पर्यटनाला चालना देण्यासाठी महाड-पोलादपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांचा विकास करणार - ना. भरतशेठ गोगावले
पर्यटनाला चालना देण्यासाठी महाड-पोलादपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांचा विकास करणार
- ना. भरतशेठ गोगावले
पोलादपूर (रवींद्र मालुसरे) - रायगड जिल्ह्याला विशेषतः महाड आणि पोलादपूर तालुक्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्नतेचा वारसा लाभला आहे. प्रागैतिहासिक काळापासून मानवी संस्कृतीची जडण-घडण आपल्या जिल्ह्यात होत असल्याचे ठोस पुरावेदेखील अलिबाग, महाड सारख्या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात तर या भूमीत जन्मलेल्या शूरवीर मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्याच्या स्थापनेसाठी मोलाची कामगिरी केली. नरवीर तान्हाजी मालुसरे, नरवीर सूर्याजी मालुसरे, नरवीर मुरारबाजी देशपांडे, परमानंदबाबा, रायगड किल्ला, कांगोरी किल्ला, चंद्रगड किल्ला वैगरे इतिहासाच्या अनेक ऐत्याहासिक वारसाच्या खुणा अस्तित्वात आहेत. या वारशाची महती जगाला पटवून देण्यासाठी पर्यटनासारखा दुसरा पर्याय नाही. पर्यटन आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, भौगोलिक स्थळांचा अतिशय नजीकचा संबंध येतो. कधीकाळी इतिहासाची सुवर्णपाने असलेली ही स्थळे जपण्याचा त्यांचे संवर्धन करण्याचा आटोकाट प्रयत्न मी करणार आहे. मला चार वेळा आमदार केलेत आणि आता मी मंत्रिपदावर तुमच्याच आशीर्वादाने विराजमान आहे. तुमच्याच नाईक मराठा समाजातल्या माणसाला राज्याचे मंत्रिपद मिळाले आहे असे भावपूर्ण उदगार महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी काढले. पोलादपूर तालुक्यातील नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या साखर गावात ग्रामदैवत आई नवलाई-भैरी यांची पुनः प्राणप्रतिष्ठा ( जीर्णोद्धार ) आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी कार्यक्रमात गोगावले बोलत होते. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
गोगावले पुढे असेही म्हणाले की, पर्यटनाच्या माध्यमातून या स्थळांचा विकास होत आहे. या स्थळांच्या संवर्धनासाठी नियोजन व कृती आराखडा आखून या कामाकडे मी अधिक लक्ष देणार आहे कारण ही स्थळे रोजगारवृद्धी, अर्थकारणास चालना देणारी केंद्र ठरणार आहेत. साखर गावातील सुभेदार सूर्याजी मालुसरे यांची स्मृती समाधी ऐत्याहासिदृष्टया सुशोभित करण्यासाठी मी निधी उपलब्ध करून दिला आहे तो कमी पडणार नाही याची मी काळजी घेईल.आई नवलाई ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संतोष महादेवराव मालुसरे यांनी प्रास्ताविक करताना सुरुवातीला मुंबई बडोदे आणि गावातील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. अनेक शतकापूर्वीचे हे मंदिर आमच्या पुर्वजांनी १५० वर्षांपूर्वी नव्याने बांधले होते, आता त्याचे पुनरनिर्माण करून साखर गावातील नागरिकांनी स्वतःच्या आणि माहेरवासिनींच्या आर्थिक बळावर उच्च प्रतीचा दगड वापरून स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आणि आकर्षक सजावट असलेले मंदिर उभे केले आहे. आई नवलाई आणि एकूण ९ मूर्ती नवीन घडवल्या आहेत.