पोलादपूर अस्मिता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोलादपूर अस्मिता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

महाराष्ट्राचा विराट महापुरुष : आचार्य अत्रे

महाराष्ट्राचा विराट महापुरुष : आचार्य अत्रे

 

[  यंदा आपण आचार्य अत्रे यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष साजरे करीत आहोत. अत्रे हे खरे तर चालती बोलती सरस्वतीच ! त्यांनी मराठी भाषा आपल्या लेखणीने एका वेगळ्या शैलीने सुंदर केली. आपल्या महाराष्ट्रीय नव्या पिढीला आंदोलनांचा जो वारसा लाभला, तो बहुअंगी दमदार नवी दृष्टी देणारा आहे. आचार्य अत्रे अशा थोर सेवकांपैकी एक. झेंडूची फुले हे उत्तम मराठी विडंबन कवितांजली लिहिली, कर्मकांडाचे स्तोम माजवणाऱ्यांची पंचाईत करणारे साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा सारखे नाटक लिहिले. मराठातील अग्रलेख गाजले, पत्रकार म्हणून संयुक्त महाराष्ट्राची चळवळीत लोकजागृती यशस्वीपणे केली. श्यामची आई द्वारे साने गुरुजींना घराघरात पोहोचविले. महात्मा फुले हा विलक्षण चित्रपट निर्माण करून तो काळ जिवंत करून महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईचें कार्य सर्वांना निकोप रीतीने समजावले. वस्त्रहरण करून दांभिक नेत्यांवर सडेतोड टीका केली. नंतर त्यांच्यावर त्यांनी हृदयस्पर्शी विस्तृत मृत्यूलेखमालाही लिहिल्या. चतुरस्त्र बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि बहुरंगी व्यक्तिमत्त्व लाभलेला सुपुत्र महाराष्ट्राला लाभला. अत्रे यांची लेखणी आणि वाणी यात श्रेष्ठ कोण हे सांगणे कठीण आहे. महाराष्ट्र हा त्यांचा श्वास होता. हशा आणि टाळ्यांचे ते बादशहा होते. दोन्ही शस्त्रे त्यांनी हवी तशी वापरली. अत्रे यांनी स्वतःच निर्माण केलेल्या कालखंडाचा ठसा पुसता येणार नाही यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !  ]

 



एकोणविसावे शतक अस्ताला जाताना म्हणजे १३ ऑगस्ट १८९८ रोजी महाराष्ट्राच्या क्षितिजावर विसाव्या शतकात अनेक क्षेत्रात तेजाने तळपत राहणाऱ्या एका महान महाराष्ट्र सुपुत्राचा जन्म झाला. विद्वतेची कवचकुंडले जन्मताच घेऊन ल्यालेल्या या सुपुत्राच्या जीवनाची अखेर  १३ जून १९६९ रोजी झाली. महाराष्ट्रातील एक अजस्त्र शक्ती लोप पावली तेव्हा मराठीजणांच्या तोंडून उस्फुर्त शब्द निघाले.....दहा हजार वर्षात असा महापुरुष जन्माला नाही अन जन्मणार सुद्धा नाही.  त्या व्यक्तीचे नाव म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव तथा प्र. के. अत्रे. अत्र्यांनी आपल्या झंझावाती व सर्वस्पर्शी आयुष्यात विविध क्षेत्रात केलेल्या डोंगराएव्हढ्या कामगिरीमुळेच यावर्षी त्यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष साजरे करताना महाराष्ट्र त्यांचे गुणगान करणार आहे. ऐन उमेदीच्या काळात दबकत दचकत कवी म्हणून महाराष्ष्ट्र सारस्वतांच्या दरबारात वळचणीला का होईना पण कशीबशी जागा मिळवणारे अत्रे त्यानंतर आपल्या अंगच्या अचाट पराक्रमाने विडंबनकार,  शिक्षणतज्ज्ञ, नाटककार, विनोदीवक्ता, चित्रपटकथा लेखक, राष्ट्रपती पदक विजेता चित्रनिर्माता, सव्यसाची पत्रकार, महानगर पालिका आणि विधानसभेत लोकांचे प्रश्न सडेतोडपणे मांडणारा लोकप्रतिनिधी, लोकप्रिय वर्तमानपत्राचा संपादक, महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी राहून नेतृत्व करणारा झुंजार नेता. अशा एकामागून एक कर्तृत्वाची थोर दालने सहजगत्या सर करीत महाराष्ट्र मंडळीत आपला असा काही ठसा उमटवीते झाले की, गेल्या शतकाचा इतिहास लिहिताना इतिहासकारांना पदोपदी त्यांना मानाचा मुजरा करणे भागच पडणार आहे.  हुतात्म्यांच्या बलिदानातून, असंख्यांच्या त्यागातून, सेनापती बापट, एस. एम. जोशी , कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या समर्थ नेत्यांच्या तेजस्वी लढ्यातून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. परंतु या नेत्यांनी उभ्या केलेल्या लढ्याला विराट स्वरूप प्राप्ती झाले ते आचार्य अत्रे यांच्यामुळेच असे यथार्थ वर्णन महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी एकदा केले, त्याची प्रचिती संयुक्त महाराष्ट्र लढ्यात आचार्य अत्रे यांनी 'मराठा' दैनिकाची रणभेरी वाजविली तेव्हा आली. दैनिक 'मराठा' रणांगणावर, लाखोंच्या लोकसमुदायात जन्माला आले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक नामवंत नेत्यांचा जसा सहभाग होता तसेच अनेक अनामिक कार्यकर्त्यांचे योगदान होते. यांनी महाराष्ट्राला मुंबई मिळवून तर दिलीच, पण भारताच्या नकाशावर 'महाराष्ट्र' हे नाव जे आलं ते केवळ आचार्य अत्रेंच्या शक्तीमुळे, नावामुळे व दबदब्यामुळेच !
सर्वांना भाषिक राज्य मिळते मग मराठी माणसावर दिल्लीकरांचा रोष का ? मुंबई महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र हे नाव राज्याला मिळत नाही असे पाहताच हा लढा यशस्वी करण्यासाठी त्यांनी सिंहझेप घेतली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या ध्येयापोटी महाराष्ट्रभर या माणसाने शेकडो व्याख्याने देऊन रक्त ओकले, अविश्रांत झुंज दिली. आंदोलन एकहाती पेलताना त्यांच्या वाणीने व लेखणीने आग ओकली अगदी जोड्यासजोडा मारण्याची झुंजार भूमिका घेतली.

'संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" या घोषणेत 'च' आणला  तो आचार्य अत्रे यांनी आणि म्हणून 'च'चा आग्रह कशाला असे म्हणणाऱ्या यशवंतराव चव्हाणांना आपल्या नावातील  'च'काढून टाकला तर काय होईल ते पहा असे  सुनावले ते आचार्य अत्रे यांनी. शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केली तेव्हा 'हर हर महादेव' ही मराठयांची युद्धघोषणा होती, तशी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ' झालाच पाहिजे' ही मराठी जनतेची रणगर्जना झालेली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना धारेवर धरले होते, पण त्यांना केंद्र सरकारने संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत बोलावले तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी जे भाषण आचार्यांनी केले ते वाचले म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. ते आपल्या भाषणात म्हणाले, "आमदार यशवंतरावांच्या अंगी काही अलौकिक गुण नसते तर ते या पदाला पोहोचलेच नसते. आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांना अडचणीच्या काळात भारताचे सरंक्षणमंत्री म्हणून पाचारण केले नसते. त्यांचा स्वभाव, त्यांचे वागणे आणि बोलणे हे सारे काही असे आहे की त्यांचे शत्रुत्व करु इच्छिणाऱ्या माणसाला सुद्धा यशस्वीपणे फार काळ शत्रुत्व करणे शक्य होत नाही असे मी माझ्या अनुभवावरून सांगतो.
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी फ्लोरा फाऊंटनमध्ये गोळीबार झाला होता  व एके दिवशी १४ माणसे मारली गेली होती.मग त्यावेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांचा त्याच दिवशीच्या दैनिकातून आचार्य अत्रे यांनी जो उद्धार केला त्याला तुलना नाही. आचार्य अत्रे हे जेव्हा तोफ डागत तेव्हा शत्रूला साफ संपविण्याच्या तयारीनेच डागत असत. तेथे अर्धवट कारभार नव्हता. एकीकडे वेधक, भेदक शब्दांचे गाठोडे त्यांच्याकडे होते. शिव्या व ओव्या सारख्याच तोलाने वापरण्याचे शब्द सामर्थ्य त्यांच्याकडे होते. लेखणी व वाणी या दोन्ही रिद्धी व सिद्धीसारख्या त्यांच्या सेवेस हजर होत्या. त्यांच्या मदतीने त्यांनी चळवळीचे पेटत्या मशालीमध्ये  रूपांतर केले. अत्र्यांचे राजकारण कोणाला पटो वा न पटो परंतु त्यातील उत्कटता सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत जाऊन भिडली होती यात शंका नाही आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातून जी महान कामगिरी बजावली तिला तोड नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची गर्जना त्यांनी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात घुमविली. आचार्य अत्रेंनी मराठा हे दैनिक सुरु करण्याचे धाडस केले आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. पहिल्या संपादकियात त्यांनी लिहिले, महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, भाषा आणि साहित्य ज्यांनी निर्माण केले त्या महानमंगल महापुरुषांचे भक्तिभावाने स्मरण करून, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्यानी आपल्या प्राणांचे बलिदान केले त्या हुतात्म्यांना वंदन करून आणि तीन कोटी मराठी जनतेच्या चरणावर आदराने मस्तक ठेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या सेवेसाठी आम्ही हे मराठा दैनिक सुरु करीत आहोत. तेजस्वी लिखाणाने आणि घणाघाती वक्तृत्वाने त्यांनी भांडवलशाही वृत्तपत्रांची चांगलीच रेवडी उडविली. बहुजन विरोधी प्रचाराला सडेतोड उत्तरे देऊन त्यांनी भांडवलधार्जिण्या वृत्तपत्रांची बोबडी वळवली.

अत्र्यांमधील कलावंताने, साहित्यिकाने, मराठी जनतेची नस अचूक पडकली होती. तिच्या आशा-आकांक्षाशी हा महान  कलाकार एकरूप होऊन गेला होता. तमाम मराठी जनांच्या मनातील स्पंदने, हेलकावे, भावभावना, राग-द्वेष या साऱ्या छटा आचार्य अत्रे यांच्या लिखातून बाहेर पडतात आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे आचार्य अत्रे असे समीकरण होते. सर्वत्र संचार असल्याने सर्वांना आचार्य अत्रे आपले वाटत; कारण ते आपल्या मनातले बोलतात असे जनतेला वाटे. सारांश काय तर सारा महाराष्ट्र आचार्य अत्रे यांनी पालथा घातला, सारा महाराष्ट्र पिंजून काढला; त्यामुळे सर्वत्र सभा, प्रबोधन, परिवर्तनाचा नारा आणि अन्यायाविरुद्ध लढा यांची प्रेरणा सातत्याने मिळत गेली. मराठी माणसाला न्यायाची 'चाड' आणि अन्यायाची 'चीड' आहे. तितकी इतर प्रांतातील जनतेला नाही. असे ते मराठी माणसाचे वेगळेपण सांगताना नेहमी म्हणत असत. 'चांदया'पासून 'बांदया'पर्यंत या शब्दप्रणालीचे प्रवर्तकच आचार्य अत्रे !


