उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

श्री राजा शाहू 

चरणी तत्पर कृष्णाजी 

सुत आनाजी उतेकर
किल्ले प्रतागडावरील भवानी आईच्या पूजेचा मान छत्रपती शिवाजी महाराज यांनी उतेकर घराण्याला दिला होता तेव्हा हा शिक्का शाहू महाराज यांनी उतेकर घराण्याला सरंजाम दिला तेव्हा हा शिक्का मोर्तब दिला होता.

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत आणि मराठ्यांच्या इतिहासात  "उतेकर" या आडनावाचा अर्थ म्हणजे निष्ठा आणि पराक्रम! मध्ययुगीन आणि शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना याचे अनेक दाखले सापडतात. 

शिवचरित्र साहित्य खंड १० कोकणच्या इतिहासाची साधने मध्ये पान नं २१ वर  याचा स्पष्टपणे उल्लेख सापडतो.
उतेकर कुळ हे शिवरायांच्या स्वराज्यात गावाची पाटीलकी सांभाळत असत. शिवरायांशी प्रत्यक्ष संपर्कात असलेले महाड मधील वाळणच्या पाटलांचा उल्लेख इतिहासात  अढळतो. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात शिवरायांनी आपल्या विश्वासू मावळ्यांना वसवले होते. त्यात अनेक गावे उतेकरांची आहेत.  उतेकर कुळीचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात आढळतो. साताऱ्यातील जावळीच्या खोऱ्यातून सुरु झालेला प्रवास आज रत्नागिरी, रायगड तसेच नाशिक, सांगली, ठाणे इत्यादी जिल्ह्यात पूर्वांपार उतेकरांची वतने आढळतात. किल्ले प्रतापगडावर भवानी मातेचे महत्वाचे मानकरी उतेकर आहेत. पुढे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत अनेक गावांचे मोकासे उतेकर सरदारांकडे असल्याची नोंद शाहू दप्तरात आढळते. 
सरदार कृष्णाजीराव उतेकर
सरदार अणाजीराव उतेकर 
सरदार संताजीराव उतेकर 
सरदार अनाजीराव उतेकर 
सरदार कृष्णाजीराव  उतेकर
सरदार  हरजीराव उतेकर
सरदार भिकाजीराव उतेकर
सरदार शंकराजी उतेकर
उतेकर घराणे हे शिवपुर्व काळापासून सरंजामदार घराणे असून,  जावळीच्या  चंद्रराव मोरे यांचे मुतालिक घराणे आहे. पुढे शिवरायांना हिदंवी स्वराज्याच्या कालखंडात  स्वराज्य सेवा करताना दिसतात. छत्रपती थोरले शाहू महाराज स्वत:  रायगड किल्ला घेण्यासाठी आले होते तेव्हा उतेकर सरदार त्यांच्या सोबतीला असलेले पत्र उपलब्ध आहे. यावेळेस जंजिऱ्याकडून येणाऱ्या सिद्दीची रसद व कुमक अडवून  स्वराज्याचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन तुर्की फौजेच्या ते विरोधात लढले होते.

यावेळेस छत्रपती थोरले शाहू महाराजांनी  उतेकर यास सरंजाम आणि शिक्का दिला. 
तत्कालीन कालखंडात आंग्रेच्या दिंमत फौजात कायम उतेकर सरदार व पागा दिसून येतात. गेल्या शंभर वर्षांचा जरी धांडोळा घेतला तरी साताऱ्यापासून महाड पोलादपूर ते रत्नागिरी पर्यंत वास्तव्य करून असलेल्या अनेक उतेकरांची वेगवेगळ्या क्षेत्रातील मर्दूमकी नजरेत भरते. 
पोलादपूर तालुक्यातील उतेकर कुळाचे वाडवडील पदाजी, उदाजी, नंदाजी ही तीन भाऊ उतवेश्वर वरून आले आहेत. त्यापैकी पदाजी उतेकर हे रानवडी या गावी, नंदाजी उतेकर हे मोरसडे या गावी तर उदाजी उतेकर हे घागरकोंड या गावी येऊन राहिले होते.  
उतेकर कुळाचा वंश हा सोमवंशी (अंश वंश - चंद्रवंश), त्यांच्याकडून सूर्यवंशाचे संस्थापक राजा म्हणून सूर्यदेवाला मानले जाते. 
गोत्र - गर्गाचार्य, 
देवक - शंख 
तर कुलदैवतांची नावे - उतव्या, पद्मावती, भैरी, जोगेश्वरी, जानाय, मानाय अशी आहेत. 
गोती  - सकपाळ, कळंबे, आहिरे, आम्रे, भिलारे, कुचेकर, घावरे. आत्रे, पोटे, खराडे, गोडे, राखाडे, म्हाबदी, गोडावले, पोल, येरापले, बांदल, नळवंत, कोकाटे, तातपुते, दिघे 
गावातील घराणी -  टेपकरी घराणे, खोत घराणे, हुजर घराणे, सोपेकरी घराणे, पाटील घराणे, मोकाशी घराणे 
उतवेश्वर देवाचे लग्न जननी बरोबर दरवर्षी पौष महिन्यात पौर्णिमेला पुष्प नक्षत्रावर सकाळी सूर्यबिंबीला लागते. हा लग्न सोहळा उत्तेकरांचे मूळ गाव गावंढोशी, जिल्हा - सातारा, महाबळेश्वर जवळ उतव्याच्या मंदिरात पार पडतो. 
|| ओम श्री उतवेश्वर नम: ||  असा उतवेश्वराचा मंत्र आहे. तो देण्याचे कारण म्हणजे सत्ययुगात अस्थेमय प्राण होते, त्रेता युगात त्वचा असेपर्यन्त प्राण होते. द्वापारयुगात नाडीमध्ये प्राणाचे वास्तव्य असे. कलियुगात अन्नमय प्राण आहेत. आता पूर्वीसारखे सहस्त्र वर्ष किंवा अधिक आयुष्य माणसाला राहिले नाही. त्यामुळे दीर्घ तप किंवा साधना करणे शक्य नाही. माणसाचे आयुष्य अल्प, शक्ती अल्प, शुद्धता अल्प, मती अल्प, मोठी साधना कशी होणार ? नामस्मरण, जप हेच सोपे साधन ईश्वराने त्यामुळे मानवासाठी दिले आहे. देहाचा भरवसा नाही. म्हणून थोड्या काळात मुक्ती मिळण्याचे साधन देव उतवेश्वराने दिले आहे. या मंत्राचा जप कोठेही करावा.  बसले असताना, जागे असताना, झोपी जाण्यापूर्वी, किंवा कुणाशी भांडताना सुद्धा.  त्याने शत्रू वैर विसरून आपला मित्र होतो.   
बंधूनो, त्यातलेच एक नाव म्हणजे लक्ष्मण उतेकर ! महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांनी छावा च्या रूपाने पडद्यावर आणला. या चित्रपटाला उदंड प्रतिसाद आणि लोकप्रियता मिळाली.  हिंदुस्थानच्या सीमा ओलांडून हा चित्रपट जगभर पोहोचला....त्याचबरोबर 'उतेकर' हे नाव सुद्धा ! याचा आपल्या सर्वाना खुप आनंद आहे. त्याचबरोबर आनंदाचे आणखी दुसरे कारण म्हणजे...
मनोरंजनाची स्वप्ननगरी मुबंई !  
भारतीय चित्रपटसृष्टी आणि मुंबई यांचे नाते खूप वेगळे आहे. अनेक दिग्गज मंडळींनी या चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य योगदान दिले आहे. जेव्हा सिनेमा आणि सृजनशीलतेचा विषय असतो, तेव्हा त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत मोलाची असते. महाराष्ट्राने सृजनशीलता आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक पिढ्या घडवल्या आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी आणि कलात्मक ऊर्जेचा मनोरंजन क्षेत्रावर कायमच सकारात्मक प्रभाव राहिला आहे.
सिनेमा म्हणजे नक्की काय, हे पहिल्यांदा सर्वांना अनुभवायला लावणारे भारतातील पहिले चित्रपट निर्माते दादासाहेब फाळके. त्यांच्या दूरदृष्टी आणि धैर्यामुळे भारतीय सिनेसृष्टी निर्माण झाली. म्हणूनच त्यांची 'द फादर ऑफ इंडियन सिनेमा' अशी जगाच्या इतिहासात नोंद झाली. सर्वोत्कृष्ट चित्र निर्मिती करून विक्रमी यश संपादणाऱ्या आपल्या लक्ष्मणरांवानी मुंबईत विशेषतः भारतीय चित्रपटसृष्टीत आपले नाव कायमचे कोरले जाईल अशी न भूतो न भविष्यती देदीप्यमान कामगिरी छावाच्या निमित्ताने केली आहे. 

या त्यांच्या बहुमोल कामगिरीची दखल घेऊन चित्रनगरी मुंबईतच मुंबई- ठाण्यातील समस्त पोलादपूरकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार १५ जून २०२५ रोजी करण्याचे ठरले आहे. मुंबईत हा कार्यक्रम जसा होणे गरजेचे आहे तेव्हढेच या सत्कार सोहळ्यात आपण सर्व उतेकर बहुसंख्येने उपस्थित राहाणे आवश्यक आहे. 
छावा जिथे संपतो... त्या शंभूराजांचा प्रेरणादायी आत्मबलिदानाचा इतिहास व पुढची ८ वर्षे छत्रपती राजाराम महाराज व १८ वर्ष रणरागिणी ताराराणी यांचा स्वराज्य राखण्याचा लढा सुरु होतो आणि औरंगजेबाला या महाराष्ट्र भूमीत कसे गाडले जाते... तो इतिहास सांगणारे आणि जिवंत करणारे इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक  कार्यक्रमात उपस्थित राहाणार आहेत.
कार्यक्रम  : रविवार, दिनांक १५ जून रोजी सकाळी १० वाजता झवेरबेन हॉल, घाटकोपर-पूर्व येथे होत आहे. 
आपण अधिक संख्येने उपस्थित राहा !
लोकप्रतिनिधी, इतिहास प्रेमी आणि पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. 
अधिक माहितीसाठी ९३२३११७७०४ यावर संपर्क साधावा. आणि हा मेसेज प्रत्येकाच्या परिचयाच्या 'उतेकर' या माणसापर्यंत पोहोचवावा ही विनंती. आपल्या प्रतिसादाची फोनवर वाट पाहात आहे.
संदर्भ : सचिन उतेकर (चिपळूण) अनिल उतेकर (रानवडी)


रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

टिप्पण्या

  1. खूप सुंदर, व अभिमानास्पद अशोक उतेकर गाव घागरकोंड , सध्या पुणे येथे आहे, आपले लेख विचार वंत असे असतात आपणास नमस्कार

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा

लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार