पोलादपूर तालुका अविकसित यापुढच्या काळात ही ओळख पुसूया

पोलादपूर तालुका अविकसित यापुढच्या काळात ही ओळख पुसूया....

मंत्री भरतशेठ गोगावले आणि प्रवीण दरेकर 

मुंबई ( रवीन्द्र मालुसरे) : - सत्कारापेक्षा आम्ही तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलो आहोत. आम्ही दोघेही खेडेगावात जन्मलो आहोत, रानावनात हिंडलो आहोत. मोठे झालो असलो तरी जमिनीवरून चालणारे आहोत. आपल्या तालुक्यातील डोंगर, दऱ्याखोरी, वाटा आम्ही धुंडाळल्या आहेत त्यामुळे आपले प्रश्न काय आहेत याची आम्हाला नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. तेव्हा आमच्या दोघांच्याही सत्तेच्या पदाचा लाभ या तालुक्याला व्हावा असे आम्हाला  वाटते आहे. यापुढच्या काळात आपण सर्वानी आपल्या पोलादपूर तालुक्याची अविकसित तालुका ही ओळख पुसूया अशी ग्वाही राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूरवासियांना दिली.

मुंबई-ठाणे येथील पोलादपूरवासियांच्या वतीने घाटकोपर मुंबई येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना भरतशेठ गोगावले बोलत होते. भरगच्च गर्दी झालेल्या या सभागृहात पोलादपूरचे सुपुत्र आणि  बहुचर्चित छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे रोजगार हमी व फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री ना. श्री. भरतशेठ गोगावले आणि पोलादपूरचे सुपुत्र असलेले विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार श्री. प्रवीणभाऊ दरेकर, राष्ट्रपती पदक प्राप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई श्री. संजीव धुमाळ (पोलादपूर), गुहागरचे मुख्याधिकारी असलेले श्री. स्वप्निल पांडुरंग चव्हाण (महाळुंगे),मा. डॉ. ओमकार मारुती कळंबे (उमरठ) M.B.B.S (वैद्यकीय क्षेत्रात प्रविण्य, मा. कु. संग्राश निकम (वय 7 वर्ष) (महालगूर) अटल सेतू ते गेट वे ऑफ इंडिया सागरी जलतरण, डॉ. नेहा विलास शिरावले BHMS(रानवडी), निलेश मारुती जाधव B.A.L.L.B Mumbai (ओंबळी) यांचा सत्कार करण्यात आला. 


 
यावेळी भरतशेठ पुढे असेही म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर बारमाही पाणी कसे देता  येईल यासाठी तालुक्यात तीन धरणांचा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. अगोदर तालुका टँकरमुक्त झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. सर्वात मोठे धरण लहुळसे येथे होत आहे ते झाल्यानंतर अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. आपण पोलादपूर तालुकावासीयांना शिवकाळापासून ऐत्याहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, नरवीर तान्हाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, परमानंदबाबा कृष्णाजी सोनावणे, कांगोरीगड, चंद्रगड असा समृद्ध इतिहास आपल्याकडे आहे, रायगड किल्ला हाकेच्या अंतरावर आहे. तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्री जा, परंतु  जन्माला आलात तर एकदा तरी रायगडला भेट देऊन शिवरायांच्या समाधीला वंदन करा.

आमदार आणि विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर तालुकावासीयांसमोर भाषण करताना म्हणाले की, आपल्या मातीतला माणूस म्हणून छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, कॅबिनेट मंत्री ना. भरतशेठ गोगावले आणि माझा आज आपण सत्कार करीत आहात. आपल्या मातीतून जी मोठी माणसे झाली आहेत त्यांचा सत्कार करताना तुमचा अभिमान तुमचा स्वाभिमान आणि ओसंडून वाहणारा आनंद दिसतो आहे. आम्हालाही आयुष्यात अडचणी आल्या होत्या. खडतर परिस्थितीतून आम्ही संघर्ष करून त्यावर मात केली आणि आज मोठे झालो आहोत. सत्कार हा विचारांचा होत असतो. ज्यांचा सत्कार केला त्यांचे कार्य हे समाजाला दिशादर्शक आहे. आज होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून यापुढच्या काळात आपण सर्व तालुकावासीय जातीपातीच्या पलीकडे जाऊन एकत्र येऊया, या कार्यक्रमानंतर जिद्दीने उठा. पोलादपूर तालुका हा अविकसित किंवा मागासला आहे हे बिरुद पुढच्या काळात पुसून टाकुया. आजही आपण रस्त्यावर खडी टाका, पाण्याची लाईन टाका, सभामंडप द्या अशा भौतिक मागण्या करीत असतो. यापेक्षा खेडेगाव सोडून शहरात जाणाऱ्या तरुणाला गावातच कसा थांबवता येईल असा विचार करून यापुढे शिक्षण, उद्योगधंदे, व्यवसाय याकडे लक्ष द्यायला हवे. त्याचप्रकारची विकासाची भाषा आपण बोलायला हवी. मी राज्यातल्या मोठ्या बँकेचा अध्य्क्ष आहे  महाराष्ट्रभरच्या प्रकल्पाना मी आर्थिक मदत करीत असतो. परंतु माझ्या तालुक्यातून कुणीही येत नाही हे दुःख आहे. काहीतरी करायचे असे धाडस असलेल्या तालुक्यातील ५ तरुणांनी पुढे या मी नक्की मदत करील. कार्यक्रम फक्त सत्कारापुरता न राहता आजपासून तालुक्याच्या विकासाची चळवळ उभी राहिली पाहिजे. तालुक्याला आणि होतकरू तरुणांना दिशा देणारा हा कार्यक्रम ठरावा अशी प्रवीण दरेकर यांनी अपेक्षा व्यक्त केली.  

