Ticker

6/recent/ticker-posts

शिवराज्याभिषेक दिनी मोडी लिपितील ग्रंथाचे प्रकाशन

शिवराज्याभिषेक दिनी मोडी लिपितील ग्रंथाचे प्रकाशन 

श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल या संस्थेचे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारतातील इतर राज्यांतील भाषांतून पोहोचावा, या हेतूने श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल या संस्थेचे संस्थापक डॉ हेमंत राजे गायकवाड सातत्याने कार्यरत आहेत. जगातील अनेक पराक्रमी योद्ध्ये होऊन गेले परंतु या सर्वापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सर्वार्थाने किती ग्रेटेस्ट होते, हे इतिहासातील तुलनात्मक अनेक दाखले देत त्यांनी १० वर्षांपैकी 'शिवाजी महाराज दी ग्रेटेस्ट ' हे पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिले, प्रचंड स्वागत झालेल्या या पुस्तकाच्या नंतर मराठी, हिंदी, कन्नड भाषेत प्रकाशन झाले आहे. आता ३५६ व्या शिवराज्याभिषेक दिनी मोडी लिपीत हस्ताक्षराने लिहिलेल्या आवृत्तीचे रविवार दिनांक ७ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता दादर पश्चिम येथील धुरु हाॅलमध्ये  'शिवोत्सव सोहळा' आयोजन करून प्रकाशन होत आहे.

एकूण १० मोडी लिपीतील तज्ज्ञ लिप्यंतरकार आणि ज्येष्ठ अभ्यासकांनी नावलौकिक ज्येष्ठत्व असलेल्या श्री. रामकृष्ण बुटेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहासात नोंद होईल असे हे अभूतपूर्व काम पूर्ण केले आहे. आजपर्यंत मराठी वा इतर भाषेततील कोणत्याही पुस्तकाचे मोडी लिप्यंतर झालेले नाही, या सर्व उपक्रमाविषयीचे कथन बुटेपाटील स्वतः करीत आहेत.

--------------------------------------या पुस्तकाचे मोडी लिपी हस्ताक्षरातील हस्तलिखित तयार करण्याची संकल्पना डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी आमच्याकडे मांडली. खरं पाहता हे आमच्या दृष्टीने एक आव्हानच होते. शिवकार्याविषयी ममत्व असल्यामुळे काळ, काम, वेगाचं गणित मांडून हे काम आम्ही विनामोबदला दिलेल्या वेळेत करून देण्याचे आश्वासन दिले.

हे काम इतक्या कमी वेळात करून देण्याचे एकट्या दुकट्याने करण्यासारखे नव्हते म्हणून मोडी लिपी अभ्यासकांपैकी  सुंदर, सुवाच्य मोडी हस्ताक्षर असणाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून पुस्तकातील एकेक प्रकरणातील काही भाग साध्या कागदावर मोडी लिपी अक्षर लेखन नमुना म्हणून लिहून घेतले. सर्वांची मोडी हस्ताक्षरं एकसमान असल्याचे आढळले.



आम्ही १० जणांची  टीम तयार केली. त्यात मी स्वतः १) रामकृष्ण बुटेपाटील, २) भाऊराव घाडीगांवकर, ३) अरविंद कटकधोंड,४) डॉ. राहुल सारडा, ५) डॉ. तेजस लोखंडे, ६) राम वाघोले, ७) चंद्रशेखर पालव, ८)) प्रसाद सुतार, ९) रोहिदास राऊत, १०) तेजस्विनी भावे यांचा समावेश केला. एकमेकांचा संपर्क व संवाद होण्यासाठी व्हाॅटसअप ग्रुप तयार केला.

काळ,  काम, वेग या त्रयींचं नियोजन करून चैत्र शुद्ध प्रतिपदा ( गुढी पाडवा ) दिनांक १९ मार्च २०२६ रोजीच्या शुभ मुहूर्तावर लेखनाला सुरुवात केली. तत्पुर्वी उत्तम प्रतिचा कागद, शाई, लेखन साहित्य बाजारातून आणले. दोन ओळींतील अंतर, अक्षरांची उंची -जाडी निश्चित करण्यात आली आणि लेखन साहित्यांचे सर्वांना वाटप केले.

आम्ही ८ जण मुंबईचे व २ पैकी एक पुणे आणि दुसरे अकोला येथे राहणारे होते. अंदाजे ५०० पृष्ठ संख्या असलेल्या पुस्तकाची प्रत्येकी ५० पृष्ठे प्रत्येकाला लिहावी लागणार होती. 

काम-धंदा, नोकरी - व्यवसाय सांभाळून ही कसरत करावी लागणार होती याची कल्पना सर्वांना होती. त्याप्रमाणे आठवड्याने, पंधरवड्याने, महिन्याने पाठपुरावा करून कामाचा आढावा घेत, केलेले काम ठरलेल्या वेळेनुसार पुस्तकाचे लेखक डॉ. हेमंतराजे गायकवाड यांच्या ताब्यात दिले त्यावेळी त्यांनी सर्वांचे कौतुक करुन अभिनंदन केले. १९ मार्च २०२६ पासून ९ मे २०२६ या ५० दिवसांच्या कालावधीत हे काम पूर्ण करुन द्यायचे होते ते ६ मे २०२६ रोजी पूर्ण करून प्रकाशनाच्या कामासाठी डॉ. हेमंतराजे गायकवाड यांच्या हाती सूपूर्त केले. श्री. पाध्ये आर्टिस्ट यांनी सुंदर मुखपृष्ठ तयार केले. श्रीकांत शास्त्री यांनी पुस्तकाची सुबक छपाई व बांधणी करुन पुस्तक मोडी हस्ताक्षरातील हस्तलिखित ग्रंथ तयार केले तेव्हा सर्वांचे सर्वार्थाने परिश्रम कारणी लागल्याचा आनंद आणि समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

७५० वर्षांपूर्वी यादव मराठा साम्राज्यातील प्रधानमंत्री हेमाद्रीपंत उर्फ हेमाडपंत यांनी पत्रव्यवहार जलद होण्यासाठी मोडी लिपी राज्यव्यवहारात सुरू केली. ४०० वर्षांपूर्वी शिवछत्रपतींच्या मराठा स्वराज्यात राज्याचे चिटणीस बाळाजी आवजी चिटणीस ( चित्रे ) यांनी राज्यव्यवहाराच्या पत्रव्यवहारात मोडी लिपीचा वापर केल्यामुळे मोडी लिपी वैभवाच्या शिखरावर पोहोचली. बाळाजी आवजी चिटणीस यांचे हस्ताक्षर सुंदर सुवाच्य होते. स्वराज्याचा बराच मोठा पत्रव्यवहार हा त्यांच्या हस्ताक्षरात असल्याचे आढळते. 

शिवोत्सव ' दिनाच्या कार्यक्रमात आम्हा सर्वांना ' बाळाजी आवजी चिटणीस ' पुरस्काराने श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. हा क्षण आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण म्हणून कायमचा स्मरणात राहील.

मोडी लिपीतील तज्ज्ञ लिप्यंतरकार आणि ज्येष्ठ अभ्यासक यांच्या मोडी लिपी हस्ताक्षरातील हे हस्तलिखित ग्रंथरुपाने प्रकाशित होत आहे. यांचे शिवकार्याप्रति ओढ, प्रेम, आस्था, ममत्व असल्यामुळे हे कार्य सिद्धीस गेले. म्हणून श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने १० जणांना "शिवस्वराज्याचे बाळाजी आवजी चिटणीस यांच्या नावाने सन्मान पुरस्कार" प्रदान करण्यात येत आहे. यानिमित्त आम्ही संस्थेप्रति ऋण व्यक्त करतो. 

' शिवाजी महाराज दी ग्रेटेस्ट ' या मोडी लिपी हस्तलिखीत ग्रंथाच्या निर्मितीसाठी पुस्तकाचे लेखक डॉ. हेमंतराजे गायकवाड, समन्वयक मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई चे अध्यक्ष श्री रवींद्र मालुसरे, ग्रंथाचे रंगीत व आकर्षक मुखपृष्ठ तयार करून देणारे श्री पाध्ये आर्टिस्ट, सुबक छपाई व मजबूत बांधणी करुन देणारे प्रिंटर्स श्री. श्रीकांत शास्त्री तसेच  ज्यांचे ज्यांचे हातभार आणि योगदान या मोडी लिपी हस्तलिखित ग्रंथाच्या निर्मितीसाठी लाभले त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा स्नेहभाव आहेच. तो दिन प्रतिदिन वृद्धिंगत होत राहो. ही शिवरायांच्या चरणी विनम्र प्रार्थना. जय शिवराय!

श्री रामकृष्ण  बुटेपाटील, भाऊराव घाडीगांवकर, अरविंद कटकधोंड, डॉ. राहुल सारडा, डॉ. तेजस लोखंडे, राम वाघोले, चंद्रशेखर पालव, प्रसाद सुतार, रोहिदास राऊत, तेजस्विनी भावे

 

रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 







 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या