वै ह भ प मुरलीधर ढवळे गुरुजी माणूस घडवणारा शिल्पकार
वै ह भ प मुरलीधर ढवळे गुरुजी
माणूस घडवणारा शिल्पकार
शिक्षण आणि वारकरी कीर्तन या दोन क्षेत्राचा अवलंब करीत गेल्या वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या ९१ व्या वर्षांपर्यंत कार्यरत असणारे पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक या गावचे वै ह.भ.प. मुरलीधर गेणू ढवळेगुरुजी यांनी आयुष्यभर हेच काम केले.आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्याचे महत्व आणि गरज अधिक ठळकपणे अधोरेखित व्हावी यासाठी हा लेखनप्रपंच !
समाजाला सुशिक्षित व सुसंकृत करणारा 'आधार' म्हणजे शिक्षक आणि कीर्तनकार ! पोलादपूर तालुक्यातील जणू पितामह असलेल्या गुरुजींनी असिधाराव्रत म्हणून या दोन्ही प्रांतातील भूमिका देह ठेवेपर्यंत निष्ठेने केल्या.
शिक्षण देणे हे आपल्या जीवनाचे धेय्य आहे आणि ज्ञानदानाचे समर्पण करणे हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे मनोमन स्वीकारलेल्या गुरुजींच्या दोन्ही कार्याची महानता भावी पिढीला आदर्शवत अन प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.
शिक्षणाने व्यक्तीला समाजात राहायला शिकवले पाहिजे, हे स्पष्ट करताना डॉ. राधाकृष्णन म्हणतात. 'The importnace of education is not only in knowlege and skill but it is to help us to live with other's. आज माणूस एकेकापासून तुटत चालला असताना हा विचार किती मोलाचा आहे. या त्यांच्या विधानावरून 'विद्वान सर्वत्र पूज्यते' या वचनाची प्रचिती येते. वर्तमान काळात 'शिक्षक' हे केवळ अध्यापनकर्ता न राहता ते 'मार्गदर्शक', समुपदेशक देखील असले पाहिजेत. शिक्षकांचे व्यक्तिमत्व जितके विनयशील, संपन्न, व्यासंगी तितका परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर व विद्यार्थ्यांना मिळणार्या प्रेरणेवर होत असतो म्हणून तत्त्वज्ञान कितीही बदलले अध्ययन, अध्यापनाच्या प्रक्रियेत बदल झाला तरी गुरुजींसारख्या संस्कारक्षम शिक्षकांचे महत्त्व कमी होणार नाही.
२२ ऑक्टोबर १९३० साली रानवडी येथील शेतकरी गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे पहिली ते दुसरी शिक्षण रानवडी बुद्रुक येथील खाजगी शाळेत. तिसरी ते चौथी शिक्षण कापडे येथील सरकारी शाळेत, पाचवी ते सातवी महाड येथे त्यानंतर पी.एस.सी. परीक्षा सन १९४७ साली पास झाले. त्या काळातील हे शिक्षण त्यांना एखादी चांगली सरकारी नोकरी देऊ शकले असते. परंतु स्वतःचे शिक्षण घेतानाच त्यांना एक विचार मनोमन पटला होता. तो म्हणजे शिक्षण हे संस्कृती संवर्धनाचे साधन आहे, तर शिक्षक हा संस्कृतीचा साधक आहे. त्या दृष्टीकोनातून त्यांनी १९४८ साली स्वतःहा रानवडी येथे शाळा स्थापन करून गावातल्या मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.
माणसाने पावले दूरदृष्टीने टाकली तर भरारी घ्यायला वेळ लागत नाही, या पावलांना जर नम्रतेची जोड असेल तर रोवलेले पाय अधिक कटिबद्ध होतात एवढे मात्र खरे. गुरुजींनी अशीच वाटचाल सुरू केली, या शाळेला व्हॅलेंटरी शाळा म्हणून चालवल्यानंतर १९५५ मध्ये ही शाळा सरकारने स्कुल बोर्डाकडे वर्ग केली. १९६० पर्यंत रानवडी शाळेवर काम केल्यानंतर सन १९६०-६१ पनवेल येथे ते पुढील ट्रेनिंग घेऊन पास झाले. तदनंतर १९७२ ते १९८१ घागरकोंड आणि १९८१ ते १९८७ पर्यंत रानवडी येथे त्यांची नेमणूक झाली. १९८८ ला घागरकोंड येथे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले.
ज्या ज्या शाळेत त्यांनी अध्यापनाचे काम केले त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी दर्शनी भागावर प्रथम लिहिले, "यावे शिक्षणासाठी जावे सेवेसाठी" माणसांचं मोठेपण तो किती मोठा झाला यापेक्षा त्याने किती लोकांना मोठे केले यावर त्यांचे मोठेपण मोजले जाते. गुरुजींनी त्यांच्या हयातीत विद्यार्थ्यांच्या आणि वारकरी क्षेत्रातील लोकांच्या संदर्भात नेमकं हेच केलं. जो त्यांच्या सहवासात आला तो सद्गुणांनी मोठा कसा होईल हे पाहिले त्यांनी जणू हे व्रतच स्वीकारलं होतं.
नावारूपाला आलेले इतर पुष्कळ असतात, पण एव्हढ्या पावित्र्यानं, एवढ्या मंगलतेने ढवळे गुरुजींनी आपल्या आयुष्याकडे पाहिले, की आपलं जीवन नुसते जगणे न ठरता इतरांसाठी प्रेरणा ठरेल. कुटुंब कल्याण, आदिवासी बांधवाना साक्षर करणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करणे अशी अनेक उदाहरणे सामाजिक बांधिलकीची त्यांच्या बाबत सांगता येतील.
शाळा ही एकाच छापाच्या विटा भाजून काढण्याचा कारखाना होऊ नये तर प्रत्येक विद्यार्थीरूपी शिल्प स्वतंत्ररीतीने घडावे याकडे गुरुजींचा कटाक्ष असे. जीवन आणि शिक्षण यांची फारकत त्यांनी कधी मान्य केली नाही. शिक्षणातून नेहमी श्रमाची प्रतिष्ठा, ग्राम स्वच्छतेचे महत्व, पर्यावरण, समाजातला बंधुभाव, साधेपणाने जगण्याची वृत्ती अंगी कशी बाणवावी त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केला. शिक्षणाच्या ध्यासातून आपला दिवा वादळात देखील जपून ठेवणारे गुरुजी एक खंत माझ्याकडे नेहमी बोलून दाखवीत ती म्हणजे आजच्या पालकांना आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, सनदी अधिकारी होणे श्रेयस्कर वाटते. त्यासाठी त्यांना उत्तम शिक्षक आणि शिक्षण हवे असते, पण आपल्या व आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण करणारा त्यापैकी कुणी उत्तम शिक्षक व्हावा असे मनापासून वाटणारे फार कमी आहेत.
लहानपणापासूनच त्यांना परमार्थाची आवड होती. पोलादपूर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे अर्ध्वर्यू वै ह भ प रामचंद्र आ तथा ढवळे बाबा यांच्याकडून आदेश आल्यानंतर महाराष्ट्रातील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड (पंढरपूर) ते माळकरी झाले. आळंदी ते पंढरपूर अशा १५ पायी वाऱ्या त्यांनी केल्या. अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि अभ्यास केल्यानंतर १९६१ सालापासून कीर्तन सेवेस प्रारंभ केला. सात दशके कीर्तन प्रवचन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. संकट असो, दुःख असो, प्रवासात शारीरिक किंवा मानसिक व्यथा असोत, 'रामकृष्ण हरी' म्हणायला सुरुवात केली. आणि त्यांचे दैवत पांडुरंगाचे नामस्मरण केले की, कोणत्याही व्यथेचा त्यांच्या चेहऱ्यावर लवलेश दिसत नसायचा असे त्यांच्याच गावातील त्यांचे सहकारी रायगड भूषण सुप्रसिद्ध भजनी गायक पांडुरंग बुवा उतेकर हे सांगतात. रायगड जिल्हा, सांगली, मिरज, पंढरपूर, आळंदी, देहू, रत्नागिरी, सातारा येथे त्यांची शेकडो कीर्तने झाली आहेत. त्यांचे कीर्तन म्हणजे भक्तिरसाचा खळखळणारा प्रवाह. अभंगांचे मधुर व प्रभावी गायन, त्यातील प्रत्येक शब्दाच्या अर्थछटा उलगडून सांगण्याची विद्वता यामुळे त्यांचे कीर्तन ऐकणे म्हणजे एक अलौकिक अनुभूती असते. जितका मोठा कार्यक्रम तितके त्यांचे कीर्तन रंगून जात असे. समोर विद्वान अथवा मोठी माणसं आहेत म्हणून ते कधी बावरलेत अथवा आता काय सांगावे असा विचार त्यांनी कधीच केला नाही. कीर्तन प्रवचनासाठी बसलेला समाज बघून त्याप्रमाणे ते निरूपण करीत असल्याने त्यांच्या कीर्तनातले प्रत्येक वाक्य प्रत्येकाला भावते. श्री पांडुरंग चरणी ते इतके एकरूप झालेले असतात की, 'ते वर्तत दिसती देही | परी ते देही ना माझ्या ठायी || अशी त्यांची अवस्था होत असे. ज्या आजरेकर फडाची वारकरी परंपरा त्यांनी हयातभर जोपासली त्यावर त्यांची दृढ श्रद्धा होती. त्याकरिता त्यांनी आपले तन-मन-धन अर्पण केले. अविचाराने, अव्यवहाराचे आणि अविश्वासाचे वातावरण प्रदूषणमुक्त करायला संतविचारांचा मारा या भूमीवर सातत्याने घातला गेला पाहिजे यासाठी आपले वृद्धत्व जाणवत होते तरी ते कीर्तन सेवेच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजात चांगला माणूस घडावा या हेतूने त्यांचे 'घडो कीर्तन सेवा सदैव या हाती' या उक्तीप्रमाणे त्यांचे भ्रमण अविरत सुरु होते यादृष्टीकोनातून त्यांनी केलेल्या कार्यावर नजर टाकली, तर त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव होते.
मागच्या एका भेटीत आधुनिक शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यासंदर्भात ढवळे गुरुजींशी साकल्याने चर्चा झाली. जग आणि आधुनिक शिक्षण पद्धती झपाट्याने बदलत असल्याचे त्यांनी मत मांडले. याविषयी बोलताना ते म्हणाले, विद्यार्थी जसा निव्वळ परीक्षार्थी असता कामा नये तसा, शिक्षकही निव्वळ 'अर्थार्जनाचे' साधन म्हणून शिक्षण क्षेत्राकडे पाहणारा असता कामा नये. 'शिक्षक' असण्याची पहिली अट 'विद्यार्थी' असणे हीच आहे. 'शिक्षक' केवळ 'पोपटपंची' करणारा, प्रश्नांना वावच न देणारा असेल तर अर्थपूर्ण ज्ञान-व्यवहार संभवणार नाही. शिक्षक-विद्यार्थी परस्परपूरक असावेत. 'चांगला' शिक्षक विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करतो. माहिती तंत्रज्ञानाचा 'विस्फोट' झालेल्या काळात विद्यार्थी पूर्वीसारखा माहितीसाठी शिक्षकांवर अवलंबून राहिलेला नाही. माहिती देण्यासाठी सुसज्ज वाचनालयापासून ते माहिती महाजालापर्यंत अनेक साधने आज सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहेत. त्या साधनांची योग्य ती 'दिशा' त्यांना खुली करून द्यावी लागेल. विद्यार्थी त्यामुळे भटकणार नाही. झपाट्याने बदलणार्या काळात सतत अद्ययावत राहणे हे शिक्षकांसाठी देखील गरजेचे बनले आहे. काळाची नवीन आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी दोघांनाही आता स्वतःला परस्परपूरक व समर्थ केलेच पाहिजे. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमुल्यन केला जात असल्याचे चित्र समाजात दिवस आहे. आमच्यावेळी हे कॉम्प्युटर - मोबाईल नव्हते पण मान मर्यादा आणि पावित्र्य होते. गुरू-शिष्य संबंधांमधील ती पवित्र भावना सध्या लोप पावत आहे.
१८ मे १९२० रोजी .गुरुजींचे दुःखद निधन झाले. संबंध आयुष्य भर शाळेतील विद्यार्थ्यांना व कित्येक परमार्थ साधकांना व समाजातील अनेकांना संसाररुपी भव सागरातून तरुन जाण्यासाठी दिशा दर्शक दीपस्तंभ बनून त्यांनी काम केले.
‘विठ्ठल नामाची शाळा भरली॥ शाळा शिकताना तहान भूक हरली…॥’ अशा पवित्र वातावरणात
वारकरी संप्रदायाच्या सेवाधारी गुरुजींच्यामध्ये विचारांची आणि भावनेची श्रीमंती होती, त्याचप्रमाणे त्याग, निष्ठा, सहिष्णुता, औदार्य असे गुणही होते.
पोलादपूर तालुका हा वारकऱ्यांचा तालुका म्हणून ख्याती आहे. अगोदरच्या पिढीतील फक्त निखळ परमार्थ करणारा आणि सांगणारी गुरुजींरूपी जीवनज्योत जरी विझली असली तरी त्यांच्या सेवाकार्याचा दीपस्तंभ अध्यात्म मार्गातील नवतरुणांची वाटचाल सतत उजळवीत राहील, आज त्यांच्या जन्मदिनाच्या स्मृतींच्या प्रकाशात मात्र प्रत्येकाने आपली वाट शोधायला हवी.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा