नरवीर तानाजी मालुसरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नरवीर तानाजी मालुसरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

"स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. अंबाजीराव मालुसरे यांचा दोस्ताना

 

"स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. अंबाजीराव मालुसरे यांचा दोस्ताना" 

स्व यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक आठवण


द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ नोव्हेंबर १९५६ रोजी सूत्रे हाती घेतली. त्यावेळची घडलेली गोष्ट. साताऱ्याच्या जेलमधला आपला एक सहकारी सर्वात मोठया पदावर बसल्याचा सर्वाधिक आनंद साखर गावच्या स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव मालूसऱ्यांना झाला. आणि ते तडक मुंबईत दाखल झाले. करीरोडला खोजा चाळीतील नातेवाईकांकडे उतरल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जुन्या मंत्र्यालयाकडे निघाले. सोबत त्याच चाळीतील घाटावरचा वसंत पाटील नावाचा तरुण होता. धोतर, सदरा, फेटा आणि घुंगराची काठी या वेशभूषेत अंबाजीराव मंत्र्यालयाच्या गेटवर पोहोचल्यानंतर तडक आतमध्ये घुसले...त्यावेळी आजच्या इतकी कडक सुरक्षा बंदोबस्त नसे. पोलीस अडवू लागले तेव्हा बेडर अंबाजीराव मोठया आवाजात म्हणाले, मी यशवंताला भेटायला आलोय. त्याचे हाफीस कुठं आहे ते सांगा. ते पोलीस काहीच ऐकायला तयार नव्हते...इकडे अंबाजीरावांचे दरडावणे चालूच होते. मी साखर गावचा पाटील. सुभेदार तान्हाजीरावांचा वंशज. जाऊन सांगा यशवंतरावाला अंबाजीराव आलाय म्हणून. हा आरडाओरडा ड्युटीवरच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने ऐकल्यावर जवळ आला आणि म्हणाला, आजोबा १० मिनिटे इथे थांबा मी येतो लगेच. तो अधिकारी आतमध्ये गेला, यशवंतराव चव्हाणांना केबिनमध्ये चिठ्ठी पाठवून प्रसंग कळवला. त्या अधिकाऱ्याला यशवंतरावानी केबिनमध्ये बोलावून सांगितले, तुम्हीच त्यांना लगेच माझ्याकडे घेऊन या.....आणि पुढच्या काही क्षणात यशवंतराव आणि अंबाजीराव या दोन मित्रांची ह्रदयभेट झाली.

या भेटीमागची पार्श्वभूमी काय होती. जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होण्यामागे असे काय घडले होते...तर याची बीजं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात रोवली गेली होती. 

यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा कराड येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. बालपणीच त्यांचे पितृछत्र हरपले होते. त्यांच्या आईने त्यांचा सांभाळ केला. यशवंतरावांना आईकडूनच आत्मनिर्भरता आणि देशभक्तीची शिकवण मिळाली होती. 

१९३० साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, तेव्हा त्यामध्ये त्यांनी भाग घेतला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनातही ते सामील झाले होते.  सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यातून पुढे प्रतिसरकार (पत्री सरकार) स्थापन झाले, पण त्यावेळी ते तुरुंगात होते; याच तुरूंगात अंबाजीराव सुध्दा अटकेत होते. 

१९४२ च्या लढ्याचा फारसा प्रभाव पोलादपूर मध्ये नव्हता, महात्मा गांधींच्या आदेशानंतर पोलादपूर मधील वृद्ध कार्यकर्ते स्व गोपीनाथ लालाजी गांधी यांनी हालचाल सुरू केली. महात्मा गांधी व वल्लभभाई पटेल हे महाड व पोलादपूरला येऊन गेल्यानंतर चळवळीला गती मिळाली. श्री नानासाहेब पुरोहित यांचा मोर्चा महाडला येणार आणि मामलेदार कचेरी ताब्यात घेणार याची बातमी पसरली. मोर्चा निघाल्यानंतर ब्रिटीश सरकारने राक्षसी भूमिका घेत अनेकांवर अन्याय व अत्याचार सुरु केले. अनेकांना अटक केली. त्यावेळी पोलादपूर मधील गोपीनाथभाई गांधी, डॉ गणेश अनंत करमरकर, दत्तात्रय काशिनाथ जोशी, दत्तात्र्येय गणपत साबळे, बाळकृष्ण पीतांबर तलाठी, अंबाजीबुवा मालुसरे, विठ्ठल गणपत शेठ इत्यादींनी मोठा सत्याग्रह केला.

गोऱ्या सार्जंटना महाबळेश्वरला जाता येऊ नये यासाठी तिन्ही खोऱ्यातील काही समाजधुरीणांना सोबत घेऊन घाट तोडला होता. आणि पोलादपूर महालाच्या कचेरीसमोर वंदे मातरम च्या घोषणा देत तिरंगा फडकावला होता. याचा पुढारपणा करणाऱ्या अंबाजीबुवांना अटक करून प्रथम वरळी नंतर श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जेल मध्ये  घेऊन गेले. विसापूर जेल दौंड आणि मनमाड या रेल्वे-लाईनवर असलेल्या विसापूर स्टेशनपासून दोन-तीन मैलांवर आहे. एखाद्या ओसाड वाटणा-या माळावर बांधलेला हा जुना जेल बऱ्याच लांबून पाहिल्यावर मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण करतो.

 त्याचवेळी एस एम जोशी, यशवंतराव चव्हाण, आचार्य भागवत यांना येरवडा तुरूंगातून विसापूरला आणले होते. तात्या डोईफोडे, दयार्णव कोपर्डेकर हेसुद्धा होते. योगायोगाने स्वातंत्र्यात भाग घेणाऱ्या सर्वांना एकाच ठिकाणी ठेवले होते, त्या बराकीतच यशवंतराव - अंबाजीराव होते. जेलमध्ये सुद्धा हे चळवळे गप्प राहतील ते कसले. दुसऱ्या दिवशीच भल्या पहाटे हे सर्व कैदी एकत्र आले. दहीहंडीचा मनोरे रचण्याचा खेळ सुरु केला.  तब्येतीने शरीरयष्टीने चांगल्या बांध्याचे आणि जाडजूड व ताकदीने असलेले खालच्या थराला उभे राहतील असे ठरले, अर्थात यशवंतराव व अंबाजीराव खालच्या थरासाठी उभे राहिले. चार थर रचल्यानंतर शेवटच्या थरावर चढलेल्याने लपवून ठेवलेला तिरंगा ध्वज बाहेर काढून फडकावला. त्याचबरोबर सर्वजण वंदेमातरम आणि भारतमाता की जय म्हणून घोषणा  जोरदार देऊ लागले. मग काय अधिकाऱ्यांची फलटण आली. सर्वांना काठीने फटकावू लागले. सर्वांना दरडावून दमबाजी करून गेले.....पुन्हा दुसऱ्या दिवशी असेच घडले. आता मात्र याचा बंदोबस्त करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी चौकशी सुरु केली....यातले म्होरके कोण ? तीन-चार जण पुढे झाले, यात यशवंतराव आणि अंबाजीराव होतेच. त्यांना बाजूला घेऊन अर्थातच अधिक मार बसला. 

जेलमध्ये काढलेल्या या आठवणी यशवंतरावानी लिहिल्या आहेत. ते लिहितात  एक वर्ष संपल्यानंतर या जेलमधून आमची बदली विसापूर जेल इथे झाली. एक वर्ष म्हणजे माझ्या मताने माझे एक प्रकारे विद्यापीठीय जीवन होते.  

विसापूर जेल म्हणजे अत्यंत कष्टदायी जेल, अशी त्याची ख्याती होती. हवामान चांगले नाही, पाण्याची कमतरता, फार कडक बंदोबस्त व कठोर अधिकारी असलेला जेल, अशी या जेलची ख्याती होती. गुजरात आणि मुंबई येथून आलेले अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या जेलमध्ये गेले वर्षभर राहत होते. या जेलला अनेक बराकी होत्या आणि प्रत्येक बराकीतल्या सत्याग्रहींतून एक प्रमुख ‘स्पोक्समन’ निवडला जात असे. त्या बराकीतील सत्याग्रही कैद्यांचे जे प्रश्न असतील, ते हा पुढारी सोडवून घेत असे. मुंबईचे प्रसिद्ध नेते स. का. पाटील त्यावेळी विसापूर जेलमध्ये होते. त्यांनी जेलमध्ये अतिशय व्यवस्थित आणि संपन्न अशी लायब्ररी उभी केली होती. 

याचवेळी त्यांनी उमरठच्या नरवीर तान्हाजी - सूर्याजी मालूसऱ्यांच्या समाधीचा इतिहास आणि भौगोलिक परिस्थिती चर्चेत समजावून सांगितली. त्यानंतर पुढे  अंबाजीरावांची तुरूंगातून सुटकाही झाली. मात्र दोघांचा हा स्नेह कायम राहिला...भेटीगाठी होत राहिल्या आणि वाढलाही. पुढे एप्रिल १९६५ ला जेव्हा उमरठला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यशवंतरावांच्या शुभहस्ते करण्याचा कार्यक्रम ठरला तेव्हा आवर्जून स्वातंत्र्यसेनानी अंबाजीरावांचा विशेष सत्कार करण्याचा आदेश त्यांनी दिला होता, परंतु चीन ने भारतावर आक्रमण केले...यशवंतरावाना त्यावेळचे पंतप्रधान पं नेहरूंनी देशाचे सरंक्षणमंत्री म्हणून बोलावले. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे अनावरणासाठी आल्यानंतर त्यांनी तालुक्यातून जमलेल्या हजारो जनसमुदयासमोर अंबाजीरावांचा आदर सत्कार केला. त्याचा वृत्तांत त्यावेळच्या दैनिक लोकसत्ता मध्ये फोटोसह प्रकाशित झाला ते माझ्या संग्रही आजही आहे. 


लोकनेते, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन... त्यानिमित्ताने आठवणीला हा उजाळा !

- रवींद्र मालुसरे

अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब

 गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब

                            रवींद्र मालुसरे (अध्यक्षमराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई)









आप्पा परब ..... 

एक सामान्य गिरणी कामगारदादरच्या रानडे रोडवरच्या फुटपाथवर जुनी पुस्तकेदिवाळी अंकनियतकालिके विकणारे विक्रेतेप्रख्यात नाणी संग्राहक व नाणी तज्ज्ञ  ते इतिहास संकलक - संशोधक हा आप्पांचा जीवनप्रवास ऐकून कोणीही थक्क होऊन जावे अशीच आप्पांची ८३ वर्षाची आयुष्यभराची वाटचाल आहे.

 

शिवछत्रपतींना दैवत मानणार्‍या या व्रतस्थ इतिहासपुरूषाशी माझा तीन तपाचा स्नेह आहे. मला लहानापासून वाचनाची प्रचंड भूकत्यामुळे नवीन काही शोधताना दादरमधल्या रद्दीवाल्यांच्या दुकानात डोकावत असे. रानडे रोडवरील पटवर्धन ब्रदर्स हे आयुर्वेदिक दुकान सोमवारी बंद असे त्यामुळे एक दाढीधारी व्यक्ती आपल्याकडील सर्व ठेवा बंद दुकानासमोर ऐसपैस मांडत असे. ते सहज चालता बघता येत असल्याने महिन्यातून दोन तीन सोमवारी त्याठिकाणी जाणे होऊ लागले. माझ्या 'मालुसरे' आडनावासह उमरठ-साखर या जन्मगावाचा परिचय त्यांना झाल्यानंतर तर आम्ही दोघे अधिकच जवळ आलो. पुढे डिसिल्व्हा लगतच्या सोजपाल चाळीतल्या त्यांच्या घरी माझे जसजसे जाणे झाले, तसतसा त्यांना महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या घरी वा सार्वजनिक कार्यक्रमात घेऊन गेलो. आप्पांची ओळख झाल्यावर गप्पा मारताना अनेक गोष्टींचे मला अप्रूप वाटत राहिले. त्यापैकी एक गोष्ट होती. परिस्थिती कशीही असो मनाची शांतता जराही ढळू न देता ते कमालीचे स्थितप्रज्ञेत राहत. आणि माणसाच्या स्थितप्रज्ञेतही इतकी उत्कटता असते हे मला तेव्हाच प्रकर्षाने जाणवले. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे त्यांना छत्रपती शिवरायांच्या कार्याबद्दल असणारी आत्यंतिक श्रद्धा आणि हे कार्य चिकित्सक पद्धतीने पुढे घेऊन जाणारी नवी पिढी यापुढच्या काळात कार्यरत राहील काय याबद्दल वाटणारी चिंता.

 

शिवकार्याच्या अभ्यासासाठीप्रचार-प्रसारासाठी अहोरात्र वाहून घेतलेल्या या ऋषितुल्य साधकाचे चालणेबोलणेवागणे मला याची देही याची डोळा अनुभवता आलेय याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजतो. सह्याद्रीच्या रांगात महाराष्ट्राच्या कडे- कपारीत दऱ्याखोऱ्यात अखंड भटकंती करणारे आप्पा परब लाखो इतिहासप्रेमींना परिचित आहेत. इतिहासावरील निष्ठे प्रमाणेच ज्यांनी हयातभर इतिहासाचीगडकिल्ल्यांची सेवा केली असे महत्वपूर्व ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा परब होय.  महाराष्ट्रातील साडेसहाशे गडकिल्ल्यांचा केवळ इतिहासच नव्हे तर त्या गडकिल्ल्यांमागील विज्ञानवास्तुशास्त्रभूगोलतत्कालीन सामाजिक - आर्थिक - राजकीय - सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्टया त्यांचे महत्व सांगणारे आप्पा परब हा गडकिल्ल्यांचा चालता-बोलता इतिहास आहे. आपले अवघे आयुष्यच आप्पांनी गड - किल्ल्यांवरील संदर्भ संशोधनासाठी झोकून दिले आहे. अवतीभोवतीची परिस्थिती कितीही चंगळवादी होऊ दे आपण आपले अंगीकारलेले व्रत व्रतस्थपणे कसोशीने पाळायचे  हा खाक्या आप्पांनी आयुष्यभर जपला. ते करण्यासाठी जे काही करायचे ते प्रसंगी अपमान सोसून आप्पांनी केले. त्यांनी अक्षरशः हजारो लोकांना गडकिल्ले दाखवले पण ते करण्यासाठी त्यांनी कधी एक छदामही कोणाकडून घेतला नाही. 'जे किल्ले मावळ्यांनी तानाजी - बाजी - येसाजी यांनी प्रसंगी रक्त सांडून राखले तो माझ्या पूर्वजांचा वारसा दाखवण्यासाठीसांगण्यासाठी मला पैशाची गरज नाही.हा विचार आप्पा नेहमी जपत आले व त्या बरहुकूम ते वागत आले. 'माझा धर्म इतिहासमाझे दैवत शिवराय. माझी जात गडकिल्ल्यांची. त्या थोर युगपुरुषाने कधी जातीभेद मानला नाहीतर मग मी का मानू ?' हा उच्च विचार आप्पांनी आपल्या उरात कोरून ठेवला आहे. आप्पांचा यामागील स्वार्थ एकचआपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या यशोगाथात्यांचे कार्यकर्तृत्व भावीपिढीला योग्यरितीने समजावे. प्रतिकूल परिस्थितीतही शिवरायांनी व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेला असीम त्याग येणाऱ्या पिढीला आकलन व्हावा यासाठी अपार काबाडकष्ट घेऊन आप्पा ही उरफोड करीत आहेत. त्यांनी छत्रपतींच्या कार्याचा झपाटून अभ्यास केला. प्रचंड तप केलेकठोर जीवन जगले. इतिहासाची ही पाने शोधताना आणि त्यासंबंधाने विषयवार संगती लिहिताना जेव्हा भूगोल बोलत नाही तेव्हा विज्ञान व आकाशातील ग्रह तारे बोलतात या तत्वज्ञानाची सांगड घातली. गडकिल्ल्यांचा अभ्यास करताना भूगोल आणि विज्ञान एकमेकांस कसे पूरक आहेत हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या पुस्तकांचे विषय जरी पाहिले तरी त्यांचे लिखाण हे चतुरस्त्र लेखकाचे लिखाण आहे हे समजते. आप्पांच्या वाड्.मयातील प्रज्ञाशिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी शेकडो वेळा अनेक गडांवर जावून केलेले प्रत्यक्ष प्रयत्नआणि त्यातून शिवप्रेमींना मिळणारी प्रसन्नता हे अनुभवता येते.

 

नेहमी आपल्या पाठीवर आपली सॅक बांधून घेऊन आपले पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेऊन गड चढणारे आप्पा आज महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यातून भटकंती करणाऱ्या इतिहासप्रेमींना हे आपले हक्काचे मार्गदर्शक वाटतात. त्याला कारणेदेखील तशीच आहेत. गड -किल्ल्यांसंदर्भात कोणताही अडचणींचा प्रश्न असो आणि कितीही वेळा विचाराआप्पा कपाळावर एकही आठी पडू ने देता हसतमुख चेहऱ्याने तुमचे समाधान करतात. त्यासाठी तासनतास ते माहिती पुरवतात. अनुभवाच्या दाण्यांचे पीठ ते आपल्या वाणीतून आणि लेखणीतून देतात. एखाद्या माऊलीने जात्यावर ओवी आठवावी तसा शिवकाळातला इतिहास सांगताना त्यांच्या अनुभव विचारांचे गाणे होत जाते. 'दास राहतो डोंगरीहा रामदासांचा एक श्लोक आप्पांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडतो. दादरच्या आपल्या चाळीतल्या घरी आप्पा क्वचितच असतील पण रायगडराजगडसिंहगड अशा कुठल्यातरी गडावर मात्र ते नक्कीच सापडतील. कदाचित तोच त्यांचा खरा पत्ता असावा. इतकी अफाट मुशाफिरी करणारे आप्पा तसे प्रसिद्धीच्या बाबतीत मात्र शेकडो मैल दूर आहेत. त्यामागची त्यांची 'फिलॉसॉफी'' ही तितकीच वेगळी आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या जाणत्या राजाचे कार्यकर्तृत्व आपल्या खारीच्या वाट्याने समाजासमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करीत असताना प्रसिद्धी ती  कसली मिळवायची हा त्यांचा रोखठोक सवाल आजकाल उठसुठ प्रसिद्धीच्या मागे घोडे दामटविणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे.

 

ऊन,वारा अन पाऊस याची तमा न बाळगता दऱ्याखोऱ्यातून हिंडताना आप्पा तहानभूक विसरतात. छत्रपती शिवाजी महाराजछत्रपती संभाजी (शंभाजी)तानाजीबाजीप्रभूंसारख्या व्यक्तींमुळे आप्पांच्या प्रतिभेला अनेकदा नव्याने अंकुर फुटू लागतात. या भटकंतीत ठोस अभ्यासाने केलेले विधान ही काळ्या दगडावरची अमीट रेष ठरते. गडकिल्ल्यांतून भटकंती करताना तिथला चिरान चिरा आप्पांशी बोलतो. जणू इतिहासच वर्तमान होऊन आप्पांच्या मुखाने बोलू लागतो. हा इथे असा बाजी लढला.... तानाजी - सूर्याजी हे इथून असे दोरखंडाने गडावर चढले.... महाराजांच्या घोडीच्या टापा या इथून अशा एक ना असंख्य कथा आणि बाहू-मनगटांना स्फुरण चढविणाऱ्या घटनांची मालिका आप्पा सांगतात. म्हणूनच आप्पांविषयी म्हणावेसे वाटते की,

प्राचीवरूनि मावळतीच्याजगा सांग भास्करा ।

रायगडाचा शिवसूर्य तो कधी न मावळता ।।

सह्यगिरीत दुमदुमतील भेरीगर्जतील खोरी ।।

हिंडता फिरता तुम्हा सांगतीलत्यागाची महती ।

तुवा घडावे अन घडवावेपेटवीत ज्योती ।।

गडकिल्ल्यांतून भटकंती करणारे आप्पा अनेकदा जीवघेण्या प्रसंगातूनही गेले आहेत. रायगडावर मशिदीचे बांधकाम सुरु असल्याचे कळताच तातडीने रायगडावर धाव घेऊन ते रोखण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे तिथल्या खवळलेल्या मुस्लिमांनीआप्पांना जीवे मारण्याची धमकीही दिलीपरंतु अशा धमक्यांना भीक न घालता आप्पांची रायगडावरी सुरूच आहे. आप्पांच्या अशा प्रकारच्या स्वाभिमानी घटनांची खरे तर एक मोठी जंत्रीच होईल स्वाभिमानी मराठ्यांचे उसळते रक्त पाहायचे असेल तर ते आप्पांच्या ठायीठायी बसले आहे.

 

आप्पांचा जन्म कोकणात गरीब कुटुंबात झाला असला आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी  कोहिनुर मिलमध्ये काम केले असले तरी त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वीकृत कार्य हे बौद्धिक ऋषिकार्य आहे असेच मी समजतो. मुळात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणे वाटते तितके सोपे नाही. ज्ञानीपुरुषांना प्रसिद्धी मुळीसुद्धा हाव नसल्याने ते आपले जीवन चरित्र सांगण्याच्या अगर जोपासण्याच्या भानगडीत पडत नाहीत. एखाद्या ज्ञानी योग्याच्या जीवन चरित्राकडे सामान्य लौकिकदृष्टीने पाहून चालत नाही. ज्ञानी व्यक्तिमत्वाच्याज्ञानोत्तर सिद्ध स्वरूप अवस्थेतील लौकिक सदृश्य वर्तनात आणि ज्ञानसाक्षात्कार पूर्वलौकिक जीवनात पौर्वदेहिक संचिताचावंशपरंपरेतील ज्ञानमार्गी साधना परंपरेचा अनुबंध प्रकटलेला असतो. आप्पांच्या वर्तनातून तो दिसून येतो. आप्पांनी त्यांच्या आयुष्यात सातत्याने ज्ञान-कर्मनिष्ठ राहण्याचा दीर्घोद्योग केला. त्याचबरोबर कर्माला मग ते प्रापंचीकव्यावहारिक असे कोणत्याही प्रकारचे असोत्या कर्माला आप्पांनी शिवकार्याची आणि अध्यात्मशास्त्राची भक्कम  बैठक प्राप्त करून दिली. एकादृष्टीने शिवकाळाचे चिंतन करणारे  'सिद्धऋषीम्हणूनच त्यांचा अभ्यास केला पाहिजे.

 

आप्पा परब हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमानपत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत ४० हून अधिक त्यांची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. आप्पांचा अभ्यास हा खरेतर एका मोठ्या ज्ञानशाखेचाच अभ्यास आहे. लिखित कागदपत्रे ही अधिक बोलकी व खात्रीशीर असतात. इतिहासाला कागदपत्रांच्या पुराव्यांसह वाटचाल करता येत नाहीपरंतु अलिखित संदर्भसाधने अबोल असून त्यांचा अर्थ आपणाला शोधून काढावा लागतो.

 

आधुनिक युगात इतिहासाची पाने उलगडताना भूगोलाला विज्ञान आणि अध्यात्म यांची जोड देऊन त्यांची मांडणी करणे हे ऐतिहासिक साहित्यात आजपर्यंत घडले नाही. जो जो कागद वा नाणी हाताशी सापडले त्यावर बुद्धिनिष्ठ संशोधन करून काढलेले निष्कर्ष आप्पांनी वाचकांसमोर विविध पुस्तकांच्या माध्यमातून मांडले. त्यात मुख्यतः संशोधनात्मक भाषाशैली वापरावी लागलीपण ती सर्वसामान्यांना समजेल अशी सोप्या शब्दांत त्यांनी मांडली. आणि हे मांडताना नेहमीच सचोटीविश्वाससत्य कथन या बाबींना अग्रकम दिला. प्रसंग कितीही बाका असूदे त्यांनी फायदा तोट्याचा विचार न करता आपल्या विचारधारेला कधीही तिलांजली दिली नाही. आप्पांच्या वयाने ऐंशी पार केली आहे.  तरीही आज आप्पांच्या व्यक्तित्वाकडे आणि कार्याकडे दृष्टीक्षेप टाकला तर शिवकार्याचा ध्यास घेतलेला हा योगी शरीराने  थकलेला नाहीहे प्रतित होते.  अभ्यासांती निष्कर्ष काढून आपल्या पद्धतीने मांडणी करीत त्यांचा लेखनयज्ञ पहाटेपासूनच सुरू होतो. अल्प किंमतींत छापून घेतलेली आपली ग्रंथसंपदा पदरमोड करून स्वतःच ती  जनमानसात पोहोचविणारा साहित्यिक असे त्रिविध प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्त्व सहज डोळ्यात भरते. अशी व्यक्तिमत्त्व आधुनिक काळात दिसत नाहीत.

 

संतवृत्तीच्या विभूती मग ते कोणत्याही काळातील असोतसमाजासाठी ते आपले जीवन हेतुपूर्वक आणि हेतूपुरस्पर व्यतीत करतात. त्यांचे महत्व पटते पण त्यांच्या कार्याचे माहात्म्य समजत नाही असा काहीसा विचित्र प्रकार आजच्या धारणेत निर्माण झाला आहे. अतिरेकी अभिनिवेशअनाठायी  अहंकारअनावश्यक वाचाळता यामुळे आजचे विचारविश्व पार झाकोळून गेले आहे. अशावेळी वैभवी गतकाळाचा किंबहुना आपल्या पुर्वासुरींच्या इतिहासाच्या चिंतनाचीमननाची आवश्यकता असतेच असते.

 

सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात तरुण पिढीला कोणतेही मानधन न घेता इतिहास शिकविणारा आप्पा परब हा कर्मयोगी या साऱ्या सव्यापसव्यात मात्र उपेक्षित आहे. स्वाभिमानी आप्पांना हे अशा प्रकारचे लेखन आवडणारही नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे. रुढार्थाने आप्पांच्या विषयी लिहिताना आजच्या स्वकेंद्रित होत चाललेल्या समाजापुढे एका आदर्श व्रतस्थ लेखकाचेइतिहास संशोधकांचे कार्य ठेवावे असे मनोमन वाटत आहे. शासन आणि समाज या दोन्ही घटकांनी म्हणावी तशी त्यांची दखल घेतली नाही हे शल्य शिवप्रेमीच्या मनात आहे. आजच्या या तत्वेचारित्र्यसत्यनिष्ठ विचारधारा याबाबतीत फारसे फिकीर न बाळगण्याच्या युगात नेमक्या याच गोष्टी ज्यांनी आयुष्यभर तळ हातावरच्या फोडाप्रमाणे कसोशीने जपल्या अशा आप्पा परब यांना चतुरंग पुरस्कार मिळणे ही मोठी आशादायक बाब आहे. आप्पा प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतातपरंतु केवळ त्यांचे व्यक्तिमहात्म्य न वाढवता तत्व आणि सामाजिक कार्य यांचा मेळ त्यांनी साहित्यातून निरपेक्षपणे कसा घेतला याची दखल 'चतुरंगनेघेतली.  ती ओळख जगाच्या कानाकोपऱ्यात सहज पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांनी पुढाकार घ्यायला पाहिजे.

