"दशावतार" प्रेक्षक भावनाविवश होत भानावर येतोय.... तो ताळ्यावर येणे गरजेचे!
दशावतार" चित्रपट पाहणं हा एक माझ्यासाठी अप्रतिम अनुभव होता. मी कोकणी असल्यामुळे आंबा, फणस, काजू, कोकम, मालवणी खाजा, माडावरची शहाळी,वडे-सागोती गोडया पाण्यातील मासे, चिंबोऱ्या यांचा खुप आस्वाद घेत आलो आहे. कोसाकोसावर बदलणारी आगरी, बाणकोटी, कोकणी कुणबी, कोकणी मुसलमानी, भंडारी, मालवणी या भाषांची गोडीही कानांना सुखावते. पावसाळ्यात पुरेपूर हिरवाईने नटलेला कोकणचा निसर्ग जसा डोळयांना सुखवतो तसा मार्चनंतर मात्र त्याचे भकासपण डोळ्यात पाणी आणते. कोकणातल्या माणसांची देवावरची भक्ती, गावच्या राखणदारावरचा विश्वास, त्याच्या कोपाची भीती आणि ग्रामदैवतांशी जोडलेली श्रद्धा यांची विलक्षण अनुभूती चित्रपट पाहताना येते. आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यात लोककथेवर चित्रपट बनतात. गोवा आणि कोकणाच्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या दशावतार या पारंपरिक नाट्यप्रकारावर आधारित हा चित्रपट आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणारा एक महत्वाचा उपक्रम आहे. लोककथेप्रमाणेच ‘दशावतार' मधून कोकणाचा आत्मा प्रभावीपणे उभा राहिला आहे. दशावतार कोकणातील सध्या जे काही उद्योग धंदे शहरीकरण चालू आहे त्यावर एकदम चोख लक्ष ठेवून आणी सर्व कोकणी लोकांना झोपेतून जागा करणारा हा चित्रपट आहे. विकास म्हणजे काय? दशावतारचे पात्र पाणी, जंगल आणि जमीन यांच्याशी कसे जोडलेले आहे हे दाखवून दिले आहे, असा एक उत्तम चित्रपट, प्रत्येकाने पाहावा.‘दशावतार’ ही श्रद्धा, निसर्ग आणि मानवी भावनांचा संगम असलेली प्रभावी कलाकृती आहे. या चित्रपटाला आकार देणाऱ्या संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
दशावतार म्हणजे कोकणच्या मातीतील परंपरा, अध्यात्म आणि गूढतेचा भव्य मिलाफ! दशावतार म्हणजे परंपरा, निसर्ग आणि संघर्ष यांची भव्य गुंफण. हा संदेश सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण चित्रपटभर अधोरेखित होत असतो.
८१ व्या वर्षीही दिलीप प्रभावळकर यांनी केलेला अभिनय व भावभावना पाहून अंगावर रोमांच उभे राहतात. त्यांचे डोळ्यातील आणि चेहऱ्यावरचे भाव इतके परिणामकारक आहेत की ते प्रेक्षकांच्या मनाला भिडतात."पत्त्यामधले राजे आम्ही, केवळ मी निराळा! मी असा कसा वेगळा? शेवटच्या घटका मोजत असलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला वाचवण्यासाठी ८१ वर्षांचा योद्धा - दिलीप प्रभावळकर मैदानात उतरले आहेत. आपल्या प्रत्येक भूमिकेला अजरामर करून बदामचा वा चौकटचा राजा नाही तर अभिनयाचा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केले आहे.
अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांची लहानपणापासूनच "चिमणराव" ही व्यक्तीरेखा हृदयात घर करून बसली आहे. त्या चिमणरावांनी मारलेली हाक "काऊ' त्यांच्या सारखी कोणी मारुच शकत नाही, याचबरोबर दिलीप प्रभावळकर हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर येतात ते श्रीयुत गंगाधर टिपरे, लगे रहो मुन्नाभाई सिनेमातले गांधीजी आणि त्याचबरोबर बालपणी टीव्हीवर पाहिलेला, पुस्तकांतून भेटलेला बोक्या सातबंडे.
विशेष अभिनयशैलीने, हावभावांनी आणि लवचिक देहबोलीने विविध भूमिका साकारून मराठी तसेच हिंदी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक मानाचं स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते 'दिलीप प्रभावळकर हे नाव माहिती नसेल असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही. आपल्या सहजसुंदर अभिनय, प्रभावी संवादफेक आणि खुसखुशीत लेखणीच्या माध्यमातून दिलीपजी गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांचं मनोरंजन करत आहेत. दिलीपजींसारखे रंगकर्मी मराठी भाषेला अधिकाधिक समृद्ध करीत असतात प्रयोगशील अभिनेते, लेखक, कथाकार, नाटककार आणि दिग्दर्शक म्हणून दिलीप प्रभावळकर यांची ख्याती आहे. फक्त मराठीतच नव्हे तर इतर भाषांमधील सिनेमांमधूनही प्रभावळकरांनी आदराचे स्थान मिळवले आहे. एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून न राहता सतत प्रयोग करणाऱ्या मोजक्याच कलावंतांपैकी दिलीपजी अग्रस्थानी आहेत. कायम आपल्यातील कलावंताला आव्हान देण्याचे धाडस त्यांनी केले. मग ती भूमिका "एक डाव भुताचा" मधील भाबड्या मास्तुरे ची असो नाहीतर "चौकट राजा" मधील श्रीयुत गंगाधर टिपरे" असो नाहीतर "वासू ची सासू" असो. एकपात्री प्रयोग असो नाहीतर "लगे रहो मुन्नाभाई" गांधीगिरी. "झपाटलेला" मधील तात्या विंचूचा महामृत्युंजय मंत्र आजही अनेकांना तोंडपाठ आहे. ही सगळी दिलीपजींच्या अभिनयाची कमाल आहे!
"दशावतार" पाहताना गावकुसापासून देवभूमीपर्यंतचा प्रवास सुरू होतोय…परंपरेच्या रंगभूमीवरून उगम पावलेली एक भव्य गाथा भव्य पटावर अप्रतिमरित्या सादर होतेय याचा चांगला फील सुरुवातीपासून येतो. कोकणच्या संस्कृतीची छान सांगड या कथेतील आहे. लेखकाने कथा अशी रचली आहे की कुठेही कंटाळवाणा किंवा ओढूनताणून आणलेला प्रसंग वाटत नाही. अप्रतिम सिनेमॅटिक अनुभव आहे. गंभीर सामाजिक समस्या केंद्रस्थानी असलेली कथा, अतिशय सुंदर फोटोग्राफी, परिणामकारक पार्श्वसंगीत, आणि पौराणिक संकल्पना यांचा सध्याच्या काळाशी मेळ जुळवत दशावतार उत्तम परिणाम साधतो.अजय-अतुल याचे रंगपुजा गाणे छान आहे.सुबोध खानोलकर यांचं लेखन-दिग्दर्शन, छायांकन व कलाकारांचा अभिनय सगळंच उत्कृष्ट;दिग्दर्शकाने प्रत्येक कलाकाराकडून त्यांचे सर्वोत्तम काम करून घेतले आहे. विशेषत: दिलीप प्रभावळकर यांचा सशक्त अभिनय हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.खरोखरच वय हा फक्त एक आकडा आहे हे त्यांनी या चित्रपटातून सिद्ध केले आहे. दिलीप प्रभावळकर यांचा यातला अभिनय हा राष्ट्रीय पुरस्काराने नावाजला जावा अशा दर्जाचा झाला आहे!
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभवळकर यांचा अप्रतिम अभिनय मनाला जसा भावला. तसेच सिद्धार्थ मेनन, रवी काळे, सुनील तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, भरत जाधव, महेश मांजरेकर, गीतकार गुरु ठाकूर आणि संपूर्ण कलाकार व तंत्रज्ञ मंडळींचे कार्य स्तुत्य आहे. दिग्दर्शक सुभोध खनोलकर, निर्माते संजय दुबे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, सुजय हांडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
कोकण असो मराठवाडा किंवा विदर्भ, सर्वत्र निसर्गावर मानवाचे हल्ले वाढतच आहेत आणि त्याला विरोध करणारा आवाज कमी पडता कामा नये. कोकणातील रंगमंचाचा सजीव अनुभव घ्यायचा असेल आणि मराठी संस्कृतीवर प्रेम असेल, तर हा चित्रपट नक्की पाहा! विकासाच्या गोंडस नावाखाली कोकण भकास होत असताना तिथल्या भूमिपुत्राला चाकरमानी म्हणा वा कोकणवासी म्हणा त्यांनी कोकण वाचविण्यासाठी संघर्ष सतत सुरु ठेवला आहे. आपल्याच भाऊबंदानी कवडीमोल भावाने जमिनी परप्रांतीयांना विकल्या आहेत. उद्या हे सर्वच गोष्टीवर अधिकार गाजवतील. या हक्कदारांची दिवसेंदिवस वाढती संख्या पाहता भविष्यात कोकणातल्या प्रत्येक तालुक्यात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या राखनदारांची कोकणच्या रक्षणकर्त्यांची संख्या कमी पडणार आहे. दशावतार हाऊसफुल चालतो आहे. प्रेक्षक भावनाविवश होत भानावर येतो आहे, परंतु तो ताळ्यावर येणे गरजेचे आहे. कोकणी माणसाला रोजगार मिळवायला आपले गाव सोडून मुंबई-पुणे का गाठावे लागते? संपूर्ण महाराष्ट्र गुंतवणूकीचे स्वागत करत असताना कोकण त्याचा विरोध का करतो? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला हा चित्रपट नक्की पहा. कोकणात एनरॉन, रिफायनरी , कोळसा प्रकल्प, अणूप्रकल्प असे घातक प्रकल्प आणणार तर असेच होणार. कोकणातल्या समुद्रावर आक्रमण झालेय, कातळशील्पे गाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जोपर्यंत पर्यावरणपूरक प्रकल्प कोकणात येत नाही तो पर्यंत कायम विरोध रहाणार. मित्रांनो कोकणात विकास हवा पण निसर्गाचा समतोल राखूनच हवा हीच आपली एकमुखी मागणी हवी.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
0 टिप्पण्या