आमच्यासाठी आमची गावपांढर हे एक जागृत देवस्थान असून आलेली संकटे आम्ही आईला सांगितली तर ती दूर होतात. नवस केल्यावर मनासारखं चांगले घडून आल्याचा अंतर्यामी विश्वास वाटतो, तसा प्रत्ययही येतो. आमचे पूर्वज सुभेदार सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीच्या सुशोभीकरणासाठी मंत्रीमहोदय गोगावले यांनी फंड उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचेही त्यांनी मनापासून आभार मानले.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी आपल्या भाषणात साखर गावाचे पोलादपूर तालुक्यातील मोठेपण आणि महत्व सांगताना मालुसरे, चोरगे यांच्यासह साखर गावातील कर्तृत्ववान परंपरेच्या इतिहासाचा आढावा घेतला. मी याच देवळात बसून दहावीपर्यंत अभ्यास केला आहे. राजकारणात आणि सामाजिक सामाजिक कार्यात नेतृत्व करू शकलो याचे कारण माझी या देवतेवर मनापासून श्रद्धा आहे यामुळेच हे घडले असावे. तर तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष पवार आपल्या भाषणात म्हणाले की, अनेक पिढ्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या साखर ग्रामस्थांनी आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला साजेल आणि तालुक्यात आजपर्यंत नाही असे सुंदर मंदिर उभे केले आहे. एकीचे बळ काय असते याची जाणीव जशी साखर गावाला झाली आहे तशीच ही कृती समाजासमोर आदर्श ठरणार आहे. शिवसेना पोलादपूर तालुकाप्रमुख निलेश अहिरे म्हणाले की, माझ्या तीन पिढ्यांची या देवतेवर श्रद्धा आहे. या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही. याप्रसंगी तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव, भाजपा तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा केसरकर, सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांतदादा मोरे यांचीही भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर लक्ष्मण मोरे (विभाग प्रमुख शिंदे गट,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती), मनसे उपाध्यक्ष आणि कामगारसेना चिटणीस राज पार्टे,ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेशदादा कोळसकर, शेकाप पोलादपूरचे ज्येष्ठ नेते निवृत्ती उतेकर, उद्योजक शिवरामशेठ केसरकर, शेकापचे सरचिटणीस वैभव चांदे, महाडचे संपर्क प्रमुख प्रमोदजी गोगावले, तुकारामदादा उतेकर, भगवानदादा अहिरे, प्रगतशील शेतकरी श्री. रामचंद्रशेठ कदम, उद्योजक चंद्रकांत कोंढाळकर, उद्योजक श्री. संजय उतेकर, समाजसेवक सर्वश्री बापूराव बांदल, अनिल दळवी, भिवाशेठ उतेकर, नारायण साने, ज्ञानेश्वर सकपाळ, आनंदबुवा झाडाणे, अंकुश कुमठेकर उपस्थित होते.
गावातील वास्तूरचनाकर संतोष शां. सुतार यांनी कल्पकतेतून उभारलेल्या मंदिराचे उदघाटन वेदशास्त्र संपन्न गुरुजी-संजय कुलकर्णी यांच्या मंत्रोच्चाराने गावातील ज्येष्ठ नागरिक धर्मभूषण आणि रायगड भूषण गुरुवर्य ह भ प श्री लक्ष्मण महाराज मालुसरे, श्री जयराम रामचंद्र बांद्रे, श्री बाबू तुकाराम चोरगे, श्री मारुती रामजी तांदळेकर, श्री गंगाराम सुभाना कदम, श्री विष्णू सखाराम सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. तर मुख्यदेवता आई नवलाई आणि जोगेश्वरी, वाघजाई, भैरी, बापदेव, महादेव, जननी, सालूबाई, कालभैरी, शंकर या मूर्तीची स्वानंद सुखनिवासी प. पू. गुरुवर्य अरविंद नाथ महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहन परमपूज्य योगीराज ब्रह्मचारी ह. भ. प. एकनाथ महाराज लाखे यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष विनायकदादा मालुसरे, प्रमुख मार्गदर्शक श्री ज्ञानोबा विठोबाराव मालुसरे आणि श्री पांडुरंग (शेठ) चिमाजी चोरगे यांच्या नेतृत्वाखाली भरत चिमाजी चोरगे (उपाध्यक्ष), बाजीराव विठोबा मालुसरे (सचिव), दिनकर धोंडू चोरगे (सह सचिव), सखाराम रामचंद्र बांद्रे (खजिनदार), दीपेश परशुराम मालुसरे (कार्याध्यक्ष), हनवती भिवा चोरगे (उपाध्यक्ष), दगडू शंकर मालुसरे (सचिव), संतोष शांताराम सुतार (खजिनदार) कमिटी सदस्य - लहू सखाराम मालुसरे, गोविंद धों चोरगे, अशोक रामचंद्र चोरगे, नारायण शंकर तांदळेकर, जयराम विठोबा चोरगे, धोंडू लक्ष्मण घावरे, गणेश तुकाराम सुतार, भगवान किसन पवार, नथुराम कोंडीराम सकपाळ, विजय मुकणे, दशरथ काशीराम चोरगे, महादेव दाजी कदम, राजेश लक्ष्मण तांदळेकर, सचिन चोरगे, नारायण हनवती चोरगे यांनी विशेष मेहनत घेतली. तीन दिवस हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते, त्यांचा मानपान व स्वागत कार्यक्रम समन्वय समितीचे प्रमुख मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष श्री रवींद्र तुकाराम मालुसरे, दगडू महादेव चोरगे, श्री विष्णू धों चोरगे, श्री विश्वनाथ हनवती मालुसरे,श्री कोंडीराम हरी सुतार यांनी केले.
नवीन मूर्तीचे गावात आगमन झाल्यानंतर टाळ-मृदंग, सनई-चौघडा, लेझीम, ढोल ताशा यांच्या गजरात शोभायात्रा काढून गाव प्रदक्षिणा करण्यात आली. दुसऱ्या दिवशी प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्यहवाचन, मुख्य देवता स्थापना, नवग्रह स्थापना, वास्तूप्रसाद होमहवन, मूर्तीचे अग्नुतारण, जलाधिवास, धान्याधिवास प्रधान हवन, मूर्तीचा पिंडिकान्यास, होमहवन करण्यात आले.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हलगीवादक राजू आवळे पथक यांचे हलगी वादनाने कार्यक्रमाला बहार आली. महिलांसाठी पैठणीचा खेळ, साखर गावातील वारकऱ्यांचे सामुदायिक भजन, गावातील महिलांचा हरिपाठ आणि आळंदी येथील सुप्रसिद्ध निरुपणकार ह. भ. प.एकनाथ लाखे महाराज यांचे कीर्तन असे भरगच्च गर्दीत कार्यक्रम झाले. तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे गुरुवर्य ह. भ. प. लक्ष्मणमहाराज मालुसरे, गणपत महाराज मोराणकर, भजनानंदी गायनाचार्य हरिभाऊ रिंगे महाराज यांचे श्रीगुरुपूजनही यावेळी करण्यात आले.
महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जागरण गोधळ हा एक विधी आहे ज्यामध्ये विशिष्ट इच्छा पूर्ण झाल्यानंतर रात्रभर देवतेचे स्मरण करीत जागरण केले जाते. रात्रौ १२ नंतर जेजुरी येथील सुप्रसिद्ध गोंधळी भाऊ पाचंगे यांनी जागरण गोंधळ घातला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, स्वप्नील चोरगे, पत्रकार दशरथ चोरगे, मिलिंद मालुसरे यांनी केले.
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४
फारच सुंदर मंदीर बांधले आहे. मन प्रसन्न झालं. माझी विनंती आहे की, या मंदिरा भोवती भरपूर झाडे लावली तर खूप सुंदर वातावरण आणि परिसर होईल. येणारा भाविक सुखावेल .
उत्तर द्याहटवा