बुधवार, २० मे, २०२०

सार्वजनिक गणेशोत्सव


सार्वजनिक गणेशोत्सव
आनंदाची पर्वणी अन् जल्लोषाचा साज.


उत्सवप्रियता हा मानवी जीवनाचा एक विशेष भाग आहे, भारतीय परंपरेतील एक धारा असलेली मराठी संस्कृती तर उत्सवप्रधान आणि उत्साहवर्धक आहे. श्रावण-भाद्रपद-अश्विन-कार्तिक या चातुर्मासात तर अनेक उत्सवांची रेलचेल असते. गणपती हे प्राचीन काळापासून मराठी माणसांचे लोकप्रिय दैवत आहे. मूलतः हि आर्येतर देवता . वैदिक मंत्र्यांच्या घोषात वैदिकांनीही ती स्वीकारली. आणि पाहता पाहता सर्व स्तरात ती विकास पावत गेली. ज्ञानाच्या क्षेत्रात तो बुद्धिदाता तर सकाम साधना करताना तो विघ्नहर्ता म्हणून ठरला. त्याची मनापासून भक्ती केली तर तो साधकाच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर करतो आणि सर्व प्रकारची मनोवांछित सुखे प्रदान करतो अशीही श्रद्धा ह्या दैवताविषयी जनसामान्यात मनात दृढमूल झाली आहे. प्रत्येक मंगल कार्याच्या शुभ प्रसंगी त्याचे आवाहन करण्याची तसेच त्याचे प्रथम पूजन केले जाते. श्रीगणेशाची व्यक्तिगत पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवरील पूजाअर्चा हि पूर्वापार परंपरा आहे.  विवाहाचा शुभ प्रसंग असो वा लक्षमीपूजन, वास्तुशांती, गृहप्रवेश, कोनशिला समारंभ असो इतकेच काय कोणत्याही मंदिरात भगवंताची प्राणप्रतिष्ठा करायची असली तरी  प्रथम गणेशपूजन केले जाते.
गणपतीचे रूप हे ओंकाराकार आहे. ओंकारावर बुद्धी लक्ष केंद्रित केली तर भौतिक ऐश्वर्य,वैश्र्विक सामर्थ्य, बौद्धिक साक्षात्काराची प्राप्ती होते. तसेच गणपती हा समूहाचा नेता आणि तत्वज्ञानाची देवता. त्याचप्रमाणे गणेश हि विद्येची देवता साहित्यापासून संगीतापर्यंत आणि समरांगणापासून भोजनापर्यंत अधिवास करीत असते. श्री गणेश हि अन्य देवतांपेक्षा अगदी आगळी देवता ! ती गणांची देवता म्हणून तिला 'गणपती' हे अधिदान प्राप्त झालेले आहे. आपल्या राज्यातील गणेशोत्सवाला समृद्ध अशी ऐत्याहासिक परंपरा आहे. भाद्रपद शु || चतुर्थीला 'वरदा चतुर्थी' असेही म्हणतात. त्या दिवशी गणपतीची मृण्मयमूर्ती घरी आणून सिद्धीविनायक या नावाने तिची दिड दिवस स्थापना करून विधिपूर्वक पूजा केली जाते.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजही गणेशभक्त होते. त्यांना हा वारसा त्यांच्या मातापित्यांच्या कडून मिळाला होता. त्यांचे वडील शहाजी महाराज आणि आई जिजाऊ हे उभयता श्री गजाननाचे उपासक होते. शाहूराजांनी सुद्धा मोरया गोसावींच्या संस्थानाला इनामे देणग्या दिल्याचे इतिहासात दाखले आहेत. पुण्यातील कसबा पेठेतील गणपती मंदिर मातोश्री जिजाऊंनी बांधले. एकदा स्वारीवर असताना शिवाजी महाराजांचा मुक्काम आंबवडे गावी झाला. त्या दिवशी चतुर्थी होती. उपवास असल्याने संध्याकाळी स्नान करून श्रीगणेशाचे दर्शन घेऊन भोजन करण्याचा महाराजांचा शिरस्ता होता. परंतु या गावी श्री गणपतीचे मंदिर नव्हते. पूर्वीचे मंदिर यवनी  टोळ्यांनी उध्वस्त केल्याचे महाराजांना गावकऱ्यांकडून समजल्यानंतर महाराजांनी नव्याने गजाननाची प्राणप्रतिष्ठा स्थानिक पुजाऱ्याच्या हस्ते करून तेथे स्थापना केली. त्या मंदिराच्या उभारणीच्या  खर्चासाठी रोख रक्कम आणि जमीनही इनाम दिली. पेशवाईच्या काळात चतुर्थीपासून दशमीपर्यंत गणेशपूजा पार पडू लागली. नंतर तर लोकमान्य टिळकांनी या गणेशपूजनाला सार्वजनिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे फार मोठे उपासक होते. त्यांची तपश्चर्या फारच कडक होती. त्यांनी श्रीगणेशाला मोरगावाहून चिंचवडला आणले असे सांगितले जाते. आपल्या राज्यातील आठ तीर्थक्षेत्रे अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या राज्यात मोरया गोसावी यांची गणेशभक्ती म्हणून जी कीर्ती पसरली त्या कीर्तीचा महिमा औरंगजेब बादशहा पर्यंत पसरला.बादशहा प्रभावित झाला आणि त्यांनी मोरया गोसावी यांच्या गणपती संस्थानाला इनामे दिली. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचे प्रतिध्वनी पुढे मराठेशाहीच्या आणि पेशवाईच्या वैभवातून सांस्कृतिक जीवनात उमटू लागले. पेशवाईत शनिवारवाड्यात श्री ची स्थापना,पूजा,अर्चना,आरती,मंत्रजागर वैगरे धार्मिक कार्यक्रम यथासांग केले जात असे. त्याचबरोबर या उत्सवात विद्वान,कथेकरी,हरिदास यांचे शाहीर, कलावंतिणी यांचे कार्यक्रम होत असत. विसर्जनाचा कार्यक्रम सुद्धा फुलांनी शृंगारलेल्या पालखीतून वाजत गाजत थाटामाटात होत असे. स्वतः श्रीमंत पेशेवे इतर सरदार दरबारी  प्रतिष्ठीतांसह पालखीबरोबर असत. पुढे ब्रिटिश आमदानीतही शिंदे,होळकर,पवार,पटवर्धन यासारख्या स्वतंत्र संस्थाने असलेल्यांच्याकडे गणेश उत्सव होत इतमामाने असे.

१८९२  मध्ये पुण्याचे सरदार नानासाहेब खाजगीवाले हे ग्वाल्हेर येथे गेले असताना दरबारी गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात करीत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावरून हा उत्सव यापेक्षाही अधिक आनंद आणि उत्सवी स्वरूपात पुण्यामध्ये करावा अश्या कल्पनेने ते परत आल्यानंतर श्री खाजगीवाले, श्री धोडवडेकर श्री भाऊ रंगारी यांचे तीन सार्वजनिक गणपती बसवले. सार्वजनिक गणेश उत्सवाची हि कल्पना लोकमान्य टिळकांना आवडली. या उत्सवाच्या माध्यमातून विस्कळीत होत चाललेला हिंदू समाज संघटित व्हावा ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे पाऊल पुढे पडेल हि कल्पना लोकमान्यानी हिरीरीने अमलात आणण्याचे ठरवून कार्यारंभाला सुरुवात केली. लोकमान्य हे जनसामान्यांच्या नाड्या पकडणारे, सांस्कृतिक घटनांना उजाळा देणारे जसे संस्कृती पूजक होते तसे राष्ट्र उत्थानाचा सतत विचार करणारे एक थोर तत्वचिंतक सुद्धा होते. सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु केलेला या उत्सवाबाबत प्रारंभी काही लोकांनी या गणेश उत्सवाला आक्षेप घेतला. समाजातील विशिष्ट वर्गाचा हा उत्सव असून मुसलमानांच्या मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या ताबूत मिरवणुकांना विरोध करण्यासाठी हे टिळकांच्या डोक्यातून निघाले असल्याची टीका जाहीरपणे लोक करू लागले. महाराष्ट्रात त्या वेळी काही ठिकाणी प्लेगची साथ पसरली होती, आता हि साथ का पसरली तर देवघरातला गणपती चौकात आणून बसविला म्हणून अशी सडकून टीका होऊ लागली. परंतु लोकमान्यांच्या प्रभावी राष्ट्रव्यापी नेतृत्वापुढे या आक्षेप घेणाऱ्यांचे काही चालले नाही. पुण्यात पहिला सार्वजनिक गणपती स्वतः टिळकांनी १८९४ मध्ये विंचूरकरांच्या वाड्यात बसवला. याबाबत अलीकडे वाद असला तरीही या उत्सवाला सार्वजनिक आंदोलनाची पार्श्वभूमी करण्याचा मान लोकमान्यांनाच जातो. समाजातील सर्व थरातील जाती-जमातींचे लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले. पुढे तर कोचीनपासून कलकत्त्यापर्यंत शेकडोंच्या संख्येने सार्वजनिक उत्सव साजरे होऊ लागले. इतकेच नव्हे तर एडन नैरोबीपर्यंत परदेशात हि उत्सवाची लाट गेली. ब्रिटिश प्रशासनाने सुद्धा हिंदू-मुसलमानांच्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही.

टिळकपर्वात सार्वजनिक गणपती उत्सव म्हणजे ज्ञानाची सदावर्तेच होती. स्वतः लोकमान्य टिळक, चि.केळकर, नाट्याचार्य खाडिलकर
काळकर्ते परांजपे,महर्षी शिंदे, मदन मोहन मालवीय, सरोजिनी नायडू, बिपीनचंद्र पाल, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, सेनापती बापट, रँग्लर परांजपे, वीर सावरकर, दादासाहेब खापर्डे यांच्यासारखे हिंदू वक्ते ज्याप्रमाणे होते, त्याप्रमाणे मौलवी सय्यद मुर्तुजा, बॅ. आझाद, डॉ एस. एम.अल्लि, जनाब गुलशेरखान, रसुलभाई यासारखे मुसलमान वक्तेही होते. परदेशी मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशाचे स्वराज्य याचा प्रचार यातून मोठ्या प्रमाणात होत असे.  पुण्यातील सोट्या म्हसोबाच्या गणपतिच्यापुढे .. . सोनोपंत दांडेकरांच्या अध्यक्षतेखाली श्री गुलाम दस्तगीर यांची सतत ७३० दिवस व्याख्याने झाली. पुढे गांधीयुगातही गणेश उत्सवात राष्ट्रीय चळवळीने अधिक जोर धरला. खादीचा प्रचार, सत्य, अहिंसा, सत्याग्रह, असहकार, कायदेभंग, ग्रामोध्दार, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निर्मूलन यासारख्या अनेक उपक्रमांची माहिती जनतेला होऊ लागली. त्याचबरोबर गणेशोत्सवातील मेळ्यातुन अनेक कलावंत, वक्ते, कीर्तनकार, नृत्यकार, शाहीर, गवई, नट यांच्या कलेला वाव मिळाला. समाजातून नेतृत्व पुढे येऊ लागले. दातृत्व वाढीस लागले. समाजा-समाजातील भेदाभेद दूर होऊन समता प्रस्थापित होण्यास फार मोठे सहाय्य झाले. आजघडीला गणपती उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. हा उत्सव अधिकाधीक करमणूक प्रदान होत गेला. तरी त्याचे भावनिक अस्तित्व आजही टिकून आहे. थोडक्यात काय देवांचा देव श्री गणेश हा इथल्या सामाजिक उत्थानासाठी आवश्यक अशा प्रेरणा जागवणारा देव आहे. इथल्या सांस्कृतिक समन्वयाच प्रतीक होऊन राहिलेला देव आहे. प्रथम या उत्सवाकडे राष्ट्रीय उत्सव म्हणून बघितले गेले. या उत्सवाचा विचार करता १८९३ आरंभापासून ते १९२० लोकमान्यांच्या मृत्यूपर्यंत त्यानंतर १९२० ते १९४७ देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, १९४७ ते १९८०, १९८० नंतर आजच्या तंत्रज्ञान-संगणक युग असे टप्प्यांचा कालखंड आहे. सुरुवातीच्या नऊ दशकांत नव्हता तो फरक गेल्या तीन दशकात जाणवतो आहे. गेल्या १२५ वर्षात समाजात, देशात आणि जगातही प्रचंड स्थित्यंतरे झाली. दोन जागतिक महायुद्धे झाली. आपल्या देशाची पाकिस्तानबरोबर तीन तर चीन बरोबर एक अशी युद्ध झाली.
देशहिताची कृती सर्वसामान्यांच्या मनातही उफाळून यावी या हेतूने टिळकांनी स्थापन केलेल्या गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरूपाबद्दल खंत व्यक्त करावीशी वाटतेय. लोकमान्यांनी म्हणा कि भाऊसाहेब रंगारी यांनी म्हणा सार्वजनिक गणेशोत्सवाचे लावलेल्या या रोपट्याचा वेल अमरवेलीसारखा चांगलाच फोफावला आहे. महाराष्ट्रातीलच गणेशोत्सवाची संख्या ६० हजाराहून अधिक आहे. दिवसेंदिवस यात वाढ होतच आहे पण 'गणेश' बाजूला पडून 'उत्साही उत्सवच' जास्त होत आहे हि दुःखदायक बाब आहे. या उत्सवाचे आज जाहिरातीकरण अधिक होत आहे. काहीजण आपल्या प्रतिष्ठेसाठी तर काहीजण मोठेपणातून सर्वप्रकारचे लाभ मिळवण्यासाठी या उत्सवाचा वापर करीत आहेत. लोकमान्यांनी या उत्सवातील आपला उदात्त हेतू राष्ट्रीय बाणा जागृत करण्यासाठी जपण्यासाठी ठेवला. तो हेतू नष्ट होतो कि काय असेच वाटत आहे. कार्यक्रमातील विकृतता, मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक मशीन, विसर्जनाच्या मिरवणुकीतील फटाके आणि दणदणाटात अचकट-विचकट विकृत नाच करीत मिरवणूक तासनतास चालवणे. अलीकडे तर पाट पूजन, मंडप पूजन, पाद्य पूजन असे नवीन फंडे आले आहेत. एकाच विभागात राजा-महाराजा-नवसाला पावणारे असे विराजमान होत आहेत. प्रसिद्धीचा झोत आपल्या मंडळावर यावा यासाठी सेलिब्रेटी ना गाऱ्हाणे घालून मंडपात आणले जात आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी शतकापूर्वीपासून सुरु केलेला हा उत्सव आजही आपले उदिष्ट बऱ्याच प्रमाणात जपवणूक करून आहे  ! गणेशोत्सव हा केवळ मराठी माणसांचा सण म्हणणे बरोबर होणार नाही. या निमित्ताने सर्व धर्मातील राज्याराज्यातील माणसांचा हातभार या उत्सवास लागतो. गणेशोत्सवाच्या मंडपासाठी बांबू पुरवणारी मंडळी मुस्लिम, ताडपत्री कच्छि, वेलवेट सिल्कचे कापड सिंधी, गणेशमूर्ती मराठी, गणेश विसर्जन कोळी, ताशा,बंद,लेझीम हिंदू-मुलसलमान, आणि महाआरतीसाठी गुजराथी,जैन,पंजाबी, दाक्षिणात्य मंडळी असतात. मराठी मनात गणपती उत्सवाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. शेवटी त्यातही आजच्या समाजाचे प्रतिबिंब पडल्याखेरीज राहील कसे ? आजघडीला गणपती उत्सवाचे स्वरूप बदलले असले, हा उत्सव अधिकाधीक करमणूक प्रदान होत जात असला तरी त्याचे धार्मिक आणि भावनिक अस्तित्व बऱ्याच प्रमाणात कालातीत टिकून राहणार आहे.

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704






वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...