आगरी-कोळ्यांची माटुंगा येथील श्रीमारुबाईचे जागृत देवस्थान
आगरी-कोळ्यांची माटुंगा येथील श्री मारुबाई चे जागृत देवस्थान आताचे मुंबई आणि पूर्वीचे बॉम्बे हे शहर मुळात अरबी समुद्रातील सात बेटे जोडून तयार झाले आहे. त्या बेटांमध्ये कुलाबा , ओल्ड वूमन आयलंड , बॉम्बे , माझगाव , वरळी , माहिम , माटुंगा यांचा समावेश होता. सात बेटांच्या मुंबापुरीचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी , आगरी , भंडारी , पाचकळशी या समाजाचे लोक होते. तीनशे वर्षांपूर्वी मुंबईतील सर्व गावे ब्रिटिशांनी ताब्यात घेतली. यापैकी बहुतांश बेटांना त्यावेळी त्यांची ग्रामदेवता होती. गावातील लोकांचे ती रक्षण करते अशी तेथील गावकऱ्यांची श्रद्धा होती. माटुंगा बेटावरील गावकऱ्यांची श्री मारुबाई ही ग्रामदेवता होती. माटुंगा बेट हे तेव्हा आताच्या परळपासून ते शीवपर्यंत विस्तारलेले होते. शीव ही पूर्वीच्या मुंबईची उत्तर सीमा होती. मराठीमध्ये सीमा , हद्दीला शीव म्हणत असल्याने तेच नाव या भागाला पडले. माटुंगा बेटावर प्रामुख्याने कोळी-आगरी , भंडारी लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. माटुंग्याला फार पूर्वी श्री मारुबाई टेकडी गाव असेही म्हटले जायचे. कालांतराने या ना...