Ticker

6/recent/ticker-posts

पोलादपूर पैठणचा रंगकर्मी : संदीप जंगम

पोलादपूर पैठणचा रंगकर्मी : संदीप जंगम 

संदीप जंगम .....पोलादपूर तालुक्यातील पैठणचा हा रंगकर्मी. मुंबईतील मराठी चित्रपट-नाट्य-दूरदर्शन या क्षेत्राशी निगडित असणारे व्यक्तिमत्व. मी 'पोलादपूर अस्मिता' सुरु केल्यापासून गेली चार दशके पोलादपूरचा अभ्यासक या नात्याने भूतकाळ आणि वर्तमानाचा शोध घेण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी दादरच्या छत्रपती शिवाजी मंदिरात संदीप यांची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या "महाराष्ट्र माझा : मुंबई कुणाची " अर्थात गोष्ट संयुक्त महाराष्ट्र लढ्याची या विषयावर त्यांच्या नाटकाचा प्रयोग आहे. मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा विषय ते रंगभूमीवर घेऊन येत आहेत त्यामुळे या विषयाच्या अनुषंगाने अधिक बोलणे झाले... 

पोलादपूरचा इतिहास आणि माणसे मला पुस्तकातून, कार्यक्रमातून, सोशलमिडीयातून भेटत असतात, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा मी शोध घेत त्यांच्या कामाची नोंद घेत असतो. हा लेख लिहीपर्यंत संदीप यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही, मात्र मोबाईलवर त्यांच्याशी बोललो, माहिती करून घेतली.  हाताच्या बोटावर मोजता येतील अशी तालुक्यातली माणसे सोडली तर या कला क्षेत्रापासून व्यावसायिक पद्धतीने आवड जोपासणारी कलावंत मंडळी अजून फार दूर आहेत. छावा चित्रपटाच्या माध्यमातून जगभर पोहोचलेले लक्ष्मण उतेकर (मोरसडे) पोलादपूर पेठेतील ज्येष्ठ साहित्यिक-लेखक प्रल्हाद जाधव (शेवंता जिती हाय या गाजलेल्या नाटकाचे लेखक), हरिओम घाडगे (करंजे ), किरण मोरे (आडावळे ), रानवडीचे नितीन सुरेश उतेकर (निर्माता - सुखी माणसाचा सदरा - भरत जाधव ) तुर्भेचे अमोल शिवराम उतेकर ( निर्माता - सर्व लाईन व्यस्त आहेत - महेश मांजरेकर).

सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे संदीप हे मराठी चित्रपट - नाट्य - मालिका यामध्ये आपली प्रतिभा जोपासत आहेत. त्यांची कारकीर्द फार मोठी नसली तरी या सृष्टीने दखल घ्यावी असा त्यांचा प्रवास आहे. संदीप यांनी लेखक म्हणून "एका क्षणात" हे नाटक, संयुक्त महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी हे इव्हेन्ट शो, त्याचप्रमाणे गूढ या चित्रपटाचे त्यांनी संवाद लिहिले आहेत. याशिवाय ईटीव्हीसाठी (एक झोका नियतीचा), झी मराठी (कुलवधू ), स्टार प्रवाह (लक्ष्य क्राईम स्टोरी ), कलर्स मराठी (चाहूल ), स्टार प्रवाह (दुहेरी, प्रेम तुझा रंग कसा ), सोनी मराठी (चाहूल गुन्हेगारीची ) या सिरियलची संवाद लेखन केले आहे. डायरेक्टर म्हणून झी मराठी (होम मिनिस्टर ), ईटीव्ही (खाद्य भ्रमंती). साम टीव्ही (लिंबू टीबु ) असा त्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास आहे. 

जन्मापासून मृत्युपर्यंत माणसाचे जगणे अनेक घटकांनी आणि घटनांनी ओतप्रोत भरलेले असते. या घटकांचा आणि घटनांचा परिणाम म्हणून त्याच्या जन्मापासून मरेपर्यंत तो सौंदर्य, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयंकर, बीभत्स, अद्भुत आणि शांत या नवरसांचा अनुभव घेत आपले आयुष्य जगत असतो. त्याच्या जगण्यातील या नवरसांच्या अंतर्भावाने नृत्य, संगीत आणि साहित्य यांसारख्या अभिजात कला नटल्या आहेत. या अभिजात कलांपैकी, साहित्यात कथा, कविता आणि कादंबरी अश्या अभिव्यक्तीच्या माध्यमांचा समावेश होतो. प्रामुख्याने उल्लेख केलेल्या या तीनही माध्यमांत माणसाचे अखिल जगणे प्रतिबिंबित होते. किंबहुना तसे ते प्रतिबिंबित व्हावे, हा या माध्यमांचा प्रमुख उद्देश असतो. तालुक्यातील संदीप जाधव यांना हे क्षेत्र ऐन तारुण्यापासून खुणावत होते. ती ओढ त्यांना पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पर्यंत घेऊन गेली. त्याठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले, आणि करिअर घडवण्यासाठी स्ट्रगल केला.  

संदीप जंगम यांनी मराठी माणसांना किंबहुना अवघ्या महाराष्ट्राला वस्तुस्थितीची जाणीव करून देणारा विषय मांडण्याचा प्रयत्न यातून केला असावा. 'संयुक्त महाराष्ट्राचा लढा' हे महाराष्ट्राच्या जीवनातले एक रोमांचकारी असे पर्व होते. या पर्वात महत्त्वाचा होता तो विचार. हा लढा विचारांचा होता. मराठी अस्मितेचा होता. स्वाभिमानाचा होता. मराठी भाषेच्या अस्तित्वाचा आणि प्राणप्रिय ठरलेल्या मुंबईच्याही अस्तित्वाचा होता. केंद्राने भाषावर प्रांतरचनेचे तत्त्व सर्वत्र लागू केले होते. त्यादृष्टीने प्रत्येक प्रांताला न्याय दिला होता. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र अन्याय आला होता. त्यामागे एक प्रकारचे राजकीय षड्यंत्र होते. महाराष्ट्र म्हणजे पुंडाईचा देश, बंडखोरीचा देश, दरोडेखोरीचा देश अशी काहीशी विचित्र कल्पना इंग्रजी इतिहासाच्या वाचनाने त्यांच्या मनात घर करून बसली होती. खुद्द महाराष्ट्राचे जे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच नेहरुंच्या मनात एक प्रकारची अढी निर्माण झाली होती. ते त्याच दृष्टिकोनातून शिवप्रेमी महाराष्ट्राकडे पाहात होते.

स्वातंत्र्यानंतर भारतीय संघराज्यातील एक स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची १ मे १९६० ला स्थापना झाली; पण महाराष्ट्र हे नाव मात्र गेल्या दोन हजार वर्षांपासून प्रचलित आहे.महाराष्ट्र. नावातच राष्ट्र असणारे आणि स्वाभाविकपणे संकुचितपणाला थारा न देणारे राज्य...स्वतंत्र भारतात भाषा हा आधार मानून राज्यांची पुनर्रचना झाली, तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याची भावना बळावली. त्या असंतोषातून उभी राहिली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्या चळवळीला बहुतांशी यश मिळाले आणि आजचे महाराष्ट्र राज्य १०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून अस्तित्वात आले. स्वाभिमानाने आणि शर्थीने मिळविलेला तो महाराष्ट्र आज कुठे आहे ?  सुसंस्कृत महाराष्ट्र संपला आहे असेच दिसतंय. नेत्यांनी व त्यांच्या चमचा नि  सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली आहे. गुन्हेगारी, भोंदूगिरी, काळी जादूची कांड, कोयता गँग, पक्ष फोडाफोडी, नेते खरेदी  व स्वतः किती मोठे नेते आहोत याची प्रचंड जाहिरातबाजी यातच महाराष्ट्र संपला आहे. या पार्श्वभूमीवर - 

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ – विचार करायला भाग पाडणारी संदीप जंगम यांची नाट्यकृती समोर येत आहे.  ‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ या शीर्षकाने सादर झालेल्या नव्या नाट्यकृतीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक मराठी आणि महाराष्ट्रप्रेमी व्यक्तीच्या भावनांशी थेट नातं जोडणारा विषय या नाटकात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. संस्कृती कला प्रतिष्ठान आणि लोकजागर नाट्य संस्था निर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संदिप जंगम यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील विविध घटनांचा आढावा घेत, या कलाकृतीतून त्या काळातील संघर्ष, बलिदान आणि मराठी अस्मितेचा अभिमान उलगडला जातो.

नाटक पाहताना कधी पूर्वजांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो, तर कधी महाराष्ट्र आणि मुंबईसाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांच्या कथा डोळे पाणावून टाकतात. त्याचबरोबर आजच्या महाराष्ट्राची आणि विशेषतः मुंबईतील मराठी माणसाच्या स्थानाची वास्तव स्थितीही या नाटकातून अधोरेखित केली जाते. गावागावातून मुंबईत आलेल्या मराठी माणसांच्या कष्टावर उभी राहिलेली ही नगरी आज बदलत चालली आहे. “मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” असा ठाम आवाज देणाऱ्या मराठी जनतेच्या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे नाटक विचार करायला भाग पाडते. गिरगाव, लालबाग, परळ, दादर यांसारख्या मराठी वस्तींच्या भागात आज मराठी माणूस किती उरलाय, हा सवालही या कलाकृतीतून उपस्थित केला जातो.

दिग्दर्शकाने रंगमंच, नाट्य आणि पार्श्वभूमीवरील स्क्रीन यांचा अत्यंत सर्जनशील वापर केला आहे. विशेष म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून सादर केलेले दृश्य नाटकाला एक वेगळाच आयाम देतात. ही शैली प्रेक्षकांना नाट्यचित्र माध्यमाचा नवा अनुभव देणारी ठरते. विशेष म्हणजे ह्या नाट्यकृतीला आदेश बांदेकर आणि उदय सबनीस यांचं निवेदन आहे.

नाटकाला रोहन पाटील यांचे संगीत लाभले असून प्रकाशयोजना राजेश शिंदे यांनी केली आहे. AI चित्रफितींची जबाबदारी प्रसाद सोनावणे आणि हर्ष राऊत यांनी सांभाळली आहे. शाहीर मनोहर गोलांबरे आणि रविंद्र खोमणे ह्यांनी गायन केलं आहे. गणेश जाधव आणि संदिप जंगम यांचा प्रभावी अभिनय नाटकाला अधिक बळकटी देतो. या नाट्यकृतीची निर्मिती महेश भोसले आणि संदिप जंगम यांनी केली आहे. व्यावसायिक रंगभूमीवर वेगळे आणि विचारप्रवर्तक विषय हाताळण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. प्रेक्षकांनी या अनोख्या आणि आशयघन नाट्यकृतीचा आस्वाद घ्यावा, तसेच पुढील पिढीला महाराष्ट्राच्या इतिहासाची आणि अस्मितेची जाणीव करून देण्यासाठी हे नाटक आवर्जून दाखवावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

नाटकांचा जन्म इ.स.पूर्व तीनशे वर्ष अगोदरचा आहे. भरतमुनींनी 'नाट्यशास्त्र'च लिहिले. ज्या अर्थी या शास्त्राचा जन्म झाला त्या अर्थी रंगदेवता कितीतरी अगोदर जन्मली होती.  विष्णुपंत भावे यांनी इ. स. १९४३ साली नाटकांचा प्रारंभ करण्याआधीपासून लोकनाट्य रंगभूमी अस्तित्वात होती. तिचा रसिक वर्ग या नव्या रंगभूमीच्या आगमनाने तिच्या विकासाने चोखदंळ होत गेला. व्यावसायिक रंगभूमीने स्पर्धेमुळे व व्यवसायाच्या भरभराटीसाठी रंगभूमीवर नवनवे प्रयोग केले व नाटक पुढे गेले. रंगभूमीचा हा विकास समाज परिवर्तनाबरोबरच होत गेल्याचे लक्षात येते. लोकनाट्य, संगीतनाट्यापासून उगम पावलेल्या या परंपरेत काळाच्या ओघात अनेकानेक आधुनिक नाट्यप्रवाह सामील झाले, ते विकसितही होत राहिले. त्यातूनच आजचे मराठी रंगभूमीचे क्षितिज विस्तारित झाल्याचे दिसून येते. केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक रंगभूमीच्या अवकाशात साकारलेले अनेक महत्त्वपूर्ण प्रयोग मराठी रंगभूमीवर यावेत यासाठी मराठी रंगकर्मी नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. मराठी रंगभूमी या बदलांची साक्षी होती आणि आपल्या परीने त्यांचे अर्थ लावत तिने काही सक्रिय भूमिकाही निभावली. हा अशा रंगभूमीचा विलक्षण इतिहास तर आहेच, पण एका प्रकारे तो या कालखंडातील सामाजिक वास्तवाचाच मांडलेला एक लेखाजोखाही आहे.

समाजातील सर्व थरांतल्या आणि सर्व जातकुळीच्या रंगभूमीला आणि त्याद्वारे सामाजिक बदलांना भिडण्याचे असे प्रयत्न मराठीतून याआधी फारसे झालेले नाहीत.

मराठी नाटक हा मराठी माणसाचा अतिशय आवडता विषय. मग ते नाटक संगीत असो, विनोदी असो किंवा इतर नाट्यप्रकारातील नाटक असो. मराठी माणूस ती भरभरून वाचतो आणि पाहतोही. मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत व त्यानंतर भारतातील व भारताबाहेरील मराठी माणसाने मराठी रंगभूमीवर मनापासून प्रेम केले आहे. काळानुसार नाटकांचा दर्जा व प्रेक्षकांची आवड ही बदलत जाते हे सर्वश्रुत आहे. तथापि या प्रत्येक नाट्यप्रकारातील प्रेक्षक हे नाटक केव्हाही आले, रूप बदलून आले, कलाकार बदलून आले तरी पाहतोच.....या नाट्यकलाकृतीचेही मराठी माणूस विशेषतः संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जन्मलेला तरुण आपल्या पूर्वजांचा इतिहास स्वतः पाहण्यासाठी आणि इतरांना आवर्जून पाहण्यासाठी आवाहन करील अशी अपेक्षा धरूया.

- रवींद्र मालुसरे

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

संपर्क : ९३२३११७७०४ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या