सेवाव्रती लघुपट ही जगदीश पुळेकर यांच्या आयुष्यातील महत्वाची निर्मिती - डॉ. शैलेश मोहिते
मुंबई (रवींद्र मालुसरे ) : कुष्ठरोग्यांच्या जीवनात त्यांच्या चेहऱ्यावर हसू यावे यासाठी त्या क्षेत्रात वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना एके काळी मोठा त्याग करावा लागत असे,समाजात विशिष्ट्य पद्धतीने विशेषतः दुर्लक्षित घटकांतील रुग्णांसाठी काम करताना डॉ. विजयकुमार डोंगरे यांनी आयुष्याला झोकून दिले होते. डोंगरे सरांचे काम जगासमोर येणे आवश्यक होते, समाजातील कोणताही एक विषय घेऊन त्यासाठी सर्वस्व कसे वाहून देता येते असे अनेक विषय आहेत. परंतु जगाला भेडसावणारा हा प्रश्न किती महत्वाचा आहे हे ओळखून जगदीश पुळेकर यांनी ही डॉक्युमेंट्री तयार करून सामाजिक भान जागवणारी उत्तम कमगिरी केली आहे असे उदगार नायर रुग्णालय अधिष्ठदाता डॉ शैलेश मोहिते यांनी काढले.
रुग्णसेवा हीच खरी सेवा साधना मानणाऱ्या आणि अनेक दशकं ग्रामीण व शहरी कुष्टरोग निवारण आणि रुग्णसेवेसाठी झटणारे, देशा-परदेशात कॉन्फरन्समध्ये सहभागी होणारे व या विषयावरील ६० पुस्तकांचे लेखक दादर मधील पद्मश्री डॉ. विजयकुमार डोंगरे यांचा जीवनप्रवास आणि असामान्य कार्यावर आधारित ३५ मिनिटांचा लघुपट "सेवाव्रती" चा विशेष प्रीमियर शो दादर सार्वजनिक वाचनालय आणि काशिनाथ धुरु हॉल ट्रस्ट व मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या संयुक्त वतीने दासावा मध्ये निमंत्रितांसाठी मोफत आयोजित केला होता त्यावेळी डॉ. मोहिते बोलत होते. फिल्म डिव्हिजन मध्ये प्रदीर्घ कारकीर्द गाजवलेले जगदीश पुळेकर हे या लघुपटाचे क्रिएटिव्ह हेड असून त्यांनीच लेखन, दिग्दर्शन व निर्मितीही केली आहे.
यावेळी गायकवाड इन्स्टिटयूटचे डॉ. हेमंतराजे गायकवाड म्हणाले की, डॉ. डोंगरे यांना मी वैद्यकीय क्षेत्रातील माझे गुरु मानतो. निस्वार्थी भावनेने रुग्णांसाठी अहोरात्र ते कसे जगायचे याचा मी साक्षीदार आहे. रुग्णसेवा हाच खरा मानवतेचा धर्म आहे व त्यासाठी आर्थिक कमाई दुय्यम मानून त्यासाठीच त्यांनी आयुष्य वेचले. यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी मोलाची साथ दिली हे सुद्धा तेवढेच मी महत्वाचे मानतो.
मुंबई लेप्रसी प्रोजेक्ट संस्थेचे डायरेक्टर डॉ. विवेक पै आपल्या भाषणात म्हणाले की, मुंबई लेप्रसी संस्थेची स्थापना १९७६ मध्ये डॉ डोंगरे यांनी केली. आमच्या दोन्ही संस्थापक डॉक्टरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. म्हणजेच कुष्ठरोग निवारण कामाविषयी सरकारी पातळीवर किती महत्व आणि आस्था आहे हे दिसून येते. काही वर्षांपूर्वी बाधित व्यक्तींच्या घृणास्पद स्वरूपाबद्दल समाजाचा प्रतिसाद नाकारण्याचा होता आणि तो रुग्णांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंत पोहोचला होता. परंतु आता कुष्ठरोग शोध मोहीम, उपचार आणि निर्मूलन या त्रिसूत्रीवर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. २०२३ मध्ये, भारत सरकारने राष्ट्रीय धोरणात्मक योजना (एनएसपी) आणि कुष्ठरोगासाठी रोडमॅप (२०२३-२७) सुरू केला जेणेकरून २०२७ पर्यंत या आजाराचा संसर्ग शून्य करण्याचे उदिष्टय आहे.
डॉ. प्रीतम पाठारे आपल्या भाषणात म्हणाले की, पुळेकर यांचे सर्वांनी आभार मानायला हवेत. कुष्ठरोग आणि त्याच्याशी संबंधित कलंक या दोन्हींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी, त्याचा प्रसार, परिणाम आणि योग्य उपचार समजून घेण्यासाठी ही डॉक्युमेन्ट्री जगभरात या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्याचबरोबर प्रभावित व्यक्तींना निरोगी, अधिक सन्माननीय जीवन जगण्यास मदत करणारी ठरणार आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ वृत्तपत्र लेखिका श्रीमती मंदाकिनी भट, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक पास्कोल लोबो, वसंत हरयाण, रमेश सांगळे यांना वृत्तपत्र लेखक चळवळीसाठी अनेक वर्षे अमूल्य योगदान दिल्याबद्दल जीवन गौरव सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर दासावाचे कार्यकारिणी सदस्य यतीन कामथे,सुरेश शिंदे, कार्यक्रम प्रमुख सुनील कुवरे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्यवाह नितीन कदम, माहिती जनसंपर्क खात्याचे निवृत्त प्रसिद्धी प्रमुख देवेंद्र भुजबळ, दूरदर्शनचे ज्येष्ठ कॅमेरामन अजित नाईक, प्रफुल्ल कळके, प्रोफेसर गोपीनाथ वाघमारे, अनिल समेळ आदी मान्यवर उपस्थित होते, तर ही Documentry देशा -परदेशात स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार असल्यामुळे या विशेष क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दासावाचे वाचक सभासद, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे सभासद, चित्रपट-नाट्य कलाप्रेमी, नागरिक आणि विद्यार्थी हे मोठया संख्येने उपस्थित होते.
दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व आणि डॉ. डोंगरे आणि जगदीश पुळेकर यांच्या कामाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे आपल्या प्रस्ताविकात दिगंबर चव्हाण यांनी सांगितले तर कार्यक्रम प्रमुख राजन देसाई यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष विजय कदम, चंद्रकांत पाटणकर, अरुण खटावकर,अनंत आंगचेकर,दिलीप ल सावंत,एस एम बी चॅनेलचे हेड अशोक सावंत, राजेंद्र लकेश्री, रामचंद्र जयस्वाल,सूर्यकांत भोसले, चंद्रकांत तावडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
0 टिप्पण्या