रवींद्र मालुसरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रवींद्र मालुसरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.





सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सतरावे शतक प्रबोधनाचेअठरावे शतक वैचारिकतेचेएकोणीसावे शतक प्रगतीचेविसावे शतक चिंतेचे म्हणून ओळखले जाते ! तर एकविसावे शतक माहिती-तंत्रज्ञान युगांचे संबोधले जात आहे. इंग्रजांची राजवट असतानाच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले वर्तमानपत्र सुरु केले होते. त्यामागे गतकाळाचे संपन्न बुद्धिवैभव व विचारसंपदा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हावीआपला समृद्ध वारसाही प्रभावशाली परंपरा अखंडितपणे चालावीसांस्कृतिक-सामाजिक ठेवा समाजासमोर ठेवावा असा उदात्त हेतू त्यांचा होता.  वृत्तपत्र हे समाजाचे अत्यंत महत्त्वपूर्ण अंग आहे हे त्यांनी जाणले होते. इंग्रजांची राजवट संपल्यानंतर आपण लोकशाही शासनप्रणालीत स्वीकारली आणि त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किती अत्यंत मोठे स्थान आहे हे आपण जाणतच आहोत. त्यामुळेच जगभरात वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानतात. आपण जर थोडे इतिहासात डोकावले तर लक्षात येते की युरोपात राजेशाही अस्तित्वात असतानाच वृत्तपत्रचळवळीचा उदय झाला होता. तत्कालीन राजे-सरंजामदारांनी वृत्तपत्राची ताकद जोखली होती. त्यामुळेच नेपोलियन बोनापार्टने लेखणीचे सामर्थ्य तलवारीपेक्षा जास्त आहेअसे उघडपणे मान्य केले होते. भारतात जरी छपाईयंत्रणेचा सर्वव्यापी वापर उशिरा सुरू झाला होतातरी लेखणीचे आणि बातमीचे महत्त्व तत्कालीन समाजात निश्चितच होते. नाहीतर मुघलकालीन आईने-अकबरीमध्ये न खिंचो कमानकोन तलवार निकालोजब तोप मुकब्बिल होतोअखबार निकालो असा शेर लिहिलाच गेला नसता. खरं तरऐतिहासिक काळात भारतवर्षात दळणवळणाच्या साधनाअभावी समाजातील संवाद फार कमी प्रमाणात होत असे. मात्र काळ पार बदलला आहे. समाजही वेगाने बदलत आहे. विशेष म्हणजेमाहिती आणि संपर्काच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे समाजातील संवादाची माध्यमे प्रचंड वेगाने प्रगती करीत आहेत. संगणकइंटरनेट आणि दूरदर्शन वाहिन्या यांच्या वाढत्या प्रसारामुळे वृत्तपत्रांचे स्वरूपही बदलत आहे. या बदलत्या काळात एक महत्त्वाची बाब मात्र टिकून आहेती म्हणजे वृत्तपत्रांमधील वाचकांचा सहभाग. वाचकांच्या सक्रीय सहभागाशिवाय वृत्तपत्र आणि सर्वसामान्य नागरीक यांच्यातील संवाद होणे शक्य नसते. नाहीतर वृत्तपत्र हे संवादाचे एकतर्फी माध्यम राहिले असते. परंतुवृत्तपत्रसृष्टीतील पूर्वसुरींनी परस्परसंवादाचे महत्त्व खूप आधीच जाणले होते. म्हणूनच मराठीत पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या पहिल्याच अंकात लोकांनाच  लिहिण्यासाठी खास आवाहन केले होते. विशिष्ट पदवी घेऊन जन्माला येणार पत्रकार हा त्यापूर्वी नव्हता. अगदी तेव्हापासून जनमनाचा कानोसा घेत समाजातले वैगुण्य टिपतघडलेल्या घटनांची दखल घेणारा लोकांना जागृत करणारा म्हणजे पत्रकार होय. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण सुरु केले ते समाजाच्या जागृतीसाठी ! यानंतरचा काळ हा स्वातंत्र्यासाठी पत्रकारिता करणारे आणि आपल्या आयुष्यासोबत लेखणी झिजवणारे आले असेच इतिहास सांगतो. साप्ताहिके ही माध्यमांची जननी आहे असे म्हटले तर भारतीय इतिहासाला तरी ही गोष्ट नाकारता येणार नाही.

ब्रिटीशांविरोधातील आंदोलनात टिळकांनी लेखणी हातात घेतली तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अत्रे यांनी 'मराठाद्वारे विरोधकांना वठणीवर आणले. जनता क्रांतीचा जयजयकार करते हाच पत्रकाराचा खरा धर्म आहे. पत्रकारांची लेखणी ही सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या शिपायाची तलवार होय.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत इतर अनेक देशातल्याप्रमाणे भारतीय वृत्तपत्रांनी परकीय शासनसंस्थेच्या शोषक कारभाराची पाळेमुळे उघड केली नि एक प्रकारे अग्निदिव्य पत्करले. एका बाजूने लोकमत जागृत करण्याची व दुसऱ्या बाजूने त्या लोकमताचे संघटित दडपण शासनावर पाडण्याची अवघड कामगिरी भारतीय पत्रकारितेने केलेली आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आघाडीच्या नेत्यांनी चळवळीचे एक साधन म्हणून वृत्तपत्राचाच वापर केला.  आपल्या जीवनात वृत्तपत्राचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात वर्तमानपत्रांनी समाजसुधारकांसारखे महत्त्वाचे कार्य केले आहे. देशी वृत्तपत्रे हे स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख साधन आहे हे लक्षात घेऊन स्वातंत्र्य चळवळीच्या बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी देशभक्त भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सुरुवातीच्या काळातील जे अग्रणी नेते होते ते एकजात पत्रकार होते. न्या. रानड्यांपासून लोकमान्य टिळकगोपाळ गणेश आगरकरशिवराम महादेव परांजपेमोहनदास करमचंद गांधीस्वातंत्र्यवीर सावरकरडॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा लढा चालविला होता. तळमळीचं यज्ञकुंड त्यांच्या अंतःकरणात धगधगत होतं. या यज्ञकुंडाच्या भडकलेल्या ज्वालातून बाहेर पडणारे जे स्फुल्लिंग होते ते त्यांचे शब्द झाले आणि त्या शब्दांनी सर्वांच्या अंतःकरणाची पकड घेतली. पहिले मराठी वृत्तपत्र सुरू झाले त्याला आता दीडशे वर्षात्रर काळ उलटला आहे. या कालावधीतील मराठी वृत्तपत्रांची वाटचाल अगदी डोळे दिपविणारी वाटली नाही किंवा अपेक्षेइतकी ती उच्च स्तरावर गेली असेही आढळून आले नाहीतरी तिने गाठलेला पल्ला उपेक्षणीय नाही. जिचा सार्थ अभिमान बाळगावा अशी एक वैशिष्टचपूर्ण परंपरा मराठी वृत्तपत्रसृष्टीला लाभलेली आहे. ही ध्येयवादी परंपरा आता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे आणि सरकारी दडपशाही व हस्तक्षेपामुळे क्षीण झाली असलीतरी मराठी वृत्तपत्र जगताचा व्याप निश्चितच वाढला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय भाषांतील वृत्तपत्रांना भरपूर वाव मिळेल व त्यांची भरघोस वाढ होईल अशी जी अपेक्षा होती. ती आता स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर  वर्षाचा काळ उलटल्यावर काही प्रमाणात तरी फलद्रूप होऊ लागली आहे.

