पोलादपूरचे प्रतिभावान साहित्यिक, नाट्यलेखक प्रल्हाद जाधव

पोलादपूरचे प्रतिभावान साहित्यिक, नाट्यलेखक प्रल्हाद जाधव 

मुंबईत उद्या होत असलेल्या स्नेहसंमेलनात प्रल्हाद जाधव हे छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची मुलाखत घेणार आहेत. पोलादपूरचे सुपुत्र असलेले प्रतिभावान प्रल्हाद जाधव नक्की कोण आहेत ...त्यांचा परिचय करून देणारा हा लेख 

प्रल्हाद जाधव हे पोलादपूरचे. लहानपणापासून तालुक्यातील आजूबाजूचे डोंगर, नद्या त्यांना खुणावत असत. सावित्रीच्या डोहात जसे ते डुंबत असत. तसेच आडवाटेवरच्या अनेक डोंगरात त्यांनी पायपीट भटकंती केली आहे.  राज्यशासनाच्या नोकरीत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पदभार सांभाळल्यानंतर प्रल्हाद जाधव माहिती व जनसंपर्क खात्याचे संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. ३० वर्षे शासकीय नोकरीत असताना शासनासाठी अनेक गाणी, जाहिराती, जिंगल्स, माहितीपट त्यांनी लिहिल्या आहेत. प्रल्हाद जाधव आपल्या भिडस्त आणि संकोची स्वभावामुळे आपल्या लेखनाविषयी कधी कुठे फार काही बोलताना दिसत नाहीत, ते फक्त एवढेच म्हणतात, 'माझे काम मी करीत आहे आणि पुढेही करीत राहणार आहे. 

प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, व्यासंगी संशोधक व वनाधिकारी  पद्मश्री  मारुती चितमपल्ली यांची ओळख मराठी जगताला आहे.मारुती चितमपल्ली यांच्यासोबत अनेक जंगलात फिरण्याचा प्रल्हाद जाधव यांना योग्य आला. जाधव दरवर्षी दोनदा हिमालयात जातात. त्याठिकाणच्या अनेक आठवणी पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत.   

प्रल्हाद जाधव यांनी आजपर्यंत किमान १६  नाटके आणि तितक्याच एकांकिका लिहिल्या असून त्यांचे सर्वत्र प्रयोग होत असतात. शेक्सपिअर गेला उडत, विठू माझा लेकुरवाळा, हिरण्यगर्भ, शेवंता जित्ती हाय, एक कप चहासाठी, टाजदंड, या भुतांनो या। यमक, भूमिका, चेटूक, लेडीज सायकल, दोन घडीचा डाव, डोन्ट वरी बी हॅपी। तर एकांकिका : कुलकणीं व्हर्सेस देशपांडे, कृष्णाजी केशव, (मुंबई विद्यापीठात एस. वाय.ची.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. पाचूचे बेट, चिमूटभर अधाराचा स्वामी, आचार्य देवो भव, गेला मोहन कुणीकडे ?, ऑपरेशन दगड, पक्षी जाय दिगंतटा, हरवले ते गवसले का?, युद्धविलाप, मरणगंध इत्यादी. 'कृष्णाजी केशव' ही त्यांची एकांकिका मुंबई एकांकिकांच्या लेखनासाठी खाजगी संस्थांची आणि शासनाची इतकी पारितोषिके मिळाली आहेत की त्याचे रेकॉर्डही त्यांनी ठेवले नाही. त्यांचे चाहते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत असे सांगितले तर त्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही.महाराष्ट्र शासनातून माहिती संचालक म्हणून निवृत्त झालेले प्रल्हाद जाधव यांना लेखक आणि नाटककार म्हणूनही ओळखले जातात. विशेषतः दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत कुठे ना कुठे त्यांची नाटके हमखास होत असतात. 

रानभूल,  तांबट,  आनंद नक्षत्र, प्रसिद्धी आणि प्रतिमा, आनंदाची मुळाक्षरे, हिमाक्षरे अशी त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पोलादपूरच्या नद्यांतील साधर्म्य वर्णन असलेल्या "पाण्यातले दिवस" या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ललित गद्याचा पुरस्कार लाभला आहे. 'पाझर' नावाची संपूर्ण लांबीची एक चित्रपट कथाही त्यांनी या काळात लिहिली असून त्या अनुषगाने पुढे काय करता येईल या प्रयत्नात ते आहेत. 

६२ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत प्रल्हाद जाधव यांची विठू माझा लेकुरवाळा, शेवंता जित्ती हाय !,  सुजाता मेली न्हाय ! होणारी ही 3 नाटके सादर झाली होती. प्रल्हाद जाधव यांचे 'शेवंता जित्ती हाय! हे नाटक गेली 33 वर्षे महाराष्ट्रात विविध स्पर्धामध्ये कोठे ना कोठे सतत होत असते. अलीकडच्या काळातील हा एक विक्रमसुद्धा ठरु शकतो. या नाटकात अशी काय जादू आहे ते जाणून घ्यायचे असेल तर त्याचा प्रयोग पाहणे किंवा त्याची स्क्रिप्ट मिळवून वाचणे याला पर्याय नाही, महाराष्ट्राबाहेर हिंदी आणि छत्तीसगढ़ी भाषेतही त्याचे प्रयोग झाले आहेतः विविध महोत्सवात अधून मधून त्याचे प्रयोग होतच असतात.शेवंता जित्ती हाय! हे नाटक ३० वर्षे झाल्यानंतरही इतकी वर्षे जिवंत आणि ताजेतवाने कसे राहिले याचा विचार करून त्यांनी या नाटकाची रसिक प्रियता लक्षात घेऊन त्याच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित एक नाट्य-श्रृंखला कढावी असे ठरवून त्या श्रृंखलेतील दुसरे नाटक "सुजाता मेली न्हाय"  है आणि त्याच मालिकेतील तिसरे नाटक "संगीता हाय का व्हाय?"  या नावाचे लिहून पूर्ण झाले. याबाबत जाधव म्हणतात. या तिन्ही नाटकांचा केंद्रबिंदू स्त्री आणि स्त्रीचे दुःख असा आहे. या तीन नाटकाच्या लेखन प्रकल्पाला जाधव यानी 'नाटय-त्रिवेणी असे नाव दिले आहे.  महाराष्ट्रातील अनेक दिग्गज आणि नामवंत रंगकर्मीनी या नाटकाविषयी अनेकदा गौरवोद्वार काढले या नाटकावर चित्रपट तयार करावा असे प्रस्ताव अधून मधून त्याना प्राप्त होत असतात पण दर्जेदार आणि खात्रीच्या निर्माता-दिग्दर्शकाच्या अभावी अजून ते काम मार्गी लागलेले नाही. 








- रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा

लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार