्धा त्याचा आग्रह मोडत नाही. आता खराप्रश्न पुढे आहे. खर तर मेघदूतची  कथा खूप साधी. आजीच्या गोष्टीसारखी. पण कालिदासाने त्याला जे प्रतिभेचे अफलातून पैलू पाडलेत , त्याला तोड नाही. ती  गोष्ट आहे एका यक्षाची.  अलकापुरीत, यक्षनगरीत  राहणाऱ्या  कोण्या एका यक्षाकडून त्याच्या कर्तव्यात काही चूक घडली आहे. कुबेर हा त्यांचा राजा आहे,  'चुकीला माफी नाही ' असा पवित्रा घेत तो  या यक्षाला 'तडीपारी'ची म्हणजे अल्कानगरी एक वर्षासाठी सोडण्याची 'सजा' देतो. नुकत्याच लग्न झालेल्या या यक्षाला पत्नी विरहाचा शाप बसतो  आणि तिथूनच कथा यक्षाच्या भावनिक चढ उतारासोबत  वळणावळणांनी पुढे सरकते. ‘मेघदूता’ला कोणतीही पूर्वपीठिका वा कथानक नाही. कालिदास यक्षाला का गावाबाहेर काढले याचे साधे कारणही सांगत नाही, मग त्याच्या घराविषयी, पत्नीसंदर्भात माहिती द्यायची त्याला गरज वाटत नाही. आता बोला, तर सुरुवातीलाच आपल्याला धक्का देऊन कालिदास गोष्ट सुरु करतात. कुबेराने गावाबाहेर काढलेला  अलकापुरीचा हा यक्ष महाराष्ट्रातील नागपूर जवळच्या रामटेकला येतो . ज्याठिकाणी वनवासातील राम टेकला, थांबला होता, ते स्थान   म्हणजे रामटेक.  एक वर्षासाठी गाव सोडण्याची शिक्षा लाभलेला हा विरहात बुडालेला यक्ष   पहिले आठ महिने कसेतरी काढतो पण , आषाढाच्या पहिल्याच दिवसाने त्याचा सारा  संयम  सुटून जातो.   त्याला पत्नीची आठवण अस्वस्थ करू लागते. आपल्या पत्नीशी संवाद साधण्यासाठी तो यक्ष  पर्वतावर टेकलेल्या मेघालाच म्हणजे आकाशातील ढगाला आपले कुशल विरहव्याकुळ पत्नीपर्यंत पोहचवण्याची विनंती करतो.हे व्यक्त करताना त्यात विरहाचा वणवा  आहे पण त्यावर  शृंगाररसाचा वर्षाव करीत   प्रत्येक श्लोक  लिहिणारा कालिदास हा भारतातील साहित्याला जागतिक पातळीवर घेऊन   जातो . कारण त्याच्या सहज व्यक्त होण्यातही माणसाच्या निसर्गाशी असणाऱ्या  वैश्विक   संबंधांचा उच्चतम अविष्कार आहे. वाढतच जाणाया विरहात त्याच्या मनाला कशाचंच भान  राहात नाही. तो त्या अचेतन मेघालाच आपला दूत बनवू पाहतो. त्या मेघाच्या संमतीची वाटही न पाहता त्याच्यावर दुताचं काम सोपवून टाकतो. दूरवर, हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या अलकानगरीत यक्षाची अतिप्रिय पत्नी राहात असते. तिला या मेघानं आपला संदेश सांगावा, आपल्या सांत्वनाचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचवावेत, अशी यक्षाची इच्छा असते. यासाठी मेघाने अलकानगरीपर्यंत कसा प्रवास करावा, हे तो त्या मेघाला समजावून सांगतो. अलकानगरीत   पोहोचल्यावर त्याच्या प्रियेचं निवासस्थान कसा शोधावा, तिला कसं ओळखावं,  हेही तो   समजावून सांगतो. एवढाच ‘मेघदूत’ या काव्याचा कथाविषय.कथानक असं फारसं काही नाही आणि तरीही त्यातला प्रत्येक श्लोक नितांत रमणीय झाला आहे. कारण त्यात निसर्गाचं रूप   वर्णन आहे, त्याच्या आश्रयानं प्रेमिकांच्या भावभावनांचं प्रकटीकरण आहे. हा आविष्कार   अत्यंक तरल असला तरीही अतिशय उत्कट आहे.सध्या यक्षाची वस्ती असलेल्या रामगिरी पासून यक्षपत्नीचं निवास असलेल्या अलकानगरीपर्यंतच्या प्रदेशातल्या मुख्य खुणा यक्ष   मेघाला सांगतो. हे प्रदेशवर्णन सौंदर्यपूर्ण तर आहेच, त्याबरोबर त्या मेघाची स्तुतीही त्यात   आहे, त्याला काही क्रीडा सूचित केल्या आहेत. कालिदासाची ‘मेघदूत’ ही एक साहित्यकृती   वाचली तरी तो स्वत: किती सुजाण रसिक होता, याची कल्पना येते. निसर्ग, प्रदेश, माणसं   यांबद्दलचं त्याचं भान आणि जाण, त्यांबद्दल वाटणारं प्रेम हे आपल्याला ठायीठायी जाणवत राहातं. खरं तर मेघाच्या अलकानगरीच्या प्रवासमार्गात उज्जयिनी ही नगरी येत नाही. तरीही ती पाहण्यासाठी मेघानं जरा वाट वाकडी धरावी, असं यक्ष त्याला सांगतो आणि उज्जयिनीच्या सौंदर्याचं वर्णन करतो. या वाकडया रस्त्यामुळे मेघाला आपल्या पत्नीकडे पोहोचायला उशीर   होणार आहे, हे यक्षाला कळत असतं. तरीही मेघानं उज्जयिनीला जावेच, असा यक्षाचा आग्रह असतो. ही रसिकता प्रत्यक्षात कालिदासाचीच रसिकता आहे, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. 

या मेघदूताने अलकापुरीपर्यंतचा प्रवास कसा करायचा ? मेघदूताचे खरे सौंदर्य हेच प्रवासवर्णन आहे. यक्ष प्रत्येक श्लोकागणिक  निसर्गातील रंगचित्रे मोठ्या बहारीने सादर करतो आणि मेघाला आपल्या प्रियपत्नीपर्यंत पोहचण्याचा मार्ग सांगतो . त्याच्या या कथनामध्ये सहजपणे येणाऱ्या प्रेमाच्या उत्फुल्ल आविष्काराच्या कल्पनाविलासाने  मन मोहून जाते. त्याचे शब्द अलंकारिक असतात पण कल्पनांची उंची तुम्हाला मेघदूताची 'नजर'बहाल करते,सृष्टीतलं जे काही उत्तम, उदात्त, सुंदर, मंगल असतं, ते सगळं खया प्रतिभावंताला मोहात पाडतं. कालिदासाच्या प्रतिभेचा आविष्कार जसा आपल्याला निसर्गवर्णनात, प्रदेश वर्णनात,   उज्जयिनी किंवा अलकापुरीच्या वर्णनात आढळतो तसाच तो त्यानं केलेल्या व्यक्तिचित्रणातसुद्धा आढळतो. 


अलकापुरीत असणाया आपल्या पत्नीला कसं ओळखायचं हे सांगताना यक्ष   मेघाला म्हणतो, ‘‘जिनं बोलणं मर्यादित केलं आहे, जी माझा जणू दुसरा प्राणच आहे (जीवितं मे द्वितीयं), मी तिचा प्रियकर शापामुळे तिच्यापासून दुरावल्यामुळे जी चक्रवाक पक्षिणीप्रमाणे एकटी पडली आहे आणि सांप्रतच्या मोठया असणा- दिवसात (पावसाळ्यात दिवस मोठाच असतो) जिची   उत्कंठा गंभीर झाली आहे, अशी बाला माझी प्रिय पत्नी आहे, हे तू ओळख. खरोखर कालिदासाची शैली, त्याने केलेले शब्दप्रयोग हा विस्तृतपणे लिहिण्याचा विषय आहे. कालिदास हा   शब्दप्रभू होता. असं म्हटलं जातं की, त्याच्या मनात एखादा विचार प्रकटला की, तो स्पष्ट   करण्यासाठी अनेक शब्द त्याच्यासमोर उभे राहात. त्यांतला अभिप्रेत असणारा नेमका अर्थ  व्यक्त होईल आणि सौंदर्यही खुलेल, असा शब्द तो निवडत असे. एक उदाहरण म्हणून ‘मेघदूता’मधील पहिलाच श्लोक पाहा.‘‘कश्चित्कान्ता विरहगुरूणा स्वाधिकारात्प्रमत्ता!’’ इथं पत्नीसाठी ‘कान्ता’ हा शब्द कालिदासानं वापरला आहे. खरं पाहता पत्नीसाठी संस्कृतमध्ये भार्या, दारा, अर्धागिनी, परिणीता इत्यादी अनेक शब्द आहेत. मात्र कालिदासानं ‘कान्ता’ हाच शब्द निवडला. कारण कान्ता म्हणजे शृंगारात प्रिय असणारी पत्नी. ‘विरहगुरूणा’ म्हणजे तिचा विरह फार दीर्घकाळ सहन करत आहे. केवळ घरसंसार सांभाळणारी ही पत्नी नाही. तर ती नवतरुणी शृंगारात अत्यंत प्रिय वाटावी अशी आहे. म्हणूनच यक्ष   विरहाग्नीत तडफडतो आणि अशा बेभान अवस्थेत अचेतन मेघाला आपला दूत म्हणून निवडतो. ‘मेघदूत’ या काव्याचा गाभा ‘शृंगाररसा’वर आधारलेला आहे. त्यातही साहित्याच्या दृष्टीनं   श्रेष्ठ असा हा ‘विप्रलंभ- शृंगार’ म्हणजे विरहातला मनोवेधक शृंगार आहे. आता जगातील   बहुतेक प्रमुख भाषांमध्ये ‘मेघदूता’ची भाषांतरं उपलब्ध आहेत. भारतातल्या सगळ्याच भाषांमध्ये ‘मेघदूता’चे अनुवाद झाले आहेत. सध्याच्या भाषांमध्ये संस्कृतच्या सर्वात जवळची भाषा म्हणजे आपली मराठी. ‘मेघदूता’च्या अनुवादात तीच आघाडीवर आहे.प्रेम कसे व्यक्त करावे, हे कालिदास सहज   सोप्या संकेतांनी सुचवतो. आणि जीवनाकडे कसे पाहावे याचेही मेघाच्या सोबत आपल्याला 'मार्गदर्शन' करतो.  होय 'मेघदूत' या अजरामर काव्यामध्ये फक्त उपमा-उत्प्रेक्षांचा जलसा नाही, चमकदार शब्दांची दिमाखदार आतषबाजी नाही. तर त्यात मानवी  मनाच्या विविध छटांचा रंगोत्सव पाहायला मिळतो . मला कालिदास त्यामुळेच आवडतो,  भारतातील आणि  जगातील डझनावारी भाषांमध्ये मेघदूत पोहचलेले आहे. लक्षावधी   लोकांना आजही त्याची ओढ वाटणे, हेच कालिदासचे यश. तसे पाहायला गेलो तर हे महाकाव्य कधी लिहिले त्याचा नीटसा पुरावा उपलब्ध नाही. काही लोकांच्या मते ते २ - ३ हजार वर्षापूर्वीचे नक्की असणार. पण त्यातील नावीन्य नित्यनूतन आहे. हेच कवीच्या काव्यप्रतिभेचे यश म्हणावे लागेल. कालिदास हा असा शब्दांशी खेळणारा भाषाप्रभू होता,त्याने पहिल्यांदा  मेघाला त्याच्या कथानकाचे नायकत्व बहाल करून त्याबोवती यक्ष-यक्षिणीची कथा गुंफली. त्यात विरहाचा वणवा  आहे पण त्यावर  शृंगाररसाचा वर्षाव करीत प्रत्येक श्लोक  लिहिणारा कालिदास हा भारतातील साहित्याला जागतिक पातळीवर घेऊन जातो . कारण त्याच्या सहज व्यक्त होण्यातही माणसाच्या निसर्गाशी असणाऱ्या  वैश्विक संबंधांचा उच्चतम अविष्कार आहे.आषाढ हा महिना मोठा विलक्षण ज्येष्ठाच्या बरसातीने शांतावलेल्या धरतीला आषाढात खऱ्या अर्थाने हिरवा बहर येतो, आषाढ हा महिना मोठा विलक्षण ज्येष्ठाच्या   बरसातीने शांतावलेल्या धरतीला आषाढात खऱ्या अर्थाने हिरवा बहर येतो, आषाढ असा   आमच्या अवघ्या जीवनाला व्यापून असतो. संसार तापाने पोळलेल्या वारकऱ्यांची दिंडी जेव्हा पंढरपुरात पोहचते, तेव्हा कृष्ण मेघश्याम आषाढ दोन्ही कर कटेवर ठेवून वीटेवर उभा दिसतो. त्याचेच सावळे प्रतिबिंब प्रत्येक वारकऱ्यांच्या हृदयात उमटलेले. मग त्या हृदयांच्या असंख्य  तारा झंकारतात आकाशात ‘जय जय विठोब रखमाई’चा झणत्कांर होतो, वारकऱ्यांच्या   मनातील सावळा मेघश्याम आषाढ घन बनून बरसू लागतो. झाडांच्या पानापानातून वाजू   लागते टाळी आणि चंद्रभागेच्या पाण्यातून ऐकू येतात अभंग ओळी. ओल्या काळ्या मातीचा  होतो अबीर बुक्का आणि मनामनात भरून राहतो.... आकाशाएवढा तुका..










रवींद्र मालुसरे, (अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई )

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...