Ticker

6/recent/ticker-posts

कोकणातील बंद घरांची गोष्ट फक्त स्थलांतराची नाही - रवींद्र मालुसरे


कोकणातील बंद घरांची गोष्ट फक्त स्थलांतराची नाही - रवींद्र मालुसरे

१९९२ मध्ये पोलादपूर तालुका अतिदुर्गम अविकसित आणि मागासलेला घोषित केला होता, त्यावेळी एका विशेषाकांसाठी मी "पोलादपूर तालुक्याच्या विकासाची दशा आणि दिशा" या विषयावर काही अभ्यासू व्यक्तींकडून लेख लिहून घेतले होते, आश्चर्य म्हणजे आजही ते तसेच लिहावे लागतील. तालुक्यात एकही उद्योग उभा राहू शकला नाही,पाण्याचे दुर्भीक्ष, महागाई आणि युवकांच्या हाताला काम नसल्याने पोटासाठी शहराकडे धावणाऱ्या लोकांमुळे गेल्या काही वर्षात वाड्या वस्त्या ओस  पडल्या आहेत. गावात घरं आहेत पण माणसं नाहीत. यामागची कथा साधी आहे मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर. गेल्या अनेक दशकांपासून कोकणातील तरुण शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि चांगल्या संधींसाठी शहरांकडे जात आहेत. त्यामुळे कोकणातील अनेक घरं वर्षभर बंद असतात. ती फक्त सणासुदीला किंवा सुट्टीत उघडतात. सिमेंट क्रॉक्रिटची चांगली घरं मोठ्या प्रमाणावर बांधली गेली आहेत, मात्र रोजगार देणारा  एकही कारखाना तालुक्यात नाही. म्हणून कोकणातील बंद घरांची गोष्ट फक्त स्थलांतराची नाही. ती अर्थव्यवस्थेची गोष्ट आहे. यापुढे राजकीय नेतृत्व आणि स्थानिक गाव पुढाऱ्यांनी विकासाची भाषा बदलली नाही तर अनेक दशके तालुका याच चक्रात अडकून राहील असे उदगार पोलादपूर अस्मिताचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार रवींद्र मालुसरे यांनी काढले.

पोलादपूर शहरातील कॅप्टन मोरे सभागृहात आपले कोकण प्रतिष्ठान आणि बबन शेलार टॉक शो च्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात मालुसरे प्रमुख पाहुणे आणि सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे प्रा. सुनील वलखंडे, तर व्यासपीठावर उद्योजक नरेश पडम, माजी सभापती सहदेव जाधव, निवृत्ती मोरे, मुंबई कमिटी अध्यक्ष रघुनाथ जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

रवींद्र मालुसरे पुढे असेही म्हणाले की, आपल्या तालुक्यातील भूमिपुत्रांच्या पूर्वजांचा इतिहास तेजस्वी आहे.  पूर्वजांच्या रक्ताचा, स्वाभिमानाचा, शौर्याचा, निष्ठेचा आणि शहाणपणाचा वारसाहक्क सर्वांकडे  आहे. मात्र सुशिक्षित होऊनही  आपण त्यांचा इतिहास आणि कर्तबगारी विसरत चाललो आहोत. मुंबईतील पोलादपूरवासियांचा  १९३० पासूनचा इतिहास  पुराव्यासह माझ्याकडे उपलब्ध आहे. तालुक्याचा स्नेहबंध जपत विकासाची भाषा करणाऱ्या मुंबईत गेल्या १०० वर्षात ३ संस्था जन्माला आल्या आणि काळाच्या ओघात त्या संपल्या. त्या संस्थांच्या माध्यमातून तालुक्यासाठी नेते आणि वेगवेगळ्या भागात समाजासाठी कार्यकर्ते निर्माण झाले. त्यांनी सामाजिक बैठक सांभाळण्याचा आणि ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी आपल्यापरीने शक्य होईल असा तात्कालिक प्रयत्न केला. मात्र बदलत्या परिस्थितीचा वेध घेऊन "सामाजिक बैठक सांभाळण्याचा आणि ग्रामीण भागाचा विकास व्हावा" ही भाषा बोलणारे एकही सार्वजनिक व्यासपीठ गेल्या दोन दशकात ग्रामीण किंवा शहरी भागात होऊ शकले नाही.  काही प्रमाणात ते पुण्यात आणि दुसऱ्या राज्यातील बडोद्यात आहे. मात्र मुंबईत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे.
शेकडो तालुकावासीयांच्या उपस्थितीत यावेळी गेली ३५ वर्ष सरपंच अथवा उपसरपंच पदावर कार्यरत असणाऱ्या तुकाराम शेलार (पळचील ) यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांचा विशेष जीवन  गौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ पत्रकार रवींद्र मालुसरे (पोलादपूर अस्मिता), निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुदेश पालकर, महाराष्ट्र राज्यशिक्षक परिषदेचे अध्यक्ष राजेश सुर्वे, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त विजय पवार, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत पहिला क्रमांकाचे पारितोषिक मिळविलेल्या रा जि प शाळा सडवली, शूरवीर शेलारमामांचे वंशज कुडपण गावचे हनुमंत शेलार यांचा जीवन गौरव गौरव पुरस्काराने सत्कार करण्यात आला. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर तालुकावासीयांच्यासाठी हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याविषयीची भूमिका आपल्या प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार बबन शेलार यांनी आपल्या भाषणात मांडली. गेली ३० वर्षे ग्रामीण भागात राहून मी पत्रकारितेतून अनेक प्रश्न निर्भीडपणे मांडले. मात्र मी सध्या तालुक्यात फिरताना निर्माण झालेली परिस्थिती पाहताना अस्वस्थ होतो.
गेल्या २० वर्षात बरेच नव्हे तर सर्वच काही चांगले घडले आहे. वाट्याला गरिबी आणि संघर्ष असूनही सर्वच क्षेत्रात अनेकजण मोठे झाले आहेत. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे लक्ष्मण उतेकर. तर राजकीय क्षेत्रात मा. भरतशेठ गोगावले चार वेळा आमदार आणि सध्या कॅबिनेट मंत्री झाले आहेत. पोलादपूरचे सुपुत्र मा. प्रवीणभाऊ दरेकर हे आमदार व त्यानंतर विरोधी पक्षनेते झाले आहेत. मंगेश कुडाळकर हे आणखी एक सुपुत्र आमदार झाले आहेत. एकेकाळी शाखाप्रमुख होणे फार मोठे मानाचे होते, आज अनेक पक्षात शेकडो शाखाप्रमुख, वॉर्ड अध्यक्ष आणि त्याच्याही वरच्या मानाच्या पदावर कर्तृत्वाने विराजमान आहेत. 
उद्योग सुरु करून स्वकष्टाच्या कमाईवर हजारो मोठे उद्योजक निर्माण झाले आहेत. ४० वर्षांपूर्वी आपणच निर्माण केलेल्या विनाअनुदानित हायस्कुलमधून शिक्षण घेतलेले हजारो जण उच्च विद्याविभुषित होऊन एकतर नोकरीच्या मोठया पदावर किंवा परदेशात आहेत. फक्त शिक्षण घेण्यासाठी परदेशात असणारी संख्या हजारावर आहे. धार्मिक क्षेत्रात, कलाक्षेत्रात, साहित्यात, पत्रकारितेत, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्यांची संख्याही फार मोठी आहे. ग्रामीण भाषेचा लहेजा सांभाळत ल आणि ळ किंवा न आणि ण बोलण्यात चुकणाऱ्यांची मुले- नातवंडे फाड फाड इंग्रजी बोलत आहेत. एकंदर जागतिक बदलाचे वारे आपणा पोलादपूरकरांच्या वाट्यालाही आले आहेत. तरीही समाजात फिरणारा आणि गावागावात नेतृत्व करणारा समाज बांधव समाधानी नाही, तो आंतरीक ओढीने सामाजिक बांधिलकीची भाषा बोलतो आहे, तेव्हा त्याचे मनापासून स्वागत होणे गरजेचे आहे. शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टया सबळ झालेल्या तालुक्यातील तरुणांनी आपल्या मायभूमीकडे आस्थेने पाहावे असे मला वाटते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पवार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या