 स्वातंत्र्योत्तर काळात आपण सांसदीय लोकशाही राज्यपद्धतीचा स्वीकार केलेला असल्यामुळे सामान्य माणसाचे महत्त्व जरूर वाढले आहे. भाषावार राज्यरचनेमुळे प्रत्येक राज्यात स्थानिक भाषेला महत्त्व व प्रतिष्ठा मिळणे अपरिहार्य वृत्तपत्राच्या या नव्या स्वरूपामुळे वृत्तपत्र चालविणे हा आता केवळ धर्म वा मिशन राहिलेले नाही. या व्यवसायाला आधुनिक उद्योगसंघटनेचे स्वरूप आले आहे. दैनिक वृत्तपत्र उभे करण्यासाठी उभारावे लागणारे प्रचंड भांडवलतांत्रिक प्रगतीमुळे टिकाव धरण्यासाठी अत्याधुनिक यंत्रांचा व तंत्रांचा वापर करण्याची अपरिहार्यतावृत्तपत्राचा व्यापआणि या व्यवसायात नफ्याला असलेला वावतसेच वृत्तपत्रा- सारख्या प्रभावी साधनावर पकड ठेवण्याची धनिकांची धडपड यांमुळे भांडवलदारी मालकी वृत्तपत्र व्यवसायात शिरली आहे. एक किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन देशस्वातंत्र्यासाठी वा सामाजिक विचारांचे अभिसरण व प्रचार करण्याच्या हेतूनेच केवळ वृत्तपत्र सुरू करावे अशी परिस्थिती आता उरलेली नाही. मराठी वृत्तपत्र आर्थिक लाभाच्या हेतूने कचितच निघाले. त्याग आणि सेवा हेच वृत्तपत्रांचे एक वेळ भांडवल होते. पण ते आता सारे पालटले आहे. त्यागसेवायांसारख्या गोष्टी दुर्मिळ झाल्या असून वृत्तपत्र चालवायला तशा त्या पूर्वीही पुरेशा नव्हत्याआणि आता तर नाहीच नाही. भांडवली प्रवृत्तीने सर्वच मराठी पत्रसृष्टीला अजून ग्रासलेले नसलेतरी तिची वाटचाल त्याच दिशेने होऊ लागली आहे. मराठीतील मोठी व मुंबईतील मराठी दैनिके एकाद दुसरा अपवाद वगळता सर्वस्वी अमराठी भांडवलदारी संघटनांच्या ताब्यात आहेत. वृत्तपत्र समूहांच्या साखळीतील एक दुवा असे स्थान या वृत्तपत्रांना पत्करावे लागते. विशिष्ट धोरणापेक्षा भरपूर खपम्हणून भरपूर जाहिराती आणि मग भरपूर नफा या दृष्टीला यामुळे अपरिहार्यपणे महत्त्व मिळू लागले आहे. अशा परिस्थितीने होणाऱ्या धंदेवाईक स्पर्धेत छोट्या वृत्तपत्रांचा टिकाव लागणे कठीण होऊ लागले आहे. त्याचबरोबर मराठी वृत्तपत्र जन्माला आले ते प्रभोधनाच्या हेतूने. पुढे त्यात टीकाप्रक्षोभनिंदानालस्तीस्तुती अशा विवित्र गोष्टींना एकेका काळात प्राधान्य मिळाले. पण त्या सर्व अवस्था पार करून खरेखुरे 'वर्तमानपत्र म्हणजे मुख्यतः कालचे व आजचे वर्तमान कथन करणारे पत्रअसे निर्भेळ स्वरूप त्याला येत आहे. लो. टिळकांच्या काळात आणि नंतरही आग्रही मतपत्र म्हणून त्याचे जे स्वरूप होते ते पूर्णपणे मागे पडले आहे. नराठी वृत्तपत्राचे हे स्वरूप हा बदललेल्या काळाचा परिपाक आहे. एकूण भारतीय वृत्तपत्रसृष्टीत अशा तन्हेचा बदल घडून येत आहे. वृत्तपत्र-निर्मितीची तांत्रिक साधने बदलत असल्यानेही नवे स्वरूप अधिकाधिक गडद होणे अपरिहार्य आहे. पण एक गोष्ट निश्चित कीभारतीय भाषांतील वृत्तपत्रांत मराठी वृत्तपत्र आघाडीवर राहात आले आहे. याचे एक कारण असे कीबदलत्या परिस्थित्यनुरूप ते बदलत गेले. या बदलाचा आणि त्याला कारणीभूत होणाऱ्या परिस्थितीचा मागोवा घेतल्यानंतर लक्षात येते.

 

वृत्तपत्राच्या सामर्थ्याविषयी अनेकांनी अनेक प्रकारे उद्‌गार काढले आहेत. नेपोलियनसारख्या रणधुरंधराने म्हटले की, "चार जबरदस्त वृत्तपत्रे हजारो संगिनीना निष्प्रभ करू शकतात. "लेखणीचे सामर्थ्य हे माणसांची मने घडविण्याचे सामर्थ्य असल्यामुळेच जगातील अनेक हुकूमशहांनी लेखणीची धास्ती घेतली. त्यांच्या राजवटीत वृत्तपत्र-स्वातंत्र्यावर कायम निर्बंध राहिलेपरंतु गुप्त पत्रकांच्या रूपाने क्रांतिकारी विचारांच्या प्रसाराचे कार्य अशाही राजवटीत जोमाने चालते व त्यातूनच राज्यक्रांतीला साह्य होते. लोकमत जागृतीसाठी लोकांना माहिती पुरवूनगुपिते उघड करून वृत्तपत्रे सत्तेवर अंकुश ठेवतात. पर्यायाने संपूर्ण समाजाचे नियमन करतातअसा अर्थ त्यात अभिप्रेत आहे. अन्यायांना वाचा फोडून सामान्य माणसाच्या न्याय्य हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी हा चौथा स्तंभ पार पाडीत असतो.

सद्य परिस्थितीतही महाराष्ट्रातून प्रसिध्द होणारी वर्तमानपत्रे आपले जनजागृतीचे आणि लेखणीद्वारे सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम यशस्वीपणे करत आहेत. पूर्वीच्या काळात जनतेतील साक्षरतेचं प्रमाण कमी होतं. तशीच वर्तमानपत्रेही मर्यादित होती. मात्र सध्या परिस्थिती बदललेली आहे. आजमितीस महाराष्ट्रातून प्रसिध्द होणारी वर्तमानपत्रेसाप्ताहिकेपाक्षिकेमासिकेत्रैमासिके यांची संख्या साधारण ३५,००० हून अधिक आहे. त्या प्रत्येकाचा होणारा खप लक्षात घेता वाचकांची संख्या किती असेल याचा आकडा न काढलेलाच बरा. मोठमोठ्या शहरापर्यंत राहणाऱ्या हजारोशेकडो माणसांच्या जीवनाचा एक अपरिहार्य भाग वृत्तपत्रांनी व्यापलेला आहे. दैनंदिन जीवनात एक गरजेची वस्तू म्हणून वृत्तपत्राचे महत्त्व आज सर्वमान्य झालेले दिसते. आजच्या जीवनात वृत्तपत्रे हा अपरिहार्य घटक झाला आहे. किंबहुना आधुनिक संस्कृतीचे ते एक चिन्ह बनले आहे. वृत्तपत्रांनी सारे जीवनच व्यापले आहे. वृत्तपत्ररहित जीवनाची आपण कल्पनाही करू शकत नाही. दैनंदिन जीवनाची ती गरज झालेली आहे. सुदूर आदिवासी भागात कदाचित अजूनही इतक्या मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रांची गोडी निर्माण झाली नसेलपण वृत्तपत्रांचा संचार तेथपर्यंत जाऊन पोहचलेला आहे एवढे मात्र निश्चित. त्यामुळेच वृत्तपत्राविना आधुनिक माणूस राहू शकत नाही असे म्हटले जाते.

 

आजच्या पिढीतील पत्रकारांनी मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला काळानुरूप वेगळे रुप दिले. कारण सद्याचे युग हे स्पर्धात्मक युग असल्यामुळे आणि इलेक्ट्रॉनिक मिडियामुळे प्रिन्ट मीडीयाचे काम अवघड बनले आहेत्यातून मार्ग काढण्यासाठी वृत्तपत्रांच्या मालकांना सत्ताधारी व विरोधक या दोघांची मर्जी सांभाळून आपला व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे ते नीतीमुल्यांपासून दूर जात आहेत. भरमसाठ पैसे घेऊन दिली जाणारी भडक वृत्तेजाहिराती यांनी वृत्तपत्रांना गिळंकृत करून टाकले आहे. जर वाहिनी किंवा वर्तमानपत्राच्या मालकांनीच धोरण ठरवलं असेल तर संपादक काहिही स्वातंत्र्य घेऊ लिहू किंवा दाखवू शकत नाही. त्यामुळे उठसुठ संपादक आणि पत्रकारांना दोष देणं चुकीचं आहे. संपादकांच्या विचारस्वातंत्र्यासाठी ठामपणे उभे रहाणारे मालक आता भारतात अपवादात्मक शिल्लक राहिले आहेत.

स्मार्टफोन हातात घेऊन सध्या पिढी जन्माला आलेली आहे. अर्थात त्यासोबत इंटरनेटसोशल मीडियाची ओळख त्यांना त्यांचं पहिलं पाऊल टाकण्यासोबतच सुरु होते. अजून चालायला न लागलेली लहान बाळं रडून मोबाईलचा हट्ट धरतात. मोबाईलवर कुठे दाबल्यावर व्हिडिओ दिसतो किंवा मोबाईलमधून आवाज येतो हे त्यांना सर्रास ठाऊक असते. पहिली-दुसरीतील मुलं मोबाईलमध्ये फोटो काढणेयुट्यूबवर व्हिडीओ पाहणे असं सारं अगदी कौशल्याने करतात. माध्यमांच्या क्रांतीमुळे पिढ्यांमधील अंतर दिवसागणिक वाढत आहे. या बदलाचा आपण मोठा भाग आहोत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे सर्व जग एक मोठे खेडे बनल्याने संपर्कस्पर्धाअचूकता आणि प्रसंगावधान या गोष्टींना अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. इंटरनेट हा परवलीचा शब्द झाला असून जगाच्या कानाकोपऱ्यातील खबर इंटरनेटद्वारे आपल्या घरात बघण्यास मिळते. सोशल मीडियाचं (सामाजिक माध्यम) प्रस्थ आपल्याकडे इतकं फोफावलं आहे कीसार्वजनिक ठिकाणी अथवा घरांमध्ये लोक मोबाइलमध्ये मान खुपसून बसलेले असतात. जे बोलायचं ते व्हॉट्सअप किंवा फेसबुकसारख्या माध्यमातूनचया टप्प्यापर्यंत आपण येऊन पोचलोय. अपरिचित तर सोडाच पण परिचित माणसांशीसुद्धा थेट संवाद कमी होऊ लागलाय.

सध्याचे युग हे प्रसार क्रांतीचे युग म्हणून संपुर्ण जगाच्या लक्षात राहणार आहे. अमेरिकेच्या पेन्टागॉनवर किंवा सध्याचा युक्रेनवर रशियाने केलेला हल्लापंतप्रधानांचे परदेश दौरे अथवा बदलापूर सारख्या ठिकाणचा लोकक्षोभ काही क्षणात घरबसल्या पाहण्याचा योग प्रसार प्रगतीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. एखादी घटना पहाणे आणि ऐकणे म्हणजे ती घटना सत्य मानणे हे जरी खरे असले तरी ज्ञानी माणसांना प्रत्येक घटनेच्या पाठीमागे असणारा दस्तऐवज आपण आजही या फास्टफुड माध्यम क्रांतीमध्ये तपशिलवार वाचणेच आवश्यक वाटते.

डिजिटल माध्यमांकडे फक्त एक नवे माध्यम एवढ्याच मर्यादित दृष्टीने पाहणे चूक ठरेल. ती एक स्वतंत्र आणि व्यापक व्यवस्था आहे. आशयाची निर्मितीस्वरूपवितरणग्राहकवर्गआर्थिक गणितेयशापयशाचे निकष अशा अनेक बाबतीत ती वर्तमानपत्रेदूरचित्रवाणीसारख्या प्रसारमाध्यमांच्या व्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. या माध्यमांचे वय तसे जेमतेम दोन दशकांचेपण त्यांच्या वाढीचे स्वरूप आणि प्रमाण चक्रावून टाकणारे आहे. प्रस्थापित प्रसारमाध्यमांपुढे तर त्यांचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहेचपण त्यांचा वापर करणारे आणि नियमन करू पाहणारे यांच्यासाठीही ती आव्हानात्मकच आहेम्हणूनच डिजिटल माध्यमांचे स्वरूपत्यांची व्यवस्था आणि त्यांनी निर्माण केलेले आव्हान समजून घेणे हे माध्यमकर्मीअभ्यासक तसेच या माध्यमांचा वापर करणाऱ्या सुबुब्द नागरिकांसाठी आवश्यक आहे.

 आपण पत्रकार आहोतयाचा अभिमान वाटावा असा पत्रकारितेचा सुवर्णकाळ आता संपत चालला आहे. पत्रकारिता हे व्रत आहेसतीचं वाण आहेया गोष्टी केवळ सुविचार म्हणून राहिल्या आहेत. कविता आकाशातून पडत नसते. ती कवीच्या हृदयातून जन्माला यावी लागते. तसेच हाडाचा पत्रकारसुद्धा जन्मालाच यावा लागतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांवरसमस्यांवर मात करून ज्यांनी ग्रामीण पत्रकारितेची वेदना बोलकी केली पत्रकारिता ही शहरी किंवा ग्रामीण असतेयावर माझा विश्वास नाही. जिथे वेदना आहेव्यथा आहे अन ज्याची लेखणी जीवनाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श करणारी वास्तववादी प्रयत्न करते तोच खरा पत्रकार. मग तो शहरातला असो कीग्रामीण- भागातला. निश्चितच अभिमानास्पद आणि अभिनंदनीय आहे.

कार्लाइल नावाचा जगप्रसिद्ध माणूस असं म्हणाला होता की, 'खुज्या आणि ठेंगण्या माणसांच्या लांब सावल्या पडायला लागल्या कीसूर्यास्त जवळ आला आहेअसे समजायला हरकत नाही.आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी तिसरा वर्धापन दिन साजरा करताना त्यांच्या माध्यमात वास्तववादी लिखाण करून पत्रकारितेत येऊ घातलेल्या सूर्यास्ताला दूर लोटेलया अपेक्षेसह त्यांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छात्यांच्या या लिखाणातील उर्मी आणि हृदयातील गुर्मीला माझा मानाचा मुजरा !!


 




- रवींद्र मालुसरे

अध्यक्षमराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

संपर्क - ९३२३११७७०४

इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

पोलादपूर-महाड : शौर्याची परंपरा




पोलादपूर-महाड  : शौर्याची परंपरा

- रवींद्र मालुसरे

गडकिल्ले आणि दुर्गम दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला पोलादपूर - महाड तालुका हा रणभूमीवर लढणाऱ्या प्रसंगी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचा. पूर्वीचा कुलाबा आणि सध्याचा रायगड जिल्हा हा सुभेदार नरवीर तानाजी -  सूर्याजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे यांच्यापासून शूरवीरांचा जिल्हा आहे. या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाल्यानंतर तेव्हापासून विरांना प्रसवणारी ही भूमी आजपर्यंत शौर्याने तळपत आहे.

शिवकाळात, पेशवाईत, ब्रिटिश काळात व देश स्वातंत्र्य झाल्यानंतर वेळोवेळी या दोन्ही तालुक्यातील अनेक वीर पुरुषांनी पराक्रम केला व आपल्या नावाची व अद्वितीय पराक्रमाची नोंद इतिहासाच्या पानापानावर करून ठेवली आहे. आमचा साखर गाव तर या देव, देश, व धर्म कार्यात नेहमीच अग्रेसर राहात आला.  शिवकाळात सुभेदार तान्हाजी - सूर्याजी मालुसरे, पहिल्या जागतिक महायुद्धात सुभेदार भाऊराव मालुसरे तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सेनानी अंबाजीराव मालुसरे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नाना पुरोहित यांच्या सोबत स्वातंत्र्य सेनानी सखाराम चोरगे, बिठोबाअण्णा मालुसरे यांनी सहभाग घेतला. मालुसरे कुटुंबासह साखर गावाचा हा मोलाचा सहभाग आमचा ऐतिहासिकदृष्ट्या वारसा सांगणारा आणि समाजातल्या पुढच्या पिढीला ऊर्जा देणारा आहे...

पहिल्या महायुद्धाच्या काळात म्हणजे १९१४-१८ या काळात साखर खडकवाडीचे सुभेदार भाऊराव मालुसरे हे परभूमीत मेसोपोटेमियाच्या मोहिमेत धारातीर्थी पडले. मेसोपोटेमियाच्या मोहिमेत म्हणजे आजचे इराक, सीरिया हे देश तसेच इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेय कडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमिया मध्ये समावेश होतो.  पंजाब आणि अन्य पाच 'मरहट्टा' बटालियन' यांनी मिळून युद्धाला तोंड दिलं होतं. मेजर जनरल चार्ल्स टाऊनशेंड यांच्या नेतृत्वाखालील सहाव्या पूना डिव्हिजनचा भाग असलेली पाचवी रॉयल 'मरहट्टा' ही या पाचांपैकी एक.ही लढाई नोव्हेंबर १९१५ पासून एप्रिल १९१६ पर्यंत चालली होती. या काळात सैन्याची रसद आधी निम्मी झाली, मग पाव झाली आणि शेवटी तर स्वतःचं खेचर मारून खा, नाहीतर उपाशी मरा अशी वेळ आली. मराठा लढवय्यांनी खेचराचं मांस खायला साफ नकार दिला. तेव्हा मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शाहू महाराज यांनी तारेनं आपल्या सैन्याला कळवलं की, "खाण्यापिण्याच्या निर्बंधाविषयी असलेल्या मोठ्या अंधश्रद्धांपेक्षा जीव वाचवणं हे अधिक महत्त्वाचं आणि आवश्यक आहे." अखेर उपासमारीनं दमलेल्या खंगलेल्या, संख्याबळ कमी झालेल्या डिव्हिजनला शरणागती पत्करावी लागली. सर्व शूर अधिकारी आणि जवान तुर्की फौजेचे युद्धकैदी बनले. तुर्की छावणीत भारतीय युद्धकैद्यांच्या कष्टांना सीमा नव्हती. इराकी वाळवंटातून पायपीट करत त्यांना सिरियापर्यंत नेलं गेलं आणि सिरिया ते तुर्कस्थान हा रेल्वेमार्ग बांधण्याच्या कामावर त्यांना जुंपलं गेलं. कित्येकांचा बंदिवासात छळ झाला. आजारपण, उपासमार यांनी खंगून कित्येक जण मृत्युमुखी पडले.ब्रिटिश साम्राज्यासाठी, स्वतंत्र जगाच्या निर्मितीसाठी भारतातल्या विशेषतः पंजाब आणि महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांनी परक्या भूमीवर आपल्या पलटणीखातर बलिदान दिलेलं आहे. ते जगले ते 'नाव', 'निशाण', 'इमान', (नमक), 'परंपरा' (दस्तुर) आणि 'इज्जत' यांच्यासाठी आणि त्यांनी देह ठेवला तोही त्यासाठीच. महाड-पोलादपूर तालुक्याच्या खेड्यापाड्यांतली लढवय्यी आणि काटक परंतु साधी, नेक, कष्टाळू अनेक जणांनी त्यावेळी हौतात्म्य पत्करले. त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने राणीची मुद्रा असलेले  नंतर त्यांना पंचधातूचे एक शौर्य पदक त्यांच्या कुटुंबियांना सन्मानाने दिले होते. HE DEAD FOR FREEDOM & HONOUR - BHAU MALUSARE 

मराठ्यांना लढवय्येपणाची परंपरा आहे. मेसोपोटेमियाची मोहीम ही त्यांच्या या कीर्तीला साजेशी युगप्रवर्तक आणि इतिहासावर आपली मोहोर उमटवणारी होती. त्यांचं शौर्य, धैर्य, चापल्य आणि अत्यंत खडतर परिस्थितीतही पहिल्या महायुद्धात चिवटपणे झुंजण्याचं सामर्थ्य या त्यांच्या गुणांचा गौरव म्हणून या रेजिमेंटला लाइट इन्फन्ट्री (Light Infantry) हा किताब मिळाला.

भारताला खूप मोठा इतिहास आहे. ब्रिटिश येण्यापूर्वी भारताला अशी काही सीमा नव्हती. खरं तर देश म्हणून असं वेगळं स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. तर अनेक राजे, बादशहा, सरदार हे आपल्या राज्य विस्ताराकरता लढत होते. स्वसंरक्षण करत होते. मात्र १८५७ च्या पहिल्या लढाईनंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिशांनी भारतीय भूखंडाची सत्ता ताब्यात घेतली आणि खऱ्या अर्थाने भारताला सीमारेषा प्राप्त झाली, ओळख मिळाली. दक्षिण आशियात आपलं स्थान बळकट रहावं यासाठी ब्रिटिशांनी शास्त्रोक्त पद्धतीने संरक्षण दलाची उभारणी सुरू केली आणि 'भारतीय सैन्य' म्हणून संरक्षण दलाला चेहरा प्राप्त झाला.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक उच्च पदवी घेऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे. भविष्यात ऐशआरामी जीवन जगण्यासाठी परदेशात जाणाऱ्या युवकांची संख्याही वाढत आहे.  परंतु महाड - पोलादपूर हे शूरवीरांची परंपरा जपणारे तालुके व प्रत्येक गावातील एक तरी तरुण सैन्यात पाठवून आपली देशसेवेची परंपरा आजही अनेक गावात टिकून आहे. या दोन्ही तालुक्यांनी देशाला हजारो सैनिक तर दिलेच परंतु मातृभूमीसाठी बलिदान देणा-यांमध्येही ते मागे राहिले नाहीत.

सैन्यातील नोकरी आता बिकट होऊ लागली आहे. सीमोपलिकडे वाढणाऱ्या हालचालीं बरोबरच अंतर्गत आव्हानेही वाढली आहेत. अशा स्थितीत सैन्यातील नोकरी अनेक जण टाळतात परंतु मृत्यु समोर आहे हे माहित असुनही त्यात स्व:ताला झोकून देणारे अनेक जण या दोन्ही तालुक्यात दिसतात.

