'अँग्री यंग मॅन' अमिताभ
बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आज ८१ वा वाढदिवस. आपल्या दमदार अभिनयाने अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी चित्रपटांसाठी व्यतीत केलं आहे.
बॉलिवूडचा शहनशहा, बिग बी, महानायक अशी अनेक बिरुदं मानाने मिरवणारा हा बॉलिवूडचा बाप..वयाच्या ८१ व्या वर्षीही रुपेरी पडद्यावर तितक्याच सशक्तपणे नायकाच्या भूमिकेत वावरणारा आणि प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरणारा या रुपेरी पडद्यावरच्या अनभिषिक्त सम्राटाचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !
'अँग्री यंग मॅन' अशी ओळख असलेल्या अमिताभ यांनी १९६९ च्या दशकापासून सिनेसृष्टीचे रुप पालटले. चार दशकांहूनही अधिकच्या कारकीर्दीत त्यांनी १८० हून अधिक चित्रपटांत काम केले. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. सर्वोत्तम अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंच चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवलाय. अग्नीपथ, ब्लॅक, पा आणि २०१५ मध्ये आलेला पिंकू या सिनेमांसाठी बिग बींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. सिनेमांसोबतच अमिताभ बच्चन यांनी गायक, निर्माता आणि टीव्ही होस्ट म्हणूनही काम केलं आहे.
भारत आणि जगभरातल्या सात विद्यापीठांकडून अमिताभ यांना डॉक्टरेट देण्यात आलीय. यात इजिप्तमधल्या अकॅडमी ऑफ आर्ट्स आणि ऑस्ट्रेलिया क्वीन्सलॅण्ड युनिव्हर्सिटीजचा समावेश आहे. देश-विदेशातले शंभराहून अधिक मानाचे पुरस्कार अमिताभ बच्चन यांच्या नावावर आहेत. भारत सरकारचा पद्मविभूषण तर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अमिताभ यांना प्रदान करण्यात आलाय. लंडनमधल्या प्रसिद्ध मादाम तुसाँ या संग्रहालयात अमिताभ बच्चन यांचा मेणाचा पुतळा समाविष्ट करण्यात आलाय. हा मान मिळवणारे अमिताभ बच्चन हे आशियातले पहिले अभिनेते आहेत.
अमिताभ बच्चन हा महानायक ... पृथ्वीवरचा एकही देश असा नसेल की, महानायकाची ख्याती तिथं पोहोचलेली नाही. जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य खूप कमी लोकांना मिळतं. त्यात अमिताभ अव्वल आहेत. त्यांचं रिअल लाईफसुद्धा एखाद्या फिल्मपेक्षा कमी थरारक नाही. सुरुवातीला आलेलं अपयश, त्यानंतर मिळालेलं अमाप यश, त्यानंतर करिअरला लागलेली घसरण, गांधी-नेहरु परिवाराशी दुरावलेले संबंध अशा कधी निसरड्या तर कधी पक्क्या रस्त्यावरुन अमिताभ चालत राहिले. पण हे सगळं सुरु असताना अमिताभ कधी थांबले नाहीत. चलते रहना हा त्यांच्या आयुष्याचा फॉर्म्युला राहिला. कौन बनेगा करोडपती हा शो अमिताभ बच्चन यांच्या करीयरमधला महत्वाचा टप्पा. पडत्या काळाता या टीव्ही शोने त्यांना चांगली साथ दिली. या शोसाठी अमिताभ यांचं एका दिवसाचं मानधन आहे तीन कोटी रुपये. एका सिनेमासाठी अमिताभ बच्चन तब्बल २० कोटी रुपये मानधन म्हणून घेतात. या वयातही त्यांचा भाव अजिबात कमी झालेला नाही.
अमिताभची उमेदवारीच्या काळातील धडपड, त्याची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीचा भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास, त्याच्या समकालीन चित्रपटांचं स्वरूप, त्याचा पडता काळ याचं सखोल, हे यापूर्वी अनेकदा लिहून आले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला जंजीर, दिवार या चित्रपटातील विजय वर्मा या व्यक्तिरेखेने खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’ची ओळख मिळवून दिली. ७२ च्या युद्धानंतर आणीबाणी लादेपर्यंतचा तो काळ म्हणजे व्यवस्थेविरुद्ध खदखद होती. ती सुरुवातीला जंजीर आणि दिवार चित्रपटातील नायक अँग्री यंग मॅन अमिताभच्या रूपाने पडद्यावर लोकांना दिसली, अभिनयाचा तो अंगार आज सुद्धा सिनेरसिकांच्या मनावर ठसलेला आहे. अडल्या-नाडलेल्यांची पिळवणूक करणाऱ्यांना ठोसे लगावणारा कोणीतरी मासिहा अवतीर्ण व्हावा असे लोकांना वाटत होते असा तो काळ.सलीम-जावेद यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला ‘दिवार’ हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटच्या मृत्यूच्या सीनपर्यंत मनाची पकड घेतो. अमिताभ या चित्रपटामुळे सुपरस्टार झाला तो आजही त्या पदावर विराजमान आहे.
अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली 'सात हिंदोस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. परंतु 'जंजीर' या चित्रपटाने त्यांना प्रकाशझोतात आणले. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर बिग बी यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ७६ व्या वर्षीही अमिताभ यांच्याकडे अनेक चित्रपट येत आहेत. अमिताभ यांनी मोठ्या पडदा तर गाजवला आहे तसेच त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची भूरळ घातली आहे. रिअलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' मधील त्यांचे सूत्रसंचालन खूपच लोकप्रिय आहे
दादासाहेब फाळके पुरस्कार या भारत सरकारकडून दिला जातो त्यासाठी अमिताभ यांची दोन वर्षांपूर्वी निवड केली. हा एक वार्षिक पुरस्कार असून भारतीय सिनेमांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो. सिनेसृष्टीतील त्याच्या योगदानाला सरकारने दिलेली ही कौतुकाची थाप असते.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
अभ्यास पूर्ण लेख, वाचनीय आहे
उत्तर द्याहटवाअमिताभ बच्चन यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्याच्या निमित्ताने लिहिलेला हा लेख मस्तच! अमिताभ या महानायकाच्या उंचेल्या, भव्यदिव्य झगमगीत देदीप्यमान कारकीर्दीचे पॅनोरामिक दर्शन या लेखातून घडते. मालुसरे साहेब, आपले या उत्तम लेखाबद्दल मनापासून अभिनंदन आणि अमिताभ बच्चन या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ महाकलावंतास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्यासह अनंत शुभेच्छा!
उत्तर द्याहटवा- अशोक सावंत
संपादक: समुद्र, हेलोसखी