सामाजिक कार्यकर्तृत्वाची दुसरी माळ
पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी
जीवरसायन शास्त्रामध्ये मूलभूत संशोधन
करणा-या पहिल्या भारतीय महिला कमला सोहनी या ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत यांच्या
त्या भगिनी होत. कमला भागवत-सोहोनी यांचं भागवत
घराणं साधी राहणी, उच्च विचारसरणी असं होतं. सर्वच माणसं बुद्धिमान. घेतलेलं काम उत्तमरीत्या
तडीस नेणारी. कमलाबाईंचा जन्म १९११ सालचा.
त्यापूर्वी मागच्या पिढीतली त्यांची आजी मॅट्रिक झालेली, इंग्रजीवर प्रभुत्व
असलेली होती. मुलींनी शिक्षण घेतलंच पाहिजे, त्यापूर्वी लग्न नाही, या ठाम विचारांची.
त्यांच्या नाती त्यांना इंग्रजीबद्दलच्या शंका विचारीत. आत्या, काका घरातले सर्वच लोक
उच्च शिक्षण घेतलेले.
दुर्गाबाई, कमलाबाई आणि विमलाबाई तिघीही
बहिणी शिकल्या. मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी मिळवणा-या त्या पहिल्या आणि त्या
काळातील एकमेव महिला होत्या. तंत्रज्ञान संशोधन शिष्यवृत्ती आणि स्पिंगर रिसर्च शिष्यवृत्ती
मिळवल्यानंतर त्यांनी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगलोर’ या संस्थेत प्रवेश मिळवला. इंग्रजांच्या अंकित राष्ट्रातली एक हिंदुस्थानी
मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. इसवी सन १९३३ मध्ये रसायनशास्त्र
हा विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात बी.एस्सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी वर्तमानपत्रातीत
जाहिरातीनुसार शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स'मध्ये
अर्ज केला. टाटांनी १९११ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत प्रवेश मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे
समजले जाई. प्रवेशासाठी कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या, परंतु संस्थेचे प्रमुख, नोबेल
पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांनी 'मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही' असे
कमलाबाईंना कळविले. कमलाबाई श्री. रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या व 'मुलगी म्हणून माझ्यावर
होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही,आणि इथे राहून मी संशोधन करून एम.एस्सी. होणारच.'
असे ठामपणे सांगितले. श्री. रामन यांनी कमलाबाईंच्या हट्टास्तव त्यांना एका वर्षासाठी
प्रवेश दिला. मग वर्षभर कमलाबाईंनी बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला.
वर्षअखेर रामन त्यांना म्हणाले. तुमची निष्ठा आणि चिकाटी पाहून असे वाटते की, यापुढे
संस्थेत फक्त मुलींनाच प्रवेश द्यावा.'
जीवरसायनशास्त्रात संशोधन करणाऱ्या डॉ. कमलाबाई सोहोनी
यांचा भारतातल्या पहिल्या स्त्री शास्त्रज्ञ म्हाणून सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक राष्ट्रपती
राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते २९ एप्रिल १९६० रोजी मिळालं आणि विज्ञान क्षेत्रामध्ये
उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठीचा शेवटचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना १९९७ मध्ये
मिळाला. दरम्यान, त्यांनी परदेशात आणि देशातही संशोधनाचं महत्त्वाचं काम केलं. त्यांच्या
संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या १५५ इतकी आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी आपलं सारं
आयुष्य अन्नभेसळी विरोधातच काम करण्यात व्यतीत केलं म्हशीचे दूध मातेच्या दुधासमान
करण्याची प्रक्रिया शोधणे, दुधातील व कडधान्यांतील प्रथिने शोधणे, निरा पेयाचे परिणाम
व उपयोग आणि ताडगुळाविषयीचे त्यांचे संशोधन.
१९३६ मध्ये कमलाचा प्रबंध पूर्ण झाला.
तिला मुंबई विद्यापीठाकडून एम.एस्सी.ची पदवी मिळाली. आता पीएच.डी.! तिने जानेवारी १९३७
मध्ये मुंबईच्या हॉफकिन इन्स्टिटय़ूटमधे प्रवेश घेतला. औषधासाठी प्राण्यांचं विच्छेदन
करण्याचं काम तिच्याकडे आलं. ते काम करता करता इकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणं चालू
होतं. आणि मुंबई विद्यापीठाने तिला दोन शिष्यवृत्त्या दिल्या. ‘स्प्रगर रिसर्च स्कॉलरशिप’
आणि ‘सर मंगलदास नथुभाई फॉरिन स्कॉलरशिप’ या दोन्ही शिष्यवृत्त्या मिळवणारीही ती पहिलीच
विद्याíथनी. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, जीवरसायन संशोधक डॉ. डेरिक रिक्टर यांच्यामुळे
कमलाला पीएच.डी.साठी १८ डिसेंबर १९३७ साली केंब्रिजमधे प्रवेश मिळाला. मुंबईत असताना
१९३६ मध्ये तिने अमेरिकेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. पण वेळ टळून गेली होती.
तिला पुढच्या वर्षी अर्ज करा, असं त्या विमेन विद्यापीठानं कळवलं होतं. पण कमलाने केंब्रिजला
प्रवेश मिळताच त्या विद्यापीठाला कळवून टाकलं. ‘मी यंदा अर्ज करणार नाही. मला दोन शिष्यवृत्त्या
मिळाल्या आहेत. माझं संशोधन चालू आहे,’ असं पत्र एका स्त्रीकडून तेही एक मागास देशातल्या
स्त्रीकडून, पाहून तिथल्या उच्चपदस्थांनी जीवरसायनशास्त्राचे जनक आणि नोबेल पुरस्कार
विजेते सर गॉलंड हॉपकिन्स यांना पत्र पाठवून विचारलं, ‘ही अजब मुलगी कोण? तिची माहिती
कळवा.’ हॉपकिन्सनी कळवलं, ‘अत्यंत बुद्धिमान, कठोर परिश्रम करणारी ध्येयवेडी मुलगी
आहे.’ हॉपकिन्सचं हे प्रशंसापत्र पाहून ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सटिी, विमेन’
फार प्रभावित झाली. त्यांनी कमलाला ताबडतोब पत्र लिहिलं, ‘‘आम्ही तुला प्रवासी शिष्यवृत्ती
देत आहोत. तिच्या आधारे तू अमेरिकेत ये.’’ (१९३८) ‘काही तरी घोटाळा आहे. ही शिष्यवृत्ती
तर प्रोफेसरना देतात, मला कशी?’ असा प्रश्न कमलाला पडला. तिने हॉपकिन्सना विचारलं.
त्यांनी सगळी हकिगत सांगून म्हटलं, ‘यात काही घोटाळा नाही.’ अर्थात कमलाला अत्यंत आनंद
झाला. मार्च १९३८मध्ये युरोपात लीग ऑफ नेशन्सची बठक होती. तेथील विद्यार्थी परिषदेला
हजर राहा, असं तिला सांगण्यात आलं. तेही भारत, इंग्लड, अमेरिका या तीन देशांतील विद्यार्थ्यांची
प्रतिनिधी म्हणून. कारण काय तर ती भारतीय, शिकत होती केंब्रिजमध्ये (म्हणजे युरोपात)
आणि अमेरिकन फेडरेशनने तिला फेलोशिप दिली म्हणून ती अमेरिकन विद्यार्थिनीपण होती. लक्झेंबर्गला
ती गेली. तिला ठरावीक प्रश्न विचारण्यात आले. आपल्या भाषणात तिने सर्व प्रश्नांची उत्तरं
देऊन आपल्या संशोधनाच्या आवडीबद्दल सांगताना वडिलांचा संदर्भ दिला. घरातलं मोकळं वातावरण
आणि वडिलांनी मुलगी म्हणून कधीच आडकाठी केली नाही. मला ज्यात रस होता ते शिकण्यासाठी
मदत केली. तिच्या या भाषणाचं अर्थातच कौतुक झालं.
केंब्रिजला परतल्यावर तिचं संशोधनाचं
काम सुरू झालं. आता तिनं व डॉ. डेरिक यांनी वनस्पतींवर काम सुरू केलं. प्रचंड आणि सातत्याने
काम करत असताना तो क्षण आला. अचानक कमलाला एक महत्त्वाचा शोध लागला. बटाटय़ातील प्रेसिपिटेट
हँड-स्पेक्ट्रोस्कोपमधून पाहताना तिला एक निराळ्याच रंगाची रेष दिसली. त्याचं नाव सायट्रोक्रोम
‘सी’. वनस्पतींच्या श्वसनक्रियेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या सायट्रोक्रोम घटकाचा शोध
होता तो. तिने आणि मार्गदर्शक रॉबिन यांनी अधिक अभ्यास करून त्यावर लेख लिहिला. आजही
जगात वनस्पतींच्या श्वसनाचा विषय चच्रेला येतो तेव्हा कमला भागवत यांचा व ‘नेचर’मधील
त्यांच्या लेखाचा (१९३९) उल्लेख असतोच. ‘वनस्पतींमध्ये सायटोक्रोमचा शोध’ हा पीएच.डी.चा
विषय तिला आवडला. तिने मार्गदर्शक रॉबिन यांचा सल्ला घेऊन प्रबंध लिहिला.
केंब्रिज विद्यापीठाकडून पीएच.डी. मिळवणारी
ती पहिली भारतीय स्त्री आणि मराठी भाषिक. १४ महिन्यांत प्रबंध हा एक विक्रमच होता.
अनेकांनी आग्रह करूनही परदेशात मिळालेलं शिक्षण, ज्ञान आपल्या देशासाठी उपयोगात आणायचं
या उदात्त विचाराने ती भारतात परतली..
तत्पूर्वी, भारतात परतण्यापूर्वी एक
घटना घडलेली होती.. दिल्लीच्या लेडी हार्डिज कॉलेजला ‘लेडी डफरीन फंड’ची मदत होत होती.
आणि त्या फंडच्या सल्लागार समितीवर कमलाबाईंचे केंब्रिजमध्ये गुरू सर एफ. जी. हॉफकिन्स
होते. त्या कॉलेजमध्ये जीवरसायनश्स्त्र विभाग नव्याने उघडण्यात येणार होता. तिथे विभाग
प्रमुख म्हणून सर हॉफकिन्सनी कमलाबाईंचं नाव कळवून टाकलं. त्या वेळी कमलाबाई पीएच.डी.साठीच्या
संशोधनात मग्न होत्या. त्या हॉफकिन्सना म्हणाल्या, ‘मी ज्या कामासाठी इथे आलेय ते पूर्ण
झाल्याशिवाय परत जाण्याचा विचारही करणार नाही.’ हॉफकिन्सना त्याचं कौतुक वाटलं. त्यांनी
दिल्लीला कळवलं, ‘ती जागा कमला भागवत यांच्यासाठी राखून ठेवावी. ते पद भरू नये.’ त्यामुळे
भारतात आल्यावर १ ऑक्टोबर १९३९ पासून कमला भागवत दिल्लीत लेडी हाìडज कॉलेजमध्ये जीवरसायनशास्त्राच्या
व्याख्यात्या म्हणून रुजू झाल्यामहाराष्ट्र सरकारने मुंबईतील विज्ञानसंस्थेत जीवरसायनशास्त्राचा
विभाग नव्याने उघडला. तिथे कमलाबाई १९ जून १९४९ ला विज्ञान संस्थेत रुजू झाल्या. म्युझियमसमोर
या विभागाला स्वतंत्र जागा मिळाली आणि कमलाबाईंनी सुसज्ज प्रयोगशाळा उभारली. आपल्या
विद्यार्थ्यांना (एम.एस्सी.) त्या सहा-आठ महिने शिक्षण देऊन नंतर संशोधन करायला सांगत.
पुढे कमलाबाई इन्स्टिटय़ूटच्या संचालक
झाल्या. या पदाची धुरा नि:पक्षपाती बुद्धीने सांभाळून १८ जून १९६९ रोजी निवृत्त झाल्या.
प्रख्यात शास्त्रीय संशोधन संस्थेच्या त्या पहिल्या स्त्री संचालक ठरल्या. त्यांनी
इतिहास घडवला. कमलाबाईंच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या १५५ इतकी आहे.
त्यांचे अनेक विद्यार्थी परदेशात गुरूचं
नाव उज्ज्वल करीत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांनी भरभरून आणि आपुलकीने प्रेमाने ज्ञान
दिलं. निवृत्त झाल्यावरही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. ग्राहक मार्गदर्शन सोसायटी ऑफ
इंडियासाठी काम करीत तिथेही अन्नातली भेसळ कशी ओळखायची यावरती शिबिरं घेतली. यावरती
प्रात्यक्षिक देऊन खेडय़ापाडय़ात, शहरात सर्वसामान्य ग्राहकाला वापरता येईल अशी शोध पेटी
तयार केली. विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिलं.१९९७ मध्ये आयुष्याच्या अखेरीस कमला सोहोनी
यांना विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार
देण्यात आला. भारतीय वैद्यकीय संशोधन खात्याने त्यांना सन्मानित करण्यासाठी एक खास
कार्यक्रम दिल्ली इथे आयोजित केला. कमलाबाई सोहोनी यांच्या सन्मानार्थ खूप प्रेक्षक
सभागृहात जमले होते. सर्वानी उभं राहून टाशांचा कडकडाटात त्यांच्या कार्याला मानवंदना
दिली. आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हातात पुरस्कार घेऊन उभ्या असलेल्या कमलाबाई
व्यासपीठावर कोसळल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण अगदी थोडय़ा दिवसांत
त्या गेल्याच. तारीख होती २६ सप्टेंबर १९९७. वयाच्या ८५ व्या वर्षी त्या अनंतात विलीन
झाल्या. कमलाबाईंनी केंब्रिजपर्यंत धडक मारली आणि प्रत्येक ठिकाणी आपला प्रथम क्रमांक कायम राखला. कसलीही प्रसिद्धीची हाव नाही. आयुष्यभर ज्ञानार्जन आणि विद्यार्थ्यांना प्रेमाने ज्ञान देणं यात त्या रमल्या. सरकारी नोकरीतही त्यांनी देशहित पाहिलं. कुणाचाही दबाव सहन न करता उत्तम काम केलं. या प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या प्रेमळ कर्तव्यतत्पर शास्त्रज्ञ ‘स्त्री’ला माझे लाख लाख प्रणाम !
..... रवींद्र मालुसरे
९३२३११७७०४
देवी ,विज्ञान शक्ति
उत्तर द्याहटवा