Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राभिमानी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी

महाराष्ट्राभिमानी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख

बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी

देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे आज २३ जानेवारी २०२६ पासून जन्मशताब्धी वर्ष सुरु होत आहे. आज विशीत असलेल्या अनेकांना, विशेषतः मराठी मुलांना "बाळ ठाकरे किंवा बाळासाहेब" ह्या शब्दातील जरब, आदर, प्रेम, आपुलकी, अभिमान अनुभवायला नाही मिळणार हा त्यांच्या नशिबाचा दोष आहे आणि आपण त्याच कारणासाठी नशीबवान!

शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली. माझा जन्म १९६५ म्हणजे एक वर्षाचा. त्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर-प्रभादेवीत गेली ५० वर्षे राहूनही मला कधी शिवसैनिक व्हावे असे वाटले नाही. देशाच्या लोकशाहीसाठी बलिदान दिलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विचाराचे माझ्यावर ऐन तारुण्यात गारुड होते, त्यांच्या निर्घृण हत्येनंतर मी राजकीय विचाराला तिलांजली देऊन लेखणी हातात घेतली.

खरे तर राजकारण हा पिंड नसल्याने मी कधीच सेनेच्या शाखेत गेलो नाही, सेनेच्या कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला नाही. परंतु बाळासाहेबांबद्दल असलेली माझी श्रद्धा कडव्या शिवसैनिकांइतकीच आहे. खासदार ऍड शरद दिघे आणि आमदार शरयूताई ठाकूर वगळता माझे अमूल्य मत नेहमीच शिवसेनेला दिलेय. शिवाजी पार्क, सेनाभवन हे रोजच्या संपर्कात असल्याने शिवसेना अत्यंत जवळून पाहण्याची संधी मला प्राप्त झाली. बाळासाहेबांच्या अमोघ वक्तुत्वाच्या शिवाजी पार्कवरील लाखो जनसमुदायाच्या सभा तसेच छोटे कार्यक्रम -मोठ्या सभा यातून त्यांना मी प्रत्यक्ष ऐकले आहे. त्यांच्या भाषणांच्या ऑडिओ कॅसेट संग्रही ठेवल्या आणि ऐकल्या, सेनेची आंदोलने, रस्त्यांवरील चळवळी यांचा अभ्यास केला आहे. त्यांची भाषणे ऐकताना कधीही कंटाळा आला नाही. प्रत्येक भाषणात वेगळाच चमकदार मुद्दा समोर आला. त्यांचा एकेक शब्द म्हणजे वादळ भासे म्हणून त्यांच्यासाठी 'दिव्यत्व' हा शब्द मला वापरावासा वाटतो.

अनेक राजकीय नेत्यांप्रमाणे ते ढोंगी वाटले नाहीत. माझे भाग्य असे की, त्यानंतर त्यांच्या नजरेच्या टप्प्यात ३ वेळा आणि २ वेळा त्यांच्याशी निकटचा संवाद साधण्याची मला संधी मिळाली. १९८४ मध्ये मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या संमेलनात, माझ्या जन्मभूमीत नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ते उमरठला आले होते. युतीची सत्ता येण्यापूर्वी १९९१ मध्ये शिवसेना भवन जवळच्या एका दुकानात ते मीनाताई ठाकरे यांच्यासोबत उभे होते मी आणि माझा पत्रकार मित्र नितीन चव्हाण त्यांना दुकानाच्या बाहेरून बघत होते, त्यांनी आम्हा दोघांनाही आतमध्ये बोलावले आमच्याशी ५ मिनिटे बोलले. २००६ मध्ये मातोश्रीवर ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक चंद्रकांत पाटणकर यांच्या 'माझी पत्रपंढरी' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी, २००६ मध्ये मातोश्रीवर मी संपादित केलेल्या 'जागल्यांचा लोकजागर' या पुस्तकाच्या प्रकाशन असे प्रसंग माझ्या वाट्याला आले.

शालेय जीवनापासून 'मार्मिक' मधील व्यंगचित्रे प्रत्यक्ष अंकामध्ये आणि नाक्यानाक्यावर शिवसेना शाखेच्या वतीने फळ्यांवर खडूने काढलेली व्यंगचित्रे पाहत होतो. २०१४ मध्ये आमच्या वृत्तपत्र लेखक संघाचे माजी प्रमुख कार्यवाह श्रीकांत मयेकर यांनी मार्मिकचे पहिल्यापासूनच अंक संस्थेला भेट दिले, त्यांचे वडील स्व. लक्ष्मण मयेकर हे शिवसेना स्थापनेपासून कट्टर शिवसैनिक आणि मार्मिकचे नियमित वाचक होते. त्यांचा हा ठेवा चाळताना मला बाळासाहेबांचे मोठेपण अधिक भावले. एकंदर बाळासाहेबांच्या काळात वावरताना मला त्यांची दूरदृष्टी, निर्णयक्षमता, परिस्थितीचे आकलन याचा पदोपदी प्रत्यय आला. भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर तर एवढी विलक्षण होती, की इतका चाणाक्ष राजकारणी मी पाहिलेला नाही.

बाळासाहेब जे बोलतात ते कार्यकर्त्यांच्या हृदयाला थेट भिडतं. हाच कार्यकर्ता बाळासाहेबांपुढे कुणालाही मानायला तयार नसतो. बाळासाहेबांकडे निर्णय घेण्याची एक अद्भुत शक्ती आहे. त्यांचे निर्णय अनेकांसाठी टीकेचे विषय ठरले. पण आश्चर्यकारकरीत्या बाळासाहेबांचीच तर्कसंगती अचूक असल्याचा पडताळा उभ्या जगाला आला. आणखी एक वैशिष्ट्य सांगावं लागेल त्यांचं. बाळासाहेबांनी आपला पक्ष कधी नियमांच्या वगैरे जंजाळात अडकू दिला नाही. आणि त्याबद्दल त्यांना कुणी कधी विचारलंही नाही. ती त्यांची अशी स्वतःची विशिष्ट कार्यशैली होती. त्यांचं सामर्थ्य, त्यांचा करिष्मा हे सारं लोकविलक्षणच होते. खऱ्या अर्थानं निर्मोही असलेला असा हा माणूस. जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना मला म्हणावेसे वाटतेय की, बाळासाहेबांचे चरित्र म्हणजेच शिवसेनेचा इतिहास आहे,


 संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणजे मराठी माणसाचा अभिमान स्वाभिमान आणि अस्मितेचा लढा होता. मुंबई काँग्रेसवर गुजराती श्रीमंत वर्गाचे वर्चस्व होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने एक इतिहास घडवून मुंबई कुणाची हा प्रश्न निकालात काढून मुंबई ही महाराष्ट्राचीच. मराठी माणसाचीच हे अधोरेखीत केले होते. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 'महाराष्ट्रात मुंबई आली; परंतु मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता' मुंबईतील व्यापार गुजराती-मारवाड्यांकडे तर कार्यालयांमध्ये दाक्षिणात्यांचा वरचष्मा. छोटी-छोटी कामे, टॅक्सी व्यवसाय उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांच्या हाती होता. मुंबईत असा सर्वत्र परप्रांतीयांचा वावर होता. मराठी माणूस मात्र कुठेही दिसत नव्हता. त्याला घाटी घरगडी म्हणून हिणवले जायचे. मराठी माणूस आपल्याच राज्यात परका झाला होता. पोरका झाला होता.

महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत नोकरभरतीत मराठी माणसावर वर्षानुवर्षे अन्याय होत होता. हा अन्याय दूर करण्यासाठी श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रयत्न केले. शिवसेनेच्या जन्माचे बीज यातच दिसून येते. त्याच बीजाचे रोपण बाळासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनामध्येसुद्धा दिसते. बाळासाहेब फ्री प्रेस जर्नल या दैनिकात व्यंगचित्रकार म्हणून काम करीत होते. त्यांनी नोकरी सोडून स्वतःचे व्यंगचित्र साप्ताहिक काढण्याचे ठरविले. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी 'मार्मिक' असे नाव सुचविले. महाराष्ट्रातली सामाजिक सुधारणांची चळवळ आणि जातिभेदविरोधी चळवळ या दोन्हीमध्ये प्रबोधनकारांचे योगदान अगदी पायाभूत आहे. प्रबोधनकारांचे हे काम पुढे नेण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी सुरुवात केली. मराठीत दुसरे व्यंगचित्र साप्ताहिक नव्हते. १३ ऑगस्ट, १९६० हा मार्मिकच्या प्रकाशनाचा दिवस ठरला आणि समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. यशवंतराव चव्हाण यांचे नाव निश्चित करण्यात आले.

१ मे, १९६६ च्या मार्मिकमध्ये 'मराठी राज्यात मराठी माणसाची ससेहोलपट' हा अग्रलेख प्रसिद्ध झाला. यातूनच शिवसेनेची मूळ भूमिका शिवसेना स्थापन होण्यापूर्वीच स्पष्ट झाली. या अग्रलेखात स्पष्ट म्हटले आहे की, ... आम्ही याच विशुद्ध राष्ट्रवादी भूमिकेचे कट्टर पुरस्कर्ते आहोत. पण स्वतःच्या प्रांताची न्याय्य नि वाजवी गाऱ्हाणी कडाडून मांडणे, त्यासाठी भांडणे हा संकुचित प्रांताभिमान आणि आपल्या प्रांतातील जनतेचं अकारण नुकसान होत असलं तरी ते मुकाट्याने सहन करणे हा विशाल राष्ट्राभिमान, ही संपूर्णतः तत्त्वदुष्ट, तर्कदुष्ट व व्यवहारदुष्ट भूमिका मात्र आम्हांला साफ नामंजूर आहे. मार्मिकमध्ये शिवसेना जन्माला येण्यापूर्वीच नोकऱ्यांमध्ये मराठी माणसांवर कसा अन्याय होतो याची माहिती येत होती. मराठी माणसांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू झाले होते. याच अंकात शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा वाघ छापण्यात आला शिवाय तेजस्वी छत्रपती शिवाजी महाराज होतेच. मागच्या बाजूला महाराष्ट्राचे चित्र आणि 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' हे वचन लिहिले होते आणि मोठ्या अक्षरात 'मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी' शिवसेना असे छापले होते. 'मार्मिक' मधून मुंबईतील आस्थापनातील नोकरवर्गाच्या याद्या छापून येत होत्या त्या परप्रांतीयाच्या होत्या. त्यात मराठी माणसास स्थान नव्हते. लायकी असून त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. मुंबईतील सरकारी-निमसरकारी व प्रायव्हेट कंपन्यामध्ये दाक्षिणात्यांचा भरणा जास्त होता. मराठी माणूस शोधून सापडत नव्हता. बाळासाहेबांनी आपल्या लिखाणाने मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवले. अनेक मराठी माणसे मार्मिकच्या कार्यालयात येऊन आपल्या व्यथा आणि वेदना मांडायचे. ही मराठी माणसांची गर्दी पाहून प्रबोधनकार म्हणाले, हे एवढे लोक येतात,  याला काही संघटनात्मक स्वरूप द्यायचं की नाही ? या सगळ्या गोष्टीला, चळवळीला संघटनेचा आकार द्या. तरच त्यातून ठोस घडेल, नाही तर ही जागृती फुकट जाईल. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी प्राणपणाने झुंजणारी संघटना काढणे. शिवसेनेची स्थापना झाली आणि समीकरणे बदलायला सुरूवात झाली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना असे बिरूद लावून 'मार्मिक'कार बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. तोपर्यत मराठी माणसांचा तारणहार म्हणून  मराठाकार आचार्य प्र. के. अत्रे यांच्याकडे पाहिले जायचे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर मात्र मराठी लोकांचा तारणहार म्हणून 'मार्मिक' कार बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र पाहू लागला.  'शि व से ना' ही चार अक्षरं घराघरांत जाऊन पोहोचली होती, तर 'बाळ ठाकरे' हे नाव वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर दिसू लागलं होते.

'महाराष्ट्राला आज खरी गरज 'महाराष्ट्रवादा'ची आहे !' अशा शब्दांत बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन झाली तेव्हाच्या पहिल्या सभेत  आपलं भाषण सुरू केलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. आज मराठी माणूस जागा झाला आहे. यापुढे तो अन्याय सहन करणार नाही. राज्य सरकारला याची दखल घ्यावीच लागेल, असा खणखणीत इशारा देतानाच त्यांनी शिवसेनेचं धोरणही विशद केलं. 'आज महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे. त्यामुळे शिवसेना राजकारणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,' असं सांगतानाच त्यांनी आपल्या 'मार्मिक' शैलीची चुणूकही उपस्थित जनसमुदायाला दाखविली. 'राजकारण हे गजकरणासारखं आहे' असं बाळासाहेब म्हणाले आणि हशा उसळला. कोणत्याही प्रकारच्या तात्त्विक आणि जडजंबाल विश्लेषणात अडकून प्राध्यापकी धाटणीचीभाषणं करण्याऐवजी मिष्किल कोट्या आणि चटपटीत विनोद यांच्या जोरावर सभेवर पकड बसविण्याची सुरुवात ठाकरे यांनी त्या पहिल्या मेळाव्यापासूनच केली होती.

प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांनी त्या पहिल्या मेळाव्यात आपल्या नेहमीच्या शैलीत सांगितलं होतं की, इतके दिवस हा बाळ, ठाकरे कुटुंबीयांचा होता. आज हा बाळ मी तुम्हाला दिला...!' तेव्हापासून महाराष्ट्रातील मराठी माणसाने स्वीकारलेला हा मराठी अस्मितेचा "ठाकरी ब्रँड" आजही ठळकपणे अग्रभागी महाराष्ट्रात आहे. मराठी मनावर पाच दशकं गारूड करणारा हा अवलियाची तीन तीन पिढ्याअसंख्य शिवसैनिकांच्या मनात घर करून राहिलेला आहे. ज्याला जनतेची नाडी ओळखता येते तोच खरा नेता बनतो. बाळासाहेबांनी १९६६ मध्ये मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली. त्यांच्या वेदनेवर बरोबर हात ठेवला. म्हणूनच 'कदम मॅन्शन, ७७ रानडे रोड, दादर (पश्चिम)' येथे शिवसेनेची स्थापना केली. आणि मंत्र दिला “तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. पण, न्याय मिळालाच पाहिजे!”

बाळासाहेब थोर व्यंगचित्रकार होते. आजूबाजूच्या अनेकविध घटना जागरुकपणे पाहणे, त्यातील उणीवा शोधून काढणे आणि लोकांसमोर मिश्किलपणे मांडणे यात बाळासाहेबांचा हात धरणे फारच कठीण ! आपल्या मनातील विचार प्रभावीपणे मांडता येणं हे वैशिष्ट्य. त्यांचं भाषण हा तर श्रोत्यांशी आपल्या शिवसैनिकांशी त्यांनी केलेला एक संवाद असायचा. या संवादासाठी तर शिवसैनिक तासनतास खिळून बसत. ते सभास्थानी आले की, जणू सामूहिक संमोहन झाल्याप्रमाणे सभेत रोमांच निर्माण होत असे.  शिवसैनिकांच्या अंगात वारं संचारतं असे. जोडीला फटाक्यांची धूमधाम, भगवे झेंडे घेऊन शिवसैनिक नाचायला लागत. त्यांच्या  जयजयकाराच्या घोषणा बेभान होऊन देत असत. वातावरणात एक अपूर्व असा जल्लोष निर्माण होत असे. ही किमया असे  'माझ्या तमाम बंधू-भगिनीआणि मातांनो' हे शब्द उच्चारून पहिल्या वाक्याला टाळ्या घेणाऱ्या नेत्याची ! 

बाळासाहेब ठाकरे म्हणजे कोणाचीही तमा न बाळगणारे व्यक्तिमत्व. त्यांची अंगकाठी कृश होती, पण ते कधी गप्प बसले नाहीत. आत एक व बाहेर एक, असा त्यांचा स्वभावच नव्हता. वयाच्या ऐंशीतही त्यांच्या मुखातून अंगार बाहेर पडायचा. त्यांच्या शब्दाखातर शिवसैनिक जिवाची बाजी लावायला तयार असत. शिवसैनिकांना त्यांनी लढाऊ बाणा शिकवला. कोणत्याही प्रकारच्या दुबळेपणाचा त्यांना अत्यंत तिटकारा होता. खरं तर बाळासाहेब सागराएवढे जनमानस लाभलेले लीडरशिप  उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांच्या लीडरशिपद्वारे प्रेरणा घेऊन अनेक नेते तयार झाले आहेत. सर्वसामान्य भाजीवाला, रिक्षावाला, छोटे  व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती अशी अनेक माणसं त्यांची प्रेरणा घेऊन कुणी सामान्य शिवसैनिक पुढे नगरसेवक, तालुका पंचायत सभापती, नगराध्यक्ष, जिल्हापरिषद सदस्य, अध्यक्ष, महापौर, खासदार, आमदार, राज्यातील आणि केंद्रीय मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि लोकसभेचा सभापदी झाला, परंतु अशा कोणत्याही पदावर जाण्याचा त्यांना केव्हाही मोह झाला नाही. कोणत्याही निवडणुकीला मी उभा राहणार नाही आणि कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नाही हा त्यांचा निर्धार त्यांनी मृत्यूपर्यंत कायम ठेवला. यात त्यांची निःस्पृहता दिसून येते. शिवसैनिकांनी निष्ठेने दिलेले "शिवसेनाप्रमुख" हे पद त्यांना मोठे वाटत होते. मात्र काही टीकाकारांच्या मते पक्षाचा रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना राजकीय पद स्वीकारण्याची गरजच भासली नाही. केंद्रीय मंत्र्यांनासुद्धा ते मातोश्रीवरून आदेश देत होते,

१७ नोव्हेंबर २०१२. दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांची वेळ.....हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नावाचे अस्तित्व काळाच्या पडद्याआड गेले. काळावर आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या युगपुरुषाचे देहावसान झाले !  गेल्या ६० वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी मराठी समाजास काय दिले?बाळासाहेबांनी आम्हाला काय दिले? ह्या प्रश्नचे खूप मोठे उत्तर देता येईल. पण एका शब्दात सांगायचे तर "हिंमत"! आम्हाला मुंबईत नडायला अजून कोणाची माय व्यायाली नाय ही भावना आमच्यात त्यांनी रुजवली. एकूणच अन्यायाविरुद्ध संघर्ष करायचा असा विचार आणि विश्वास त्यांनी दिला. आपण नडलो आणि अडकलो तर पाठीशी साहेब आहेत हा खूप मोठा मानसिक आधार त्यांनी लाखो लोकांना दिला.  बाळासाहेबांच्या राजकीय विचारांबद्दल, निर्णयांबद्दल अनेक मतांतरे असू शकतात. विरोधक कुणालाही चुकलेले नाहीत. पण एक गोष्ट त्यांचे विरोधकही मान्य करतात की ह्या महाराष्ट्रात एक निधडी, गरज पडल्यास मुठी आवळू शकणारी, अनेक प्रसंगी मुठी आवळून दाखवलेली एक पिढी घडवण्यात ह्या लोकपुरुषाचा आणि फक्त त्याचाच वाटा आहे !

भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच? बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते.  पैशांनी फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना शिवसेनाप्रमुखांनी आपल्या विचारांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगात मराठी माणसाला स्वाभिमानाचा मंत्र दिला आणि मराठी माणसांवर होणारे अत्याचार, धाक, दडपशाही मोडीत काढण्याची ताकद दिली. 

आज साहेब नाहीत. त्या स्फुल्लिंग चेतावणाऱ्या सभा, अग्रलेख नाहीत, अनेक समीकरणे बदलली आहेत, त्यांच्यावर जीवापाड श्रद्धा असलेले वेडे वीर वयोमानानुसार शांत झालेत. शिवसेनेची पडझड होतेच आहे तरीही तो शांतपणे असह्य होऊन पाहतो आहे. मराठी अस्मिता आणि राष्ट्रवाद या मूल्यांवर त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या भाषणांतील तेज, निडर भूमिका आणि सामान्य माणसाविषयीची  कळकळ यामुळे ते कायम जनमानसाच्या हृदयात राहिले. त्यांच्या अमोघ वाणीतून प्रकटलेला स्वाभिमान महाराष्ट्रवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील.अश्या ह्या असामान्य अवलियाला, लोकोत्तर पुरुषाला, शिवसैनिकांच्या दैवताला त्यांच्या स्मृतीदिनी आमचा मानाचा मुजरा!!! जय महाराष्ट्र !!! 

रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 







 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या