Ticker

6/recent/ticker-posts

स्व पासून सुरुवात करून शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन केले - रवींद्र मालुसरे

जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही तुमच्याशी स्पर्धा करा - श्रीमती मालती श्रीधरन

स्व पासून सुरुवात करून शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन केले - रवींद्र मालुसरे 

आयकर भवनात भव्य शिवजयंती साजरी 

दहावी बारावीची परीक्षा म्हणजे तुमच्या स्वप्नांकडे नेणारी पहिली मोठी पायरी असते! तुमच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा हा खरा कस पाहणारा क्षण असतो. आतापर्यंत केलेला अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत म्हणून निर्धास्तपणे आणि सकारात्मक विचारांनी परीक्षा द्या. लक्ष केंद्रित करा आणि आत्मविश्वासाने पेपर लिहा. प्रत्येक प्रश्नाला शांतपणे सामोरे जा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे योगदान सर्वोत्तम द्या. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही परीक्षा यशाची नवी दारे उघडो, अशा शुभेच्छा प्रधान मुख्य आयकर आयुक्त मुंबईच्या श्रीमती मालती श्रीधरन यांनी दिल्या. आयकर विभाग लोकाधिकार समितीच्या वतीने चर्चगेट येथील मुख्य कार्यालयात ३९६ वी शिवजयंती आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी व्यासपीठावर 

आयकर आयुक्त अंकुश कपूर साहेब, आयकर आयुक्त मारूती मद्देवाड साहेब, उप आयकर आयुक्त निरज अग्रवाल साहेब, अतिरिक्त आयकर आयुक्त प्रीतम तुरेवार साहेब, मराठी वृत्तपत्र लेखक संघांचे अध्यक्ष आणि नरवीर तानाजी - सूर्याजी मालुसरे यांचे वंशज रवींद्र मालुसरे, आयकर लोकाधिकार स्थानिय समितीचे कार्याध्यक्ष विकास मोरे, महासचिव मुकुंद परब, कोषाध्यक्ष सतीश घाणेकर उपस्थित होते. 

आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात जर काम करायचे ठरविले तर नक्कीच यश मिळते. कोणी अभ्यासात हुशार असते तर कोणी खेळात अव्वल असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम केले तर यश नक्कीच मिळते. यशाला शाॅर्टकट नसतो. तुम्हाला मेहनत करावीच लागते आणि जर ते क्षेत्र तुमच्या आवडीचे असेल तर तुम्हाला मेहनत करायची आवड निर्माण होते. तुम्ही तुमच्याशी स्पर्धा करा असेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. 

तर रवींद्र मालुसरे हे "छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा दौलतीचे खांब"  या विषयावर बोलताना आपल्या भाषणात म्हणाले की, स्व पासून सुरुवात करून शिवरायांनी स्वतःचे राज्य स्थापन केले आणि हे राज्य माझे नसून माझ्या रयतेचे आहे हा मंत्र त्यांनी जगाला दिला. त्यांचे कार्य पाहिले तर  शिवाजी महाराज हे जगभरातल्या सर्व राजे, सम्राट, बादशहा यांच्यापेक्षा काकणभर सरस होते. त्यांच्या जीवनातील पराक्रमाचे आणि गनिमी काव्याचे प्रसंग अभ्यासून विद्यार्थ्यांनी त्यातून बोध घ्यावा. शिवपूर्वकाळाचा अभ्यास केल्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म कशासाठी झाला हे आपल्याला कळते. गडकिल्ले, बखरी, पोवाडे, शिवकालीन शस्त्रसंग्रह आणि विपुल ग्रंथसंपदा या सर्वातून छत्रपती शिवाजी महाराज अजूनही जिवंत आहेत आणि मराठी माणसांसाठी ही  अभिमानाची बाब आहे. 

माहिती प्रशासनिक अधिकारी देवेंद्र गोसावी आणि तेजस नलावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन हा खडतर टप्पा कसा पार केला?  याची चित्रफितीद्वारे माहिती दिली. सहकार्याध्यक्ष प्रमोद वाघे आणि संयुक्त चिटणीस सोपान जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक किरण कुबल, शंकर कामठे, शंकर उथळे पाटील, महिला मुख्य संघटक सौ स्वाती नाईक  यांच्यासह समीतीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी, कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थिनी, शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या