ज्यांच्या हाती आपलं आयुष्य सोपवून आपण देशात निर्धास्त राहत असतो अशा तालुक्यातील आंर्मी इतिहासाचा धांडोळा घेत तालुक्यातील अनेक योध्यांची दखल या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न मी करीत आहे. लढवय्या ही अस्मिता असलेल्या तालुकावासीयांना हे वाचायला नक्की आवडेल व स्फूर्तिदायक ठरेल अशी खात्री आहे. याचे कारणही महत्वाचे आहे  ते असे की, दि मराठा लाईट इन्फन्ट्रीचं बोधचिन्ह आहे 'कर्तव्य, सन्मान आणि धाडस' (Duty, Honour and Courage) तेही मला तितकंच प्रिय आहे.परिश्रम, सचोटी, निष्ठा आणि दैव या तत्वांवर विश्वास ठेऊन अनेकजण सैन्यदलात भरती झाले त्याप्रमाणे- 

सुभेदार नरवीर तान्हाजी - सूर्याजी मालुसरे यांच्या कुळाचा वारसा सांगणारे आमच्या साखर गावातील नायक पंढरीनाथ तुकाराम मालुसरे हे भारतीय सैन्यदलात देशसेवा करण्यासाठी६ मराठा लाईफ इन्फंट्री बेळगाव मध्ये भरती झाल्यानंतर २२  वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्त झाले आहेत, बेळगाव, जम्मू काश्मीर(सांभा), नॉर्थ सिक्कीम, नॉर्थ ईस्ट सिक्कीम, पुणे, जम्मू काश्मीर(आखनूर ), पश्चिम बंगाल, न्यू दिल्ली, मध्य प्रदेश, साऊथ सुदान देश, खंजळवान गुरेझ सेक्शन, पठाणकोट या ठिकाणी त्यांनी आपली ड्युटी बजावली. विशेषत: जम्मू काश्मीरमध्ये सांभा येथे (२००४ ), नॉर्थ सिक्कीम बंकर येथे (२००६ )नॉर्थ ईस्ट सिक्कीम लांचूग येथे (२००७ ), जम्मू काश्मीर आखनूर येथे (२०१२ ), युनायटेड नेशन-दक्षिण आफ्रिका येथे साऊथ सुदान (२०१७ ),जम्मू काश्मीर खंजळवान गुरेझ सेक्शन येथे (२०१९ ) या ठिकाणी झालेल्या सैन्यदलाच्या महत्वाच्या ऑपरेशन मध्ये त्यांना कामगिरी बजावता आली.

नायक पंढरीनाथ मालुसरे हे सैन्यदलातील निवृत्तीनंतर मंगळवार, दिनांक १०  सप्टेंबर २०२४  रोजी सकाळी ११  वाजता आपल्या जन्मभूमीत साखर गावात येत आहेत. साखर गावातील सर्व आबाल-वृद्धाना याचा अत्यंत आनंद होत आहे. याप्रित्यर्थ गावाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत होत आहे. साखर ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलेल्या स्वागत कार्यक्रमास तालुक्यातील सर्व समाजबांधव सुद्धा अगत्याने उपस्थित राहात आहेत यालाही महत्व आहे.

लष्कराच्या समूहात, गणवेशाच्या आवरणाखाली स्वतःचे व्यक्तिगत अस्तित्त्व हरवून धैर्याने, शौर्याने भारताचे सर्वार्थाने संरक्षण करून, समाजाकडून काहीही अपेक्षा न ठेवणाऱ्या भारतीय सैन्यातील वीर जवान जेव्हा आपल्या गावात येईल तेव्हा प्रत्येक सैनिकास, कृतज्ञतापूर्वक त्याचे स्वागत करण्यासाठी एकत्र पुढे सामोरे जायला हवे याचा चांगला पायंडा निर्माण होणे यानिमित्ताने गरजेचे आहे. साखर गावातील यापूर्वी नारायण रामचंद्र मालुसरे, पांडुरंग तांदळेकर, सुधीर चोरगे, शशिकांत खैरे, प्रदीप मारुती मालुसरे आणि पंढरीनाथ तुकाराम मालुसरे यांनी भारतीय सैन्यदलात देशसेवा केली आहे.  साखर गावाची ही  मोठी असाधारण कमाई म्हणावी लागेल.

आपल्या तालुक्यातील बहुसंख्य जवान हे पायदळात असतात. इन्फंट्री अथवा पायदळ हा सेनादलाचा प्रत्यक्ष सरहद्दीवर शत्रूशी आमने-सामने लढणारा विभाग. शत्रूवर हे पायदळाचे लोक चढाई करतात तेव्हा तोफखाना व रणगाडा तुकड्या त्यांना साहाय्य करतात. भारतातील सीमेचा खूप मोठा भाग असा आहे की, जिथे रणगाडे जाऊच शकत नाहीत. तर हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांमुळे तोफखान्याला मर्यादा पडते. अशा ठिकाणी सर्व मदार पायदळावरच असते. चढाई करताना एक संघ किंवा तुकडी असणे आवश्यक असते, म्हणून पायदळाची रचना पूर्वीपासून वेगळी आहे. पायदळ हे अनेक रेजिमेंटस् (अथवा विभाग) मध्ये विभागले गेले आहे. काही पलटणी खूप जुन्या आहेत. मराठा रेजिमेंटच्या १ मराठा, २ मराठा ह्या अडीचशे वर्षे जुन्या पलटणी आहेत.  एका भागातल्या लोकांची भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी सारख्या असतात. त्यांच्या राहण्याच्या पद्धतीत साम्य असते. त्यांचे सणवार, रीतिरिवाज, देवदैवते एक असतात. ह्या गोष्टी दिसायला लहान असल्या, तरी त्याने बराच फरक पडतो. 'शिवाजी महाराज की जय' ह्या आरोळीने मराठा जवानाला जेवढी 'स्फूर्ती' मिळेल तेवढी शीख जवानाला मिळणार नाही, तर 'सत् श्री अकाल' म्हटल्यावर त्यांना जेवढे स्फुरण चढेल तेवढे इतर कुणाला चढणार नाही. वरून छोट्या वाटणाऱ्या ह्या गोष्टींची पाळेमुळे अशी खोलवर रुजली आहेत.










हे मरहट्टे मोठे शूर, कडवे आणि चिवट असतात. म्हणून तर त्यांना त्या युद्धात 'लाइट इन्फन्ट्री' हा किताब मिळाला." शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांना लढवय्येपणाची परंपरा आहे. मराठा सैनिकांना पूर्वी 'गणपत' म्हणायचे. पहिल्या महायुद्धाच्या काळात Frankfurter Zeitung मध्ये एका जर्मन सैनिकाचं पत्र प्रसिद्ध झालेलं आहे. त्यात भारतीय सैन्याच्या शौर्याचं वर्णन त्यानं असं केलेलं आहे

फौजी आंबवडे गावाचा इतिहास :

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची परंपरा जपणारे गाव प्रत्येक घरातील एक तरी तरुण सैन्यात पाठवून आपली देशसेवेची परंपरा आजही टिकून आहे. फौजी आंबवडे गावाने देशाला हजारो सैनिक तर दिलेच परंतु मातृभूमीसाठी बलिदान देणा-यांमध्येही ते मागे राहिले नाही.

सैन्यातील नोकरी आता बिकट होउ लागली आहे. सीमोपलिकडे वाढणा-या हालचालीं बरोबरच अंतर्गत आव्हानेही वाढली आहेत. अशा स्थितीत सैन्यातील नोकरी अनेक जण टाळतात परंतु मृत्यु समोर आहे हे माहित असुनही त्यात स्वतला झोकून देणारे अनेक जण फौजी आंबवडे गावात दिसतात. फौजी आंबवडे गाव २३  लहान वाड्यांमध्ये वसलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात येथील अनेक कुटुंब होती. कान्होजी आंग्रे यांच्या आरमारातही काहींनी गुप्तहेरांची जबाबदारी पार पाडली होती. गावातील या पराक्रमाची साक्ष वतनदारी सनदीचे कागद व मानाची पंचधातूची तलवार गावात देत असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुमारे ४०० वर्षांचा इतिहास असलेले महाड तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या फौजी आंबवडे या गावाचा इतिहास आजदेखील संपूर्ण देशाला प्रेरणादायी व आदर्शवत राहिला आहे. गावातील प्रत्येक घरातील एक तरुण आज भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत आहे. आजघडीला या गावाची लोकसंख्या सुमारे ४ हजार आहे. १९१४  मध्ये झालेल्या पहिल्या महायुद्धात या गावातील १११  सैनिकांनी सहभाग घेतला. पैकी सहा जवान शहीद झाले होते. या १११  मधील १०५  जवान मायदेशी परतले. दुस-या महायुद्धात २५०  तरुणांनी भाग घेतला त्यातील ७०  जणांना वीरगती प्राप्त झाली.एकाच दिवशी २१  धारातीर्थी पडल्याच्या तारा गावात आल्याचे वृध्द व्यक्ती सांगात. या युद्धाचे प्रतीक म्हणून तत्कालीन ब्रिटिश सरकारने शहीद जवान स्मारक गावात उभे केले. ते आजही स्फूर्ती देत आहे.

सहा पिढ्यांपासून शौर्य परंपरा

१९४२  चा रणसंग्राम, १९६०  संयुक्त महाराष्ट्र, १९६२  चीनचे युद्ध, १९६५  भारत-पाक युद्ध, १९७१ चे युद्ध व १९९९  च्या कारगिल युद्धामध्येदेखील फौजी अंबवडे गावच्या सुपुत्रांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याची साक्ष भारतीय सैन्य दलातील ऐतिहासिक दस्तऐवजांमधून पाहावयास मिळते. भारत पाकिस्तान, बांगला देश युद्धातही या गावातील अनेक सुपुत्रांनी शौर्य गाजवले. या गावचे शहीद सुभेदार रघुनाथ गणपत कदम १९६५ च्या युद्धामध्ये जम्मू-काश्मीर येथे लढत असताना शहीद झाले, त्याचप्रमाणे २००३  यावर्षी मनोज रामचंद्र पवार यांना लेह लडाख भारत-पाक सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झाली. या वीरांची आठवण म्हणून त्यांच्या नावाने समाधी स्मारक गावात उभारण्यात आले असून, ते पुढील पिढीला प्रेरणादायी ठरले आहे. १९८०  मध्ये महाराष्ट्र सरकारने या गावाचे नामांतर 'फौजी आंबवडे' असे केले. आज या गावामध्ये माजी सैनिकांची संख्या पाचशेच्यावर असून आज भारतीय सैन्यात १००  पेक्षा जास्त तरुण कर्तव्य पार पाडत आहेत. आज या गावातील सैन्यात दोनशे जण सेवेत आहेत तर एकशे बारा निवृत्त झालेले आहेत. तरुण वर्ग सैन्य भरतीत कायम पुढे असतो. प्रत्येक घरातील एक जण सैन्यात आहेच. भारतीय सैन्यात अगदी शिपायापासून ते कॅप्टन पदापर्यंत गावातील अनेक जवानांनी पदे भूषवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. मनोहर रखमाजी पवार यांना तसेच काहीना त्यांच्या कामगिरीबद्दल सेनापदकेही मिळालेली आहेत. या गावातील तरुण शिक्षण कोणतेही घेतील परंतु सैन्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही असे माजी सैनिक कृष्णा पवार यांनी सांगितले. या गावातील 





फौजी अंबवडे गावचे सुपुत्र निखिल निवृत्ती कदम हा युवक तर सध्या लेफ्टनंट या पदावर भारतीय सैन्यात आहे.



महावीरचक्र प्राप्त सुभेदार कृष्णा सोनावणे :

कृष्णा सयाजी सोनावणे यांचा जन्म पोलादपूर तालुक्यातील कुडपण या गावी झाला. ७नोव्हेंबर १९४१ रोजी ते भूसेनेत दाखल झाले. १६फेब्रुवारी१९४८ रोजी शत्रूने नौशेराच्या सर्व ठिकाणी एकाच वेळी चौफेर हल्ला चढविला. त्यांपैकी ७ क्रमांकाच्या एम.एम.जी. चौकीवर शत्रूच्या सुमारे बाराशे जणांनी जोरदार हल्ला केला. कृष्णा सोनावणे यांच्या ताब्यात ही चौकी होती. हल्लेखोरांनी अगदी जवळून आपल्या बंदुका चालविल्या. हल्लेखोरांचे गट चौकीवर एकसारखे हल्ले करू लागले.

     नाईक कृष्णा सोनावणे यांनी आपल्या पथकाला आपली शांतता ढळू न देता मारा चालू ठेवण्याचे आदेश दिले आणि शत्रूची मोठी हानी करणे चालू ठेवले. या चकमकीत क्रमांक एकचा बंदूकधारी मानेवर गोळी लागून जखमी झाला. नाईक सोनावणे यांनी स्वत: ती बंदूक चालविण्यास सुरुवात केली. हे करीत असताना शत्रूच्या गोळ्यांनी त्यांच्या उजव्या हाताची चाळण झाली. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी जीवाची तमा न बाळगता डाव्या हाताने बंदुकीचा मारा चालू ठेवला. त्यांच्या चौकीचे भवितव्य दोलायमान स्थितीत असताना त्यांनी लढा चालूच ठेवला. त्यांची बंदूक नंतर नादुरुस्त झाली. अशा परिस्थितीत त्यांनी डाव्या हाताने हातगोळा फेकून व आपल्या सैनिकांनाही तसे करण्याचा आदेश देऊन लढा जारी ठेवला. अशा प्रकारे शत्रूची जबरदस्त हानी करून त्यांनी हल्ला परतवून लावला. अशा प्रकारे धैर्य व निर्धार दाखवून कठीण प्रसंगातही थंड डोक्यानेे कर्तव्यनिष्ठा बजावली आणि दोन तासांच्या अतिशय निकराच्या व बिकट प्रसंगात आपल्या सहकार्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या कृतीमुळे शत्रूचे सातशेहून अधिक सैनिक ठार झाले व महत्त्वाचे ठाणे वाचविणे शक्य झाले. या कार्याबद्दल त्यांना ‘महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले.

वाकण गावचे कॅप्टन आनंद रामजी साने हे १९६२ च्या लाईट इन्फ्रंट्री मराठा रेजिमेंट मध्ये देशसेवेच्या ध्येयाने  दाखल झाले होते. १९७१मध्ये झालेल्या पाकिस्तानच्या युद्धात सरहद्दीवर शत्रुसैन्याशीं प्रतिकूल परिस्थितीत झुंज देऊन अतुलनीय कामगिरी करून शौर्याचे दर्शन घडवले होते, त्याबद्दल त्यांना तत्कालीन राष्ट्रपतींकडून सन्मानित केले होते. 

पूर्वीचा कुलाबा आणि सध्याचा रायगड जिल्ह्यातील अनेक वीर जवानांनी रणभूमीत पराक्रम केला व आपल्या नावाची, पराक्रमाची नोंद इतिहासात करून ठेवली आहे. ब्रिटिश काळापासून सैनिकी पेशातील महाड-पोलादपूर मधील ज्या वीरांनी लढताना वीरमरण पत्करले त्यांची यादी -

(१) सयाजी गणपत जाधव - १८ जून १९४२ दुसरे जागतिक महायुद्ध - खडपी ता. पोलापूर

(२) देऊ दाजी सकपाळ - २१ मे १९४२ - भारत पाकिस्तान युद्ध - धामणेची वाडी - पोलादपूर

(३) गणपत राघोबा सालेकर - १९ नोव्हेंबर १९६२ - भारत चीन युद्ध - मोरसडे - पोलादपूर

(४) अनाजी धोंडू चव्हाण - १८ डिसेंबर १९६२ - भारत चीन युद्ध - फणसकोंड कोंढवी - पोलादपूर

(५) बाबुराव विठ्ठल जाधव - १२ सप्टेंबर १९६५ - भारत पाकिस्तान युद्ध -  पळसुले - पोलादपूर

(६) गणपत पार्टे - २६ नोव्हेंबर १९७१ -     भारत पाकिस्तान युद्ध -  तुर्भे बुद्रुक - पोलादपूर

(७) सखाराम गोविंद लाड - ३ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  उंदेरी - महाड

(८) लक्ष्मण गमरे - १० डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  पार्ले  - पोलादपूर

(९) यशवंत रामचंद्र गावंड - १४ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  वाघेरी - महाड

(१०) गणपत गोपाळ कळमकर - १४ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  वाकी - महाड

(११) नथुराम गोविंद कासारे - १६ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  नातोंडी - महाड

(१२) सुडकोजीं दगडू जाधव - १७ डिसेंबर १९७१ - भारत पाकिस्तान युद्ध -  वरंध - महाड 

(१३) सुरेश गुणाजी भोसले - १५ डिसेंबर १९८७ - ऑपरेशन मेघदूत -  लोहारे - पोलादपूर

(१४) सुरेश दगडू सुतार - १३ मे १९८८ - ऑपरेशन रक्षक - मांडला - पोलादपूर

(१५) प्रकाश अर्जुन सावंत - १५ ऑगस्ट १९९३ - ऑपरेशन रक्षक - दिवील - पोलादपूर

(१६) विश्वनाथ रामजी कोरपे - ११ डिसेंबर १९९४ - ऑपरेशन रक्षक - पुनाडे - महाड

(१७) नामदेव दगडू पवार - २१ सप्टेंबर १९९९ - ऑपरेशन मेघदूत - धामणे - महाड

(१८) तानाजी हबाजी  बांदल - ४ मे २००१ -  ऑपरेशन पराक्रम - चिखली - पोलादपूर

(१९) मनोज रामचंद्र पवार - २१ फेब्रुवारी २००३ - ऑपरेशन पराक्रम - फौजी आंबवडे - महाड

(२०) सुभेदार भरत अमृत मोरे - ९ मे २००३ - ऑपरेशन पराक्रम - कोंढवी - पोलादपूर

(२१ ) लक्ष्मण महादेव निकम  - ९ मे २००३ - ऑपरेशन पराक्रम - कोंढवी - पोलादपूर

(२२) ६ जून २००९ राकेश तात्याबा सावंत -  सावंत कोंड - पोलादपूर

(२३) १ सप्टेंबर १९२१ पोलादपूर तालुक्यातील लोहारे गावातील भुमीपुत्र श्री धीरज साळुंखे

(२४) २ ऑक्टोबरला २०२२ महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावचेराहुल आनंद भगत

(२५) १२ मे २०१८ महाड तालुक्यातील शेवते गावातील प्रथमेश कदम

 


रवींद्र तुकाराम मालुसरे

अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

 

हा लेख वाचल्यानंतर कृपया ९३२३११७७०४ यावर प्रतिक्रिया द्याव्या.



 इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...