सामाजिक कार्यकर्तृत्वाची पहिली माळ
ज्ञानाई सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले भारताच्या
स्त्री शिक्षणाची गंगोत्री. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका. क्रांतिबा जोतिराव फुले
यांच्या पत्नी. शिक्षिका, लेखिका, कवियित्री,
माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची
सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी
स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खऱ्या शक्तीची ओळख
होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही, असं ठाम मत त्यांनी
स्त्रियांपुढे मांडलं. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई
फुले यांचा जन्म झाला. तिने वयाच्या दहाव्या वर्षापासून अक्षरओळख करून घेतली. साक्षर
झाली.त्या शाळेत जय लागल्या कि कर्मठ लोक त्यांच्यावर दगड,शेण व चिखल फेकत असत. काहीजण
त्यांच्या अंगावर धावून जात परंतु ह्या सर्वाना सावित्रीबाईंनी खंबीरपणे तोंड दिले. अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी
पुले दांम्पत्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली.
ही शाळा पुढे भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून गणली गेली. तसेच पुण्यात व मुंबईतही
मुलींसाठी शाळा सुरु केला. गिरगावातील कमलाबाई हायस्कुल अजूनही कार्यान्वयीत आहे. ज्योतीरावांनी
आपल्या पत्नी सावित्रीबाई यांची त्या शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती केली. ज्योतीरावांनी
सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले आणि तिच्यात शिक्षिका होण्याची गुणवत्ता निर्माण
केली. त्या पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटल्या गेल्या.
१९ व्या शतकात स्त्री शिक्षणात त्यांनी केलेली कामगिरी
अद्वितीय ठरली. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य १८ व्या शतकात
समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही
काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी
ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा
फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
अभिरुची संवर्धन व चारित्र्याची
जडणघडण या गोष्टींकडे फुलेंच्या शाळांमध्ये कटाक्षाने लक्ष दिले जात असे. त्यामुळे
फुले दांम्पत्यांच्या शाळांमधील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांच्या संख्येपेक्षा
१० पटीने वाढली. इतकेच नव्हे तर, फुलेंच्या शाळेतील मुली परीक्षेतही सरकारी शाळेतल्या
मुलांपेक्षा गुणवत्तेत सरस ठरल्या. परिणामी फुले दांम्पत्यांची शैक्षणिक क्षेत्रातील
कामगिरीची सर्वदूर प्रशंसा झाली.
स्त्रियांसोबत होणाऱ्या
क्रूर प्रथाना त्यांनी विरोध केला. बालविवाह,बाळ-जरठ विवाह, सतीप्रथा,केशवपन अश्या
नावाखाली वर्षानुवर्षे होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात त्यांनी सरकार दरबारी आवाज
उठवला. तरुण मुली अनेकदा नराधमांच्या शिकार बनत त्यांच्या आणि गरोदर विधवांच्या संततीला
समाजात मंचाने स्थान नव्हते. अशा स्त्रियांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न
करताना त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले. सावित्रीबाई व ज्योतिराव फुलेंना
स्वतःचे अपत्य नव्हते. त्यांनी एका विधवेला व तिचा मुलगा यशवंत याला आधार दिला. पुढे
रीतसर यशवंतला दत्तक घेतले. तसेच त्याच्या आईचा सांभाळ केला अनेकांचे आंतरजातीय विवाह
लावून दिले. पुनर्विवाह चळवळीत भाग घेतला. विधवा केशवपना विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून
आणला.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात
सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या
बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास
पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी
मदतीचा हात पुढे केला. दीडशे वर्षापूर्वी स्त्री-पुरुष समता व सामाजिक न्याय प्रस्थापित
करण्यासाठी चळवळ उभारुन तत्कालीन रुढीप्रिय समाज व्यवस्थेशी कडवी झुंज कोणी दिली, तर
ती फुले दांम्पत्याने. बालविवाहाला विरोध करुन ते थांबले नाहीत, तर विधवांचा पुनर्विवाह
करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडलं. विधवांच्या पुनर्विवाहास
मान्यता मिळण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मागणी केली आणि या सामाजिक कार्यात
फुले दांम्पत्यांना यश येऊन त्यास १८५६ मध्ये मान्यता मिळाली.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या
सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते.
त्यामुळेच १८७६–७७च्या दुष्काळात
त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या
स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने
त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.'काव्यफुले' व 'बावनकशी' हे काव्यसंग्रह
त्यांनी लिहिले. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्यातील मोलाच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा
जन्मदिन हा 'बालिकादिन' म्हणून ओळखला जातो.
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
सावित्रीबाईंना छान मानवंदना
उत्तर द्याहटवा