कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

 



कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

कोकणातील महाडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे झालेले अकाली निधन त्यावेळी महाड - पोलादपूरकरांच्या मनाला चटका लावणारे होते.  बातमी घेऊन येणारी त्या दिवसाची काळ अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक दुःख देणारी होती. माणिकराव यांच्यावर मुंबईत कोरोना आजारात रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. दुर्दैवाने आपल्यातला काळाने एक मोठी क्षमता असलेले नेता आपल्यातून हिरावून नेला होता.  माणिकराव जगताप यांच्या निधनाने एक स्वयंभू नेता काळाच्या पडद्याआड गेला होता. सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी अभ्यासू वृत्तीने तळमळीने झटणारा लोकनेता होता तो.

माणिकरावांचे आणि माझे व्यक्तिगत पातळीवर  संबंध अतिशय जवळचे मित्रत्वाचे होते. माणिकरावांची आणि माझी सामाजिक-ऐत्याहासिक प्रश्नावर अधूनमधून अनेकवेळा चर्चा व्हायची, एकमेकांची फोनाफोनी असायचीच. माझी आणि त्यांची पहिली भेट १९८८ मध्ये मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झाली. आमच्या खडकवाडी गावच्या 'मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाने' वर्धापन दिनाचा कार्यक्रम दामोदर हॉलमध्ये आयोजित केला होता. वीर सावरकरांचे खाजगी सहाय्यक आणि लेखक बाळाराव सावरकर प्रमुख पाहुणे होते. महाडचे काँग्रेस नेते ऍड सुधाकर सावंत, यांच्या सोबत माणिकराव आले होते.  तालुक्याचे काँग्रेसचे नेतृत्व करणारे स्व. महादेवराव मालुसरे, श्री ज्ञानोबा मालुसरे यांचा कार्यक्रम मुंबईत यशस्वी करण्यासाठी पोलादपूरचे सभापती सुरेश जाधव - बैकर सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात  माणिकराव यांचा उगवता युवा राजकीय नेता म्हणून पुरस्कार प्रदान करून सत्कार केला होता.  पुढे जिल्हा परिषदेचे उपसभापती असताना नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीचे बांधकाम आणि परिसर सुशोभित करण्यासाठी  माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांना घेऊन ते आले होते. आमच्या साखर गावावर त्यांनी आणि साखर गावकऱ्यांनी त्यांच्यावर अतोनात प्रेम केले. त्यांनी शक्य होईल असा विकासही केला. 

रायगड जिल्ह्याचे राजकारण डोळ्यांपुढे आणले की, अनेक दिग्गज आणि कर्तबगार राजकीय नेते डोळ्यांपुढे येतात. त्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून माणिकराव यांचे स्थान अग्रणी होते. आपल्या कर्तबगारीने त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. एखादा प्रश्न हाती घेतल्यानंतर तो तडीस लावेपर्यंत ते स्वस्थ बसत नसत.  रायगडच्या  प्रत्येक क्षेत्रातील प्रश्नांची त्यांना जाण होती.  विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत त्यांनी सार्वजनिक जीवनातील पहिलं पाऊल उचलले होते. अत्यंत कमी वयात म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप पाडली होती. महाविद्यालयीन विद्यार्थी नेतृत्व करण्यापासून पुढे युवक काँग्रेसमध्ये ठेवलं होतं, पुढे जिल्हापरिषद सदस्य, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, नंतर लोकप्रिय आमदार ही वाटचाल स्वत:च्या हिंमतीवर केली. वजनदार नेते अशी त्यांची प्रगती होत गेली. ही करताना अनेकांच्या मदतीला धावून येणारा आपला हक्काचा माणूस अशीच त्यांच्याबद्दल ओळख निर्माण झाली होती. प्रत्येकाशी मैत्री ठेवत, पक्षीय चौकटीच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवणारे एक उमदे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे श्री माणिकराव. मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खांशी एकरूप झालेले त्यांचे नेतृत्व होते. महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघातील गावागावात, घराघरात त्यांचा लोकसंपर्क होता. या डोंगराळ तालुक्याच्या अविकसित भागाला पाणी मिळवून देण्यासह भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केले,  शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांसाठी झटणारा लोकप्रिय नेता, एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. चिंतनशीलपणा असलेले सजग नेतृत्व, त्यांच्यातील माणुसकी आणि निखळ- निकोप मैत्री, वक्तशीरपणा, त्यांच्या मनाचा मोठेपणा, त्यांच्यातील आक्रमक व स्पष्टवक्तेपणा, त्यांच्या नजरेचा धाक, अंत:करणातील हळवेपणा व भावुकपणा, त्यांच्यातील आध्यात्मिक श्रद्धाळूपणा, त्यांच्या स्वभावातील मिश्कीलपणा आदी विविध पैलू त्यांच्यात होते.

कोकणच्या अस्मितेसाठी ते सदैव आक्रमक राहिले. स्वत:चा आदर्श त्यांनी स्वत: निर्माण केला होता व संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकारणातही त्यांनी हे दाखवून दिले. त्यांनी अतिशय कमी वयात महाराष्ट्राच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली आणि अनेक वादळं पाहिलेल्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव अलीकडे घेतले जाऊ लागले होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, पण त्यात ते सदैव खंबीर राहिले. विधानसभा निवडणुकांत त्यांचा पराभव झाला, सलग तीनवेळा त्यांना पराभव पाहावा लागला. पण त्यांच्यासारख्या लोकनेत्यांसाठी या क्षुल्लक गोष्टी ठरल्या. ते पुन्हा पुन्हा  राजकारणात सक्रियच  राहिले आणि त्यांनी लोकप्रियतेची यशाची कमान चढतीच ठेवली. त्यांच्याकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता. त्यांना सामाजिक नेतृत्वाची परंपरा होती, मात्र राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे माणिकराव जगताप यांची वाटचाल थक्क करायला लावणारी आहे. त्यात माणिकराव हे झंझावातासारखे असल्याने त्यांनी एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांची जिद्द आणि धडाडी ही यापुढच्या नव्या पिढीतील राजकीय कार्यकर्ते आणि नेते यांना अनुकरणीय अशीच ठरणार आहे. ते रोखठोक बोलत. अशा बोलण्याचा फटकाही काहीवेळा त्यांना बसला. तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे माणिकराव. माणिकराव हा संवेदनशील माणूस ‘लोकनेता’ होतानाही संवेदनशीलच राहिला किंबहुना त्यांच्यातली ही अखंड जागती संवेदनशीलताच त्यांना ‘लोकनेता’ या उपाधीपर्यंत घेऊन गेली. दुसऱ्याच्या दु:खाने माणूस म्हणून डोळ्यांत पाणी येणारा जेव्हा सांघिक पातळीवर ते पुसण्याचा कृतियुक्त यशस्वी प्रयत्न करतो तेव्हा तो लोकनेता म्हणून गणला जातो; आणि यातील सातत्य तो जेव्हा टिकवून ठेवतो तेव्हा तो ‘संवेदनशील लोकनेता’ म्हणून लोकांना आपला वाटतो.

कोकण हा तर त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. कोकणातले अनेक जटील प्रश्नांवर प्रशासनापासून ते मंत्र्यांपर्यंत नेऊन ते सोडवून घेत. ती सोडविण्याची त्यांनी प्रसंगी वेगळी आक्रमक शैली होती.  त्यामुळे कोकणच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या आजच्या पिढीतील ते अभ्यासू नेते ठरले होते.

महाड हे शहर पूर्वीपासून एक व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते.  त्यावेळी श्री. वीरेश्वर देवस्थानच्या  गाडीतळावर मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी रायगड किल्ला निवडल्यानंतर तर मराठ्यांच्या इतिहासात महाडचे भौगोलिक महत्व अधिक वाढले होते हा इतिहास आहे. त्यानंतर तर छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तान्हाजी-सूर्याजी-मुरारबाजी देशपांडे आणि भारतरत्न डॉ बाबासाहेंब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड शहराला ऐत्याहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ आणि इतिहासाचा वारसा लाभत गेला त्यात अधिकाधिक भर पडत गेली. महाड, पोलादपूर आणि माणगाव तालुक्यातील काही भाग मिळून महाड विधानसभा मतदारसंघाची रचना होते. या मतदारसंघात १९५२ ते १९८० च्या काळात सलग चार वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. महाड-पोलादपूर हा मतदारसंघ हा तसा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असा हा मतदारसंघ आहे. पुर्वी महाड - पोलादपूर या मतदारसंघाची हा "समाजवाद्यांचा" मतदारसंघ अशी ओळख होती. क्रांतिवीर नाना पुरोहित, मोहन धारिया, नानासाहेब कुंटे, किशोर पवार, शांतारामभाऊ फीलसे, अशी समाजवादी नेत्यांनी येथे नेतृत्व केले आहे. श.बा सावंत, चंद्रकांत देशमुख आणि माणिकराव जगताप अशी काही वर्षे काँग्रेसची सोडली तर १९९० नंतर हा "शिवसेनेचा" मतदारसंघ झाला. अगदी अपवादात्मक परिस्थितीत येथे काँग्रेसला यश मिळाले. अरुण देशमुख आणि ऍड सुधाकर सावंत ही आणखी दोन अभ्यासू राजकीय व्यक्तिमत्व परंतु दोन दोन निवडणुका लढूनही त्यांना काँग्रेस अंतर्गत एकमेकांना पाडापाडीच्या राजकारणामुळे सत्तास्पर्धेत यश मिळाले नाही महाड विधानसभा मतदार संघ हा कायम काँग्रेस विरोधी विचारांचा राहिलेला आहे. चंद्रकांत देशमुख, व माणिकराव जगताप यांना सोडले तर पुन्हा कधी या मतदार संघांत यश मिळविता आले नाही. एकदा तर सम-समान मत झाल्यामुळे चिठ्ठीवर टाकून इथला आमदार निवडला गेला होता. त्यानंतर २००४ चा अपवाद सोडता महाड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलं. यामध्ये भरतशेठ गोगावले हे २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा या मतदारसंघामधून आमदार झाले आहेत. आजही ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांची  मतदारसंघावर पकड असल्याची चर्चा आहे.

महाड तालुक्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून माणिकराव तीन वेळा यापूर्वी निवडून आले होते.  २००४ चा अपवाद सोडला तर विधानसभा निवडणुकीतील यश त्यांना हुलकावणी देत राहिले. पण त्यांनी जिद्द सोडली नव्हती,  एकदा एखाद्या उमेदवाराचा पराभव झाला किंवा तो निवडणुकीच्या राजकारणातून थोडा बाजूला झाला तर कार्यकर्त्यांचा ओघ कमी होत जातो. काळाच्या ओघात जेव्हा 'माजी' हा शब्द राजकारण्यांच्या मागे जेव्हा लागतो तेव्हा प्रवाहापासून माणसे दुर होत जातात, माणसांच्या गर्दीला ओहोटी लागते पण माणिकरावांना जनतेचे निर्व्याज्य प्रेम सतत लाभत आले होते. अशा प्रभावशाली राजकारण्याच्या घरी जन्माला आलेल्या स्नेहलदीदींना राजकारणाचे बाळकडू घरूनच मिळाले. माणिकरावांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा कोणाकडे असणार याचा निवाडा त्यांनी आपल्या हयातीतच घेतला होता. त्यांची कन्या स्नेहलताई जगताप - कामत  यांना राजकारणात पदार्पण करताना अडचणी आल्या नाहीत. महत्वाच्या चर्चेसाठी घरी येणाऱ्या राजकारणातील मान्यवरांचा सहवास मिळाला त्यातूनच त्यांचे राजकीय शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्नेहलताई राजकारणापासून दूरच राहिल्या. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील शारदाश्रम विद्या मंदिर मध्ये माध्यमिक तर कीर्ती महाविद्यालयातून बी.एसी.एल.एल.बी शिक्षण घेतल्यानंतर अलिबागच्या एल.एल.बी. जे.एस. एम कॉलेज मधून पदवी संपादन केली.






















२००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला महाड शहरात सामाजिक कार्याला सुरुवात केली. आणि  नंतर त्या अनेक सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावर दिसू लागल्या. २०१६ मध्ये त्या थेट महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरल्या आणि मोठा विजय मिळवला. या विजयानंतर खऱ्या अर्थाने स्नेहलजींच्या राजकारणाराला सुरुवात झाली. सर्वांना हसत-खेळत आपलसे करून मिळून-मिसळून राहणाऱ्या,ऐतिहासिक महाड शहराच विकासात्मक कायापालट करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या, कर्तृत्व, वकृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचं कमालीचं समीकरण असणाऱ्या महाड नगर परिषदेच्या कार्यसम्राट नगराध्यक्षा म्हणून गेल्या ४ वर्षात स्नेहल माणिक जगताप यांनी आपला ठसा उमटवला. महाडच्या १५० वर्षाच्या नगरपालिका इतिहासात प्रथमच जनतेतून निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला उमेदवार. आणि त्यासुद्धा महाराष्ट्रात सर्वात कमी वयाच्या महिला नगराध्यक्ष ठरल्या.   नगरपालिकेतील चांगल्या कामगिरीमुळे अहमदनगरच्या "सह्याद्री समूहाच्या वतीने  "सह्याद्री राज्यकर्ता पुरस्कार-२०१७" गौरविण्यात आले. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वच्छता अभियान कार्यक्रमात रायगड जिल्ह्यात प्रथम आणि कोकणात दुसरा क्रमांकावर घेत शासनाकडून ५ कोटीचे बक्षीस सुद्धा पटकावले. गेल्या महिन्यात दैनिक लोकमतने सुद्धा त्यांना पुरस्कार प्रदान करून गौरविले.
या ब्लॉगवरील इतरही विषय वाचण्यासाठी अनुक्रमणिका वाचा ...प्रतिक्रिया द्या लिंक इतरांना पाठवा 
राजकारणाचा वारसा असतानाही स्नेहल यांनी स्वबळावर आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे, त्यांनी नेहमीच माणसे जोडण्याचे काम केले. संवेदनशील स्वभावामुळे लोकांचे प्रश्न वेगाने मार्गी लागावेत यासाठी त्या अनेकदा संबंधितांशी स्वतः संवाद साधतात. प्रश्न समजून घेत असतात आणि ते तातडीने उपाययोजना होत मार्गी कसे लागतील याच्या प्रयत्नात राहतात. महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने त्या प्रयत्नशील राहिल्या आहेत.

वयाच्या ५४ व्या वर्षी माणिकरावांनी हे जग सोडले. त्यावेळी महाडला पूर आला होता. कार्यकर्ते दुःखात होते, त्यांच्या कुटुंबावर एवढा मोठा आघात झाला.  असे असतानाही महाड नगरीच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी वडिलांच्या म्हणजेच माणिकराव जगतापांच्या निधनाचे दुःख काळजाच्या कोपऱ्यात ठेवत त्या चारच दिवसात पूरग्रस्त महाडकरांच्या सेवेसाठी धावल्या होत्या. स्नेहल जगतापांचे आगमन कार्यालयात होताच सर्व अधिकारी वर्ग व तेथे असणारे सर्व लोक अवाक झाले होते.

महाड विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होत आहे. या मतदारसंघामधून याआधी माजी मंत्री प्रभाकर मोरे यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यानंतर भरतशेठ गोगावले यांनी या मतदारसंघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलं. ते सध्याही विद्यमान आमदार आहेत. आता शिवसेनेतील फुटीमुळे महाडमधील कार्यकर्तेही आणि मतदारही विभागले गेले. त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार? आणि फटका कोणाला बसणार? हे येणाऱ्या २३ तारखेला निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा स्पष्ट होईलच.

स्नेहल माणिकराव जगताप ... महाडचे एक कल्पक नेतृत्व, धाडसी निर्णय क्षमता घेणारे उमदे व्यक्तिमत्त्व, आणि माणिकराव जगताप तथा आबाची राजकारणातली 'सावली; म्हणून ओळखली जाणारी त्यांची लेक. महाडच्या राजकारणातील कारभारीण म्हणून उदय झाल्यानंतर आता  महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करीत आहेत. आपल्या वडिलांच्या विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, महाड - पोलादपूरच्या पहिल्या महिला आमदार म्हणून त्यांनी विधानभवनात पाऊल टाकावे... या यशासाठी मनापासून शुभेच्छा!

रवींद्र मालुसरे

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण