Ticker

6/recent/ticker-posts

शूरवीर बाजीप्रभू देशपांडे : मराठा दौलतीचे खांब

शूरवीर बाजीप्रभू देशपांडे : मराठा दौलतीचे खांब 

सरणार कधी रण प्रभू तरी

हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती

विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती

कसा सावरु देह परी.

--  कवी कुसुमाग्रज

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातल्या तांबड्या मातीतील रणमर्द ...शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयी ज्ञानपीठप्राप्त कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांनी या ओळी लिहिल्या आहेत. 
स्वतःच्या देहाची तटबंदी करून पावन खिंडीत झुंजणाऱ्या व ज्यांनी स्वतःचा अंत पाहिला, पण स्वराज्याचा उदय रोखू दिला नाही असे स्वराज्याच्या रक्षणासाठी शौर्याची पराकाष्ठा गाठणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा वेध आज मी "मराठा दौलतीचे खांब" या स्तंभात करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
जिवापेक्षा महाराजांची पर्वा करणारे बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले.
"तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला" हे बाजी प्रभु देशपांडे ह्यांचं वाक्य मराठा इतिहासात आजीवन अजरामर राहिले आहे. 
बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातील सिंध गावाची फार मोठी आसामी.पिढीजात देशपांडे (देशकुलकर्णी) होते.  हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे ते पिढीजात दिवाण होते.  घरची परंपरा कुस्तीची. गावात बाजींचा चारचौकी देशपांडे वाडा होता, त्या वाड्यात समृध्द घोड्यांची पागा होती. पागेच्या मागच्या बाजूला बाजींनी तालीम बांधली होती. शिवाजी राजांनी रायरी सर करून फितूर चंद्रराव मोरे यांना ठार केले त्यावेळी त्यांना बाजीप्रभू  देशपांडे हे सोनं सापडलं, पण बाजी मनोमनी म्हणत असतं कि राजे हे सोनं आधी मातीमोल होतं. तुमचा स्पर्श झाला आणि जीवाचं सोने झाले. राजाना तर रायरी जिंकल्यापेक्षा  'बाजी' मिळाल्याचा आनंद अधिक झाला होता. बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व तात्काळ आपलेसे करून घेतले होते. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा महाराजांना समर्पिली होती. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.  
बाजी स्वतः पहाटे ३ वा. उठत असत. बाजींच्या पदरी शूर धिप्पाड पैलवानांची फौज होती. सर्वजण कसलेले पैलवान होते. बाजींचे थोरले बंधू फुलाजी हे तर कुस्तीचे अतिशय व्यसनी. ३ तास लढत झाल्याशिवाय त्यांचे मनच भरत नसे..!! तर हे देशपांडे कुटुंब कुस्तीचे अतिशय नादिष्ट्य ..!! बाजी ५ हजार जोराचा ठेका एका दमात मारत असत ,तद्नंतर २ तास हत्यारांचा सराव. मग अंघोळ पाणी .... न्याहारीला२ शेर तुपातील शिरा  यायचा त्याबरोबर ५ शेर दुध एवढा प्रचंड व्यायाम, आणि खुराक मगच बाजी शिवरायांना भेटायला राजगडी रवाना होत असत...! मग काय... बाजींचे काम काय लहान सहान होते ? अहो,त्यांच्या एका हाकेत बारा मावळ भगव्याखाली जमा होत होता... माणसासारखी माणसच काय पण हत्ती घोडे सुध्दा त्याना वचकून असत..! 
सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला होता. ६ महिने सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकलेल्या छत्रपती शिवाजी राजांनी  वेढ्यातून सुटण्यासाठी योजना आखली. 
पुढील आठवड्यात : कान्होजी जेधे
शिवराजांनी पन्हाळा सोडण्याचे ठरविले.  बरोबर ६०० हत्यारबंद पायदळ घेऊन बाजीप्रभूंसह महाराज हेरांनी योजलेल्या मार्गाने पन्हाळयावरून निसटले. १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा, गुरूवार, रात्रीची सुमारे १० ची वेळ. विजा चमकत होत्या, घनघोर पाऊस कोसळत होता आणि एवढ्यात सिद्दीच्या एका पहारेकऱ्याने हे पाहिले आणि तो ओरडला, 'दगा दगा'... ही चाहूल लागताच राजांनी लगोलग दोन पालख्या केल्या. एका पालखीत ते स्वत: तर दुसऱ्या पालखीत हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारे, त्यांच्यासारखाच पेहराव केलेला प्रति शिवाजी (शिवा काशीद) हे बसले. महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले. हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्दी जौहरकडे पोहोचविली. जौहरने मसूदला पाठलाग करावयास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले. पण ते खरे शिवाजी नाहीत हे कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेल्या शिवा काशीदचा शिरच्छेद करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवराजासाठी शिवा काशीदने समर्पण केले. 
महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. सोबत रायाजी बांदल, फुलाजी प्रभू, आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते. विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका बाजीच्या लक्षात आल्यावर वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजीला मागे सोडून महाराज पुढे जाण्यास तयार नव्हते, परंतु बाजीने महाराजांना शपथ घातली. आणि म्हणाला, महाराज लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे...!!! तुम्ही पुढे व्हा...गडावर पोहोचलात की तोफांचे बार काढा तोपर्यंत मी शत्रूला अडवून ठेवतो. पुढे ८ तास चिखल वाटेने ,भर पावसात धावत येवून आणि  बाजी व फुलाजी हे दोघे बंधू आणि संभाजी जाधव गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. सिद्दी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशागडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते.तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. "जो पर्यंत तोफेचा आवाज, माझ्या कानाला ऐकू येत नाही, तोपर्यंत यमाला सांगा मला मरायला वेळ नाही!" या त्वेशाने बाजी झुंजत होता. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र प्रकटलेला होता. 


हजार घाव झेलूनही खिंडीत"बाजी" बाकी आहे।
जोवर येत नाहीत तोफांचे आवाज तोवर लढण्याचा हट्ट  बाकी आहे।।
तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. 
" पावन खिंडीत पाऊल रोवून 
 शरीर पिंजे तो केले रण...  "
देवांनाही हेवा वाटावा असा इतिहास इथे बाजीने घडवला, याच पराक्रमामुळे घोडखिंडीचे नाव त्यांच्या रक्ताने पावन झाल्यामुळे 'पावनखिंड' अस नाव देण्यात आलं.
तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्युला
लढण्याचा इतिहास आमुचा,
हारणे आमुच्या रक्तात नाही,
जोवर मैदानात उभा मी,
जिंकणे नियतीला शक्य नाही। 
घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाची शर्थ मानला जातो. 
शिवछत्रपती जर खरे ओळखायचे असतील तर या नरवीरांच्या बलिदानातून ओळखावे. आपल्या धन्यासाठी कोण तोफेचे आवाज होईपर्यंत प्राण सोडत नाही, तर कोणी पोटच्या पोराचे लग्न टाकून गड सर करायला जातो ...कोण मृत्युच्या पालखीत हसत हसत बसतो ..तर कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या अंथरुणात झोपतो..!
यांचे हे असामान्य बलिदान ही शिवराय करत असलेल्या महान कार्याची खरीखुरी पावतीच होय..!


रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 
९३२३११७७०४ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या