मराठी भाषा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी भाषा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

'माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान'स्पर्धा




 मराठी भाषा दिवसानिमित्त स्पर्धा

'माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान' लेख स्पर्धा

या विषयावर खुली लेख स्पर्धा


मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दरवर्षीप्रमाणे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्ताने दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ मुबंईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्र लेखक, निवृत्त व सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी विनामूल्य ' माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान ' या विषयावर १२०० शब्दमर्यादा असलेली खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची घोषणा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषांनी आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे. खेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते, कशीही असो ती 'मराठी' च म्हणून मराठी माणसाला आवडते.  बोलीभाषेतील साहित्यकृतींचा धांडोळा घेत स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी लेख लिहावा यावा अशी अपेक्षा आहे,  पहिल्या ५ जणांना रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व इतरांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. युनिकोड फॉंट मध्ये टाईप करून दि १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लेख  chalval1949@gmail.com यावर पाठवावेत तसेच स्पर्धेचीअधिक माहिती, नियमावली व आगावू नोंदणी करण्यासाठी स्पर्धा संयोजक राजन देसाई ८७७९९८३३९० यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त ऍड देवदत्त लाड, विकास होशिंग, संजीव गुप्ते यांनी केले आहे.

खेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी 

अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते 

कशीही असो ती 'मराठी' च म्हणून 

मराठी माणसाला आवडते 

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

मराठी भाषेची चिंता व्यक्त करण्याची वेळ आली आहे - पोलीस उपायुक्त संदीप भागडीकर

मराठी भाषेची चिंता व्यक्त करण्याची वेळ आली आहे - पोलीस उपायुक्त संदीप भागडीकर 

इंग्रजी भाषा ही खरं तर जगाच्या व्यवहाराची भाषा आणि जीवनात स्थैर्य येण्यासाठी ती उत्तमपणे सर्वाना यायला हवी. मात्र आपण मराठी माणसांनी गेल्या काही दशकात याचा गैर अर्थ काढला आणि आपल्या दोन पिढ्या कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणासाठी घातल्या त्यामुळे त्यांची मराठी भाषेची तोंडओळखसुद्धा पुसली गेली आहे. यासाठी मराठी पालकांनी आपल्या पाल्याचे घरीच शिक्षक होऊन त्यांना मराठीचे धडे द्यायला हवेत. मराठी भाषेला भवितव्य नाही अशी ओरड सर्व व्यासपीठावरून अलीकडे होत असते मात्र संत ज्ञानोबा-तुकोबांपासून सर्व साधुसंत, समाजसुधारक, विचारवंत, साहित्यिकांनी समृद्ध केलेल्या शेकडो वर्षाच्या मराठी भाषेची गळचेपी होणार नाही, ती मरणारही नाही मात्र दिवसेंदिवस खंगत जाईल. मराठी भाषेच्या भविष्याचा असा चिंता व्यक्त करणारा विचार सहायक पोलीस आयुक्त संदीप भागडीकर यांनी व्यक्त केला. 

प्रभादेवी येथील आगरी समाज सेवा संघाच्या हॉलमध्ये मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते आपले विचार मांडत होते. याप्रसंगी चतुरंग सन्मान पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब, मनसे उपाध्यक्ष आणि दादर-माहीम विधानसभाध्यक्ष यशवंत किल्लेदार, आगरी सेवा संघाचे अध्यक्ष पद्माकर म्हात्रे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  भागडीकर साहेब पुढे असेही म्हणाले की, मराठी माणसांनी डोळसपणे अनुभव घेतला तर त्यांच्याच लक्षात येईल की, मराठी साहित्य आणि संस्कृती जपण्याची आता वेळ आली आहे. मराठी माणसाचे मन जेव्हा अशांत होते तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड, राजगड अशा गडकोटांवर जायला हवे म्हणजे आपण किती दगड आहोत हे लक्षात येते. 


याप्रसंगी यशवंत किल्लेदार यांनी  विचार मांडले, ते म्हणाले की मराठी भाषा, संस्कृती याचबरोबर मुंबईतील मराठी माणसांचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे प्रयत्न करीत असतात, त्यांची भाषा अनेकांना पटत नाही मात्र कालांतराने त्यांचा विचार बरोबर होता हे लक्षात येते. मी मराठीमध्ये शिकलो त्यामुळे लहानपणापासूनच बहुश्रुत होत गेलो. आयुष्याच्या या टप्प्यावर मला जाणवतेय ते म्हणजे महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरांचे सरकारी आशीर्वादाने परप्रांतीयकरण झपाट्याने होते आहे, त्यामुळे मराठी माणसांचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी यापुढे संघर्ष करावाच लागणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मी अनेक उपक्रम करीत असतो, यापुढे मी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या सोबत असेल.

शिवराजाभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब यांचे याप्रसंगी ' शिवपूर्वकाल ते शिवराजाभिषेक' या विषयावर व्याख्यान झाले. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र जुलमी राजवटीच्या अंधारात होता. स्वजात - स्वधर्माचा विसर पडून क्षत्रिय आपापसात लढत होते, अशावेळी आई जिजाऊंनी आपल्या पुत्रामध्ये स्वराज्य स्थापण्याचा विचार रुजविला. शिवरायांनी महाराष्ट्रातील अठरा पगड जातीजमातींना एकत्र आणून मावळ्यांमध्ये स्वतःचे राज्य निर्माण करण्याची जिद्द निर्माण केली. त्याचीच परिणीती पुढे रयतेचे राज्य निर्माण होण्यात झाले. त्यासाठी अनेक शूरवीरांनी पराक्रम केला, धारातीर्थी पडले काही गडाच्या पायरीचे दगड झाले. त्यावेळी इतर धर्मियांचे पातशहा, बादशहा यांच्या राजवटी हिंदुस्थानात होत्या, अशावेळी स्वाभिमान जागवत शिवाजी महाराजांनी राज्यरोहन करीत स्वतःला अभिषेक करून घेतला. स्वतःचे सोन्याचे व चांदीचे नाणे व स्वतःचा शिक्का तयार करून घेतले.  संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या उपक्रमांचा आणि चळवळीच्या ७५ वर्षाचा आढावा घेतला आणि संस्थेच्या उन्नतीसाठी भविष्यात सरकार आणि हितचिंतकांनी संस्थेच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले.   

कार्यक्रमास स्थानिक नागरिक, मराठी भाषाप्रेमी आणि दिवाळी अंकांचे अनेक संपादक-प्रकाशक उपस्थित होते. संघाचे कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष विजय कदम, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्यवाह नितीन कदम, सुनील कुवरे, दिगंबर चव्हाण, दिलीप ल सावंत, कृष्णा काजरोळकर, अबास आतार, ऍडव्होकेट प्रीती बने, रामचंद्र जयस्वाल, राजन देसाई, चंद्रकांत (चंदन) तावडे  यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी तर आभार प्रदर्शन पद्माकर म्हात्रे यांनी केले. 




रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे

 मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे - डॉ पी एस रामाणी

मुंबई : मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे. अप्रतिम शब्दरचना हीच मराठी भाषेची समृद्धी आहे. प्राथमिक शाळेत शिकलेलो म्हणी, वाक्प्रचार, अलंकार आणि आपल्या मूळांत खोलवर रुजलेला आहे. मराठी भाषेतला अनोखा ठेवा आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही अश्या अनेक पिढ्या जन्माला आल्या.  मराठी भाषेचे हे वेगळेपण जपण्यासाठी आणि वैयक्तिक आयुष्यात मराठी भाषा जोपासण्यासाठी, ती पुढील पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान असायला हवे असे  मराठीची थोरवी जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी यांनी दादर येथे गायली. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा दिन धुरू हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.  उपस्थितांना आवाहन करताना रामाणी असेही  म्हणाले की, मराठी प्रेम एक दिवसापर्यंत मर्यादित नसून, यापुढे  प्रत्येक दिवस मराठी म्हणून जगूया.

मराठी भाषेवरचे आक्रमण सहन करू नका - पद्मश्री डॉ तात्याराव लहाने तर सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री  डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, प्रशासकीय सेवेत असताना मी रुग्णांची नाळ सोडली नाही. सकाळी आठपासून संध्याकाळपर्यंत मी रुग्णांना भेटत राहिलो त्यांना माझ्यासमोर बसवून माझ्या गावाकडच्या बोलीभाषेत संवाद साधत राहिलो. त्यामुळे लाखो रुग्णांना मी कुणीतरी जवळची व्यक्ती आहे असा विश्वास वाटू लागलो. मी खेडेगावात मातृभाषेतच शिक्षण घेतले नावलौकिक मिळवला. त्यामुळे अनुभवांती मी खात्रीने सांगू शकतो. इंग्रजी ही फक्त पोपटपंची करण्यासाठी आहे खरे ज्ञान मातृभाषेतूनच मिळते. अपमान-अपयशाचा अनुभव तुमच्यासारखा माझ्याही आयुष्यात आला, पण मी जिद्द सोडली नाही. ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत झाडांना पाणी घालून मिळालेल्या पैशातून अभ्यास केला. उच्चारांनी ज्ञानात किंवा हुशारीत फरक पडत नाही हे सिद्ध करण्यासाठी खूप अभ्यास केला. डॉ लहाने साहेबांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना बदलत्या परिस्थिती वर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले की, मराठी भाषेवरचे आक्रमण सहन करू नका. मोबाईलमुळे घराघरातला संवाद संपला आहे. पूर्वी माणूस शंभर पाने वाचायचा आता शंभर शब्द सुद्धा ऐकण्याची क्षमता त्याच्यापाशी राहिली नाही.

मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त श्री प्रमोदभाई शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्रात जन्मलेल्या आपल्या सर्वांना माय मराठीने सर्वांना सर्वकाही दिले. ओळख आणि ज्ञान भरभरून दिली, परंतु माणसाचे संस्कारित मन बऱ्याचदा सैरभैर होते. माणुस वर वर दिसतो तितका खंबीर असेलच असं नाही....मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या जी आपल्या पर्यंत पोहोचत नसते किंवा त्या आनंदी आणि सुखी चेहऱ्याच्या आड लपवत असतो,लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शकतो. पण त्यासाठी मनशांती आणि मनशक्ती ची गरज आहे. आपल्या उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव यांनी मराठी भाषेचा शाहीर, कीर्तनकार, कथाकार, कादंबरीकार, कवी यांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली याचे विवेचन आपल्या भाषणात केले.

यावेळी व्यासपीठावर दासावाच्या प्रमुख कार्यवाह शुभा द कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे ऍड देवदत्त लाड, विकास होशिंग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक दिवंगत शरद वर्तक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या अमृत महोत्सवी चळवळीचा आढावा घेताना गेली ४८ वर्षे दिवाळी अंकांचे संपादक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करीत असल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व संपादकांचे आभार मानले. तर दासावाचे कार्याध्यक्ष मनोहर साळवी यांनी वाचनालयाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. वाचन चळवळीतील योगदानाबद्दल प्रदीप कर्णिक यांना दत्ता कामथे स्मृती पुरस्कार तर मराठी भाषेत शिवकालीन इतिहासाचा आयुष्यभर धांडोळा घेत इतिहास प्रेमींचे ग्रंथदालन समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक आप्पा परब यांना सेवाव्रती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंकांचा पारितोषिक वितरण करताना मनोरंजनकार' का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - महाराष्ट्र टाइम्स, चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक - सकाळ अवतरण, पांडुरंग रा भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक - मुक्त आनंदघन, पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक - गोवन वार्ता, पु ल देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक -कालनिर्णयसाने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक -अधोरेखित, मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक - मनशक्तीकृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक - श्रमकल्याण युग, याशिवाय उत्कृष्ट अंक म्हणून शब्दमल्हार,नवरंग रुपेरी, कनक रंगवाचा, पुरुष स्पंदनं,शब्दगांधार, समदा, सह्याचल, ठाणे नागरिक, त्याचप्रमाणे  उल्लेखनीय अंक म्हणून - संस्कार भक्तिधारा, क्रीककथा, कालतरंग, शैव प्रबोधन, धगधगती मुंबई,निशांत, सत्यवेध, गावगाथा यांना प्रदान करण्यात आले.

 मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती 'मराठी कॅलिग्राफी शब्द स्पर्धा, शाखाप्रमुख संजय भगत (प्रभादेवी) पुरस्कृत (१) मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या (२) जागतिकीकरण आणि मराठी भाषा या विषयावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरण झाले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे अभ्यासक सुरेश परांजपे मराठी रंगभूमीवर गाजलेल्या व्यक्तींची मिमिक्री तर कवयत्री अनघा तांबोळी यांचा तरल काव्यानुभव 'केवल प्रयोगी' चे सादरीकरण झाले. संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन राजन देसाई यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, माजी अध्यक्ष विजय कदम, नितीन कदम, दिगंबर चव्हाण, दिलीप ल सावंत, सुनील कुवरे, दत्ताराम गवस, प्रशांत भाटकर, आदेश गुरव  यांनी विशेष मेहनत घेतली. 



मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

मराठीच्या भल्यासाठी दिवाळी अंक परंपरा जपू या !

 

दिवाळी ! दिव्यांची आरास. रांगोळीचा थाट, पक्वानांचा घमघमाट आणि फटाक्यांची आतषबाजी ! दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्साह, उल्हासाचा उत्सव ! प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. अशी ही दिवाळी मराठी माणसांच्या नसानसातून झिरपत असते. दिवाळी म्हणजे दीप मांगल्याचा सण. रोषणाई,फराळ आणि फटाक्यांची आतिषबाजी हे दिवाळी सणाचे वैशिष्ट्य. त्याचप्रमाणे दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा  एक अविभाज्य भाग आहे.  म्हणूनच दीपावली सणाची केवळ चाहूल सुद्धा अबाल वृद्धांना हर्षभरित करते.

दिवाळी' येते तीच मुळात हसत, खेळत, नाचत. सभोवताल प्रकाशाने, देदीप्यमान तेजाने उजळून टाकत. सोबतीला असतात गतकाळाच्या दिवाळीच्या आठवणी, वर्तमानकालीन अपेक्षा आणि पुढील वर्ष आनंदात, सुखासमाधात जावं, ह्या आशा आणि इच्छा. दिवाळी म्हटलं की पहाटेची अभ्यंगस्नानं, उटणी, मोती आणि म्हैसूर चंदन साबणाचे सुवास, अत्तरं, फराळ, फटाके, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, नवीन कपडे हे सारं असतंच, त्याचबरोबर दिवाळी अंक घरी आल्याशिवाय बऱ्याच मराठी घरांत ह्या सणाची पूर्तता होत नाही! दिवाळीची चाहूल लागताच मराठी माणूस आणखी एका गोष्टीत गुंतून राहतो ते म्हणजे दिवाळी अंक. ह्या दिवाळी अंकांनी मराठी मनाला मोहवून टाकले आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि जगभरातील काही ठिकाणी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते. प्रत्येक सण, उत्सवावर त्या त्या प्रदेशातील सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा प्रभाव असतो. पण, महाराष्ट्रात दिवाळी सणाचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे. हा पैलू म्हणजे दिवाळी अंक. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे. जो केवळ मराठी भाषेतच पहायला मिळतो. अर्थात, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा महोत्सवाच्या निमित्ताने विशेषांक, गुजराती भाषेतही दिवाळी अंक छापले जातात. पण, त्यांचे प्रमाण अगदीच अल्प आहे. दिवाळी अंकाची सुरुवातच मुळात साहित्यिक प्रेरणेतून झाली आहे.

या दिवाळी अंकांच्या उगमतेचा इतिहास फार 'मनोरंजक' आहे. साहित्य क्षेत्रातील दिवाळी अंकांची प्रथा सुरु केली ती मनोरंजनकार काशिनाथ रघुनाथ तथा का र मित्र यांनी १९०९ साली. एकूण २०० पृष्ठसंख्या असलेल्या या दिवाळी अंकाची किंमत केवळ १ रुपया होती. हिरव्या रंगाच्या जाड कागदाच्या मुखपृष्ठावर एक मुलगा व एक स्त्री अंक पाहत असतानाचे चित्र असलेल्या या अंकात एकूण ४२ पाने जाहिरातीची होती. मात्र सुरुवातीची २६ पाने संपल्यानंतर अनुक्रमणिका दर्शविणारी ४ पाने होती. त्यानंतरच्या पानावर भारताचे तत्कालीन राजे किंग एडवर्ड सात यांचे चित्र व त्या पुढील पानावर संपादकाचे 'दोन शब्द' होते. आजच्या जाहिरातीचे बीज त्या काळातही पेरले गेले होते याची प्रचिती या दिवाळी अंकातील 'स्वदेशी लोटस' या साबणाच्या जाहिरातींवरून येते. जाहिरातीसोबत असलेले कुपन घेऊन येणाऱ्यास एक साबण बक्षीस देण्याची ती योजना विविधोपयोगी वस्तूंच्या जाहिरातींसोबत 'दामोदर सावळाराम आणि मंडळी' यांची १६ पानी दीर्घ जाहिरात आहे. . मनोरंजनाचा हा दिवाळी खास अंक महाराष्ट्रीयांस प्रिय होवो, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे. बालकवींची सुप्रसिद्ध असणारी ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता या पहिल्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती! यानिमित्ताने सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे.  गेली ११३ वर्षे मराठी साहित्याचा हा जागर अखंड होत आहे. हे सातत्य इतर भाषांमध्ये फारसे घडताना दिसत नाही. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषेची मिठ्ठास असून, ती खास महाराष्ट्राची साहित्यिक दौलत आहे. मराठी संस्कृतीमधील दिवाळी अंकांचे योगदान मोठे असून, लेखकांच्या दृष्टीने त्यांच्या जडणघडणीची ती एक शाळाच आहे. दिवाळी अंकांनी मराठी साहित्यातील विविध प्रकार हाताळले असून, त्यातून अनेक लेखक-साहित्यिक नावारूपास आले आहेत.  गेल्या ११३ वर्षांमधील  दिवाळी अंकातील साहित्यिक, कवी कोण होते यांची नुसती यादी बनवली, तरी त्यातून मराठीत किती विपुल आणि व्यापक प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली आहे हे लक्षात येते.  शतकोत्तर वर्षाच्या कालखंडात दिवाळी सणात आमूलाग्र बदल झाला आहे.  त्याला दिवाळी अंकही अपवाद ठरले नाहीत. दिवाळी व दिवाळी अंक या नात्यांमधील वीण दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली आहे. मराठी माणसाची 'दिवाळी' दिवाळी अंकाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही ! ‘दिवाळी-दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या उक्तींमधील आनंद दिवाळी साजरा करण्यातील अनेक गोष्टींइतकाच दिवाळी अंक हा त्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

प्रत्येक दिवाळी अंकाचा स्वत:चा असा एक वाचक वर्ग असतो. तो शक्यतो मिळेल त्या किमतीला तो अंक विकत घेतो. यंदाही तसेच घडेल, असे दिवाळी अंक संपादक आणि  विक्रेत्यांना वाटते आहे.  कारण दिवाळी अंक आले, की त्यावर उड्या मारणारे वाचक अजूनही तितक्याच निष्ठेने ते विकत घेताना दिसतात. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे.

दिवाळी अंकांच्या निर्मितीला शंभर वर्ष होऊन गेली. आजही नव्या पिढीला एकदा तरी दिवाळी अंक प्रकाशित करायचा याची भुरळ पडत असते. दरवर्षी नवनवीन दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. सध्याच्या घडीला मराठीत पाचशेहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात. हा आकडा आश्चर्य चकित करणारा आहे. यात दर्जेदार असे अंक खूप कमी असतात हि गोष्ट वेगळी पण आजही दिवाळी अंक नव्या पिढीला आकर्षित करतात याचं समाधान वाटतं. मजकूर कमी आणि जाहिराती जास्त असं स्वरूप अलीकडच्या अनेक दिवाळी अंकाचं दिसू लागलंय. पण तरीही दिवाळी अंकांच्या या गर्दीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ते टिकवून आहेत. दिवाळी अंकांचा व्याप सांभाळणे सोपे नाही, त्यातून मिळणारे उत्पन्नही बेताचे असते. असे असूनही मराठीतले बरेचसे म्हणजे मौज, दीपावली, आवाज, चंद्रकांत, धनंजय, किस्त्रीम, साधना,हंस, नवल, शतायुषी, आक्रोश, कलाकुंज, प्रसाद, धर्मभास्कर इत्यादी  दिवाळी अंक २५, ५० किंवा किंवा त्याहून अधिक वर्षे निघत आहेत.

१९५० ते ८० या काळातील दिवाळी अंक हे खरोखर साहित्यिक  विशेषांक होते आणि ते जाहिरातींचा वापर केवळ आधार म्हणून करत. जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतशी महाराष्ट्रातील मराठी मनाची साहित्यिक, सांस्कृतीक भूक वाढत होती. यात दिवाळी अंकांनी मोलाची भूमिका बजावत हे खाद्य अधिक सकसपणे द्यायला सुरुवात केली.  या वाढत्या भुकेला मराठी प्रकाशक साप्ताहिके, मासिके, पुस्तके आणि दैनंदिन घडामोडींसाठी वृत्तपत्रे जमेल तसे खाद्य देत आहेत आजही देतात. वैचारिक देवाणघेवाण होत पुढे वाढलेली वाचकांची भूक पाहून साप्ताहिकांनी विषयनिवडीत पहिल्यांदा कात टाकली. त्याचे पडसाद दिवाळी अंकातही उमटले. कथा, कविता, नाटक, कादंबरी यांसोबतच इतर भाषांमधील लेखकांचे अनुवादित साहित्य, भाषांतरीत कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं दिवाळी अंकात छापून येऊ लागली. आज तर दिवाळी अंकांचे स्वरुप इतके बदलले आहे की, दर वर्षी मोठ्या संख्येने दिवाळी अंक बाजारात येतात व स्वत:च्या वैशिष्ट्यांसह ते वाचकांपर्यंत पोहोचतातही. विशेषतः धार्मिक, महिला, ज्योतिष, आरोग्य, रहस्यकथा, विनोद, पाककला  या वैविध्यपूर्ण प्रकारांसह ते वाचलेही जातात. काही दिवाळी अंक तर अलीकडे पाणी, सोने, गड किल्ले, नातेसंबंध इत्यादी विषयांवर दर वर्षी स्वतंत्र विषय घेऊन त्याचा विशेषांक काढत असतात. काही संपादक आता तर जाहिराती जास्त व त्याला तोंडी लावायला साहित्य अशी अवस्था आहे.

दिवाळी अंकांना बँकांच्या जाहिराती यंदा मिळालेल्या नाहीत. टाळेबंदीत बरेच नुकसान सोसल्याने खासगी कंपन्यांनीही हात आखडता घेतला. दिवाळी अंकांच्या संपादकांना स्नेहसंबंधांतून मिळालेल्या जाहिरातींवरच अवलंबून राहावे लागले आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच पुस्तकांची व नियतकालिकांची छपाई बंद होती. प्रकाशकांच्या अडचणी आणि इतर समस्यांमुळे जो पुस्तकांचा खप आहे तो मंदावला असे म्हणता येईल. याचाच परिणाम या वर्षीच्या दिवाळी अंकांवर मोठ्या प्रमाणावर दिसून येणार आहेत. दोन वर्षे लागोपाठ जागतिक कोरोना संकट टाळेबंदीचा फटका दिवाळी अंकांनाही बसल्याचे सांगितले जाते आहे.  साहित्य फराळाची शतकी परंपरा सांगणाऱ्या दिवाळी अंकांकडे जाहिरातदारांनी पाठ फिरवली आहे. 'कोरोना'मुळे बाजारात दिवाळी अंक येणार नाहीत असे वातावरण तयार होत असतानाही आलेल्या इतर अनेक संकटांवर मात करीत, नवी जिद्द बाळगत, निराशेचे ढग बाजूला करीत गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही अनेक दिवाळी अंक तयार होऊन बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.  'हल्ली जाहिराती मिळत नाहीत, त्या मिळाल्या तरी मागाहून त्यांचे पैसे वसूल करणे फार जिकीरीचे होते', 'वाढत्या किंमती आणि घटता वाचक या दुष्टचक्रामुळे आता अंक काढणे परवडत नाही', अशा तक्रारी कानावर येतात. या तक्रारी खोट्या आहेत, असे नाही. मात्र, तरीही पाचशेच्या घरात अंक निघतात आणि दिवाळी अंकांची परंपरा सुरू राहावी यासाठी संपादक, लेखक सतत प्रयत्न करतात हेही तेवढेच महत्त्वाचे. आता काही दिवसांपासून कुठे आपल्या भारतात जनजीवन सुसह्य होऊ पाहत आहे. परंतु जगभरात करोनाची साथ चालू आहेच,  महाराष्ट्रामधे गेल्या वर्षभरात वादळ आणि पावसाच्या  महापूराने थैमान घातलेले आपण अनुभवले  आहे. निसर्ग सर्व बाजूंनी असहकार करत असताना संकटांच्या काळात मनुष्याला सकारात्मक रहाण्यासाठी, आलेल्या संकटांशी झुंजण्यासाठी, मनाला पुन्हा उभारी येण्यासाठी साहित्य महत्वाची भुमिका बजावत असते. कोरोनाची टाळेबंदी, समुद्री वादळ, ढगफुटी पावसामुळे अनेक ठिकाणी आलेले महापूर व  विस्कळीत झालेले जनजीवन या पार्श्वभूमीवर ही स्थिती अपेक्षित असूनही संकटाच्या काळातही मराठी भाषेतील दिवाळी अंकांची ही भव्य परंपरा, आपले सांस्कृतिक वैभव जपले जावे  केवळ परंपरा खंडित होऊ नये या  हेतूने प्रकाशकांनी दिवाळी अंकांची निर्मिती केली आहे. तुम्हा-आम्हा वाचकांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करून दिली जात आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.  साहित्य त्याच्या थकलेल्या मनाला विरंगुळा देतेच देते पण त्यासोबत हे ही दिवस जातील आणि पुन्हा ताठ कण्याने उभे रहाण्याची आशा आणि इच्छा जागृत करुन संकटकाळात धीर आणि दिलासा देते.

तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवीन बदल होत आहेत. अनेक गोष्टीत थोड्याबहुत प्रमाणात ते बदल अनुभवता येत आहेत. असाच बदल डिजिटल जगात होतोय. पहिला ‘डिजिटल’ स्वरूपातील दिवाळी अंक २००० मध्ये प्रसिद्ध झाला होता. ‘ऑनलाइन’ प्रकाशित झालेल्या घटनेला यंदा बावीस र्वष पूर्ण होत आहेत. एकवीस वर्षापूर्वी कोणी कल्पनासुद्धा केली नसेल की, इंटरनेटच्या आणि समाज माध्यमांच्या या युगात आपण पुस्तके आपल्या हातातील मोबाईलवर वाचू शकू. पण प्रत्येक दशक आपल्या बदललेल्या काळाची भाषा बोलत असतं. डिजिटल रूपात संगणकावर, मोबाइलवर आणि किंडल किंवा टॅब्लेटवर वाचता येणारे दिवाळी अंक, ऑडिओ बुक दिवाळी अंक, व्हिडीओ रूपात संवाद साधणारे दिवाळी अंक अशी एक नवी परंपराच सुरू झाली आहे.  या परंपरेनं जसं लोकप्रिय साहित्य जगभरातल्या मराठी भाषकांना तळहातावर उपलब्ध करून दिलं, तसंच यातून अनेक नवे लेखक घडवले आहेत. तो म्हणजे पुस्तके, मासिके, पाक्षिक नियतकालिके यामध्ये. तसेच प्रकाशित होणार्‍या आजच्या दिवाळी अंकांमध्ये सुद्धा ई-जगातला बदल पाहायला मिळतोय. पारंपरिक छापील दिवाळी अंकांचा आनंद घेतानाच नव्या माध्यमातील प्रयत्नांचंही स्वागत टेक्नोसॅव्ही नवीन पिढीने करायला हवे.

 भाषा आणि संस्कृती एकमेकींच्या हातात हात घालून वाटचाल करतात, एखादी भाषा नष्ट होते तेव्हा शेकडो वर्षांच्या संचितातून साकार झालेली, संपन्न झालेली संस्कृतीही लयाला जाते. आपल्या पूर्वसूरींच्या श्रमातून, कौशल्यातून, बौद्धिक-सामाजिक मंथनातून आकाराला आलेली अशी संस्कृती आपल्या डोळ्यांदेखत संपू नये असे वाटत असेल तर त्या संस्कृतीच्या खुणा आणि प्रतीक म्हणून जे उरले आहे ते जपणे, वृद्धिंगत करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव मराठी भाषिक अस्मिता म्हणून आपल्याच मुळा-नातवंडांमध्ये रुजवायला हवी. 

मराठी भाषा जगवा, समृद्ध करा. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत, बंद होत आहेत. शतकी परंपरा असूनही मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळत नाही. इंग्लिश माध्यमांच्या शाळांत मराठी भाषेची सक्ती करा अशा घोषणा आणि चर्चा आपण अधूनमधून करीत असतो. शंभर वर्षात अनेक आक्रमणे पचवत आणि स्वीकारत आजही चारशे-पाचशेच्या आसपास प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक मराठीची पताका खांद्यावर घेऊन मिरवत आहेत. दिवाळी अंकांची ही परंपरा तशीच सुरू रहावी यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपला वाटा उचलणे गरजेचे आहे. मराठी भाषा जगवायची असेल, तिचं स्थान भक्कम करायचं असेल, तर आज आपण सर्वांनी निश्चय करणे गरजेचे आहे. 

महागडे मोबाईल आणि टी व्ही ने आपली संस्कृती बिघडवण्याचा घाट घातला आहे, पण दिवाळी अंक मराठी माणसांची सांस्कृतिक भूक भागवित आहेत. अभिरुची वाढविताहेत, मराठी वाचक वाढविताहेत त्याबद्दल ह्या अंकांच्या संपादकांना  धन्यवाद द्यायलाच हवेत. त्याचवेळी, दिवाळी अंक प्रकाशकांनी आता नव्या जगातील नव्या माध्यमांशी मैत्री करणेही गरजेचे आहे. दिवाळी अंक हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ती स्वतःला समृद्ध करण्यासाठीची ती एक पर्वणी असते. कायदा न करता तिच्या संवर्धनासाठी आत्मीयतेने  मराठी वाचूया, बोलूया आणि लिहूया !

 रवींद्र तुकाराम मालुसरे,  अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४  

शनिवार, १६ मे, २०२०

मराठी भाषेची चिंता आणि चिंतन


मराठी भाषेची चिंता आणि चिंतन




प्रत्येक वर्षी जगाच्या पाठीवरील कोठेही वास्तव्य करणारा मराठी माणूस २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून उत्साहाने साजरा करीत असतो. पण आपला  हा मराठी भाषेचे चिंतन करण्याचा हा एकच दिवस आहे का ? हा प्रश्न उभा राहतो. खरे तर मराठीची काळजी वर्षाच्या ३६५ दिवस करायला हवी. पण तसे होताना दिसत नाही. कवी जुलिअन यांनी "मराठी असे माझी मायबोली जरी आज ती राजभाषा नसे" हि खंत प्रकट केलेली होती. आज ती राजभाषा आहे पण, तिची अवस्था मात्र कशी आहे ते कवी कुसूमाग्रजांनी यापूर्वीच तितक्याच खेदाने नमूद करून ठेवल्याचे आपणा सर्वाना स्मरते आहे. आपल्या या मराठी साहित्याला साडेसातशे वर्षाची परंपरा असली तरी मराठी बोलीला किमान एक हजार वर्षापेक्षा अधिकच परंपरा लाभलेली आहे. सव्वा अकरा कोटी लोकांची मराठी ही जगातील १० व्या क्रमांकाची मोठी भाषा आहे. संपन्न ज्ञानभाषा असणारी मराठी महानुभावांची धर्मभाषाही आहे. मराठी ही राजभाषा असणारे सातवाहन,राष्ट्रकूट आणि मराठे हे राज्यकर्ते भारतभर राज्य करत होते. मराठी भाषा बोलणारे आज जगातील ७२ देशात पसरलेले आहेत. भारताच्या अनेक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात अनेक जण महत्वाच्या अधिकार पदावर काम करीत आहेत, त्यामुळे ही फक्त एका प्रांताची भाषा नसून ती महत्वाची राष्ट्रीय भाषा झाली आहे. मराठी भाषेत आजवर सुमारे एक लाख ग्रंथ प्रकाशित झालेले असुन त्यातील असंख्य ग्रंथ वैश्विकदृष्ट्या श्रेष्ठ ठरावेत असे आहेत. या एक हजार वर्षाच्या परंपरेत मराठीने अनेक संकटे पेलून आपली योग्यता आणि संपन्नता सिद्ध केलेली आहे. मराठी ही अमृतातेही पैजा जिंकणारी भाषा आहे. १६१४ मध्ये मराठीचे परदेशी उपासक फादर स्टीफन यांनी मराठीचा केलेला गौरव बघितला तर मराठीचे भव्य आणि सुंदर स्वरूप दिसून येईल.

जैशी हरळामांजी रत्नकीळा | की रत्नामाजी हिरा निळा |
तैशी भाषा मांजी चोखळा | भाषा मराठी ||१||
जैशी पुष्पामांजी पुष्प मोगरी | की परिमळामांजी कस्तुरी |
तैशी भाषामंजी साजिरी | मराठीया ||२||



केंद्र सरकारने आजवर भारतातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून तामिळ,संस्कृत,तेलगू,कन्नड व मल्याळम या भाषांना अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला आहे. आपल्या मराठी भाषेला सुद्धा तो मिळावा अशी तमाम मराठी भाषकांची तीव्र इच्छा आहे. सरकारी पातळीवरूनसुद्धा तसा पाठपुरावा केला जातो आहे, पण अजूनही यश पदरात पडेनासे झाले आहे. या दर्जामुळे कोणत्याही भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोर तर उमटते. आणि त्याचबरोबर भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळते व  भाषाविकासाच्या कार्याला चालना मिळते.
आपल्या शेजारील तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा मिळाला आहे. तिथे या भाषेचे चिंतन आणि चिंता वर्षभर केले जाते. पण मराठीची आपण फारशी चिंता करतो आहे अथवा चिंतन करतो आहे असे दिसून येत  नाही. साहित्य संमेलनाच्या नावाने एक उरूस पार पडला की बस्स.  कन्नड भाषेच्या उत्थापनासाठी सवंर्धनासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले जाते. कन्नड भाषा वाढावी यासाठी शासकीय पातळीवरून सर्व व्यवहार कन्नडमधून केले जातात. आपण मराठी माणूस अथवा आपले राज्यकर्ते स्वभाषा टिकविण्यासाठी कितपत प्रयत्न करतो याचे आता चिंतन करायला हवे.

कोणतीही भाषा हि ज्ञानाची भाषा असते. जे आपल्या भाषेत नाही ते इतर भाषेतून आपल्याला घेता येते. केवळ आपल्या भाषेला महत्व देऊन इतर भाषेला नकार म्हणजे एका दृष्टीने ज्ञानाला नकार असतो. परंतु इतर भाषेला अधिक महत्व देऊन स्वभाषेकडे दुर्लक्ष झाले तर ती भाषा आपले अस्तित्व गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या भाषेचे महत्व ओळखून इतर भाषा आत्मसात केली पाहिजे. इंग्रजीला नकार देऊन जसे चालणार नाही तसे तिचेच गोडवे गाऊनही चालणार नाही. मराठी भाषा संपन्न बनवण्यासाठी अन्य भाषेतून जे साहित्य,ज्ञान आणता येईल ते आणले पाहिजे. अशा प्रकारे मराठीचे ज्ञान भांडार वाढविता येणे शक्य आहे. असे झाले तरच मराठी हि ज्ञानभाषा बनायला फार उशीर लागणार नाही.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी |
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी |
एवढ्या जगात माय मानतो मराठी ||



असे कवी सुरेश भटांनी म्हटले आहे. खरोखरच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा आणि मराठी भाषा ऐकण्या-बोलण्याचा सार्थ अभिमान आम्हा मराठीजनांना आहे असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे मराठी भाषेबद्दल खंत व्यक्त करायची. ज्यांना स्वतःलाच मराठीबद्दल अभिमान वाटत नाही तेच मराठी भाषेला दुय्यम दर्जा देतात. आमचे महाविद्यालयातील प्राध्यापक महोदय तर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना म्हणतात की, मराठी विषय घेऊ नका. मराठी भाषा घेऊन पुढे काय करणार ? आणि घेतला तर त्यामागे निवडताना असा विचार असतो..एकतर तो सोपा आहे किंवा अवघड आहे म्हणून. सोपा या अर्थाने कारण आपली ती मातृभाषा आहे आणि अवघड या अर्थाने की त्यामध्ये भरपूर कविता असतात. पण काव्य म्हणजे मानवी जीवनातील हिरवळ आणि संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव यांचे अभंग म्हणजे मानवी जीवनाला दिशा देणारे तत्वज्ञान. खरं तर आज महाविद्यालयीन स्तरावर मराठी विषय सक्तीचा करणे गरजेचे आहे. कारण मुलांच्या बुध्यांकाबरोबर भावनांक देखील वाढला पाहिजे. आणि हा भावनांक वाढविण्याचे काम मराठी साहित्य विषय करीत असतो. मातृभाषेमध्ये शिक्षण म्हणजे आईच्या दुधावर पोसणे. त्याला दाईच्या दुधाची जोड कशी येईल ? इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे यामध्ये निश्चितच फरक आहे. ज्ञानाची निर्मिती ही मानवी बुद्धीचा आणि विचारसामर्थ्याचा सर्वश्रेष्ठ अविष्कार असतो. असा अविष्कार इतर भाषेवर अवलंबून राहिल्याने कधीच होत नाही. विचारसामर्थ्य हे खऱ्या अर्थाने मातृभाषेतूनच घडत असते. आपण इतर कोणत्याही भाषेत बोलत असलो तरी विचार मात्र मातृभाषेतूनच करतो. म्हणूनच शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असले पाहिजे असेच शिक्षण क्षेत्रातील विचारवंतांना वाटत आले आहे.

आज मराठी भाषेवर सर्वांगांनी असे आक्रमण चालू झाले आहे. यातून आपली मूळ मराठी भाषा वाचवायची अथवा टिकवायची असेल तर तिची नाळ कदापि तोडता काम नये. आज मराठी भाषा आणि संस्कृतीलाही मरणयातना भोगाव्या लागत आहेत. पर्यायाने या मरणयातना मराठी माणसांच्या आहेत. याला जबाबदार आपण मराठी भाषिकच आहोत. इंग्रजी अथवा इतर भाषेचा तिरस्कार करून मराठीचा विचार करता येणार नाही. यासाठी जागरूकपणे मराठी भाषेचा विचार करायला हवा. हतबल होऊन चालणार नाही. सकारात्मक कृती करायला हवी. आपल्याला भावनात्मक पातळीवर मराठीचा विचार करून चालणार नाही. व्यावहारिक पातळीवर मराठीबद्दल सांगोपांग विचार करायला हवा. मराठी माणसाच्या ठिकाणी असलेली भाषेबद्दलची उदासिनवृत्ती नाहीशी व्हायला हवी. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. हा जागतिकारणाचा काळ आहे. आणि या जागतिकारणाची भाषा इंग्रजी आहे. त्यामुळे इंग्रजीपासून दूर जाऊन चालणार नाही. अशी मराठी मरणारही नाही आणि संपणारही नाही. परंतु तिचे पालन पोषण अर्थात संवर्धन मात्र होणे आवश्यक आहे. एकूणच माय मराठी भाषा ही सक्षम असून भाकरी देणारी भाषा म्हणून ती श्रेष्ठच आहे. मात्र मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी मराठीला अमृतरूपी गोडवा देणाऱ्या मराठीच्या बोली टिकवायला हव्यात.

भाषा हि अंगवळणी पडल्यानेच समाजात रूढ होत असते, असा भाषेच्या जाणकारांचा अनुभव आहे. ती पर्यायी पारिभाषिक शब्दाने क्रमशः विकसित होत असते. हाही नवा अनुभव नाही. पण त्याकरिता वैयक्तिक व सामूहिक पातळीवर कितपत पायाभूत पद्धतीने प्रयत्न होतात हेच महत्वाचे आहे. कदाचित हे ओळखूनच भाषाविकास मंडळाची नव्याने स्थापना केली गेली असावी. पण हि स्थापना फक्त घोषणेपुरती उरली हेही राजभाषा दिनाच्या निमित्ताने खेदाने नमूद केले पाहिजे. राजभाषा हि फक्त अशत: सचिवालयात आणि तिथल्या पत्रव्यवहारात राहू नये अशी आपली सततची अपेक्षा असते. ती समाजाभिमुख होणे व समाजाकडून तिचा अधिकात अधिक वापर होत गेल्यानेच राजभाषा म्हणून सिद्ध होणार आहे. हे काम कुणा एकट्या दुकट्याचे नसून सर्वस्व शासनाचेही नाही. तर ते शासन आणि समाज अशा दुहेरी पातळीवरून प्रकट होणारे असावे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषेविषयी केला जाणारा विचार-चिंतन हे मराठीतूनच होत असल्याने मराठी भाषा अधिक काळ संवादी राहणार आहे. जागतिकीकरणामुळे कितीही बलिष्ठ आव्हान तिच्यासमोर उभे राहिले असले तरी ती मरणार नाही. हे निर्विवाद सत्य आहे. इंग्रजीचा स्वीकार करीत असताना मराठी भाषेला त्यागून चालणार नाही. आपल्या भाषेचा स्वाभिमान जपणे आणि इतर भाषेचा आदर करणे हे सूत्र आत्मसात करण्याची वेळ आली आहे. आपली मातृभाषा अधिक समृद्ध करण्यासाठी तिच्या ज्ञानवाटा अधिक विस्तारित करायला हव्यात. नवनवीन  ज्ञान मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न सर्व मराठी जणांनी  केला पाहिजे कारण भाषेचा विकास हा सर्व समाजाचाच असतो. म्हणून सर्व समाजानेच आपल्या मराठी भाषेविषयी अस्मिता ठेवायला हवी.

शेवटी असे म्हणावेसे वाटते, विश्वकल्याणाची संकल्पना 'पसायदानाच्या' रूपात सर्वप्रथम ज्या माय मराठीत कोरली गेली ती विश्वात मराठी माणसाला श्रेष्ठत्व देणारी ठरणारी आहे. 

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704




वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...