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि दुर्गतपस्वी बाळकृष्ण सदाशिव तथा आप्पा परब हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ते आपल्या भाषणात म्हणाले, कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले, कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले, तर उत्तरेकडून आलेले हिरवे वादळ कसे रोखावे हे राणी ताराबाई यांनी स्त्री शक्तीची ताकद दाखवून शिकवले. त्यामुळे नुसते जगण्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व करुन जगा. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे सुक्ष्मदर्शी दृष्टीकोन असायला हवा. इतिहासाच्या प्रत्येक गोष्टीत काही कारणे लपलेली आहेत. ही याच दृष्टीकोनातून पहिली तर उलगडत जातात. प्रत्येकाने जीवनात असे काहीतरी कर्तव्य करावे, ज्यामुळे देशाचे, समाजाचे, संस्कृतीचे आणि स्वतःच्या घराण्याचे नाव उज्वल होईल. नुसते जगण्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व दाखवून स्वतःला अजरामर करा,



तर मुंबई गनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर आपल्या भाषणात म्हणाले की, लक्ष्मण उतेकर यांच्या यशाचे गमक आपल्या पोलादपूरची माती आहे.आपल्या राजाचा हेवा वाटेल असा इतिहास जगात पोहोचविण्याची भूमिका उतेकरांनी घेतली. हे करताना मनात त्यांनी कोणती भूमिका घ्यायची हे नक्की केले असणार त्यामुळे त्यांना यश आणि प्रसिद्धी मिळाली आहे. उतेकरांसारखे अनेक विद्वान आपल्या तालुक्यात इतरही क्षेत्रात आहेत. यापुढच्या काळात त्यांचा शोध घ्या. आज सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षाचे लोकप्रतिनिधी सत्तेच्या जवळ आहेत. त्यांच्या शब्दाला वजन आहे. यापुढच्या काळात तालुक्यात स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात उभा राहिला तर तालुक्याची वाटचाल समृद्धीकडे होईल.
सत्काराला उत्तर देताना लक्ष्मण उतेकर म्हणाले, माझ्या मातीतल्या माणसांनी मायेने हा सत्कार केला आहे. त्यामुळे मी अभिमानाने सांगेन माझे सत्कार भरपूर झाले परंतु असा सत्कार कुठेही झाला नाही. कोरोना काळात संभाजी महाराजांचा इतिहास मी ज्यावेळी वाचला तेव्हा या चित्रपटाचे बीज माझ्या मनात रोवले गेले. संभाजी महाराजांचे चरित्र अनेकांनी डागाळले आहेत. परंतु शहेनशहा औरंगजेब जेव्हा दिल्लीचे तख्त सोडून शंभू महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः महाराष्ट्रात येतो. शंभू राजांना पकडल्यानंतर त्यांचे हालहाल करतो, तुकडे तुकडे करतो. मनातली भीती जात नाही म्हणून त्यांच्या शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकतो. हे अभ्यासल्यानंतर औरंग्याला पराक्रमी संभाजी राजे  कळले होते परंतु महाराष्ट्राच्या मातीला त्यांचे मोठेपण, शौर्य, पराक्रम कळले नाही.

राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीव धुमाळ साहेब सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, या सत्काराच्या माध्यमातून तालुक्यासमोर अनेक झाकली माणके समोर आणण्याचे काम संयोजक करीत आहेत, देशाच्या राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला तोच आनंद मला पुन्हा मिळत आहे की, माझे तालुकावासीय एकत्र येऊन आमचे कौतुक करीत आहेत. लक्ष्मण उतेकरांची चित्रपटाची केलेली  मांडणी तर वाखाणण्यासारखी आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशाने आपल्या सर्वांची छाती अभिमानाने फुलून येते.

कार्यक्रमाला श्री गणेशनाथ संप्रदायाचे गुरुवर्य ह भ प अरविंदनाथ महाराज आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे संयोजक सुभाष पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात संमेलनाच्या आयोजनामागचा हेतू  सांगितला. पोलादपूर तालुक्यात वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक तरुण उच्च स्थानावर विराजमान आहेत, त्यांचा गुणगौरव आणि परिचय मोठ्या व्यासपीठावरून समाजाला व्हावा त्याचप्रमाणे तालुक्याचे महत्वाचे प्रश्न समोर  यावेत. त्यांची सोडवणूक व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आर्थिक सहभागासह मेहनत घेतली त्यामुळे आम्ही यशस्वी झालो आहोत असे वाटते आहे.कार्यक्रमाची सुरुवात प्रभादेवीतील सुप्रसिद्ध गायक दिलीप गोळपकर यांच्या सरगम ऑन द ट्रॅक याने झाली. ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार प्रल्हाद जाधव आणि आदेश मालुसरे यांनी मुलाखतीद्वारे लक्ष्मण उतेकर यांच्या जीवनातील संघर्ष आणि यश हे उलगडून दाखविले. 

पोलादपूर तालुका हा वारकऱ्यांचा तालुका म्हणून तालुक्यातील सन्माननीय सर्वश्री गुरुवर्य ह भ प गुरुवर्य ह भ प श्री. अरविंदनाथ महाराज (मठाधिपती गणेशनाथ महाराज संस्थान), गुरुवर्य ह भ प श्री. गणपत महाराज मोराणकर (श्रीगुरु आजरेकर फड सांप्रदाय कोकण विभाग अधिष्ठान प्रमुख), ४२ वर्षे पोलादपूर ते आळंदी पायीवारीचे अधिष्ठान प्रमुख ह भ प गुरुवर्य श्री. लक्ष्मण महाराज मालुसरे, ह भ प गुरुवर्य श्री. रघुनाथदादा मोरे (हनुमंतबाबा मोरे सांप्रदाय अधिष्ठान प्रमुख), सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक भाजनानंदी ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी  व्यासपीठावर श्री. कृष्णा मा. कदम (अध्यक्ष वैद्यकीय कक्ष पोलादपूर), श्री. सुनिल मोरे (अध्यक्ष, नाईक मराठा समाज पोलादपूर), श्री. रामचंद्रशेठ कदम (उद्योजक, शासनाच्या उद्यानपंडीत पुरस्काराने सन्मानित), श्री. रवींद्र मालुसरे (अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई), श्री. कोंडीराम पार्टे (अध्यक्ष, मराठा समाज बडोदे), श्री. अशोक सिलीमकर (उपाध्यक्ष, मराठा समाज बडोदे), श्री. विजय उतेकर (अध्यक्ष, उतवेश्वर १५ गाव एकता संघ खेड रत्नागिरी) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वानखेडे आणि किशोर जाधव यांनी केले.  

स्नेहसंमेलन समितीचे श्री. किशोर ना. जाधव, संजय उतेकर, बाजीराव मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली  कृष्णा कदम (KK ), राम साळवी, रामचंद्र कळंबे,तानाजी रिंगे, विजय शेलार,पांडुरंग दाभेकर,कृष्णा चं. कदम(के के), राजू रिंगे,युवराज साळेकर, चंद्रकांत मोरे,सुनिल सकपाळ, बळीराम मोरे,अनंत रिंगे,नंदु कळंबे,दत्ता केसरकर,संतोष गोगावले, संतोष मेढेकर, शिवराम उतेकर, विनोद पार्टे, ज्ञानेश्वर मोरे, लक्षमण सकपाळ, शंकर मोरे, निलेश मोरे, अंकुश उतेकर, अभिषेक मोरे, सार्थक जाधव,दगडू केसरकर,संतोष मालुसरे, निलेश केसरकर, गोविंद पवार, पांडुरंग साळेकर, रविंद्र शिंदे,प्रमोद शिंदे ,चंद्रकांत कदम ,पांडुरंग उतेकर ,वसंत मोरे ,नितीन उतेकर,चंद्रकांत उतेकर ,लक्षमण वाडकर, शशिकांत सकपाळ ,शिवराम केसरकर, सुरेश रिंगे ,वसंत उतेकर,सुशांत जाधव,  संतोष साळेकर, चंद्रकांत साळेकर आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा

लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार