जाग मराठ्या जाग रे जाग
लोकांची जनता पक्षाला तमा नाही.
लोकशाहीला धोका आहे ही कल्पनासुद्धा लोकांना सहन झाली नाही हे मात्र खरे. इंदिराजींची व्यक्तीगत महत्त्वाकांक्षा देशाची लोकशाही गुंडाळण्याची शक्यता आहे असे जाणवताच लोकांनी त्यांना सत्तेवरून खाली ओढले. जनता पक्ष नावाने जी सत्ताभिलाषी झुंड या देशात उभी झाली होती तिचे काम झाले. सत्ता जनता पक्षाच्या हातात आली पण लोकशाहीनिष्ठ लोक दयामाया न दाखविता कठोर होऊन सत्ता काढून घेतात याची तमा न बाळगता जनता पक्षातले घटक पक्ष वागू लागले. लोकशाही निष्ठेचा वरपांगी मुलामा फासलेल्या जनता नेत्यांनीच दडवून ठेवलेले आपापले व्यक्तीगत व पक्षीय स्वार्थ साधण्यासाठी एकमेकावर गुरकावण्यास सुरुवात केली.
देशातला एकमेव संघटीत कार्यक्षम राष्ट्रव्यापी काँग्रेस पक्ष पराभवाने विस्कळीत, हतबल झाला होता. पराभवानंतर एकमेंकावर चुकांचे खापर फोडण्याला नेते सज्ज होतात तो प्रकार काँग्रेसवाल्यात प्रथमच सुरू झाला होता. आपल्याला पुन्हा आपले बळ संघटीत करून उभे राहायचे आहे हे या पराभूत नेत्यांना सुचतच नव्हते. उलट सत्ता हाती आलेल्या जनता पक्षात कसे शिरावे याचाच विचार अनेक काँग्रेस नेते करू लागले होते. पराभवानंतर एकत्र येण्याला एकजुटीने राहाण्याला अधिक महत्त्व असते हे भान या मंडळीना उरलेच नव्हते.
जनता पक्षातली बंडाळी
पराभूतांची ही अवस्था होती पण विजेत्यांची देखील यापेक्षा वेगळी अवस्था नव्हती. पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडायला काँग्रेसवाले सरसावले होते तर विजयाचे श्रेय लाटण्यावरून जनता पक्षात यासारखीच झोंबाझोंबी सुरू झाली होती. सत्ता आपल्या हातात आहे आणि ती सत्ता फक्त आपल्याच पक्षाच्या हातात राखण्यासाठी जनतापक्षातले सर्व घटक पक्ष व जनताचे मित्रपक्ष धडाडत होते पण उत्तरेतल्या राज्यात विधानसभांच्या निवडणुका घेण्याचे ठरलें आणि मग तर आपले पक्षीय स्वार्थं दडपून ठेवणे सर्वांनाच कठीण झाले. जनता पक्षात अक्षरशः बंडाळी माजली. मित्रपश्न म्हणवणा-यांनी जनताला अक्षरशः कोलवून आपले स्वतंत्र मोर्चे उभारले आणि जनता पक्षाला हात चोळत बसण्याची वेळ आली.जनता पक्षाला आपले ऐक्य दुबळे आहे. याची जाणीव विधानसभा निवडणुकीने करून दिली. चीनने भारतावर आक्रमण केले त्यावेळी राष्ट्रघातक भूमिका घेणाऱ्या चीनधार्जिण्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बघता बघता त्रिपुरा व बंगाल ही राज्ये जिंकून घेतली भारतीय लोकशाहीच्या पाठींत हे दोन मार्क्सवादी विळे खुपसले गेले. जनता पक्षच या गोष्टीला जबाबदार आहे. तत्वशून्य तडजोड करून मोरारजी जगजीवन-चरसिंग एस. एम. जोशी आणि अटलबिहारी या पंचकाने भारतातला एकमेव राष्ट्रीय पक्ष पराभूत केला पण आपल्या पक्षाला समर्थं करणें मात्र त्याना शक्य झाले नाही.
राज्यांची राष्ट्र बनवून भारत तोडणार
इंदिरा गांधींची हुकुमशाही नष्ट करण्यासाठी पुढे सरसावलेले लोकशाहीवादी नेंते मार्क्सवाद्यांच्या जगजाहीर हुकुमशाही विरुद्ध आवाज काढायचा अधिकारच आज गमावून बसले आहेत. बंगाल मधून ज्योति बसू आज जनता पक्षालाच नव्हें केंद्रीय सत्तेलाच आव्हान देत आहेत. राज्यांची राष्ट्रे बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काश्मिर, पंजाब, तामीळनाडू, बंगाल, त्रिपूरा या पाच राज्यातून स्वायत्ततेची मागणी पुढे दामटली जात आहे. प्रांतिय भावनेचा भारतीय एकतेला आव्हान देणारा आवाज यापूर्वी कधीही येवढा समर्थ झालेला नव्हता. इंदिरा गांधीनी भारतीय लोकशाही जेवढी घोक्यात आणली नव्हती तेवढी आज जनता पक्षाने आणली आहे. पण जनता पक्ष ही गोष्ट दडवून ठेवून केंद्रीय सत्ता शाबूत राखू बघत आहे. मोरारजी-जॉर्ज-जगजीवन-चरणसिंग-राजनारायण-बहुगुणा-अटलबिहारी आणि पक्षाध्यक्ष चंद्रशेखर ही अष्टग्रही भारताच्या राजकीय प्रांगणात झाली आणि तिने या देशातले स्थैर्यंच नष्ट केले. आज कधी नव्हता एवढा गोंधळ देशात आहे. देशात अराजक माजू बघत होते म्हणून मी आणीबाणी आणली हा इंदिराजींचा दावा फोल ठरवण्याची धडपड एकीकडे चालला आहे. आणि दुसरीकडे देश मोठ्या वेगाने अराजकाकडे धावतो आहे.
सत्ता जिंकूनही 'जनता' पराभूत
उत्तर प्रदेश-हरयाणा-बिहार-मध्यप्रदेश या हिंदी भाषिक राज्यांत जनता पक्ष विजयी झाला आहे पण जनता पक्षाने विजय मिळवला म्हणजे निश्चित कुणी विजय मिळविला हे ठरवण्यासाठी तिथल्या जनता आमदारांत अक्षरशः रणधुमाळी माजली आहे. मुख्यमंत्री बदलले जात आहेत. मंत्र्यांना काढून टाकले जात आहे. दबाव आणून पुन्हा घेतले जात आहे. अनुयायांचे जथे गोळा करून नेत्यांवर दबाव आणून आपल्या पक्षाचे घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न जनतातला प्रत्येक घटक पक्ष करीत आहे. जनता पक्षाचे नेते एकमेकाविरुद्ध विधाने करून स्वतःचे हसे करून घेत आहे तर अनुयायी आपापल्या जुन्या पक्षांच्या रिंगणातच फिरत आहेत. जुन्या प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्यासाठी नव्या जोमाने या नव्या पक्षात जुन्याच कारवाया करत आहेत. अशा या परिस्थितीमुळे सत्ता जिंकूनही राज्यकारभार करणे जनता पक्षाला अशक्य झाले आहे. दुसरे स्वातंत्र्य आणल्याची भाषा करणारे सगळे स्वातंत्र्यवीर परस्परांतील दुष्मनीमुळे आज नोकरशहाचे गुलाम बनले आहेत.
यथा काष्ठंच काष्ठंच !
महाराष्ट्रात विधानसभेचे उमेदवार ठरवताना जनतापक्षातल्या गटांनी एकमेकाला काटशह देण्याची आणि लांड्या-लबाडया अपप्रचार करण्याची जी झुंबड उठवली होती ती लक्षात घेतल्यावर महाराष्ट्रातला जनता पक्ष ही इतर राज्यातल्या जनता पक्षासारखाच म्हणजे एकमेकांचे गळे कापू बघणाऱ्या गारद्यांच्या घोळक्यांसारखाच आहे हे सिद्ध झाले आहे. उभ्या केलेल्या प्रत्येक उमेदवारांबद्दल त्या त्या भागात दिसणारी नाराजी बघितली म्हणजे जनता पक्षातली मंडळी जनता लाटेबरोबर वाहात यथा काष्ठंच काष्ठंच न्यायाने योगायोगाने जवळ आली आहेत. त्यांच्यात वैचारिक भावनिक एकता कणमात्र नाही याची खात्री पटते. जनता पक्षात भिन्न भिन्न निष्ठांचा संघर्ष अत्यंत तीव्रतेने पेटला आहे. खेरीज सौदेबाज संधिसाधू भुरट्यांचीही या पक्षात भाऊगर्दी झाली आहे. निष्ठेवरून झुंजणाऱ्या तळमळीच्या कार्यकर्त्यांना एकमेकांचे शह काटशह देऊन हे संधिसाधू भुरटेच जनतापक्षात शिरजोर झाले आहेत. मुंबईतील जनता पक्षाचे उमेदवार कसे आहेत याबद्दल जनसंघाचे निष्ठावंत कार्यकर्त वामनराव परब यांनी जाहिरपणे जे सांगितले आहे त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होईल.
जनता कार्यकर्त्यांना गुलामीतून सोडवा
वामनराव परब म्हणतात 'जनता उमेदवारांमध्ये चारित्र्यहीन-बेजबाबदार अनेक प्रकारची दलाली करणारे आणि कसोटीच्या वेळी कातडी बचावणारे स्वार्थी संधिसाधू भरले आहेत' निष्ठावंताना लाथा आणि गद्दारांना सत्ता देण्याची सौदेबाजी करणारे नतद्रष्ट जनता नेतृत्व पक्षाचे ऐक्य ओलीस धरून चांगल्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करत आहे. पक्ष फुटू नये म्हणून हजारो जनता कार्यकर्ते गप्प बसले आहेत. त्यांचे उच्चार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य त्यांच्याच नेत्यांनी हिरावून घेतले आहे. म्हणूनच या सौदेबाज नेत्यांचे दलाल उमेदवार पराभूत करून निष्ठावंत जनता कार्यकर्त्यांना 'तिसरे स्वातंत्र्य' मिळवून देण्याचे काम मतदारांनीच करायचे आहे. जनता उमेदवारांचा पराभव करा आणि निष्ठावंत जनता कार्यकर्त्यांना सौदे बाज जनता नेत्यांच्या जोखडातून मुक्तता द्या. निरनिराळया मतदार संघात जनता नेत्यांनी उभे केलेले हे भाडोत्री उमेदवार स्थानिक जनता कार्यकर्त्याच्या नाराजीचा बोजा डोक्यावर घेऊन निवडणुका कशा जिंकणार हा प्रश्नच आहे पण केंद्रीय सत्ता हातात असल्याने जनता पक्षाचे सत्ताभिमुख स्थानिक नेते अमाप पैसा ओतून आपले हे दलाली उमेदवार विजयी करण्याची इर्षा बाळगून आहेत. मतदारांनीच या उमेदवारांचा निकाल लावायचा आहे नाराज झालेले जनता कार्यकर्ते या कामात मतदारांना निश्चितपणे सहाय्य करणार आहेत. अन्य राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही राजकारणाचा उकिरडा व्हावा आणि त्यावर या सत्ताभिलाषी गाढवांचा गोंधळ माजावा असे वाटत असेल त्यांनी खुशाल जनता पक्षाच्या उमेदवारांना मते द्यावीत. पण जनता पक्ष सुधारावा, अधिक समर्थ व्हावा, जुनी भांडणे जुन्या निष्ठा विसरून त्यांने पक्षीय ऐक्याची कास धरावी, लोकांशी इमानदारी ठेवण्याची बुद्धी जनता नेत्यांत यावी असे ज्यांना वाटत असेल त्यांनी मात्र जनता पक्षाच्या उमेदवारांचा यावेळी पराभवच करायला हवा.
जनताला मत म्हणजे कशाला मत
* जनता पक्षाच्या उमेदवाराला मत म्हणजे निष्ठावंतावर अन्याय करून संधिसाधूना उमेदवाऱ्या देण्याच्या दुष्ट प्रथेला प्रोत्साहन.
* जनताला मत म्हणजे अराजक सदृश गोंधळाची पाठराखण.
* जनताला मत म्हणजे विक्षिप्त वेड्या महमदांच्या हातात आपले भविष्य सोपवणे.
* जनताला मत म्हणजे खोट्या आशामागे धांवून वैफल्याची वाट धरणे.
* जनताला मत म्हणजे बेपर्वा लोकप्रतिनिधी आणि बेदरकार नोकरशाही यांच्या संगनमताला संमती देणे असा अनुभव निम्म्या भारताला आहे महाराष्ट्रात हे घडावे अशी तुमची इच्छा आहे का ? या निवडणुकीत सर्वप्रथम या प्रश्नाचा निकाल लावायचा आहे.
इंदिराजी सूडाने पेटल्या
या निवडणुकीत दुसरा सवाल आहे काँग्रेस पक्षाचा, लोकसभा निवडणुकीनंतर पराभूत काँग्रेस पक्षात विभाजन झाले आहे. इंदिरा गांधींना काँग्रेस पक्षावर आपलेच वर्चस्व हवे होते ते मिळवण्याच्या नादात त्यांनी पक्ष फोडला. जनता पक्षाची सत्ताभिलाषी झुंड रोखून धरण्याचे काम आपले नेतृत्व असेल तरच काँग्रेस पक्ष करू शकतो असा आव इंदिरा गांधींनी आणला आणि पक्षाच्या ऐक्यासाठी, पक्ष नेतृत्वाच्या मोठेपणासाठी ज्या यशवंतराव चव्हाणांनी स्वतःकडे व महाराष्ट्राकडेही वेळप्रसंगी कमीपणा घेतला त्या यशवंतराव चव्हाण यांनीच पक्षाचे ऐक्य धोक्यात आणले अशी आरोळी ठोकली. काँग्रेसपक्ष समर्थ करण्याची भाषा करत इंदिराजींनी काँग्रेसपक्ष फोडला. एवढेच नव्हे तर यशवंतराव चव्हाणांचे शक्तीस्थान असलेल्या महाराष्ट्रातच यशवंतरावांचा पराभव करण्यासाठी बाजारबुणगे जमवून काँग्रेस 'आय' च्या वतीने विधानसभा लढण्याचाही डाव टाकला. इंदिराजींची ही आय काँग्रेस महाराष्ट्रात सत्ता जिंकण्यासाठी निवडणुका लढवत नसून काँग्रेसचा महाराष्ट्रात पराभव करून यशवंतराव चव्हाणांना छोटे बनवण्यासाठीच हा डाव खेळत आहे. उत्तरप्रदेशाने इंदिराजींना सपशेल पराभूत केले. महाराष्ट्रात यशवंतरावांना तसेच पराभूत व्हायला लावण्यासाठी सूडाने पेटलेल्या इंदिराजी आपली उरलीसुरली प्रतिष्ठा राबवत आहेत. आधीच विकलांग झालेल्या काँग्रेसला मतभेद व्यक्ती महात्म्य दूर ठेवून समर्थ करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी इंदिराजी अधिक दुर्बल का बनवू बघत आहेत ?
अराजक माजवून सत्तेवर येण्यासाठी
या मागे फार धोकादायक कारस्थान आहे. आलेल्या परिस्थितीत्त झालेल्या चुकांबद्दल लोकांची क्षमा मागून, समर्थ असलेल्यातले आपल्याला जवळचे असतील त्यांना गोंजारून, आपल्यातल्या नाराज असलेल्यांना सांभाळून, लोकांच्या इच्छांना मान देऊन राजकारणाचा फिरलेला डाव पुन्हा कबजात आणण्याचा लांबचा पल्ला गाठण्याएवढा धीर व त्यासाठी लागणारी चिवट पण तशीच लवचिक वृत्ती इंदिराजींजवळ नाही. यशवंतराव चव्हाण अशा लांब पल्याच्या राजकारणात मुरलेले आणि हे राजकारण यशस्वी करून दाखवणारे आहेत. संयुक्त महाराष्ट्र समितीने उध्वस्त केलेला काँग्रेसचा डाव त्यांनी कसा सांवरला हे आपण जाणतो. भारतीय राजकारणाच्या पटावर पुन्हा एकदा आपली यशवंत खेळी खेळण्याची संधी यशवंतरावांना लाभली आहे. आणि इंदिराजींना नेमकी याचींच भिती वाटली. आज कॉन्ग्रेसमध्ये त्यांचे स्थान पराभूत नेत्याचे होते. यशवंतरावाकडेच काँग्रेस पक्ष आशेने बघत होता. यशवंतरावांचे राजकारण यशस्वी झाले म्हणजे इंदिराजी संपल्याच. तेव्हा डाव आपण जिंकू शकत नाही हे कळताच पट उधळून पळणाऱ्या चिडक्या पोरीसारख्या इंदिराजींनी काँग्रेस संघटनेचा पट उधळला आहे. पण यामधून इंदिराजींचा फायदा काय ? हा सवाल कुणालाही पडेल. फायद्यासाठी प्रत्येक खेळी करणाऱ्या आणि ती करतांना अपरंपार धोकाही पत्करणाऱ्या इंदिराजींनी यावेळीही अशीच धोकादायक खेळी खेळली आहे.
या दगडांपेक्षा विट मऊ
काँग्रेस आता आपल्या हातात राहाणार नाही हे इंदिराजींना कळून चुकले आहे आणि जनता पक्षाच्या गोंधळामुळे लोक जनता पक्षाच्या हातात राहाणार नाहीत हे त्यांनी जाणले आहे. अपेक्षाभंगाने चिडलेले-जनता पक्षातल्या गटबाजीने विटलेले लोक पुन्हा काँग्रेसकडे परतण्याची शक्यता आहे. यशवंतरावांच्या नेतृत्वाने काँग्रेसबद्दल लोकांचे मत निवळू लागले आहे. तेव्हा काँग्रेसकडे लोक परतण्यापूर्वीच काँग्रेस दुर्बल करायची म्हणजे लोकांना आसरा उरणार नाही. जनता पक्ष गटबाजीने ग्रासलेला आणि काँग्रेस फाटाफुटीने खचलेला अशी देशाची अवस्था झाली की इथे अभूतपूर्व गोंधळ माजेल कुणालाच राज्य करणे शक्य होणार नाही. सरकारे कोसळतील, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात उरणार नाही. नोकरशाही लोकांना पिळून काढील मग हताश झालेले लोक म्हणू लागतील 'या दगडांपेक्षा ती विट मऊ होती' स्वतःची प्रतिमा उजळण्यासाठी इतरांच्या तोंडाला सर्वनाशाची काजळी फासण्यासाठी इंदिराजी आता पुढे सरसावल्या आहेत.
निवडणूक लढवून इंदिराजींना सत्ता नकोच
पण काँग्रेस दुर्बल झाल्यावर इंदिराजी सत्तेवर कशा येणार ? अस प्रश्न तुम्हाला पडेल. त्याचे उत्तर फार भयंकर आहे पण इंदिराजींच्या कपट व्यूहाचे तेच मर्म आहे. इंदिराजींना कुठल्या पक्षाच्या नेत्या म्हणून लोकशाहीच्या कौलाने आता सत्ता मिळवायचीच नाही. (मी निवडणुकीसाठी उभीच नसल्याने सत्तेवर येण्याचा प्रश्न नाही असे त्या सांगत आहेतच) अराजक माजावे कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहू नये, सारे पक्ष गटबाजी हेवेदावे याने पोखरावे. स्थीर शासन द्यायला सारे पक्ष अपात्र ठरावेत निवडणुकांवरचा लोकांचा विश्वास उडावा आणि सेनेने ही परिस्थिती थांबवण्यासाठी हस्तक्षेप करावा अशीच इंदिराजींची चाल दिसते. भारतीय सेना दलाचे लोक सत्ताभिलाषी नाहीत हे इंदिराजीही जाणतात. भारतीय सेना देशाचा कारभार आपल्या हातात सोपविल असा इंदिराजींचा कयास दिसतो. म्हणूनच राष्ट्रव्यापी काँग्रेस तोडून लोकांना रस्त्यावर येण्याचे आवाहन इंदिराजींनी केले आहे. एक काळ संप-मोर्चे निदर्शने याविरूद्ध कडक कारवाई करणाऱ्या इंदिराजी आज त्या मार्गानेच् देशात हलकल्लोळ उठवायला निघाल्या आहेत.
या दुःस्वप्नाला तडाखा द्या
अराजक माजवून लष्करी हस्तक्षेपाद्वारा सत्ता हातात घेण्याचा हा मार्ग फार धोकादायक आहे पण तो जलदीचा मार्ग आहे. आणि धोका पत्करून जलदीने गोष्टी घडवण्याची इंदिराजींना आदत आहे. धोका पत्करून डाव खेळायचा आणि जिंकायचा हेच इंदिराजींच्या राजकारणाचे सूत्र आहे. यावेळी भारतीय लोकशाही पणाला लावून हा धोकादायक खेळ खेळायला त्या उभ्या झाल्या आहेत. यशवंत नीतिला आपली चाल करूच द्यायची नाही असे त्यांनी ठरवले आहे आणि यशवंतरावांचे मर्मस्थान फोडायला त्या झपाटल्यासारख्या महाराष्ट्रात उतरत्या आहेत. द गॉलला फ्रान्सच्या जनतेने जसे परत बोलावून सत्तेवर बसवले तसे भारतीय जनता बोलावून सन्मानान इंदिराजींना सत्तेवर बसवील असे इंदिराजींचे साजिंदे सर्वत्र सांगतच आहेत. मराठी जनतेनेच या दुःस्वप्नाला पहिला तडाखा हाणायला हवा. कारण असे काही घडले तर भारतात लोकशाही उरणार नाही आणि भारताचे ऐक्यही उरणार नाही. या देशात परस्पर पूरक पण विरोधी अशा दोन राष्ट्रवादी शक्ती वाढाव्यात पैकी सत्तेवर असलेल्या संधीसाधूंचे सोगे धरून सत्ता सांभाळण्याची जोशीगिरी थांबवून जनता पक्षाने ध्येय घोरणाबाबत निश्चिती करून आपली एकजूट पक्की करावी आणि अखिल भारतीय काँग्रेसने आपल्या या पूर्वीच्या चुका सुधारून आपला पक्ष मजबूत करावा असे मला वाटते.
सत्तेवर शिवसेनेचा अंकुश हवा
अराजक माजवण्याच्या आरोळ्या ठोकणारा आणि देशाचे वाटोळे देशाचे तरी चालेल माझे चांगले झाले पाहिजे म्हणणाऱ्या इंदिराजींच्या काँग्रेस (आय) चा मराठी जनतेने संपूर्ण पराभव केला पाहिजे. त्यामुळेच भारतीय राजकारणाला योग्य वळण लागणार आहे. महाराष्ट्रात जनता पक्ष आणि इंदिराजींच्या आय काँग्रेसचा संपूर्ण पाडाव व्हायला हवा हे मला जितके आवश्यक वाटते त्याहून अधिक आवश्यकता मला मुंबईमध्ये शिवसेनेचे उमेदवार यशस्वी होण्याची वाटते. मराठी माणसाचे हितरक्षणासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या सत्तेवर शिवसेनेचा अंकुश ठेवण्याची व्यवस्था मुंबईतल्या मतदारांनी करावी असा माझा आग्रह आहे.
मुंबईवर अजूनही वाईट नजर आहेच
शिवसेना ही मुंबईतील मराठी माणसाच्या हिताची जपणूक करणारी जाज्वल्य राष्ट्रवादी संघटना आहे. मुंबईच्या ऐश्वर्यांकडे वाकडा डोळा करून बघणाऱ्यांना सरळ करू शकणारी ही समर्थ शक्ती मुंबईत आहे म्हणूनच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार प्रभावी होऊ शकलेला नाही. पण मुंबई महाराष्ट्रात आहे ही गोष्ट आजही अनेकांना बेचैन करते. निरनिराळया राजकीय पक्षात शिरकाव करून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा बेत रचण्याचे कारस्थान हे लोक आजही करत आहेत. मुंबई हे भारताचे प्रतिक आहे असे बरबर गोड गोड बोलणा-यांच्या पोटात मुंबई ही एकट्या महाराष्ट्राची राहू नये ही गोष्टच मळमळत असते आणि ही मळमळ सरळपणे बाहेर टाकता बेत नाही म्हणून कुणी मुंबईच्या कॉस्मॉपॉलीटन संस्कृतीचे गोडवे गात आपल्या कारवाया चालवतो तर कुणी मुंबईला छोटा भारत म्हणत मुंबई धोडण्याचे बेत रचतो. मुंबईवरची मराठी माणसाची पकड कणभर ढिली झाली तरी महाराष्ट्र मुंबई गमावण्याची शक्यता डोळयाआड करून चालणार नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान यशस्वी करण्यासाठी वरवर वेगळे भासणारे पण परिणाम मात्र महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करणारे पर्याय पुढे आणले जाण्याची शक्यता आहे.
पर्याय कोणताही असेल परिणाम एकच !
जयप्रकाशजींच्या छोट्या राज्यांच्या कल्पनेचा शुभारंभ कदाचित महाराष्ट्राचे तुकडे पाडून केली जाईल. कदाचित मोठी औद्योगिक शहरे राज्यांच्या ताब्यात न ठेवण्याची टूम काढून त्याची सुरुवात मुंबई केंद्रशासित करण्यापासून होईल.कदाचित् सागरी राज्याचे खूळ पुढे दामटून गोव्याचा प्रश्न यामुळे सुटेल असे सांगणारा डबलबारी तोडगा मराठी माणसाच्या थोबाडावर हाणला जाईल.अथवा कांहीच जमले नाही तर मुंबईत अन्य भाषिकांवर अत्याचार होतात हा गरबा गाऊन अन्य भाषिकांच्या हक्काचे मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी मुंबईवर केंद्रीय हुकुमत आणली जाईल. हे सगळे कनवाळूपणाचे खाटकी तोडगे मनोमनी जपत अनेक मंडळी दबा धरून बसली आहेत. त्या सगळयांना शिवसेना हाच एकमेव अडसर वाटतो आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा कुठलाही डाव शिवसेना प्राणपणाने उधळून लावील याची खात्री या सगळ्यांना आहे. म्हणून मराठी माणसाची शिवसेना ही ताकद दुभंगावी, कमकुवत व्हावी निदान पक्षी तिला राजकीय शक्ती म्हणून कांही स्थान उरू नये असे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न मराठी माणसाने उधळून लावले पाहिजेत आणि मुंबईत शिवसेनेची ताकद आहे याची साक्ष जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा दिली पाहिजे.विधानसभा निवडणूक ही अशी एक संधी आहे. मुंबईतून शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून देऊन या संधीचा पुरेपूर फायदा मराठी माणसाने घेतला पाहिजे.
केंद्रीय सत्ता दुर्बळ प्रांतीय भावना प्रबळ
आज केन्द्रीय सत्ता दुर्बल झाली आहे. पंजाबात अकाली दलाच्या सल्ल्यानुसार केन्द्राला चालावे लागत आहे. काश्मिरात शेख अब्दुल्ला केन्द्रीय सत्तेला ताठपणे ठोकरा मारीत आहे. बंगाल आणि त्रिपुरात मार्क्सवाद्यांनी आपला तळ पक्का केला आहे. तामिळनाडूत अण्णा द्र. मु. क. मजबूत आहे. आपापल्या राज्याचे, आपापल्या समाजाचे आणि आपापल्या भाषिक गटाचे हितरक्षण करण्यासाठी ह्या राज्यांचे नेते सर्व शक्तीनिशी कोशिस करीत आहेत. गुजरातला पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे पाठबळ आहे. उत्तर प्रदेशाने तर केन्द्रीय मंत्रीमंडळावर चौफेर चढाई करून ठेवली आहे. केन्द्रात महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा कैवारी कुणी उरलेला नाही. प्रत्येक प्रश्नावर आपले घोडे पुढे दामटून केंद्रीय सत्तेकडून उकळता येईल तेवढे उकळण्याची धडपड सगळी राज्ये मोठ्या शिताफीने करीत आहेत. महाराष्ट्र मात्र पूर्वीपेक्षा आज अधिक पोरका झाला आहे. केंद्राकडून अधिक कांही उकळण्यासाठी नव्हे तर जे आपलेच आहे ते आपलेच रहावे म्हणून आपण विधानसभेत महाराष्ट्राच्या हितावर डोळयात तेल घालून लक्ष ठेवण्याची कुवत असलेली माणसे पाठवली पाहीजेत. या माणसांवर अखिल भारतीय पक्षांची मर्जी सांभाळण्याचे बंधन नसेल तेवढे अधिक बरे. कारण अखिल भारतीय पातळीवरच्या पक्षांना एका राज्यापुरते आग्रही होणे शक्य होत नाही.
मराठी माणसावर आरोपांची खैरात
स्वातंत्र्यानंतर प्रत्येक प्रांतातच आपल्या हक्कासाठी लोकांनी आंदोलने केलो त्या आंदोलनांनी राष्ट्र भंगले नाही पण मुंबईत मराठी माणसांनी आंदोलन केले की लगेच राष्ट्र भंगत असल्याची आरोळी उठते. मराठी माणसाच्या हिताचा प्रश्न आला की राष्ट्रऐक्यचा गळा काढण्याची ही पुराणी युक्ती दुसरे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही वापरली जात आहे. आता तर वेगवेगळ्या प्रांतीय शक्ती आपापले गोट मजबूत करून उभ्या आहेत त्यांच्याच खांद्यावर केन्द्राचे जनता पक्षीय सरकार बसले आहे. आपण मनात आणू तर केंन्द्रीय सरकारला खाली खेचू अशा मस्तीत या प्रांतीय शक्ती असून त्या अधिक आक्रमक व आग्रही बनल्या आहेत. या विरूद्ध महाराष्ट्राची स्थिती आहे. महाराष्ट्राचे केन्द्रीय सत्तेवर वजन नाही. इन मीन अडीच मंत्रिपदे महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहेत. आणि केंद्रीय सत्तेला विरोध करणाऱ्या पक्षाचे नेते महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण आहेत. यशवंतराव चव्हाण दुर्बल व्हावेत म्हणून सतत प्रयत्न होणार परिणामी महाराष्ट्रावर अन्याय लादले जाणार. सीमाप्रश्नाबाबत काँग्रेसच्या राजवटीने वेळकाढूपणा केला. कारण कर्नाटकाला दुखावणे त्यांना परवडणारे नव्हते. जनता पक्षही यापेक्षा काही वेगळे करू शकणार नाही. उलट महाराष्ट्राला दुखावणे आता त्यांना अधिकच सोपे झाले आहे.
काँग्रेस सीमाभागाचा सौदा करून टाकेल
काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण काँग्रेसला पुन्हा समर्थ करण्यासाठी धडपडत आहेत. अशावेळी तेही कर्नाटक काँग्रेसशी सीमा प्रश्नावरून वाद वाढवणार नाहीत, उलट त्यांना सांभाळूनच घेतील आणि या सांभाळण्याचे परिणाम सीमा भागातील मराठी लोकांना भोगावे लागतील. म्हणून सीमाभागातील मराठी बांधवांच्यासाठी लढायला तयार असलेली हुकुमी शक्ती महाराष्ट्र विधानसभेत असायला हवी. शिवसेनेशिवाय अशी दुसरी कुठलीही शक्ती मला तरी दिसत नाही. मुंबई हा महाराष्ट्राचा प्राण आहे. मराठी भाषिकांचे वेगळे राज्य न करण्याचे खरे कारण मुंबई त्यामुळे महाराष्ट्राला द्यावे लागणार हेच होते. मुंबईचे वैभव, जगाच्या नकाशावरील, मुंबईचे डोळयात सलावे असे महत्त्वपूर्ण स्थान या गोष्टी लक्षात घेऊनच त्यावेळी बनियेगिरीचे राजकारण खेळले गेले होते. द्विभाषिक करून मुंबईला जळूसारखा गुजराथ चिकटवण्याचा उपद्वद्याप याच बनियगिरीतून स्फुरला होता. मराठी माणसाने अपार नेटाने संघर्ष करून त्यावेळी मुंबई वाचवली, पण मुंबईवर डोळा ठेवणारे त्यावेळचे नेते आज त्यावेळेपेक्षा अधिक समर्थ झाले आहेत. त्यावेळी ते फक्त गुजरातचे नेते होते, आता राष्ट्र नेते आहेत. पंतप्रधान होण्याची जिद्द, तत्त्वशून्य तडजोडी करून ज्यांनी पुरी केली ते मुंबईबाबत फसलेले आपले राजकारण यशस्वी करण्याचा आता प्रयत्न करणार नाहीत असे मानायला मी तयार नाही.
मोरारजी आहेत तोवर सावधगिरी हवीच
आपले हेकट आग्रह अपरंपार विरोध असतानाही पुढे रेटण्याची रग मोरारजी देसाईंमध्ये आहे हे दारूबंदीच्या धोरणावरून स्पष्ट झाले आहे. मुंबई महाराष्ट्राच्या हातात राहू न देण्याच्या धोरणाबद्दलही असाच हट्ट हा रगेल नेता धरू शकेल. मी हा धोका दृष्टीआड करू शकत नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात एकाही गुर्जर स्त्रीच्या केसाला धक्का लागला नसताना रस्तोरस्ती स्त्रियांची अब्रू घेतली गेली असं म्हणून मोरारजींनी त्यावेळी मराठी माणसाला बदनाम केले आणि आजही त्याच नीच प्रचाराची हे पाठराखण करत आहेत हे निदान मुंबईतल्या मराठी माणसाने तरी दुर्लक्षून चालणार नाही. हा ना तो बहाणा करून महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा हट्ट मोरारजींनी धरला तर त्यांना थांबवणार कोण ? फक्त शिवसेनेतच ती ताकद आहे. म्हणूनच शिवसेनेची मजबूत फळी विधानसभेत उभी व्हायलाच पाहिजे. भोळसट विश्वासाचे राजकारण करण्यापेक्षा सावधगिरीचे राजकारण करणेच
या काळात अधिक आवश्यक आहे. मुंबईतून शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येण्यानेच मुंबई कुणाची या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावायची तरतूद करून ठेवली जाणार आहे.
जनता उमेदवारांत गुजराथी मंत्र्यांचे घातकी पित्ये
कुणाला माझे हे प्रतिपादन सापसाप करून भुई ठोकण्याचा प्रकार वाटेल पण मी म्हणतो त्याप्रमाणे मुंबईच्या राजकारणात साप सोडण्याचे प्रकार गुजरातकडून अजून चालू आहेत. हे परवा अनपेक्षितपणे बाहेर आले आहे. जनता पक्षाचेच एक कार्यकर्ते दडिया यांनी ही गोष्ट चव्हाट्यावर आणली. महाराष्ट्र विधानसभेची उमेदवार यादी घेऊन एस. एम. जोशी दिल्लीला चंद्रशेखरला भेटण्यास गेले तिथे गुजराथचे काही मंत्री जोशीबुवांची बाट बघतच बसले होते. या गुजराथच्या मंत्र्यानी आपले खास उमेदवार या यादीत घुसवले व उमेदवारांच्या यादीतल्या काही उमेदवारांना डच्चू मारला. दडिया यांच्या या निवेदनावरून गुजराथ मधील काही नेते मंडळी अजूनही मुंबईवर आपली वाकडी नजर कशी राखून आहेत हे स्पष्ट होते. महाराष्ट्र व मुंबईत आपले 'ट्रोजन हॉर्स' (घातकी पित्ये) निवडून आणून गुजराथचे मंत्री काय साधू बघत आहेत हे समजण्याएवढे मुंबईचे मराठी नागरिक बेवकूफ आहेत का ? महाराष्ट्राने ही गोष्ट क्षुल्लक मानू नये असे माझे मत आहे. मुंबईचे राजकारण पटेलांचा हात धरूनच करावे लागते. असे मानणाऱ्या जनता आणि काँग्रेस पक्षाला आपले महत्त्व पटावे म्हणून मुंबईच्या मराठी माणसाने शिवसेनेच्याच उमेदवारांना यशस्वी करायला हवे.
शिवसेनेला सत्ता नको सुरक्षा हवीशिवसेना महाराष्ट्राची सत्ता जिंकायला उभी झालेली नाही. मुंबईत मराठी माणसाचे जे सत्तेचे आहे ते राखायला ती उभी राहिली आहे. तेव्हा सत्ता कुणाचीही आणा सत्तेवर अंकुश मात्र शिवसेनेचा ठेवा असे माझे कळकळीचे आवाहन आहे. विधानसभेत शिवसेनेचे पंचवीस आमदार बसतील तर पुढची निदान पंचवीस वर्षे मुंबई महाराष्ट्रात राहिल. मुंबईच्या आसऱ्याला राहून महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली पकड ठेवण्याचा उद्योग परप्रांतिय करतात हे सिद्ध झालेले आहे. मराठी मातीशी समरस न होण्याचा, आयुष्य महाराष्ट्रात घालवून दोन वाक्क्येही मराठी बोलू न शकणाऱ्यांना मुंबईचे पहिले नागरीक बनवण्याची दिलदारी मराठी माणसाने अनेकदा दाखवली आहे.
मराठी बोलता वाचता न येणारे महाराष्ट्राचे मंत्री बनतात. मराठीचा गंधही नसलेले 'येस्त्रास्वामी-छगनभाई मगनभाई' मराठी माणसाच्या उरावर नाचत दिल्लीपर्यंत पोहचतात आणि राष्ट्र ऐक्याची प्रवचने इंग्रजीतून आम्हाला ऐकवतात. हे सगळे आपण कितीकाळ चालवून घेणार आहोत ? आजवर निदान नावापुरते तरी राष्ट्रऐक्य होते पण आता ठिकठिकाणी आपापल्या स्वार्थांसाठी प्रांतिय भावना उसळून उठल्या असतांना महाराष्ट्राचे हित जपण्यासाठी आपण निर्भेळ महाराष्ट्र निष्ठेची कदर करणार आहोत का नाही ?
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या उद्योगांवर अखेरचा मर्माघात करण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार विधानसभेत निवडून द्या.
महाराष्ट्राच्या सीमा भागाचा सौदा करून आपले पक्षीय स्वार्थ साधण्याची कुणाला हिम्मत होऊ नये म्हणून शिवसेनेचे उमेदवार विधान सभेवर निवडून द्या.
प्रांतिय भावनेच्या वाढत्या उद्रेकातून केली जाणारी राजकारण हाणून पाडून महाराष्ट्राच्या हितावर जागरूक लक्ष ठेवण्यासाठी शिवसेना उमेदवारांनाच निवडून द्या.
सत्तेचा हत्ती काबूत ठेवण्यासाठी मराठी माणसाच्या हातात अंकुश हवा आणि तो चालवणारा हिम्मतबाज हातही हवा. शिवसेनाच त्याची गरज पुरी करू शकेल.
मराठी माणसाचा आवाजच मुंबईत चालतो हे दाखवून देण्यासाठी मुंबईकरांनी शिवसेनेच्याच उमेदवारांना यशस्वी केले पाहिजे.
जाग मराठया जाग रे जाग
जागरूकपणे वागला नाहीस तर हात पोळून घेतल्यासारखंच होईल.
मुंबईकरांनो यावेळी सारे पक्ष विसरा !
आणि शिवसेनेच्या रेल्वे इंजीनावर शिक्का मारा.
जयहिंद जयमहाराष्ट्र
- अनिरुद्ध पुनर्वसु
(स्व. नारायण आठवले - ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेनेचे माजी खासदार )
दिवंगत ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार आणि प्रभंजनकार नारायण आठवले यांनी १९७८ मध्ये 'जाग मऱ्हाट्या जाग रे जाग' ही छोटी पुस्तिका लिहून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित केली होती. तेव्हा शिवसेनेचे निवडणूक चिन्ह "रेल्वे इंजिन" होते.....पुस्तिकेत व्यक्त झालेली मराठी माणूस, मुंबई, परप्रांतीय वैगरे वैगरे तेव्हाची परिस्थिती आजही तशीच आहे... विशेष म्हणजे आता "रेल्वे इंजिन" मनसेकडे आहे. पत्रकार, संपादक, लेखक, राजकीय कार्यकर्ता, स्वातंत्र्यसैनिक अशा अनेक नात्यांनी सहा दशके नारायण गजानन आठवले यांनी पत्रकारिता केली. मराठी भाषा, महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा सांस्कृतिक जागल्या म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. आठवले यांनी महाराष्ट्रावरील प्रेमापोटी आपली रसवंती लेखणी आजन्म झिजवली. तसेच, वेळ आली तेव्हा रणांगणात उतरून ते 'संयुक्त महाराष्ट्रा'साठी तीनदा तुरुंगात गेले. राजा ठकार, सागर, तळीराम सोज्ज्वळ, नारायण महाराज, नाना वांदेकर, पूर्वा नगरकर, फकीरदास फटकळ आणि सर्वांत लोकप्रिय असे अनिरुद्ध पुनर्वसू अशा कितीतरी टोपण नावांनी त्यांनी विपुल लिहिले.
संकलन : रवींद्र मालुसरे














0 टिप्पण्या