पोलादपूर तालुका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोलादपूर तालुका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २१ जुलै, २०२४

पोलादपूर तालुक्यातील श्री गुरुपरंपरा || गुरुवंदन ||

 



पोलादपूर तालुक्यातील श्री गुरुपरंपरा || गुरुवंदन ||

पोलादपूर तालुका हा खरं तर वारकऱ्यांचा तालुका. वै गुरुवर्य ह भ प हबाजीबाबा,  वै गुरुवर्य ह भ प हनवतीबुवा,  वै गुरुवर्य ह भ प मारुतीबाबा मोरे,  वै गुरुवर्य ह भ प गणेशनाथ महाराज,  वै गुरुवर्य ह भ प रामचंद्र आ ढवळेबाबा,  वै गुरुवर्य ह भ प नारायणदादा घाडगे,  वै गुरुवर्य ह भ प श्रीपततात्या,  वै गुरुवर्य ह भ प मोरे माऊली अशी वारकरी सांप्रदायातली थोर परंपरा तालुक्याला लाभली आहे. वर उल्लेखिलेल्या श्रीगुरूंनी डोंगराळ भागात परमार्थ करताना आणि तो वाडीवस्तीवर रुजवताना निस्वार्थीपणे देवाची करुणा भाकली. ज्ञानदीप लावू जागी या उक्ती सार्थ करण्यासाठी अहोरात्र शरीर झिजवले. त्यामुळेच पोलादपूर तालुक्याला वारकऱ्यांचा तालुका अशी ओळख संपूर्ण महाराष्ष्ट्रात निर्माण झाली आहे. त्यांची पुढची पिढी सध्या हा वारसा चालवत आहे. त्यांनी तो विना अहंकार समर्थपणे चालवावा अशी प्रांजळ मागणी फक्त देवाकडे करू शकतो. खरा गुरु शिष्याला परिपूर्णतेने घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. अर्थार्जनाची, नावलौकिकाची अपेक्षा न करता तो मडके साकारणाऱ्या कुंभारासारखे कष्ट घेतो. कुंभार जसा ओली माती मळून योग्य मिश्रण करून त्या मातीतून हळुवार हाताने सुबक मडके आकारास आणतो, तसाच खरा गुरुही शिष्यरूपी ओल्या मातीत सुविचारांचे-सद्गुणांचे सिंचन करून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य करत असतो,... हे कार्य पुढच्या पिढीकडून निरंतन चालू राहावे अशी गुरुदक्षिणा मागत आहे.

या लेखातून गेल्या १२५ वर्षातील पोलादपूर तालुक्यातील वारकरी परंपरेचा आढावा घेण्याचा त्रोटक प्रयत्न मी करीत आहे. अधिक वाचण्यासाठी अनुक्रमेतील विषयानुसार वाचावे ही वाचकांना विनंती.

सदगुरू वै ह.भ.प.नारायणदादा तथा दादामहाराज घाडगे

भगवंताच्या ठिकाणी अनन्य होण्यातच मानवी जीवाची सार्थकता आहे असे श्री ज्ञानदेवांनी म्हटले आहे. "एथ अर्जुन माझेपण सार्थक एक" असा जीव वा असे जीवनचं आदर्श असते. आपल्या वाट्याला आलेल्या कर्माची प्रतारणा न करता ती ईश्वरपूजा आहे अशी सद्बुद्धी ज्याच्या ठायी आहे, असा जीवचं आज दुर्मिळ झाला आहे. अशा सूडबुद्धीने, सद्दवासनेने जीवन व्यतीत करणाऱ्यापुढे मस्तक आपोआप लवते. पोलादपूर तालुक्यातील करंजे येथील सदगुरू वै ह.भ.प.नारायणदादा तथा दादामहाराज घाडगे हे असेच थोर हरिभक्त होऊन गेले आहेत. बालपणापणापासून त्यांचा अध्यात्माकडे ओढा. करंजे गावातील श्री. नारायण रामजी घाडगे हे संपूर्ण नाव सांगताच फारच थोड्या लोकांना हे नाव परिचित वाटेल परंतु त्याच्याऐवजी सर्वश्रुत झालेले 'नारायणदादा' हे नाव पोलादपूर तालुक्यातील सर्व समाजाला  विशेषतः वारकरी समाजाला अगदी जवळचे म्हणजे नातेवाइकासारखे वाटेल. "नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जागी" ही आद्य वारकरी कीर्तनकार भक्त शिरोमणी संत नामदेवरायांची प्रतिज्ञा दादा महाराजांनी मनोमनी स्वीकारल्यानंतर तालुक्यातील असे एकही गाव उरले नाही की, ज्या ठिकाणी दादामहाराजांचे कीर्तन वा प्रवचन झाले नाही. आपल्या आयुष्याच्या नऊ दशकांच्या धार्मिक कारकिर्दीत कीर्तनाच्या निरूपणातून त्यांनी अनेक साधकांच्या  अडचणी साधनेतून दूर केल्या. ते साधकांचे मायबाप बनले. त्यांची आपादमस्तक शुभ्र वस्त्रे धारण केलेली हसतमुख मूर्ती पहिली की, त्यांच्या रूपाने जणू सात्विकपणचं साकार झाला आहे असे वाटत असे.त्यांच्या सहवासात अनेक साधक आले.भक्त झाले, प्रपंचाने गांजलेले लोक आले सर्वाना त्यांनी प्रेम दिले, मार्गदर्शन केले, सन्मार्गाला लावले, कित्येक खचलेली मने सावरली, उध्वस्थ संसार पुन्हा उभे केले. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर एकुलते एक असल्याने अल्पवयात घरच्या कुटुंबाची जबाबदारी शिरावर येऊन पडली. लिहिता-वाचता येईपर्यंत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत येऊन सेंचुरी मिलमध्ये नोकरी करावी लागली. बालपणापासूनच त्यांचा अध्यात्माकडे ओढा असल्याने प्रांतकाळी भूपाळी म्हणणे, जप, ध्यान, पूजा, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, नामदेव गाथा याचे वाचन आणि दिवसभर इतर वेळी भागवताचा अभ्यास हे ठरलेले. वै. गुरुवर्य अर्जुनमामा साळुंखे यांच्याकडून तुळशीची माळ घेतल्यानंतर पंढरीची वारी नित्याची झाली. पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे आणि वाळवंटातील कीर्तन-प्रवचनाचा मनसोक्त लाभ घ्यायचा हा परिपाठ पंढरीत ठरलेला. त्यांचा या क्षेत्रातला विद्याव्यासंग आणि भगवंतावरील निष्ठा पाहून मामानी १९५६ साली दादांना गुरुपदाची दीक्षा दिली. मामांच्या मृत्यूनंतर ६ तपे सदगुरु भावे महाराज वारकरी समाज या संप्रदायाची धुरा त्यांनी सांभाळली. या काळात दादांनी वारकरी संप्रदायाचा मुंबई,पोलादपूर,बडोदे, रत्नागिरी,सिंधुदुर्ग,रायगड,औरंगाबाद,कोल्हापूर येथे खूप विस्तार केला. जन्मभर कीर्तन-प्रवचनरूपाने आपल्या मार्दवभऱ्या बोलीने जनजागरण केले. दादांची राहणी अत्यंत साधी धोतर-सदरा, डोक्यावर काळी टोपी,कपाळी उभा गंध असा वेष. तर उच्च विचारसरणीने अंतर्मन भरलेले. दादांना आयुष्यात खूप संत सहवास लाभला. ह.भ.प.तात्यासाहेब वासकर,मामासाहेब दांडेकर,खंदारकर महाराज, रंगनाथ महाराज,बाबामहाराज सातारकर, निवृत्ती महाराज देशमुख,कबीर महाराज, बाबामहाराज देहूकर, ज्ञानेश्वर मोरे माउली,बाळासाहेब भारदे, सावळाराम बाबा, काकामहाराज आजरेकर, गणेशनाथ महाराज अशा दिग्गज संतांची वाणी त्यांनी ऐकून आपल्या जीवनी मुरवली. पोलादपूर तालुक्यातील ही पावनभूमी दादामहाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. त्यांच्या कीर्तन प्रवचनादी प्रबोधनामुळे माणूस परमार्थ साधू शकतो असा रोकडा अनुभव प्रत्यक्ष पोलादपूर मधील हजारो भाविकांना येत असे. त्यामुळे आज त्यांच्या हातून माळ घेतले अनेक वारकरी गावागावातून दिसतात. "गुरु घाली ज्ञानांजन, गुरु सोडावी गाठ लिंगदेहाची" परमार्थातील उच्च ध्येय हे माणसाला स्वबुद्धीने ठरविता येत नाही. त्याला गुरु करावा लागतोच. दादांनी जन्मभर परमार्थ केला आणि करविला. अनेकांच्या पदरी पंढरीच्या वारीचे व्रत टाकले. "नामा म्हणे सुदर्शनावरी , देवे रचिली पंढरी" असे पंढरी माहात्म्य सांगून लोकांना पंढरी सन्मुख केले. गाथा,ज्ञानेश्वरी चे अंतरंग उकळून दाखविले. त्यांची सहजवाणी नास्तिकालाही आत उतरायला लावणारी असे. हे अधिक पणाने दृढ करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन सर्वांच्या सहकार्याने १९७७  साली श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जुनी धर्मशाळा तिळवणकर या भगवद्भक्त ब्राम्हणाकडून विकत घेतली.महाद्वाराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या जुन्या जागेत दादांचा परमार्थ अधिक सात्विकपणे बहरला, त्यांच्या भागवताच्या निरूपणाला अधिक तेज प्राप्त झाले. आज प्रशस्थ आणि सुसज्ज देखण्या स्वरूपात करोडो रुपयाची मालमत्ता असलेल्या या धर्मशाळे चे  बांधकाम पूर्णत्वास येत आहे. अर्थात यामागे दादांच्या सात्विक, प्रेमळ,निस्वार्थी भक्तीसाठी हा देवाचा प्रसाद असावा असे मला वाटतेय.दादांचा पंच्याहत्तरी  निमित्त सत्कार केला. त्यावेळी समाजातले अनेक मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना दादामहाराज भावपूर्णतेने म्हणाले होते. "जीवनात प्राण असेपर्यंत श्री ज्ञानोबा माऊलींनी ही सेवा करून घ्यावी हीच माझी भावना आहे. परमार्थाचा अथक जन्मभर प्रचार, प्रवास, प्रेमप्रबोधन आणि अखंड अभ्यास यामुळे देह थकला होता. त्याला ईश्वरचरणी विलिन  होण्याची ओढ लागली होती. देवही अशा भक्तांची वाट पाहत असतो. शेवटपर्यंत परमार्थ चालू होता. पौष कृष्ण द्वितीय सोमवार, १२.०२.२००९ रोजी हा साधुशील महात्मा महापुरुष ईश्वराच्या चिंतनात देवलोकी परतला. करंजे गावासह संपूर्ण तालुका व मुंबई पासून बडोद्यापर्यंतचा परिसर शोकाकुल झाला. एक कर्मयोगी, एक धर्माज्ञ योगी काळाआड झाला. दादांचे दयालुत्व, उदारत्व आठवून गावागावातील माणसे, अनुयायी अश्रू ढाळू लागली. दादांचे सारे आयुष्य त्यागात आणि लोकांच्या उपयोगी पडण्यात गेले. भक्तीला त्यागाची संगत लागते. तो त्याग त्यांनी जन्मभर आचरला

गुरुवर्य रामदादा नारायण घाडगे - श्रीगुरु नारायणदादा महाराज घाडगे यांचे गुरुवर्य ह भ प रामदादा घाडगे हे ज्येष्ठ चिरंजीव. मोठे दादा वैकुंठवासी झाल्यानंतर ह भ प रामदादांना आकाश फाटल्यासारखे झाले. भावे महाराज वारकरी समाज नावाच्या मोठ्या प्रपंचाची जबाबदारी अंगावर पडली होती. समाजाचा व स्वतःच्या प्रपंचाचा व्यवहार पहावायाचा, नित्याचे वाचन, चिंतन, कीर्तन-प्रवचनाची तयारी करायची. अशी सर्वच जबाबदारी पार पाडणे ही त्यांची इतिकर्तव्यता ठरली. ठिकठिकाणची परमार्थातील ज्येष्ठ मंडळी गुरुवर्य दादांचे सांत्वन करण्यासाठी येत. तेव्हा त्यांना ते सांगत आपण गुरुवर्य नारायणदादांच्या आश्रयाखाली व कृपाशीर्वादाने परमार्थात तयार झाला आहात. पांडुरंग काही कमी पडू देणार नाही. गुरुवर्य रामदादानी सुद्धा नम्र होत त्यांच्या प्रसादाचा स्वीकार केला. 'जगा धाकुटे होइजे, जे जवळीक माझी' या ज्ञानवाणीने त्यांचे अंतःकरण काठोकाठ भरले असल्याने नम्रता न आली तरच नवल ! गेल्या दशकभरात अन्य संतसांगातीचे सानिध्य गुरुवर्य दादामहाराजाना मोलाचे वाटते आहे. सारी पारमार्थीक जबाबदारी आनंदाने सांभाळणे त्यांचे चालू आहे. कसली उदासीनता नाही, औदासिन्य नाही, खेद नाही, भीती-नैराश्य नाही त्यामुळे 'देव सखा जरी विश्व | अवघे कृपा करी' या हा अमृतानुभव त्यांना येतो आहे. काही माणसे अलौकीकत्वाचा वसा घेवून जन्माला येतात. थोरत्व हे अनेक जन्मांच्या तपस्येचे फलित असते. थोर कुळी जन्म घेण्यासाठी भाग्याचा उदयच व्हावा लागतो. कुळात सात्त्विक कन्यापुत्रांचा लाभ होणे या योगासह ईश्वरी तत्वही हर्षित होते. श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे - कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विक | तयाचा हरिख वाटे देवा || ईश्वरीकृपा प्राप्त झालेल्या सदगुरू परंपरेची कृपा प्राप्त झालेले सत्पुरुष गुरुवर्य ह भ प. रामदादामहाराज सध्या या गुरूंगादीची समृद्ध परंपरा गुरुपदावरच्या अधिष्ठान पदावरची वाटचाल सांभाळत आहेत.  संतपरंपरेतील ज्ञानदानाचे, जनजागृतीचे व लोकोध्दाराचे महत्वाचे काम त्यांच्या परीने त्यांच्याकडून होते आहे.  मनुष्य जन्माला येतो तो पूर्वकर्माची शिदोरी घेऊन. गुरुवर्य रामदादा महाराज समाजाला जे ज्ञानदान देत आहेत त्यावरून त्यांचे पूर्वसंचित ज्ञानमय होते. यामुळे या जन्मात शुद्धाचरण, संतपूजन आणि देवदर्शन हा त्यांचा ध्यास ठरला आहे. श्री निळोबारायांनी तर सदाचार संपन्नतेलाच संतपूजन म्हटले आहे. मोठ्या दादांच्या  निर्वाणानंतर तुळशीची माळ आणि नामस्मरणाचा मंत्र घ्यावा यासाठी रामदादांकडे अनुयायांची रीघ लागलेली असते.  'मनुष्यजात सकळ | स्वभावता भजनशील ||' त्यामुळे डोंगर कोळी, माळी, धनगर, समुद्र किनाऱ्यावरचे कोळी, कुणबी, लोहार, सुतार, कातकरी, चर्मकार अशा अठरा पगड जाती धर्मियांनी दादांचे शिष्यत्व पत्करले आहे. तुळशीची माळ आणि पुष्पहार घातल्यानंतर ते पुढे सांगतात  दररोज सकाळी लवकर उठून घरीच देवाची पूजा करा. ज्ञानेश्वरीच्या क्रमशः ओव्या वाचा. गाथ्यातील अभंग वाचा. जपाची माळ हातात घेऊन नामजपाचा मंत्र पूर्ण म्हणा. तुळशीला पाणी घाला. आषाढी किंवा कार्तिक वारीपैकी कोणतीही एक पंढरपूरची वारी करा, दररोज परमेश्वराचे नाव घ्या आणि गुरुपौर्णिमेला गुरूंचे स्मरण करा. फार फार पुण्याईने सदगुरूंकडून मिळालेले नाम घट्ट धरावे कारण तेच तुमच्या आयुष्याचे पाथेय आहे.' देवदेवतांच्या अनेक मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापना अनेक ठिकाणी दादामहाराजांच्या हस्ते झाल्या आहेत. मुंबईत प्रभादेवीच्या श्रीविठ्ठलाच्या मंदिरात, सैतान चौकीच्या श्रीविठ्ठलाच्या मंदिरात, कोळीवाड्यातील शंभू महादेवाच्या मंदिरात बरीच वर्षे सातत्याने दादांची प्रवचने झाली. कारणपरत्वे व आग्रहाने मुंबई बाहेरही पंढरपूर,आळंदी, कोकण, बडोदे अशा वेगवेगळ्या ठिकाणी शक्य होऊन पोहोचता येईल तिथे जावून त्यांनी समाजाच्या परंपरेची प्रवचने आणि कीर्तन सेवा सुरु ठेवली आहे. तुम्हांसी त्याची काय चिंता असे | भक्ती चालविता देव असे || देवाच्या इच्छेनेच भक्ती चालू राहाणार आहे ही देवावरील श्रद्धा, निष्ठा व्यक्त केली की, माणसाच्या जीवाचे सोने होते. श्रीगुरु अर्जुनमामांच्या निर्वाणानंतर आपल्या शिष्यांना उपदेश करतांना मामांचेच वाक्य प्रमाण मानून त्यांच्याच वचनांचा उल्लेख करून त्या आधारेच रामदादा  परमार्थ करीत आहेत. पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची चरण धुळी लागो मज ।। अशी त्यांची श्रद्धाशीलता आहे. विठ्ठलावांचुनी ब्रम्ह जे बोलती । वचन ते सती मानू  नये । अशा आवडीने त्यांची ही सेवा श्री पांडुरंगाच्या चरणी रुजू होते आहे.

सदगुरू वै ह.भ.प.ज्ञानेश्वर तथा मोरे माऊली

प्रयत्नांचे सामर्थ्य, विचारांचे मोठेपण व ईश्वरी नामाचे महात्म्य ही जीवनाच्या विकासाची अंगे आहेत हे सदगुरू वै ह.भ.प.ज्ञानेश्वर तथा मोरे माऊली यांनी आपल्या अल्प आयुष्यात पटवून दिले.  दिले. हाच विचार घेऊन एखादा सामान्य माणूस असामान्य भक्तीमुळे अलौकिक यश मिळवतो याचें प्रत्यंतर म्हणजे वैकुंठवासी सद्गुरु ज्ञानेश्वर मोरे माऊली होत. कोकणची माऊली म्हणून ज्ञानेश्वर मोरे यांना ओळखले जाते. या माऊलीने जगकल्याणासाठी आपली काया, मन, धन वेचले आणि महाड- पोलादपूरातीलच नव्हे तर अवघ्या कोकणातील दुर्गम भागात रहाणाऱ्या सर्वसामान्य जणांना विठ्ठल नामात रंगवून टाकले. मोरे माऊली क्षत्रिय मराठा समाजात जन्माला येऊन सुद्धा नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम व विठ्ठलांच्या भक्तीत स्वतःला विसरले. विठ्ठलाच्या ध्यासाने आणि गजराने त्यांनी पंढरपुरापासून पुणे-मुंबई ठाणे व अवघा कोकणचा परिसर दुमदुमून टाकला.

माऊलीचा जन्म २१ डिसेंबर १९३१ रोजी डिलाईरोड मुंबई येथील भटाच्या चाळीत एका सामान्य कामगार कुटुंबात झाला. त्यांचे पुर्ण नांव ज्ञानेश्वर मारुती मोरे होय. जिल्हा रायगड, पोलादपूर तालुक्यातील पळचील हे त्यांचे गांव. त्यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण मुंबईत, पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण चुलते श्रीपती बाबा मोरे यांच्याकडे राहून पुणे येथे झाले. वडिलोपार्जित आलेला विठ्ठल भक्तीचा वारसा घराण्याला होताच. त्यातच पुण्याला असताना मामासाहेब दांडेकर यांची कितर्न माऊलींनी तरुण वयातच ऐकली होती. याचा परिपाक म्हणजे शाळेत असतांना विद्यार्थी स्नेहसंमेलनात त्यांनी पहिले किर्तन केले. याचाच अर्थ असा होता की, लहानपणापासूनच त्यांच्या  अध्यात्माकडे ओढा होता. शिवाय ह.भ.प. गंगुकाका शिरवळकर यांचा मोरे घराण्याला आशिर्वाद होताच. वडिलांच्या निधनामुळे लहानपणातच त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली ते मुंबईत आले. त्यांना मुंबईत  पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी मिळाली व ते मुंबईकरच झाले. त्यांचा जीवनप्रवाह सरळ, साधा, आणि एकमार्गी असा होता. देव म्हटला की सर्व सद्गुणांचा समुच्यय, देव म्हणजे सर्व सद्भभावांचे आगर, देव मंगलाचे मंगल असा हा विठ्ठल सर्व जगात, प्राणी मात्रात भरलेला आहे. अशी बालपणापासूनच माऊलींच्या हृदयांत भावना होती ही भावना जपत कुटुंब, संसार व परमार्थाची सांगड घालत आयुष्य वेचायचे व सर्वसामान्य माणसाला आपल्यापरीने सुखी करायचे असे ठरवूनच ते समजात सहभागी झाले व आपल्या अलौकीक वक्तृत्वाने आपल्या सभोवती अगणित माणसे त्यांनी जमवली. 

सन १९५२ मध्ये श्रीपती बाबांच्याबरोबर माऊली आंळदीला गेले. भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन ते अजानवृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता त्यांच्या डोक्यावर एक कोवळे पान पडले. त्यांना थोडे आश्चर्य वाटले. त्यांनी कुतुहालाने या पानाबाबत आपले चुलते श्रीपती बाबांना विचारले त्यांनी सांगितले की, ज्ञानेश्वरा हा माऊलींचा प्रसाद आहे व तू माळ धारण करावी अरी त्यांची इच्छा आहे. ते क्षणभर भारावले व त्यांनी ह.भ.प रावसाहेब शिरवळकर यांच्या हस्ते माळ घेतली. गुरुच्या आशिर्वादाने त्यांचे आयुष्य उजळून निघाले.  सन १९६४ मध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पुण्य पावन भूमीत आळंदीत माऊलींनी अजान वृक्षाखाली बसून दोन महिन्यांत २१ पारायणे केली, त्याचेवळी इंद्रायणीकाठी धुंडा महाराजांची किर्तन ऐकण्याचे भाग्य लाभले. त्यांचाच परिपाक म्हणजे त्यांनी सोडलेल्या १८ सामुदायिक पारायणंचा संकल्प होय, संकल्प मनी स्फुरला व १५ एप्रिल १९६५ साली पालवेन (रत्नागिरी) गावात शुभारंभ करून त्यांची मुहूर्तमेढ रोवली गेली. कोकणातील हे पहिले पारायण. या पारायणाने कोकणातील वारकरी सांप्रदायाला नवी दिशा मिळाली. या एका परायणाने माऊली कोकणवासीयांच्या गळ्यातील ताईत बनले. पुढे कुरवली (खेड), बोरावळे (पोलादपूर), तुर्भे (पोलादपूर) शिवथर (महाड), निगडे (महाड), खोपड (पोलादपूर) इत्यादी ठिकाणी तेरा पारायणे पुर्ण झाली. लाखो भाविकांनी या नाम यज्ञाचा लाभ घेतलाच कळत नकळत ज्ञानेश्वर मोरे माऊली सांपद्रायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

अंगात बंद कोट आणि फेटा बांधुन माऊली किर्तनाकरीता उभे राहिले की, त्यांना पाहून समोरचा श्रोता भारावून जाई. माऊलींचे व्यक्तीमत्व ते आपल्या हृदयात सामावून घेत. किर्तन तासतास ऐकत बसावे असे त्यांला वाटे. भक्ती रसात ओथंबलेल्या वाणीचा शब्द नी शब्द ते आपल्या कानात श्रोता साठवून ठेवत असे. अल्पावधीतच त्यांची 'किर्तने महाराष्ट्रभर होऊ लागली. मोरे माऊलीचे संपूर्ण जीवनचरित्र जर पाहिले तर त्यांचे व्यक्तीमत्व अतिशय सौम्य व मृदु होते. म्हणूनच त्यांना माऊली ही उपाधी लोकांनी दिली. त्यांच्या सहवासात जो जो आला त्यांचे ते माऊली झाले. संत ज्ञानेश्वर माऊली प्रमाणेच त्यांचं हृदय सर्वसामान्य जणांसाठी अथांग मायेने व करुणेने भरलेले असे. महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष असताना पंढरपूर देवस्थान बील आणि यात्राकराचा प्रश्न सोडविण्यासाठी २३ मार्च १९७२ रोजी विधानसभेवर पहिला वारकऱ्यांचा प्रचंड भजनी मोर्चा काढला व प्रचंड मेळावे भरविले. याकामी त्यांनी रामदासबुवा मनसुख, बाळासाहेब भारदे, तात्यासाहेब वासकर यांचे मार्गदर्शन घेतले. हे आंदोलन त्यांनी यशस्वी करुन दाखविले कोकणात अनेक मंदिरे व सामाजिक संस्था उभ्या केल्या. बेबलघर येथील चौदाव्या पारायणाची संपूर्ण जबाबदारी माऊलींवर पडल्याने मुंबईला येताच ते आजारी पडले. औषधोपचाराने काही फरक पडेना. रक्तवाहिनीत दोष आढळला व आपला मृत्यूजवळ आल्याची त्यांना चाहूल लागली. त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना जवळ बोलाविले. भविष्यातील सर्व कामे वाटून दिली व एकसंघ राहून समाजाचा हा वसा चालविण्याची त्यांना आज्ञा केली. ४ जानेवारी १९७३ रोजी ठिक एक वाजून तीस मिनिटांनी वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी या थोर माऊलीने आपली जीवनज्योत परमात्म्याच्या चरणी विलीन केले. आज त्यांच्या अलौकिक कार्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. सध्या माऊलीचे सुपूत्र उच्चविद्याविभूषित गुरुवर्य ह भ प आनंद उर्फ दादामहाराज मोरे हे अधिष्ठानावर विराजमान असून माउलींच्या कार्याची धुरा पुढे चालवीत आहेत. दादामहाराजांचे कीर्तन म्हणजे अभ्यासोनि प्रगटावे असेच असते. त्यांच्या कीर्तनात पूर्णतः भक्तिभाव, गोडवा आणि मार्दव यांचा संगम असतो. त्यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे भव्य स्वरूपात समाजाच्या नावाने धर्मशाळा उभी केली आहे. त्यांनी मुंबईतील लोअर परळ येथे मोरे माऊली स्मारक मंदिराची भव्य वास्तू उभारली असून वर्षभर या स्मारक मंदिरात भजन, किर्तन, प्रवचनाबरोबर शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी १० जानेवारी हा दिवस मोरे माऊली यांची पुण्यतिथी म्हणून केली जाते.

स्वानंद सुखनिवासी तपोनिधी सद्गुरू तपोनिधी गणेशनाथ महाराज

स्वानंद सुखनिवासी तपोनिधी सद्गुरू गणेशनाथ महाराज हे तत्कालीन कुलाबा जिल्यातील पोलादपूर - महाड तालुक्यातील कसदार हरिभक्तिच्या  परंपरेतील अत्यंत गोमटे व रसाळ फळ होय.  गुरूदेव श्री राजारामनाथ महाराज व त्यांची सुशील पत्नी विठाई  हे दांपत्य विरक्त वृत्तीने परमेश्वरचरणी लिन होत संसार करीत होते. परंतु बरेच  दिवस त्यांना पुत्रसंतानाचे सुख नव्हते. ते घोड्यावरून खेडोपाडी जाऊन  लोकांना बीजमंत्राचा उपदेश करून  सन्मार्गाला लावीत असत. समाज अंधश्रध्दा, जूनाट विचारांनी दयनिय स्थितीत जगत असताना समाजप्रबोधनाचे कार्य ते नेटाने चालवीत होते. हे चालू असतानाचा श्रीगणेशाचा प्रसाद म्हणून त्यांना पुत्र रत्न जाहले. त्यांचे नाव 'गणेश' असे ठेवण्यात आले. स्वतः महाराजांचे गुरू (वडील) यांनी सन १९३७-३८ साली श्री क्षेत्र सेंदुर मलई येथे श्री दत्तप्रभुंच्या मूर्तीची स्थापना करून मंदिराची उभारणी केली आहे. व त्याठिकाणी बाबांच्या तिसऱ्या पिढीतील मूळपुरूष व धर्मभुषण श्री रघुनाथ महाराज यांनी एक विहिर बांधली आहे. त्यावर शिलालेखही  सापडतो.  दर्यानाथ महाराज, श्री सागरनाथ महाराज, श्री रघुनाथ महाराज, श्री भगवाननाथ महाराज, श्री राजारामनाथ महाराज अशा समृध्द गुरूपरंपरेचा त्यांना वारसा लाभला. वडिलांच्या सोबत वावरताना गणेशनाथांच्या मनात भक्ति संप्रदाय दृढ होऊ लागला. आणि १९३८ साली राजाराम महाराजांनी श्रीदत्तचरणी देह ठेवल्यानंतर तरूण वयात या संप्रदायाची संपूर्ण धुरा वाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्याकाळात दत्त जयंतीला येणाऱ्या दिंड्या शिस्तबध्द नव्हत्या, बाबांनी प्रथम दिंडीला हरिनामाच्या तालावर पावले टाकायला व भक्तिभावाने भजन, प्रवचन किर्तन करावयास लावून मांगल्य निर्माण केले. राजारामनाथ महाराजांनी देह ठेवण्यापूर्वी मंदिराचे नैमित्तिक कार्यक्रम पध्दतशीर चालावेत याकरिता श्रीदत्त मंदिर कमिटी नेमली होती. राजारामनाथ महाराज यांचे पोलादपूर तालुक्यातील आडावळे गावी कोंडीबा कंरजेबुवा हे शिष्य होते. ते वर्षातून ठराविक वेळी त्यांच्याकडे जात असत. त्या करंजेबुवांचे चिरंजीव तुकाराम करंजे हे गणेशनाथ महाराजांचे अगदी जवळचे शिष्य. साखर गावाने चोरगेवाडी येथील एक शेत त्याकाळात बाबांना अर्पण केले होते. साखर गावापासून कामथे खोऱ्यात गणेशनाथांचा संप्रदाय फार मोठा. गणेशनाथ बाबांची किर्तनसेवा पहिल्यांदाच श्रीक्षेत्र भिवघर येथे 'आलिया संसारा । उठा वेगी करा ||' या अभंगावर केली. यानंतर पुढे आपल्या वागण्यातील सभ्यता, शिष्टाचार व मनाची सहनशिलता यामुळे ते सर्वांना आपलेसे करीत गेले. नामाचे महात्म्य पटवून देत समाजाला सन्मार्गाला लावण्याचे काम करीत गेले. मुंबईतील लालबाग येथे अध्यात्मिक केंद्र उभारून धार्मिक कार्यक्रम सुरू झाले.  ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी तिर्थक्षेत्री १९७३ साली सर्व शिष्य साधकांकडून धनदान,श्रमदान स्विकारून आश्रमासाठी जागा विकत घेतली. आणि पवित्र मठ उभारला. सद्गुरू तपोनिधी गणेशनाथ महाराजांच्या प्रासादिक वाणीतून १९४३ ते १९८४ पर्यंत ज्ञानेश्वरीच्या ओव्या तसेच संत तुकाराम महाराजांसह सर्व संतांचे अभंग निरूपण करीत. परमार्थिक विषयांशी समरस  होऊन ज्यावेळी ती वाकगंगा प्रवाहित होत असे. तेव्हा सारे श्रोते मंत्रमुग्ध होत असत. गणेशनाथ महाराजांनी आपल्या भाविक भक्त मुमुक्षु साधकांसाठी आपले मौलिक विचारधन १) सार्थ हरिपाठ, २) परमार्थ विचार साधना ३) परमार्थ मार्ग दिपिका ४) श्री ज्ञानेश्वरी (मराठी व गुजराती भाषेत) ५) परमार्थ साधना विचार इत्यादी ग्रंथ पुस्तके प्रकाशित केली. मुंबई - लालबाग येथे मठात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना सप्टे. १९८४ च्या सुरूवातीला एकाऐकी त्याच्या छातीत दुखु लागले. बेचैन वाटू लागले.  तज्ज्ञ डॉक्टर शारीरीक तपासणी करून उत्तम उपचार करीत होते. परंतु बाबांनी डॉक्टरांना सांगितले की, मला उद्या सकाळी आळंदीला जायचे आहे. तुमचे उपचार लवकर उरकून घ्या. अखेर दि. २१/९/१९८४ भाद्रपद वैद्य शके १९०६ इंदिरा एकादशी या शुभदिवशी  बाबा माउलींच्या चरणी लीन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांचे पार्थिव श्रीक्षेत्र आळंदी येथे नेण्यात आले. गणेशनाथ बाबा हे वारकरी सांप्रदायाचे पिठाधिश्वर असल्याने धर्मशास्त्रानुसार त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. अरविंदनाथ महाराज यांना उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. महाराजांच्या गळ्यातील एक माळ काढून त्यांच्या गळ्यात घालण्यात आली. गेली ४० वर्षे स्वानंद सुखनिवासी तपोनिधी अरविंदनाथ महाराज निष्ठेने भक्तजनांसमोर भजन, पूजन, प्रवचन करीत आहेत. अभ्यासपूर्ण विवेचन करीत सर्वांची मने हेलावून टाकणारे त्यांचे प्रवचन ऐकताना ते सिद्ध अधिकारी आहेत हे आपणाला जाणवत असते. सध्या पोलादपूर - महाड तालुक्यातील अनेक गावातील साधक त्यांच्या कृपाछत्राखाली परमेश्वराचे नामचिंतन सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौलनामानुसार महाड येथे रामनगर पेठे जवळ, वरंध घाटात मध्यावर माझेरी पारमाची उंबर्डे, सुनेभाऊ कुंभारकोंड परिसरात अरविंदनाथांनी दासबोधात उल्लेखिलेली शिवथरघळ अभ्यासांती शोधून काढली आहे. श्री गणेशनाथ महाराज संस्थान ट्रस्ट स्थापन करून शेंदूरमलई, आणि संप्रदायाच्या मालकीच्या श्रीक्षेत्र आळंदी आणि श्रीक्षेत्र पंढरपूर येथे परंपरेचे आणि काही नवीन धार्मिक कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यांच्या वतीने पार पडले जातात. गुरुवर्य अरविंदनाथांच्या नेतृत्वाखाली दोन्ही तालुक्यात अनेक पारायणे पार पडली आहेत. कार्तिकी आळंदी ते पंढरपूर वारी, आणि दिंडी क्रमांक १८३ असलेली आषाढी पायी वारी परंपरेने सुरु आहे. रायगडद जिल्ह्यासह महाड, पोलादपूर, आळंदी, पंढरपूर, बडोदे येथे फार मोठ्या प्रमाणावर शिष्यवर्ग परमार्थ करीत आहे.. 

वै.सदगुरू ह.भ.प. रामचंद्र आनंदा तथा ढवळेबाबा

वै. ह.भ.प. रामचंद्र आनंदा तथा ढवळेबाबा हे वै. श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फडाचे कोकणातील अर्ध्वर्यू. फडप्रमुख वै.ह.भ.प. विठ्ठल वामन भुरे ऊर्फ काकासाहेब यांचे ते अनुग्रहीत होते. आज ते हयात नाहीत परंतु कोकण विभागाचे मार्गदर्शक म्हणून अत्यंत कष्ट करुन महाड-पोलादपूर या दोन्ही तालुक्यात त्यांनी २५ ते ३० गावात फिरून त्यांनी २ ते ३ हजार वारकरी केले. गेल्या शतकात जन्मलेल्या तालुक्यातल्या बऱ्याचजणांना त्यांची योग्यता माहिती झाली होती. निरागसता, निर्व्याजता, कोमलता आणि रम्यता यांच्या विशाल जलाशयात निःसंकोचपणे अवगहान करीत असल्याचा अनुपमेय आनंद सर्वांच्यासारखा मलासुद्धा अनुभवायला मिळाला. त्यांच्या सहवासाने चित्तशुद्धी व शांती यांनी मनुष्याचे जीवनमूल्य उंचावते व विशालतर क्षेत्रात पदार्पण करीत करीत मनुष्य प्रगत होत असतो. अगदी हाच आनंद बाबांच्या सहवासात येणाऱ्याला लाभत असे. आणि हो तो लुटताना कुणालाही आर्जव करावे लागले नाही.  संकोचून, लाजून, अंग आखडून विनम्रतेचा लाचार चेहरा करून त्यांच्याजवळ बसावे लागत नसे. त्यांनी आपल्याशी बोलायला सुरुवात केली की, एकदोन मिनिटातच आपण आपल्या दीर्घ परिचित व्यक्तीशी बोलत असल्यासारखा मोकळेपणा, विश्वास व आनंद वाटत असे. त्यांच्या  बोलण्यात इतका स्पष्टपणा, सरळपणा व प्रामाणिकपणा होता की ऐकणारा अगदी मुग्ध होऊन ऐकत असे. आणि  बोलण्याच्या ओघात त्यांनाही कशाचेच भान न राहता विषयाच्या गांभीर्याप्रमाणे  संथ लयीत ते सतत बोलतच राहत असत. पंढरपूरच्या ८० च्या वर वाऱ्या त्यापैकी ५० पायी वाऱ्या त्यांनी केल्या होत्या. पोलादपूर तालुक्यातील वारकरी सांप्रदायांचे अध्वर्यू म्हणून परिचित असणारे बाबा वयाच्या ११८ व्या वर्षी मार्गशिर्ष व १ शके १९२८ रोजी वैकुंठवासी झाले. श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फडाची आज नववी पिढी चालू आहे. सध्या कोकण विभागात गुरुवर्य ह भ. प गणपत तथा दादामहाराज महाराज मोराणकर हे अधिष्ठानावर विराजमान आहे. गेली ५० वर्षे ते कीर्तन-प्रवचन याच्या माध्यमातून फडाच्या विस्ताराचे आणि गोरगरिबांना भक्तिमार्गावर नेण्याचे काम करीत आहेत. वै गुरुवर्य ढवळेबाबा वारकरी संप्रदाय कोकण विभाग स्थापन करून महाड-पोलादपूर तालुक्यात हे पारमार्थिक कार्य जोमाने करीत आहेत. पायाळाचे गुण पडते ठाऊके। जगा पुंडलीका दाखविले ।।१८३२ साली बाबासाहेब आजरेकर यांनी या फडाची स्थापना केली. बाबासाहेब हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावचे. तुकोबांच्या विचारांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. भामचंद्र डोंगरावर जाऊन तुकोबांच्या अभंगाचे चिंतन करून वारकरी परंपरेला नवा आयाम देण्याचे काम त्यांनी केले. वारकरी संप्रदायाची दर्शन (तत्वज्ञान) म्हणून विशेषतः तुकोबांच्या अंगाने सर्वप्रथम मांडणी त्यांनी केली. बाबासाहेबांची हि मांडणी अधिक व्यापक स्वरूपाची आणि वारकरी संप्रदायाला समृद्ध करणारी ठरली. बाबासाहेब आजरेकर मूळचे वासकर  फडाचे कीर्तनकार. फडासोबत त्यांचे पारमार्थिक मतभेद झाले. भक्तीला गौणत्व देऊन ज्ञानाची मातब्बरी इथे वाढते आहे असे लक्षात येताच त्यांनी वासकर फडापासून फुटून स्वतंत्र फड काढला. पुढे मराठवाड्यासह उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात हा फड अधिक विस्ताराला गेला. या फडावर कोकण,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकातील बेळगाव,धारवाड,विजापूर,चिकोडी,बागलकोट, गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, बडोदा,अहमदाबाद,होस्पेट,येथील वारकरी भाविक आहेत. या फडावर सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश खुला आहे. गोव्यातील ४-५ ख्रिस्ती व सांगली जिल्ह्यातील ३० जैन वारकरी या फडावर आहेत.  या फडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फड लोकशाही मानणारा. या फडावर मूर्तिपूजा होत नाही. मूर्तीऐवजी गाथेची पूजा होते. अक्षरांची पूजा करणारा आणि ज्ञानाला महत्व देणारा हा फड आहे. आजरेकर फडाचे महत्वाचे वैशिट्य म्हणजे महाराष्ट्राच्या प्रबोधन पर्वाची सुरुवात करणारे न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी देशमुख हे या फडाचे सदस्य होते. प्रार्थना समाजाच्या स्थापनेची प्रेरणा न्या रानडे यांनी आजरेकर फडाकडून घेतली. परंपरेशी असलेलं  नाते न तोडता आपली नवी पद्धती रूढ करण्याची भूमिका प्रार्थना समाजाने घेतली.  आळंदीतून ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा हैबत बाबानी सुरु केला. हा पालखी सोहळा सुरु करण्यात बाबासाहेब आजरेकरांची भूमिका महत्वाची राहिली. या सोहळ्यात फडाची पायी दिंडी सातव्या क्रमांकावर चालते. प्रस्थानांतर आजोळघरी पहिला नामजगार करण्याचा मान या फडकडे आहे. संपूर्ण दिंडी सोहळ्यातील संध्याकाळी खिरापतीला मानही याच फडाकडे आहे. फलटण आणि भंडीशेगाव मुक्कामी फड मालकाला कीर्तनाचा मान असतो. देहूला तुकाराम बीजेला कीर्तन करण्याचा मान फड मालकांना आहे. याबरोबरच विठ्ठल मंदिराच्या दक्षिण दरवाजावरील नित्य पंचारतीच्या भजनाची सेवा या फडाची असते. आजरेकर फडाची परंपरा फार मोठी. वारकरी विचारांचा वारसा अविकृत स्वरूपात आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या फडाने केली.  माऊली बाबासाहेब आजरेकर यांनी घालून दिलेल्या या परंपरेला अधिक व्यापक करण्याची  शक्य होईल तशी खेड्यापाड्यात पोहोचवण्याची जबाबदारीआता मोराणकर यांच्यासारख्या माहात्म्यांवर आणि  फडातील अनुयायांची आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे या फडाचे महत्व असे सांगतात.- सर्वच फडकरी आपल्या परीने संप्रदायाचे काम करीत आहेत. परंतु तत्वज्ञान आणि आचार या दोन्ही अंगाचा विचार केला तर आजरेकर फड हा वारकरी संप्रदायाचे मूळ स्वरूप जास्तीत जास्त अविकृत आणि शुद्ध स्वरूपात जपणारा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचे पारंपरिक विवेचन व गायन हे या फडाचे वैशिट्य आहे. 

धर्मभूषण सदगुरू ह.भ.प. लक्ष्मण महाराज मालुसरे

महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी ।। अशा भगवत वृत्तीचे लोक ठायी ठायी विखुरले आहेत. काही माणसे जबरदस्त पूर्वपुण्याईचे गाठोडे पाठीवर घेऊनच जन्माला येतात.. अठरा विश्वे दारिद्र्य पदरी असले तरी आई वडिलांच्या संस्कारीत जीवनात लहानाचे मोठे होतात. सज्ञान झाल्यानंतर या जन्मी कर्तव्य कर्म करुन कर्तृत्वासह पुरुषार्थ सिद्ध करतात.' प्रारब्धेची वाढे ज्ञान। प्रारब्धेची वाढे मान।।' हा पूर्व पुण्याईचा ठेवा ज्यांना लाभला आहे ते धर्मभूषण गुरुवर्य ह.भ.प. लक्ष्मणबाबा मालुसरे हे पोलादपूर तालुक्यातील साखर गावचे सुपुत्र.

ऐतिहासिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि पारमार्थिक वारसा लाभलेल्या मालुसरे कुळात स्व. गणपत मालुसरे व स्व. गंगुबाई गणपत मालुसरे यांच्यापोटी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण इयत्ता ४ थी पर्यंत साखर येथे उर्वरीत शिक्षण पोलादपूर येथे तर अकरावीपर्यंतचे शिक्षण मुंबईतील आगरकर नाईट हायस्कूल व सरस्वती विद्यामंदिर येथे झाले. लहानपणापासून चौकस आणि हरहुन्नरी असलेल्या लक्ष्मण महाराजांना तरुणपणातच रंगभूमीवर नाट्य अभिनय करण्याची ओढ लागली. आवड  असल्यामुळे साहजिकच १९७४ साली त्यांना रंगभूमीवर प्रवेश मिळाला. 'गाईल गाथा सहृयकडा' हे पहिले नाटक रंगमंचावर आल्यानंतर जीवन झाले माझे खडकाळ, मी बायको पाहून आलो, उभी राहिले मृत्यूच्या दारी, सांगते ऐका जीवनात सुख मिळते इत्यादी कौंटुंबिक आशयाची त्यांच्या अभिनयाला वाव, दाद देणारी, किंबहूना स्मरणात राहणारी नाटके मुंबईतील रंगमंचावर यशस्वी झाली. वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव घेण्याची ओढ असलेले त्यांचे मन हे क्षेत्र आपले नाही हे सांगू लागल्याबरोबर त्यापासून दूर होऊन नेव्हीमध्ये नोकरी पत्करली आणि अमेरिकेचा दौरा करुन आले.  हिंदुस्थानात दुष्काळ पडला होता, व  जहाजातून गहू आणण्याचे काम त्यांनी केले होते. पुढे ही नोकरी सोडल्यानंतर पोलादपूर तालुक्यातील - दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर रोजगार - हमी योजनेची कामे चालू होती. तिथे सुपरवायझरचे काम मिळाले यातही लक्ष लागेना पुन्हा मुंबईत आले आणि पहिल्यादांच नवीन १० वीचा पुन्हा मुंबईत आले आणि पहिल्यादांच नवीन १० वीचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे हे लक्षात घेऊन 'एल जी क्लासेस' सुरु केला आणि नावारुपाला आले गावातल्या पारमार्थिक वातावरणाचा प्रभाव असल्यामुळे पंढरपूर तिर्थक्षेत्री जाऊन वारकरी होण्याची ओढ लागली. जीव कितीही मोठा असला तरी तो सद्गुरुकपेशिवाय पूर्ण होत नाही. मोक्षाचा सोडी बांधी की करी । असे सामर्थ्य या विचारात आहे. याच विचाराने त्यांनी   पोलादपूर तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यू गुरुवर्य ह.भ.प. नारायणदादा  घाडगे यांच्या हस्ते गुरु मंत्र आणि तुळशीमाळ ग्रहण केली आणि त्यांचे शिष्यत्व पत्करले. प्रपंचासाठी जीवन झिजत असतेच मात्र ते भागवत सेवेसाठी झिजावे आणि विशेषतः आपण जो परमार्थ करतो तो सगळ्यांनी करावा यासाठी किर्तन-प्रवचनाद्वारे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी संतवाङमयाचा अभ्यास करण्याचे ठरविले. अभ्यासाची सवय असल्याने काही साधने नसताना हाताशी जी होती त्याचा अभ्यास सुरु झाला. तिर्थरूप स्व. ह.भ.प. विठोबा अण्णा सु. मालुसरे आणि गुरुवर्य ह.भ.प. नारायणदादा घाडगे यांच्या ज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव होताच. अभ्यासाची सवय असल्याने काही साधने नसताना हाताशी जी होती त्याचा अभ्यास सुरु झाला. 'श्रद्धावान लाभते ज्ञानम् । गीतेत म्हटल्याप्रमाणे श्रद्धावंताना आत्मज्ञानापर्यंत जाता येते. आणि आज त्याची प्रचिती सर्वाना येते आहे. गेली ३ तपे पोलादपूर - महाड तालुक्यातील प्रत्येक गावात इतर प्रसंगी किंवा हरिनाम सप्ताहानिमित्त त्यांच्या किर्तन - प्रवचनाचे कार्यक्रम चालू आहेत. उच्च कोटीच्या अध्यात्माबरोबर लोकरंजन करण्याची हातोटी असल्याने अलीकडे तर त्यांच्या कार्यक्रमात वाढ झाली आहे. वयाची सत्तरी उलटली असतानाही प्रवासाचा शीन न मानता, मानापानाची पर्वा न करता जनजागरणाचे कार्य निर्मळ मनाने ते करीत असतात. यापेक्षाही अत्यंत महत्त्वाचे कार्य त्यांच्या हातून घडले आहे व पुढे साकार होणार आहे ते म्हणजे ज्ञानोबारायांच्या आळंदी तिर्थक्षेत्री उभी राहणारी धर्मशाळा. 'तीर्थ तया ठाय । येती पुनीत व्हावया ।।' असे तीर्थाचेही तीर्थपण आळंदीला लाभले आहे. पोलादपूर ते आळंदी अशी हजारो भाविक भक्तगणांची पायी वारी त्यांच्या अधिष्ठान आणि नेतृत्वाखाली गेली ३४ वर्षे अविरत महाड भोरमार्गे सुरु आहे. अलीकडच्या काही वर्षांत शिवसेना तालुका प्रमुख ह भ प अनिलदादा मालुसरे हे पायी वारीचे योग्य पध्दतीने नियोजन करीत असतात. अवघ्या महाराष्ट्राचे लोकदैवत श्रीपांडुरंग आणि गुरुवर्य नारायण दादा हे त्यांचे परमदैवत. संतसेवा, गुणीजन व वारकऱ्यांबद्दल आदर, संतवाङमयावर असलेले अतूट प्रेम, निर्लोभ आणि निरागस वागणे, व कोण्याही जीवना न घडो मत्सर असा व्यवहार. प्रवचन-किर्तनात रसाळता, हळूवारता आणि सेवेसाठी घेतलेल्या विषयाची सोडवणूक हे त्यांच्या अंगी भिनले आहे. पोलादपूर तालुक्यातीलच नव्हे तर महाड तालुक्यातील दंडनगरी, पंदेरी, म्हाप्रळ, चिंभावे, कोंडोरी, पालगड, मुंबई, ठाणे शहरात त्यांचे परमार्थिक कार्यक्रम हजारोंच्या संख्येने होत आहेत. शेकडो शिष्यगणांचा शिस्तबद्ध परिवार लाभलेले धर्मभूषण लक्ष्मणबाबा मालुसरे यांनी मालुसरे कुळाचेच नव्हे तर वारकऱ्यांचा तालुका म्हणून परिचित असलेल्या पोलादपूर तालुक्याचाही नावलौकिक वाढविला आहे.

ज्ञानपंढरीचा वारकरी वै. संतचरणरज 
श्रीगुरु ह. भ. प.  हरिश्चन्द्र महाराज मोरे   

सद्गुरू वै. हनुमंतबाबा हे अध्यात्मिक ऐश्वर्य संपन्न महापुरुष. त्यांनीच पोलादपूर, खेड तालुक्यात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ  रोवली. कौटुंबीक जबाबदारी पूर्ण व्हावी म्हणून ते डिलाईल रोडच्या पुलाजवळ गुळवाला चाळीत राहायचे आणि मिलमध्ये नोकरी करायचे. सद्गुरू हनुमंतबाबा म्हणजे निष्ठावान वारकरी होते तसेच गावागावातील समाजात परमार्थात वाढ व्हावी यासाठी पुढाकार घेणारे, त्यासाठी सातत्याने जनसंपर्क वाढविण्यासाठी प्रयत्नात राहणारे वारकरी होते. साहजिकच महाड-पोलादपूर तालुक्यातील अनेक समाजधुरीण त्यांच्या घरी येत असत. महाराजांच्या समोरच परमार्थाची चर्चा, नवनव्या कार्यक्रमांची आखणी होत असे. जणू ते पोलादपूर तालुक्यातील लोकांच्या पारमार्थिक जीवनाचे निस्वार्थ सेवाभाव जपणारे पथदर्शक होते. त्यांनी स्वतःचे अधिष्ठान तयार करून साधा सोपा परमार्थ कीर्तनरूपाने मुंबईत अनेक ठिकाणी सांगितला. कॉटनग्रीनच्या श्रीराममंदिरात प्रत्येक रविवारी ते कीर्तन ऐकण्यासाठी जात असत. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील जगद्गुरू संत तुकाराम  महाराजांच्या मंदिरात कार्तिकी वारीला देहूकर फडाच्या वतीने नियमित कीर्तन, बकरीअड्डा, कुलाबा, प्रभादेवी येथील श्री विठ्ठल मंदिर, करीरोड पुलाखाली पिंपळेश्वर मंदिरात शे-दीडशे भाविक श्रोत्यांसमोर अशी त्यांची कीर्तने होत असत. जन्मापासून आयुष्याच्या अंतापर्यंत “लावूनी मृदुंग श्रुतीटाळघोष | सेवू ब्रम्हरस आवडीने ||” हे संत तुकाराम महाराजांचे वचन ज्यांनी सार्थ केले असे त्यांचे चिरंजीव पोलादपूरचे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संतचरणरज श्रीगुरु ह. भ. प. हरिश्चन्द्र महाराज मोरे यांचे नुकतेच वैशाख शु. दशमी, शनिवार, दिनांक १८ मे २०२४ रोजी देहावसान झाले आहे. दशमी, एकादशी, द्वादशी हा वारकऱ्याचा पर्वकाळ. संतचरणरज श्रीगुरु बाबांनी हा पर्वकाळ साधला आणि वारकरी संप्रदायला अपेक्षित आपल्या मरणाचा सोहळा करून घेतला.

पोलादपूर तालुक्यातील दाभीळ या डोंगराच्या कड्याकपारीत, प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक गावात त्यांचा जन्म झाला. तसे पाहिले तर गरिबीची परिस्थिती परंतु आपल्या मुलाने चांगले शालेय शिक्षण घ्यावे त्याने त्याच्यावर चांगले संस्कार होतील परंतु जगाचे यथार्थ ज्ञान व्हावे आणी आध्यत्मिक संपन्नता साधता यावी यासाठी त्यांनी त्यांच्या शालेय शिक्षणासोबत अध्यमिक ज्ञानांर्जनाकडे विशेष लक्ष दिले त्यामुळे श्रीगुरु हनुवतीबाबांनी त्यावेळी जुनी दहावी पर्यंत शालेय शिक्षण दिले. आणि त्याचा योग्य तो परिणाम झाला. हरिशचंद्र महाराज अध्यात्म पथावर मार्गक्रमण करीत होते. धर्मजागरण, संतमत जागरण असे दर्शन आंतर्बाह्य जगात घेत ते त्यावेळच्या पिढीबरोबर वाढत होते. वडीलधाऱ्या मंडळींची घरातली नित्याची भजने, कामगार विभागात होणारी चक्रीभजने, ज्ञानेश्वरी, भागवत, भगवतगीता,कीर्तन, प्रवचन रूपातली उपासना, वाडवडिलांनी डोळसपणे केलेला संतवाङ् मयाचा अभ्यास व त्याच्या प्रसारासाठी केलेले हिमालयासारखे उत्तुंग कार्य, या सगळ्याच गोष्टींचा बालपणापासूनच महाराजांच्या मनावर ठसा उठला होता, त्यांनी श्रीक्षेत्र अलंकापुरी (आळंदी) गाठली. तिथे त्यांच्या पूर्वपुण्याईने परमपूज्य सदानंद गुरुजींचा सहवास लाभला मुळातली विद्याभ्यासाची अभिरूची, त्यात संतश्रेष्ठ ज्ञानराजांच्या पुण्यपावन धर्मक्षेत्री अभ्यासाचा योग, उत्तमोत्तम मार्गदर्शक व घरचाच वडिलांचा विद्या व्यासंगाचा आदर्श, अंत:करणावरचे धार्मिक, सांप्रदायिक संस्कार  यामुळे श्रीगुरु हरिश्चन्द्र महाराजांचे धार्मिक शिक्षण कसदार झाले. त्यांच्या निरूपणाची भाषा रसाळतेने सुंदर व आशय घनतेने प्रगल्भ झालेली जाणवत होती. आळंदीवरून विद्याभ्यास घेऊन आल्यानंतर श्रीक्षेत्र आळंदी व श्रीक्षेत्र पंढरपूरची वारी,पारायणे, प्रवचन, कीर्तन असे चतुरंग पद्धतीने त्यांनी संप्रदायाचे सेवाकार्य मोठ्या जोमाने परंतु भक्तिभावाने सुरु केले. श्री गुरू वैराग्यसंप्पन्न गंगूकाका शिरवळकर फडाच्या अधिपत्याखाली सद्गुरू ह.भ.प.वै. हनुमंतबाबांच्या कृपाशीर्वादाने रचलेल्या भक्कम पायावर "सद्गुरू ह.भ.प.वै. हनुमंतबाबा मोरे वारकरी समाजाच्या" या इमारतीला त्यांनी आकाशाची उंची दिली, असे त्यांचे आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात अनमोल कार्य आहे. वडिलांच्या पश्चात पोलादपूर, महाड, खेड,मुंबई, ठाणे, बडोदे या ठिकाणी त्यांच्या मनोगतानुसार हरिनाम सप्ताहांचे व श्रीमद ज्ञानेश्वरी पारायणांचे आयोजन त्यांनी केले. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर बोरजफ़ाटा येथे सावित्री, ढवळी, कामथी या तीन नद्यांच्या संगमावर संत हनुमंतबाबा वारकरी शिक्षण संस्था या नावाने धर्मशाळा उभारण्याचा संकल्प सोडला आणि न भूतो न भविष्यती अशी आश्रमाच्या रूपात संस्था वेळेपूर्वीच उभी राहिली त्यानंतर या आश्रमातूनच महाराज समाजाच्या विस्तारासाठी आणि परमार्थ वाढीसाठी अहोरात्र झटू लागले. त्यांचे  सुपुत्र ह भ प रघुनाथदादा ते हयात असल्यापासून त्यांच्या सोबत परमार्थाची धुरा वाहू लागले होते. रघुनाथदादांच्या विचारामुळे समाजाला एक शिस्त आली, त्यामुळे आबालवृद्धांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अधिक संख्येने लोक परमार्थाला वाहून घेऊ लागले. अनेक ठिकाणच्या नामसप्ताहात तेथील लोकांच्या आग्रहानुसार कीर्तनादी कार्यक्रमासाठी महाराजांचे जाणे अनेक गावात होई. साहजिकच सांप्रदायिक परंपरा पुढे चालविण्यासाठी रघुनाथ महाराजांच्यावर जबाबदारी येऊन पडली.. 'सकळ तीर्थाचिये धुरे । जिये का मातापितरे । तया सेवेसी कीर शरीरे । राहून लोण कीजे।।'  अनेक  गावागावांमधील ज्ञानेश्वरी प्रवचनाची व कीर्तनाची सेवा चालवूनही पुढे त्यांनी पित्राराधन करावे ही अपेक्षा शिष्यगणांची आहे.

भजनानंदी भजनसम्राट ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज

 अभंग गायनाची खासियत अशी, की तो देवाच्या द्वारी उभा   राहून गायला, तर त्यात रंग भरतोच, परंतु जिथे असू तिथे तल्लीन होऊन अभंग गायला, तर आपल्या सभोवतालचा परिसर गाभाऱ्यासारखा पवित्र होतो. समाधीस्थ अवस्था तयार होते आणि त्या आनंदात टाळ, चिपळ्या, मृदंगही नाचू लागतात. सगळे विठ्ठलमय होतात. तिथे रंक-राव असा भेदभाव उरतच नाही. कारण तो दरबार ईश्वराचा असतो. त्याचा कृपाप्रसाद सर्वांना सारखा मिळतो. सर्व विषयांशी संग सुटतो आणि केवळ विठुनामाचा संग जडतो. त्याचप्रमाणे विविध गुणांनी, विविध अभिव्यक्तीनी आणि वैविध्यपूर्ण स्वभावांनी बनलेली अनेकविध माणसं समाजात वावरत असतात. सारीच माणसं जिवंत असतात. पण ज्या माणसांत चैतन्य असते, कर्तृत्वाची स्फुल्लिंगं प्रज्वलित झालेली असतात, जीवनाचा अन्वयार्थ ज्यांना ज्ञात झालेला असतो अशीच माणसं जिवंत वाटतात आणि समाजातल्या अशा विखुरलेल्या चैतन्यमयी माणसांमुळे समाजपुरुष जिवंत साहे असे वाटते. अशी कर्तृत्ववान माणसं समाजाची भूषण असतात. इतकेच नव्हे तर अशी माणसं समाजाची कवचकुंडल असतात. असंच एक कवचकुंडल पोलादपूर तालुक्यातील लहुळसे गावात ८४ वर्षांपूर्वी एका अज्ञानी, दरिद्री, विपन्नावस्थेत वावरणाऱ्या कुटुंबात जन्माला आले, जे पुढे संपूर्ण महाराष्ट्रात 'भजनानंदी हरिभाऊ रिंगे महाराज' म्हणून समाजाला ललामभूत ठरले. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले जातात. त्यात पहिले तीन भौतिक उद्देश आहेत.. चौथा ज्ञानी. त्याला एका कामासाठी देवाने मर्त्यलोकी पाठविलेला असतो. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' असे जगायचे कल्याण चिंतने आणि त्यासाठी देह कष्टविणे हे संतांच्या कर्तव्यापैकी एक आहे. हरिभाऊंनी आयुष्यभर आवडीच्या क्षेत्रात केलेले भव्यदिव्य काम पाहता ते एक व्यक्ती आहे असे मी मानत नाही, त्यांचं जीवन आता पारमार्थिक क्षेत्रातील एक विचार बनलेला आहे. हरिभाऊंना मुंबईत आल्यानंतर परम पूजनीय गुरुवर्य ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचा सहवास लाभला. त्यांच्या हातून तुळशीची माळ घेतल्यानंतर त्यांचे जीवन पूर्ण आंतरर्बाह्य बदलले. तुझ्या गळ्यात सूर आहे ...तुम्ही आयुष्यभर सुरात गात चला. नंतर भजन सम्राट खाशाबा कोकाटे यांच्याकडे संगीताची रागदरबारी शिकण्यासाठी जाऊ लागले. गात राहिले... शिकत राहिले...वयाच्या २० व्या वर्षांपासून आता वयाच्या ८४  व्या वर्षांपर्यंत त्यांचा रोजचा सराव आणि साधना यामुळे  हरिबुवा रिंगेमहाराज यांची नाममुद्रा श्रद्धेने आणि कर्तृत्वाने मंतरलेली झाली आहे. महाराजांनी महाराष्ट्रात वारकरी गायन क्षेत्रात संस्मरणीय कार्य केले आहे. गेली ६४  वर्षे अखंड साधना केल्यामुळे स्वतः सुरेल आणि पल्लेदार पहाडी आवाजाचे ते जसे धनी आहेत तसेच शेकडो गुणिजन विद्यार्थ्यांचे ज्ञानदान करणारे गुरुजींही आहेत. श्री पांडुरंगाचे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे वारकरी आणि निस्सीम भक्त म्हणून महिन्याची वारी करणारे अशा अनेकविध नात्यांनी ते जसे समाजात सुपरिचित आहेत. तशी प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या सत्वसंपन्न व्यक्तिमत्वाची मुद्रा उमटवली आहे. उदा. दोन वर्षांपूर्वी लहुलसे गावात द्वादशी व्रताचा करण्याचा संकल्प त्यांनी गावकऱ्यांसमोर मांडला. गावाने त्यांचा शब्द प्रमाण मानला, एकजुटीने एकमताने उभा राहिला. न भूतो न भविष्यती असा कोकणात महायज्ञ सुफळ संपन्न झाला. कर्मानेच ईश्वराची सेवा करावी लागते. सेवा करण्याला भजन म्हणतात. म्हणजे सर्व सुखासाठी 'कर्मे ईशु भजावा' हेच खरे. हरिभाऊ रिंगे महाराज यांचा जीवनपट नजरेसमोर आणला तर कर्माने ईश्वराला भजावे म्हणजे 'कर्मे ईशु भजावा' चा अर्थ अधिक स्पष्टपणे लक्षात येईल. हरिभाऊ ८३  वर्षानंतरची वाटचाल करीत असताना त्यांची उमेद पूर्वीसारखीच उदंड आहे. प्रतिकुलता झेलत आणि चैतन्य उधळत जगावं कसं याचा वस्तुपाठ म्हणजे हरिभाऊंचे जीवन आहे. हरिभाऊंनी आयुष्यभर नाद ब्रम्हाचा अर्थ सांगितला व लेखाच्या विद्वान संगीत तज्ज्ञांपेक्षा काकणभर सरस असे भारतीय शास्त्रीय संगीतावर आपले चिंतन मांडले. विद्यादानासारखे श्रेष्ठ दान नाही. विद्यादान हे म्हणजे आत्मानंद देणारे ज्ञानदान होय. सतचित आनंद देणारे ज्ञान. यासाठी योग्य गुरु योग्य शिष्यासाठी जीवन जगतो आणि योग्यतेचा शिष्य भेटल्यावर अनेक कसोट्यांतून नेल्यावर नाते निर्माण होते.


 सुप्रसिद्ध पखवाजवादक वै ह भ प रामदादा मेस्त्री


संपूर्ण महाराष्ट्रात खेडोपाडी - वारकरी सांप्रदायामध्ये हरिनाम सप्ताह साजरे होत असतात. देवाचे नामस्मरण करण्यासाठी हरिकिर्तन आयोजित केले जाते. त्याप्रसंगी संप्रदायिक टाळकरी मंडळीना मृदुंगाची साथ अतिशय महत्वाची मानली जाते. किर्तनामध्ये किर्तनकाराला व टाळकरी भजनी साथीदारांना मृदुंगाची साथ देणारा पट्टीचा शास्त्रशुध्द मृदुंग वादक असेल तर 'रंगभरे किर्तनात' या संत उक्तीप्रमाणे भक्तिक्षेमयुक्त वातावरण श्रोतृवर्गात निर्माण होते व प्रत्यक्ष पांडुरंगच किर्तनात अवतीर्ण झाल्याचा आनंद मिळतो. 'तेथे असे देव उभा' हि अनुभूती मिळते अशी अनेक थोर किर्तनकार अधिकारी व्यक्तींना आलेली प्रचिती मानली जाते. भजनात मृदुंगाची साथ अतिशय महत्त्वाची असते. संत - तुकाराम महाराज म्हणतात, 'लावुनी - मृदुंग श्रृती टाळघोष ।। अशा या - मृदुंगाचे जयजयरामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम, धुमाळी ठेका, त्रिताली, दादरा, केरवा अशा विविध तालाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेली आणि देणारी संपुर्ण महाराष्ट्रात जी अनेक थोर मंडळी होऊन गेली आहेत त्यात पोलादपूर तालुक्यातील करंजे गावचे मृदंगाचार्य स्व. रामदादा मेस्त्री हे होत.

रामदादा मेस्त्री यांना पखवाज वादनाची कला ही जशी अंगभूत होती तशीच ती करंजे गावातील मेस्त्री (सुतार) कुटुंबियांना ही दैवीजात कला परमेश्वराने बहाल केली आहे. आजही या वाडीतील वयोवृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत कुणीही पखवाजवर हात टाकला की सुमधुर स्वर ऐकायला येतो. रामदादा एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आले होते. पुढे ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर मात्र त्यांच्या कलेला अनेक धुमारे फुटले. सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या सोबत आल्यानंतर त्यांची कला व्यावसायिक पद्धतीने अधिक फुलली. अनेक गाजलेले मराठी-हिंदी चित्रपट, भावगीते यांना त्यांच्या पखवाज वादनाची साथ मिळाली. परंतु प्रसिद्धीच्या झोतात कसे राहावे हा त्यांचा पिंड नसल्याने त्यांच्या नावाचा ठसा खोलवर उमटला नाही हे आपले दुर्दैव आहे. किर्तनात, भजनात, दिंडींत, चक्रीभजनात, भारुडात विविध ढंगाने बोल कसे वाजवावेत तर रामदादानी आणि त्यांचे बंधू शंकर मेस्त्री यांनी. जणू त्यांनी मृदंगवादकाचे एक स्वतंत्र घराणेच निर्माण केले होते जे महाराष्ट्राला सुपरिचत झाले होते. रामदादा आपल्या वादनात विविध बोलसमूहांनी युक्त व विविध लयबंधांनी गुंफलेल्या गती, गतपरणी, परणी, रेले वगैरे रचनाप्रकार वाजवत असत. रामदादा मेस्त्रींच्या पखवाजाच्या गंभीर नादाने 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' चा गजर अधिकच खुलत असे ! चक्री भजनात पखवाजात पदाच्या अनुषंगाने मुख्यत: धुमाळी, भजनी, आदिताल, झंपा, तेवरा, दीपचंदी, दादरा असे ताल ते वाजवत. त्यात उठान, उतार, तोड, लग्गी वा सरपट, गजर असे भागही  वाजवत. याबरोबरच त्यांनी धृपवादन व  सोलोवादनात  स्वतःचा  वेगळा  ठसा  उमटवला  होता. त्यांनी आपल्या आयुष्यात महाराष्ट्रभर मृदंग शिक्षणाचे अनेक वादक तयार केले. आम्ही रामदादांचे शिष्य ही बिरुदावली ते अभिमानाने मिरवत असतात. त्यांचे पुतणे सुनील मेस्त्री हे आज संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या पखवाज वादनाने सुपरिचित झाले आहेत. त्यांचे पखवाज वादन ऐकायला मिळावे यासाठी त्यांना अनेक ठिकाणाहून आमंत्रणे येत असतात.

 


 

रवींद्र मालुसरे

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 

 

 






वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...