अत्र्यांची वाणी आणि लेखणी मराठी माणसांच्या मनातील विचार नेमका व्यक्त करीत होती. आणि म्हणूनच महाराष्ट्रात कोणतीही छोटी-मोठी घटना घडली तर त्यावर आचार्य अत्रे मराठा मधून काय  म्हणताहेत ?  अत्र्यांनी अग्रलेखातून कोणाला ठोकून काढले आहे ? याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष असे. आचार्य अत्र्यांमधील साहित्यिकाचा - संपादकाचा हा प्रचंड विजय होता. अत्र्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर कितीही कठोर टीकेची राळ उठवली तरी या माणसाने महाराष्ट्रावर अपरंपार प्रेम केले ही गोष्ट कुणीही नाकारू शकणार नाही. महाराष्ट्राचे मोठेपण त्यांनी पूणर्पणे जाणून घेतले होते. महाराष्ट्राचे मानदंड सूक्ष्मतेने अवलोकिले होते. आधुनिक महाराष्ट्राच्या मानदंडांचा 'तेल्या - तांबोळ्यांपर्यंत राजकारण गेले पाहिजे' संदेश जवळजवळ  ४० वर्षानंतर अमलात आणला तो याच व्यक्तीने आणि जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरच दिल्लीकरांकडून घाला पडण्याची वेळ आली तेच सतराव्या शतकांतील मराठी क्षात्रधर्माची सही सही आठवण देणारा पराक्रम ऊर्ध्वबाहू करून पोट तिडकीने लढले ते अत्रेच ! अत्रे नुसते महाराष्ट्र धर्माचा जयजयकार करून थांबले नाहीत तर त्या धर्माची सरिता या विसाव्या शतकातील बहुरंगी जीवनाच्या अनेक दालनातून  फिरवत पुढे नेण्याचे श्रेय निश्चितपणे त्यांच्याकडे जावे. अत्र्यांनी अनेक क्षेत्रात मिळविलेले विजय प्रचंड होते. त्याचप्रमाणे त्यांनी पत्करलेले पराभवही तेवढेच प्रचंड होते. जीवनाबद्दलचे त्यांचे कुतूहल कधीच संपले नाही. आणि म्हणूनच जीवनाचे प्रत्येक अंग हे एक आव्हान समजून त्यांनी त्यात बेदरकारपणे प्रवेश केला. आपल्या पराक्रमाने त्यांनी त्या त्या जीवनांगाचा पूर्ण आस्वाद अन उपभोग घेतला. आणि प्रत्येक वेळी एखाद्या अनासक्त योग्याप्रमाणे ते त्या जीवनांगातून  सहजतेने मुक्त झाले. कशातही अडकून पडले नाहीत. आचार्य विनोबा भावेंना 'वनरोबा' म्हणून चपराक लागवणारे अत्रे विनोबांच्या वाङमय साहित्याचे निस्सीम भक्त बनले. सदोदित आपल्या वक्तृत्वातील विनोदाचे भुईनळे उडविणारे अत्रे, डॉ आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणावेळी हजारोंच्या डोळ्यात अश्रू आणू शकले. अत्रे सर्वत्र होते तरीही सर्वाहून अत्रे आणखी कितीतरी अधिक होते. त्यांच्या एवढे पूर्ण जीवन जगलेला माणूस शतकातून एखादाच जन्माला येतो. जीवनाची अशी एकही छटा नसेल की जिचा अविष्कार अत्र्यांच्या जीवनात झालेला नाही. राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांच्या निधनावेळी दुखवट्याचा संदेश पाठविला होता. त्यात अत्र्यांचे वर्णन "Writer & Fighter of Maharashtra' असे केले होते. राकट देशा - कणखर देशा असे महाराष्ट्राचे पूर्ण प्रतिबिंब लोकांनी आचार्य अत्र्यांच्या व्यक्तिमत्वात पहिले होते. आचार्य अत्रे नसते तर 'मराठा' दैनिक जन्माला आले नसते. आणि पुढे संयुक्त महाराष्ट्र झाला नसता. एका दैनिकाने 'मराठाने' आपल्या मातृभाषेचे एक राज्य निर्माण केले ही इतिहासातील एकमेव घटना. म्हणूनच त्यांना शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त मानवंदना !

लोकप्रियता तुझे नाव आचार्य अत्रे ! आचार्य अत्रे !! महाराष्ट्रव्यापी असे व्यक्तिमत्त्व होते त्यांचे ! महाराष्ट्रप्रेम, महाराष्ट्राचा अभिमान, मराठी बाणा, मराठीपण आणि मराठी अस्मिताच त्यांच्या जीवनातून, लिखाणातून, भाषणातून प्रदर्शित होते. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माती हीच त्यांची चतु:सूत्री होती. आचार्य अत्रेंसारखी भ्रमंती, वाचनातले सातत्य, सततचे लिखाण, सारखी बडबड, सारखी व्याख्याने, सतत वाङमयीन व्यग्रता, सारखे चिंतन, मनन, एखाद्या तपस्वी सारखे ऋषितुल्य जीवन व्यतीत केले या महापुरुषाने.  आचार्य अत्रे या एकाच प्रचंड माणसात १९२५ ते ४० या काळात दहा अलौकिक अत्रे सामावलेले होते.

साहित्याला लोककल्याणकारी स्पर्श हवा असा आग्रह धरीत राहिले. दुष्ट रूढी, दांभिकपणा, अन्याय यावर सतत घणाघाती हल्ले चढवले. प्रसिद्ध-अप्रसिद्ध, लहान-थोर गुणिजनांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. समाज सुधारकांच्या आणि दिनदुबळ्यांच्या पाठिशी कायमचे उभे राहिले.
२०२३ साल हे महाराष्ट्राचे लाडके 'प्रचंड पुरुष' आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रभर साजेसे अनेक छोटे मोठे कार्यक्रम सर्वत्र होत आहेत. अत्र्यांएवढी अफाट आणि अबाधित लोकप्रियता स्वातंत्रोत्तर काळात कुणाही मराठी साहित्यिकाला लाभली नाही याचे हे द्योतक आहे.


 - रवींद्र मालुसरे

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

 

सोमवार, १० जुलै, २०२३

पोलादपूरचा समग्र इतिहास सांगणारा विशेषांक

 पोलादपूरचा समग्र इतिहास सांगणारा विशेषांक 

अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यावर 

जागी होते अस्मिता 

अन पेटून उठतो माणूस संघर्षासाठी 

तुम्ही म्हणाल प्रश्न संघर्षाने सुटत नाहीत 

ठाऊक आहे आम्हाला संघर्ष उध्वस्त करतो 

माणसातल्या माणूसपणाला 

आमचा संघर्ष नाही माणसाविरुद्ध

आमचा संघर्ष आहे माणूसपणासाठी

करावाच लागेल संघर्ष आम्हाला 

तालुक्याच्या न्याय हक्कासासाठी 

या ओळी संपादकीयात छापून १९९८ मध्ये म्हणजे २५ पर्षांपूर्वी 'पोलादपूर अस्मिता' चा विशेषांक प्रकाशित केला होता. पोलादपूरचा समग्र इतिहास सांगणारा हा विशेषांक कोणाला वाचायचा असेल तर तर 9323117704 वर मेसेज पाठवा..... सन १९९८ मध्ये मी सीताराम रेणुसे,सीतारामबुवा कळंबे, ज्ञानेश्वर मोरे, दिवंगत अशोक जंगम, सुनील मोरे-काटेतली (बडोदा), मुजुमले गुरुजी, प्रकाश कदम, ज्ञानोबा ला कळंबे या माझ्या सहकार्यांना सोबत घेत "पोलादपूर तालुका विशेषांक" प्रकाशित केला होता,  त्यांनी विशेष मेहनत घेतल्याने हा अंक त्यावेळी प्रकाशित करू शकलो होतो.

आता तो अंक दुर्मिळ झाला आहे. अजूनही त्या अंकाबाबत विचारपूर होत असते.

या अंकात .......

(१) पोलादपूरच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचा इतिहास, 

(२) चालीरीती व जाती जमाती, भौगोलिक परिस्थिती, 

(३) ऐत्याहासिक स्थळे, तालुक्याचा सांस्कृतिक वारसा काल-आज-उद्या, 

 (४) तालुक्याची स्वयंपूर्णता, उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर उपाय, 

 (५) शैक्षणिक आढावा, 

(६) तालुक्याच्या विकासाची दिशा आणि दशा, 

 (७) गोपीनाथभाई गांधी घराण्याची स्वातंत्र्य चळवळीतील तेजस्वी परंपरा, 

(८) नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चार शब्द, 

(९) पोलादपूरच्या ऐत्याहासिक वास्तू अस्मितेचा ठेवा,

(१०) तालुक्यातील गडभ्रमंती, 

 (११) साद सह्याद्रीची भटकंती तालुक्यातील दऱ्याखोऱ्याची, 



इत्यादी वाचनीय आणि उपयुक्त माहिती छापली आहे. कोणाला हा अंक पाहिजे असल्यास ९३२३११७७०४ या व्हॅट्सऍपवर किंवा chalval1949@gmail.com या मेलवर नावासह मेसेज पाठवावा..... 

रवींद्र मालुसरे 

(अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई )  

सोमवार, ३ जुलै, २०२३

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःचा चेहरा ओळखावा - रवींद्र मालुसरे

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःचा चेहरा ओळखावा  - रवींद्र मालुसरे 





मुंबई : (रवींद्र मालुसरे) 


महिन्यातील एक दिवस देवासाठी, समाजासाठी समर्पित भावाने कार्य करण्यास पांडुरंगशास्त्री आठवलेले यांनी स्वाध्यायींना शिकविले व भक्तीला पूजापाठापलीकडे नेऊन सामाजिक कार्याचा आशय प्राप्त करून दिला. यातून ‘योगेश्वर कृषी’, ‘मत्स्यगंधा’ अशा उपक्रमांचा प्रारंभ झाला व ते अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाले. ‘‘ ‘स्व’चा आत्मगौरव करीत परस्पर भेद, द्वेष विसरून प्रेमाने माणूस माणसाजवळ आणण्याचा स्वाध्याय हा एक बुद्धिगम्य मार्ग आहे,’’‘‘स्व’ला ओळखा, दुसऱ्यांच्या ‘स्व’चा आदर करा, तेजाची पूजा करा, प्रेमभाव जपा, स्वत:ला दुर्बल, शूद्र समजू नका, आपल्या हृदयस्थ देवत्वाला ओळखून आत्मगौरव संपादन करा,’’ असे सांगत स्वाध्याय परिवाराचे हे कार्य दादांनी मराठी एवढेच गुजराती बांधवांमध्ये, तेही आदिवासी, कोळी या समाजामध्ये मोठ्या आत्मीयतेने रुजविले. नव्वद टक्क्याहून ज्या स्कॉलर विद्यार्थ्यांनी मार्क्स मिळवले आहेत त्यांनी आपले ध्येय निश्चित करताना हा विचार मनात कायमस्वरूपासाठी रुजवला पाहिजे असे उदगार सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय न्यूरो स्पायन सर्जन डॉ प्रेमानंद रामाणी यांनी काढले. श्री शांता सिद्धी ट्रस्टच्या वतीने दादर येथे संस्थेच्या या वेबसाईटचे उदघाटन आणि इयत्ता दहावीमध्ये उत्तम मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला होता. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, डाइव्हिंग या ऑलम्पिक या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय क्रीडाप्रकाराचे  पंच  श्री मयूर व्यास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

डॉ रामाणी विद्यार्थ्यांना पुढे असेही म्हणाले की, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यारणा, ध्यान आणि समाधी. ही आठ अंगे एकत्रित येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण रचना तयार होते.  व्यक्तीला आरोग्य, तंदुरुस्ती, संपदा आणि शांती यांचा एक भक्कम पाया घालण्यासाठी ही आठ अंगे अत्यावश्यक आहेत. योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाच्या या आठ अंगांमध्ये प्राविण्य मिळवणे कठीण आहे. पण कोणत्याही व्यक्तीसाठी हे अशक्य नाही. ही अंगे आपल्याला अधिक सचेतन आणि जागरूक होण्यात मदत करतात. यामुळे आपल्याला आयुष्याचे सर्वाधिक चीज करण्याची क्षमता प्राप्त होते.तर रवींद्र मालुसरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, दहावी-बारावीचे सर्वोच्च मार्कांचे यश म्हणजे आई -वडिलांची लादलेली आकांक्षा पूर्ण करण्याचे यश. परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढच्या आयुष्यात आपली स्वतःची वाट निवडायला हवी. का, कशासाठी, कुठपर्यंत पोहोचण्यासाठी  असे प्रश्न मनात धरून विशिष्ट ध्येय ठेऊन आपण निवडलेला मार्ग आनंद, यश, कीर्ती आणि पैसे देतो. तंत्रज्ञानाच्या शतकात वावरताना स्वतःचा चेहरा ओळखा  म्हणजे तुमच्या गुणवत्तेला न्याय दिल्यासारखे होईल. श्री मयूर व्यास यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, एकातरी क्रीडाप्रकारात विद्यार्थ्याने मैदानात उतरायला हवे. संस्थेची माहिती  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कार्यवाह भूषण जॅक यांनी केले. 


सोहम मोये, सिया मोये, वेदांत पराग व्होरा, महालक्ष्मी श्रीधर शानबाग,रुजूला भाटकर, श्रावणी जोशी, रीती करण रावत, साची जवाहर खांडेपारकर, आषिता आरोसकर या ९२% हुन अधिक मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. किशोर  कुलकर्णी, संजय  दिवाडकर, जयंत  गायतोंडे, विनायक  पंडीत, संजय  कुलकर्णी, सतीश  दाभोळकर, दीपक  देसाई इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला हजर होते














रवींद्र मालुसरे





अध्यक्ष - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, ९३२३११७७०४  

मंगळवार, २७ जून, २०२३

मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा

 'मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा'

रवींद्र मालुसरे 

महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखली जातेतर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके  सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या  ठेक्यावरग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. मुंबईत विशेषतः मध्य मुंबईच्या गिरणगावात  विठ्ठल मंदिरासह काही ठिकाणी गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. बदलत्या काळासोबत मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा अस्तंगत होत आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही महाराष्ट्रीयन परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली श्री विठ्ठलाची मंदिरे आणि त्यात होणारे अखंड हरिनाम सप्ताह. १९८० नंतर मुंबईतील गिरण्या आणि कारखाने धडाधड बंद झाले. कष्टकरी मुंबईबाहेर फेकला गेला आणि त्याबरोबर गिरणगावातील चाळीचाळीतून उमटणाऱ्या आणि मंदिरातील भजनांच्या सुरावटी मंदावल्या.  मुंबईतील गिरण्या आणि कारखाने बंद पडल्यानंतर कष्टकरी मुंबईकर एक तर उपनगरात फेकला गेला किंवा आपल्या गावाकडे परतला. त्यामुळे मुंबईच्या चाळीचाळीत आणि छोट्या मोठ्या मंदिरातून ऐकू येणारे भजनमंजुळ स्वर मंदावले. 

पूर्वी गिरणगावात बारश्यापासून ते लग्नाच्या सत्यनारायणाच्या पुजेपर्यंत त्यापुढे एखाद्या मृत्यूनंतर स्मशानापर्यंत ते उत्तरकार्याच्या दिवसापर्यंत भजन कीर्तन मोठ्या संख्येने होत असे. त्याची जागा आता बेंजो डीजेच्या धांगडधिंगायने घेतली आहे. अशा परिस्थितीत मुंबईची भजन संस्कृती जगविण्यासाठी निष्ठेने जी थोडी मंडळी प्रयत्न करीत आहेत त्यांचे योगदान फार मोठे आहे. पारंपरिकतेची कास धरत काहीजण मुंबईचा हा ठेवा आपापल्या परीने जपत असल्याचे दिसून येत आहे. काळाच्या ओघात मुंबापुरीतील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह क्षीण होत तर काही पडद्याआड जाऊ लागले आहेत.

मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ म्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळ जवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीचीत्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर देवींची मंदिरे हि पुरातन आहेत. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची शंभर वर्षांहून अधिक वर्षे वारकरी परंपरा जोपासणारी अनेक मंदिर सुद्धा मुंबईत आहेत. प्रत्येक आषाढी एकादशीला टाळ मृदुंगाचा गजर आणि 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषात तल्लीन वारकरी हेच दृश्य मुंबईतल्या मंदिरांमध्येही पहायला मिळतं.  श्री विठ्ठल रखुमाई दैवताचे भौगोलिक स्थान मुंबई शहरात कुठे आहे आणि त्याठिकाणी काय पारमार्थिक कार्यक्रम होतात याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

वडाळा - वडाळा बस डेपोजवळकात्रक रोडवरील श्री विठ्ठल मंदिर सर्वाना परिचित आहे. एकेकाळी या मिठागराच्या बेटावर व्यापारी असत. त्यातील एका व्यापाऱ्याला विठ्ठल-रखुमाई ची मूर्ती  सापडलीत्यांनी ती पंढरपूरला संत तुकाराम महाराजांना दाखवली आणि त्यांनी मंदिर बांधण्यास सांगितले अशी आख्यायिका आहे. पुढे मुंबई विस्तारात गेली आणि या मंदिराचा लौकिक वाढू लागला. आषाढी एकादशीला सर्वदूर मुंबईतील हजारो भाविक भक्त दिंड्या- पताका घेऊन येथे येत असतात.  मुंबईतील ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाहीत्यांच्यासाठी हे मंदिर एक ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून उभे आहे.

प्रभादेवी - प्रभादेवी गावासाठी कै. हरी दामाजी परळकर यांच्या स्मरणार्थ त्यांची सून श्रीमती ताराबाई परळकर यांनी हे मुरारी घाग मार्गावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर  सन १९०० मध्ये हे मंदिर बांधले. गुरुवर्य अर्जुन मामा साळुंखेगुरुवर्य नारायणदादा घाडगेगुरुवर्य रामदादा घाडगे अश्या चार पिढ्या परमार्थ करीत आहेत.  सन १९१५ च्या काळात ह भ प रामकृष्ण भावे महाराज मुंबईत  'जगाच्या कल्याणाया ध्येयाने प्रेरित होऊन आले होते. रामभाऊ हे श्री विठ्ठलभक्त आणि सेवाधारी होतेहाकेच्या अंतरावरील बाळकृष्ण वासुदेव चाळीत असा सप्ताह उत्तमरीत्या पार पडल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले होते. आपल्या आचार-विचाराव्दारे 'जग लावावे सत्पथीहेच कार्य ठळकपणे करणाऱ्या भावे महाराजांना रामभाऊ नाईक भेटले आणि विनंती केलीआमच्या मंदिरात सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरु करावा. त्यांनी या सुचनेचे स्वागत केले आणि मग सन १९२१ पासून गोकूळ अष्टमी निमित्त श्रावण शुद्ध चतुर्थीपासून पुढे सात दिवसांचा दुसरा अखंड हरिनाम सप्ताह प्रभादेवीत सुरु झाला. त्याच मंदिरात पुढे काही काळानंतर माघ शुद्ध दशमी पासून सात दिवसांचा तिसरा अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला. भावे महाराजांनंतर गुरुवर्य अर्जुनमामा साळुंखे आणि गुरुवर्य ह  भ प नारायणदादा घाडगे यांनी गुरुपदाची गादी सांभाळत महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गावोगावी श्री सद्गुरू भावे महाराज वारकरी समाजाचे पारमार्थिक कार्य अनेक अखंड हरिनाम सप्ताहाच्या मार्फत पोहोचवले आहे. सद्गुरू ह भ प श्री रामकृष्ण भावे महाराज यांनी उभारलेल्या धार्मिक चळवळीला म्हणजे मुंबई शहरातील अखंड हरीनाम सप्ताह सुरु करण्याला सन १९२३ मध्ये एकशे तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सद्गुरू भावे महाराज ट्रस्टची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारात सुसज्ज धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य ह भ प रामदादा घाडगे यांच्या गुरुपदाखाली ह भ प कृष्णामास्तर घाडगे यांच्या मार्गदर्शनाने मंदिरात अनेक भाविक भक्त वर्षभर पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पाडीत असतात. आषाढी एकादशीला मुंबईतील अनेक भजनी मंडळी तसेच दादर ते वरळी पर्यंतचे हजारो वारकरी तसेच शालेय विद्यार्थी वेशभूषा दिंड्या घेऊन या पुरातन मंदिरात देवाच्या दर्शनाला येत असतात.

बांद्रा - सरकारी वसाहतीत १९७६ पासून अस्तित्वात असलेल्या या मंदिरात श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती या काळ्या पाषाणातील तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती संगमरवरी स्वरूपात आहेत. संत मुक्ताबाईंची सुंदर तसबीर आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'संत मुक्ताबाई  पुण्यतिथी समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहसाजरा होत असतो. या मंदिरातील ४० वारकऱ्यांनी अनेक वर्षे 'आळंदी ते पंढरपूरअशी  पायी वारी केली आहे. आज ही वसाहत मोडकळीस आली आहेबरेच भाविक भक्त विस्थापित झाले आहेत तरीही आषाढी एकादशीला निष्ठेने उत्सव धार्मिक पद्धतीने पार पाडीत आहेत.

सेंच्युरी मिल वसाहत हरीहर संत सेवा मंडळ - वरळी येथील कामगार वसाहतीत प्रांगणात निवृत्ती महाराज समाधी पुण्यतिथी सोहाळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण १९६५ पासून आयोजित केले जाते. बिर्ला परिवार आणि रामप्रसादजी पोद्दार हे खरे या धार्मिक कार्यक्रमाचे आश्रयदाते होते. गिरणी कामगारांनी सुरु केलेल्या या सोहळ्यास वै ह भ प निवृत्ती महाराज देशमुख नागपूरकर यांनी व्यापक स्वरूप दिले. अकराशे अकरा वाचक बसविण्याचा संकल्प सोडला परंतु तो २१०० पर्यंत गेला. पारायणाचार्य वै पुंडलिक महाराज वेळूकर यांनी आयुष्यभर परायणाची धुरा वाहिली तर नानासाहेब कोठेकर यांनी कीर्तन संयोजनाची जबाबदारी सांभाळली. श्रीमद भगवद्गगीता पाठाची परंपरा ह भ प राणे गुरुजी यांनी तर भजन परंपरा भजनसम्राट वै ह भ प मारुतीबुवा बागडे यांनी केले. गेल्या ५९ वर्षात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणशंकरराव चव्हाणबाळासाहेब भारदेवि स पागे यांनी व महाराष्ट्रातील उत्तमोत्तम नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली आहेगिरणी संपापर्यंत प्रतिष्ठा पावलेल्या या सप्ताहात श्रवणभक्तीसाठी हजारो भाविक आणि अभ्यासू हजेरी लावीत असत.  रजनीकांत दीक्षितमनोहर राणेललन गोपाळ शर्मादत्ताराम लांबतुरे आदी कार्यकर्त्यांनी आजही ही परंपरा टिकवून ठेवली आहे.

