मालूसऱ्यांनी जपलीय शेकडो वर्षाची द्यूताची परंपरा
पांडव आणि कौरव यांच्यात द्यूत म्हणजे सारीपाट हा खेळ खेळला गेला आणि त्यातूनच पुढे महाभारत घडले, या द्यूतात पांडव द्रौपदीसह सर्वस्व पणाला लावून हरले हे सर्वश्रूतच आहे. कुरुक्षेत्रावर त्यांच्यात प्रत्यक्ष घनघोर युद्ध झाले. युद्धापूर्वी रणांगणावर कृष्णार्जुन संवाद झाला व त्यातून भगवद्गगीता या अजरामर ग्रंथांचा जन्म झाला. तो ग्रंथ आजही सर्व भारतीयांच्या श्रद्धेचा प्रमाणग्रंथ म्हणून प्रतीक ठरला आहे. हा खेळ कैलासावर भगवान श्रीशंकर आणि पार्वतीमाता हे खेळत असत याची नोंद पुराणात अनेकवेळा आली आहेच. तसेच श्री देव खंडोबा आणि देवी महालसा हे देखील सारीपाट हा खेळ खेळत असत. हजारो वर्षांपासून खेळला जाणार हा खेळ काळाच्या ओघात लुप्त होत चालला आहे. हल्ली तो काही खेडेगावातच प्रचलित असून, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परंतु नरवीर तानाजी-सूर्याजी मालूसरे यांची वंशावळ सांगणाऱ्या पोलादपूर तालुक्यातील साखर-खडकवाडी गावात हा खेळ आजही गणपती आणि दसरा या सणात हमरीतुमरीने रात्रभर जागरण करीत खेळला जातो आहे. कोकणात फक्त याच गावात गेल्या आठ पिढ्यांपासून हा खेळ आजही आवडीने परंपरा सांभाळीत खेळला जातो आहे. या गावातील मालुसरे हे कुळ पाटील हुद्द्याचे आहे.
पाटील हे पद दक्षिण भारतातून आले आहे. याची मुळे पट्ट, पट्टण, पट्टीका, पट्टी यांसारख्या शब्दांमध्ये आहेत. रेशमी पांढरे वस्त्र, किंवा चौपट, किंवा एक पट्टीका घेऊन पाटील नवे गाव वसवत असे. हा पट किंवा ही पट्टी तत्कालीन राजा किंवा राणी कडून बहाल केली जाई. म्हणजे त्याला गाव वसवण्यासाठीची मुभा दिली जाई. विशाखापट्टणम आणि कोल्हापूरजवळचे पट्टणकोडोली ही पट्टशी रिलेटेड नावे आहेत. मोठीं नगरे या अर्थाने ती नावे आहेत.
( पट्ट म्हणजे अधिकार, पट्टी म्हणजे अधिकार पत्र, पाटील म्हणजे अधिकारी.) इ.स. ७८० च्या काळात राष्ट्रकूटांची लोकमहादेवी नावाची राणी होती. तिला पट्टमहादेवीचा दर्जा होता. ती जमिनींचे दान देत असे किंवा वाटप करत असे. तिला त्या प्रकारचा पट्टबंध नावाचा राजमुकुट होता.
रेशमी वस्त्राचा, सोने-चांदी लावलेला हा पट्टधारी मुकुट असायचा. अशी भूदाने देताना, जमिनीचे वाटप करताना हा मुकुट ती राणी धारण करत असे. पट्टराणी हा किताब सगळ्याच राण्यांना नव्हता. जिच्याकडे या प्रकारचा मुकुट आणि अधिकार ती पट्टराणी.
सिंहगडाच्या स्वारीच्या वेळी टेहळणी करताना पायथ्याशी असलेल्या घेरेसरनाईकाच्या सोबत केलेल्या बोलचालीचे वर्णन असे आहे - (शिवकाळातला समकालीन शाहीर तुलसीदासच्या पोवाड्यात अशी नोंद आहे... ) ऐतिहासिक पोवाडे अथवा मराठ्यांचा काव्यमय इतिहास ज्येष्ठ साहित्यिक यशवंत नरसिंह केळकर यांनी १९२८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात हा ५५ चौक असलेला सुभेदारांच्या पराक्रमाचा पोवाडा आहे... त्यातल्या ओळी आहेत -
धन्य ह्याची नारायणा | कोण तुमचे गाव |
एवढे सांगावे आम्हाला |
सुभेदार म्हणतात -
मी साखरेचा पाटील |
गेलो होतो पुण्याला | मंडईच्या वाड्यात |
गेलो होतो पट्टी लावायला | जात होतो घराला |
तेथे वाघाने अडविला | तुमच्या आलो आश्रयाला |
यात साखरेचा पाटील याचा अर्थ सावित्री-ढवळी- कामथी तीन नदीच्या तीरावर असलेल्या आणि सूर्याजी मालुसरे यांची समाधी आणि त्यांची पत्नी सती गेली ती सतीशिळा म्हणजे साखर गाव कोणते हे सांगायची गरज नाही.
पूर्वापार खेळण्यासाठी वापरण्यात येणारा जीर्ण झालेला जुना खेळाचा पट आणि सोंगट्या अजूनही आमच्या संग्रही आहे. मागच्या अनेक पिढ्यातील स्व. अंबाजीराव, विठोबाराव, गोपाळराव, संभाजीराव हे या खेळात निष्णात होते तर, राजारामबापू दान सहज मागण्यात आणि गेणबा मालुसरे दान फेकताना आपल्या मोठया आवाजाने फेकलेल्या सोंगट्या पलटवण्यात निष्णात होते.हा खेळ सोगंट्यांचा खेळ म्हणूनही ओळखला जातो. प्राचीन काळापासून रूढ असलेल्या या खेळांत अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत आजच्या खेळात बदल झाले आहेत. प्राचीन काळी जमिनीवरच पट आखून आणि हाडे, गोट्या, फळांची कवचे वापरून असा हा खेळ खेळत असत. बुद्धिचातुर्यावर आधारित असलेल्या या खेळांमध्ये खेळाडूचा चाणाक्षपणा, दूरदर्शित्व, स्मरणशक्ती व कौशल्य हे गुणच जिंकण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरतात.
द्यूत हा सोंगट्या, पट व फासे किंवा कवड्या यांच्या साहाय्याने खेळावयाचा एक जुना बैठा खेळ. हा खेळ प्राचीन काळी भारतात फार लोकप्रिय होता. त्या काळात हा खेळ सोंगट्या व फासे यांनी खेळत असत. हल्ली फाशांच्या ऐवजी सहा कवड्यांनी हा खेळ खेळला जातो.
या खेळासाठी पिवळ्या, तांबड्या, हिरव्या व काळ्या अशा चार रंगांच्या प्रत्येकी चार सोंगट्या अशा एकूण सोळा सोंगट्या लागतात. याशिवाय चार पट्टे असलेला पट व ६ कवड्या हे साहित्य लागते. या खेळात दोन पक्ष असतात व प्रत्येक पक्षात दोन, तीन, चार,आठ अशा समान संख्यात्मक व्यक्ती खेळू शकतात.
या खेळातील एक पक्ष चार पिवळ्या व चार तांबड्या सोंगट्या घेतो; व दुसरा पक्ष चार हिरव्या व चार काळ्या सोंगट्या वापरतो. पिवळ्या व तांबड्या सोंगट्यांचा सटास (सेट) हळदकुंकू म्हणतात व हिरव्या व काळ्या सोंगट्यांच्या सटास बेलभंडार म्हणतात. खेळाचा पट चौकोनी असतो व त्याच्या चारी बाजूंस चार आयताकृती पट्टे असतात. या चारी पट्ट्यांवर ३-३ घरांचे आठ समांतर पट्टे असतात, त्यांना घरे म्हणतात. अशी एकूण ३ X ८ = २४ घरे असतात, म्हणजे आडवी तीन उभी आठ. यांपैकी बाहेरच्या बाजूच्या पट्ट्यांवर पाचव्या घरात एकेक फुली असते. अशा चार पट्ट्यांवर ८ फुल्या असतात. या फुल्यांच्या घरांना कट म्हणतात. या फुलीच्या घरात असलेली सोंगटी प्रतिपक्षाला मारता येत नाही. 'सोंगटीस नरद' किंवा 'पगडे' असेही या खेळात म्हणतात.
या खेळाची सुरुवात दोन पक्षांमध्ये पट मांडून आपापल्या सोंगट्यांचे सट निवडून करतात. सहा कवड्या हातातील मुठीत खुळखुळवून जमिनीवर पसरावयाच्या याला दान घेणे असे म्हणतात. किती कवड्या पालथ्या व किती कवड्या उताण्या पडल्या यावर किती गुण मिळाले हे ठरवितात. दानाचे गुण व प्रकार कवड्यांच्या उताणे व पालथे किती यांवर अवलंबून असते, ते पुढीलप्रमाणे असते : ६ कवड्या पालथ्या पडल्यास ६ गुण, ६ कवड्या उताण्या पडल्यास १२ गुण, १ कवडी उताणी व ५ कवड्या पालथ्या पडल्यास १० गुण. कोणत्याही खेळाडूस १० अगर २५ गुणांचे दान पडल्याशिवाय डावात सामील होता येत नाही. १० किंवा २५ चे दान पडल्यासच सोंगटी पटावर ठेवण्याचा अधिकार मिळतो. अशा रीतीने आठही सोंगट्या पटावर बसल्यानंतर आणखी १० अगर २५ चे दान पडावे लागते. त्याला फर्जी जाणे असे म्हणतात. फर्जी गेल्याशिवाय प्रतिपक्षाची सोंगटी मारावयाचा हक्क मिळत नाही.
दान पडल्यानंतर जेवढे दान पडले असेल तितकी घरे आपली सोंगटी सरकविणे. याची सुरुवात पटाच्या आपल्या बाजूच्या मधल्या घरांतून निघून उजव्या बाजून सर्वपट (४ पट) फिरून शेवटी सोंगटी आपल्या बाजूच्या मधल्या घरातून वर नेऊन पटाच्या मधल्या चौकोनात न्यावयाची. याप्रमाणे आम्ही सोंगट्यांनी सर्व पट-मार्गक्रमण करून गेल्यावर पटाच्या मधल्या चौकोनात आडव्या ठेवतात. त्याला 'सोंगटी झोपली' असे म्हणतात. अशा आठ सोंगट्यांची 'आठ नरदाची तोडी' किंवा 'आठ पगड्याची तोडी होणे' हा सोंगट्यांच्या खेळातील प्रतिपक्षावर मिळविण्याचा सर्वोत्तम विजय मानतात. यानंतर दुसरा विजय म्हणजे 'तोडातोडी'; याचा अर्थ दोन्ही पक्षांचा बरोबरीचा डाव झाला असा होतो. यात 'तोड होणे' म्हणजे ठरलेल्या कराराप्रमाणे प्रतिपक्षाची सोंगटी मारणे. अशी दोन पक्षांनी कराराप्रमाणे एकमेकांची सोंगटी मारल्यास डाव बरोबरीने सुटतो. विजयाचा तिसरा प्रकार म्हणजे आपल्या सर्व सोंगट्या पटाच्या कटीवर नेऊन ठेवणे. याला 'काडी' असे म्हणतात. असे एका पक्षाने अगोदर केल्यास खेळ संपतो व दुसरा पक्ष हरतो.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई



0 टिप्पण्या