"पोलादपूरचा शिवकाळातला रणसंग्राम"
छत्रपती शिवाजी महाराजांचे बंड मोडण्यासाठी काहीतरी केले पाहिजे हे विजापूर दरबारने ठरविले. परंतु या स्वारीवर महाड,जोरखोरे,जावळीचे खोरे या प्रदेशाची माहिती असणारा कोणीतरी हिंदू सेनापती पाठविला पाहिजे असा विचार दरबारने केला आणि शेवटी 'बाजी श्यामराज' याला शिवाजी राजांचा समूळ फडशा पाडण्यासाठी पाठविण्याचे विजापूर दरबारने ठरविले. यावेळी राजे आपल्या सैन्यासह बिरवाडी-महाडच्या परीसरात असल्याने दगा फटका करीत त्यांना जिवंत पकडण्याचा बेत बाजी शामराजाने आखला. तो पारघाटाच्या मार्गाने निघाला. चंद्रराव मोरे याच्या जावळीच्या मुलुखातील घनदाट जंगलाचा फायदा घेण्याचे त्याने ठरवले होते. गोळेगणी या गावाच्या आसपास डोंगराच्या उतारावर तो सैन्यासह लपून बसून राहिला. त्याचवेळी जावळीचा दौलतराव मोरे संभ्रमात पडला की, शिवाजीला मानावे की बाजी शामराज ला मानावे; विजापूरचे ऐकावे की स्वतःचे राज्य निर्माण करू इच्छिणाऱ्या शिवाजीचे ऐकावे. तिकडे बाजींचे सैन्य दबा धरून बसले होते. आणि इकडे शिवाजी महाराजांनी किनेश्वर आणि विन्हेरे खोऱ्यात सैन्याची जमवाजमव करून तयारीत होते. ही दोन्ही सैन्य एकत्र येऊ शकेल अशी जागा पारच्या खाली पश्चिम घाटाच्या इथेच असेल असा कयास बांधून महाराज हल्ल्याची वाट पाहात बसले,
साखर-देवळे खोऱ्यातील सैन्य तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली करंजे आणि नेरच्या घनदाट जंगलातून डोंगराळी पार या गावांवर सावधपणे जबरदस्त हल्ला करणार होते. बोचेघळीच्या खिंडीतून ढोपराच्या डोंगरावर पूर्वेकडून जंगलातून मावळच्या बांदल देशमुखांनी सैन्य उभारून जय्यत तयारी केली होती. आणि मकरंदगडाखाली मोठ्या सैन्याची जमवाजमव केली. बाजी शामराजचा आपल्या दहा हजार सैन्यावर फार मोठा विश्वास होता. एक-दोन दिवसातच शिवाजीला आपण जेरबंद करू असे त्याने मनसुबे आखले,इतक्यात त्याच्यावरच असा काही हल्ला झाला की त्याच्यासह त्याचे सैन्यहीं बावरले, अनपेक्षित हल्ल्याने हल्लकल्लोळ माजला आणि सैन्य सैरावरा धावू लागले.ते ढोपराच्या डोंगराच्या खिंडीतून पलीकडे कोतवालकडे पळून जात असताना महाराजांचे विन्हेरे खोऱ्यातील सैन्य त्यांना सामोरे गेले आणि चहुबाजूंनी इतर ठिकाणी असलेल्यांनी बाजींचे सैन्य अक्षरशः कापून काढले.
रणांगणावर धारातीर्थी पतन पावणे; हाच ज्यांचा कुळधर्म आहे अशा मराठ्यांच्या अनेक पिढ्या या खोऱ्यात जन्मल्या अन त्यांनी छत्रपती शिवरायांना साथ देत यवनी सत्तेची दडपशाही, हुकूमशाही, अत्याचारांचा प्रतिकार प्रसंगी आत्मबलिदानाने केले.प्रतिकूल भयानक परिस्थितीत झुंजून स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा पाया घालण्याच्या प्रचंड कार्यात सर्वस्वाचे बलिदान करणाऱ्या या असामान्यांचे कर्तृत्व इतके तेजस्वी आणि महान कीं, सर्व जगाने त्यांचे धडे गिरवावेत.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा