नादब्रम्हाचा उपासक सुप्रसिद्ध भजनी गायक ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर

 

नादब्रम्हाचा उपासक

सुप्रसिद्ध भजनी गायक ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर 

पोलादपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध भजनी गायक आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वर्यू संगीतरत्न ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर यांचे आज (मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ ) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८७ व्या वर्षी  निधन झाले. त्यांच्याच गावातील वारकरी संप्रदायातील पोलादपूर मधील थोर संत ह भ प. वै ढवळे बाबा आणि गुरुवर्य वै ह भ प नारायणदादा घाडगे यांचा पांडुरंगबुवांना लहानपणापासून खुप जवळचा सहवास आणि स्नेह लाभला. किर्तनासह, भजनामध्ये आपल्या वेगळ्या शैलीतील गायनाने बुवांनी रसिकांना गेली सहा दशके मंत्रमुग्ध केले. पोलादपूर तालुक्यातला वारकरी क्षेत्राचा सुवर्णकाळ हा साधारणतः १९५५  ते  १९७५. या काळात अनेक गुरुतुल्य व्यक्ती जन्माला आली. अर्जुनमामा साळुंखे, ढवळे बाबा,नारायणदादा घाडगे, गणेशनाथ बाबा, हनवतीबुवा, हबुबुवा, ज्ञानेश्वर मोरे माउली, विठोबाअण्णा मालुसरे, ढवळे गुरुजी, भजनानंदी हरिभाऊ रिंगे, सुप्रसिद्ध पखवाजवादक रामदादा मेस्त्री, शंकर मेस्त्री, भाईबुवा घाडगे, विठोबा घाडगे (पखवाज), विठोबा घाडगे (गायक) अशी बुद्धिमान आणि ईश्वराशी समरस झालेली मोठी माणसे होऊन गेली. त्यावेळी पांडुरंगबुवा आपली गायनकला भजन-कीर्तनातून श्रोत्यांसमोर सादर करीत होते. हळूहळू त्यांचा वेगळा असा श्रोतृ वर्ग निर्माण झाला. त्यांच्या अचानक जाण्याने आजरेकर समाज फड आणि पोलादपूर तालुका वारकरी संप्रदायासह संगीत क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना "रायगड भूषण" पुरस्कार प्रदान करून सन्मानाने गौरविले होते. 

        सुरवातीच्या काळात तरुण वयातच त्यांना गावागावातील भजने ऐकून त्यांना भजनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर  गायनाचार्य पं रामबुवा यादव (लोअर परेल) यांच्याकडे संगीत भजन शिकण्यास सुरुवात केली. यादवबुवांकडे काही काळ संगीत भजनाचे धडे घेतल्यानंतर सेंच्युरी गिरणीतील नोकरी आणि गावाकडची शेतीवाडी यामुळे त्यांना संगीत क्षेत्रातील शिक्षणाला वेळ देवू शकले नाहीत, मात्र त्यांनी स्वसाधनेने शास्त्रीय संगीताची साधना केली.  किर्तनात गायनसाथ करण्याची संधी लाभलेल्या पांडुरंगबुवांच्या आवाजात विशेष गोडी होती. आपल्या वेगळ्या शैलीतील गायनाने पोलादपूर, मुंबई, आळंदी, पंढरपूर परिसरातील श्रोत्यांना देखील बुवांच्या सुमधुर आवाजाची भुरळ पडली. वारकऱ्याने आयुष्यभर त्या फडाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असा नियम वारकरी पंथात आहे.आजरेकर फडाच्या जवळपास पाच पिढ्यांशी ते एकनिष्ठ राहिले. आळंदी-पंढरपूर पायी वारीतील बऱ्याचदा ज्येष्ठ म्हणून मुख्य चाल म्हणण्याचा अधिकार फडप्रमुख त्यांना देत असत. मुंबईतील गिरणी कामगारांच्या भजन स्पर्धा होत असत त्यावेळी सेंच्युरी मिल भजन मंडळ सतत पहिला क्रमांक पटकावत असत. भजन सम्राट वै मारुतीबुवा बागडे यांच्या साथीला बुवा नेहमी असत.

 पांडुरंगबुवांना मानणारा वारकरी संप्रदायातील एक मोठा वर्ग आहे.  काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. अखेर आज हृदय विकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे आणि एक मुलगी , सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने संगीत क्षेत्राची फार मोठी हानी झाल्याची भावना कलाकार मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.

