प्रभादेवी मंदिर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रभादेवी मंदिर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

प्रभादेवीकर रमेश परब यांना अभिवादन !

 प्रभादेवीकर रमेश परब यांना अभिवादन !

राजकीय आणि  दैनंदिन सामाजिक जीवनात उत्तुंग विचारांची उंची असलेली आणि सतत प्रभादेवी आणि दादर विभागात वावरणारी हसतमुख व्यक्ती म्हणजे माझे मित्र आणि  सर्वांच्या परिचयाचे 'जगनमित्र' म्हणजे रमेश परब ! आज पहाटे वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर दुःखाची हळहळ व्यक्त करणारे त्यानंतर अनेकजण भेटले.
शरीराने कमी उंचीचे परंतु सृदुढ बांध्याचे असलेल्या रमेश परब यांची मुंबई आणि कोकणातल्या राजकारणाच्या अभ्यासाची उंची व जाण मात्र फार प्रगल्भ होती. साधारण १९८० च्या विद्यार्थी दशेपासून मी त्यांच्या संपर्कात आलो आणि पक्का मित्र झालो. देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार साहेब आणि कुठल्याही राजकीय पेचप्रसंगात मुंबईत  शरद पवारांना खंबीर साथ सोबत करणारे स्वर्गीय गोविंदराव फणसेकर या दोघांचा  लाडका 'मानसपुत्र' म्हणूनही रमेश यांची ओळख होती. 

शरदरावांनी राजकीय जीवनात कोणतीही बरी वाईट घेतलेली भूमिका असो गोविंदराव आणि त्यांच्यानंतर रमेश परब यांनी सातत्याने त्यांचे समर्थनच केले आणि राजकीय जीवनात अपयश आले तरी त्यांना साथसोबत दिली. आजही राष्ट्रवादीच्या फाटाफुटी नंतर ते त्यांच्या सोबतच होते. 
शरद पवारांनी पुलोद स्थापन करताना  समाजवादी काँग्रेस पक्ष काढला आणि सैतान चौकी येथील काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन ताब्यात घेतले. हे करताना संघर्ष करणारी प्रसंगी दांडुकेशाहीची भाषा करणारे  आणि त्याठिकाणी दिवसरात्र ठाण मांडून बसणारे कार्यकर्ते पहारा देत होते, ते म्हणजे गोविंदराव फणसेकर, सदानंद तांडेल, गोविंदराव शिर्के, रमेश परब, अरुण मेहता, बबन गवस हे होते. मुंबईत काँग्रेस कमकुवत होती त्यामुळे पुढची बरीच वर्षे म्हणजे शरदरावांचा पुन्हा काँग्रेस प्रवेश होईर्यंतच त्याठिकाणचा कारभार ठप्प होता. 

मधल्या कळात  राजकीय क्षेत्रात वावरताना विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुक लढवण्याची त्यांना संधी मिळाली, परंतु शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या दादर प्रभादेवी भागात त्यांच्या वाट्याला अपयशच आले. काही वर्षापूर्वीच्या एका मनपा निवडणुकांच्या वेळी त्यांना दै सामना कार्यालयात बोलावून ते रहात होते त्या प्रभागातून शिवसेनेच्या वतीने निवडणुक लढण्याची ऑफर दिली. परंतु त्यांनी ती नम्रपणे नाकारली आणि आपल्या पक्षातर्फे निवडणुक लढवून पराभूत सुद्धा झाले. आज कोण कुठल्या पक्षात आहे हे न सांगता येणाऱ्या बदलत्या परिस्थितीत रमेश परब पक्षाचे किती निष्ठावान आणि शरद पवारांचे खंबीर समर्थक होते हे लक्षात येतेय. विशेषतः प्रतिभाताई पवार यांच्या किचनपर्यंत परब यांचा खुला वावर होता. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्यासाठी मुंबईचे मागील काही वर्षात त्या त्या वेळचे झालेले अध्यक्ष राजकीय पोळी भाजून व  लाभार्थी होऊन दुसरीकडे गेले...रमेशराव मात्र एक टेबल खुर्ची टाकून स्टँडर्ड मिल प्रभादेवीच्या नाक्यावर कायम शरद पवारांचा बॅनर लावून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी  बसले. आणि न चुकता १२ डिसेंबरला सांस्कृतिक कार्यक्रम आखत शरदरावांचा वाढदिवस आपल्या सहकाऱ्या समवेत नाक्यावर भव्य प्रमाणात करीत राहिले.

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनचे नाव प्रभादेवी  व्हावे यासाठी मी  दैनिक सामना 

मध्ये १९९२ सली लेख लिहिला, रमेशने  माझा हा लेख वाचल्यानंतर त्यावेळी मला सांगितले रवी याचा पाठपुरावा चालू ठेव, मी नंतर पुढे अनेक वर्षे रेल्वेमंत्र्यांकडे लेखी पाठपुरावा ठेवला आणि २००५ नंतर कंटाळलो. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यानंतर एके दिवशी रमेश परब यांनी मला फोन करून बोलावले आणि यासंबंधी त्यांनीसुद्धा सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची त्यांची फाईल दाखवली. त्यात त्यावेळच्या माझ्या लेखाची झेरॉक्स प्रत सुद्धा होती. सुरेश प्रभू असताना पुन्हा मी या मागणीसाठी माझ्याकडचा पत्रव्यवहार रेल्वेभवन दिल्लीला पाठविला. प्रभुसाहेबांचे पी.ए. महाजन साहेब यांची दादर पूर्व - फाळके रोडला भेट घेतली, रमेशराव यांनीसुद्धा पत्रव्यवहार पुन्हा सुरूच ठेवला होता. आणि त्याला यश आले, दिनांक १९ जुलै २०१८ रोजी रमेश परब आणि धनंजय खाटपे (यांना हा इतिहास माहीत आहे ) यांचा अभिनंदनाचा फोन आला.

श्री सिद्धिविनायक मंदिराला लागूनच गेल्या ७० - ८० वर्षांपासून पूज्य साने गुरुजी यांच्या नावाने ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुशोभित मैदान होते, भूमिगत मेट्रो स्टेशनसाठी ते वापरण्याचे ठरले. रमेश परब यांच्यासह अनेकांनी 'मैदान बचाव' अशी भूमिका घेतली त्यामुळे त्याठिकाणी मैदानाचे अस्तित्व ठेवून विकास होणार आहे असा प्लॅन मंजूर झाला. गेल्या वर्षी रमेश मला प्रभादेवीतच भेटले होते, म्हणाले रवी या गार्डनमध्ये दर्शनी भागावर साने गुरुजींचा एक चांगला भव्य पुतळा असावा असे वाटतेय, शासनाकडे त्याचा आपण पाठपुरावा करूया.  
शासकीय पत्रावर कसा करावा याचे उत्तम ज्ञान रमेश परब यांना होते. प्रभादेवी मातेच्या मंदिराला तीनशे वर्ष झाली तेव्हा हा उत्सव भव्य सोहळ्याच्या स्वरूपात व्हावा अशी भूमिका ज्यांनी घेतली त्यात आमदार सदा सरवणकर , नगरसेवक संतोष धुरी, या सोहळ्याचे नेतृत्व करणारे धनंजय खाटपे, वडापाववाले सुभाष सारंगबंधू, संजय नगरकर, महेश सावंत, संतोष गोळपकर, चेतन खाटपे, संजय बारस्कर, भूपेंद्र देवकर, अरुण भोगटे, सर्वपक्षीय कार्यकर्ते व प्रभादेवीतील युवक युवतींनी घेतली होते त्यात रमेश परब सुध्दा अग्रभागी होते. 'न भूतो न भविष्यती' असा भव्य कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत अत्यंत जल्लोषात पार पडला. उद्योजक आणि  प्रभादेवीकर असलेले चेतन खाटपे यांनी त्यावेळी हेलिकॉपटर्स मधून मंदिरावर पुष्पवृष्टी केली होती. 
प्रभादेवी येथे अनेक सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा संस्था आहेत. यांच्यामध्ये सध्या कार्यरत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना रमेश यांनी समाजसेवेचे बाळकडू आणि प्रोत्साहन दिलेले आहे. रमेश यांच्यामुळे "आम्ही प्रभादेवीकर" म्हणून घडलो असे सांगणारे अनेकजण सध्या भागात भेटतात.
ज्येष्ठ मार्गदर्शक आणि मित्रवर्य  रमेश परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली !







- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 
(घरकुल सोसायटी, श्री साई सुंदर नगर)



इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


बुधवार, २० मे, २०२०

प्रभादेवीची 'प्रभावती' माता


प्रभादेवी मातेचे मंदिर : तीन शतकांचा ठेवा 


मुंबई नगरीला सोन्याची नगरीम्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळ जवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची,त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर देवींची मंदिरे हि पुरातन आहेत.
तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा बदलत्या काळासोबत अस्तंगत होत गेल्या आणि त्याच ओघात मुंबापुरीतील वार्षिक जत्राही काळाच्या पडद्याआड जाऊ तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा बदलत्या काळासोबत अस्तंगत होत गेल्या आणि त्याच ओघात मुंबापुरीतील वार्षिक जत्राही काळाच्या पडद्याआड जाऊ लागल्या. सद्य:स्थितीत जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत यातल्या काही जत्रा मुंबईत उरल्या आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत  चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे प्रभादेवीची जत्रा. पारंपरिकतेची कास धरत हा जत्रोत्सव जुन्या मुंबईचा ठेवा जपत असल्याचे दिसून येत आहे. वर्षभर शांततेत असलेले प्रभादेवीचे मंदिर या जत्रेच्या काळात ऐरवी कॉर्पोरेट असलेला भाग ४० वर्ष मागे गेलेला दिसतो. या जत्रेच्या निमित्ताने सध्या या मार्गावर मिठाई, पेठा, हलवा, चांदेरकर खाजा असे जिन्नस; तसेच खेळणी, इतर खाद्यपदार्थ, हार, फुले, प्रसाद आदी वस्तूंची दुकाने थाटली आहेत.  मुलांसाठी आकर्षणाचा भाग असलेले आकाशपाळणेही गर्दी खेचत असतात. मौत का कुँवामधील कानठळ्या बसवणारा फटफटीचा आवाज ...प्रचंड उंचीवरून खाली येताना पोटात गोळा आणणाऱ्या आकाश पाळण्याचा थरार...सहकुटुंब मोटारीत बसून किंवा स्कूटरवर एकत्र कौटुंबिक फोटो काढण्याची हौस पुरवणारा फोटो स्टुडिओ...पिपाण्यांचा आवाज...असे बरेच काही वर्षानुवर्षे तसेच आहे. प्रभावतीदेवी ही अनेक ज्ञाती-समाजांची कुलदेवता असल्याने, समाजाच्या विविध स्तरांतून तिच्या दर्शनासाठी भक्तगण येथे येत असतात. जत्रेच्या दिवसांत तर भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. पौष महिन्यातल्या शाकंभरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या जत्रेला प्रारंभ होतो. 

१९९२ पासून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष म्हणून मी (रवींद्र मालुसरे) वर्तमानपत्रातून लेखन केले त्याचबरोबर प्रभादेवी  जनसेवा समितीचे अध्यक्ष धनंजय खाटपे, कार्याध्यक्ष- सुभाष सारंग आणि प्रमुख कार्यवाह-संजय नगरकर, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते रमेश परब यांच्या   पुढाकाराखाली  स्थानिक जनता एल्फीस्टन रेल्वे स्टेशनला 'प्रभादेवी'  नाव  द्यावे  अशी  श्रद्धापूर्वक मागणी करीत होती. मी तर १९९२ च्या नंतरच्या सर्व रेल्वेमंत्र्यांशी सातत्याने पत्रव्यवहार केला. आमच्या या मागणीला  केंद्रसरकारने योग्य न्याय दिला.व अखेर नामकरण करण्यात आले. तसे  पहिले  तर  गानतपस्वी किशोरीताई  आमोणकर, कॉम्रेड डांगे, सुलोचनादीदी, स्नेहल  भाटकर,कबड्डी महर्षी बुवा साळवी, पद्माकर  शिवलकर,संजय मांजरेकर,तारक राऊळ आदी कला -क्रीडा  क्षेत्रातली  गुणवान  मंडळीही  याच  प्रभादेवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावरची.
२५ जानेवारी १९९२ शनिवार, दैनिक सामना 
प्रभादेवीचा प्राचीन इतिहास मोठा रंजक आहे. प्रभादेवीचं मंदीर आता जिथं पाहातो, ते हिचं मूळ ठिकाण नव्हे. श्री प्रभादेवीचं मूळ मंदीर होतं मुंबईच्या माहिमात. नेमकं कुठं आणि कुणी बांधलं ह्याचा शोध घेताना, दोन वेगळ्या प्रकारची माहिती मिळते. पहिली माहिती मिळते ती 'महिकावतीच्या बखरी'त. सदर बखर सन १४४८ ते सन १५७८ या दरम्यान लिहिली गेलेली असून, यातील एक घटना सन ११४० पासून चालुक्य कुळातला राजा प्रताप बिंबाच्या मुंबईतल्या आगमनापासून सुरु होतात आणि सन १३४० च्या आसपास कुठेतरी संपतात. या दोनशे वर्षांच्या काळात मुंबईवर राज्य केलेल्या राजांचा इतिहास सांगणारी ही बखर आहे.
'महिकावातीची बखर' सांगते की, श्री प्रभावती ही मुंबईचा चालुक्य कुलाचा राजा प्रताप बिंबाची देवता. चालुक्यांची कुलदेवता श्री शाकंभरी, जिला प्रभावती असंही नांव आहे. त्याची कोकण प्रांतातली मूळ राजधानी केळवे-माहिम हातची गेल्यानंतर, सन ११४० च्या दरम्यान मुंबईतील माहिम येथे नविन राजधानी केली. राजधानी स्थापन करताना आपली कुलदेवता श्री प्रभावती हिचं देऊळ स्थापन केलं असावं, बखरीत असं कुठेही म्हटलेलं नाही, मात्र असा तर्क केल्यास तो चुकीचा ठरणार नाही. कारण आताचं मंदिर दक्षिणोत्तर असून आताच्या श्री प्रभादेवीच्या मंदीरात तिच्या डाव्या-उजव्या हाताला असणाऱ्या श्री कालिका आणि श्री चंडिका देवींच्या मूर्ती..! श्री प्रभावती, श्रीचण्डिका आणि श्री  कालिका या मुख्य देवतांव्यतिरिक्त या मंदिरात श्री सर्वेश्वरआणि श्री लक्ष्मीनारायण यांचीही स्वतंत्र गर्भगृह आहेत. मंदिराच्या बाहेर  प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला श्री शितलादेवी, श्री  हनुमान व श्री खोकलादेवीच्या मूर्ती आहेत. मंदिरात दोन दीपमाळाही आहेत. मंदिरात असलेला प्राचीन नंदी नव्याने स्थापन करण्यात आली आहे.  श्री कालिका देवी ही राजा प्रताप बिंबाचे सरचिटणिस गंभिरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता, तर श्री प्रभादेवीच्या डाव्या हाताला असलेली श्री चंडीका देवी, राजा प्रताप बिंबाचे पुरोहीत असलेल्या हेमाडपंतांची कुलदेवता असल्याचा उल्लेख राजा प्रताप बिंबाने त्याच्या कुलदेवतेसोबत, त्याच्या या दोन महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या कुलदेवतांना बरोबरीचं स्थान देऊन  त्यांचा सन्मान केला असावा किंवा या कुलदेवता असलेल्या समाजाला आपल्या राज्यात बरोबरीचं स्थान आहे असा संकेत दिला असावा असं वाटण्यास जागा आहे. शिलाहारानंतर देवगिरीचे यादव मुंबई बेटावर आले. असे सांगतात की यादव वंशाचा राजा बिंब ऊर्फ भीमदेव याने आपली राजधानी माहीम येथे स्थापन केली होती व त्याने आपल्यासमवेत काही लोक आणून तिथे वसाहत उभारली. नारळाची झाडे लावली आणि घरे व मंदिरे बांधली. त्याच्या आश्रितांपैकी प्रभू पळशीकर, ब्राह्मण आणि पांचकळशी त्याच्याबरोबर इथे आले व माहीमच्या आसमंतात त्यांनी वस्ती केली.

श्री प्रभादेवीच्या मंदिराच्या अनुषंगाने दुसरी माहिती मिळते, ती श्री. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उपाख्य के. रघुनाथजी या पाठारे प्रभू समाजातील लेखकाने इसवी सन १८९०-९५ सालात लिहिलेल्या 'The Hindu Temples of Bombay' ह्या पुस्तकात. ह्या पुस्तकात श्री प्रभादेवीचं मंदीर शके १२१७ (सन १२९५) मध्ये माहिममधील 'कोटवाडी' इथे उभारल्याचा उल्लेख केला आहे. या मंदिरात श्री प्रभादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सन १२९४-९५ मध्ये झाल्यावर पुढची दोनेकशे वर्षाच्या  शांतते नंतर पंधराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज भारतात आले. इ.स. १५३४ मध्ये त्यांनी गुजरातचा सुलतान बहादुरशहाला युद्धात नमवून वसई प्रांत, बेटे व सभोवतालचा समुद्र यांचा ताबा मिळ‍वून पोर्तुगालचा राजा आणि त्याचे वारस यांचे या भागावर आधिपत्य प्रस्थापित केले. अशा रीतीने मुंबई बेटे ख्रिस्ती धर्मियांच्या मालकीची झाली. पोर्तुगीज मिशनऱ्यांनी मूळ स्थानिकांचे धर्मांतर सुरू केले. धर्मांतर करून ख्रिस्ती होणाऱ्या लोकांना त्यांनी सर्व तऱ्हेच्या सवलती व देणग्या दिल्या. ज्यांनी धर्मांतर करण्यास विरोध केला त्यांची मानहानी करून छळ सुरू केला. त्यांना गुलामासारखी वागणूक देत सक्तीने मोलमजुरी करण्यास सांगण्यात येत असे. ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांनी स्थानिक मंदिरे व मूर्ती यांचा सूडबुद्धीने विध्वंसही केला. यावेळी बचावासाठी ही मूर्ती बांद्रे येथील एका विहिरीत लपवण्यात आली. हा काळ होता साधारणतः सन १५१० ते १५२० च्या दरम्यानचा. पुढे जवळपास दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ ही मूर्ती विहिरीच्या तळाशी पडून राहिली. पाठारे प्रभू समाजाच्या श्याम नायक यांना देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, मला विहिरीतून काढून माझी मंदिरात प्रतिष्ठापना कर. त्याप्रमाणे नायक यांनी इ.स. १७१४ मध्ये देवीची स्थापना करून १७१५ मध्ये मंदिरांचे बांधकाम पूर्ण केले. पाठारे-प्रभूंची देवी म्हणून तिचे नामकरण प्रभावती असे करण्यात आले. म्हणजे इसवी सन १७१५ सालात आताच्या मंदीरात तिची प्रतिष्ठापना केलेली आहे. असा शिलालेख प्रभादेवीच्या मंदिरात पाहायला मिळतो. म्हणजे आताच्या प्रभादेवीच्या मंदिराला  ३०८ वर्ष होत आहेत. या मंदिरातील देवीची मूर्ती मात्र कमीतकमी सातशे पंचवीस ते जास्तीत जास्त आठशे पंचानऊ वर्षांपूर्वीची आहे असं म्हणण्यास जागा आहे. त्या मंदिराचे मूळ मालक कृष्णनाथ जयानंद कीर्तीकर. परधर्म आक्रमकांच्या याच मोहिमेत श्री प्रभादेवीचं मंदीर जमिनदोस्त करण्यात आल्याचा उल्लेख के. रघुनाथजींच्या पुस्तकात आहे.
मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता तो गिरणी कामगारांचा. या देवीचा आजुबाजूचा परिसरही सेंच्युरी, स्टँडर्ड, बॉम्बे डाईंग आदी गिरण्यांचा. हजारोंनी राहणाऱ्या गिरणी कामगारांच्या अनेक चाळी व वाड्यांचा हा परिसर. ही सर्वच मंडळी गावागावातून कामानिमित्त मुंबईत आली, त्यामुळे साहजिकच गावातल्या (विशेषतः कोकणातल्या) जत्रांचे स्वरूप येथेही आले. आज याच परिसरातील गिरण्या-चाळी-झोपडपट्ट्या, वाड्या नामशेष होऊन चकाचक कॉर्पोरेट कंपन्या किंवा टोलेजंग टॉवर्स  आले असले तरी गेल्या ५० वर्षांतले जत्रेचे स्वरूप आणि देवींच्या प्रती असलेला भक्तिभाव किंचितही कमी झालेला नाही. प्रभादेवीची जत्रा लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आनंद देणारी असते. या जत्रेच्या निमित्ताने अनेक माहेरवासिनी देवीची ओटी भरण्याच्या निमित्ताने वा नवस करण्याच्या निमित्ताने खास आपल्या सासरी येत असतात

- रवींद्र मालुसरे
९३२३११७७०४


                               प्रभादेवी मंदिराला ३०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर 
                          महाराष्ट्र टाइम्समध्ये हा लेख प्रकाशित झाला होता. 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...