 

रवींद्र मालुसरे

अध्यक्षमराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

9323117704  chalval1949@gmail.com

(रवींद्र मालुसरे हे - नरवीर तानाजी–सूर्याजी मालुसरे यांचे कुलोत्पन्नरायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील उमरठ-साखर ही ऐत्याहासिक भूमी रवींद्र मालुसरे यांची जन्मभूमी )


शिवइतिहासदुर्गअभ्यासक आप्पा परब

यांना चतुरंग सन्मान जीवन गौरव पुरस्कार


मुंबई (रवींद्र मालुसरे ) : 

तीन दशकांची सांस्कृतिक परंपरा लाभलेला चतुरंगचा जीवनगौरव सन्मान पुरस्कार युद्ध इतिहास लेखककिल्ले अभ्यासकशिवइतिहासनाणकशास्त्र अभ्यासक आणि गिरीभ्रमक बाळकृष्ण तथा आप्पा परब ( ८३ ) यांना जाहीर झाला आहे. रविवारदि १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष असून प्रमुख उद्घघाटक म्हणून प्रवीण दुधे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण आयुष्य बेडरपणे आणि साहसी वृत्तीने इतिहासाच्या अभ्यासात व इतिहास नोंदीत व्यतीत करणाऱ्या आप्पा परब यांची जीवनगाथा डॉ विनय सहस्त्रबुद्धेसुधीर जोगळेकरमाधव जोशीप्रसाद भिडेविनायक परब यांच्याकडून ऐकता येणार आहे.
आप्पा परब हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमान पत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत ४० हून अधिक स्वतःची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. आप्पांचा अभ्यास हा खरेतर एका मोठ्या ज्ञानशाखेचाच अभ्यास आहे. लिखित कागदपत्रे ही अधिक बोलकी व खात्रीशीर असतात. इतिहासाला कागदपत्रांच्या पुराव्यांसह वाटचाल करता येत नाहीपरंतु अलिखित संदर्भसाधने अबोल असून त्यांचा अर्थ आपणाला शोधून काढावा लागतो. ज्यावेळी इतिहास बोलत नाही तेव्हा भूगोल बोलतोज्यावेळी भूगोलही बोलत नाही तेव्हा विज्ञान बोलते...
हे वाक्य प्रत्येक शिवप्रेमींच्या मनी बिंबवणारे निस्पृह दुर्गपंढरीचे वारकरीदुर्गतपस्वी आप्पा परब यांना २०२२ चा चतुरंग पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


आप्पासाहेब परब यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रकाशित झालेली पुस्तके 

  • किल्ले रायगड स्थळ दर्शन
  • किल्ले राजगड स्थळ दर्शन
  • किल्ले राजगड कथा पंचविसी
  • किल्ले रायगड कथा पंचविसी
  • श्रीशिवबावनी
  • शिवरायांच्या अष्टराज्ञी
  • किल्ले पन्हाळगड कथा दशमी
  • शिवजन्म
  • किल्ले विशाळगड कथा त्रयोदशी
  • सिंधुदुर्ग
  • विजयदुर्ग
  • सिंहगड
  • लोहगड
  • दंडाराजपुरी दुर्ग
  • पावनखिंडीची साक्ष
  • रणपति शिवाजी महाराज
  • हुजुरबाज
  • छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर
  • किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान
  • किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • श्रीभवानी तरवार
  • किल्ले राजगड बखर
  • श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली
  • किल्ले राजगड घटनावली
  • घोडखिंडीची साक्ष
  • रणपती शिवाजी महाराज
  • हुजुरबाज
  • छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर
  • किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान
  • किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • श्रीभवानी तरवार
  • किल्ले राजगड बखर
  • श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली
  • किल्ले राजगड घटनावली
  • घोडखिंडीची साक्ष
  • रणपती शिवाजी महाराज
  • सिन्धुदुर्ग 
  • विजयनगर साम्राज्यातील किल्ले
  • किल्ले रायगड घटनावली - श्री शिवकाळ
  • किल्ले रायगड घटनावली - श्री शंभुकाळ
  • युद्धपती श्रीशिवराय युद्ध पंच अंग कोष 
  • पोर्तुगीज अहवालातील किल्ले भाग १ 
  • पोर्तुगीज अहवालातील किल्ले भाग २ 
  • शिवराजाभिषेक 
  • आगामी -
  • निजामी अंमलातील किल्ले 
  • बहमनी 
  • आदिली
  • मोंगल 
  • आदिली (शिवकाळ )
  • कुतूबी
  • रायगड नगरी
  • ठाणे जिल्ह्यातील किल्ले
  • युद्धपती शंभू महाराज 


बुधवार, २० एप्रिल, २०२२

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया 


(रवींद्र मालुसरे )किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि.१६) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी शिवरायांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांच्या विचारातूनच देश पुढे गेला पाहिजे असे प्रतिपादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय मंत्री आणि महान सेनानी महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रथम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण करीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर राजसदरस्थळी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी आपण पाहुणे नसून या मातीमधलाच एक मराठा असल्याचे सांगितले. ते म्हणाले मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपर्‍यात असून शौर्य, बलिदान आणि वीरता असलेला हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम दूरदृष्टी पहिली. नौसेना उभी करून समुद्र तटाचेदेखील रक्षण कसे करावे हे दाखवून दिले. शिवरायांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सामावून घेत स्वराज्य निर्मिती केली. महाराजांच्या या विचाराचे आचरण केल्यास देशाचे कल्याण होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळामध्ये अखंड हिंदुस्थानचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज केले. ना. ज्योतिरादित्य सिंधिया पुढे म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडीभूषण म्हणून संबोधले होते तर बडोद्याचे राजे सयाजी गायकवाड आणि कोल्हापूरचे राजर्षि शाहू महाराज यांनी शिवरायांचा विचार डोळ्यासमोर ठेवून महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाला चालना दिली होती.छत्रपती शिवाजी महाराज हे युग प्रवर्तक होते. त्यांनी केवळ राजगादी किंवा राजसत्ता स्थापन केली नाही तर महाराष्ट्र धर्म ही संकल्पना त्यांनी हृदयात जपली होती. आगरी, कोळी, रामोशी, धनगर, मुस्लीम अशा जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला आणि तो तडीस नेला. पहिले आरमार छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले. त्यांच्या आरमाराचा अभ्यास आजही जगातील अनेक देशांची नौदले करत आहेत. रायगडावरील राजसदरेवर आयोजित करण्यातया अभिवादन कार्यक्रमाला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास अभ्यासक डॉ.उदय कुलकर्णी, निवृत्त व्हॉईस ॲडमिरल मुरलीधर पवार तानाजी मालुसरे - सूर्याजी मालुसरे यांचे वंशज रवींद्र मालुसरे,अनिल मालुसरेश्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, कार्यवाह सुधीर थोरात, सरकार्यवाह पांडूरंग बलकवडे, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते. स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रतिवर्षी किल्ले रायगडावर होणारी ही वारी आपल्या आयुष्याची कर्तव्यपूर्ती असल्याची विनम्र भावनाही त्‍यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व शिवभक्तांनी चालूवर्षी दाखवलेली मोठी संख्या पाहता त्यांनी आनंद व्यक्त केला. यापुढील काळातही किल्ले रायगडावर होणाऱ्या विविध कार्यक्रमांतून तसेच पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या कार्यक्रमाला शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्‍यांनी केले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा शिवतीर्थावर गौरव ! हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा कवड्याची माळ, धारकरी पगडी आणि भंडारा सन्मानपूर्वक देऊन शिवतीर्थ रायगड येथे सन्मान करण्यात आला उपस्थित असलेल्या समस्त मालुसरे यांच्यावतीने रवींद्र मालुसरे (अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ) यांनी हा सन्मान स्वीकारला. सिंधीया यांनी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा आपल्या भाषणात दिला. यावेळी राज्याच्या विविध ७२ गावातून सुमारे शेकडो मालुसरे पुण्यभूमी रायगड येथे एकवटले होते. २५ एप्रिल १८९६ या दिवशी लोकमान्य टिळक यांच्या उपस्थितीत तानाजी मालुसरे व येसाजी कंक यांच्या वंशजांचा नारळ देऊन रायगडावर सन्मान करण्यात आला होता त्यानंतर १२७ वर्षांनी पुन्हा एकदा मालुसरे वंशजांचा सत्कार शिवतिर्थ रायगडावर करण्यात आला. सर्वश्री रवींद्र तुकाराम मालुसरे अनिल मालुसरे, मिलिंद मालुसरे (साखर), सुभाष मालुसरे, सपना मालुसरे, अनिल मालुसरे (पारमाची), नितीन मालुसरे, सुनीता मालुसरे, स्नेहल मालुसरे (गोवा साखळी) प्रदीप मालुसरे, कल्पना प्रदीप मालुसरे (कासुर्डी), संतोष मालुसरे (लव्हेरी), सुनील मालुसरे (सुधागड),शिवराम मालुसरे (किये), संजय विजय मालुसरे (धुळे), बाळासाहेब मालुसरे(निगडे), मधुकर मालुसरे ((भावे पठार), भगवान मालुसरे, रमेश मालुसरे, तुकाराम मालुसरे, विठ्ठल मालुसरे, सचिन मालुसरे, सुधीर मालुसरे, अविनाश मालुसरे, मारुती मालुसरे, पांडुरंग मारुती मालुसरे,,तेजस मालुसरे, यशवंत मालुसरे, कैलास मालुसरे,आंबेशिवथर),संतोष मालुसरे (फुरुस ), राकेश अ मालुसरे,सूर्याजी द मालुसरे, अनिल मा मालुसरे, सागर संतोष मालुसरे, अजय काशिनाथ मालुसरे (गावडी ),रमेश मालुसरे, तुकाराम मालुसरे (आंबे शिवथर), आबासाहेब मालुसरे,मंगेश मालुसरे (गोडवली), राजेंद्र मालुसरे, रुपेश मालुसरे,कुर्ले महाड), अनिल मालुसरे (बडोदा), संतोष शा मालुसरे (खोपोली), महीपत मालुसरे, गेणू मालुसरे, सोनल म मालुसरे (पारमाची), अरुण मालुसरे, धोंडिबा मालुसरे, सुनीता अ मालुसरे-सरपंच (हिरडोशी), वालचंद मालुसरे (केळघर), मेघनाथ मालुसरे (पौड), चंद्रकांत मालुसरेआदी प्रमुख मालुसरे वंशजांचा याप्रसंगी मंडळाच्या वतीने सन्मान केला. समितीच्या वतीने देण्यात येणारा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर व इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना या वेळी देण्यात आलातर सैन्यदल अधिकारी व्हाईस अ‍ॅडमीरल मुरलीधर पवार यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिवरायमुद्रा आणि शिवऋषींची शिवसृष्टी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्री रघुजीराजे आंग्रे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन मोहन शेटे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर राज्य सदरेपासून शिवसमाधीपर्यंत शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

१२७ वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील समस्त मालुसरे परिवाराचा सन्मान होणार

     

 रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा दि १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केला आहे. यावेळी भारत सरकारमधील केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ना ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ उदय कुलकर्णी यांना अकरावा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार, व्हाईस ऍडमिरल मुरलीधर पवार यांना सैन्यदल अधिकारी सन्मान पुरस्कार तर सरदार घराण्यासाठी देण्यात येणारा सन्मान पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील ७० हून अधिक गावांत स्थायिक असलेल्या समस्त मालुसरे परिवाराला देण्यात येणार असल्याची घोषणा सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे यांनी केली आहे.



१२७ वर्षापूर्वी २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे. असिम त्यागाच्या इतिहासाची परंपरा लाभलेला मालुसरे परिवार पुन्हा एकदा या सुवर्ण क्षणाला सामोरा जात आहे.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी साखर, एरंडवाडी, सातारा जिल्ह्यातील  गोडोली, फुरुसपारगड, पारमाची, किवे, आंबेशिवथर, लव्हेरी, जामगाव मुळशी, जळगाव, धुळे, बारामती, कासुर्डी गुमा (भोर), शिवथर, निगडे (भोर), हिर्डोशी अशा महाराष्ट्रातील ७० गावांतील  मालुसरे परिवारातील ज्येष्ठ मान्यवर व्यक्ती आणि तरुण सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

रायगडवरील पहिल्या उत्सवाची कहाणी -

रायगड हा अखिल भारतातील एक दुर्भेद्य किल्ला ! १० मे १८१८ कर्नल प्रॉथरने नेतृत्वाखाली इंग्रजांनी रायगडचा ताबा घेतला, किल्ल्यावर एक घर व एक धान्याचे कोठार तेवढे इंग्रजांच्या अग्निवर्षावातून बचावले होते, शिवछत्रपतींचा राजवाडा पूर्णपणे उध्वस्त झाला होता, शिवछत्रपतींची समाधी सुद्धा भग्न झाली होती...पण प्रयासाने ओळखू येण्यासारखी होती, ही पडझड जितकी इंग्रजांच्या तोफखाण्यामुळे झाली होती तितकीच विखुरलेल्या मराठेशाहीमुळे सुद्धा झाली होती. सर्वत्र भग्न इमारतींचे अवशेष दिसत होते, गडावरील रस्ते, हारीने असलेल्या सुंदर इमारती, मंदिरे भग्न झाली होती, रायगडावरील दफ्तरखाना जळून खाक झाला होता. त्यानंतर रायगडचा उध्वस्त किल्ला जंगलखात्याच्या ताब्यात जाऊन तेथे वस्ती उरली नव्हती, रायगडचे राजकीय महत्व नष्ट झाले होते, पुढे १८८३ पर्यंत रायगडावर कोणी प्रवासी चढून गेल्याची नोंद नाही. इतके औदासिन्य लोकांत पसरले होते. पूढे मुंबईहून बोटीने नागोठणे आणि नंतर टांग्याने खडखडत लोक रायगडावर पोहोचत असत, पाचाडचा मुजावर सैद महम्मद किंवा वाडी येथील श्रीधर भगवान शेठ सोनार यांपैकी कोणीतरी गड दाखविण्याचे काम करीत. १८८५ मध्ये वर्तमानपत्रातून काही तुरळक उल्लेख येऊ लागले, १८८७ मध्ये गोविंद बाबाजी वरसईकर जोशी यांनी रायगड किल्ल्याचे वर्णन असे पुस्तक लिहिले, जोशी यांनी छत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धार सरकारी खर्चाने व्हावा असे लिहिले, यातूनच पुढे २५ एप्रिल १८९६ रायगडावर पहिला महोत्सव करण्यात आला, बारा मावळचे प्रतिनिधीसह महत्वाच्या जागी यावेळी माणसांची दाटी झाली होती, मेळ्याची पदे, विनायकशास्त्री अभ्यंकरांचे कीर्तन, शिवरामपंताचे भाषण, लोकमान्य टिळकांचे समारोपाचे भाषण, गंगाप्रसादाजवळ प्रसादाचे भोजन, छबिना इत्यादी कार्यक्रम व्यवस्थित झाल्यानंतर "तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आले." इ.स. १८१८ पासून १८९६ पर्यंतच्या रायगडाच्या सुप्तावस्थेनंतरचा हा पहिला उत्सव होय....


या कार्यक्रमाचा हा पूर्ण इतिवृत्तांत त्यावेळी दैनिक केसरीमध्ये प्रकाशित झाला होता.

रवींद्र मालुसरे - अध्यक्ष 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

९३२३११७७०४




बुधवार, १४ एप्रिल, २०२१

चित्रकार बंधूंना आवाहन

 चित्रकार बंधूंना आवाहन 

"सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे"



१६ एप्रिल १९६५... मुक्काम उमरठ...सुप्रसिद्ध शिल्पकार श्री वि ग सहस्त्रबुद्धे यांनी उभारलेल्या पुर्णाकृती भव्य पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ना यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रम पत्रिकेवर ठरला....आणि भारत-चीन युद्धाला सुरुवात झाली, "यशवंतराव , सह्याद्री होऊन हिमालयाच्या मदतीला धावले"...आणि स्व वसंतराव नाईक मुख्यमंत्री म्हणून कार्यक्रमाला आले, त्यांनी भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला उजाळा देत शेतकऱ्यांना सैनिकांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले.
*चित्रघराची संकल्पना बासनात*
तत्कालीन मंत्री भाऊसाहेब वर्तक यांच्या हस्ते चित्रघराची कोनशीला बसवताना ५५ वर्षांपूर्वी म्हणाले मुख्यमंत्री महोदय म्हणाले, प्रतापगड-रायगड कडे जाणारा शिवप्रेमी हे चित्रघर आवर्जून पाहण्यासाठी उमरठ येथे येईल असेच सरकारच्या वतीने साकारणार आहे. यात ऐतिहासिक वस्तू आणि छत्रपती शिवाजी महाराज व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग रेखाटले जातील...
बंधुनो, चित्रघर राहुद्या गेल्या ५५ वर्षात कोनशीलेच्या बाजूला दुसरा साधा दगडही शासनाकडून लागला गेला नाही. हा प्रकल्प बासनातच गुंडाळला गेला. हे दुर्दैव !
महाराष्ट्रातील चित्रकार कलावंत मंडळींची प्रतिभावान कलात्मकता आणि त्याला शिवप्रेमींचा मदतीचा हात पुढे आला तर हा प्रकल्प दखल घेण्यायोग्य प्रेक्षणीय स्वरूपात आपल्याला लोकसहभागातून साकारता येईल.
मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाने उर्वरित ७० गावातील मालूसऱ्याना या कामांसाठी एकत्र केले आहे.
आता आपल्या संकल्पनेची आणि विचारांची, व प्रत्यक्ष कृतीची गरज यामागे हवी आहे, आपण सहकार्याचा हात पुढे कराल याची खात्री वाटते. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर
२२ मार्च पूर्वी संपूर्ण जगाला टाळे लागण्यापूर्वी आम्ही सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे या अद्वितीय महापराक्रमी योध्याच्या जीवन चरित्रावर आधारीत राज्यस्तरीय चित्रस्पर्धा आयोजित केली होती. परंतु धास्तावलेले - थांबलेले जग आणि ठप्प झालेल्या दळणवळणाच्या साधनांमुळे आम्हांला अल्पसा प्रतिसाद मिळाला, सहभागी होऊ इच्छिणाऱ्या असंख्यांचे फोन आले पण ३५० व्या वर्षपूर्ततेच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप येऊ शकले नाही......(सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे - पराक्रमाची विजयगाथा) हा स्मृतिग्रंथ साकार होण्याच्या निमित्ताने आम्ही 'पुनश्च हरिओम' म्हणत स्पर्धेला पुन्हा प्रारंभ करीत आहोत.
(1) तानाजी मालुसरे यांचा प्रतापगड युद्धातील सहभाग
(2) पिळाजीराव नीलकंठ यांना मोठ्या दगडाला बांधून सूर्यराव सुर्वे चा केलेला पराभव (संगमेश्वर ।युद्ध)
(3) राजगडाच्या सदरेवर छत्रपती शिवराय व राजमाता जिजाऊ यांच्यासमोर कोंढाणा घेण्याची प्रतिज्ञा
(4) सिंहगड किल्ल्याची चढाई व
सिंहगडावरील युद्ध प्रसंग
(तानाजी,सुर्याजी, शेलारमामा, उदायभानू व मावळे)
(5) तान्हाजी मालुसरे सिंहगडावर धारातीर्थी पडले
(6) पालखीतून ते शव राजगडावर आणल्यानंतरचा प्रसंग (छत्रपती शिवराय, जिजाऊ साहेब व मावळे)
(7) गड आला पण सिंह गेला
(8) शाहीर तुलसीदास डफ घेऊन तान्हाजीरावांचा पोवाडा गातो आहे
(9) स्वा सावरकर आणि तान्हाजी (सावरकरांच्या पोवाड्यावर इंग्रज सरकारने बंदी आणली होती)
(10) शाहिस्तेखाना सोबतची लालमहाल येथे हातघाईची लढाई
(11) तान्हाजीरावांचे करारी आणि उग्र बाण्याचे चेहऱ्यावरील हावभाव

- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704





शुक्रवार, ८ मे, २०२०

चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा सुभेदार तानाजी मालुसरे


चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा सुभेदार तानाजी मालुसरे

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा आजवरच्या बखरकारांना,इतिहासाच्या अभ्यासकांना, ललित लेखकांना, चित्रपट व नाट्य निर्माता-दिग्दर्शकांना आणि अभिनय करणाऱ्या कलाकांराना सतत प्रेरणादायी ठरला आहे, देशातील अनेक जण या अद्वितीय पराक्रमी सामर्थ्यवान पुरुषोत्तमाचे चरित्र अभ्यासून भारावले गेले आहेत, आणि ह्या वीरपुरुषाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडले आहेत, यापुढेही ते मांडत राहाणार आहेत, कारण शिवचरित्र अखंड 'प्रेरणादायी' तर शिवरायांना जिवाभावाची साथ देणारे प्रसंगी बलिदान देणारे त्यांचे मावळे म्हणजे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा 'गनिमी कावा' अवलंबणारे पराक्रमाचे आणि धाडसाचे एक एक सोनेरी पान !  नरव्याघ्र नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान ! येत्या माघ वद्य नवमीला म्हणजे १७ फेब्रुवारीला सिंहगडावरील तानाजीरावांनी घडविलेल्या देदीप्यमान शौर्यदिनाला इंग्रजी ताररखेप्रमाणे ३५० वर्षे होत आहेत. छत्रपती शिवाजी राजांच्या चरणी आपली निष्ठा ठेवण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा एक रांगडा तरुण शिवरायांच्या पदरी सामील होतो काय अन  त्यांच्याशी इतका समरस होतो काय, की स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून जातो अन वचनाच्या पूर्ततेसाठी मागे न हटता आपला अमोल देह स्वामीनिष्ठेचरणी अर्पण करीत धारातीर्थी पडतो काय.  म्हणून तानाजी मालुसऱ्यांसारखे वीरपुरुष आपली जीवनगाथा लिहून अजरामर झाले ! युगानुयुगे येतील पण तानाजी मालुसरे यांचा इतिहास सातत्याने नवीन पिढीला प्रेरणादायी ठरत राहणार  आहे.  चलतचित्रपटातील पडद्यावरील एखादी कलाकृती श्रेष्ठ ठरते ती दिग्दर्शकामुळे. हल्ली चित्रपटसृष्टीला ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची भुरळ पडलेली आहे. बाजीराव मस्तानी , पद्मावत ,झाशीची राणी, आणि आता येत असलेला तानाजी ,पानिपत यांसारखे चित्रपट इतिहासावर प्रकाश टाकण्याचा किंवा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि नकळत इतिहासाची हानी करतात.आजपर्यंत तानाजीरावांच्या पराक्रमी इतिहासाची भुरळ कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी व्ही शांताराम, ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाळे आणि आता ओम राऊत यांना पडल्याने ही ऐत्याहासिक कलाकृती भव्य स्वरूपात मांडण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यापूर्वीच्या या चार चित्रपटांचा सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या  पुण्यतिथीच्या निमित्ताने हा आढावा....   



अजय देवगण-ओम राऊत यांचा तान्हाजी: द अनसंग  वॉरियर’ (२०२०)  -
'हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का' अशा दमदार डायलॉगसह 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.  'आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं’, असं म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजींच्या शौर्याची गाथा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.
तान्हाजी मालुसरे यांना भारतीय इतिहासातील सर्वोत्तम योद्धा मानले जाते. त्यांचे आयुष्य म्हणजे यश आणि त्यागाचा अद्वितीय प्रवास म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडील अनेक रत्नांपैकी एक असलेल्या या शूरवीराचा जीवनपट अजय देवगन याने साकार केला आहे. आपल्या मातृभूमीच्या प्रेमापोटी जीवाची बाजी लावणारा जिगरबाज मराठा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या अविस्मरणीय कलाकृतीतून मराठ्यांनी झुंजवलेले जिगरबाज युद्ध आणि देशाचा नकाशा पालटण्यास भाग पाडणारे तान्हाजीचे जीवन उलडणार आहे.
पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होता. या कोंढाण्यावर पुन्हा भगवा फडकवण्याचे स्वप्न शिवरायांसह स्वराज्यातील प्रत्येकानं पाहिलं आणि पराक्रमी सरदार  तानाजी मालुसरे यांच्यासह मावळ्यांनी कोंढाणा जिंकलाच. या लढाईत तानाजींना वीरमरण आले. तान्हाजी तल्लख बुद्धीचा योद्धा असला तरी एक पिता, पति, बंधू आणि भूमिपुत्र देखील होता. तानाजींचे शौर्य, पराक्रम, जिद्द आणि नेतृत्व हा प्रत्येक पैलू तसेच त्यांच्या बलिदानाची साक्ष या चित्रपटातून उलगडत जाणार आहे.
लढवय्या तानाजींची ही वीरगाथा आधुनिक तंत्रज्ञान वापरुन बनवली आहे. त्यामुळे भव्य स्वरूपात पडद्यावर पाहणं हा नक्कीच विलक्षण अनुभव असेल. अंगावर शहारे आणणारी दृश्ये तान्हाजी: द अनसंग वॉरियरमध्ये साकारण्यात आली असून तान्हाजींचे जीवन आणि त्यांनी मुघलांवर मिळवलेला विजय 3 डी प्रसंगांतून ७० एमएम पडद्यावर जिवंत होत आहे. अभिनेत्री काजोल तानाजीच्या पत्नीची सावित्रीबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. कपाळी ठसठशीत कुंकू, नाकात नथ, डोक्यावर पदर आणि करारी नजर अशा तिच्या मराठमोळ्या लुकचं तुफान कौतुक होत आहे. तसेच अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे तर कोंढाण्याचा अधिकारी असणाऱ्या उदयभानू राठोड या अधिकाऱ्याच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. पद्मावती राव, अजिंक्य देव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.  तानाजीया चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे. १५० कोटी रुपयांचा  बजेट असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सिनेमाविषयी बोलताना अजय देवगन म्हणाले की, “भारताच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या तान्हाजीसारख्या शूरवीराची कहाणी सादर करताना मला अतिशय आनंद वाटतो आहे. मला ही कथा आपल्या देशाच्या नव्हे तर जगाच्या प्रत्येक काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली पहायची आहे.

कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा ' सिंहगड '(१९२२)


चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंनी आपल्या देशात चित्रपट युगाला  सुरुवात केली तेव्हा ते मुकपट होते परंतु त्यांचा चेहरा प्रामुख्याने पौराणिक होता, तर कलामहर्षी बाबूराव पेंटरानी आपल्या सिंहगड चित्रपटाद्वारे १९२२ ला ऐतिहासिक चेहरा दिला.तानाजी या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना मला कलामहर्षी बाबुराव पेंटरांची आठवण आली. मराठी चित्रपटसृष्टी यांच्यामुळे वाढली आणि बहरली. बाबूराव पेंटर यांना शिवचरित्रावरील चित्रपटांचे जनक म्हणावे लागेल,  शिवरायांवर नाटके खूप झाली पण चित्रपट करणारे पहिले बाबूराव पेंटरच. आता येत असलेला नरवीर तानाजी वरील चित्रपट आपल्यासाठी नवीन असेल, पण बाबूराव पेंटर यांनी १९२२ साली 'सिंहगड' हा पहिला शिवचरित्रपर चित्रपट बनवला. त्यानंतर १९३३ साली व्ही शांताराम यांनी 'सिंहगड' तर १९५२ मध्ये राम गबाले यांनी 'नरवीर तानाजी" हा चित्रपट काढला होता. चित्रपट मूक असल्यामुळे कथाविषय सर्वाना माहिती असेल असाच हवा म्हणून कादंबरीकार ह. ना. आपटे यांची २००३ साली लिहिलेली  'गड आला पण सिंह गेला' ही  सुप्रसिद्ध ऐत्याहासिक कादंबरी निवडली. बाबुरावांच्या या चित्रपटाने लोकांच्या मनावर राज्य केले. हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरल्याने या चित्रपटाला तुफान गर्दी होऊ लागली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवण्यात आली.  चित्रपटाच्या उत्पन्नाचे आकडे प्रसिद्ध होत असल्यामुळे यावर सरकारचेही लक्ष गेले आणि या चित्रपटाला पहिल्यांदा 'करमणूक कर' बसवला व या चित्रपटापासून हिंदुस्थानात तो कायम झाला. पुढे काही वर्षांनी लंडन येथे जागतिक प्रदर्शनात 'सिंहगड' हा चित्रपट दाखवला गेला, त्यावेळी परीक्षकांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रावर पुढील वाक्य आहे- *This picture is an out standing example of sincerity of direction.*
ह्या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका बाबूराव पेंटर यांनी स्वतः केली. त्यांच्या बरोबर तानाजी मालुसरे ( बाळासाहेब यादव ), उदयभानू ( झुंजारराव पवार),  शेलार मामा यांची भूमिका 23 वर्षीय व्ही. शांताराम यांनी, देवलदेवी ( गुलाबबाई ) कमल कुमारी ( द्वारकाबाई ) अशा प्रमुख भूमिका होत्या. या सर्व भुमिका इतिहासाच्या पानातून बाहेर आल्यासारख्या वाटत. कारण या व्यक्तिरेखा पेंटरांच्या नजरेतून प्रथम कागदावर उमटल्या आणि त्यानंतर त्यांना वास्तवात उतरले गेले. कल्ले, दाढ्या, पगडया, कमरची घोंगडी,मुंडासे, हातातल्या काठ्या, पहरेकऱ्यांच्या खाटा, पायातल्या जाड तळाच्या वहाणा, कानातले मोठे मोठे वाळे, हातातली कडी वैगरे सर्व अगदी हुबेहुब असे. हा चित्रपट सिंहगडावर चित्रित करण्याचा बाबुराव पेंटरांचा मानस होता पण पैशाअभावी तो फोल ठरला आणि पन्हाळगडावर चित्रीकरण करण्यात आले. बाह्यचित्रीकरणाचा हिन्दुस्थानातला हा पहिलाच प्रयत्न. ऐत्याहासिक लढाया परिणामकारक दिसाव्यात यासाठी कोल्हापुरातील एक वस्ताद बाळासाहेब आणि झुंजारराव यानां शास्त्रोक्त शिक्षणासाठी दररोज येत असे. दांडपट्टा, घोडदौड, तलवार बाजींचा सराव चालू असताना एके दिवशी अचानक आग आग असा ओरडा ऐकू आला. बाबुरावांच्या स्टुडिओला आग लागली होती आणि ती चहूबाजूला पसरत जाऊन स्टुडिओ खाक झाला. यापूर्वी प्रदर्शित केलेले सैरंध्री,  वत्सलाहरण, दामाजी या चित्रपटाच्या लोकमान्य टिळक आणि नटवर्य गणपतराव जोशी यांच्यावरील लघुपटाच्या निगेटिव्ह भक्ष्यस्थानी पडल्या. मात्र एका तगड्या तरुणाने धाडसाने त्या आगीत प्रवेश करीत मोठ्या कष्ठाने बाबुरावांनी स्वतः बनविलेला देशी कॅमेरा वाचविला. आगीची बातमी ऐकून छत्रपती शाहू महाराजही आपल्या खडखड्याचे घोडे दौडवत आले. तर कोल्हापूरचे श्रीमंत सरदार नेसरीकर यानी या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भांडवल पुरवण्याचे कबूल केले. हे दु:ख विसरुन बाबुरावानी पन्हाळा किल्ल्यांवर बाह्यचित्रण सुरु केले. पन्हाळ्याच्या तीन दरवाज्यापाशी पाऊणशे मंडळींचा मुक्काम होता, चित्रपटात काम करणाऱ्या स्त्रिया पहाटे उठून नास्ता-जेवण करीत तर चित्रपटातले नायक-खलनायक पाणी भरण्याचे तसेच प्रसंगी जेवण वाढप्याचे सुध्दा काम करीत. शुटींग दरम्यानच्या काळात एकदा घोड्याला टाच मारताना घोडे बेफाम झाले आणी बाबुराव घोड्यावरुन खाली पडले. तानाजी कोंढाण्याचा डोणगिरी कडा चढतो आहे अश्या प्रसंगासाठी आजूबाजूच्या गावात सनदी पाठवून पिळदार दोनशे मावळ्यांना हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर मोहिमेवर निघतानाच्या दृश्यात एक वृध्द बाई तानाजीला आशिर्वाद देते हा प्रसंग हुबेहुब येण्यासाठी कुशिरे गावातील एका स्त्रीची निवड केली होती. हातघाईच्या लढाईत तानाजी,सूर्याजी एकत्र दिसावेत यासाठी विशिष्ट् तंत्र वापरुन दिवाळीला लावण्यात येणाऱ्या चंद्राज्योतीच्या दारुचा उपयोग केला तसेच प्रथमच मस्किंगची पध्दत अमलात आणली. सिंहगड मधील शेवटचं लढाईचं दृश्य रात्रीच्या वेळी चित्रित करायचं होतं, तानाजी व शेलारमामा घोरपडीच्या आधाराने सिंहगडावर निवडक मावळ्यांसह चढून जातात व किल्ल्याचा दरवाजा उघडून मराठा सैन्याला आत घेताना रात्रीच्या गडद अंधारात लढाईची एकच धुमचक्री चालू होते, मशालीच्या उजेडात ही दृश्ये चित्रीत होऊ शकत नव्हती. शेवटी बाबुराव पेंटरानी एक युक्ती शोधून काढली, दिवाळीला चंद्रज्योत हा दारुकामाचा एक प्रकार पेटवण्यात येतो, या चंद्राज्योतीचा खुप लख्ख पांढरा प्रकाश पडतो, या चंद्राज्योतीतील दारु दृश्यांच्या आवश्यकतेप्रमाणे एका लांब रांगेत रांगोळी प्रमाणे ठेवून ती मशालीने पेटवून त्या उजेडात लढाईची दृश्ये चित्रीत केली जात. चंद्राज्योतीचा बराचसा धुर वाऱ्याने वाहून जात असे आणी थोडाफार धूर दृश्यावर आला तरी तो मशालीचा धूर आहे असे वाटत असे. रात्रीच्या दृश्यांचे चित्रण विजेच्या दिव्याशिवाय आपल्या देशात पहिल्यांदा हे असं पार पडलं. पेन्टरानी तयार केलेले भव्य ऐतिहासिक देखावे,पडद्यांवर आलेली रोमांचकारी दृश्ये, उत्कट देशप्रेमाने ओथंबलेले वीररसाचे प्रसंग, बाळासाहेब यादवांची नरवीर तानाजीची व झुंजारराव पवारांची उदयभानुची उत्कृष्ट दणदणीत भुमिका यामुळे पुर्वीच्या सर्व मुकपटापेक्षा सिंहगड जास्त लोकप्रिय व लाभदायक झाला.
चित्रपट पुर्ण झाल्यानंतर तो पाहण्यासाठी श्रीमंत नेसरीकर, श्रीमंत बापुसाहेब इंगळे, श्रीमंत कागलकर अशी राजघराण्यातील मान्यवर मंडळी उपस्थीत होती. तेव्हाच्या मुंबईतील नॉव्हेल्टी नाट्यगृहात बाबुरावानी स्वत: रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराज,नरवीर तानाजी, उदयभानू, मावळे यांची भव्य पोस्टर्स लावली. गेटवर काही लाकडी ऐत्याहासिक प्रसंग उभे केले. त्यामूळे ती पाहाण्यास लोकांची एकच गर्दी उसळली. मुंबईला नॉव्हेल्टी सिनेमागृहात हा चित्रपट सलग सोळा आठवडे चालला होता, तो पडद्यावर आला तेव्हा पावसाचे दिवस होते, आणि पावसात या चित्रपटाने सोळा आठवड्याचा रन मिळवला होता हे या चित्रपटाच सर्वात मोठं यश होतं, आपल्या देशात चित्रपटांची सुरुवात झाल्यावर इतका लॉंग रन मिळवणारा हा पहिलाच चित्रपट, संपूर्ण मुंबईचे वातावरण शिवकालींन झाले होते. नुकतीच हिंदू-मुस्लिम दंगल शमली होती त्या पार्श्वभुमिवर प्रख्यात म्यॅजेस्टिक टॉकिजने हा चित्रपट नाकारला होता. प्रचंड गर्दी पाहुन पहिल्या खेळाला पोलीसांना पाचारण केले होते, अखेर चित्रपट सुरु झाला, टायटल्स सुरु होत पडद्यांवर तानाजी आणि शिवाजी महाराजांचे दर्शन झाले, प्रेक्षकानी टाळ्या वाजवून हर हर महादेवसह दोघांच्या नावाच्या उस्फूर्त आरोळ्या सुरु झाल्या. उदयभानूच्या वाराने जेव्हा तानाजी कोसळतो तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. तर ऐंशी वर्षाच्या तडफडार म्हाताऱ्या  शेलार मामाच्या जोराच्या घावाने उदयभानू गतप्राण होत धरणीवर पडल्यानंतर तर प्रेक्षकानी मोठ्यांदा टाळ्या वाजवून उस्फूर्त भावना व्यक्त केल्या. आणि भावाचे दु:ख न आवरणाऱ्या  सूर्याजीला प्रेमाने जवळ घेत महाराज म्हणतात, 'सूर्याजी हा शिवाजी गेला आणि तानाजी राहिला ' ही पाटी अखेरीस पाहिल्या नंतर पुन्हा प्रेक्षकांचे डोळे पाणावले.


प्रभातच्या चित्रपती व्ही शांताराम यांचा  ' सिंहगड '(१९३३)



स्वातंत्र्याचा मंत्र देणारा ऐत्याहासिक 'सिंहगड' हा बोलपट काढण्याचे प्रभात फिल्म कंपनीने ठरवले. सिंहगड किल्ला सर करण्याची शिवाजी महाराजांची इच्छा तानाजी मालुसरे या त्यांच्या शूर हिंदू-मराठा व विश्वासू सरदाराने स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून, स्वतःच्या हिमतीच्या आणि हुशारीच्या बळावर पूर्ण केली. पण यासाठी त्याला आपल्या प्राणांचे मोल द्यावे लागले. १९२२ च्या बाबुराव पेंटरांच्या चित्रपटात व्ही. शांताराम यांनी शेलारमामांची भूमिका केली होती. पण यावेळी त्यांनी स्वतःला पूर्णपणे पडद्याआड ठेवले. शंकराराव भोसले यांनी या चित्रपटात  तानाजी मालुसरे यांची भूमिका तर कमलकुमारी (लीला चंद्रगिरी), देवलदेवीची (प्रभावती), छत्रपती शिवाजी महाराज (गणपत शिंदे) उदयभानू ( बाबुराव पेंढारकर ), बुवासाहेब (घेरेसरनाईक) मा. विनायक (जगतसिंह) केशवराव धायबर (शेलारमामा) यांनी भूमिका अविस्मरणीय केल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना शांताराम यांनी नेहमीच्या रुळलेल्या चाकोरीतून न जाता काहीतरी वेगळ्या पद्धतीने अनेक दृश्य चित्रित केली, रात्रीच्या  लढाईचा  प्रसंग चित्रित करताना त्यांनी अंधारात दोन्ही पक्षांचे तुंबळ युद्ध चालू असताना तोफा डागायचे ठरवले, तोफातून एका पाठोपाठ एक याप्रकारे गोळे बाहेर पडत असताना दारूचा जो प्रकाश पडेल, त्या प्रकाशात युद्धाचा प्रकाश व काळोख असा फार गमतीचा खेळ पडद्यावर दिसत होता. ही दृश्ये या चित्रपटाची प्रमुख आकर्षण ठरली. पोवाडा हा संगीतप्रकार या चित्रपटातून प्रथमच पडद्यावर आला. इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा जोरात सुरु होता. त्याचवेळी या चित्रपटातून लहरी हैदर यांनी रचलेला पोवाडा 'चल उठ गड्या, चल वीर गड्या, घेऊन भाला, ढाल गड्या, शूर शिपाई शिवाजीचा तू, मर्द मराठा मावळचा ' या वीरश्रीयुक्त पोवाड्याने जनक्षोभ अधिक उसळत असे. गोविंदराव टेबे यांनी अत्यंत जोशपूर्ण संवाद लिहून अभिनय व संगीताप्रमाणे चित्रपटासाठी लेखणीचं  कसब सिद्ध केलं.  बाबुराव पेंटरांचा तानाजीवरील चित्रपट मॅजेस्टिक मध्ये प्रदर्शित होऊ शकला नव्हता, मात्र व्ही शांतारामांचा चित्रपट त्याठिकाणी प्रदर्शित झाला आणि तुफान चालला. जुन्या जमान्यातील हा चित्रपट, त्यावेळी विजेच्या दिव्यावर किंवा बंदिस्त साउंड प्रूफ स्टुडिओत चित्रीकरण होत नसे. चित्रपट म्हणावा तेव्हढा गतिमान झाला नव्हता तरीही त्याकाळी 'सिंहगड' प्रचंड गाजला आणि त्यातुन प्रभातच्या चालकांना पुढचे रंगीत चित्रपट निर्माण करण्याची उमेद मिळाली.



ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाले यांचा ' नरवीर तानाजी ' ( १९५२ )
मुंबईच्या कोहिनूर टॉकीजचे मालक श्री कान्हेरे यांनी एक ऐत्याहासिक चित्रपट करायचे ठरवले. साहजिकच शिवरायांचा पराक्रमी शिलेदार नरवीर तानाजी मालुसरे हा विषय त्यांनी निवडून बाबुराव पैलवान(तानाजी मालुसरे), मा. विठ्ठल (छत्रपती शिवाजी महाराज ), दुर्गाबाई खोटे (जिजामाता), रायबा (मदनमोहन ) शेलारमामा (केशवराव धायबर ) यांच्याबरोबर नायिका सुलोचना, वसंतराव पैलवान असा कलाकारांचा संच निवडला. भगवानदादांच्या स्टन्ट चित्रपटांचा नायक  म्हणून बाबुरावांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले होते. त्यांचे व्यक्तिमत्व रांगडे होते. त्यांची पैलवानी देहयष्टी तानाजीच्या भूमिकेला शोभून दिसणारी होती. पण मराठी संवाद बोलण्याची त्यांची बोंब होती. या चित्रपटातील त्यांचे सारे संवाद प्रख्यात गीतकार ग दि माडगूळकर यांच्या आवाजात डब केले गेले. चित्रीकरणासाठी प्रभात स्टुडिओच्या आवारात मोठमोठे सेट्स उभारले. दिग्दर्शक म्हणून राम गबाले यांच्यासाठी हा चित्रपट वेगळा होता. यापूर्वी त्यांनी ऐत्याहासिक चित्रपट केला नव्हता. यात लढाया,  कुस्त्या, वाघाशी झुंज,  दांडपट्ट्याने हत्तीची सोंड छाटणे असे प्रसंग चित्रित करायचे होते. भगवानदादा यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रीकरणाला सुरुवात झाली. हत्तीची सोंड कापण्याच्या प्रसंगासाठी हत्ती पाहिजे होता, ग दि माडगूळकर यांच्या ओळखीने औंध संस्थानाचा हत्ती मिळाला. हत्ती व्ही.आय.पी असल्याने त्याचं खाणं -पिणं, राहाणे आणि माहुताची बडदास्त ठेवली गेली होती. स्टुडिओमध्येच उदयभानूच्या वाड्याचा मोठा सेट उभारला होता. रात्रीचा सीन होता. लढाई चालू असताना तानाजी दांडपट्टा चालवीत सपासप शत्रूसैन्य कापत हटवत येतो. लढाई अगदी निकारावर आल्यावर उदयभानु हत्तीवर स्वार होऊन तानाजीच्या दिशेने अंगावर येत असताना तानाजी हत्तीची सोंड हातात धरून कापतो, खरे तर तो प्रसंग अवघड होता. त्या काळात आतासारख्या स्पेशल इफेक्टच्या सोयीचा अभाव होता, ट्रकच्या टायरची ट्यूब कापून सोंडेसारखी हत्तीच्या सोंडेला दुमडून बांधली होती. सर्व तयारी झाली. माहूत त्याच्या भाषेत हत्तीला चुचकारत होता. हत्तीनं पळत येणं आणि तानाजीने सुरक्षित अंतरापर्यंत दांडपट्टा फिरवीत जाणे एव्हढाच शॉट हवा होता, सर्व तयारी झाली, तानाजी ठरलेल्या अंतरापर्यंत आला आणि हत्तीने एकदम रागावून ' हे काय बांधलय' या भावनेने पक्की बांधलेली इनर ट्यूब रागाने उडवून टाकली आणि नासधूस करू लागला. दुसरा प्रसंग तानाजी जंगलात वाघाशी सामना करतो असा सीन होता. त्यासाठी शिकाऊ वाघ कुठे मिळेल तिथे जायचं ठरलं. पंढरपूरच्या सर्कशीत असा वाघ आहे असे समजल्यानंतर चित्रपटाचा चमू तिकडे गेला. एका बंदिस्त धर्मशाळेत झाडांच्या फांद्या, मोठमोठे दगड लावून जंगलाचा देखावा उभा करून सेट उभारला. वाघाच्या रिंगमास्टरला तानाजी सारखे केस, भरदार मिश्या, कपडे, डोक्यावर मराठेशाही पगडी, वैगरे वेशभूषा करून तयार ठेवला. वाघाचे स्वतंत्र आणि एकत्र शॉट्स घ्यायची योजना पक्की केली. कॅमेराच्या लेन्सपुरती मोकळी जागा ठेऊन डुप्लिकेट तानाजी आत सोडला. वाघाने रिंगमास्टरला आवाजावरून ओळखले परंतु आपला हा रोजचा भिडू आज हे काय करून आलाय म्हणून वाघाने डरकाळी फोडत त्याची पगडी आणि केसांचा विग उडवून दिला. मात्र पुढे बाबुराव पेहेलवानांच्या सोबत हवे तसे शॉट्स चित्रित झाले. चित्रीकरण संपल्यानंतर सर्कशीच्या चमूला एक ग्रुप फोटो काढायचा होता, वाघ मध्ये आणि त्याच्या बाजूला तो रिंगमास्टर उभा राहिला. नेहमी फोटोमध्ये मध्यभागी महत्वाच्या जागी उभे राहणारे मान्यवर यावेळी मात्र फोटोत दूर दूर उभे राहिले. हा चित्रपट सुद्धा भरपूर चालला.

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
chalval1949@gmail.com 
९३२३११७७०४

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...