गायकाची सारी करामत त्याच्या गळ्यावर अवलंबून असते. गाणं नुसतं डोक्यात असून चालत नाही. तेवढ्याच ताकदीनं ते गळ्यातून बाहेर पडावे लागते. त्यासाठी नैसर्गिक देणगीबरोबरच पराकोटीची  साधनाही असावी लागते. नशिबाची साथ तर लागतेच लागते. पांडुरंगबुवा उतेकर तसे खरेच भाग्यवान ! वय वर्षे ८७ या उतारवयातही त्यांचा आवाज एखादा प्रकाशाचा झोत चहुबाजुंनी अंगावर यावा, तसा श्रोत्याला भारावून टाकायचा. साऱ्या वातावरणात भरणारा हा आवाज खूपच जबरदस्त गोड. साधारणपणे बारीक, टोकदार, रुंद, घुमारदार, पिळदार, लांब पल्ल्याचा, दमसास पेलणारा. सुरेलपणा, स्वरांची  आस आणि गोडवा हेही त्यात होतेच. कोणतीही गायकी जन्माला येते तेव्हा ती परिपूर्ण नसते. हळूहळू ती परिपक्व होत जाते. गाणारा स्वरभास्कर अस्ताला गेला असला तरी त्यांची आठवण कायम राहील.  पोलादपूर वासियांच्या इतिहासात घडलेली अभूतपूर्व घटना म्हणजे त्यांचा काळातील पिढीने समृद्ध केले. पांडुरंगबंवा यांनी तर शेकडो अभंगांच्या पाठांतरामुळे वारकरी कीर्तन लोकप्रिय केले. शास्त्रीय संगीतातील रागांची तोंडओळख खेड्यापाड्यातल्या लोकांना भरभरून करून दिली. अनेकांना गाण्याची आवड लावली. खेडोपाडीच्या नुसत्याच भक्तीनं किंवा भावनेनं वेडेवाकडे गाणाऱ्यांना शास्त्रकाट्याची कसोटी दिली. त्यांचं गाणं वाढवलं. आणि संगीताच्या गाभाऱ्यात श्रद्धेचं, भक्तीच निरांजन लावलं. त्यांच्या वागण्यातला साधेपणा, गोडवा, निरागसता, समरसता, भक्ती हीच त्यांच्या गोड गळ्यातून स्वरांच्या रूपाने बाहेर पडत असे. गायकासाठी सूर हाच ईश्वर आहे व तो सच्चा लागला तरच ईश्वराला प्रिय आहे.   

या क्षेत्रात वावरताना त्यांना मानमरातब, आदर नेहमीच मिळत राहिला. पूर्वजन्मीचे सुकृत त्याला कारणीभूत असावे, ते अशा घरात जन्माला आले की तिथं स्वर-तालाची पूजा होत नव्हती. लहानपणी काहीसा पोरकेपणा वाट्याला आला होता. परंतु वर्तनातूनच आपल्यामधील कलेमध्ये हुनर दाखवत एक साधा माणूस म्हणून ते 'उजेडी राहिले उजेडी होऊन' जगले.  त्यांच्या गाण्यातला मोठा बिंदू म्हणजे भक्ती ! भक्ती  म्हणजे  भक्तिपदे गायन करणे नव्हे. तर गायकाच्या स्वभावातून निर्माण झालेला भक्तीचा भाव आणि त्या भावातून निघालेले स्वर आणि राग याच्यांशी एकरूप होऊन समर्पित होण्याची भक्ती आणि हीच गाण्यातली सर्वात मोठी शक्ती आहे. ज्या लोकांनी पांडुरंगबुवांच्या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व ज्यांना त्याची प्रचिती मिळाली ते सर्वजण धन्यता व सार्थकतेचा अनुभव करतात. म्हणूनच गेली पाच दशकांतील पिढ्यासाठी ते एक ऊर्जा स्रोत ठरले. मध्यसप्तकाचा षड्ज हा संगीतातील 'आधारस्वर' होय हा षड्ज साधारणपणे गायकाला सहजतेने लावता येण्यासारखा आणि रागानुरूप इष्ट त्या सर्व सप्तकांत फिरण्यास योग्य असा असावा लागतो. वादकाच्या बाबतीत तो वाद्य आणि वाद्यगुण यांना अनुसरून असतो. सर्व सांप्रदायातील वारकरी बंधूना नम्रपणे हात जोडून नमस्कार करणारा पांडुरंगबुवांचा प्रेमाचा आधार मात्र यापुढे नसेल मात्र त्यांची कीर्ती दिगंत उरणार आहे. 
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

 

रवींद्र मालुसरे (अध्यक्ष)

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण