मुंबईत "शिवोत्सव" आणि३५३ वा राज्याभिषेक सोहळा
मुंबई (रवींद्र मालुसरे ) : शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय आहेत, आपल्या महान कार्याने आणि लोककल्याणकारी धोरणांनी त्यांना जगाच्या इतिहासात अढळ स्थान मिळाले आहे. त्यांचा इतिहास भारतातील इतर राज्यातील भाषांतून पोहोचावा याहेतूने श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता दादर पश्चिम येथील धुरु हॉलमध्ये ३५३ वा राज्याभिषेक सोहळा "शिवोत्सव" आयोजित करण्यात आला आहे, या विनामूल्य कार्यक्रमास शिवप्रेमीनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी केले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कृषी अर्थ तज्ज्ञ, केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि मुक्तपीठचे संपादक श्री. तुळशीदास भोईटे, शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पवार, मुंबई बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. संदीप सुर्वे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष श्री. रवींद्र मालुसरे हे असणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वेगवेगळ्या माध्यमात सातत्याने कार्यरत राहून जनमानसात पोहोचविणारे सर्वश्री सुप्रसिद्ध मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री श्री.उदय देशपांडे (राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार ), सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक, दुर्गसंवर्धक श्री. श्रमिक गोजमगुंडे( हिरोजी इंदुलकर सन्मान पुरस्कार ), शिवचरित्रांची शेकडो पुस्तके आणि दुर्मिळ नाणी आणि वस्तूंचे संग्राहक श्री. राजा जाधव ( सर रामकृष्ण भांडारकर सन्मान पुरस्कार ), हुतात्मा स्मारक समिती प्रमुख, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्री. भाऊ सावंत (रामचंद्रपंत अमात्य सन्मान पुरस्कार), शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीचे जनसंपर्क प्रमुख श्री. रंजन गावडे ( सुभेदार तानाजी मालुसरे सन्मान पुरस्कार), मराठाकालीन शस्त्रात्रांचे कलात्मक प्रतिकृती निर्माते रुद्र आर्टचे श्री. सत्यजित वैद्य (वीर बाजीप्रभू देशपांडे सन्मान पुरस्कार ) यांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉ हेमंतराजे गायकवाड लिखित "शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट" या मोडी लिपी आवृत्ती पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यापूर्वी हे पुस्तक इंग्रजी, मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रकाशित झाले आहे. ह्या पुस्तकाचे मोडी लिपी तज्ज्ञ, लिप्यंतरकार आणि ज्येष्ठ अभ्यासक सर्वश्री रामकृष्ण बुटेपाटील, भाऊ घाडीगावकर, अरविंद कटकधोंड, डॉ. राहुल सारडा, डॉ. तेजस लोखंडे, राम वाघोले, चंद्रशेखर पालव, प्रसाद सुतार, रोहिदास राऊत, तेजस्विनी भावे यांनी आपल्या सुवाच्य अक्षरात मोडी लिपीत लिप्यंतर केले आहे.
या सर्वांना शिवकार्याविषयी त्यांच्या ठायी ममत्व असल्यामुळे ठरलेल्या वेळेपूर्वी त्यांनी हे काम पूर्ण केले आहे. त्याप्रित्यर्थ त्यांना "बाळाजी आवजी चिटणीस सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कुमारी ऋतुजा भोसले, कुमार आरंभ गायकवाड, कुमार अरिहंत जाधव हे शिवबावनी सादरीकरण करणार आहेत. त्याचे गद्य भाषेत सूत्रसंचालन श्री समीर वारेकर आणि प्रा. श्रीमती वर्षा भोसले करणार आहेत.






0 टिप्पण्या