लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा
लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचाआकांक्षा पुढती गगन ठेगंणे...
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या सिनेमा बद्दल सध्या प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे १४ फेब्रुवारीला त्यांचा हा बहुचर्चित सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे. अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा'बद्दल तेव्हापासून चर्चा आहे, जेव्हा याची घोषणा झाली होती. चित्रपटाबद्दलची उत्सुकता तेव्हा अधिक वाढली, जेव्हा ट्रेलर रिलीज झाला. विवाद वाढला, पण 'छावाने दर्शकांना रोमांचित केले. आता आगामी 'छावा' चित्रपट (Chhava Advance Booking Collection) प्रदर्शनापूर्वीच मालामाल झाला आहे. छावा चित्रपटाला नक्कीच जास्त स्क्रीन मिळतील आणि चित्रपट ब्लॉकबस्टर बनेल त्यात काही शंका नाही..
महाड तालुक्यातील बिरवाडी गावचे परंतु उर्वरित आयुष्य पुण्यात व्यतीत केलेले महामहोपाध्याय दत्तात्रेय वामन पोतदार (ऑगस्ट ५, १८९० - पुणे, ऑक्टोबर ६, १९७९) १९६१ ते १९६४ सालांदरम्यान ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते. भारताच्या केंद्र शासनाचे ते मान्यताप्राप्त पंडित होते.प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांवर त्यांनी इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही बरेच स्फुट लेखन केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा समग्र आणि सत्य इतिहास लिहून लोकांसमोर आणण्याची कामगिरी सोपविली....त्यांनी कामाला सुरुवातही केली. परंतु त्यांच्या लक्षात आले की, हे काम सोपे नाही. शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. आपल्या उरावर येईल. त्यांनी काही महिन्यानंतर यशवंतरावांची भेट घेतली आणि म्हणाले, मला हे जमणार नाही. अनेकांची मने दुखावतील. मराठी माणूस एकमेकांपासून दुरावेल. कदाचित रक्तपात होईल. जन्मापासून अनेक अवघड प्रसंगांना सामोरे गेलेल्या आणि आयुष्यात अपराजित राहिलेल्या राजे छत्रपती संभाजी राजे यांच्या इतिहासाची दुसरी बाजू आणि मोगलांच्या विरोधात आखलेली गनिमी काव्याची बाजू लक्षात न घेता अनेकांनी त्यांचे चारित्र्य डागाळून ठेवले आहे. मृत्यूला ते धाडसाने सामोरे गेले परंतु त्यानंतर मात्र त्यांचा पराक्रम आणि शौर्य अनुल्लेखित करण्याचे काम याच महाराष्ट्रात मराठी माणसांकडून घडले. लक्ष्मणराव उतेकरांनी मात्र धाडसाने संभाजी राजांची महाआरती करण्याचे ठरवले आहे.....बोला हर हर महादेव ! छत्रपती शिवाजी महाराज की जय !!जेव्हापासून चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे, तेव्हापासून हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'छावा'ची कथा मराठा साम्राज्याचे शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतीक्षित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरवरून १५ दिवसापूर्वी वादंग निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, सातारा गादीचे वंशज उदयनराजे भोसले, कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे भोसले यांच्याशी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर आणि राजकीय मंडळींसह अनेकांनी या प्रसंगाला घेतलेला आक्षेप विचारात घेऊन चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंग काढला जाणार असल्याचे दिग्दर्शक उतेकर यांनी स्पष्ट केले. तसेच हा चित्रपट प्रदर्शनाआधी इतिहासतज्ज्ञांनाही दाखविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मात्र चित्रपटासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो दिग्दर्शक. हा चित्रपट कुणाच्या नजरेतून दिसणार आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नाव असलेले लक्ष्मण उतेकर हे पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावचे. लक्ष्मण हे मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधासुधा मुलगा, सामान्य बुध्दिमत्तेचा मापदंड असलेला चारचौघांसारखा. त्यांच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले मात्र ते आयुष्याच्या अखेरपर्यंत शेती करीत होते. घराच्या आजूबाजूला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फळांची व फुलांची झाडें लावली आहेत.
बालपणी शाळेला सुट्टी पडल्यानंतर मुंबईतून लक्ष्मण गावी जायचे तेव्हा वडीलांना शेतीकामात मदत करताना शेत नांगरणे, गाई-बैलांना चारा घालणे, गाईचे दुध काढणे या सगळ्या गोष्टी लक्ष्मण उतेकर यांनी केल्या आहेत. पोलादपूरच्या मातीत जन्मलेले व वाढलेले आज कीर्तीवंत ठरलेले लक्ष्मण उतेकर स्वतःच्या गुणांनी पुढे जात मुंबईतल्या बॉलीवूड मधला एक मोठा सिनेमॅटोग्राफर आणि मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतला काहीतरी नवीन करु पाहाणारा एक दिग्दर्शक आणि आता छावा या ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे प्रतिष्ठीत होत आहेत याचा सार्थ अभिमान 'पोलादपूरकर म्हणून माझ्यासह सर्वांना असायला हवा.
माणसांमधील कर्तृत्व आणि गुणवत्ता या गोष्टी लपणाऱ्या नसतात. त्यांची दखल समाजाला घ्यावीच लागते. कोणाची प्रतिभा वेड लावते. कोणाचे ज्ञान आदर उभा करते. कोणाची वाणी, तर कोणाची लेखणी प्रेमात पाडते. आपल्या प्रज्ञेची दीप्तिमान आभा काही जणांभोवती प्रकाशाचे देखणे वलय नटवीत असते आणि या साऱ्याच गोष्टी एकत्र असतील, तर त्यातून उभे होणारे व्यक्तिमत्व एकाच वेळी आदराएवढाच दराराही उत्पन्न करते. हे व्यक्तिमत्व सहवासाने वा योगायोगाने जवळचे असेल तर त्यामुळे आपलीच उंची वाढून आपण श्रीमंत झाल्याचा अनुभव येतो. ज्याच्या किंवा जिच्या सहवासात आपली उंची वाढल्याचा असा संपन्न अनुभव येतो, तो किंवा ती व्यक्ती आपल्या प्रेमाचा विषय आहे असे समजायचे असते असे एका प्रख्यात अमेरिकी कादंबरीकाराचे म्हणणे आहे. लक्ष्मण उतेकरांच्या सहवासात टपाल आणि लालबागची राणी या चित्रपटांच्या माध्यमातून आलो तेव्हा त्यांच्या जीवनातले अनेक कंगोरे पहिल्यांदाच समजले. याबाबत अधिक विचारु लागलो तेव्हा लक्ष्मण उतेकर म्हणाले, 'या सर्व काबाडकष्टांचे मला भांडवल करायचे नाही कारण माझ्या आयुष्यातील हे सर्व क्षण मी सकारात्मक जगलो, यात माझ्या जगण्याचे आनंदाचे क्षण होते '
यात लक्ष्मण उतेकरांचे महत्व म्हणजे... मला रात्रीच्या काळोखात गाडीच्या चाकांत तेल ओतणारा तो माणूस आठवतो. स्वतः साठी आणि इतरांच्याही सगळ्या भविष्याची वाटचाल सोपी करणारी अशी माणसे हीच समाजाच्या निर्धास्तपणाची हमी देत असतात. आणि अशी माणसे आपल्याजवळ असणे
हा आपल्याला लाभलेल्या आशीर्वादाचा भाग असतो. असा माणूस आपल्या मनातला सगळा कुंदपणा घालवतो, त्यात प्रकाशकणांची पेरणी करतो... मी हे अनुभवलेय म्हणून लक्ष्मण उतेकरांच्या आयुष्यातला चढ-उतार, काबाड कष्ट, जिद्दीचा, संघर्षाचा आणि यशाचा प्रवास पोलादपूर अस्मिताव्दारे वाचकांसमोर आणावा असे मनापासून वाटतेय.
स्वा सावरकर मार्गावर असलेल्या जहांगिर पार्क वाडी, शिवाजी पार्क दादर येथे उतेकर राहत असत आजही ते घर आहे. माहिम येथील गोपी टॅक म्युनिसिपल शाळेमध्ये इयत्ता १ ली ते ७ वी शिक्षण घेतले त्यानंतर लोकमान्य विद्यामंदीर, माटुंगा येथे ८ वी ते १० वी पर्यंत, परंतु १० वीला दोन वेळा नापास झाल्यानंतर पुढे शिकण्याची इच्छा संपली त्यामुळे ते अर्धवट राहिले. खरं तरं शाळा पुढे शिकण्यासाठी तशी परिस्थितीही नव्हती आणि वेळही नव्हता. त्यामुळे शाळा सोडावी लागली. मुलीच्या अॅडमिशनचा चेक देण्यासाठी पुण्याच्या डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये गेले तो पहिल्यांदा कॉलेज पाहाण्याचा पहिला क्षण असे ते म्हणतात. सकाळी वर्तमानपत्रे टाकणे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात १ रुपयांना पॉपकॉर्न विकतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची अमोघ वाणीतील भाषणे ऐकणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आणि महापरिनिर्वाणाच्या दिवशी स्वतः वडापाव बनवून विकणे, सायकलवर पाय पोहोचत नसतानाही माहिमपर्यंत जाऊन सायकलने पाणी आणण्यासाठी १०-१२ फेऱ्या माराव्या लागत असत. गणपती विसर्जन करण्याच्या दिवशी ज्यांना समुद्रात जाणे शक्य नसायचे अशा भक्तांकडून गणपती घेऊन गणपती विसर्जन करायचे तेव्हा त्या कामाचे ५ रुपये मिळायचे. पुढे जैन ब्रदर्स मध्ये कामाला लागले, ऑफीस उघडण्यापासून ऑफीसमध्ये गाड्या धुवायच्या, टेबले पुसायची, लादी साफ करायची, साहेबांच्या घरी जाऊन त्यांचा डबा आणणे, त्यांच्या घरचा एअरकंडीशन दुरुस्त कर, मुलांच्या बुटांना पॉलिश करुन आण अशी असंख्य कामे करतच होते. पुढे त्यांना मुख्य ऑफीस बॉयचे काम दिले. परंतु मधल्या काळात मनाने बंड पुकारल्याने काम सुटले...८ तास विनाकारण बाहेर घालवू लागले, शिवाजी पार्क कट्टा, नारळीबाग येथे टाइमपास होऊ लागला परंतु अशाही वेळी स्वतःच्या करियरचा विचार चालूच होता. करियरचा विचार करताना कशासाठी जगायचं हा साधा प्रश्न लक्ष्मण उतेकरांच्या मनात उभा राहिला होता आणि तो ध्यास घेऊन योग्य उत्तर धुंडाळत राहिला. काहीतरी वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगण्याचा तीव्रतेनं विचार ते करु लागले. त्यांचे मन भोवतालच्या घटनांनी स्वतःच्या मनात उमटणाऱ्या सर्व साध्या प्रतिक्रियांची नोंद घेऊ लागले. त्यातून वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगायचा नवा मार्ग उतेकर शोधू लागले. उतेकर जरी स्वतःला चारचौघासारखा समजत होते तरी त्यांच्या अंतरंगात सुप्त का होईना, पण एक स्फुलिंग नक्कीच होतं. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान्निबोधत हे स्वामी विवेकानंदाचे आवाहनात्मक विचारांनी आणि अथक परिश्रमाने कठीण, विपरीत परिस्थिती बदलता येते, असाध्य ते साध्य करता येतं हा शिवाजीपार्कच्या सागरातून कन्याकुमारीला असलेल्या सागरातील शिलास्मारकानं दिलेला विश्वास त्यांना दीपस्तंभ वाटत होता. कष्ट करण्याचे संस्कार जरी लहानपपणापासून झाले असले तरी खरा कष्टाचा प्रवास वयाच्या १७ व्या वर्षापासून सुरु झाला होता. त्यांचे काका स्व. महादेव उतेकर हे त्यांना गावाहून
मुंबईला घेऊन आले होते. करड्या शिस्तीचे आणि स्वावलंबी वृत्तीने जगणाऱ्या त्यांच्या काकांचा त्यांच्या समोर आदर्श होता. त्यामुळे लक्ष्मण उतेकरांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचं श्रेयही ते त्यांनाच देतात. सिनेमॅटोग्राफी शिकण्यासाठी ते कुठल्याही शाळेत किंवा संस्थेत गेले नाहीत. व्यावसायिक छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला नाही. मात्र जैन ब्रदर्स ने असिस्टंट म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतर पुढच्या यशस्वी वाटचाली संदर्भात ते म्हणतात, 'जीवनात सर्वच गुरुंचे खूप महत्वाचे योगदान आहे असे मी मानतो. प्रत्येक कला शिकताना सराव हा अतिशय महत्वाचा आहे असे मी मानतो. कोणतीही कला ही एक-दोन वर्षात येणारी कला नसते. त्यासाठी अनेक वर्ष कष्ट घ्यावे लागतात. घड्याळ न पाहाता वेळ द्यावा लागतो. पण जसेजसे तुम्ही सराव करत जाता तसे त्यात तुम्ही पारंगत होत जाता आणि त्याचे फळ तुम्हाला मिळते. आणि हे करताना मी लोकांच्या काय अपेक्षा आहेत याचे भान ठेवले परंतु त्याचे दडपण मी कधीच घेतले नाही. मात्र कुठलीही गोष्ट मी मनापासून केली आणि ती लोकांना आवडली. कुठलीही गोष्ट करताना खूप मेहनत घेऊन, अभ्यासपूर्वक करण्याचा माझा स्वभाव आहे. सध्या पठडीबाज शिक्षणाबरोबरच बाजारात आलेले नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागतो. आणि ते आत्मसात करण्याची मी नेहमीच तत्परता दाखवतो'
लक्ष्मण उतेकरांना आयुष्यात खुप चांगली माणसे भेटली. अशोक जैन, प्रदीप जैन, मंगेश कल्याणी, प्रकाश गायकवाड, डामरे अशी अनेक माणसे आहेत, ज्यांना त्यांनी स्वतःच्या हृदयात अजून जपून ठेवले आहे. त्यांनी केलेले उपकार ते विसरु शकणार नाहीत. त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी विसरणे शक्य नाही कारण त्या आठवणींना त्यांच्या मते सुगंध आहे. लक्ष्मणरावांच्या आयुष्यात रासवट असे जगण्याचे बरेच क्षण आले, मात्र ते त्यांना हसत सामोरे जात गेले. सिनेसृष्टी म्हणजे कचाकड्यांची तकलादू, मायेची दुनिया. या दुनियेत पैसा, मानमरातब, प्रसिध्दी आहे. असे असूनही उतेकरांनी पहिल्यापासूनच ठरवले आहे. आपले पाय जमीनीवरच राहिले पाहिजेत. या चंदेरी दुनियेतले सुख उपभोगायचे मात्र सुख आले म्हणून हवेत तरंगायचे नाही तर आपल्यातला आतला माणूस सतत जीवंत राहिला पाहिजे हे पाहायचे. आजही शाहरुखखान, श्रीदेवी, अक्षय कुमार, अर्जुन कपुर, अलिया भट इत्यादी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार अभिनेत्यांची पत्रे येतात. त्यांचे कौतुकाचे शब्द आणि पाठीवर शाबासकीची थाप पाठीवर पडते. परंतु आजही शिवाजी पार्कच्या आमच्या नाक्यावरील पानवाला भय्याने पाठीवर मारलेली थाप किंवा माझ्या पोलादपूर तालुक्यातील गाववाले, नातेवाईक यांनी आस्तेवाईकपणे केलेली विचारपुस मला नेहमीच भावते असे ते म्हणतात. लक्ष्मण उतेकरांनी शून्यातून हे विश्व उभे केले, स्वतःचा रस्ता स्वतः तयार केला... आव्हाने स्वीकारली आणि पूर्णही केली, या प्रवासात त्यांनी पैशाला महत्व दिले नाही. माझ्या घामाचा, कष्टाचा पैसा मला मिळणारच होता. मी माझ्या इच्छाशक्तिच्या जोरावर यशस्वी झालो. तरुणपणातच असे उत्तुंग यश मिळवूनही अतिशय नम्र आणि विनयशील वागणुकीने लक्ष्मण उतेकर रसिकांची मने जिंकून घेतात. यशाचा कुठलाही गर्व नसलेला असा हा कलाकार आहे.
कष्ट करण्याचे ठरविले असल्याने सतत कामात मग्न राहायचे हाच ध्यास त्यांनी घेतला आहे. अगदी आयुष्यात मिळालेला क्षण आणि आलेली प्रत्येक संधी वाया घालवायची नाही, यामुळे इतरांसारखा वाचन हा माझा छंद बनला नाही. मात्र कुठेही वावरताना ते उत्तम कानसेन असल्याने ग्रहण केलेले ते मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी साठवत जात असावेत, त्यामुळेच कदाचित टपाल चित्रपटासाठी अडचणीच्या वेळी त्यांनाच एक गाणे लिहावेसे वाटले आणि ते उत्तमरित्या सुचले देखील.
टपाल या पहिल्या चित्रपटानंतर पोलादपूर तालुक्याचे मुंबई निवासी सुपुत्र लक्ष्मण उतेकर यांनी लालबागची राणी हा चित्रपट काढला.
लालबागची राणी म्हणजे वीणा सोबत या सिनेमात अशोक शिंदे, दगडू फेम प्रथमेश परब, पार्थ भालेराव, नेहा जोशी, नंदिता धुरी या कलाकारांचा अभिनय पहायला मिळाला.
लक्ष्मण उतेकर यांची हिंदी चित्रपट सृष्टीत नावलौकीकाला साजेशी अशी कामगीरी आहे. या क्षेत्रात आवड असल्याने त्यांनी म्युझिक व्हिडिओपासून पुढे मोठे चित्रपट दिग्दर्शित केले. आजपर्यत त्यांचे इंग्लीश विंग्लिश (श्रीदेवी), ब्लु (अक्षय कुमार), तेवर (अर्जुन कपुर), बॉस (अक्षय कुमार), लेकर हम दिवाना दिल, देख इंडियन सर्कस, द प्रायव्हेट लाइफ ऑफ अल्बर्ट पिंटो (लघुपट), खन्ना अॅण्ड अय्यर, त्यांनी 'इंग्लिश विंग्लिश', 'खन्ना अँड अय्यर' या चित्रपटांसाठी कॅमेरामन म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी 'मिमी', 'लुकाछुपी' डिअर जिंदगी असे चित्रपट दिग्दर्शित केले. आता त्यांनी 'छावा' या चित्रपटाचं देखील दिग्दर्शन केलं आहे.
त्यांचा पहिला मराठी चित्रपट 'टपाल' हा सन २०१३ मध्ये दक्षिण कोरीया येथील १८ व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाला जागतिक अव्वल दर्जाचा चित्रपट म्हणून मान्यता मिळाली. भारतामध्ये आयोजित केलेल्या ४४ व्या International Film festival 2013 मध्ये निवड परिपूर्ण दृश्य विभागासाठी उत्कृष्ट चित्रपट तर आणखी ९ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी सुध्दा म्हणून निवड केली गेली होती. तिसऱ्या आय-एशियन फिल्म फेस्टीवल तसेच पुणे फिल्म फेस्टीवल मध्ये सुध्दा हा चित्रपट दाखविला गेला. लक्ष्मण उतेकर हे पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावचे सुपुत्र असुन एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा हिंदी-मराठी चित्रपट सृष्टितील माणसांच्यातला हा कलावंत आपल्या पोलादपूर तालुक्यात जन्माला आला आहे. याचा पोलादपूर अस्मिता परिवाराला अभिमान वाटतो आहे. भविष्यातल्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा!
राजे छत्रपती शिवरायांचे रयतेचे हिंदवी स्वराज्य आणि राजाभिषेक ज्या भूमीत स्थापन झाले आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या कर्तृत्वाने व रक्ताने लाल झालेल्या महाड - पोलादपूरच्या भूमीत जन्म झालेल्या लक्ष्मण उतेकर यांचा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या महापराक्रमाचा वेध घेणारा छावा हा चित्रपट येत आहे. ज्या खोऱ्यातील मावळ्यांनी शिवरायांना प्रसंगी जीवाचे बलिदान देत साथ दिली त्या मावळ्यांचा वारसा लक्ष्मण उतेकर यांना लाभला आहे. उतेकरांच्या रक्तात 'शौर्य आणि निष्ठा' हा रक्तगट असल्यामुळे आणि इतिहासावर असलेल्या वेडापायी त्यांनी एव्हढे मोठे धाडस त्यांनी केले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी सहन केलेला त्रास इतका भयानक आहे त्यामुळे तेवढाच जास्त आदर त्यांच्याबद्दल मराठी माणसात आहे. आणि म्हणून ते तितकंच ताकदीने मांडलं पाहिजे ही अपेक्षा असतें. आम्हांला शंभूराजे कळलेच नव्हते. जे दुर्गुण कळले होते ते त्यांच्यात नव्हतेच. जे सद्गुण त्यांच्यात होते ते कुणी सांगितलेच नाहीत. लक्ष्मण उतेकर यांनी इतिहासाचा अभ्यास करून धाडसाने सांगण्याचा आणि देशाच्या कानाकोपऱ्यात दाखविण्याचा हा प्रयत्न केला आहे. संपूर्ण हिंदुस्थानात हा चित्रपट इतिहासप्रेमींच्या हृदयात देशभक्तीची नवीन चेतना जागवणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या अजरामर शौर्याची, त्यागाची आणि स्वाभिमानाची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे. हा पण चांगला प्रयत्न आहे. देशाला कळेल छावा काय प्रकरण होतं......
ही लिंक तुमच्या मोबाईल मधील सर्वांना पाठवा.
- रवींद्र तुकाराम मालुसरे
अध्यक्ष : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
या ब्लॉगवरील इतरही पोस्ट नक्की वाचा
www.https://poladpuraasmita.blogspot.com/2025/01/blog-post_24.html
तुमच लेखन एवढ मनाला भिडत की, वाचता वाचता स्व. व्दारकानाथ संझगिरींची आठवण झाली. आमाप शब्द संग्रह. लयभारी साहेब.
उत्तर द्याहटवाखूप छान आणि उपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाछावा फिल्म पहायची उत्सुकता खूप वाढली आहे.
उत्तर द्याहटवाउतेकर साहेब आपल्या लेखणीला व दिग्दर्शनाला सलाम
उत्तर द्याहटवाअतिशय उत्तम उतेकर साहेब
उत्तर द्याहटवा