लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

नादब्रम्हाचा उपासक सुप्रसिद्ध भजनी गायक ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर

 

नादब्रम्हाचा उपासक

सुप्रसिद्ध भजनी गायक ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर 

पोलादपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध भजनी गायक आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वर्यू संगीतरत्न ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर यांचे आज (मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ ) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८७ व्या वर्षी  निधन झाले. त्यांच्याच गावातील वारकरी संप्रदायातील पोलादपूर मधील थोर संत ह भ प. वै ढवळे बाबा आणि गुरुवर्य वै ह भ प नारायणदादा घाडगे यांचा पांडुरंगबुवांना लहानपणापासून खुप जवळचा सहवास आणि स्नेह लाभला. किर्तनासह, भजनामध्ये आपल्या वेगळ्या शैलीतील गायनाने बुवांनी रसिकांना गेली सहा दशके मंत्रमुग्ध केले. पोलादपूर तालुक्यातला वारकरी क्षेत्राचा सुवर्णकाळ हा साधारणतः १९५५  ते  १९७५. या काळात अनेक गुरुतुल्य व्यक्ती जन्माला आली. अर्जुनमामा साळुंखे, ढवळे बाबा,नारायणदादा घाडगे, गणेशनाथ बाबा, हनवतीबुवा, हबुबुवा, ज्ञानेश्वर मोरे माउली, विठोबाअण्णा मालुसरे, ढवळे गुरुजी, भजनानंदी हरिभाऊ रिंगे, सुप्रसिद्ध पखवाजवादक रामदादा मेस्त्री, शंकर मेस्त्री, भाईबुवा घाडगे, विठोबा घाडगे (पखवाज), विठोबा घाडगे (गायक) अशी बुद्धिमान आणि ईश्वराशी समरस झालेली मोठी माणसे होऊन गेली. त्यावेळी पांडुरंगबुवा आपली गायनकला भजन-कीर्तनातून श्रोत्यांसमोर सादर करीत होते. हळूहळू त्यांचा वेगळा असा श्रोतृ वर्ग निर्माण झाला. त्यांच्या अचानक जाण्याने आजरेकर समाज फड आणि पोलादपूर तालुका वारकरी संप्रदायासह संगीत क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना "रायगड भूषण" पुरस्कार प्रदान करून सन्मानाने गौरविले होते. 

        सुरवातीच्या काळात तरुण वयातच त्यांना गावागावातील भजने ऐकून त्यांना भजनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर  गायनाचार्य पं रामबुवा यादव (लोअर परेल) यांच्याकडे संगीत भजन शिकण्यास सुरुवात केली. यादवबुवांकडे काही काळ संगीत भजनाचे धडे घेतल्यानंतर सेंच्युरी गिरणीतील नोकरी आणि गावाकडची शेतीवाडी यामुळे त्यांना संगीत क्षेत्रातील शिक्षणाला वेळ देवू शकले नाहीत, मात्र त्यांनी स्वसाधनेने शास्त्रीय संगीताची साधना केली.  किर्तनात गायनसाथ करण्याची संधी लाभलेल्या पांडुरंगबुवांच्या आवाजात विशेष गोडी होती. आपल्या वेगळ्या शैलीतील गायनाने पोलादपूर, मुंबई, आळंदी, पंढरपूर परिसरातील श्रोत्यांना देखील बुवांच्या सुमधुर आवाजाची भुरळ पडली. वारकऱ्याने आयुष्यभर त्या फडाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असा नियम वारकरी पंथात आहे.आजरेकर फडाच्या जवळपास पाच पिढ्यांशी ते एकनिष्ठ राहिले. आळंदी-पंढरपूर पायी वारीतील बऱ्याचदा ज्येष्ठ म्हणून मुख्य चाल म्हणण्याचा अधिकार फडप्रमुख त्यांना देत असत. मुंबईतील गिरणी कामगारांच्या भजन स्पर्धा होत असत त्यावेळी सेंच्युरी मिल भजन मंडळ सतत पहिला क्रमांक पटकावत असत. भजन सम्राट वै मारुतीबुवा बागडे यांच्या साथीला बुवा नेहमी असत.

 पांडुरंगबुवांना मानणारा वारकरी संप्रदायातील एक मोठा वर्ग आहे.  काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. अखेर आज हृदय विकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे आणि एक मुलगी , सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने संगीत क्षेत्राची फार मोठी हानी झाल्याची भावना कलाकार मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.

गायकाची सारी करामत त्याच्या गळ्यावर अवलंबून असते. गाणं नुसतं डोक्यात असून चालत नाही. तेवढ्याच ताकदीनं ते गळ्यातून बाहेर पडावे लागते. त्यासाठी नैसर्गिक देणगीबरोबरच पराकोटीची  साधनाही असावी लागते. नशिबाची साथ तर लागतेच लागते. पांडुरंगबुवा उतेकर तसे खरेच भाग्यवान ! वय वर्षे ८७ या उतारवयातही त्यांचा आवाज एखादा प्रकाशाचा झोत चहुबाजुंनी अंगावर यावा, तसा श्रोत्याला भारावून टाकायचा. साऱ्या वातावरणात भरणारा हा आवाज खूपच जबरदस्त गोड. साधारणपणे बारीक, टोकदार, रुंद, घुमारदार, पिळदार, लांब पल्ल्याचा, दमसास पेलणारा. सुरेलपणा, स्वरांची  आस आणि गोडवा हेही त्यात होतेच. कोणतीही गायकी जन्माला येते तेव्हा ती परिपूर्ण नसते. हळूहळू ती परिपक्व होत जाते. गाणारा स्वरभास्कर अस्ताला गेला असला तरी त्यांची आठवण कायम राहील.  पोलादपूर वासियांच्या इतिहासात घडलेली अभूतपूर्व घटना म्हणजे त्यांचा काळातील पिढीने समृद्ध केले. पांडुरंगबंवा यांनी तर शेकडो अभंगांच्या पाठांतरामुळे वारकरी कीर्तन लोकप्रिय केले. शास्त्रीय संगीतातील रागांची तोंडओळख खेड्यापाड्यातल्या लोकांना भरभरून करून दिली. अनेकांना गाण्याची आवड लावली. खेडोपाडीच्या नुसत्याच भक्तीनं किंवा भावनेनं वेडेवाकडे गाणाऱ्यांना शास्त्रकाट्याची कसोटी दिली. त्यांचं गाणं वाढवलं. आणि संगीताच्या गाभाऱ्यात श्रद्धेचं, भक्तीच निरांजन लावलं. त्यांच्या वागण्यातला साधेपणा, गोडवा, निरागसता, समरसता, भक्ती हीच त्यांच्या गोड गळ्यातून स्वरांच्या रूपाने बाहेर पडत असे. गायकासाठी सूर हाच ईश्वर आहे व तो सच्चा लागला तरच ईश्वराला प्रिय आहे.   

या क्षेत्रात वावरताना त्यांना मानमरातब, आदर नेहमीच मिळत राहिला. पूर्वजन्मीचे सुकृत त्याला कारणीभूत असावे, ते अशा घरात जन्माला आले की तिथं स्वर-तालाची पूजा होत नव्हती. लहानपणी काहीसा पोरकेपणा वाट्याला आला होता. परंतु वर्तनातूनच आपल्यामधील कलेमध्ये हुनर दाखवत एक साधा माणूस म्हणून ते 'उजेडी राहिले उजेडी होऊन' जगले.  त्यांच्या गाण्यातला मोठा बिंदू म्हणजे भक्ती ! भक्ती  म्हणजे  भक्तिपदे गायन करणे नव्हे. तर गायकाच्या स्वभावातून निर्माण झालेला भक्तीचा भाव आणि त्या भावातून निघालेले स्वर आणि राग याच्यांशी एकरूप होऊन समर्पित होण्याची भक्ती आणि हीच गाण्यातली सर्वात मोठी शक्ती आहे. ज्या लोकांनी पांडुरंगबुवांच्या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व ज्यांना त्याची प्रचिती मिळाली ते सर्वजण धन्यता व सार्थकतेचा अनुभव करतात. म्हणूनच गेली पाच दशकांतील पिढ्यासाठी ते एक ऊर्जा स्रोत ठरले. मध्यसप्तकाचा षड्ज हा संगीतातील 'आधारस्वर' होय हा षड्ज साधारणपणे गायकाला सहजतेने लावता येण्यासारखा आणि रागानुरूप इष्ट त्या सर्व सप्तकांत फिरण्यास योग्य असा असावा लागतो. वादकाच्या बाबतीत तो वाद्य आणि वाद्यगुण यांना अनुसरून असतो. सर्व सांप्रदायातील वारकरी बंधूना नम्रपणे हात जोडून नमस्कार करणारा पांडुरंगबुवांचा प्रेमाचा आधार मात्र यापुढे नसेल मात्र त्यांची कीर्ती दिगंत उरणार आहे. 
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

 

रवींद्र मालुसरे (अध्यक्ष)

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

मराठीच्या भल्यासाठी दिवाळी अंक परंपरा जपू या !

 

दिवाळी ! दिव्यांची आरास. रांगोळीचा थाट, पक्वानांचा घमघमाट आणि फटाक्यांची आतषबाजी ! दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्साह, उल्हासाचा उत्सव ! प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. अशी ही दिवाळी मराठी माणसांच्या नसानसातून झिरपत असते. दिवाळी म्हणजे दीप मांगल्याचा सण. रोषणाई,फराळ आणि फटाक्यांची आतिषबाजी हे दिवाळी सणाचे वैशिष्ट्य. त्याचप्रमाणे दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा  एक अविभाज्य भाग आहे.  म्हणूनच दीपावली सणाची केवळ चाहूल सुद्धा अबाल वृद्धांना हर्षभरित करते.

दिवाळी' येते तीच मुळात हसत, खेळत, नाचत. सभोवताल प्रकाशाने, देदीप्यमान तेजाने उजळून टाकत. सोबतीला असतात गतकाळाच्या दिवाळीच्या आठवणी, वर्तमानकालीन अपेक्षा आणि पुढील वर्ष आनंदात, सुखासमाधात जावं, ह्या आशा आणि इच्छा. दिवाळी म्हटलं की पहाटेची अभ्यंगस्नानं, उटणी, मोती आणि म्हैसूर चंदन साबणाचे सुवास, अत्तरं, फराळ, फटाके, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, नवीन कपडे हे सारं असतंच, त्याचबरोबर दिवाळी अंक घरी आल्याशिवाय बऱ्याच मराठी घरांत ह्या सणाची पूर्तता होत नाही! दिवाळीची चाहूल लागताच मराठी माणूस आणखी एका गोष्टीत गुंतून राहतो ते म्हणजे दिवाळी अंक. ह्या दिवाळी अंकांनी मराठी मनाला मोहवून टाकले आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि जगभरातील काही ठिकाणी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते. प्रत्येक सण, उत्सवावर त्या त्या प्रदेशातील सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा प्रभाव असतो. पण, महाराष्ट्रात दिवाळी सणाचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे. हा पैलू म्हणजे दिवाळी अंक. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे. जो केवळ मराठी भाषेतच पहायला मिळतो. अर्थात, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा महोत्सवाच्या निमित्ताने विशेषांक, गुजराती भाषेतही दिवाळी अंक छापले जातात. पण, त्यांचे प्रमाण अगदीच अल्प आहे. दिवाळी अंकाची सुरुवातच मुळात साहित्यिक प्रेरणेतून झाली आहे.

या दिवाळी अंकांच्या उगमतेचा इतिहास फार 'मनोरंजक' आहे. साहित्य क्षेत्रातील दिवाळी अंकांची प्रथा सुरु केली ती मनोरंजनकार काशिनाथ रघुनाथ तथा का र मित्र यांनी १९०९ साली. एकूण २०० पृष्ठसंख्या असलेल्या या दिवाळी अंकाची किंमत केवळ १ रुपया होती. हिरव्या रंगाच्या जाड कागदाच्या मुखपृष्ठावर एक मुलगा व एक स्त्री अंक पाहत असतानाचे चित्र असलेल्या या अंकात एकूण ४२ पाने जाहिरातीची होती. मात्र सुरुवातीची २६ पाने संपल्यानंतर अनुक्रमणिका दर्शविणारी ४ पाने होती. त्यानंतरच्या पानावर भारताचे तत्कालीन राजे किंग एडवर्ड सात यांचे चित्र व त्या पुढील पानावर संपादकाचे 'दोन शब्द' होते. आजच्या जाहिरातीचे बीज त्या काळातही पेरले गेले होते याची प्रचिती या दिवाळी अंकातील 'स्वदेशी लोटस' या साबणाच्या जाहिरातींवरून येते. जाहिरातीसोबत असलेले कुपन घेऊन येणाऱ्यास एक साबण बक्षीस देण्याची ती योजना विविधोपयोगी वस्तूंच्या जाहिरातींसोबत 'दामोदर सावळाराम आणि मंडळी' यांची १६ पानी दीर्घ जाहिरात आहे. . मनोरंजनाचा हा दिवाळी खास अंक महाराष्ट्रीयांस प्रिय होवो, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे. बालकवींची सुप्रसिद्ध असणारी ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता या पहिल्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती! यानिमित्ताने सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे.  गेली ११३ वर्षे मराठी साहित्याचा हा जागर अखंड होत आहे. हे सातत्य इतर भाषांमध्ये फारसे घडताना दिसत नाही. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषेची मिठ्ठास असून, ती खास महाराष्ट्राची साहित्यिक दौलत आहे. मराठी संस्कृतीमधील दिवाळी अंकांचे योगदान मोठे असून, लेखकांच्या दृष्टीने त्यांच्या जडणघडणीची ती एक शाळाच आहे. दिवाळी अंकांनी मराठी साहित्यातील विविध प्रकार हाताळले असून, त्यातून अनेक लेखक-साहित्यिक नावारूपास आले आहेत.  गेल्या ११३ वर्षांमधील  दिवाळी अंकातील साहित्यिक, कवी कोण होते यांची नुसती यादी बनवली, तरी त्यातून मराठीत किती विपुल आणि व्यापक प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली आहे हे लक्षात येते.  शतकोत्तर वर्षाच्या कालखंडात दिवाळी सणात आमूलाग्र बदल झाला आहे.  त्याला दिवाळी अंकही अपवाद ठरले नाहीत. दिवाळी व दिवाळी अंक या नात्यांमधील वीण दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली आहे. मराठी माणसाची 'दिवाळी' दिवाळी अंकाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही ! ‘दिवाळी-दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या उक्तींमधील आनंद दिवाळी साजरा करण्यातील अनेक गोष्टींइतकाच दिवाळी अंक हा त्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

प्रत्येक दिवाळी अंकाचा स्वत:चा असा एक वाचक वर्ग असतो. तो शक्यतो मिळेल त्या किमतीला तो अंक विकत घेतो. यंदाही तसेच घडेल, असे दिवाळी अंक संपादक आणि  विक्रेत्यांना वाटते आहे.  कारण दिवाळी अंक आले, की त्यावर उड्या मारणारे वाचक अजूनही तितक्याच निष्ठेने ते विकत घेताना दिसतात. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे.

दिवाळी अंकांच्या निर्मितीला शंभर वर्ष होऊन गेली. आजही नव्या पिढीला एकदा तरी दिवाळी अंक प्रकाशित करायचा याची भुरळ पडत असते. दरवर्षी नवनवीन दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. सध्याच्या घडीला मराठीत पाचशेहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात. हा आकडा आश्चर्य चकित करणारा आहे. यात दर्जेदार असे अंक खूप कमी असतात हि गोष्ट वेगळी पण आजही दिवाळी अंक नव्या पिढीला आकर्षित करतात याचं समाधान वाटतं. मजकूर कमी आणि जाहिराती जास्त असं स्वरूप अलीकडच्या अनेक दिवाळी अंकाचं दिसू लागलंय. पण तरीही दिवाळी अंकांच्या या गर्दीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ते टिकवून आहेत. दिवाळी अंकांचा व्याप सांभाळणे सोपे नाही, त्यातून मिळणारे उत्पन्नही बेताचे असते. असे असूनही मराठीतले बरेचसे म्हणजे मौज, दीपावली, आवाज, चंद्रकांत, धनंजय, किस्त्रीम, साधना,हंस, नवल, शतायुषी, आक्रोश, कलाकुंज, प्रसाद, धर्मभास्कर इत्यादी  दिवाळी अंक २५, ५० किंवा किंवा त्याहून अधिक वर्षे निघत आहेत.

१९५० ते ८० या काळातील दिवाळी अंक हे खरोखर साहित्यिक  विशेषांक होते आणि ते जाहिरातींचा वापर केवळ आधार म्हणून करत. जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतशी महाराष्ट्रातील मराठी मनाची साहित्यिक, सांस्कृतीक भूक वाढत होती. यात दिवाळी अंकांनी मोलाची भूमिका बजावत हे खाद्य अधिक सकसपणे द्यायला सुरुवात केली.  या वाढत्या भुकेला मराठी प्रकाशक साप्ताहिके, मासिके, पुस्तके आणि दैनंदिन घडामोडींसाठी वृत्तपत्रे जमेल तसे खाद्य देत आहेत आजही देतात. वैचारिक देवाणघेवाण होत पुढे वाढलेली वाचकांची भूक पाहून साप्ताहिकांनी विषयनिवडीत पहिल्यांदा कात टाकली. त्याचे पडसाद दिवाळी अंकातही उमटले. कथा, कविता, नाटक, कादंबरी यांसोबतच इतर भाषांमधील लेखकांचे अनुवादित साहित्य, भाषांतरीत कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं दिवाळी अंकात छापून येऊ लागली. आज तर दिवाळी अंकांचे स्वरुप इतके बदलले आहे की, दर वर्षी मोठ्या संख्येने दिवाळी अंक बाजारात येतात व स्वत:च्या वैशिष्ट्यांसह ते वाचकांपर्यंत पोहोचतातही. विशेषतः धार्मिक, महिला, ज्योतिष, आरोग्य, रहस्यकथा, विनोद, पाककला  या वैविध्यपूर्ण प्रकारांसह ते वाचलेही जातात. काही दिवाळी अंक तर अलीकडे पाणी, सोने, गड किल्ले, नातेसंबंध इत्यादी विषयांवर दर वर्षी स्वतंत्र विषय घेऊन त्याचा विशेषांक काढत असतात. काही संपादक आता तर जाहिराती जास्त व त्याला तोंडी लावायला साहित्य अशी अवस्था आहे.

दिवाळी अंकांना बँकांच्या जाहिराती यंदा मिळालेल्या नाहीत. टाळेबंदीत बरेच नुकसान सोसल्याने खासगी कंपन्यांनीही हात आखडता घेतला. दिवाळी अंकांच्या संपादकांना स्नेहसंबंधांतून मिळालेल्या जाहिरातींवरच अवलंबून राहावे लागले आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच पुस्तकांची व नियतकालिकांची छपाई बंद होती. प्रकाशकांच्या अडचणी आणि इतर समस्यांमुळे जो पुस्तकांचा खप आहे तो मंदावला असे म्हणता येईल. याचाच परिणाम या वर्षीच्या दिवाळी अंकांवर मोठ्या प्रमाणावर दिसून येणार आहेत. दोन वर्षे लागोपाठ जागतिक कोरोना संकट टाळेबंदीचा फटका दिवाळी अंकांनाही बसल्याचे सांगितले जाते आहे.  साहित्य फराळाची शतकी परंपरा सांगणाऱ्या दिवाळी अंकांकडे जाहिरातदारांनी पाठ फिरवली आहे. 'कोरोना'मुळे बाजारात दिवाळी अंक येणार नाहीत असे वातावरण तयार होत असतानाही आलेल्या इतर अनेक संकटांवर मात करीत, नवी जिद्द बाळगत, निराशेचे ढग बाजूला करीत गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही अनेक दिवाळी अंक तयार होऊन बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.  'हल्ली जाहिराती मिळत नाहीत, त्या मिळाल्या तरी मागाहून त्यांचे पैसे वसूल करणे फार जिकीरीचे होते', 'वाढत्या किंमती आणि घटता वाचक या दुष्टचक्रामुळे आता अंक काढणे परवडत नाही', अशा तक्रारी कानावर येतात. या तक्रारी खोट्या आहेत, असे नाही. मात्र, तरीही पाचशेच्या घरात अंक निघतात आणि दिवाळी अंकांची परंपरा सुरू राहावी यासाठी संपादक, लेखक सतत प्रयत्न करतात हेही तेवढेच महत्त्वाचे. आता काही दिवसांपासून कुठे आपल्या भारतात जनजीवन सुसह्य होऊ पाहत आहे. परंतु जगभरात करोनाची साथ चालू आहेच,  महाराष्ट्रामधे गेल्या वर्षभरात वादळ आणि पावसाच्या  महापूराने थैमान घातलेले आपण अनुभवले  आहे. निसर्ग सर्व बाजूंनी असहकार करत असताना संकटांच्या काळात मनुष्याला सकारात्मक रहाण्यासाठी, आलेल्या संकटांशी झुंजण्यासाठी, मनाला पुन्हा उभारी येण्यासाठी साहित्य महत्वाची भुमिका बजावत असते. कोरोनाची टाळेबंदी, समुद्री वादळ, ढगफुटी पावसामुळे अनेक ठिकाणी आलेले महापूर व  विस्कळीत झालेले जनजीवन या पार्श्वभूमीवर ही स्थिती अपेक्षित असूनही संकटाच्या काळातही मराठी भाषेतील दिवाळी अंकांची ही भव्य परंपरा, आपले सांस्कृतिक वैभव जपले जावे  केवळ परंपरा खंडित होऊ नये या  हेतूने प्रकाशकांनी दिवाळी अंकांची निर्मिती केली आहे. तुम्हा-आम्हा वाचकांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करून दिली जात आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.  साहित्य त्याच्या थकलेल्या मनाला विरंगुळा देतेच देते पण त्यासोबत हे ही दिवस जातील आणि पुन्हा ताठ कण्याने उभे रहाण्याची आशा आणि इच्छा जागृत करुन संकटकाळात धीर आणि दिलासा देते.

तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवीन बदल होत आहेत. अनेक गोष्टीत थोड्याबहुत प्रमाणात ते बदल अनुभवता येत आहेत. असाच बदल डिजिटल जगात होतोय. पहिला ‘डिजिटल’ स्वरूपातील दिवाळी अंक २००० मध्ये प्रसिद्ध झाला होता. ‘ऑनलाइन’ प्रकाशित झालेल्या घटनेला यंदा बावीस र्वष पूर्ण होत आहेत. एकवीस वर्षापूर्वी कोणी कल्पनासुद्धा केली नसेल की, इंटरनेटच्या आणि समाज माध्यमांच्या या युगात आपण पुस्तके आपल्या हातातील मोबाईलवर वाचू शकू. पण प्रत्येक दशक आपल्या बदललेल्या काळाची भाषा बोलत असतं. डिजिटल रूपात संगणकावर, मोबाइलवर आणि किंडल किंवा टॅब्लेटवर वाचता येणारे दिवाळी अंक, ऑडिओ बुक दिवाळी अंक, व्हिडीओ रूपात संवाद साधणारे दिवाळी अंक अशी एक नवी परंपराच सुरू झाली आहे.  या परंपरेनं जसं लोकप्रिय साहित्य जगभरातल्या मराठी भाषकांना तळहातावर उपलब्ध करून दिलं, तसंच यातून अनेक नवे लेखक घडवले आहेत. तो म्हणजे पुस्तके, मासिके, पाक्षिक नियतकालिके यामध्ये. तसेच प्रकाशित होणार्‍या आजच्या दिवाळी अंकांमध्ये सुद्धा ई-जगातला बदल पाहायला मिळतोय. पारंपरिक छापील दिवाळी अंकांचा आनंद घेतानाच नव्या माध्यमातील प्रयत्नांचंही स्वागत टेक्नोसॅव्ही नवीन पिढीने करायला हवे.

 भाषा आणि संस्कृती एकमेकींच्या हातात हात घालून वाटचाल करतात, एखादी भाषा नष्ट होते तेव्हा शेकडो वर्षांच्या संचितातून साकार झालेली, संपन्न झालेली संस्कृतीही लयाला जाते. आपल्या पूर्वसूरींच्या श्रमातून, कौशल्यातून, बौद्धिक-सामाजिक मंथनातून आकाराला आलेली अशी संस्कृती आपल्या डोळ्यांदेखत संपू नये असे वाटत असेल तर त्या संस्कृतीच्या खुणा आणि प्रतीक म्हणून जे उरले आहे ते जपणे, वृद्धिंगत करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव मराठी भाषिक अस्मिता म्हणून आपल्याच मुळा-नातवंडांमध्ये रुजवायला हवी. 

मराठी भाषा जगवा, समृद्ध करा. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत, बंद होत आहेत. शतकी परंपरा असूनही मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळत नाही. इंग्लिश माध्यमांच्या शाळांत मराठी भाषेची सक्ती करा अशा घोषणा आणि चर्चा आपण अधूनमधून करीत असतो. शंभर वर्षात अनेक आक्रमणे पचवत आणि स्वीकारत आजही चारशे-पाचशेच्या आसपास प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक मराठीची पताका खांद्यावर घेऊन मिरवत आहेत. दिवाळी अंकांची ही परंपरा तशीच सुरू रहावी यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपला वाटा उचलणे गरजेचे आहे. मराठी भाषा जगवायची असेल, तिचं स्थान भक्कम करायचं असेल, तर आज आपण सर्वांनी निश्चय करणे गरजेचे आहे. 

महागडे मोबाईल आणि टी व्ही ने आपली संस्कृती बिघडवण्याचा घाट घातला आहे, पण दिवाळी अंक मराठी माणसांची सांस्कृतिक भूक भागवित आहेत. अभिरुची वाढविताहेत, मराठी वाचक वाढविताहेत त्याबद्दल ह्या अंकांच्या संपादकांना  धन्यवाद द्यायलाच हवेत. त्याचवेळी, दिवाळी अंक प्रकाशकांनी आता नव्या जगातील नव्या माध्यमांशी मैत्री करणेही गरजेचे आहे. दिवाळी अंक हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ती स्वतःला समृद्ध करण्यासाठीची ती एक पर्वणी असते. कायदा न करता तिच्या संवर्धनासाठी आत्मीयतेने  मराठी वाचूया, बोलूया आणि लिहूया !

 रवींद्र तुकाराम मालुसरे,  अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४  

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

छत्रपती शिवाजीराजे भोसले




(१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) 

छत्रपती शिवाजीराजे हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.

“आम्ही पूर्ण जग फिरलो. त्यातील भारत हा मुलुख आम्ही जिंकलाच कसा यावर आज विश्वास बसत नाही. शिवाजीसारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर ही पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे निर्माण झाले असते” असे लॉर्ड एल्फिस्टन यांनी तर इंग्लंडचे ग्रँड डफ यांनी “राजे केवळ लढवय्ये नव्हते तर सामाजिक आणि अर्थकारण यांची उत्तम जाण असणारे राजकारणी पुरुष होते. हतबल झालेल्या बहुजनांना त्यांच्या चाणाक्ष योजनेमुळे सत्ताधीश होता आले.”  
ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केले त्यांच्या दोन अधिकाऱ्यांचे हे विचार त्यांनी जागतिक इतिहासात कायमचे कोरून ठेवले आहेत………………….
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की, ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्ययोद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. असा हा राजा केवळ पुण्यवंत राजाच नव्हता, तर तो आदर्श नीतिवंत राजा होता.
निश्चयाचा महामेरू !
बहुत जनांसी आधारू !
अखंड स्थितीचा निर्धारू !
श्रीमंत योगी !!


अशा साक्षपूर्ण शब्दांत या जाणत्या राजाचे वर्णन इतिहासात केले आहे. शिवाजी महाराज श्रीमंत तर होतेच; पण योगीही होते. दक्षता, कणखरता आणि तत्परता असा स्थायीभाव असलेल्या शिवछत्रपतींच्या शब्दकोशात आळस नव्हता, उत्साह होता, चंचलता नव्हती, निग्रह होता, मोह नव्हता, ममता होती, भोगवाद नव्हता, त्यागवाद होता. अष्टपैलू, अष्टवधानजागृत, आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, लोकहितदक्ष, धर्माभिमानी; पण परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, असा हा जाणता राजा होता. जगातील थोर पराक्रमी आणि मुत्सद्दी राजांची यादी जर समोर धरली, तर छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा मोहरा सापडणे दुर्मिळ आहे. नेपोलियन बोनापार्ट, ज्युलियस, सिकंदर, किंवा दुसरे कोणतेही नृपती उदाहरणार्थ घेतले तरी प्रत्येक नृपतीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज कांकणभर अधिक आहेत आणि हे शतप्रतिशत कबूल करावेच लागते. छत्रपती शिवाजी महाराज आपले आहेत म्हणून त्यांना श्रेष्ठ ठरवायचे नसून ते एक ऐतिहासिक सत्य आहे. सर्व नृपती मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांना अग्रस्थान मिळण्याचे पहिले कारण असे आहे की, त्यांची नीतीमत्ता बलवत्तर होती. मोगल सत्तेने जिकडे तिकडे आपला अंमल बसवला होता व स्त्रियांची अब्रू लुटण्याचा प्रसंग केव्हा येईल, याचा नेम नव्हता. अशा धामधुमीच्या काळामध्ये महाराजांचा जन्म झाला होता. राजांनी हे चित्र स्वराज्यात संपूर्ण बदलून टाकले होते. सर यदूनाथ सरकारांच्या मते,‘ कृषकवर्ग ’ (कुणबी) शिवाजी महाराजांच्या लष्कराच्या पाठीचा कणा होता. लष्करात कुणबी, मराठे, ब्राह्मण, प्रभू, शेणवी, मुसलमान, न्हावी, महार, कोळी, भंडारी, रामोशी, धनगर, आगरी, वैगेरे ५६ जातीचे लोक होते. शिवरायांचे सैन्य राष्ट्रीय होते. केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील सर्व जातीतील गुणवंतांना शिवरायांच्या सैन्यात प्रवेश मिळे. माणसांची पारख करूनच त्यांचा सैन्यात समावेश केला जाई.

भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.
आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : "छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले,
 
 त्यांच्या मागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला."
 
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक शिवनेरी या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले  शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे इतिहासकार मानतात
 
कोणास कधी जहागिरी अगर जमिनी तोडून न देणारे, न्यायाच्या कामात कोणाची भीडमूर्वत न धरणारे, दुष्टांचा काळ, पण गरिबांचा कनवाळू, एकंदर रयतेस पोटच्या मुलांप्रमाणे वागवणारे, सदैव सावध व उद्योगी, नेहमी मातेच्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता वाहणारे, स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म या विविध संपत्तींचे संगोपन करणारे, पापभीरू परंतु रणशूर, असे हे आधुनिक काळाचे अद्वितीय स्वराज्य संस्थापक, श्रीमंत  छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोकांच्या पंक्तीस बसण्यास सर्वथैव  पात्र आहेत.


रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

बुधवार, २० मे, २०२०

सार्वजनिक गणेशोत्सव


सार्वजनिक गणेशोत्सव
आनंदाची पर्वणी अन् जल्लोषाचा साज.


उत्सवप्रियता हा मानवी जीवनाचा एक विशेष भाग आहे, भारतीय परंपरेतील एक धारा असलेली मराठी संस्कृती तर उत्सवप्रधान आणि उत्साहवर्धक आहे. श्रावण-भाद्रपद-अश्विन-कार्तिक या चातुर्मासात तर अनेक उत्सवांची रेलचेल असते. गणपती हे प्राचीन काळापासून मराठी माणसांचे लोकप्रिय दैवत आहे. मूलतः हि आर्येतर देवता . वैदिक मंत्र्यांच्या घोषात वैदिकांनीही ती स्वीकारली. आणि पाहता पाहता सर्व स्तरात ती विकास पावत गेली. ज्ञानाच्या क्षेत्रात तो बुद्धिदाता तर सकाम साधना करताना तो विघ्नहर्ता म्हणून ठरला. त्याची मनापासून भक्ती केली तर तो साधकाच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर करतो आणि सर्व प्रकारची मनोवांछित सुखे प्रदान करतो अशीही श्रद्धा ह्या दैवताविषयी जनसामान्यात मनात दृढमूल झाली आहे. प्रत्येक मंगल कार्याच्या शुभ प्रसंगी त्याचे आवाहन करण्याची तसेच त्याचे प्रथम पूजन केले जाते. श्रीगणेशाची व्यक्तिगत पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवरील पूजाअर्चा हि पूर्वापार परंपरा आहे.  विवाहाचा शुभ प्रसंग असो वा लक्षमीपूजन, वास्तुशांती, गृहप्रवेश, कोनशिला समारंभ असो इतकेच काय कोणत्याही मंदिरात भगवंताची प्राणप्रतिष्ठा करायची असली तरी  प्रथम गणेशपूजन केले जाते.
गणपतीचे रूप हे ओंकाराकार आहे. ओंकारावर बुद्धी लक्ष केंद्रित केली तर भौतिक ऐश्वर्य,वैश्र्विक सामर्थ्य, बौद्धिक साक्षात्काराची प्राप्ती होते. तसेच गणपती हा समूहाचा नेता आणि तत्वज्ञानाची देवता. त्याचप्रमाणे गणेश हि विद्येची देवता साहित्यापासून संगीतापर्यंत आणि समरांगणापासून भोजनापर्यंत अधिवास करीत असते. श्री गणेश हि अन्य देवतांपेक्षा अगदी आगळी देवता ! ती गणांची देवता म्हणून तिला 'गणपती' हे अधिदान प्राप्त झालेले आहे. आपल्या राज्यातील गणेशोत्सवाला समृद्ध अशी ऐत्याहासिक परंपरा आहे. भाद्रपद शु || चतुर्थीला 'वरदा चतुर्थी' असेही म्हणतात. त्या दिवशी गणपतीची मृण्मयमूर्ती घरी आणून सिद्धीविनायक या नावाने तिची दिड दिवस स्थापना करून विधिपूर्वक पूजा केली जाते.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजही गणेशभक्त होते. त्यांना हा वारसा त्यांच्या मातापित्यांच्या कडून मिळाला होता. त्यांचे वडील शहाजी महाराज आणि आई जिजाऊ हे उभयता श्री गजाननाचे उपासक होते. शाहूराजांनी सुद्धा मोरया गोसावींच्या संस्थानाला इनामे देणग्या दिल्याचे इतिहासात दाखले आहेत. पुण्यातील कसबा पेठेतील गणपती मंदिर मातोश्री जिजाऊंनी बांधले. एकदा स्वारीवर असताना शिवाजी महाराजांचा मुक्काम आंबवडे गावी झाला. त्या दिवशी चतुर्थी होती. उपवास असल्याने संध्याकाळी स्नान करून श्रीगणेशाचे दर्शन घेऊन भोजन करण्याचा महाराजांचा शिरस्ता होता. परंतु या गावी श्री गणपतीचे मंदिर नव्हते. पूर्वीचे मंदिर यवनी  टोळ्यांनी उध्वस्त केल्याचे महाराजांना गावकऱ्यांकडून समजल्यानंतर महाराजांनी नव्याने गजाननाची प्राणप्रतिष्ठा स्थानिक पुजाऱ्याच्या हस्ते करून तेथे स्थापना केली. त्या मंदिराच्या उभारणीच्या  खर्चासाठी रोख रक्कम आणि जमीनही इनाम दिली. पेशवाईच्या काळात चतुर्थीपासून दशमीपर्यंत गणेशपूजा पार पडू लागली. नंतर तर लोकमान्य टिळकांनी या गणेशपूजनाला सार्वजनिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे फार मोठे उपासक होते. त्यांची तपश्चर्या फारच कडक होती. त्यांनी श्रीगणेशाला मोरगावाहून चिंचवडला आणले असे सांगितले जाते. आपल्या राज्यातील आठ तीर्थक्षेत्रे अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या राज्यात मोरया गोसावी यांची गणेशभक्ती म्हणून जी कीर्ती पसरली त्या कीर्तीचा महिमा औरंगजेब बादशहा पर्यंत पसरला.बादशहा प्रभावित झाला आणि त्यांनी मोरया गोसावी यांच्या गणपती संस्थानाला इनामे दिली. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचे प्रतिध्वनी पुढे मराठेशाहीच्या आणि पेशवाईच्या वैभवातून सांस्कृतिक जीवनात उमटू लागले. पेशवाईत शनिवारवाड्यात श्री ची स्थापना,पूजा,अर्चना,आरती,मंत्रजागर वैगरे धार्मिक कार्यक्रम यथासांग केले जात असे. त्याचबरोबर या उत्सवात विद्वान,कथेकरी,हरिदास यांचे शाहीर, कलावंतिणी यांचे कार्यक्रम होत असत. विसर्जनाचा कार्यक्रम सुद्धा फुलांनी शृंगारलेल्या पालखीतून वाजत गाजत थाटामाटात होत असे. स्वतः श्रीमंत पेशेवे इतर सरदार दरबारी  प्रतिष्ठीतांसह पालखीबरोबर असत. पुढे ब्रिटिश आमदानीतही शिंदे,होळकर,पवार,पटवर्धन यासारख्या स्वतंत्र संस्थाने असलेल्यांच्याकडे गणेश उत्सव होत इतमामाने असे.

१८९२  मध्ये पुण्याचे सरदार नानासाहेब खाजगीवाले हे ग्वाल्हेर येथे गेले असताना दरबारी गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात करीत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावरून हा उत्सव यापेक्षाही अधिक आनंद आणि उत्सवी स्वरूपात पुण्यामध्ये करावा अश्या कल्पनेने ते परत आल्यानंतर श्री खाजगीवाले, श्री धोडवडेकर श्री भाऊ रंगारी यांचे तीन सार्वजनिक गणपती बसवले. सार्वजनिक गणेश उत्सवाची हि कल्पना लोकमान्य टिळकांना आवडली. या उत्सवाच्या माध्यमातून विस्कळीत होत चाललेला हिंदू समाज संघटित व्हावा ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे पाऊल पुढे पडेल हि कल्पना लोकमान्यानी हिरीरीने अमलात आणण्याचे ठरवून कार्यारंभाला सुरुवात केली. लोकमान्य हे जनसामान्यांच्या नाड्या पकडणारे, सांस्कृतिक घटनांना उजाळा देणारे जसे संस्कृती पूजक होते तसे राष्ट्र उत्थानाचा सतत विचार करणारे एक थोर तत्वचिंतक सुद्धा होते. सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु केलेला या उत्सवाबाबत प्रारंभी काही लोकांनी या गणेश उत्सवाला आक्षेप घेतला. समाजातील विशिष्ट वर्गाचा हा उत्सव असून मुसलमानांच्या मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या ताबूत मिरवणुकांना विरोध करण्यासाठी हे टिळकांच्या डोक्यातून निघाले असल्याची टीका जाहीरपणे लोक करू लागले. महाराष्ट्रात त्या वेळी काही ठिकाणी प्लेगची साथ पसरली होती, आता हि साथ का पसरली तर देवघरातला गणपती चौकात आणून बसविला म्हणून अशी सडकून टीका होऊ लागली. परंतु लोकमान्यांच्या प्रभावी राष्ट्रव्यापी नेतृत्वापुढे या आक्षेप घेणाऱ्यांचे काही चालले नाही. पुण्यात पहिला सार्वजनिक गणपती स्वतः टिळकांनी १८९४ मध्ये विंचूरकरांच्या वाड्यात बसवला. याबाबत अलीकडे वाद असला तरीही या उत्सवाला सार्वजनिक आंदोलनाची पार्श्वभूमी करण्याचा मान लोकमान्यांनाच जातो. समाजातील सर्व थरातील जाती-जमातींचे लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले. पुढे तर कोचीनपासून कलकत्त्यापर्यंत शेकडोंच्या संख्येने सार्वजनिक उत्सव साजरे होऊ लागले. इतकेच नव्हे तर एडन नैरोबीपर्यंत परदेशात हि उत्सवाची लाट गेली. ब्रिटिश प्रशासनाने सुद्धा हिंदू-मुसलमानांच्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही.

टिळकपर्वात सार्वजनिक गणपती उत्सव म्हणजे ज्ञानाची सदावर्तेच होती. स्वतः लोकमान्य टिळक, चि.केळकर, नाट्याचार्य खाडिलकर
काळकर्ते परांजपे,महर्षी शिंदे, मदन मोहन मालवीय, सरोजिनी नायडू, बिपीनचंद्र पाल, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, सेनापती बापट, रँग्लर परांजपे, वीर सावरकर, दादासाहेब खापर्डे यांच्यासारखे हिंदू वक्ते ज्याप्रमाणे होते, त्याप्रमाणे मौलवी सय्यद मुर्तुजा, बॅ. आझाद, डॉ एस. एम.अल्लि, जनाब गुलशेरखान, रसुलभाई यासारखे मुसलमान वक्तेही होते. परदेशी मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशाचे स्वराज्य याचा प्रचार यातून मोठ्या प्रमाणात होत असे.  पुण्यातील सोट्या म्हसोबाच्या गणपतिच्यापुढे .. . सोनोपंत दांडेकरांच्या अध्यक्षतेखाली श्री गुलाम दस्तगीर यांची सतत ७३० दिवस व्याख्याने झाली. पुढे गांधीयुगातही गणेश उत्सवात राष्ट्रीय चळवळीने अधिक जोर धरला. खादीचा प्रचार, सत्य, अहिंसा, सत्याग्रह, असहकार, कायदेभंग, ग्रामोध्दार, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निर्मूलन यासारख्या अनेक उपक्रमांची माहिती जनतेला होऊ लागली. त्याचबरोबर गणेशोत्सवातील मेळ्यातुन अनेक कलावंत, वक्ते, कीर्तनकार, नृत्यकार, शाहीर, गवई, नट यांच्या कलेला वाव मिळाला. समाजातून नेतृत्व पुढे येऊ लागले. दातृत्व वाढीस लागले. समाजा-समाजातील भेदाभेद दूर होऊन समता प्रस्थापित होण्यास फार मोठे सहाय्य झाले. आजघडीला गणपती उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. हा उत्सव अधिकाधीक करमणूक प्रदान होत गेला. तरी त्याचे भावनिक अस्तित्व आजही टिकून आहे. थोडक्यात काय देवांचा देव श्री गणेश हा इथल्या सामाजिक उत्थानासाठी आवश्यक अशा प्रेरणा जागवणारा देव आहे. इथल्या सांस्कृतिक समन्वयाच प्रतीक होऊन राहिलेला देव आहे. प्रथम या उत्सवाकडे राष्ट्रीय उत्सव म्हणून बघितले गेले. या उत्सवाचा विचार करता १८९३ आरंभापासून ते १९२० लोकमान्यांच्या मृत्यूपर्यंत त्यानंतर १९२० ते १९४७ देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, १९४७ ते १९८०, १९८० नंतर आजच्या तंत्रज्ञान-संगणक युग असे टप्प्यांचा कालखंड आहे. सुरुवातीच्या नऊ दशकांत नव्हता तो फरक गेल्या तीन दशकात जाणवतो आहे. गेल्या १२५ वर्षात समाजात, देशात आणि जगातही प्रचंड स्थित्यंतरे झाली. दोन जागतिक महायुद्धे झाली. आपल्या देशाची पाकिस्तानबरोबर तीन तर चीन बरोबर एक अशी युद्ध झाली.
देशहिताची कृती सर्वसामान्यांच्या मनातही उफाळून यावी या हेतूने टिळकांनी स्थापन केलेल्या गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरूपाबद्दल खंत व्यक्त करावीशी वाटतेय. लोकमान्यांनी म्हणा कि भाऊसाहेब रंगारी यांनी म्हणा सार्वजनिक गणेशोत्सवाचे लावलेल्या या रोपट्याचा वेल अमरवेलीसारखा चांगलाच फोफावला आहे. महाराष्ट्रातीलच गणेशोत्सवाची संख्या ६० हजाराहून अधिक आहे. दिवसेंदिवस यात वाढ होतच आहे पण 'गणेश' बाजूला पडून 'उत्साही उत्सवच' जास्त होत आहे हि दुःखदायक बाब आहे. या उत्सवाचे आज जाहिरातीकरण अधिक होत आहे. काहीजण आपल्या प्रतिष्ठेसाठी तर काहीजण मोठेपणातून सर्वप्रकारचे लाभ मिळवण्यासाठी या उत्सवाचा वापर करीत आहेत. लोकमान्यांनी या उत्सवातील आपला उदात्त हेतू राष्ट्रीय बाणा जागृत करण्यासाठी जपण्यासाठी ठेवला. तो हेतू नष्ट होतो कि काय असेच वाटत आहे. कार्यक्रमातील विकृतता, मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक मशीन, विसर्जनाच्या मिरवणुकीतील फटाके आणि दणदणाटात अचकट-विचकट विकृत नाच करीत मिरवणूक तासनतास चालवणे. अलीकडे तर पाट पूजन, मंडप पूजन, पाद्य पूजन असे नवीन फंडे आले आहेत. एकाच विभागात राजा-महाराजा-नवसाला पावणारे असे विराजमान होत आहेत. प्रसिद्धीचा झोत आपल्या मंडळावर यावा यासाठी सेलिब्रेटी ना गाऱ्हाणे घालून मंडपात आणले जात आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी शतकापूर्वीपासून सुरु केलेला हा उत्सव आजही आपले उदिष्ट बऱ्याच प्रमाणात जपवणूक करून आहे  ! गणेशोत्सव हा केवळ मराठी माणसांचा सण म्हणणे बरोबर होणार नाही. या निमित्ताने सर्व धर्मातील राज्याराज्यातील माणसांचा हातभार या उत्सवास लागतो. गणेशोत्सवाच्या मंडपासाठी बांबू पुरवणारी मंडळी मुस्लिम, ताडपत्री कच्छि, वेलवेट सिल्कचे कापड सिंधी, गणेशमूर्ती मराठी, गणेश विसर्जन कोळी, ताशा,बंद,लेझीम हिंदू-मुलसलमान, आणि महाआरतीसाठी गुजराथी,जैन,पंजाबी, दाक्षिणात्य मंडळी असतात. मराठी मनात गणपती उत्सवाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. शेवटी त्यातही आजच्या समाजाचे प्रतिबिंब पडल्याखेरीज राहील कसे ? आजघडीला गणपती उत्सवाचे स्वरूप बदलले असले, हा उत्सव अधिकाधीक करमणूक प्रदान होत जात असला तरी त्याचे धार्मिक आणि भावनिक अस्तित्व बऱ्याच प्रमाणात कालातीत टिकून राहणार आहे.

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704






वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...