दुर्गमहर्षी आप्पा परब यांना "पेशवा मोरोपंत पिंगळे जीवनगौरव सन्मान पुरस्कार" प्रदान
छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक स्तरावर गौरव अभिमानास्पद - डॉ. तेजस गर्गे
गडावरील माची स्थापत्य म्हणजे सुरक्षितता आणि युद्धकौशल्य मुत्सद्दीनीती
मुंबई (रवींद्र मालुसरे ) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचे प्रतीक असलेले १२ शिवकालीन किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये (World Heritage Sites) समाविष्ट करण्यात आले आहेत, 'अद्वितीय वैश्विक मूल्य' म्हणून जागतिक स्तरावर गौरव झाला आहे. हे गड-किल्ले म्हणजे शौर्य, सामर्थ्य, संस्कृतीचे आणि स्वराज्याच्या दृढ इच्छाशक्तीचे मूर्तिमंत रूप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने उभारलेली ही दुर्गरचना यापुढे जगभर ओळखली जाणार आणि महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारी ठरणार आहे. हे केवळ किल्ले नाहीत तर स्वराज्याच्या प्रेरणेची अमर ठिकाणं आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विशेष म्हणजे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वत: युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेत तांत्रिक सादरीकरण केले होते. त्यांच्यासह अनेक इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींचा यांमध्ये हातभार लागला होता. छत्रपती शिवाजी महाराज वीर होतेच. पण उत्कृष्ट सेनानायक, श्रेष्ठ मुत्सद्दी, थोर राजनीतिज्ञ, धुरंधर पराक्रमी आणि आदर्श राज्यकर्तेही होते. रयतेच्या स्वराज्याची निर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांवरील माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. असे गौरवोद्गार पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक डॉ तेजस गर्गे तेजस गर्गे यांनी काढले.
श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील धुरू हॉल मध्ये शिवोत्सव - २०२६ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते 'जागतिक वारसा स्थळे १२ किल्ले जबाबदारी : सरकारची आणि आपली' या विषयावर आपला विचार मांडत होते. ते पुढे असेही म्हणाले की, एकदा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूचं संवर्धन, नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात ते आता आपल्याला पाळावे लागतील, पर्यटकांना गडावर रात्री मुक्काम बंदी करावी लागेल. गड-किल्ल्यांवरील पर्यटकांची वाढलेली गर्दी, उपद्रवी पर्यटकांकडून पायवाटांपासून गडाच्या माथ्यापर्यंत ठिकठिकाणी फेकला जाणारा कचरा, बेकायदा मद्यपान, बुरजांवर, तटबंदीवर उभे राहून 'शौर्य' दाखविण्याच्या प्रयत्नांत पर्यटकांकडून होणारे बांधकामाचे नुकसान अशा समस्यांवर प्रशासनाला यापुढे आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे.
पण त्यामुळे किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील. आता राज्य सरकारकडून या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल. महाराजांनी उभारलेले किल्ले आणि महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी याचं नीट जतन होईल आणि तिथे पर्यटनासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास संकलक लेखक दुर्गमहर्षी आप्पा परब, ACP नायब सुभेदार सोपान जाधव (निवृत्त), मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुप्रसिद्ध शंभू व्याख्याते अक्षय चंदेल यांचे मला समजलेले छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान झाले. दुर्गमहर्षी आप्पा परब यांना "पेशवा मोरोपंत पिंगळे जीवनगौरव सन्मान पुरस्कार" प्रदान करून गौरविण्यात आले. शिवराजाभिषेक समितीचे सचिव समीर वारेकर यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनलचे प्रमुख डॉ.हेमंतराजे गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याचे आणि उद्दिष्ट याचे प्रास्ताविक भाषणात सांगितले. स्वराज्याची प्रेरणा ते स्वराज्याची स्थापना असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे मी वाचन केल्यानंतर जगाच्या इतिहासात असा मोठा राजा होऊन गेला नाही असे माझे मत झाले. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय आहेत, आपल्या महान कार्याने आणि लोककल्याणकारी धोरणांनी त्यांना जगाच्या इतिहासात अढळ स्थान मिळाले आहे. त्यांचा इतिहास भारतातील इतर राज्यातील भाषांतून पोहोचावा याहेतूने मी शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट हे पुस्तक लिहिले. त्याचे उदंड स्वागत झाले आता ते मराठी इंग्रजीसह इतर ६ भाषांमध्ये उपलब्ध आहे. यानंतर छत्रपतींच्या इतिहासाचे अनेक पैलू इंग्रजीमधून देशापरदेशात पोहोचावा यासाठी मी श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल या संस्थेची स्थापना केली. यावर्षी माझ्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिवोत्सव उपक्रमांतर्गत वेगवेगळे चार कार्यक्रम होणार आहेत.
धोक्यात सापडलेल्या प्रत्येक जीवाला आशेचा हात देणे ही मानवतेची सर्वोच्च सेवा महाराष्ट्रातील रेस्क्यू संस्था करीत असतात. श्री. राहुल मेश्राम यांच्या सहकार्याने ‘रेस्क्यू’ क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या शिवदुर्ग मित्र (लोणावळा),डेला ऍडव्हेंचर (लोणावळा ), यशवंती हायकर्स (खोपोली ), निसर्ग मित्र (पनवेल ), नासिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूअर्स असोसिएशन (NCRA) या पाच रेस्क्यू संस्थांचा पुरस्कार आणि आर्थिक योगदान देत विशेष सत्कार करण्यात आला.
श्री. पंकज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबावनी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अंतिम फेरीत पोहोचलेले स्पर्धक ज्ञानी ईश्वरी अनमोल जाधव,स्नेहल शिंदे, तावी अक्षता विक्रम गायकवाड, हितेश पंढरीनाथ पिंपळे, तुष्यंती पूनम अविनाश चुलभरे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धकांनी यावेळी आपल्या ओजस्वी सादरीकरणातून भक्ती, शौर्य आणि स्वराज्यनिष्ठा यांचा सुंदर संगम शिवबावनी सादर करून प्रकट केला. यातून त्यांच्यातली शब्दशुद्धता, तालबद्धता आणि भावार्थ यांचा उत्तम समतोल उपस्थित प्रेक्षकांना ऐकता आला.
श्री. रंजन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या १२ किल्ल्यांच्या छायाचित्रांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुधीर नाझरे, कल्पेश गणेश पाटील याना प्रथम क्रमांक विभागून तर द्वितीय क्रमांक विभागून अमोल वसंत घाग, चंद्रकांत निवृत्ती काटकर, तृतीय क्रमांक विभागून महेंद्र विश्राम गोवेकर, डॉ सौरव मनीषा मनोहर साळवे त्याचप्रमाणे उल्लेखनीय म्हणून प्रथमेश प्रकाश अवसरे, अभय आराध्ये, मिलिंद वसंत आग्रे, ठाकूरदास रामा परदेशी, दिपक दत्तात्रय बाविस्कर, पृथ्वीराज चंद्रशेखर शिंदे यांना पारितोषिके देण्यात आली.
श्री. अमित घाट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मोडी लिपी निबंध स्पर्धेत डॉ. राहुल शिवप्रसाद सारडा (प्रथम ), कु. संपदा स्मिता दिगंबर राणे (द्वितीय ), सौ. शामल शिरीष देशपांडे (तृतीय ) यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी प्रचंड संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवा संस्थेचे श्री गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.









0 टिप्पण्या