लोअर परेल - येथील बारा चाळ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर . श्रीक्षेत्र पंढरपूरला बडवे मंडळीकडून भाविकांना होणार त्रास आणि यात्रेच्या वेळी शासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १९६७ मध्ये जुन्नरचे कीर्तन केसरी गुरुवर्य रामदासबुवा मनसुख यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरु होता. लोअर परेल येथील या मंदिरात भक्ती करणारे  ज्ञानेश्वर मोरे माऊली हे  वारकरी महामंडळाचे अध्यक्ष होते. तरुण वयातील एक अभ्यासू वक्ते म्हणून त्यांचा परिचय वारकरी पंथातील झाला होता. परंतु  ४ जानेवारी १९७३ त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी कोकणात १८ पारायणे करण्याचा संकल्प केला होता ते हयात असताना १४ पारायणे झाली उर्वरित ४ पारायणे त्यांच्या समाजातील अनुयायी यांनी केली. त्याच्यानंतर ह भ प कृष्णाजीराव शिंदे आणि पोपट बाबा ताजणे यांनीही संप्रदाय सांभाळण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.  सध्या गुरुवर्य अनंतदादामहाराज मोरे हे उच्च विद्याविभूषित संप्रदायाचे गुरुवर्य  म्हणून धुरा सांभाळत आहेत. श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूरला धर्मशाळा असून लोअर परेल येथील वर्षभर नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम आणि अखंड हरिनाम सप्ताह होत असतात. आषाढी एकादशीला लोअर परेल मधील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. 

वरळी कोळीवाडा - श्री शंकर मंदिर हे कोळी बांधवानी १८ ऑगस्ट १९०४ मध्ये बांधले. त्यानंतर १९२२ ला आळंदी निवासी गुरुवर्य तुकाराम महाराज कबीर त्याठिकाणी आले. आणि त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात केली. साधारण १९२५ पासून याठिकाणी त्रयी सप्ताह (तीन आठवड्यांचा) अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. तीन आठवडे सातत्येने चाललेला असा हरिनाम सप्ताह महाराष्ट्रात इतरस्र कुठेही नाही१९५३ पासून आजतागायत हैबतबाबा दिंडी क्रमांक १ रथाच्या पुढे आळंदी ते पंढरपूर अशी पायी दिंडी वारी या मंदिरातील भाविक भक्त निष्ठेने करीत आहेत. अगोदरच्या काळात बैलगाडीतून सामान घेऊन दिंडी निघत असे. मामासाहेब दांडेकरनारायणदादा घाडगेप्रमोद महाराज जगतापकेशवमहाराज कबीर यांच्यासह शेकडो मान्यवर कीर्तनकारांनी कीर्तने झाली आहेत. या मंदिरात आरतीसाठी १९०८ पासूनचा पुरातन ढोल आहे. आषाढी एकादशीनिमित्त कोळीवाड्यातील शेकडो भाविक भक्त देवदर्शनासाठी येत असतात. विलास वरळीकर हे सध्या अध्यक्ष आहेत.

सायन - शीव म्हणजे आताच्या सायन फ्लायओव्हर जवळील श्री विठ्ठल मंदिर. श्रीधर दामोदर खरे हे १८६० साली मुंबईत आल्यानंतर सायन मध्ये स्थायिक झाले. ते एकदा पंढरपूरला वारीसाठी गेले असता त्यांनी धातूंची मूर्ती आणलीपरंतु ती चोरीस गेली. त्यानंतर त्यांनी पाषाणाची मूर्ती घडवून घेतली. त्यावेळी त्याठिकाणी आगरी-कोळी लोकांची वस्ती मोठ्याप्रमाणे होतीत्यांनी एकत्र येऊन मंदिर बांधले आणि १८९३ मध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरातील पुजारी पंढरीनाथ उत्पात यांना पुजारी म्हणून तर वासुदेव बळवंत सोमण यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचा कारभार करण्यासाठी ट्रस्ट नियुक्त करण्यात आला.  प्रत्येक सणानुसार या मंदिरातील मूर्तींना आभूषणे आणि वस्त्रालंकार घालण्यात येतात. आषाढी एकादशीला मंदिराला विलोभनीय सजावट करण्यात येते.

माहीम - माहीम फाटक ते मोरी रोड या भागातील १९१६ सालचे प्रसिद्ध माहीम विठ्ठल-रखुमाई मंदिर.  १९१४-१५ मध्ये माहीम इलाख्यात प्लेगची साथ पसरली होती. भयभयीत झालेले लोक एका तांत्रिक भगताकडे गेली तेव्हा त्याने सांगितले या बेटावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी करा. तेव्हा १९१६ साली मंदिराचे निर्माण केले. आणि पंढरपूरला जाऊन काळ्या पाषाणाच्या मूर्ती आणल्या. तेव्हापासून आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक आणि भजनाचे कार्यक्रम हजारो गर्दीत होत असतात.

बांद्रे - बाळाभाऊ तुपे यांनी संकल्पना मांडल्यानंतर नाभिक समाजाने ९ जानेवारी १९४० साली श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची उभारणी केली. स्थानिक भाविकांच्या गर्दीत आषाढी एकादशी साजरी केली. अनेक दिंड्या येत असतात.

भायखळा - भायखळा पश्चिमेला ना म जोशी मार्गावर हे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर १२९ वर्षाचे हे पुरातन मंदिर आहे. मंदिरात नित्य भजनपोथीवाचनआरतीहरिपाठ होत असतात. प्रदीर्घ चाललेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा निष्ठेने पार पाडली जात आहे. आषाढी एकादशीला सातरस्त्यापासून भायखळ्यापर्यंत हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.

गोखले रोड दादर - जीवनाचा सुरुवातीचा अधिक काळ अलिबाग येथे झाल्याने अलिबागकार हे आडनाव स्वीकारलेले परंतु मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपत ल गुडेकर यांनी आपल्या धार्मिक कार्याला प्रभादेवीतील गोखले रोड झेंडू फार्मसी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात १९५२ पासून श्रीराम नवमी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. गाथ्यावरील भजन,पोथी वाचनएकादशीला कीर्तन हे तेव्हापासून नित्य होत असतात. १९६८ ला अलिबागकर महाराज यांचे निधन झाल्यानंतर गुरुवर्य ह भ प गोपाळबाबा वाजे यांनी धुरा सांभाळली. आणि पंढरपूरआळंदी यासह महराष्ट्रात संप्रदाय पोहोचविला.श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कासार घाटाजवळ या वारकरी समाजाची धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य म्हणून नारायण महाराज वाजे हे समाज चालवीत आहेत. आषाढी एकादशीला दादर सैतानचौकीएल्फिस्टन परिसरातील शेकडो भक्त दर्शनाला येत असतात.

दादर पश्चिम - डी एल वैद्य रोड मठाच्या गल्लीत हे विठ्ठल मंदिर आहे. शिवाजी पार्क परिसरातील शेकडो भाविक भक्त याठिकाणी नेहमीच दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात नारदीय कीर्तन परंपरा राबविली जाते. या परंपरेचे शिक्षण आणि सादरीकरण विशेषतः महिलांचा सहभाग अधिक असतो. काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे महाराष्ट्र व्यापी कीर्तन संमेलन यांनी आयोजित केले होते. आषाढी एकादशीला दिवसभर भजने आणि कीर्तने होत असतात.

विशेष म्हणजे गेल्या शतकभरातील धर्मक्षेत्रांसह खेड्यापाड्यात वारकरी पंथ आणि संतांचा विवेकी विचार पोहोचविणारे शेकडो कीर्तनकार सर्वश्री गुरुवर्य मामासाहेब तथा सोनोपंत दांडेकरधुंडा महाराज देगलूरकरगुंडामहाराजतात्यासाहेब वास्करशंकरमहाराज कंधारकर,रामचंद्र महाराज नागपूरकरअमृतमहाराज नरखेडकरबन्सीमहाराज तांबेभानुदास महाराज देगलूरकरकिसनमहाराज साखरेअर्जुनमामा साळुंखेकिसनदादा निगडीकरमारुतीबाबा कुर्हेकरजगन्नाथ महाराज पवाररामदासबुवा मनसुखह भ प गहिनीनाथ औसेकर महाराजमाधवराव शास्त्रीगोपाळबुवा रिसबूडभीमसिंग महाराजचैतन्य महाराज देगलूरकरबंडातात्या कराडकररामकृष्ण महाराज लहवितकरज्ञानेश्वर महाराज मोरेमहंत प्रमोद महाराज जगतापरविदास महाराज शिरसाटएकनाथमहाराज सदगीरकेशव महाराज उखळीकरसंदीपान महाराज शिंदेबंडातात्या कराडकरपांडुरंगबुवा घुले बळवंत महाराज औटीन्यायमूर्ती मदन गोसावीअशोक महाराज सूर्यवंशीबोडके बुवाआनंददादा महाराज मोरे अशा शेकडो वारकरी सांप्रदायातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने-प्रवचने झाली आहेत. मुंबईकरांच्या या मंदिरात हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आले आहेत.

गिरण्यांच्या भोंग्याबरोबर गिरणगाव जागा व्हायचाकष्टकरी कामगार घामाने चिंब व्हायचा परंतु मराठी माणसाची संस्कृती टिकवण्यासाठी बेभान व्हायचा. फुलाजीबुवा नांगरेहातिस्कर बुवावासुदेव (स्नेहल) भाटकरशिवरामबुवा वरळीकरमारुतीबुवा बागडेखाशाबा कोकाटेहरिभाऊ रिंगेखाशाबा कोकाटे,, मारुतीबुवा बागडेतुळशीरामबुवा दीक्षितहरिबुवा रिंगेकिशनबुवा मुंगसेभगवानबुवा निगडीकरदामू अण्णा माळीपांडुरंगबुवा रावडेविठोबाबापू घाडगेबाबुबुवा कळंबेचंद्रकांत पांचाळविलासबुवा पाटीलपरशुरामबुवा पांचाळरामचंद्रबुवा रिंगे या भजनी गायकांनी आणि राम मेस्त्रीगोविंदराव नलावडेतुकाराम शेट्येमल्हारीबुवा भोईटेसत्यवान मानेगणपतबुवा लेकावलेशंकर मेस्त्रीभाऊ पार्टेविठोबाअण्णा घाडगेराम घाडगे या पखवाज वादकांनी मुंबईकरांना रात्रभर जागविले होते. मिल ओनर्स असोशिएअशन प्रभादेवीच्या मफतलाल सभागृहात मिल कामगारांच्या भजन स्पर्धा घ्यायचे. ही स्पर्धा आणि काही नामवंत काळाच्या पडद्याआड गेले असले तरी नवोदित पिढी मागचा भजन परंपरेचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी तो चालविण्याचा प्रयत्न करीत आहे.  

मंदिरात धार्मिक कार्याला जोडून घेतलेली पहिली पिढी गेल्या काही वर्षात निवृत्त होऊन मुंबईच्या उपनगरात किंवा गावी वास्तव्याला गेली आहे. काहींनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे  'वारकरी प्रबोधन महासमितीचेसंस्थापक अध्यक्ष ह भ प रामेश्वर महाराज शास्त्री आणि सातारा सहकारी बँकेचे अध्यक्ष ह भ प राजाराम तथा नाना निकम हे दरवर्षी गिरणगावात दिंडी सोहळा काढीत असतात. परंतु भविष्यात उंच उंच टॉवरच्या भुलभुलैयात मुंबईतील मंदिराचा कळस आणि त्या ठिकाणचा चाललेला परमार्थ दिसेल कायकिंबहुना सुरुवातीच्या काळातला परमार्थ उभारी घेत पुन्हा उंची गाठणार आहे का या प्रश्नाचे उत्तर काळ देणार आहे.

रवींद्र मालुसरे

अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

9323117704

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, ९३२३११७७०४

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...