Ticker

6/recent/ticker-posts

देव माझ्या हृदयात आहे...

 

देव माझ्या हृदयात आहे... 

प्रत्येक व्यक्ती जन्मत:च आपले जग स्वत:बरोबर या पृथ्वीतळावर आणतो असे म्हणतात, ते खरेच आहे. कुठे जन्म घ्यायचा हे त्याच्या हातात नसते मात्र जन्माला आल्यानंतर तो आपल्या जगात वाढतो. आयुष्यभर त्याचा जो काही चांगला-वाईट विचार असतो, जे कर्म करायचे असते ते करतो. राजे राजवाड्यात जन्मला सुखात लोळत असला तरी त्याला किंवा डोक्यावर छप्पर नसलेल्यालाही संघर्ष करावा लागतो. आणि शेवटी असंख्य जीव जंतू असलेल्या या कायमच्या जगातून आपल्या आठवणी ठेवून लांब कुठेतरी पुन्हा न परतण्यासाठी तो निघून जातो. 

माझे बाबा.... हरिभक्त परायण ह. भ. प. तुकारामबुवा गणपत कृष्णाजी पुताजी कृष्णाजी सटवोजी मालुसरे, वय वर्ष ९० जगल्यानंतर असेच कुठेतरी फार दूर न परतण्यासाठी निघून गेले आहेत. त्यांना मालुसरे कुळाचा वारसा लाभला होता तरी बाबा श्रीक्षेत्र पंढरपूरच्या पांडुरंगाचे निस्सीम भक्त आणि त्यांचे श्रीगुरु गुरुवर्य ह भ प नारायणदादा घाडगे यांचे निस्सीम शिष्य. त्यांनी वयाची ७० वर्षे श्रीक्षेत्र पंढरपूरची नियमित कार्तिकी वारी, ३०-३५ वेळा आळंदीची आणि मुंबई ते पंढरपूर अशी पाच वेळा आषाढी एकादशीसाठी पायी वारी केली. परिस्थितीमुळे त्यांनी शाळेचा वर्ग आणि शिक्षकही पाहिला नाही मात्र आपल्याला श्री ज्ञानेश्वरी, श्रीसंत तुकाराम गाथा, श्री संत नामदेव गाथा, भागवत वाचायचे आहे. अभंग, ओव्या पाठ करायचे आहे हा ध्यास त्यांचा होता. हाच ध्यास त्यांना अक्षर ओळख करून देऊन गेला. मुंबईत माधवबाग, कॉटन ग्रीन, सेंच्युरी मिल बावन चाळ, प्रभादेवी श्री विठ्ठल मंदिर, बारा चाळीतील श्री मोरे माऊली मंदिर, कोळीवाडा, घाटकोपर, अशा विविध ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कीर्तनकारांची कीर्तने ऐकली. प्रसंगी टाळ घेऊन धरकरी म्हणून मागे उभे राहिले. नवखा प्रवचकार असला तरी श्रवण करण्यासाठी समोर बसले. मागच्या पंधरा दिवसापूर्वीच्या एकादशी पर्यंत अगणित बुवांची हजारो कीर्तन-प्रवचने ऐकली असावीत. काही कीर्तने त्यांनी केली असली तरी श्रवणभक्तीला त्यांनी अग्रक्रम दिला. मुंबईत आणि गावीही सतत वाचन चालू असे. कीर्तन -प्रवचनकारांना ओवी अथवा अभंग आठवेनासे झाले की, बाबा ते सांगून सोडवणूक करीत असत.  काही संदर्भ चुकला असेल तर नंतर खाजगीत सांगत. अनेक ओव्या आणि शेकडो अभंग पाठ केले. निरक्षर बाबा कष्टाने जिद्दीने संस्कारीत साक्षर झाले. स्वहस्ताक्षरांत लिहिलेल्या संतांच्या अभंगांच्या चिट्ठ्या त्यांच्या स्वतःच्या संग्रहातील धार्मिक पुस्तकांच्या  पानापानात खोवलेल्या आजही आहेत. 


सकाळी लवकर उठून मोठया आवाजात  ज्ञानेश्वरी वाचायचे, अभंग म्हणायचे हा त्यांचा नित्याचा परिपाठ. घरातल्या आम्हाला आणि शेजाऱ्यांना म्हणायचे, मी मोठ्याने म्हणतो ते तुमच्यासाठी... नकळतपणे तुमच्या हे कानावर जावे म्हणून. त्यांचा एक नित्याचा अभंग आमच्या कानावरून गेला आहे, तो असा-

॥ आज माघ शुद्ध दशमी ॥

सत्यगुरुरायें कॄपा मज केली । 

परि नाहीं घडली सेवा कांही ॥१॥

सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना ।

मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥२॥

भोजना मागती तूप पावशेर ।

पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥

काय कळे उपजला अंतराय । 

म्हणोनियां काय त्वरा झाली ॥४॥

राघवचैतन्य केशवचैतन्य । 

सांगितली खूण माळीकेची ॥५॥

बाबाजी आपुले सांगितलें नाम । 

मंत्र दिला राम कॄष्ण हरि ॥६॥

माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार । 

केला अंगीकार तुका म्हणे ॥७॥

जन्मापासून बाबांना अस्थमा आजार. त्यावर काही वर्षांपासून उपचार सुरूच होता मागच्या नोव्हेंबर महिन्यापासून तो उतारवय झाल्याने अधून मधून उचल खात होता. वृद्धत्वामुळे त्यांचे शरीर थकले होते.  डिसेंबर मध्ये त्यांनी असेच अंथरून धरले. शरीरातील सोडीयम कमी झाले. त्यामुळे दिवसभरात एकदा तरी काही वेळासाठी विस्मरणात जाऊ लागले. एके दिवशी मलाही ओळखत नाहीत हे लक्षात आल्यानंतर मी त्यांना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आजपर्यंतच्या आठवणी, घरातल्या समोरच्या वस्तू आणि जवळच्या व्यक्ती यांच्याविषयी प्रश्न विचारले. त्यांच्या तोंडून असंबद्ध उत्तरे येत होती. दोन दिवस बसण्याची ताकद नसल्याने त्यांनी घरात देवपूजा केली नव्हती. मी त्यांना तोच प्रश्न विचारला, बाबा तुम्ही आज देवपूजा केली का? त्यांनी 'नाही' असे उत्तर दिले. पुढचा प्रश्न विचारला "मग देव कुठे आहे?".... जड झालेला हात छातीकडे ठेवत म्हणाले "माझ्या हृदयात". काही मिनिटांनंतर पुन्हा सर्व आठवू लागल्यावर मी सध्या शिकत असलेली मोडी लिपीच्या अभ्यासाची वही दाखवली. पाहिल्यानंतर पाठीवर हात ठेवत म्हणाले, चांगले आहे. 

बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ अगोदरच्या रात्री बाबांची प्रकृती बिघडली. माझी बहीण गीता आणि भावोजी निवृत्ती उतेकर हे तातडीने माझ्या गावात पोहोचले. मावस बहीण भावनाचा मला फोन आला दादा तुम्ही मुंबईतून निघा. त्याच रात्री ४ वाजता  तातडीने गावी पोहोचलो..... बाबांचे डोळे सताड उघडे होते. बरेच काही शोधताहेत,  स्मरणात साठवलेले काही आठवताहेत,या जगात आपण जन्माला आलो आता आपल्याला हे भाड्याचे घर खाली करून निघायचे आहे अशी निरवानिरवाणीची भाषा त्यांच्या नजरेला नजर देताना मला जाणवू लागली....आणि दशमीची घटिका दुपारी ४. ३२ ला सुरु झाली आणि १५ मिनिटानंतर ४. ४५ ला दोन दिवस - रात्र सताड असलेले डोळे बाबांनी कायमचे मिटले. सहज डोळे मिटले जणू काही काळाला मारलेली ती प्रेमाची मिठीच होती. निसर्ग नियमाला अनुसरून त्यांनी मृत्यूला प्रेमाने जवळ बोलावले. झाकलिया या घटीचा दिवा । 

नेणिजे काय झाला केधवा । 

यापरी जो पांडवा । देह ठेवी ॥" 

अशा रितीने जो देह ठेवील तो साक्षात देवच होतो. बाबांनी सतत परमेश्वराचे नामचिंतन केले. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले आहे. 

"ऐसे जे नित्ययुक्त । 

तयासी मी सुलभ सतत । 

ते देहांती निश्चित । 

मीचि होती ॥"  

भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगीतले आहे. 

"अंतकालेच मामेव स्मरन्मुकक्ता कलेवरम् । य: प्रयाति स मद्भावं याती नास्त्यत्र संशयः ॥" 

जो आयुष्यभर क्षणमात्र न विसरता ईश्वरचिंतन करेल तो शेवटी ईश्वराला येऊन मिळतो. बाबा गेले तो माघ शुद्ध दशमी - वैराग्याशिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना गुरुकृपा झाली तो दिवस,आजच्याच दिवशी तुकोबारायांचे गुरू श्री सद्गगुरू बाबाजी चैतन्य यांनी "राम कृष्ण हरी" या मंत्राचा अनुग्रह दिला. "बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी".

बाबांच्या जीवाची घालमेल इकडे सुरु झाली होती. आणि तिकडे पंढरपूर येथे दशमी आणि भक्त पुंडलिकरायांचा उत्सव  सुरु झाला होता. बाबांच्या निधनाची बातमी समजताच लोकांची घरी रिघ लागली. माघ शुद्ध दशमीला निधन, एकादशीला अग्निसंस्कार आणि द्वादशीला

दूध पाजण्याचा सावडण्याचा विधी हे त्रिकाळ पर्व त्यांनी साधले. ज्या योग्याने धार्मिक संचित (पुण्य ) आयुष्यात साठवले आहे त्याच्याच पदरी असा चांगला योग येतो असे भेटीला आलेले अनेक लोकं भावना व्यक्त करू लागले. 

बाबांना मी जन्मापासूनच्या ६० वर्षात सफेद सदरा, लेंगा, डोक्यावर टोपी, कपाळाला बुका याच वेषात पाहिले. कीर्तनाला उभे राहिले की धोतर नेसायचे. त्यांच्या जन्माची कथा बाजीराव नानाची आई बय आणि त्यांच्या स्वतःच्या तोंडातून ऐकली. 

अगोदर त्यांची आई मुक्ताबाई नंतर पाठोपाठ बाबांच्या मृत्युंनंतर वयाच्या १२ वर्षीच एक बहीण आणि एक भाऊ यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्या अंगावर येऊन पडली. तिन्ही भावंडे अल्पवयीन असतानाच्या वेळीच त्यांच्या आईने जग सोडले होते. शेतीवाडी भरपूर असूनही अठराविश्व दारिद्र. कुडाच्या भिंती आणि गवताने शाकारलेले केंबराळी घर, सर्वच शेती पिकवली असती तर त्यांना संपूर्ण आयुष्यात कायमचे सुगीचे दिवस लाभले असते. मात्र अंगमेहनत करण्यासाठी मोठा कुटुंब कबीला लागतो. घरखर्चासाठी पैसा लागतो. मग बाबांनी आणि तात्यांनी गुरेढोरे सांभाळली पण त्यातून फक्त पोटाला मिळत होते.  घरखर्च कसा चालणार.  ही तिन्ही भावंडे अगदीच लहान. दोघा लहानग्यांना गावी ठेवून बाबांना त्यांचे काका गंगाराम वाडकर १९४७ ला १३ व्या वर्षी मुंबईत घेऊन गेले. हॉटेलात, वखारीत काम करतानाच माजगावला एका प्रिंटिंग कारखान्यात कामाला लागले ही एकच नोकरीं त्यांनी केली. अनेकांना तिथे कामाला लावले. नवनवीन मशीन इतर ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या कारखान्यात काम कमी झाले मात्र बाबा रिटायर्ड होईपर्यंत मालकाने कंपनी चालू ठेवली. बाबांचा सत्कार करून निरोप दिला आणि काही दिवसातच कंपनी कायमची बंद केली. 


बाबा जन्मापासून शाकाहारी. पुढे वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी श्री सदगुरु भावे महाराज वारकरी समाजाचे सदगुरु वै. नारायणदादा घाडगे यांच्या हस्ते तुळशीची माळ घेऊन पंढरपूरमध्ये दिक्षा घेतली. पोलादपूर येथील वारकरी संप्रदायाचे  अधर्व्यू सदगुरु नारायण दादांसारख्या महान गुरु महाराजांनी माझ्यावर कृपा करावी. त्यांनी आपल्या मस्तकी हात ठेऊन  आशीर्वाद द्यावा ही त्यांची मनीषा होती.  दादांनी त्यांचा शिष्य म्हणुन स्वीकार केला. त्यांच्या संत संगतीचा सहवास दीर्घ लाभल्याने आध्यात्मिक जीवनामधे गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व काय आहे याची त्यांना प्रचिती आली. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, 

"गुरुविण ब्रम्ह कैसा कळे ।"

गुरुंच्या मार्गदर्शनाशिवाय परमसत्य जाणणे अशक्यप्राय आहे.  त्यामुळेच प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेमधीलच गुरुकडुन दिक्षा घ्यावी. त्यासाठी प्रथम स्वतः प्रामाणिक असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला. 

बाबा आणि गुरुवर्य दादामहाराज प्रभादेवीतच राहायला होते. प्रभादेवीच्या पुरातन श्रीविठ्ठल-रखुमाई मंदिरात दोघांची नित्य नियमित कार्यक्रम करण्यासाठी भेट होत असे.  "रामकृष्ण हरी" या वारकरी मंत्राचा त्यांनी नुसता अर्थ सांगितला इतकेच नव्हे तर तो त्यांच्या मनावर कायमचा बिंबवला. असं म्हणतात की..

रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार केल्याने जीवनाच फलित होतं, वारकरी संप्रदायामध्ये या मंत्राला अनन्यसाधारण महत्व आहे.

समोरच्या व्यक्तीला मग ती वारकरी असो वा नसो आपसूक प्रेमपूर्वक नम्रतेने उच्चारला जाणारा शब्दमंत्र म्हणजेच 

"राम कृष्ण हरी"

जर खरच आपल्याला सुंदर दिवसाची सुरुवात करायची असेल तर शांत चित्ताने रोज "राम कृष्ण हरी" मंत्राचा जप नक्की करावा जेणेकरून आपलंही अंतःकरण कसे शुद्ध होईल हे त्यांनी कटाक्षाने पाहिले. 

- रवींद्र मालुसरे

अध्यक्ष, 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या